६. विमल हेतु स्फुरो नवनीत

राष्ट्रीयत्वाचे शिक्षण

उत्तम इंग्रजी लिहायला – वाचायला शिकविणे, उत्तम इंग्रजीत भाषण – संभाषण करायला शिकविणे म्हणजे समाजाला सेवा पुरविणे आहे असे मी मागच्या लेखात लिहिले होते. आपण सेवा पुरविण्यापेक्षा समाजाची सेवा अधिक केली पाहिजे असेही मी लिहिले होते. हे लिहून झाल्यावर गेला महिनाभर ‘विद्या’ आणि ‘अविद्या’ हे दोन शब्द माझ्या डोक्यात घोळत होते. विचार मांडण्यात स्पष्टता यावी म्हणून मी विद्या ऐवजी ‘सद्विद्या’, ‘अविद्या’ आणि ‘कुविद्या’ असे तीन शब्द वापरतो.

माझ्या मागच्या लेखातील चिंतनाचा सारांश मांडायचा झाला तर ‘इंग्रजी माध्यमातून शिकविणे ही अविद्या आणि मातृभाषेतून शिकविणे ही सद्विद्या’ असा तो मांडता येईल. पण या सारांशाचा विस्तार अविद्या आणि सद्विद्याच्या संदर्भात करायचा झाला तर ‘समाजात प्रतिष्ठा व झटपट पैसा मिळावा म्हणून इंग्रजी शिकविणे ही अविद्या आणि विवेकानंद व अरविंदांचे विचार इंग्रजीतून मुळातून वाचण्यासाठी इंग्रजी शिकविणे ही सद्विद्या’ असा विस्तार करता येईल. त्याचप्रमाणे ‘केवळ मनोरंजनासाठी कथा-कादंबऱ्या वाचण्याकरता मातृभाषेतून शिक्षण ही अविद्या आणि समाज, निसर्ग व ईश्वरी शक्ती यांच्याशी एकरूपता अनुभवण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण ही सद्विद्या’ असाही विस्तार करता येईल.

भ्रष्टाचारासाठी, शोषणासाठी, नफेखोरीसाठी, फसवणुकीसाठी, निंदा करण्यासाठी, दुही माजविण्यासाठी, अराजक निर्माण करण्यासाठी, आत्मकेंद्रितता, स्वार्थ, उपयुक्ततावाद आणि समाजबांधवांविषयी अनास्था निर्माण करण्यासाठी, द्वेषभावना वाढविण्यासाठी इंग्रजी किंवा मातृभाषा कोणतीही भाषा शिकविली तरी ती कुविद्याच आहे. कुविद्या शिकवा असे कोणीच सांगत नाही.

अविद्या शिकवू नका असे प्रबोधिनीने आदर्श मानलेल्या कोणत्याही राष्ट्रसंताने सांगितलेले नाही. पण समाजाला सेवा पुरविणे म्हणजे फक्त अविद्येचा व्यासंग करणे आहे. ज्यांना अविद्या आणि सद्विद्या या दोन्हीचा समतोल मेळ घालता येतो त्यांनीच अविद्या वाढवावी. हा समतोल मेळ घालणे हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. ‘अविद्यया मृत्यु ती विद्यया अमृतम् अश्नुते’ हे प्रबोधिनीचे ध्येयवाक्य आहे. अविद्येचे प्रत्येक पाऊल टाकताना सद्विद्येचे एक तरी पाऊल टाकायची योजना केली पाहिजे.

‘मी’ आणि ‘राष्ट्र’ चा एकत्र विचार

अविद्या आणि सद्विद्या यांचा समतोल मेळ घालण्याचा विचार म्हणजे प्रबोधिनीचा शैक्षणिक विचार. गेल्या महिन्यात प्रतिज्ञाग्रहणाचे चार कार्यक्रम झाले. पहिल्या तीनात सूचक पद्धतीने, व चौथ्या कार्यक्रमात स्पष्टपणे, ‘मी’ आणि ‘राष्ट्र’चा एकत्र विचार करण्याचा संकल्प म्हणजे प्रथम प्रतिज्ञा घेणे असे मी सांगितले. ‘मी’ हे अविद्येचे प्रतीक आहे. ‘राष्ट्र’ हे सद्विद्येचे प्रतीक आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण ‘मी’ पण पोसण्यासाठी आवश्यक वाटते. मातृभाषेतून शिक्षण ‘राष्ट्र’ पण जोपासण्यासाठी आवश्यक आहे.

दहावीच्या परीक्षेत ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ आहे म्हणून संस्कृत शिकणे-शिकविणे ही देखील अविद्याच आहे. गीता आणि उपनिषदे मुळातून समजून घेण्यासाठी, रामायण-महाभारत मुळातून वाचण्यासाठी संस्कृत शिकणे-शिकविणे म्हणजे सद्विद्या.

