परिशिष्ट २ – घटना-परिशिष्ट २ (अंशतः)

सहविचारात्मक नेतृत्वपद्धती

प्रबोधिनीच्या नियमावलीत नियम १७.३ मध्ये संचालक हे सहविचारात्मक नेतृत्वपद्धतीने काम करतील असे म्हटले आहे. याचा नेमका अर्थ काय? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी नेतृत्व करणाऱ्याने मुख्यतः ज्या दोन जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या असतात, त्यांचा स्थूलमानाने विचार करणे उपयुक्त होईल.

ध्येय निश्चिती :

नेत्याने, उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या अनुरोधाने, आपल्या गटासमोरील अथवा संघटनेसमोरील, अथवा कार्यासमोरील ध्येय निश्चित करावयाचे असते. प्रबोधिनीच्या बाबतीत बोलावयाचे झाले, तर प्रबोधिनीचे अंतिम ध्येय हे आता नव्याने ठरवायचे आहे, असे नाही. ते सुनिश्चित आहे. भारतीय समाज आणि भारतीय राष्ट्र यांना वैभवसंपन्न आणि गौरवसंपन्न करणे, हे ते ध्येय होय. समाजाची धारणा करणारा जो धर्म, त्याची पुनर्सस्थापना करणे, हे ज्ञान प्रबोधिनीचे अंतिम ध्येय आहे. घटनेतील नियम ३.७ मध्ये नेतृत्वविकसन, शिक्षणप्रणालीची निर्मिती इ. वर ग्रथित केलेल्या उद्देशांच्या मुळाशी स्वदेशात विचार प्रबोधन व कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, येथे पुनरुज्जीवन होऊन देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे असा उद्देश असल्याचे म्हटले आहे…..

****************************************************************************************************************

मातृभूमि हे दैवत येथे स्थापियले-पूजिले
त्याग, पराक्रम, सेवा यांचे त्रिदल पदी वाहिले
कर्मसुमातुन ज्ञान-भक्तिचे परिमळ दरवळले
चहू दिशांनी आज विकसती या कमलाची दले ।।

पूर्तीला जातील येथुनी जनमनिची ईप्सिते
घडतिल येथे द्रष्टे, चिंतक, नवयुगनिर्माते
प्रखर तयांची प्रज्ञा वेधिल विश्वरहस्याते
देवत्वाप्रत खचित पोचतिल पथिकसंघ येथले ।।