नवे मार्ग शोधताना : रोजच्या सवयीच्या रस्त्याने जायचे असेल तर अंधारातही चालत जाता येते. व्यवस्थित आखलेला, खाणाखुणा दाखवणारा, प्रकाशित असलेला रस्ता असला तर नव्या रस्त्यानेही न चुकता जाता येते. रुळलेली, मळलेली वाट जिथे संपते तिथून पुढे अंदाज घेत घेतच जावे लागते. स्वतः वाट तयार करत जावे लागते. एखादा मोठा गट किंवा एखादी महत्त्वाची व्यक्ती कुठे जाणार असेल तर पुढे रस्ता निर्वेध करणारी पथके पाठवतात. कोणीतरी पुढे जाऊन रस्त्यावर, वळणांवर, फाट्यांवर खुणा करून ठेवाव्या लागतात.
नवीन रस्ता शोधणाऱ्यांना तर रोजच अज्ञात प्रदेशात पुढे शिरायचे असते. समुद्र-प्रवास करणारे दर्यावर्दी असोत, जंगलातून किंवा वाळवंटातून जाणारे प्रवासी असोत, उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर जाणारे संशोधक असोत, गुहा आणि भुयारे यांचे दुसरे टोक शोधणारे गिर्यारोहक असोत, सर्वांना स्वतःवर विश्वास ठेवून नव्या प्रदेशात प्रत्येक पुढचे पाऊल टाकावे लागते. अशा लोकांना मागे टाकलेल्या वाटेचा फारसा उपयोग नसतो. त्यांना नवे. शोधण्याच्या अनुभवाचा उपयोग असतो. प्रबोधिनी ही एक नवे मार्ग शोधणाऱ्यांची संघटना आहे. मार्ग शोधायचा आहे शिक्षण क्षेत्रातला. शिक्षणातून मनुष्यघडण करण्याचा. मनुष्यघडणीतून संघटन करण्याचा. संघटनातून विकास करण्याचा. विकासातून व्यक्तीच्या व समाजाच्या मूळ रूपाचे प्रकटन करण्याचा. त्या मार्गाने पुढे जात राहायचे आहे.
जुन्या आकृतिबंधात रेंगाळणे हानिकारक : ज्यांना मार्ग शोधायचा आहे, नव्या वाटा पाडायच्या आहेत, त्यांना आधीच्या रस्त्यावर रेंगाळून चालत नाही. आधीचा रस्ता रुळलेला आहे, तो सोयीचा आहे व तो वहिवाटीत ठेवायचा आहे हे खरे. तो अनेकांना वापरता यावा यासाठीच शोधून काढला आहे हे ही खरे. एक गट पुढचा रस्ता शोधत असताना दुसऱ्या एका गटाने आतापर्यंत तयार केलेला रस्ता राखावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. असा रस्ता राखणाऱ्यांना त्या कामावर प्रेम करावे लागते, त्या कामाशी निष्ठा ठेवावी लागते.
तयार रस्त्यावरून अनेकांना जाता येईल अशी व्यवस्था करणे याला शिक्षण क्षेत्रात म्हणतात पाठ्यपुस्तकी शिक्षण. आजवर उजेडात आलेले उपयुक्त ज्ञान निश्चित करून, समजण्याच्या दृष्टीने त्याचे सोयिस्कर भाग करून, या भागांचा एक क्रम निश्चित केला की, त्याला म्हणतात अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम. हा अभ्यासक्रम सगळ्यांना सारख्या पद्धतीने मिळावा यासाठी केलेली सोय म्हणजे पाठ्यपुस्तके, या पुस्तकांमध्ये क्रमाने मांडलेले उपयुक्त ज्ञान कोणाकोणापर्यंत किती पोहोचले हे तपासण्याची व्यवस्था म्हणजे परीक्षा. आणि या परीक्षेत सर्वांनी यशस्वी व्हावे म्हणून केलेले प्रयत्न म्हणजे पाठ्य-पुस्तकी शिक्षण. प्रबोधिनी नावाच्या ज्या कार्यसंघाने नवे मार्ग शोधायचे आणि घडवायचे आहेत त्यांनी रेखीव परिघाच्या पाठ्यपुस्तकी शिक्षणात रमून गेलेले चालेल का? अर्थातच नाही!
