डोळस मोरपिसारा फुलवू पंचेन्द्रिय मनबुद्धिचा
नील नभांगणि मेघ बोलवू देशाच्या समृद्धीचा ।। धृ.।।
अज्ञाताला अनुभवणारी अमूर्त समजुन देणारी
तालसूर, शिल्पाचा, अभिनय, नाट्याचा रस घेणारी
बहुविध प्रज्ञा अशी रूजावी शिक्षणातुनी मनोमनी
उत्साहाचे सृजनामध्ये रूपांतर हो क्षणोक्षणी
कुतूहलातुन जन्मा यावा झरा जिता नवसिद्धीचा ।।१।।
सत्य शुभंकर जे जे त्याला अनुसरण्याचे धैर्य हवे
ठरली चौकट पार कराया निर्भय बळ अवतरो नवे
अभिनव उत्तर शोधण्यात मन चुका कराया भिऊ नये
आणि उद्याच्या आयुष्याचे पाथेयच हाती यावे
जीवनास आधारभूत जे ठरेल ते ते देण्याचा ।।२।।
नाद गंध कविता रंगांचे प्रतिभालेणे खुलवावे
प्रसुप्त वैभव अंतरिचे हे दोन हातांनी उधळावे
आनंदाचे निर्झर अवघे मनीमानसी उमलावे
राव रंक उत्फुल्ल मनाने समरस होऊनी नाचावे
कलाकुतूहल दैवी असेल हक्कच आहे सर्वांचा ।।३।।