अभंग निरुपण

पतितपावना जानकीजीवना – अभंग क्रमांक – १५

पतितपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावें ॥ धृ ॥भक्तीची आवडी नाही निरंतर । कोरडें अंतर भावेंविण ॥ १ ॥माझे मीतूंपण गेले नाही देवा । काय करूं ठेवा संचिताचा ॥ २ ॥रामदास म्हणे पतिताचें उणें । पतितपावनें सांभाळावे ॥ ३ ॥ ‘रामदास काय म्हणाले?’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९९९ साली प्रकाशित झाली. पण त्यासाठी समर्थ रामदासांच्या साहित्याचे वाचन आणि या पुस्तकासाठी वेच्यांची निवड १९९३ ते १९९६ या काळात झाली. त्या काळात समर्थांनी रचलेली पदे आणि अभंगही वाचनात आले. त्यावेळी ‘पतितपावना जानकीजीवना’ या चरणाने सुरू होणारे पाच अभंग नजरेत भरले. पण पुस्तकात फक्त दासबोधातल्या ओव्या घेणे शेवटी पुरेसे वाटले. ते अभंग पुस्तकात घ्यायचे नसल्याने तसेच बाजूला राहिले. १९९९ सालापासून पुण्याच्या प्रशालेतील आठवीच्या विद्यार्थ्यांचे विद्याव्रत पूर्वतयारी शिबिर सज्जनगडावर घ्यायला सुरुवात झाली. तीन दिवसांच्या शिबिरात रोज एक तास भजन असायचे. तोपर्यंत रामदासांचे दोन-तीनच अभंग प्रबोधिनीत म्हटले जात. शिबिरातील रोजच्या भजनात, रामदासांचे आणखी काही अभंग असावेत असे वाटले. तेव्हा ‘पतितपावना जानकीजीवना’ अशी सुरुवात असणारे पाच अभंग पुन्हा आठवले. हे अभंग विद्याव्रत पूर्वतयारी शिबिरात २००२ ते २०१४ पर्यंत नियमितपणे म्हटले जात. त्या पाच अभंगांपैकी पहिला अभंग आज निरूपणासाठी निवडला आहे. पतित म्हणजे खाली पडलेला. ज्याचे नैतिक आचरण समाजाच्या दृष्टीने निंदनीय आहे, त्याला पतित म्हणतात. पण इथे जो आपली शिवस्वरूपाची ओळख विसरला आहे, आणि जो स्वतःला एक असहाय्य किंवा अगतिक जीव मानतो, तो पतित असा अर्थ घेणे जास्त योग्य आहे. पतिताला जो पावन करतो, म्हणजे शुद्ध करून घेतो, किंवा पडलेल्या स्थितीतून पुन्हा मूळ स्थितीला आणून ठेवतो, तो पतितपावन. हे विशेषण किंवा संबोधन श्रीरामाला म्हणजेच परमेश्वराला लावले जाते. तो परमेश्वर श्रीराम या मानवी अवतारात जानकीच्या म्हणजे सीतेच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारा आहे. म्हणून त्यालाच जानकीजीवना असेही संबोधन वापरले आहे. त्याला प्रार्थना केली आहे, की माझे मन स्वतःला निराधार जीव मानते. त्याला पुन्हा त्याच्या शिवस्वरूपाची आठवण करून दे. समर्थांनी इतर ठिकाणी वापरलेले शब्द म्हणजे स्वतःला जीव मानणे, किंवा मी म्हणजे हा देहच आहे असे मानणे, ही देहबुद्धी. आणि स्वतः शिव आहोत हे ओळखणे, म्हणजे आत्मबुद्धी. माझी देहबुद्धी तू आत्मबुद्धीमध्ये पालटून टाक. आणि हा बदल सुद्धा वेगाने म्हणजे लवकरात लवकर कर. ही या अभंगातली मुख्य प्रार्थना आहे. अभंगाच्या पुढच्या दोन कडव्यांमध्ये मी किती प्रकारांनी पतित आहे, त्याचे वर्णन केले आहे. या निरूपणमालेत तुकाराम महाराजांचा ‘माझे मज कळो येती अवगुण’ हा अभंग पाहिला होता. त्यासारखाच हा अभंग आहे. जो साक्षात्काराच्या जवळ गेलेला आहे त्याला आपल्यातील छोटे-छोटे दोष सुद्धा मोठे वाटायला लागतात. त्यामुळे ‘तुझ्या भक्तीची आवड मला निरंतर, म्हणजे सर्वकाळ राहत नाही’, म्हणून समर्थ स्वतःला पतित समजतात. भक्ताची साधना चालू असते, तेव्हा एकदा कधीतरी त्याला सहज ईश्वरदर्शन होऊन जाते. पण त्यात ईश्वराच्या कृपेचा भाग जास्त असतो. त्यानंतर भक्ताला सतत ईश्वरदर्शन होत राहावे असे वाटते, ते मात्र होत नाही. माझे प्रयत्न कुठे कमी पडतात? भक्तीमध्ये मी कुठे कमी पडतो? असे त्याला वाटायला लागते. मला सतत ईश्वरदर्शन होत नाही, मला पाहिजे तेव्हा ईश्वरदर्शन होत नाही, म्हणजे माझ्या भक्तीतच काहीतरी कमी पडते, असे त्याला वाटते. ईश्वराच्या भक्तीऐवजी जगातल्या व्यावहारिक गोष्टींंचे विचार मनामध्ये येतात. ईश्वरच सर्वकाही आहे, यावरचा आपला विश्वास, म्हणजे भाव, कमी आहे असे त्याला वाटायला लागते. ज्याच्या अंगाला काहीच चिकटत नाही तो कायम कोरडा राहतो. ज्याचे मन, म्हणजे अंतःकरण, म्हणजेच अंतर, कायम ईश्वराला जोडलेले नाही ते अर्थातच कोरडे असले पाहिजे. सर्वत्र ईश्वर आहे असा विश्वास