बांधिलकी आणि कार्यक्षमता: दहा-बारा वर्षांपूर्वी प्रबोधिनीतील तेव्हाच्या महाविद्यालयीन सदस्यांमध्ये एक वाद रंगलेला होता. समाजातील विविध कामे, कार्यकर्ते व संस्था यांना भेटी द्यायला ते जायचे. भेटीहून परत आल्यानंतर प्रत्येक वेळी वाद व्हायचा की ‘कमिटमेंट’ (म्हणजे ध्येयाशी निष्ठा किंवा बांधिलकी) आधी निर्माण झाली पाहिजे की ‘कॉम्पिटन्स्’ (कार्यक्षमता) आधी निर्माण करायला पाहिजे? भेट द्यायला जाणाऱ्याचा स्वभाव आणि भेट दिलेल्या कामाचा किंवा कार्यकर्त्याचा प्रभाव यानुसार झोका कधी कमिटमेंटकडे झुकायचा तर कधी कॉम्पिटन्सकडे झुकायचा. या वादाची तीव्रता एवढी होती की दहावीतल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे दोन शब्द पोचले होते.
आधी आस्था हवी : केरळमध्ये तिरुअनंतपुरम् जवळ मित्रनिकेतन नावाची एक संस्था आहे. तिचे संचालक श्री. विश्वनाथन् वरील वादाच्या काळात एक दिवस पुण्यात प्रबोधिनीला भेट द्यायला आले होते. त्यांना मी दहावीच्या वर्गात घेऊन गेलो. त्यांची मुलांबरोबर प्रश्नोत्तरे झाली. त्यामध्ये एका विद्यार्थ्याने त्यांना वरील वादातला प्रश्न विचाला, “तुम्हाला कमिटमेंट महत्त्वाची वाटते की कॉम्पिटन्स्?” उत्तरादाखल त्यांनी त्यांची आणि कै. आप्पांची विमान प्रवासात कशी भेट झाली, त्या वेळी काय बोलणे झाले, त्यांना प्रबोधिनीचे कार्यकर्ते कसे भेटत गेले असा इतिहास सांगितला व शेवटी ते म्हणाले, ‘I agree with Dr. Pendse. First you must feel concern. Commitment, competence and all other things come afterwards. ‘मी डॉ. पेंडसेंशी सहमत आहे. तुम्हाला प्रथम आस्था (कन्सर्न) वाटली पाहिजे. बांधिलकी (कमिटमेंट), कार्यक्षमता (कॉम्पिटन्स) आणि इतर सर्व गोष्टी नंतर येतात.’ श्री. विश्वनाथन् आणि कै. आप्पांची एकदाच विमान प्रवासात दोन तास भेट झाली होती. त्यानंतर सुमारे सतरा अठरा वर्षांनी प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांसमोर आल्यावर त्यांना त्या भेटीतला ‘कन्सर्न’ (आस्था) हा शब्द आठवला.
आस्था शिकवली पाहिजे : कै. आप्पा १९७२ साली इंग्लंडमध्ये गेले होते. तेव्हा तेथील एका परिसंवादात ते सहभागी झाले होते. त्यानंतर लंडन टाइम्स्च्या प्रतिनिधीने त्यांची मुलाखत घेतली होती. लंडन टाइम्स्च्या शैक्षणिक पुरवणीत ती प्रसिद्ध झाली होती. कै. आप्पांच्या बोलण्यातील एक वाक्य “Gifted should be taught concern” हे त्या बातमीचे शीर्षक म्हणून छापले होते. बुद्धिमान विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता देशाच्या व समाजाच्या कारणी लागायची असेल तर समाजघटकांबद्दल मनात आस्था धारण करायला त्यांना शिकवले पाहिजे, हा त्याचा अर्थ.
समाजाबद्दल, देशाबद्दल आणि समाजघटकांबद्दल मनात आस्था वाटणे म्हणजे त्यांच्याशी आपले नाते आहे असे वाटणे. आपले आजचे जीवन त्यांच्या जीवनाशी, आपले भवितव्य त्यांच्या भवितव्याशी जोडले आहे असे वाटणे. आपले आयुष्य इतरांशी जोडलेले आहे याची जाणीव जितकी प्रखर व सातत्याने होत राहील त्या प्रमाणात निष्ठा, कार्यक्षमता हे सगळे नंतर निर्माण होतात किंवा मिळवता येतात, हा कै. आप्पांच्या किंवा श्री. विश्वनाथन् यांच्या बोलण्यातला सारांश.
