८. कर्तृत्वाला बांधिलकीचा कणा

विवेकानंदांचा राष्ट्रधर्म : स्वामी विवेकानंदांनी युरोपमधून परतल्यावर मद्रास येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात ‘माझ्या मोहिमेची योजना’ या विषयावर एक व्याख्यान दिले होते. या व्याख्यानाचा शेवट करताना देशभक्तीसाठी आवश्यक अशा तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. देशवासीयांची दुर्दशा पाहून ती दूर करण्यासाठी हृदयाची तळमळ ही पहिली गोष्ट. दुर्दशा दूर करण्यासाठी मार्ग शोधून काढणे ही दुसरी गोष्ट. त्या मार्गाने जाताना पर्वतप्राय विघ्नांना तोंड देता येईल असा दृढनिश्चय असणे ही तिसरी गोष्ट. ज्याच्या ठायी या तीन गोष्टी आहेत असा प्रत्येक जण अचाट कामे करणारा देशभक्त होईल असे स्वामीजींनी म्हटले आहे. प्रबोधिनीलाही कर्मवीर देशभक्तांच्या व्यक्तिमत्त्व विकसनाचा विचार करायचा आहे. तळमळ मार्ग शोधणे-दृढनिश्चय या पायऱ्या म्हणजेच आपण करतो आहोत तो आस्था-क्षमता-बांधिलकी यांचा विचार. त्यापैकी बांधिलकी व्यक्त करणारे पाच गुण क्रमशः विस्ताराने पाहू.

सदाचार : स्वतःशी प्रामाणिक राहून वागणे म्हणजे सदाचार. अप्रामाणिकपणा

शिकायच्या आधीच सदाचार सुरू होतो. सत् म्हणजे काय याची जाणीव जशी वाढत जाते त्या प्रमाणात सदाचार (सत् ला अनुकूल आचार) विकसित होत जातो. अगदी प्रारंभीच्या काळात सदाचारामध्ये १) खरे बोलणे, २) स्वतःच्या चुका व मर्यादा मान्य करणे, ३) मदत करण्याची सदैव तयारी असणे, ४) इतरांशी जुळवून घेण्याची नेहमी तयारी असणे आणि ५) सर्वांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणे असे पाच प्रकारचे वागणे अपेक्षित करता येईल. इतरांमधील अप्रामाणिकपणाची जाणीव होऊ लागल्यावर आपण तसे न वागण्याचाही समावेश सदाचारात करावा लागतो. सदाचाराच्या सुरुवातीच्या पायऱ्यांनंतर ‘विकसता विकसता विकसावे’ या पद्यातील १) तपविता तपविता तपवावे …, २) झिजविता झिजविता झिजवावे…, ३) वितरता वितरता वितरावे … आणि ४) भरडिता भरडिता भरडावे या चार कडव्यांमधील आचार म्हणजे प्रबोधिनीच्या दृष्टीने सदाचाराच्या पुढच्या पुढच्या पायऱ्या आहेत.

सत्प्रवृत्ती : सदाचारासाठी लागणारी तत्परता सत्प्रवृत्तीतून निर्माण होते. आरंभीचा सदाचार हा अनुकरणातून, प्रिय किंवा आदरणीय व्यक्तीच्या सांगण्यावरून, आजूबाजूचे सर्वच तसे वागतात म्हणून होतो. पण हळूहळू सदाचाराचा आग्रह बाहेरच्या कोणत्याही कारणापेक्षा स्वतःच्या प्रेरणेने व्हायला लागतो. ही स्वतःमधील प्रेरणा म्हणजेच सत्प्रवृत्ती. ‘आमची विद्या ही सज्जनांना अभय देण्यासाठी व दुष्टांचे दमन करण्यासाठी असेल. परमेश्वरी शक्तीचे अवतरण सर्व मानव समाजात होण्यासाठी आम्ही आमच्या विद्येचा उपयोग करू’, आणि ‘आमचा कणन् कण आणि क्षणन् क्षण तुझ्याच इच्छेने सार्थकी लागू देत’, असे संकल्प प्रबोधिनीच्या विद्याव्रत संस्काराच्या उपासनेत आणि वर्षारंभ-वर्षान्ताच्या उपासनेत अध्वर्यूने सांगितल्यावर सर्वजण म्हणतात. हेच संकल्प अध्वर्यूने सांगितले म्हणून नाही, तर स्वतःला वाटते म्हणून, मनात स्फुरू लागले म्हणजे सत्प्रवृत्ती जागृत झाली.