असला तर तुम्ही व्यवहारात असा किंवा साधना करत असा, ईश्वराशीच जोडलेले असाल. पण ईश्वरावर पूर्ण विश्वास नसला, तर व्यवहार करताना आपोआपच ईश्वरावरचे लक्ष बाजूला होते. कमळाचे पान पाण्यात असते. पण पाण्याबाहेर काढले की सर्व पाणी निथळून जाते. पानाला एक थेंब चिकटलेला नसतो. एरवी हे उदाहरण मन एवढे ईश्वरात बुडालेले असते की व्यवहार मनाला चिकटत नाही असे कर्मयोग्याचे वर्णन करण्यासाठी देतात. पण तेच उदाहरण मला इथे उलट अर्थाने घ्यावेसे वाटते. मन व्यवहारात एवढे गुंतून जाते की ईश्वर स्मरण केले पाहिजे हे माहीत असले तरी त्याची आठवण राहत नाही. कमळाचे पान जसे पाण्याबाहेर काढल्यावर कोरडेच राहते, तसे ईश्वर आहे हे बुद्धीला कळले तरी मनाला त्याची खात्री वाटत नाही. ही खात्री किंवा विश्वास नाही म्हणजेच भाव नाही म्हणून मन किंवा अंतर कोरडे आहे असे म्हटले आहे. हा कोरडेपणा कसा असतो याचे आप्पांनी छान वर्णन केले आहे. त्याची सुरुवात ‘मला काय मिळाले?’ किंवा ‘माझे काय आहे’ या ‘मी-केंद्रित’ विचाराने होते. हा विचार जास्त होत राहिला की ‘इतरांचे काय आहे?’ आणि ‘इतरांना काय मिळाले?’ याबाबतीत ‘मला काय त्याचे’ अशी बेफिकिरीची किंवा बेपर्वा वृत्ती होते. त्याला आप्पांनी अनास्था असे म्हटले आहे. ‘मी-केंद्रित वृत्ती’ आणि इतरांविषयी अनास्था यातून, सर्व काही, सर्व वेळ माझ्यासाठीच, या स्वार्थी वृत्तीचा जन्म होतो. आणि जे काही सर्व वेळ मलाच मिळायला पाहिजे, ते आज, आत्ता, लगेच मिळणार असेल, तरच ते उपयोगाचे अशा उपयुक्ततावादी वृत्तीचा जन्म होतो. मी-केंद्रितता, अनास्था, स्वार्थ आणि उपयुक्ततावाद, हे सगळे मनात भरलेले असेल, तर ईश्वरप्रीती काय, मानवप्रीती आणि राष्ट्रप्रीतीलाही मनात स्थान असत नाही. अशा कोरड्या अंतःकरणाला आप्पांनी भावनाकोश रिता असणे असे म्हटले आहे. अंतःकरणामध्ये ईश्वरप्रीतीची ओल निर्माण होण्यासाठी नियमित दैनंदिन उपासना केल्याचा उपयोग होतो, असे आप्पांनी म्हटले आहे. उपासनेने माझे कोरडेपण थोडेफार कमी झाल्याचा अनुभव, मीही घेतला आहे. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र म्हणत गेल्याने मी-केंद्रित विचार कमी होऊन मीे हळूहळू इतरांना मधून मधून विचाराच्या केंद्रस्थानी आणू लागलो. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’ हा मंत्र म्हणत गेल्याने माझी अनास्था कमी होऊन संघटनेशी दूरान्वयाने संबंध असलेल्या व्यक्तींंविषयीही आस्था, म्हणजेच आपलेपणाने दखल घेण्याची वृत्ती, वाढायला लागली. शुद्धिमंत्रांपैकी ‘ॐ मनो-वाक्‍-काय-कर्माणि मे शुद्ध्यन्ताम्’ हा मंत्र म्हणत गेल्याने स्वार्थ साधण्याचा विचार कमी होऊ लागला. इतरांच्या हिताचा विचार वाढू लागला. शुद्धिमंत्रांपैकी पुढचा पंचकोशांच्या शुद्धीचा मंत्र म्हणत गेल्यावर उपयुक्ततावाद कमी होऊन, दीर्घकालीन ध्येयासाठी लगेच परताव्याची अपेक्षा न करता, निरपेक्ष कृती होऊ लागली. आणि मग स्वगत चिंतन करताना आपण राष्ट्राचा, मानवतेचा आणि ईश्वरशक्तीचा भाग आहोत याची जाणीव वाढत जाऊन त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि त्यांच्यासाठी जगण्याचा संकल्प मनात स्फुरू लागला. हे प्रेम वाढणे म्हणजेच आपले आत्मबळ वाढणे. हा संकल्प पूर्ण होण्यासाठी, केवळ माझ्याच नाही तर, आमच्या सर्वांच्या ‘बुद्धीला प्रचोदना मिळो’ ही गायत्री मंत्रातील प्रार्थनाही मग मनःपूर्वक होऊ लागली. आपण इतके प्रयत्न केले की तो पतितपावन जानकीजीवन आपले मन वेगाने पालटायला येईलच, असा विश्वास वाटू लागला, म्हणजे आपले कोरडे असलेले अंतर ईश्वरी प्रेमाने ओले होऊ लागले किंवा भावनाकोश भरू लागला. एवढे सगळे कळले तरी माझे ‘मी-तू’पण संपत नाही. जोपर्यंत मी-केंद्रितता पूर्ण जात नाही, तोपर्यंत मी वर्तुळाच्या मध्यभागी आणि बाकीचे सगळे परिघावरचे ‘तू’, ज्यांना मी माझ्याऐवजी विचाराच्या केंद्रस्थानी आणायचा प्रयत्न करतो, अशी विभागणी होतच राहते. आपले मन पूर्णपणे पालटण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. या प्रयत्नांमध्ये आपण टिकवलेली किंवा मिळवलेली शारीरिक शक्ती, आपल्याकडे असलेले किंवा मिळवलेले धन, आपण गोळा केलेले विविध

