धडधाकट घरधनी हवा न् बाळ गुटगटीत गोजिरवाणं
आई सोन्याची पुतळी जशी ही काया देवाघरचं लेणं ।। ध्रु. ।।
ही मोकळी रानची हवा, झऱ्याचं झुळझुळ निर्मळ पाणी
माझ्या घामाची भाकर अर्धी, त्यावर मीठ मिरचीचं खाणं ।। १ ।।
गाव ठिपक्याची रांगोळी जशी, राऊळ गाजतंय रात्रंदिन
तालमीत तांबडी तरणी पोरं, न् साळंमधी बाळाचं चाललंय ल्हेनं ।।२।।
रानावनात हिरवी पानं, अवघा शिवार गातोय गानं
माझ्या कौलारू छपराखाली, हा संसार बावन्न कसाचं सोनं ।। ३ ।।
चित्र मोठं छान त्यानं हरपलं भानं, गाव आणि घर याचं मांडिलं सपान
पण हाय हाय इपरित घडतंया सारं, अचानक उलटंच फिरतंया वारं ।। ४ ।।
पुरी अडाणी राहिली लोकं, गरीबी घेतीया आपला प्राण
भुताखेतानं धरलंय डोकं, गावभर माजलीया मायंदाळ घाण ।।५।।
घरोघर ही पाटीभर पोरं, आपसात भांडत्यात लहानथोर
शेतीकाम करीना कुणी, पुढारी गिळतोय अवघं नाणं ।। ६ ।।
जो तो आयतंच मागतोय खाणं, उठसूठ दसपिंड यात्रा न् लग्न
जरा काय झालं की इस्पितळ, उगीचंच औषध इंजेक्शन ।। ७ ।।
असं झालं खरं पण बरं नाही सारं, समद्यांनीच करावा आता एक इचार
गाव निखरून निर्मळ करा, वाहू द्या सहकार्याचा झरा
आपणच आपलं डॉक्टर, औषध, वारा, पाणी न् गाणं ।। ८ ।।