आदरणीय आणि आत्मीय
आपल्या समाजाची सभ्यता, संस्कृती, परंपरा आणि वारसा या संबंधी काही चिंतन गेले दोन-तीन महिने मांडत आहे. सर्व भौतिक आणि संस्थात्मक रचनांमधून समाजाच्या सभ्यतेची पातळी निश्चित होते. ‘इंडियात गुणांची कदर नाही’, ‘इंडियात प्रमाणिकपणे काम करणाऱ्याला काही स्कोप नाही’, असे म्हणत विदेशाची वाट धरणारे काही जण असतात. त्यांच्या मनातल्या उत्तमतेच्या स्वप्नांशी जुळणारे वास्तव त्यांना अनुभवायला येत नाही. म्हणून असे लोक ते सभ्येतेचे वास्तव माझे नाहीच, असे म्हणतात.
आपले सामूहिक आदर्श काय होते व आजही अनेक जण कोणते आदर्श मानतात याची गंधवार्ता भारतात राहून नाही असेही अनेक जण असतात. यज्ञ, दान, तप, स्वधर्म, श्रेयस, निःश्रेयस, उपासना, धर्मसंस्थापना, योग, अभ्युदय, त्याग, विद्या, अविद्या, पुरुषार्थ, आश्रम अशा संकल्पनांबद्दल गाढ अज्ञान असण्यात आधुनिकता आहे असे त्यांना वाटते. त्यांना भारतातील संस्कृती आपली वाटत नाही. प्राचीन ऋषी, मुनी, चक्रवर्ती, संत, आचार्य, प्रवर्तक, प्रचारक, शास्त्रज्ञ, वीर, तत्त्वज्ञ यांची नावेही माहीत नाहीत असे अनेक जण असतात. त्यांना आपली परंपरा माहीत नसते.
आपल्या आधीच्या पिढ्यांची ध्येये, स्वप्ने, उद्दिष्टे आपली आहेत असे मानणे म्हणजे त्यांचा वारसा आपला मानणे, आज अनेकांना ‘माझे करीअर गोल्स’ आणि ‘माझे करीअर ऑप्शन्स’ यांचीच काळजी लागलेली असते. ते आपल्या सांस्कृतिक वारशाची फार काळजी करत नाहीत.
अशा अनेक गोष्टींची आपल्याला माहितीच नसते. माहिती असेल तर त्या आदरणीय आहेत किंवा नाही याचा प्रश्न येतो. आदरणीय असो वा नसो ते ‘माझे’, ‘आमचे’, ‘आपले’ आहे असे वाटले तर ते चालू ठेवणे, वाढवणे, बदलणे, वगळणे ही आपली जबाबदारी आहे हे लक्षात येते. ‘माझे’ वाटणे म्हणजेच आत्मीयता वाटणे. आपल्या समाजाची सभ्यता, संस्कृती, परंपरा आणि वारसा याबद्दल अशी आत्मीयता वाटू लागली तर एक स्वतंत्र व्यक्ती राष्ट्राचा घटकही बनते.
नव्या परंपरा आणि विस्तारित वारसा
राष्ट्राचा घटक बनणे म्हणजे समाजाच्या प्रवाहाबरोबर राहणे. मृत घटक प्रवाहाबरोबर नुसते वाहत जातात. जिवंत घटक प्रवाहाबरोबर जाता जाता प्रवाहाला दिशा आणि गती देण्याचेही काम करतात. समाज-प्रवाहाबरोबर आहोत म्हणूनच त्या समाजाचे आनंदाचे आणि दुःखाचे, अभिमानाचे आणि अपमानाचे प्रसंगही त्यांना आपले वाटतात. समाजातील कर्तृत्ववान आणि प्रतिभावान व्यक्तींची दखल आपण किती घेतो यावरून आपण समाजाशी किती एकरूप झालेलो आहोत हे लक्षात येते.
एकोणिसाव्या शतकामध्ये ब्रिटिशांचे राज्य आल्यावर त्यांच्या विरोधात व त्यांच्या राज्य-पद्धतीमुळे आपल्या समाजातले अनेक जणांचे गुण प्रकट होण्याची संधी मिळाली. नव्या परंपरा सुरू झाल्या व जुन्या वारशात नव्या वारशाची भर पडली. स्वातंत्र्ययोद्धे, समाजसुधारक, कर्तृत्ववान लोकांची नावे घेताना उमाजी नाईक, लहूजी वस्ताद साळवे, जोतिबा फुले, रखमाबाई शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, भाऊराव पाटील, नाना पाटील, दादासाहेब गायकवाड, आण्णाभाऊ साठे अशी अनेक नावे ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे पुढे आली. महाराष्ट्राबाहेर डोकावले तर बिरसा मुंडा, नारायण गुरू अशी नावे दिसतात. दयानंद, विवेकानंद, अरविंद किंवा वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर किंवा टिळक, गांधी, नेताजी या परंपरांची आठवण ठेवताना त्यात या नव्या परंपरांची भर पडली आहे याचे भान ठेवले पाहिजे. या नव्या परंपरांचा अभिमान बाळगणाऱ्याना जुन्या परंपरांबद्दल आत्मीयता वाटली पाहिजे.
निवडीचे व्यापक क्षेत्र
स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे की शिक्षणाचा प्रसार समाजात जेवढा वाढेल