पतितपावना जानकीजीवना – अभंग क्रमांक – १५ Read More »

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते – अभंग क्रमांक – १४

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवीते हरीवीण ॥ १ ॥देखवी ऐकवी एक नारायण । तयाचे भजन चुको नये ॥ २ ॥मानसाची देव चालवी अहंता । मीच एक कर्ता म्हणो नये ॥ ३ ॥वृक्षाचेहि पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठे ॥ ४ ॥तुका म्हणे विठो भरला सबाह्य । उणे काय आहे चराचरी ॥ ५ ॥ हा अभंग जवळजवळ पंधरा-वीस वर्षे भजनामध्ये म्हटला होता. त्याचा अर्थ महत्त्वाचा आहे असे वाटायला १९९२-९३ साल उजाडले. एका युवतीने आवराआवर करताना सापडलेला एक जुना दिवाळी अंक आणून दिला. त्यात ‘मला परमेश्वरी शक्तीचा प्रत्यय कसा आला?’ या विषयावर पंचवीस जणांच्या मुलाखती छापून आल्या होत्या. त्यात आप्पांचीही मुलाखत होती. त्या मुलाखतीमध्ये विवेकानंदांवर कथा लिहिण्याची प्रेरणा कशी झाली, प्रबोधिनीच्या वास्तूसाठी जागा शोधायला मार्गदर्शन कुठून मिळालं, अडचणींंना तोंड देण्याची शक्ती कशी मिळाली, याचे अनुभव सांगत आप्पांनी शेवटी असे म्हटले आहे की ‘माझी इच्छाशक्ती ही परमेश्वराच्याच इच्छाशक्तीचा एक भाग आहे असे मला जाणवत असते. परमेश्वरी इच्छाशक्तीच गुरू किंवा मित्र म्हणून माझे हात बळकट करत असते’. मुलाखत १९७५ सालची. मी वाचली १९९२ साली. पण वाचण्यापेक्षा ऐकण्याने आणि पाहण्याने जास्त विश्वास बसतो, त्यासाठी आणखी दोन भेटींंचे योग यायला लागले. विवेकानंदांच्या भारत परिक्रमेचं शताब्दी वर्ष १९९२ मध्ये होतं. त्या निमित्ताने विवेकानंद केंद्राने कलकत्ता ते हिमालय ते कन्याकुमारी असे ज्या मार्गाने विवेकानंद गेले त्याच मार्गाने एक रथयात्रा काढली होती. ती पुण्यात आली तेव्हा त्या यात्रेबरोबरचे कार्यकर्ते प्रबोधिनीचे काम बघायला आले होते. शिवापूरलाही गेले होते. त्यांच्याशी बोलताना त्यांना मी विचारले की अशी योजना करण्याचा विचार तुम्हाला कसा सुचला? त्यांचे प्रमुख म्हणाले की आम्ही विचार केला नाही. स्वामीजींंनी आम्हाला प्रेरणा दिली आणि तेच आमच्याकडून यात्रा करून घेत आहेत. काही दिवसांनी विवेकानंद केंद्राच्या अध्यक्षा भेटल्या. त्या म्हणाल्या वर्षभराच्या यात्रेचे नियोजन आणि कार्यवाही करण्याइतके कार्यकर्त्यांचे बळच आमच्याकडे नाही. गावोगावचे लोक त्या त्या ठिकाणचा यात्रेचा कार्यक्रम यशस्वी करतात. स्वामीजीच आमच्याकडून हे काम करून घेत आहेत. त्यानंतर १९९३ सालच्या गणेशोत्सवात मी तिरुअनंतपुरमला एका शैक्षणिक परिषदेसाठी गेलो होतो. परिषदेच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून काही संस्थाभेटी होत्या. एका गावात ‘विनोबानिकेतन’ नावाची संस्था बघायला आम्हाला नेले होते. विनोबांच्या भूदान यात्रेत हे गाव ग्रामदान करणारे झाले होते. ग्रामदानाची प्रेरणा क्षणिक असू शकते. ती टिकाऊ करण्यासाठी भूदान यात्रेत त्यांच्या बरोबर असलेल्या एक केरळी संन्यासिनी परिव्राजिका राजम्मा यांना विनोबांनी त्याच गावात थांबायला सांगितले. ग्रामदानाचा खरा अर्थ गावकऱ्यांना समजावून सांगणे हे त्यांचे काम.  १९५७ सालापासून त्या तिथेच होत्या. त्या मला १९९३ साली भेटल्या. शेवटची बातमी कळली तेव्हा २०१९ सालीही, वयाच्या ९४ व्या वर्षी त्या तिथेच होत्या. गाव वनवासी भागातले आहे. आणि वनवासी भागातील मुलींंचे वसतिगृह चालविणे, त्यांना शिक्षण देणे, हे त्यांचे मुख्य काम अव्याहत चालू आहे. त्यांच्या भेटीत त्यांनी सांगितले की भूदान यात्राच परमेश्वरी प्रेरणेने सुरू झाली. परमेश्वरानेच विनोबांच्या तोंडून मला इथे राहायला सांगितले आणि परमेश्वर माझ्याकडून काम करून घेत असताना माझ्या स्वभावाचा त्यात अडथळा होणार नाही असा प्रयत्न मी करत असते. प्रथम आप्पांची मुलाखत वाचली. मग विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांचा सामुदायिक अनुभव आणि राजम्मांचा व्यक्तिगत अनुभव ऐकायला मिळाला. त्यानंतर मला हा अभंग समजून घ्यायची दृष्टी मिळाली. सत् म्हणजे