‘मी’चा विचार म्हणजे मला अधिक गुण मिळाले पाहिजेत, अधिक महत्त्व मिळाले पाहिजे, अधिक ‘स्कोप’ मिळाला पाहिजे, अधिक अधिकार मिळाला पाहिजे, अधिक संधी मिळाली पाहिजे, अधिक सन्मान मिळाला पाहिजे, अधिक प्रसिद्धी मिळाली पाहिजे याचा विचार. ही अविद्या.

‘राष्ट्राचा’ विचार म्हणजे इतरांना अधिक स्वातंत्र्य, संधी, मान, न्याय,अधिकार, महत्त्व, ‘स्कोप’ मिळाला पाहिजे याचा विचार. हे शिकविण्यासाठी आमच्या मुलांना इंग्रजीतून शिकवा असे कोण म्हणते आहे ? मला तरी अजून कोणी आढळले नाहीत. ‘तुम्ही सद्विद्येची काळजी करता म्हणून आम्ही अविद्येची काळजी करतो’ असे म्हणणारेही मला अजून भेटलेले नाहीत. ‘तुम्हाला सद्विद्येची काळजी करायची असेल तर करा आम्ही अविद्येचीच करणार’ अशा थाटात बोलणारेच अधिक असतात. अशांनाही ‘विद्यां च अविद्यां च यस्तद् वेद उभयं सह’ – सद्विद्या आणि अविद्या या दोन्हीला जो एकत्र जाणतो – असे बनवायचे आहे. असे बनणे म्हणजे ‘मी’ व ‘राष्ट्र’ यांचा समतोल मेळ घालणे.

विद्याव्रत संस्कार आणि मातृभूमीपूजन

विद्याव्रत संस्कारात जी सहा व्रते आहेत त्यामध्ये राष्ट्रअर्चना व्रताचा समावेश आहे. ‘मी’ आणि ‘राष्ट्र’चा समतोल मेळ घालण्याच्या म्हणजे राष्ट्रीयत्वाच्या शिक्षणाचा तिथून प्रारंभ होतो. ज्या प्रौढांना विद्याव्रत संस्काराची संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी मातृभूमी-पूजनाच्या कार्यक्रमाची रचना केली आहे. त्या पूजेतील विविध सामूहिक आणि व्यक्तिगत संकल्प ‘मी’ आणि ‘राष्ट्र’चा समतोल मेळ घालण्याचेच संकल्प आहेत. थोडक्यात इंग्रजी माध्यम आणि मातृभाषा माध्यम याचा संबंध अनुक्रमे ‘मी’ आणि ‘राष्ट्र’शी म्हणजेच अनुक्रमे ‘अविद्या’ आणि ‘सद्विद्या’शी आहे. भारताचे राष्ट्रीयत्व ‘उभयं सह’ या भूमिकेत आहे. आपण सद्विद्या आणि अविद्या यांचा मेळ घालायचा आणि इतरांनी त्यातून फक्त अविद्या काढून घ्यायची असे होणार नाही यासाठी सावध राहिले पाहिजे.

आपल्या उपक्रमातील सावधानता

गेल्या महिन्यात निगडीला माध्यमिक विभागाची क्रीडा प्रात्यक्षिके झाली. पुण्यात युवक विभागाच्या प्रात्यक्षिकांची तयारी चालू आहे. क्रीडा प्रात्यक्षिके ही प्रबोधिनीतच सुचलेली कल्पना. कोणाच्या मागणीवरून सुरू झालेली नाहीत. आमची हौस म्हणून केलेली प्रात्यक्षिके ही अविद्या. समाजाला उत्तम नियोजन व संघटित प्रयत्नांचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी केलेली प्रात्यक्षिके ही सद्विद्या. समाजाला काही दाखविण्यासाठी प्रात्यक्षिके ही अविद्या. विवेकानंदांच्या संदेशाचे आम्हाला स्मरण होण्यासाठी प्रात्यक्षिके ही सद्विद्या. विवेकानंदांच्या विचारांच्या केवळ आपल्या स्मरणासाठी प्रात्यक्षिके ही अविद्या. विवेकानंदांच्या विचारांची समाजाला आठवण म्हणून प्रात्यक्षिके ही सद्विद्या. थोडा अधिक खोलात जाऊन विचार केला तर अगदी समाजाला आठवण करायला जाणे ही सुद्धा अविद्या. प्रात्यक्षिकांच्या रूपाने आपल्यातील उत्तम क्रीडा, नियोजन, संघटन-कौशल्यांचे मातृभूमीला समर्पण ही सद्विद्या. अविद्या-सद्विद्येच्या रेषेवर आपण सद्विद्येच्या दिशेने सरकत राहिले पाहिजे. अविद्येची साथ राहणारच आहे. तुम्ही कसा विचार करता ?