७. असा वारसा पेलायास्तव वज्राचे बल दे

वंश आणि वारसा

एका निवृत्त न्यायाधीशांशी बोलताना मृत्युपत्रांमधील वेगवेगळ्या गंमती-जंमती ते सांगत होते. मृत्युपत्रांसंबंधीचे अनेक वाद त्यांच्या समोर निवाड्यासाठी आलेले होते. त्यातले अनुभव सांगता सांगता त्यांनी एक सूत्र सांगितले. ते म्हणाले की “तुम्ही स्वतः मिळवलेली संपत्तीं तुम्ही तुमच्या मुला-मुलींना, नातेवाईकांना, मित्रांना, सहकाऱ्यांना, नोकरांना, कोणालाही देऊ शकता. परंतु आधीच्या पिढीतील कोणीतरी तुम्हाला अधिकृत वारसदार म्हणून दिलेली संपत्ती तुम्ही तुमच्या कुटुंबातील पुढच्या पिढीतील अधिकृत वारसदारालाच दिली पाहिजे.” या सूत्राला अपवादही त्यांनी अनेक सांगितले. परंतु वंशपरंपरेने म्हणजे वारसा हक्काने आलेली संपत्ती ही स्वतःच्या मर्जीप्रमाणे वापरण्यासाठी नाही, हा त्या सूत्रातला मुख्य अर्थ मला समजला.

संपत्तीप्रमाणेच ज्ञानाच्या बाबतीत

बृहदारण्यक या नावाचे एक मोठे उपनिषद आहे. त्याच्या सहा प्रकरणांपैकी तीन प्रकरणांच्या शेवटी आगळ्या-वेगळ्या याद्या मला बघायला मिळाल्या. सध्या ‘लायसेन्स्ड् सॉफ्टवेअर’ व ‘फ्रीवेअर’ असे दोन प्रकार संगणक क्षेत्रात आढळतात. ‘लायसेन्स्ड् सॉफ्टवेअर’ म्हणजे संगणक प्रणाली तयार करणाऱ्या कंपनीकडून तुम्हाला विकत घेऊन वापरावे लागते ते. ‘फ्रीवेअर’ म्हणजे तुम्ही इंटरनेटवरून कोणाच्या परवानगीशिवाय फुकट घेऊ शकता ते. या उपनिषदात जे मंत्र संग्रहित झाले ते संग्रहित करणाऱ्या ऋषींनी आपला ज्ञान-वंश त्याच्यात सांगितला आहे. तेव्हापासून ते मंत्र ‘फ्री-वेअर’ झाले असा मी त्याचा अर्थ केला. त्यापूर्वी ते मंत्र ‘लायसेन्स्ड् सॉफ्टवेअर’ होते. तीन प्रकरणांच्या शेवटी असलेल्या या ज्ञान-वंशांच्या याद्या पन्नास ते साठ पिढ्यांच्या आहेत. पहिल्या गुरूने त्याच्या शिष्याला, त्याने त्याच्या शिष्याला असे हे ज्ञान परंपरेने दिले. साठाव्या शिष्याने ते सर्वांना खुले केले. पंधरा वर्षांची एक पिढी धरली तर साठ पिढ्या म्हणजे नऊशे वर्षे तरी होतात. राजांच्या वंशावळी पुराणांमध्ये आहेत, ब्रिटिश काळातील गव्हर्नर जनरलांच्या याद्या इतिहासामध्ये असतात. अशा राजवंशांपेक्षा उपनिषदातील हे ज्ञान-वंश मला आवडले.

ज्ञान-वारसा आणि सांस्कृतिक वारसा

उपनिषदांमधील या याद्यांप्रमाणेच अध्यात्म, योग, आयुर्वेद, संगीत, नृत्य, शिल्प या बाबतीतही गुरु-शिष्यांच्या परंपरेच्या सात-आठ पिढ्यांच्या अनेक याद्या बघायला मिळतात. ते ज्ञान त्या परंपरेने टिकवले आणि वाढवले. आठव्या शिष्याने पहिल्या गुरूंपासून आठव्या गुरूंपर्यंत सर्वांनी मिळवलेले ज्ञान टिकवले आणि वाढवले.