असणे. सत्-ता म्हणजे असणेपण म्हणजेच अस्तित्व. ‘कोणाचिये सत्ते’म्हणजे कोणाच्या असण्याच्या किंवा अस्तित्वाच्या आधारावर किंवा बळावर, कोणत्या शक्तीचा आधारावर, आपलं हे शरीर चालते याचा विचार करून पाहा. आपले चालणे, बोलणे, ऐकणे, पाहणे या सर्व क्रिया ज्या शक्तीच्या आधाराने चालतात त्या शक्तीलाच आम्ही हरी, नारायण अशा नावाने पुकारतो. त्या शक्तीची सतत जाणीव ठेवली पाहिजे. ती जाणीव जिवंत राहण्यासाठी तिचे स्मरण किंवा भजन न चुकता केले पाहिजे. विजेचा प्रवाह शॉर्ट सर्किट होऊन तुटला की विजेवर चालणारी उपकरणे बंद पडतात. तसे जिच्या सत्तेने म्हणजेच अस्तित्वामुळे आपले शरीर चालते, त्या शक्तीचे भजन करायचे चुकले, म्हणजे राहिले, की त्या शरीराच्या हालचाली निरुद्देश व्हायला लागतात. म्हणून परमेश्वरी शक्तीच्या योजनेप्रमाणे आपल्या शरीराचा उपयोग होण्यासाठी तिचे भजन करत राहिले पाहिजे. मानस म्हणजे मन. मानसाची अहंता, म्हणजे आपल्या मनात ‘मी चालतो’, ‘मी बोलतो’, ‘मी पाहतो’ असा जो विचार सतत असतो तो विचार. पण चालणे, बोलणे, ऐकणे, पाहणे या क्रिया जो देव चालवतो तोच देव आपल्या मनातल्या ‘मी करतो’ या विचारालाही बळ देत असतो. ‘मीच एक कर्ता’ म्हणजे मी सर्व काही करतो हा विचार, फसवा आहे. आपण भजन करायचे चुकलो, म्हणजे विसरलो, की मीच सर्व करतो असं वाटायला लागतं. हा विचार आपल्या मनात वरचढ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ‘कर्ता राम आहे, मी नाही’ हे म्हणायची सवय लावून घेतली पाहिजे. झाडावरची पाने हलतात ती कशामुळे हलतात? फांदीवर एखादा पक्षी बसला तर त्याच्या बसण्यामुळे पाने थरथरतात. झाडावर बसलेल्या माकडांनी फांद्या हलवल्या की पानेही हलतात. वाऱ्याची झुळूक आली तरीही पाने हलतात. लाजाळू सारख्या झाडाच्या पानांना स्पर्श केला तरीही ती मिटतात. थोडक्यात झाडावरचे पान स्वतःहून हलत नाही. पक्षी, माकड, वारा किंवा हाताचा स्पर्श यामुळे ते हलते. आणि या सगळ्यांच्या मागे ज्या शक्तीचे अस्तित्व आहे, त्या शक्तीमुळेच खरे तर छोट्याश्या पानाचीही हालचाल होत असते. जसा छोट्याश्या पानाच्या अहंतेला म्हणजे ‘मी हलतो’ या विचाराला काही अर्थ नाही, तशी माणसाच्या मनातील अहंताही त्या नारायणाच्या सत्तेवर अवलंबून आहे. मग ती अहंता, म्हणजे ‘मी संकल्प केला’, ‘मी योजना केली’, ‘मी काम केले’, ‘मी बदल घडविला’ असे मीपण, मिरविण्यात काय अर्थ आहे? जशी आपली त्वचा, स्नायू, हाडे शरीराला आकार देतात, तशी त्या शरीराची रचना क्रियाशील किंवा जिवंत ठेवण्यासाठी आपल्यातील अहंता उपयोगी पडते. त्या अहंतेचा एवढाच उपयोग. ‘डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो…’ या बाळबोध श्लोकामध्ये आपल्या सर्व क्रियांचे वर्णन करून शेवटी, ‘…घेतो झोप सुखे, फिरूनि उठतो ही ईश्वराची दया’ असे म्हटले आहे. हेच खरे. या सर्व क्रिया चालू राहण्यासाठी ईश्वराला फार लक्ष घालायला लागू नये, म्हणून त्यानेच शरीरात थोडी अहंता घालून ठेवली आहे. परमेश्वराच्या मोठ्या अहंतेचा छोटासा भाग त्याने प्रत्येक शरीरात ठेवला आहे. ते ते शरीर चालवण्याची जबाबदारी त्या त्या शरीरात ठेवलेल्या अहंतेवर सोपवली आहे. आप्पांना जो अनुभव आल्याचे मी वाचले, विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांकडून आणि परिव्राजिका राजम्मा यांच्याकडून जे अनुभव ऐकले, तसाच अनुभव त्यांच्या आधी तुकाराम महाराजांनाही आला होता. म्हणून ते म्हणतात की विठ्ठल सबाह्य म्हणजे जसा आत आहे तसा बाहेरही भरलेला आहे. तो नाही असे चर म्हणजे सजीव, किंवा अचर म्हणजे निर्जीव, असे काही नाही. चर-अचरामधून त्याला उणे म्हणजे वजा केले तर काहीच शिल्लक राहणार नाही. तो आहे म्हणूनच सर्व आहे. तोच सर्व काही करतो, म्हणून आपल्याला सर्व घडामोडी होताना दिसतात. मी कर्ता आहे असा विचार मनात येणं, ही सुद्धा मनातील एक घडामोड आहे. ती ही तो परमेश्वरच करत असतो. आरशामध्ये आपले प्रतिबिंब आपल्याला दिसते. केरळात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नारायणगुरू या समाजसुधारक संतांनी एक मंदिर स्थापन केले होते. त्या मंदिरामध्ये गाभाऱ्यात मूर्तीच्या ठिकाणी आरसाच ठेवलेला होता. दर्शनाला गेले की समोर आपलेच प्रतिबिंब

