एकात्मतेचा अंतर्गत तरल प्रवाह…

लेख क्र. ४०

१४/७/२०२५

संत्रिकेमध्ये निरंतर सुरू असलेले संस्कारसेवेचे काम विविध समाजगटात पोहोचविण्याचा प्रयत्न असतो. सुरुवातीच्या काळातील बुरुड समाजातील सामूहिक विवाह, सोमवंशीय क्षत्रिय समाजातील उपनयन, मातंगसमाजासाठी कलशारोहण, नागरवस्तीमध्ये जाऊन केलेले सत्यनारायण, ग्रामीण भागातील महिलांसाठी मार्गशीर्षातील गुरुवार, परीट समाजात मातृभूमिपूजन असे लहान-मोठे प्रयोग झाले आहेत. सध्या संत्रिकेचे जवळ-जवळ ५० पुरोहित देश-विदेशात विविध संस्कार करत आहेत. हे संस्कार करताना त्यांना खूप वेगवेगळे अनुभव येतात. गेल्या १५-२० वर्षात आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरदेशीय विवाहांचे प्रमाण वाढते आहे. अशा विवाहात दोन्ही बाजूंना समजून घेताना बराच प्रयास करायला लागतो. पण बाहेर सतत दुहीची भावना पेरणारे कार्यरत असताना भारतातील एकात्मतेचा प्रत्यय येईल असे सकारात्मक अनुभव प्रबोधिनीच्या विवाहसंस्काराच्या माध्यमातून मिळतात. त्यामागे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अनेक कारणे असतील पण एकमेकांसाठी जुळवून घेण्याची भावना नक्की दिसते हे महत्वाचे आहे. असाच एक विवाह डॉ. मनीषा शेटे यांनी पंजाबामध्ये लग्न लावताना अनुभवला. त्याचे वर्णन त्यांच्याच शब्दात येथे देत आहोत.

पौरोहित्य करायला लागले आणि विविध लोकांशी भेटण्याची संधी मिळाली. थोड बहुत हिंदी इंग्लिश येत असल्याने विवाहासारख्या संस्कारांकरिता भारतभर जाण्याची संधी मिळाली. माणसांची स्वभाव वैशिष्ट्य थोडी बहुत समजली पण आज लिहायचे आहे ते वेगळे आहे.. आपण भारतीय म्हणून कुठे आणि कसे एक असतो, एकमेकांना कसे सामावून घेत जातो आणि तेही सहजतेने. (थोडे बहुत इकडे तिकडे होत असणार ते अगदी घराघरात होतच असते) पण तरी स्वीकारशीलता जाणवेल इतकी मला तरी दिसली आहे.

निमित्त एका विवाहाचे होते, मराठी मुलगा व पंजाबी (शीख) वधू यांचा विवाह लावण्याचा योग आला. अगदी पहाटे शीख पद्धतीने गुरू ग्रंथ साहिब यांना साक्षी ठेवून विवाह झाला. सुश्राव्य गायनाने गुरू नानकजी यांची पदे म्हणत विवाह सुरू झाला. वधूच्या वडिलांनी वर-वधूंच्या खांद्यावर शेला घातला. दोघांनी ते वस्त्र हातात धरून गुरू ग्रंथ साहिब यांना ४ फेरे घातले, वधु-वरांना अभंगातूनच मार्गदर्शन झाले. मराठी कुटुंबीय आनंदाने पूर्णवेळ बसून त्यामध्ये सहभागी झाले.