आपण मार्ग वाहता ठेवण्याच्या कामात गुंतून पडू नये म्हणूनच प्रबोधिनीच्या घटनेत प्रबोधिनीचे उद्देश मांडताना पहिल्या परिच्छेदातील पहिलेच वाक्य आहे – ‘ज्ञान प्रबोधिनी म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांचे शिक्षण देणारी सामान्य प्रतीची शिक्षणसंस्था नव्हे.’ सामान्य म्हणजेच सर्वांना ओळखू येणारी किंवा सर्वांना समजणारी. सामान्य म्हणजे कमी गुणवत्तेची किंवा हलक्या दर्जाची असा अर्थ नाही.
सामान्य आणि विशेषातील पूल : जे सर्वांना माहीत आहे ते सामान्य. जे अनेकांना नवलाईचे आहे ते विशेष. ज्या विशेषाची नवलाई संपली ते सामान्य झाले. नवा मार्ग नवलाईचा असतो. कोकण रेल्वे पूर्ण झाल्यावर किंवा पुणे-मुंबई जलदगती मार्ग झाल्यावर अनेकांनी केवळ नव्याचा अनुभव घेण्यासाठी त्या रेल्वेने किंवा त्या मार्गाने प्रवास केला. आता तो अनेकांनी गृहीत धरलेला आहे. विशेषाचे सामान्य होणे एका बाजूला चालू असते. त्याचबरोबर नवे विशेष निर्माण होत राहिले पाहिजे. विशेषाचे सामान्यीकरण ही प्रबोधिनीची जबाबदारी आहे. नवीन विशेषाची निर्मिती हा प्रबोधिनीच्या स्थापनेचा उद्देश आहे.
पाठ्य-पुस्तकांचे शिक्षण उजेडात आलेल्या ज्ञानावर बेतलेले आहे. उजेडात न आलेले उजेडात आणणे हे प्रबोधिनीचे काम आहे. माणसाच्या अनेक क्षमतांपैकी स्मरणशक्ती व तर्कशक्तीवर पाठ्यपुस्तकांचे शिक्षण अवलंबून आहे. याशिवाय शरीराच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या अनेक शक्तींचा विकास करण्याचे मार्ग शोधणे ही प्रबोधिनीतील विशेष शिक्षणाची कल्पना आहे.
प्रबोधिनीच्या घटनेत पुढे म्हटले आहे – …. सामान्य प्रतीची शिक्षण-संस्था नव्हे. म्हणून प्रबोधिनीतील विद्यार्थी शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक अशा सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न होईल अशा प्रकारचे शिक्षण देणे.’
विशेष शिक्षणाचे स्वरूप : असे विशेष शिक्षण देण्यासाठी कोणत्या तरी शिक्षण मंडळाने किंवा परीक्षा मंडळाने किंवा अगदी प्रबोधिनीने तयार केलेला अभ्यासक्रम शिकवून पुरत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या विकासासाठी स्वतःचा अभ्यासक्रम वेळोवेळी स्वतःच तयार करायला शिकवले पाहिजे. त्या अभ्यासक्रमानुसार अनुभव घेत त्यातून स्वतःमध्ये विकासाला अनुकूल बदल घडवण्याचे शिक्षण देणे हा प्रबोधिनीचा उद्देश आहे.
ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.१
ज्ञान प्रबोधिनी म्हणजे केवळ पाठ्य-पुस्तकांचे शिक्षण देणारी सामान्य प्रतीची शिक्षणसंस्था नव्हे. म्हणून प्रबोधिनीतील विद्यार्थी शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक अशा सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न होईल अशा प्रकारचे शिक्षण देणे.