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते – अभंग क्रमांक – १४ Read More »

वैष्णवजन तो तेने कहिअे – अभंग क्रमांक – १३

वैष्णवजन तो तेने कहिअे, जे पीड पराई जाणे रे; परदुःखे उपकार करे तोये, मन अभिमान न आणे रे ॥ धृ ॥ सकळ लोकमां सहुने वंदे, निंदा न करे केनी रे; वाच काछ मन निश्चळ राखे, धन धन जननी तेनी रे ॥ १ ॥ समदृष्टी ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे; जिह्वा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे ॥ २ ॥ मोह माया व्यापे नहि जेने, दृढ वैराग्य जेना मनमां रे; रामनामशुं ताळी लागी, सकळ तीरथ तेना तनमा रे ॥ ३ ॥ वणलोभी ने कपटरहित छे, काम क्रोध निवर्या रे; भणे नरसैयो तेनुं दरशन करतां, कुळ एकोतेर तार्या रे ॥ ४ ॥ प्रबोधिनीमध्ये १९८४ साली गांधी विचार अभ्यास शिबिर झाले होते. त्या शिबिरामध्ये गांधीजींंची आश्रम प्रार्थना म्हटली जायची. त्या प्रार्थनेतला हा अभंग. त्यानंतर वर्ष-दोन वर्ष दर रविवारी प्रबोधिनीतल्या नित्याच्या उपासनेनंतर ही आश्रम प्रार्थनाही म्हटली जायची. काही भाग एकत्र व काही सांगून पाठोपाठ म्हटला जायचा. हा गुजराथी भाषेतला अभंग सांगून म्हणायच्या भागापैकी होता. सात-आठ रविवार नेहमीचे अध्वर्यू नसल्यामुळे तो मला सांगायला लागला. सांगता सांगता या अभंगाचे भगवद्गीतेशी असलेले साम्य लक्षात यायला लागले. गीतेमध्ये ज्ञानाची लक्षणे सांगायच्या ऐवजी ज्ञानी माणसाची लक्षणे सांगितली आहेत. स्थिर बुद्धीची लक्षणे सांगायच्या ऐवजी स्थितप्रज्ञ व्यक्तीेची लक्षणे सांगितली आहेत. भक्तीची लक्षणे सांगायच्या ऐवजी भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. कर्मयोगाची लक्षणे सांगायच्या ऐवजी कर्मयोगी माणसाची लक्षणे सांगितली आहेत. ज्ञान, स्थिर बुद्धी, भक्ती, कर्मयोग या विचाराने समजून घेण्याच्या किंवा स्वतः अनुभवण्याच्या संकल्पना आहेत. त्यापेक्षा त्या संकल्पना ज्याच्यात मुरलेल्या आहेत त्या व्यक्तीचे वागणे-बोलणे पाहणे हे बहुसंख्य लोकांना जास्त सोपे जाते. अशा अशा प्रकारे जो वागतो त्याच्यामध्ये ती ती संकल्पना मुरलेली आहे असे समजा; ही सर्वसामान्य लोकांना शिकविण्याची चांगली पद्धत आहे. तसे या अभंगांमध्ये वैष्णव कोणाला म्हणायचे हे सांगण्यासाठी वैष्णव कसा वागतो हे सांगितले आहे. विष्णूचा भक्त तो वैष्णव. पंधराव्या शतकात गुजराथेत नरसी मेहता आणि बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी वैष्णव भक्तिमार्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. महात्मा गांधींनी या गुजराथी अभंगाचा भारतभर प्रसार केला. मी भगवद्गीता विसरलो तर हा अभंग माझ्यासाठी ध्रुव ताऱ्यासारखे काम करेल असे त्यांनी म्हटले आहे. दासबोधातल्या उत्तम पुरुष लक्षणांमध्ये ‘आपणास चिमोटा घेतला । तेणें कासाविस झाला । आपणावरून दुसऱ्याला । राखत जावे ॥’ असे म्हटले आहे. आपल्याला कोणी चिमटा घेतला तरी त्याचा त्रास होतो. याहून मोठ्या दुःखाच्या प्रसंगात मग इतरांना किती त्रास होत असेल असा विचार करून जो इतरांच्या दुःखाचा स्वतः अनुभव घेतो, त्याला वैष्णव म्हणावे. इतरांच्या दुःखाचा स्वतःच अनुभव घेतल्यावर, स्वतःच्या दुःखाचे कारण दूर करायचा जसा आपण प्रयत्न करतो, तसेच इतरांचे दुःख दूर करायचा प्रयत्न करू. मग इतरांचे दुःख स्वतःचे मानून ते दूर करण्यासाठी केलेल्या अशा कामांना उपकार कसे म्हणता येईल? सर्वांमध्ये जो विष्णूला पाहतो तो विष्णूची सेवा करायची म्हणूनच ते दुःख दूर करायचा प्रयत्न करतो. कितीही सेवा केली तरी ती कमीच असते. त्यामुळे सेवेत कोणावर तरी मी उपकार केला असा अभिमान वाटण्यासारखे काही नसते. असा जो दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी निरभिमान सेवा करतो तोच खरा वैष्णव आहे. दुःखी लोकांचे दुःख दूर करावे. ती त्यांची सेवा झाली. त्याशिवाय इतरांना त्यांच्यातील विष्णूरूप ओळखून नमस्कार करीत जावे. सकळ लोकमां, म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तीनही लोकांमधील, सहुने, म्हणजे सर्वांना, जो आदरपूर्वक वंदन करतो, तोच खरा वैष्णव आहे. समोरून वंदन करायचे आणि मागून निंदा करायची असा काही लोकांचा स्वभाव असतो. त्यांना वैष्णव म्हणता येणार नाही. सगळ्यांना वंदन केल्यामुळे त्यांच्यातले दोष ज्याला दिसतच नाहीत तो खरा वैष्णव. त्यामुळे तो कोणाचीच निंदा करू शकत नाही. निंदा केली नाही की वाणी स्वच्छ राहते. सर्वांना वंदन केले की मन स्वच्छ राहते. आणि इतरांचे दुःख दूर करण्यासाठीच काम केले की ‘काछ’ म्हणजे कर्म देखील सत्कर्म होते. ज्याची वाणी, कर्म आणि मन आपल्या अनुक्रमे चांगले उच्चार, चांगली कृती आणि चांगल्या विचारापासून ढळत नाही, त्याला ते निश्चळ राखता आले. तोच खरा वैष्णव. अशा वैष्णवाला जन्म देणारी आई खरोखरच धन्य आहे. माझ्याजवळ जे आहे आणि इतरांजवळही जे आहे ते सारे ईश्वराचेच आहे. त्यामुळे त्यात माझे आणि इतरांचे असा फरक ज्याला करता येत नाही त्याची दृष्टी सम, म्हणजे सगळ्यांना सारखेपणाने बघणारी आहे. सगळे देवाचेच आहे आणि देवच आपल्याला देतो ही भावना असल्यावर काहीतरी मिळवलेच पाहिजे असा हपापलेपणा, म्हणजे तृष्णा, ज्याने सोडून दिली आहे तो खरा वैष्णव. असा वैष्णव सर्व स्त्रियांकडे आपली आई म्हणूनच पाहतो. या कडव्यामधल्या दुसऱ्या ओळींमध्ये मजेशीर रचना केली आहे. जिह्वा थकी असत्य न बोले – खोटे बोलायचा प्रयत्न करून ज्याची जीभ थकून गेली, पण ती खोटे बोलू शकली नाही, त्यामुळे जो खोटे बोलू शकत नाही, तो खरा वैष्णव. परधन(दुसऱ्याची संपत्ती) नव(नवीन) झाले(धरले) हाथ(हातात) रे – दुसऱ्याची संपत्ती, हाथ झाले, म्हणजे हातात धरण्याचा अनुभव, त्याच्या हातांना, नव, म्हणजे नवीनच असतो. म्हणजे ज्याच्या हातांना दुसऱ्याच्या धनाला स्पर्श करण्याची इच्छा ही झाली नाही तो खरा वैष्णव. खऱ्या वैष्णवाच्या मनातला भाव जिभेपसून हातापर्यंत त्याच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवातहीे भिनलेला असतो. ज्याच्या मनाला वाच, काछ, मन, सन्मार्गावर निश्चळ ठेवण्याचा आपला मार्ग सोडून, भलत्या वाटेने जाण्याचा मोह झाला नाही, आणि कोणत्याही वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये ज्याचा जीव गुंतला नाही, अर्थात ज्याला मायेचा म्हणजे आसक्तीचा स्पर्श झाला नाही तो खरा वैष्णव. मोह-माया त्याला स्पर्श करू शकत नाही याचे कारण त्याच्या मनामध्ये दृढ वैराग्य आहे. ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल आकर्षण न वाटणे म्हणजे वैराग्य. रामनाम घेण्यामध्येच, ज्याची ताळी लागी, म्हणजे ज्याला एकतानाता साधली, त्याच्यामध्येच असे वैराग्य निर्माण होऊ शकते. रामनामात मन रमून गेले की वैराग्यही येते, मोहमायेपासून सुटकाही होते आणि सर्व तीर्थक्षेत्रांची, इतरांना तारून नेण्याची शक्तीही त्याच्या शरीरातच प्रकट होते. म्हणजे अशा वैष्णवाचे दर्शन घेतले की तीर्थक्षेत्रांची यात्रा करून जे पुण्य मिळायचे ते मिळून जाते. वणलोभी, म्हणजे लोभरहित, आणि कपटरहित असा जो असतो, लोभ आणि कपट ज्यामुळे निर्माण होतात ते काम आणि क्रोध ज्याने आपल्या मनातून घालवून दिलेले असतात तो खरा वैष्णव. धृपदातील इतरांच्या दुःखाने दुःखी होण्यापासून चौथ्या कडव्यातील आपल्या मनातील कामक्रोध घालवून देण्यापर्यंत, ज्याचे सर्व आचरण शुद्ध आणि नैतिक झाले आहे, तो खरा वैष्णव. संत नरसी मेहता म्हणतात अशा वैष्णवाचे दर्शन ज्याला झाले, त्याचा तर उद्धार झालाच, म्हणजे तो तर विष्णूच्या पायाशी जाऊन पोहोचणारच. पण त्याशिवाय त्याच्या अेकोतेर, म्हणजे ७१, पिढ्यांचाही उद्धार झाला. म्हणजे थोडक्यात त्याच्या सगळ्या कुळाचा उद्धार झाला असे समजावे. महात्मा गांधींंनी या अभंगाला ध्रुव ताऱ्यासारखे मानले. यात वर्णन केलेल्या वैष्णवाच्या आचरणाचा आदर्श त्यांनी स्वतःसाठी समोर ठेवला. केवळ स्वतःसाठी नाही तर त्यांच्या आश्रमात राहणाऱ्या सर्वांसाठी एकादश व्रतांच्या रूपाने हा आदर्श समोर ठेवला. काळानुसार व्रतांची संख्या आणि नावे बदलू शकतील. मात्र नरसी मेहतांनी समोर ठेवलेला हा नैतिक आचरणाचा आदर्श कायमस्वरूपी आहे. नैतिक आचरण ही आध्यात्मिकतेची पहिली आणि अत्यावश्यक पायरी आहे. ती कोणालाही टाळता येणार नाही. प्रयत्नपूर्वक नैतिक आचरण केले की