सदाचार आणि सत्प्रवृत्ती म्हणजे सत्शी बांधिलकी. कोणत्याही कामाशी, ध्येयाशी, तत्त्वाशी बांधिलकी म्हणजे सत्शी बांधिलकीचाच एकेक अंश आहे.

राष्ट्रीय चारित्र्य : नदीच्या प्रवाहामधील पाण्याच्या थेंबांना समुद्राकडे जाण्याची गती असते आणि प्रवाहातील पाण्याचे सर्व थेंब मिळून नदी होते. या प्रमाणेच प्रत्येक भारतीयाच्या वागण्यातला जो सारखेपणा ते भारतीयांचे राष्ट्रीय चारित्र्य. हा सारखेपणा भाषा, जेवण, उत्सव, कपडे इ. मधून लक्षात येतो. पण पाण्याच्या थेंबाप्रमाणे सर्व भारतीय फक्त एकत्र केले की त्यातून भारत हे राष्ट्र तयार होत नाही. त्यासाठी प्रत्येक भारतीयाला राष्ट्र घडवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडावे लागते. भारतीय लोकसमूहाचा गौरव वाढवण्यासाठी, ओळख टिकवण्यासाठी आणि दुर्लोकिक धुऊन काढण्यासाठी स्वतःचा गौरव, ओळख, दुलौंकिक यांची फिकीर न करता धडपड करणे म्हणजे राष्ट्रीय स्वभाव घडविणे. राष्ट्रीय स्वभाव आपल्याद्वारे प्रकट व्हावा आणि आपण राष्ट्रीय स्वभाव घडवावा या दोन्ही साठी देशाच्या वर्तमान परिस्थितीची समतोल जाणीव असायला लागते. तसेच स्वार्थ कमी होऊन निःस्वार्थी वृत्ती वाढावी लागते.

राष्ट्रीय प्रेरणा : राष्ट्रीय प्रेरणा निर्माण होण्यासाठी देशाच्या भविष्यकाळाचे एक वास्तवपूर्ण पण वैभवशाली चित्र डोळ्यांसमोर उभे राहावे लागते. Vision २०२० हा दस्तऐवज असे चित्र उभे करणारा आहे. अशा बाह्य साधनांचा उपयोग होतोच. परंतु स्वतःमधील राष्ट्रीय प्रेरणा वाढवण्यासाठी स्वतःच देशाच्या भवितव्याचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी कोणतीही गोष्ट किंवा प्रयत्न ‘मला किती व कशा प्रकारे आणि लगेच उपयोगी होणार आहे का?’ असा विचार करणे कमी झाले पाहिजे. सार्वजनिक हिताचे आणि परिणाम दीर्घकाळाने दिसणारे कामही आज करायला तयार असले पाहिजे. म्हणजेच ध्येयनिष्ठा. राष्ट्रीय प्रेरणा अशी ध्येयनिष्ठा व्यक्तीला देते. ध्येय गाठण्याच्या आकांक्षेने मन सदैव प्रफुल्ल व कार्यरत राहिले म्हणजे राष्ट्रीय प्रेरणा विकसित झाली.

