सेवा करणे आणि पुरविणे
काही दिवसांपूर्वी एका बी.एड्. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट झाली. ते प्रबोधिनीचे हितचिंतक आहेत. ओळख झाल्या झाल्याच त्यांनी प्रश्न विचारला, “प्रबोधिनीची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याची काही योजना आहे का ?” मी उत्तर दिले, “नाइलाज झाला तर योजना बनविण्याचा विचार करू.” त्यांनी त्यावर अतिशय आस्थेने मला समजावले, “तुम्ही नकारात्मक विचार करू नका. नाइलाज झाला तर असे का म्हणता ? आता समाजाची ती गरज आहे. तुमच्या सारख्यांनी नाही सुरू केली तर व्यापारी वृत्तीचे लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करतील.” मी म्हटले, “नाइलाज झाला तर योजना करण्याचा विचार करू ही सकारात्मकच भूमिका आहे. इंग्रजीशी आमचे भांडण नाही. राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षण देण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणे एवढा एकच मार्ग आता शिल्लक आहे असे वाटले तर तसे अवश्य करू.” त्यांनी पुन्हा एकदा म्हणून पाहिले, “समाजातला महत्त्वाकांक्षी व क्षमतावान गट सध्या इंग्रजी माध्यमाची मागणी करतो आहे. तुम्हीच त्यांना उत्तम शिक्षण देऊ शकाल.” मी मुद्दा न सोडता सांगितले, “राष्ट्रीय वृत्ती निर्माण करण्यासाठी भारतीय भाषांमधूनच व्यवहार करणे जास्त सोयीचे आहे.” आपल्या उद्दिष्टांना पोषक पद्धतीने काम करण्याने आपण समाजाची सेवा करतो. सेवा करता येत असेल तर त्याला बाधा न येता सेवा पुरवायला अडचण नाही. पण इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सेवा पुरविणे म्हणजे समाजाची सेवा करणे नाही.
प्रज्ञावंतांपासून प्रारंभ आणि प्रभावशालींवर प्रभाव
‘We start with the gifted but we do not stop with them. We want to carry our message to the last person in the social ladder,’ असे फार पूर्वी आपण छापून ठेवले आहे. ‘प्रज्ञावतापासूनच प्रारंभ का ?’ याला उत्तर म्हणून ‘उच्च क्षमतावाल्यांना प्रेरित करता आले तर ते इतर अनेकांमध्ये परिवर्तन करू शकतील’, असा युक्तिवाद मांडला होता. युक्तिवाद म्हणून तो आजही खरा आहे. पण उच्चक्षमतावाल्यांना प्रेरित करताना, प्रेरक प्रयत्नांमधला किती भाग ते स्वार्थ साधनेला पूरक म्हणून ग्रहण करतील व किती भाग समाज-घडणीसाठी आवश्यक निःस्वार्थता वाढविणारा म्हणून ग्रहण करतील हे आधी सांगणे शक्य नसते. निःस्वार्थ कार्यक्षमता वाढविणारा भाग अधिक प्रमाणात ग्रहण केला जावा यासाठी शास्त्रशुद्ध प्रयत्न करत राहणे हा प्रबोधिनीचा शैक्षणिक प्रयोग चालूच आहे.
आपल्या सुरुवातीच्या कार्यपद्धतीचे वर्णन ‘प्रभावशालींवर प्रभाव टाकणे’ या पद्धतीने केले होते त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. आपणच कधीतरी वापरलेल्या शब्दांची आठवण देऊन कोणी ‘समाजातील महत्त्वाकांक्षी, प्रभावशाली किंवा कार्यक्षम गटाला आज इंग्रजी माध्यमाची शाळा हवी आहे म्हणून तुम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा काढा’ असे सांगायला लागला तर आपण त्याला सावध प्रतिसाद द्यायला पाहिजे.