वैष्णवजन तो तेने कहिअे – अभंग क्रमांक – १३ Read More »

एक अनेक बिआपक पूरक – अभंग क्रमांक – १२

एक अनेक बिआपक पूरक, जत देखऊ तत सोई ।माइआ चित्र विचित्र बिमोहित, बिरला बूझै कोई ॥ १ ॥सभु गोबिंदु है सभु गोबिंदु है, गोबिंदु बिनु नही कोई ।सूतु एकु मणि सत सहंस जैसे, ओति पोति प्रभु सोई ॥ धृ ॥जल तरंग अरु फेन बुदबुदा, जलते भिन्न न कोई ।इह परपंचु पारब्रह्म की लीला, बिचरत आन न होई ॥ २ ॥मिथिआ भरमु अरु सुपनु मनोरथ, सति पदारथु जानिआ ।सुक्रित मनसा गुरु उपदेसी, जागत ही मनु मानिआ ॥ ३ ॥कहत नामदेव हरि की रचना, देखऊ रिदै बीचारी ।घट घट अंतरि सरब निरंतर, केवल एक मुरारी ॥ ४ ॥ १९८३ ते १९८५ ही तीन वर्षे प्रबोधिनीमध्ये पंजाब पर्व होते. पंजाबमध्ये तीन सद्‍भावना दौरे, पंजाबी लोकांचा महाराष्ट्रातील मैत्री दौरा, दोन पूर्ण वेळ युवती कार्यकर्त्यांचा पंजाबमध्ये निवास, प्रबोधिनीच्या उपासना मंदिरात गुरु ग्रंथसाहिबचा अखंड पाठ, असे अनेक उपक्रम त्या काळात झाले. दौऱ्यांमध्ये आणि सभा बैठकींंमध्ये पंजाबी लोकांसमोर आणि त्यांच्यासह म्हणण्यासाठी पाच-सहा हिंदी आणि पंजाबी पद्ये, शबद आणि अभंग तयार केले होते. त्या काळात म्हटलेल्या अभंगांपैकी आजचा हा अभंग सगळ्यात कमी वेळा म्हटल्याचे आठवते. परंतु त्याचा अर्थ माझ्या मनाला सर्वात जास्त भिडला. नामदेवांचे जे ६१ अभंग गुरु ग्रंथसाहिब मध्ये घेतलेले आहेत, त्यापैकी एक आजचा अभंग आहे. एक अनेक बिआपक पूरक – तो एकच परमेश्वर अनेकही झाला आहे. तो सर्वांना व्यापून राहतो. आणि सर्वांना आतून पूर्णही करतो. जत देखऊ तत सोई – जिथे पाहावे तेथे सोई, म्हणजे तोच, आहे. माइआ चित्र विचित्र बिमोहित – या चित्रविचित्र मायेने मोहित झालेला बिरला बूझै कोई – कोणी विरळा, म्हणजे एखादाच मनुष्य, त्याला बूझै, म्हणजे ओळखतो. सभु गोबिंदु है सभु गोबिंदु है – सर्व काही गोविंदच आहे. गोबिंदु बिनु नही कोई – गोविंदाशिवाय अन्य कोणीही नाही. सूतु एकु मणि सत सहंस जैसे – जसे एका सुतामध्ये सत सहंस, म्हणजे शेकडो, हजारो, मणी ओवलेले असतात. ओति पोति प्रभु सोई – तसे तो प्रभू सर्वांमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. ओत म्हणजे कापडातील उभे धागे. प्रोत म्हणजे आडवे धागे. उभ्या आडव्या धाग्यांमुळेच कापडाला कापड म्हणून रूप येते. तसे त्या प्रभूमुळेच सर्वांचे अस्तित्व आहे. जल तरंग अरु फेन बुदबुदा – पाण्यावरची लाट, पाण्याचा फेस आणि पाण्यावर दिसणारे बुडबुडे जलते भिन्न न कोई – हे पाण्याचेच बनलेले आहेत, पाण्यापेक्षा वेगळे नाहीत. इह परपंचु पारब्रह्म की लीला – तसा हा प्रपंच किंवा सारी सृष्टी परब्रह्मापासूनच बनलेली आहे. लाट, फेस आणि बुडबुडा हे जसे पाण्याचे खेळ आहेत, तसा प्रपंच ही परब्रह्माची लीला म्हणजे खेळ आहे. बिचरत आन न होई – प्रपंचात परब्रह्माशिवाय बिचरत, म्हणजे चालणारा किंवा जगणारा, आणखी दुसरा कोणी असत नाही. मिथिआ भरमु अरु सुपनु मनोरथ – अल्पजीवी भ्रम, झोपेतील स्वप्ने आणि मनोरथ, म्हणजे जागेपणाची स्वप्ने सति पदारथु जानिआ – या सर्वांना सामान्य माणूस खरे पदार्थ मानतो. सुक्रित मनसा गुरु उपदेसी – सुक्रित, म्हणजे शुद्ध, मनाने गुरूचा उपदेश ग्रहण केल्यावर    जागत ही मनु मानिआ – तोच मनुष्य जागत, म्हणजे जागृत झालेल्या, मनाने ‘सभु गोबिंदु है’ हे मानायला लागतो. कहत नामदेव हरि की रचना – नामदेव म्हणतात की या हरीच्या रचनेचा देखऊ रिदै बीचारी – आपल्या हृदयातच विचार करून पाहा. घट घट अंतरि सरब निरंतर – मग प्रत्येक घटाच्या आतमध्ये, म्हणजे प्रत्येक वस्तू, प्राणी आणि व्यक्तीच्या आतमध्ये, निरंतर, म्हणजे अखंडपणे केवल एक मुरारी – केवळ एकच मुरारी, गोविंद, हरी, परब्रह्म किंवा प्रभू भरून राहिलेला आहे याचे ज्ञान प्राप्त होईल. वैज्ञानिक पद्धतीने म्हणजे वस्तुनिष्ठ रितीने जगाकडे पाहताना वैज्ञानिक स्वतःला जगापासून अलग करून जगाकडे