भन्न मूर्तीतील देव
कुष्ठरोगाने विविध प्रकारचे अपंगत्व आलेल्यांचे पुनर्वसन करून त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण करण्याचे काम करणारे बाबा आमटे यांचे नुकतेच निधन झाले. कुष्ठरोग्यांमध्येही देव पाहावा ही दिशा विवेकानंदांनी दाखवली. व्यक्तिगत आचरणाचा नमुना गांधीजींनी दाखवला. सामूहिक आचरणाचा टिकाऊ नमुना बाबा आमट्यांनी दाखवला. कुष्ठरोग निर्मूलनाचे काम आता प्रतिबंधाच्या टप्प्याला येऊन पोचले आहे. काही वर्षांनी त्याचे पूर्ण उच्चाटनही होण्याची शक्यता आहे. कुष्ठरोगाने येणारे अपंगत्व दूर झाले तरी शारीरिक किंवा मानसिक रोगांनी पीडित रोगी असणारच आहेत. या रुग्णांमध्ये देव पाहावा किंवा माणूस पाहावा. तो ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे. अशा रुग्णांची व्यक्तिगत शुश्रूषा करणे व त्यांच्यावर उपचार करणे, अशा रोगांवरती उपचार व प्रतिबंधक उपाय शोधून काढणे हे काम करणारे मात्र अधिक चांगले माणूस बनतात. बरे होणारे रुग्ण त्यांना देव मानतात. देव म्हणजे प्रगत माणूस. प्रगत माणसांना सुंदर शरीरातही देव दिसतो व जर्जर शरीरातही देव दिसतो. मुक्या प्राण्यातही देव दिसतो व अचर वनस्पतींमध्येही देव दिसतो. जनी जनार्दन व वनी जनार्दन पाहू शकणारी प्रगत माणसे थोडीच असणार. प्रबोधिनीच्या घटनेमध्ये वर्णन केलेल्या संन्याशाचा तो आदर्श आहे.
रामराज्य म्हणजेच आनंदवनभुवन
जिथे रोग नाही तिथे रुग्णसेवा करणारे कोठून असणार ? जिथे दैन्य नाही तिथे दीनबंधू कोठून असणार ? जिथे कोणी बुडणारे नाही तिथे तारणहार कोठून असणार ? अशी स्थिती म्हणजे आनंदवनभुवन किंवा रामराज्य. अशी स्थिती नसतानाही सगळीकडे परमेश्वर पाहून त्याची आवश्यक ती सेवा करणारे नेहमी थोडेच असतात. परंतु आनंदभुवन किंवा रामराज्य किंवा सुराज्य नसेल तर आपण ते निर्माण करू हे त्याहून अधिक लोकांना समजते. त्यांना नवनिर्मितीची कामेही करावी लागतात व अभावाचे खड्डेही दूर करावे लागतात. ज्या समाजात सुराज्य निर्माण करायचे त्या समाजाच्या गरजा आणि आकांक्षा, त्या समाजाची दुःखे आणि शल्ये, त्या समाजाचे आनंदाचे आणि अभिमानाचे क्षण, त्या समाजावरील प्रकट आणि छुपी प्राणसंकटे यांची जाणीव अशा लोकांमध्ये सतत असायला लागते. अशी सतत जाणीव असणे, आनंदवनभुवन निर्माण करण्याचे ध्येय सतत डोळ्यासमोर असणे, आणि वास्तवाच्या व ध्येयाच्या जाणिवेतून कामाला दिशा व प्रेरणा मिळणे हे संन्याशांपेक्षा अधिक संख्येने पण तरी थोड्याच लोकांना जमते. अशा लोकांमध्ये ‘समाजप्रामाण्यबुद्धी’ आहे असे म्हणता येईल. प्रबोधिनीची चतुर्थ प्रतिज्ञा ‘जनी जनार्दन ऐसा भाव’ मनात स्थिर होण्यासाठी घ्यायची तर तृतीय प्रतिज्ञा अशी ‘समाजप्रामाण्यबुद्धी’ मनात स्थिर होण्यासाठी घ्यायची आहे.
कर्तव्यबुद्धी आणि हितबुद्धी
भगिनी निवेदितांनी ‘नेशन मेकिंग एज्युकेशन’ असा शब्दप्रयोग त्यांच्या राष्ट्रीय शिक्षणावरील एका निबंधात केला आहे. त्यात त्या म्हणतात ‘राष्ट्रीय भावना’ म्हणजे ‘स्वतःच्या आधी इतरांचे हित व सुख झाले पाहिजे अशी भावना’. ‘इतर’ कोण हे कळण्यासाठी मनात देशभक्ती असावी लागते. या देशाच्या भूमीवर, इतिहासावर, परंपरेवर प्रेम करण्यातून ही देशभक्ती वाढते. ‘इतर’ कोण हे फक्त कळून उपयोगी नाही. ते कळल्यावर त्यांच्या हितासाठी आणि सुखासाठी कामाला प्रवृत्त होण्याची गरज आहे.
