११. नव्या पर्वासाठी राष्ट्रजीवनाची पुनर्मांडणी

राष्ट्र पुन्हा उभविणे : देशजीवनाच्या विविध क्षेत्रांत आवश्यकतेप्रमाणे नेतृत्वाची जबाबदारी घेतील असे कार्यकर्ते घडवणाऱ्या शिक्षण-प्रणालीची निर्मिती करणे व ती वापरात आणणे हे प्रबोधिनीच्या घटनेतील पहिल्या सहा परिच्छेदांचे सार आहे. ते प्रबोधिनीचे सर्वात नजिकचे उद्दिष्ट आहे. नेतृत्व विकसन व शिक्षणप्रणालीची निर्मिती ज्यासाठी करायची ती पुढची सर्व उद्दिष्टे ‘स्वदेशात विचार प्रबोधन व कार्य प्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, येथे पुनरुज्जीवन होऊन देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे असा हेतू आहे’, या एकाच वाक्यात घटनेच्या सातव्या परिच्छेदात एकत्र मांडली आहेत.

कार्य प्रबोधन आणि विचार प्रबोधन समाजात जेवढ्या प्रमाणात होत जाईल तेवढ्या प्रमाणात देशाचा कायापालट होत जातो. परंतु कार्य व विचार प्रबोधनाचे सातत्य कार्यकर्त्यांची मने घडण्यावर अवलंबून असते. कार्यकर्त्यांची मने घडविणारी शिक्षण-प्रणाली निर्दोष करत जाणे व मने घडत असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वंकष नेतृत्वाचे गुण विकसित करणे यातून कार्य व विचार प्रबोधनाच्या उद्दिष्टाकडे वाटचाल होणार आहे.

कार्य प्रबोधन व्हावे : कृतिशीलता, उपक्रमशीलता, व्यवहारातील प्रश्न सोडवणे, कामाचा पसारा वाढवणे, आव्हाने स्वीकारणे, कामाच्या पद्धती बसवणे, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ अशी उदाहरणे घालून देणे व असे वातावरण तयार करणे, ‘असाध्य ते साध्य करिता सायास’ असे कर्तृत्वाचे मानदंड तयार करणे आणि जो जो वरीलपैकी काहीही स्वतःच्या आयुष्यात करू इच्छित असेल त्याला मदत करणे हे सर्व म्हणजे कार्य प्रबोधन. ‘आपण करावे, करवावे’ हे सूत्र ज्यांनी आपल्या आयुष्याचे मार्गदर्शक सूत्र केले आहे तेच, कार्य प्रबोधन म्हणजे काहीतरी करावे अशी प्रेरणा जागविणे व त्याला अनुकूल वृत्ती घडविणे असे करू शकतील.

एखाद्या नेत्याने त्याच्या प्रदेशातील प्रशासन कसे गतिशील केले हे त्यांच्याच शब्दात वाचले की वाचणाऱ्याच्या मनात कार्य प्रबोधन होते. ‘कथा इस्रोची’ तिच्या लेखकाच्या तोंडून ऐकली की ऐकणाऱ्याच्या मनात कार्य प्रबोधन होते. ‘अमूल’ डेअरी कशी उभी केली यावरचा मंथन हा चित्रपट पाहिला की कार्य प्रबोधन होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या संयोजनात आठवडाभर काम केले की कार्य प्रबोधन होते. चित्रकूट प्रकल्पाच्या उभारणीची कथा ऐकली की कार्य प्रबोधन होते. डांग जिल्ह्यातील शबरी कुंभाच्या पूर्वतयारीची चित्रफीत पाहिली की कार्य प्रबोधन होते. प्रबोधिनीतील आपल्याहून जास्त अनुभवी कार्यकर्त्यांबरोबर काही दिवस काम केले, की कार्य प्रबोधन होते.