त्यानंतर काही वेळातच मी व उर्मिलाताई बेटकर आम्ही प्रबोधिनी पद्धतीने विवाह संस्काराची सुरुवात केली. माहिती सांगताना डोक्यात घोळत होते संत नामदेव.. तेराव्या शतकात पंजाबमध्ये गेलेले नामदेव शिंपी समाजाचे.. सहज बोलताना म्हणले शिंपी वस्त्र जोडतो, नामदेवांनी दोन प्रांत जोडले.. घुमान आठवले.. लोकांनी टाळ्या वाजवल्या. विवाह उत्तम झाला असा चहूबाजूंनी प्रतिसाद मिळाला. पंजाबी कुटुंबातील काहीजणांनी तर प्रत्यक्ष भेटून प्रतिसाद दिलाच पण अनेकांनी पुन्हा पुन्हा भेटून सांगितले. दिल्लीतील एक ताई म्हणाल्या हिंदीतून शिकवणार असलात तर फार आवडेल मला शिकायला..

सर्व झाल्यावर विमानतळावर आलो आणि एका पंजाबी काकांच्या शेजारी बसलो.. मुलाची आजी आमच्याशी मराठीत बोलत होती ते ऐकून पंजाबी काका म्हणाले, “मराठी हो क्या?” आम्ही ‘हो’ म्हणाल्यावर ते म्हणाले “मी ४० वर्ष अहमदनगर येथे होतो. मराठी कळते आणि बोलता पण येते. थोडा वेळ छान गप्पा झाल्यावर गप्पांचा विषय कशावर संपवावा त्यांनी? तर ‘देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा’ या गाण्याच्या पहिल्या ओळीने…मला हे गाणे पूर्ण पाठ आहे असे ते म्हणाले. त्यांना विचारले कुठे निघाला आहात तर म्हणाले कोचीनला, कशासाठी? तर त्यांच्या मुलीने मल्याळी मुलाशी लग्न केले आहे तिला भेटायला. आम्ही त्यांना जेव्हा सांगितले आजच एका पंजाबी मुलीचा आणि मराठी मुलाचा विवाह आम्ही लावला तेव्हा त्यांना मस्त हसू आले. ते म्हणाले,”मी पंजाबी, निवृत्तीनंतर चंदीगढला आलो. आयुष्य मात्र महाराष्ट्रात गेले. पण मुलगी शिक्षणासाठी कोचीनला गेली तिथे तिला मल्याळी मुलगा भेटला. आता मी नातीला सांभाळण्यासाठी तिकडे जात आहे.”

बांग्लादेशी मुस्लिम वधू व भारतीय हिंदू वर असे दोन विवाह संस्कार करण्याची संधी मिळाली. दोघी जणी विश्वासाने घर मागे टाकून आल्या होत्या. प्रत्यक्ष विवाहाच्या वेळी एका वधूला अश्रू अनावर झाले तेव्हा तिच्या बाजूने कन्यादानासाठी बसलेल्या वराच्या मामा-मामीने तिच्याशी इतक्या आपुलकीने संवाद साधला की उपस्थित सर्वच भारावून गेले.

दुसर्‍या बंगाली वधूने आम्हा दोघी पुरोहितांना उद्देशून सुंदर पत्र लिहिले. “आम्ही एकत्र कसे येऊ याबद्दल माझ्या मनात निश्चित शंका होती कारण, दोघांचा धर्म व देश वेगळा आहे. जन्मापासून आम्ही वेगळ्या संस्कारांमध्ये मोठे झालो, आमच्या श्रद्धा निराळ्या होत्या. पण, आता मला समजले की माझ्या श्रद्धा जपत असतानाही मी आता अधिक मुक्त, आनंददायी, चैतन्यमय हिंदुधर्मसागरात पुढचे पाऊल टाकले आहे. या संस्मरणीय संक्रमणासाठी आम्ही दोघे नेहमी कृतज्ञ राहू.

असे अनुभवल्यावर साहजिकच प्रश्न पडतो आपण एकमेकांशी कशाने जोडलेले आहोत? संस्कृतीने, विश्वासाने, आत्मियतेने, माणुसकीने? काहीतरी असे आहे जे बाहेरच्या जगात उलथापालथ चालू असतानाही जीवंत राहते ते म्हणजे या पलीकडचं काहितरी आहे.. या काहीतरीच नाव कोण सांगेल मला…