आस्थेचे विकसित रूप : आस्थेचेच आणखी एक रूप म्हणजे आपले अस्तित्व इतरांवर अवलंबून असल्यामुळे आपण त्यांच्या ऋणात आहोत असे वाटणे. भारतीय परंपरेनुसार ऋषिऋण, देवऋण व पितृऋण अशी तीन ऋणे घेऊनच प्रत्येक जण जन्माला येतो. या ऋणांतून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. ऋणांची जाणीव ठेवण्याची कृतज्ञता व ऋण फेडण्याची तळमळ हे आस्थेचेच विकसित रूप आहे. परंपरेतील या तीन ऋणांना प्रबोधिनीची घटना लिहिणाऱ्यांनी राष्ट्रीय ऋणाची जोड दिली आहे.
प्रबोधिनीच्या घटनेच्या चौथ्या परिच्छेदामध्ये बुद्धीच्या विकासाला आणखी कोणत्या गुणांची जोड दिली तर सर्वंकष नेतृत्वाची क्षमता वेगाने विकसित होऊ शकेल याची यादी दिली आहे…..हे गुण विकसित होऊन स्वतःवरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात सदैव स्फुरेल असे करणे, असा या परिच्छेदाचा शेवट केला आहे.
राष्ट्रीय ऋणाची जाणीव जर सतत असेल, ते फेडण्याची तीव्र तळमळ जर मनात असेल तर व्यक्तिमत्त्वाचे इतर गुण विकसित झाल्याचा उपयोग आहे. या राष्ट्रीय ऋणाच्या जाणीवेमुळेच गुणसंपन्न व्यक्तीचे कार्यकर्त्यात रूपांतर होते.
नारदमुनींची गोष्ट : छांदोग्य उपनिषद या जुन्या ग्रंथामध्ये नारदमुनींचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीचा एक प्रसंग वर्णन केला आहे. ‘मी इतके सर्व विषय शिकलो तरी मनात काहीतरी बाकी राहिल्याची अस्वस्थता आहे. त्यामुळे मी व्याकूळ झालो आहे’ असे नारद सनत्कुमार या गुरूंना सांगतात. सनत्कुमार नारदांना, ‘तुझा केवळ पुस्तकी अभ्यास झाला आहे. तुला त्या अभ्यासाच्या विषयांचा अनुभव नाही’, असे उत्तर देतात. मग गुरु-शिष्यांचा लांबलचक संवाद सुरू होतो. शब्दज्ञानाकडून अनुभवज्ञानाकडे जाण्याचे टप्पे सनत्कुमार नारदांना समजावून सांगतात.
या संवादाचा शेवट, ‘स्वतःपुरता संकुचित विचार करायचे सोडून व्यापक विचार कर म्हणजे तुझी अस्वस्थता संपेल,’ अशा उत्तराने होतो. असा व्यापक विचार करण्याची सुरुवात म्हणजे इतरांशी असलेला आपला संबंध ओळखणे. कौटुंबिक नात्यांपासून मानवतेपर्यंतच्या नात्यांची ओळख होत गेल्यावर सर्वांविषयी आस्था वाढत जाते.
आस्थेचे विकसित रूप म्हणजे स्वतःवरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव हे आपण पाहिले. आता कार्यक्षमता आधी की कामाशी बांधिलकी आधी या वादाकडे पुन्हा वळू. नारद-सनत्कुमार संवादात असे सांगितले आहे की व्यापकावर लक्ष केंद्रित केले की व्यापकासाठी जगण्यात सुख आहे असे वाटू लागते. हे सुख मिळवण्यासाठी काम सुरू होते. काम करता करता निष्ठा किंवा कामाशी बांधिलकी तयार होते. त्यामुळे आधी आस्था, मग काम; आणि पूर्ण क्षमतेने काम केल्यावर त्यातून बांधिलकी असा क्रम आहे.
ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.४
व्यक्तिविकसनाच्या कल्पना अधिक स्पष्ट करणे उपयुक्त आहे. व्यक्तिविकसन करणे म्हणजे प्रखर बुद्धिमत्तेच्या या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये विशेष गुणसंपदा निर्माण करणे. या गुणसंपदेमध्ये सदाचार, सत्प्रवृत्ती, अभ्यासशीलता, उद्योगप्रियता, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रीय प्रेरणा, उज्वल भारतीय संस्कृतीचा व परंपरेचा अभिमान, स्वावलंबन, उत्स्फूर्तिसंपन्नता (इनिशिएटिव्ह), अंतः प्रेरणा (इण्ट्युशन), संघटन-चातुर्य इत्यादी चारित्र्य गुणांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. हे गुण विकसित होऊन स्वतः वरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव त्यांच्या मनात सदैव स्फुरेल असे करणे.