भाग १ – १. देशसेवेची विविध रूपे

बुद्ध्याची वाण धरिले

एखाद्या आंब्याच्या झाडाला भरपूर मोहोर आला, तर नंतर आंबेही भरपूर मिळतील असा अंदाज आपण करतो. पण समजा, फक्त एकच फळ लागले आणि बाकी सगळा मोहोर गळून गेला. नंतर ते एकच फळ चांगले पिकले आणि त्याचा स्वादिष्ट आंबा तयार झाला, तर मग या एका फळावरून सुद्धा या झाडाचे फळ फार उत्तम असते असे आपण म्हणू.

लवकरच १०० कोटींच्या घरात जाणाऱ्या हिंदू समाजातही ज्यांचे आयुष्य परिपूर्ण झाले आहे, ज्यांना परमेश्वराचे दर्शन झाले आहे अशा काही हजार व्यक्ती नेहमी असतातच. एका आंब्यावरून बाकीचा मोहोर गळून गेलेल्या झाडाचे चांगले गुण जसे ओळखायचे, तसेच अशा आत्मसाक्षात्कार झालेल्या काही हजार व्यक्तींवरून 100 कोटी हिंदू समाजाचे आत लपून राहिलेले गुण ओळखायचे.

जुन्या काळातली भाषा अशी की, ‌‘एक चांगला आंबा पिकण्यासाठी बाकी सारा मोहोर गळून पडलाच पाहिजे. गळून पडणे हेच त्या मोहोराचे परमेश्वराने नेमून दिलेले काम आहे‌’. नवीन काळाची भाषा अशी आहे की, ‌‘सुंदर रंगाचा, चांगल्या स्वादाचा, मोठ्या आकाराचा, भरपूर रसाचा आणि उत्तम वासाचा एक आंबा एखाद्या झाडावर लागत असेल, तर बाकीच्या मोहोरातही अशा फळात रूपांतर होण्याचे सामर्थ्य आहे. फक्त त्या झाडाच्या Genes मध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला आहे. प्रयत्नपूर्वक तो दोष शोधून काढू, प्रयोग करून तो दोष
दुरुस्त करू, म्हणजे मग मोहोराने फुललेले झाड फळांनी लगडून जाईल.‌’

आध्यात्मिक स्त्री-पुरुषांची परंपरा हे हदू समाजाचे वैशिष्ट्य आहे; पण अशा काही हजार स्त्री-पुरुषांसाठी बाकीच्या कोटि-कोटी लोकांनी दारिद्रय, अज्ञानात आणि दैन्यात अडकून पडण्याचे काही कारण नाही. नवीन काळाची भाषा अशी आहे की, या सर्वच लोकांचे दारिद्रय, अज्ञान आणि दैन्य प्रयत्नाने दूर होऊ शकेल.

पंधरा दिवसांपूर्वी काही युवकांनी आयुष्यभर राष्ट्रसेवा करण्याचा संकल्प प्रकटपणे प्रतिज्ञा घेऊन व्यक्त केला. आपल्या कामाने, एका बाजूला गरीब आणि अगतिक असलेला १०० कोटींचा समाज आणि दुसऱ्या बाजूला सदैव परमेश्वरी शक्तीशी संवाद करणारे काही हजार स्त्री-पुरुष यांच्यामधील दरी सांधणे म्हणजे राष्ट्रसेवा करणे. हा पूल कसा बांधायचा ?

सेतुबंधनाचा आराखडा :

असा पूल बांधायचा झाला तर प्रत्येकाने स्वत:च्या मनात स्वत:च एक आराखडा निश्चित केला पाहिजे. सहकाऱ्यांबरोबर बोलतबोलत त्यातून सर्वांचा समान आराखडा ठरवला पाहिजे.कल्पनाच करायची झाली तर १०० कोटींचा समाज हिंदुस्थानामध्ये तरी कुटुंबामध्येच विभागलेला राहणार. सरासरी पांच माणसांचे कुटुंब धरले तर 20 कोटी कुटुंबप्रमुखांना


बरे खावे बरे जेवावे। बरे ल्यावे बरे नेसावे ।
समस्ती बरे म्हणावे। ऐसी वासना॥

अशी सर्वसामान्यांची किमान इच्छा पूर्ण करता आली पाहिजे. स्वत:च्या कुटुंबापलिकडे आणखी एका कुटुंबाला अशी इच्छा पूर्ण करायला मदत करणे ही किमान देशसेवा झाली. या वीस कोटींपैकी २०% म्हणजे ४ कोटी लोकांध्ये ऐश्वर्य मिळवण्याची आकांक्षा निर्माण करणे ही देखील राष्ट्रसेवाच आहे. या ४ कोटींपैकी निदान २०% लोकांध्ये – म्हणजे ८० लाख ऐश्वर्यसंपन्न लोकांध्ये मिळवलेली संपत्ती, विश्वस्त वृत्तीने संपत्ती वापरण्यापर्यंत सर्व गोष्टी करण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. परंतु विश्वस्त वृत्तीने वागणाऱ्या ८० लाख,
ऐश्वर्यवंतांच्या २०%, म्हणजे १६ लाख व्यक्ती तरी नवीन ज्ञानाचा शोध घेण्याची आकांक्षा असलेल्या पाहिजेत. अशी प्रखर जिज्ञासा असलेल्या व्यक्ती निर्माण करणे ही राष्ट्रसेवाच आहे. उदरनिर्वाहासाठी शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून अनेकांना काम करायला लागेल; परंतु केवळ ज्ञानाचीच आकांक्षा बाळगणाऱ्या १६ लाख संशोधकांपैकी २०% म्हणजे ३,२०,००० व्यक्ती निरपेक्षपणे सर्व वेळ ज्ञानदानातच मग्न असल्या पाहिजेत. असे निरपेक्ष ज्ञानदान करण्याची प्रेरणा निर्माण करणे ही राष्ट्रसेवाच आहे. काहीजण संपत्ती मिळवतील. काहीजण नवीन ज्ञान निर्माण करतील. संपत्ती किंवा ज्ञानाचे विश्वस्त वृत्तीने दान करणे काही जणांना जमेल. हीच राष्ट्रीय नीतिमत्ता. निरपेक्ष विद्यादान करणाऱ्यांच्या २०%, म्हणजे ६४,००० व्यक्ती तरी विद्या, संपत्ती आणि नीती या तिन्हींने युक्त असल्या पाहिजेत. हे एवढे सगळे घडले तर याही व्यक्तींच्या २०% म्हणजे १२,८०० व्यक्ती या सतत परमेश्वर चिंतनातच मग्न आहेत याचा अभिमान आपल्याला बाळगता येईल. यातले कुठलेही काम करणे म्हणजे राष्ट्रीय वास्तव आणि राष्ट्रीय आदर्श यांच्यातील पुलाचा एक चिरा आपण बसवला असे होईल.

सौर १, फाल्गुन शके १९१७
२०.२.१९९६