जसे ज्ञानाच्या बाबतीत असते तसे आचारांच्या बाबतीतही असते. महाराष्ट्रातल्या अनेक घरांच्या देव्हाऱ्यात तीनशे, चारशे, पाचशे वर्षे पूजेत असलेले देव आहेत. ही पूजा चालू ठेवणे म्हणजे कुळाचा वारसा चालू ठेवणे. घरा-घरांमध्ये कुळधर्म-कुळाचार चालू ठेवणे म्हणजे कुळाचा वारसा चालू ठेवणे. हे आचार म्हणजे कुळाचा सांस्कृतिक वारसा. तसेच समाजाचाही सांस्कृतिक वारसा असतो. समाजातील उत्सव, सण, लोककथा हा समाजाचा सांस्कृतिक वारसा असतो. भारतातले राजवंश पूर्वी आपली परंपरा सूर्यापर्यंत किंवा चंद्रापर्यंत नेऊन भिडवीत. परंतु सर्वसामान्य लोक ऋषींचे ‘गोत्र’ सांगतात. हा सांस्कृतिक वारसा आहे. ज्यांना ऋषींचे ‘गोत्र’ माहीत नाही अशी अनेक कुटुंबे आपली ओळख म्हणून कोणत्या झाडांच्या पानांचे ‘देवक’ हे सांगतात. हा सांस्कृतिक वारसा आहे.

डोळस राष्ट्रीय वारसा

ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, पारसी, कन्फ्यूशिअस, शिंतो, ताओ हे जगातील विविध धर्मपंथ अस्तित्वात येण्याच्याही पूर्वी भारतात वेद, उपनिषदे व गीता हे ग्रंथ निर्माण झाले. त्यामुळे जगातला कोणताही धर्मपथ मानणाऱ्या भारतीयांचा हे ग्रंथ म्हणजे राष्ट्रीय वारसा आहे. ज्ञानाबरोबर येणारे आचार व त्यांच्या मागचा विचार बदलत जातात. काही बदलत्या काळात अप्रस्तुत होतात. काही नवीन काळात समाजाला अडचणीचे व घातकही ठरतात. समाजातल्या त्या त्या वेळच्या धुरीणांनी आचार व त्याचे स्पष्टीकरण बदलण्याचे काम करायचे असते.

सृष्टीचा अभ्यास वाढतो तसे ज्ञान म्हणून सांगितलेले जुने आडाखे, जुने अंदाज, जुने निष्कर्षही बाजूला करावे लागतात. प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित ज्ञान स्वीकारावे लागते. हे काम हल्ली समाजातील वैज्ञानिक करत आहेत. ऋषी-मुनी व साधु-संतांच्या वचनांमधील व लेखनामधील काही ज्ञानही अप्रस्तुत किंवा अवैज्ञानिक वाटेल. ते ही बाजूला सारावे लागेल. बाह्यसृष्टीचे ज्ञान विज्ञानाने नेमके होत जाते. तो ही राष्ट्रीय वारसाच आहे. जगदीशचंद्र बसूंचे वैज्ञानिक संशोधन हा आपला राष्ट्रीय वारसाच आहे. वनस्पतींना आपल्या सारख्याच संवेदना असतात हे त्यांचे संशोधन ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी ….’ किंवा ‘ईशावास्यम् इदं सर्वम्….’ या चिंतनातून आणि अनुभवातून आलेल्या उद्‌गारांशी जुळणारेच आहे. कोणत्याही धर्मपंथाच्या भारतीयांना जगदीशचंद्रांच्या संशोधनाएवढेच तुकारामांचे अभंग व ईशावास्य उपनिषदातले मंत्र आपल्या राष्ट्रीय वारशाचा भाग आहेत हे समजले पाहिजे.

राष्ट्रीय वृत्ती

‘सनातन धर्म’ हे शब्द पूर्वी वैदिकांनी आणि बौद्धांनीही वापरले आहेत. कारण तो आपल्या राष्ट्रीय वारशाचा भाग आहे. ‘सनातन धर्म’ म्हणजे ‘शाश्वत व समग्र विकासासाठी व्यक्तीची, समाजाची व शासनाची कर्तव्ये’ असा अर्थ आधुनिक भाषेत सांगता येईल. वेदकाळापासूनचा सनातन धर्माचा हा राष्ट्रीय वारसा माहीत झाला, तो समजला, तो आपला वाटला, म्हणजे आपल्या देशाच्या भूमीप्रमाणे आपल्या राष्ट्रीय वारशाचेही रक्षण आपण केले पाहिजे हे कळते. आपला राष्ट्रीय वारसा वाढविणाऱ्या व राखणाऱ्यांची परंपरा श्रीराम व श्रीकृष्ण, व्यास व बुद्ध यांच्यापासून एपीजे अब्दुल कलामांसारख्या शास्त्रज्ञ राष्ट्रपतींपर्यंत येऊन पोचते. राष्ट्रीय वृत्ती म्हणजे आपण या सर्वांचे वारसदार आहोत याचा सार्थ व सक्रिय अभिमान वाटणे.