उज्ज्वल भारतीय संस्कृतीचा व परंपरेचा अभिमान : भारतीय कालगणनेप्रमाणे भगवद्‌गीता कुरुक्षेत्रावर सांगितली गेली त्याला पाच हजार वर्षे झाली. हे भारतीय संस्कृतीचे किमान आयुष्य आहे. हे राष्ट्र १९४७ साली निर्माण झाले असे म्हणणे म्हणजे भारतीय परंपरेचे अज्ञान आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे व ज्ञानाकडून अभिमानाकडे प्रवास झाला पाहिजे. हजारो वर्षांच्या परंपरेत काळे पांढरे बरेच घडले असणार. पांढरे निवडणे, काळे पुसून टाकणे ही कामे करायला राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय प्रेरणा दोन्ही लागतात. परंतु या दोन्हीसाठी लागणारी ऊर्जा भूतकाळाविषयीच्या उचित आदरातूनच मिळते. आत्मकेन्द्रिततेच्या जागी समाजाचे भूत-भविष्य-वर्तमान व्यक्तीच्या विचाराच्या केंद्रस्थानी आले की उज्ज्वलतेची परंपरा हृदयात अभिमान जागृत करते. राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रीय प्रेरणा व राष्ट्रीय परंपरेचा अभिमान हे सत्शी बांधिलकीचाच भाग आहेत.

संघटन-चातुर्य : घटनेच्या चौथ्या परिच्छेदात बुद्धीच्या विकासाबरोबर ज्या आणखी अकरा गुणांची आवश्यकता मांडली आहे त्यातील शेवटचा गुण आहे संघटन-चातुर्य. कार्यकर्त्याला नेतृत्वासाठी अतिशय आवश्यक असा हा गुण आहे.

‘बुद्धिविकास म्हणजे काय?’ या विषयावर एकदा इ. ९वी ते इ. १२वीच्या विद्यार्थ्यांसमोर कै. आप्पांचे स्वतंत्र वैचारिक झाले होते. त्यावेळी त्यांनी निरीक्षण, आकलन, स्मरण, गूढार्थ-संशोधन, प्रत्युत्पन्नमती, कार्याकार्यविवेक, प्रतिभा, दूरग्रहण, दूरप्रक्षेपण आणि शक्तिप्रदानता हे बुद्धीचे दहा पैलू सांगितले होते. १) दूरग्रहण (म्हणजेच इतरांच्या अंतःस्थितीची जाणीव), २) सामाजिक प्रज्ञा (म्हणजे सामाजिक संबंध व समाजव्यवहार या क्षेत्रात, निरीक्षण ते प्रतिभा हे सात पैलू), ३) सामाजिक संबंध व समाजव्यवहार या शिवाय चिन्हांनी होणारे व्यवहार, प्रतिमांनी होणारे व्यवहार व भाषिक व्यवहार, या बुद्धीचे कार्य चालते त्या उरलेल्या सर्व क्षेत्रात कार्याकार्यविवेक, आणि ४) बुद्धीच्या या सर्व विशिष्ट पैलूंच्या जोडीला प्रेरणा, यांचे एकत्र चालणारे काम म्हणजे संघटन-बुद्धी अशी कल्पना त्यांनी मांडली होती.

गोड भाषणाने व समजूतदारपणाने कोणत्याही गटामध्ये वागता येणे, स्वतः सदैव आशावादी राहून इतरांना आशावादी बनवता येणे, सर्व व्यक्तींना माणूस म्हणून प्रतिष्ठा देणे, अशा वागण्याने या संघटन-बुद्धीचे रूपांतर संघटन-चातुर्यात होते.

कोणत्याही व्यक्तीच्या बुद्धीला क्षमता आणि बांधिलकी वाढविणाऱ्या या एकूण अकरा चारित्र्य-गुणांची जोड दिली तर बुद्धीचा विकास समाजोपयोगी होईल असा आशावाद प्रबोधिनीच्या शैक्षणिक उद्देशांमधून व्यक्त होतो.