१) ‘सिव्हिक सेन्स’ म्हणजे नागरिकाची कर्तव्ये ओळखून ती पार पाडण्याची कर्तव्यबुद्धी; २) ‘पब्लिक स्पिरिट’ म्हणजे समूहाच्या किंवा सार्वजनिक हिताची कामे कोणी न सांगता आपणहून हिरिरीने पुढे होऊन करण्याची हितबुद्धी; आणि ३) ‘ऑरगनाइज्ड अनसेल्फिशनेस’ म्हणजे स्वार्थावर मात करून निःस्वार्थ वृत्तीने,व्यक्तिगत पुण्य, श्रेय ,यश , कीर्ती, निंदा, प्रहार, अपमान उपेक्षा यांची फिकीर न करता अनेकांबरोबर संघटित काम करण्याची संघटनवृत्ती. हे तीन गुण देशभक्तीच्या जोडीने असले तर ती खरी ‘राष्ट्रीय ‘भावना’ असे निवेदिता म्हणतात. अशी राष्ट्रीय भावना असलेले लोकच आपल्या राष्ट्रीय ध्येयानुसार आपले राष्ट्र घडवू शकतात. प्रबोधिनीची द्वितीय प्रतिज्ञा घ्यायची ती समाजामध्ये आनंदवनभुवन निर्माण करण्याचे ‘राष्ट्रीय ध्येय’ मनात स्थिर करण्यासाठी आणि ते ध्येय गाठण्याकरिता स्वतःमध्ये ‘नागरी कर्तव्यबुद्धी’, ‘सार्वजनिक हितबुद्धी’ व ‘स्वार्थनिरपेक्ष संघटनवृत्ती’ दृढमूल करण्यासाठी.
समाजकेंद्रित व्यक्तिमत्त्व विकसन
स्वार्थावर मात करणे किंवा स्वार्थनिरपेक्ष विचार करणे सर्व जणांना सर्व वेळ जमतेच असे नाही. आपल्या मनातील चांगल्या प्रेरणा लोखंडाच्या सुई सारख्या असतात. आपल्या मनातील स्वार्थ भावना त्या सुई भोवती असलेला चिखलाचा लेप असतो. समाज चांगला व्हावा हे ध्येय लोहचुंबकासारखे असते. लोहचुंबकाच्या दिशेने जाण्याचा किंवा वळण्याचा सुईचा प्रयत्न सतत होत असतो. पण तिच्या भोवतीचा चिखल तिला हलू देत नाही. स्वार्थाचा चिखल व्यक्ती-व्यक्तीच्या चांगल्या प्रेरणा एक-दिश होऊ देत नाही. त्यामुळे समाज चांगला व्हावा हे ध्येय स्वप्नच राहते किंवा मृगजळच राहते.
समाजस्थितीचे दर्शन होणे, समाजस्थितीशी आपला संबंध आहे हे कळणे, समाजाला वगळून आपला विकास होऊ शकत नाही हे कळणे म्हणजे आपल्या चांगल्या प्रेरणांभोवतीचा स्वार्थाचा चिखल कमी होऊ लागणे. चिखल कमी होऊन एकदा सुई लोहचुंबकाला जाऊन भिडली की तिच्या भोवतीचा उरलासुरला व्यक्तिगत स्वार्थाचा चिखल सामाजिक किंवा राष्ट्रीय स्वार्थाचा बनतो. राष्ट्रीय स्वार्थाच्या आड येणारा व्यक्तिगत स्वार्थाचा चिखल मी धुऊन काढीन असे म्हणणे म्हणजे समाजकेंद्रित व्यक्तिमत्त्व विकसनाचा संकल्प करणे. प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा ‘सर्वात आधी राष्ट्रीय स्वार्थ’ हा विचार मनात स्थिर होण्यासाठी आहे.
या माझ्या भारतदेशी
एकजीव उमदे व्हावे जनजीवन गावोगावी
या माझ्या भारतदेशी सुखस्वप्ने फुलुनी यावी ।। ध्रु. ।।
शेतात कोरड्या किसान गाळी घाम
पेरले उगवता हरखुन जाई भान
भरगच्च पिकाने पिवळे होई रान
बळिराजाची परि बाजारी धुळदाण
या भारतभूपुत्राच्या कष्टाला किंमत यावी ।। १ ।।
ही सागरवेष्टित भूमी सुजला सुफला
रखरखीत झाली ओलावा ओसरला
बोडके नागडे होता डोंगरमाथे
आटले झरे अन् सुकलेले पाणोठे
या सुकलेल्या रानात रुजवू या जीवनराई ।।२ ।।
गावात भांडती भाउबंद शेजारी
हे लोक निरक्षर कर्जाने आजारी
भाबडे भोळसट व्यसनांनी बेभान
मागास रिकामे शहरांचेच गुलाम
या गावकऱ्यांच्या गावी नवनवी उभारी यावी ।।३ ।।
कान्ह्याच्या गावी भरले गोकुळ होते
गोपांच्या मेळी गोवर्धनबळ होते
कालिया पूतना कंस संपले सारे
यमुनेच्या काठी स्वातंत्र्याचे वारे
हरिकथा अवतरो हीच माझिया गावी ।।४ ।।
यापुढे यशाकडे…
यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची ।। ध्रु. ।।
शक्ति-युक्ति-बुद्धिने सुजाण यत्न चालवू
संपदा समर्थता उदंड आम्ही मेळवू
सावधान पाउले जयाप्रतीच जायची ।। १ ।।
वज्रता विनम्रता तनूमनात बाणवू
स्नेहशील एकता निजांतरात तेववू
वीजवादळातही ज्योत ना विझायची ।। २ ।।
अजिंक्य झेप आपुली अशक्य शब्द नेणते
‘मृगेन्द्रता स्वयं हि एव’ मंत्र एक जाणते
सार्थ तो करू अशी शपथ ही वहायची ।। ३ ।।
विक्रमी कृती करू चला दिगंत हालवू
तेज मायभूमीचे उभ्या जगास दाखवू
चेतना स्वरातली उरात जागवायची ।। ४ ।।