कार्य प्रबोधनाची एकदा पेटलेली ज्योत पेटती राहायची असेल तर विचार प्रबोधनाचा प्राणवायू लागतो आणि कार्यकर्ता म्हणून घडलेल्या मनाचे इंधनही लागते.

विचार-प्रबोधन व्हावे : देशाच्या काया-पालटासाठी लोकांची कार्यसंस्कृती बदलावी लागते. काय काम करायचे, कसे करायचे, का करायचे, काम चांगले झाल्याचे निकष काय, यासंबंधी लोक स्वतः जाणीवपूर्वक विचार करू लागले, इतरांचे विचार तावून-सुलाखून घेऊ लागले, व त्या प्रमाणे वागू लागले म्हणजे विचार-प्रबोधन झाले.

एकोणिसाव्या शतकात राजा राम मोहन राय, महात्मा फुले यांनी विचार-प्रबोधन केले. केरळात नारायण गुरूंनी, महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, गाडगे महाराज यांनी विचार प्रबोधन केले. स्वातंत्र्योत्तर काळात बाबा आमटेंनी युवकांसाठी विचार प्रबोधन केले. नवनिर्माण चळवळीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी विचार प्रबोधन केले. जगातील सर्वात मोठी कामगार संघटना उभारताना दत्तोपंत्त ठेंगडी यांनी विचार प्रबोधन केले. केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या शेकडो सदस्यांनी केरळात वैज्ञानिक विचार पद्धतीचे प्रबोधन केले. सुंदरलाल बहुगुणांनी उत्तरांचलात पर्यावरणविषयक विचार-प्रबोधन केले. काहीतरी कृतीसह विचार प्रबोधन करणे आणि अनेकांनी संघटितपणे विचार प्रबोधन करणे असे दोन नवीन प्रवाह स्वातंत्र्योत्तर काळात दिसतात.

एका विचारसुत्राचे किंवा एखाद्या विचारसरणीचे महत्त्व ठसवून विचार प्रबोधन करण्याची रीत दिसते. आपण न्याय प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहोत. समता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहोत, समृद्धीसाठी काम करत आहोत. बुद्धीचे प्राधान्य मानून काम करत आहोत, व्यक्तीची प्रतिष्ठा वाढावी म्हणून काम करत आहोत, वैज्ञानिक जाणीव वाढावी यासाठी काम करत आहोत, प्रयत्नबादाचे महत्त्व ठसवण्यासाठी काम करत आहोत, बंधुभाव वाढवण्यासाठी काम करत आहोत असे वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्या कामाला विशिष्ट विचाराचा आधार असल्याचे लोक सांगत असतात. हे सगळे उद्देश एखाद्या राजकीय-आर्थिक-सामाजिक विचारसरणीतून आलेले असतात. सगळ्याच विचारसरणींतून ग्राह्यांश घ्यावा व कामाला विवेकयुक्त विचारांचा आधार द्यावा हे विचार प्रबोधन आहे.

देशाचा कायापालट व्हावा, येथे पुनरुज्जीवन व्हावे, देशात आणि लोक मानसात नवचैतन्य निर्माण व्हावे ही सर्व याहून दीर्घ पल्ल्याची उद्दिष्टे आहेत. ती समजून घेण्यासाठी स्वाध्याय, उपासना, स्वतःचे चिंतन आणि समकृती व समकार्य असणाऱ्यांशी संवाद यांचा उपयोग होतो. त्यामुळे घटनेतील उद्देशांच्या एकेका परिच्छेदाविषयी प्रकट चिंतन येथे संपवतो.

ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.७

नेतृत्व-विकसन, शिक्षणप्रणालीची निर्मिती इत्यादी वर ग्रथित केलेल्या उद्देशांच्या मुळाशी स्वदेशात विचारप्रबोधन व कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, येथे पुनरुज्जीवन होऊन देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे असा हेतू आहे. तो साध्य होईल अशा त-हेचे कार्य घडविणे.