उत्तिष्ठत जाग्रत !

त्या तेजस्वी डोळ्यांमधली वीज अजुन सांगते
उत्तिष्ठत जाग्रत ! बंधूंनो उत्तिष्ठत जाग्रत !॥ध्रु.॥

ऐन यौवनी मदन दाहुनी जे प्रलयंकर झाले
वेदान्ताच्या गूढ गुंजनी जे नवशंकर झाले
हिंदुधर्म अन्‌‍ हिंदुदर्शने जगात गाजविली
मानवमात्रा बंधुत्वाची साद जये घातली
असुन विरागी नि:संगाचे जे स्वामी होत॥1॥

अखिल विलासांसह नत होती यक्षभूमि पश्चिमा
मनी परंतु मायभूमितिल आर्तांची वेदना
आणि भुकेल्या श्वानास्तवही मोक्षाची हेळणा
हेच डोळुले शिणले होउनि बुद्धाची करुणा
मठबद्धांना मानवतेची शिकवित नवगीते॥2॥

त्या डोळ्यांनी अनागताचा थेट वेध घेउनी
भारतभूच्या भवितव्याचे स्वप्न भव्य पाहिले
आत्म्याचे संगीत ऐकवुनि जडवादी दुनियेला
भारत विश्वगुरू करण्याचे कार्य अजुनि राहिले
त्या कार्याचा वसा घेउ या, तोच ध्यास ध्येय ते॥3॥