प्रबोधिनीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे जाताना We start with the gifted च्या बरोबरीने We want to reach the last person in the social ladder याकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. समाजातील प्रभावशाली व्यक्ती इतर अनेकांवर समाजहिताचा प्रभाव नंतर टाकतील, यावर केवळ विसंबून राहणे बरोबर नाही. तर ‘प्रभावशालींवर प्रभाव टाकण्यासाठी’ च्या बरोबरीने ‘आवाज उमटत नसलेल्यांचा आवाज ऐकता येण्यासाठी’ आपले प्रयत्न वाढवले पाहिजेत. कारण समाजातल्या काही प्रकारच्या प्रभावशाली गटांच्या परिवर्तनासाठी नव्हे तर कायमच्या शोषणाखाली सापडलेल्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे.
‘व्यक्त मागणीप्रमाणे पुरवठा’ च्या आधी ‘अव्यक्त गरजेप्रमाणे सेवा’
आज शहरांमधल्या झोपडपट्ट्यांमधून आणि लहान लहान खेड्यांमधून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची मागणी होत आहे. हा वाढता आवाज ऐकून आपण इंग्रजी माध्यमाचा पुरवठा करावा असा एका बाजूने आग्रह दिसतो.
परंतु आपले मुख्य काम व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण करण्यासाठी; उद्योजकता आणि स्वयंरोजगाराकरिता आवश्यक वृत्ती आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी; गटकार्य आणि सामूहिक पराक्रमाची नवनवीन क्षेत्रे शोधण्यासाठी; राष्ट्रीय व जागतिक स्तरावरची गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी; स्व-प्रतिभेने तांत्रिक व सामाजिक समस्यांचा परिहार करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आपल्या आतमध्येच आहे याची जाणीव व प्रत्यंतर प्रत्येकाला देणे हे आहे.
सध्याच्या सेमी, मिश्र, पूर्ण इंग्रजी माध्यमाच्या तुकड्या
सुरुवातीला ज्या प्राचार्यांशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला त्यांच्याशी पुढे चर्चा करताना मी पुन्हा त्यांच्या पहिल्या प्रश्नाकडे आलो. मी म्हटले, “प्रबोधिनीची सर्वप्रथम सुरू झालेली शाळा इंग्रजी-हिंदी मिश्र माध्यमाची आहे. त्यानंतर सुरू झालेल्या शाळेला इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून आधी मान्यता मिळाली आणि नंतर तिला मराठी माध्यमाच्या तुकड्या जोडल्या. ही पंचवीस-तीस-चाळीस वर्षांपूर्वीची, समाजात इंग्रजी माध्यमाचे वेड निर्माण होण्यापूर्वीची गोष्ट आहे.” मग ते मी काय सांगतो ते उत्सुकतेने ऐकू लागले.
“वर्गातल्या अध्यापनाचे माध्यम इंग्रजी आणि इतर व्यवहार व संस्कारांचे माध्यम मराठी अशीच रचना दोन्ही शाळांमध्ये आहे.” इतर इंग्रजी माध्यमाच्या ” इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पाहून अध्यापनाशिवाय इतर व्यवहारांसाठी इंग्रजीची सक्ती करा असा पालकांचा आग्रह मधून मधून असतो. पण उत्तम इंग्रजी बोलता येणे हे प्रबोधिनीच्या दृष्टीने एक साधन आहे, उद्दिष्ट नाही.
प्रेरणादायी शिक्षक असतील तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधूनही देशाच्या भूमीच्या सुरक्षेची आच निर्माण होऊ शकते आणि देशवासीयांच्या दुःखाविषयी कृतिशील करुणा निर्माण होऊ शकते. समाजाच्या समृद्ध भवितव्यासाठी झटण्याची ईर्षाही निर्माण होऊ शकते. पण भारतीय इतिहास, परंपरा, संस्कृती, ऋषी-मुनी-आचार्य-संतांचे योगदान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म हे सर्व ते जगल्यानेच म्हणजे भारतीय भाषांमधून व्यवहार केल्यानेच समजते. हे मुख्य उद्दिष्ट साधण्याचे प्रयत्न सर्वाधिक महत्त्वाचे. प्रथम ही देशसेवा करायची आहे. इंग्रजी लिहिण्या-बोलण्याची सफाई शिकविणे ही सेवा त्यानंतर पुरवता येईल. सेवा करणे आणि पुरवणे ही विभागणी व त्यांचा क्रम याबाबत तुम्ही कसा विचार करता ?