पाहतात. तसे पाहताना वैज्ञानिकांनाही विश्वातील विविध किंवा अनेक रचनांच्या मागे एकच शक्ती आहे हे कळते. ती व्यापक आहे आणि सगळ्यांच्या आतमध्येही आहे हे देखील कळते. जिथे पाहावे तिथे तीच शक्ती आहे हे ही कळते. विश्वातील सर्व चित्रविचित्र रचना एका शक्तीतून उत्पन्न होऊन नष्ट झाल्यावर त्या शक्तीत विलीन होणार आहेत, म्हणजेच माया आहेत हे देखील कळते. विज्ञानाचा एवढा सखोल अभ्यास करून हे सर्व समजून घेणारे विरळाच, म्हणजे सात अब्ज मानवी लोकसंख्येपैकी कदाचित सात लाख लोकच, असतील. नामदेवांच्या काळात त्यांच्याकडे जी शब्दसंपत्ती होती ती वापरून त्यांनी पहिल्या कडव्यात विज्ञानाला मान्य होईल असेच विश्वाचे वर्णन केले आहे. धृपदाकडे मात्र, विश्वापासून स्वतःला अलग ठेवण्याच्या वैज्ञानिकाच्या पद्धतीने पाहता येत नाही. विज्ञानाला सापडलेली विश्वातील सर्वांच्या मुळाशी असलेली एकमेव शक्ती जड आहे, म्हणजे तिला काही संवेदना किंवा चेतना नाही, असे वैज्ञानिक मानतात. आणि गोविंद तर चिदानंदरूपी म्हणजे चेतना व संवेदनायुक्त आहे. मग सर्व काही गोविंद आहे, म्हणजेच चिदानंदरूपी आहे, हे वस्तुनिष्ठ पद्धतीने कसे समजेल? वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहणे म्हणजे स्वतःला वेगळे ठेवून पाहणे. माझ्यामध्ये जी काही शक्ती आहे तीच विश्वामध्ये आहे. कारण मी आणि सर्व विश्व एकाच प्रकारच्या अणुरेणूंनी बनलेलो आहोत. सर्व अणुरेणू एकाच शक्तीची रूपे आहेत. माझ्यामध्ये जी चेतना आणि संवेदना शरीरातील अणुरेणूंच्या विशिष्ट रचनेमुळे व्यक्त होते, ती चेतना आणि संवेदना, विश्वातील अणुरेणूंची रचना माझ्या शरीरातील अणुरेणूंच्या रचनेपेक्षा वेगळी असल्यामुळे, व्यक्त झालेली मला दिसत नाही. मला दिसत नाही, म्हणून ती चेतना आणि संवेदना विश्वातील अणुरेणूत नाहीच, असे म्हणायचे काही कारण नाही. संतांची पद्धत तर स्वतःचे ‘मी’ पण वेगळे न ठेवता स्वतःला गोविंदाशी एकरूप करून टाकण्याची आहे. जी शक्ती विश्वात ओतप्रोत म्हणजे उभी-आडवी भरलेली आहे हे विज्ञान मान्य करते, ती शक्ती चेतना आणि संवेदनायुक्त आहे, म्हणजेच गोविंदरूप आहे हे समजण्यासाठी वैज्ञानिकाच्या सूक्ष्म बुद्धीबरोबर शुद्ध बुद्धी देखील लागते. मगच गोविंदाशिवाय अन्य कोणी नाही हे कळते. सूक्ष्म बुद्धी म्हणजे कारण आणि परिणामांची साखळी शोधून काढणारी, अखंड काय आणि आणि घटकांनी बनलेले काय हे शोधून काढणारी बुद्धी. शुद्ध बुद्धी म्हणजे आग्रह, अभिनिवेश, अहंकार विरहित बुद्धी. पाण्याची लाट, पाण्याचा फेस आणि पाण्यावरचे बुडबुडे पाण्यातूनच निर्माण होतात आणि पाण्यातच नष्ट होतात हे वैज्ञानिकाच्या सूक्ष्म बुद्धीला कळते. बुद्धी सूक्ष्म करण्याचे प्रशिक्षण म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचे प्रशिक्षण. तसे हा प्रपंच परब्रह्मशक्तीतून निर्माण होतो आणि त्यातच विलीन होतो हे शुद्ध बुद्धीच्या संतांना कळते. परब्रह्मशक्तीशिवाय प्रपंचामध्ये विचरण, म्हणजेच संचार, हालचाल किंवा चळवळ, करणारे आणखी कोणी नाही. पण हे कळण्यासाठी बुद्धी शुद्ध करण्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. जागेपणीचे भ्रम (मृगजळ इत्यादी…) आणि जागेपणीची स्वप्ने खरी नाहीत हे सूक्ष्म बुद्धीने कळते. झोपेतली स्वप्ने खरी नाहीत हे सूक्ष्म बुद्धीने कळते. खरी नाहीत म्हणजे त्यांना सुरुवात आणि शेवट आहे. अशा गोष्टींंना भारतीय परंपरेत मिथ्या हा शब्द वापरला आहे. मिथ्या म्हणजे सापेक्ष सत्य. एखाद्याला काही काळ ते खरे वाटेल. पण सर्वांना, सर्वकाळ, खरे वाटेल असे नाही. सर्वांना सर्वकाळ खरे वाटेल तोच सत् पदार्थ. तो शोधून काढायला सूक्ष्म बुद्धी लागते आणि पुरते. तो सत्‌पदार्थ, चेतना आणि संवेदनायुक्त देखील आहे, हे कळायला मात्र शुद्ध बुद्धी लागते. बुद्धी शुद्ध करण्यासाठी मन शुद्ध करून गुरूचा उपदेश ग्रहण करावा लागतो. नामदेवांना विसोबा खेचरांच्या रूपात मानवी गुरू मिळाला. ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांच्या रूपाने आणि विवेकानंदांना रामकृष्णांच्या रूपाने मानवी

एक अनेक बिआपक पूरक – अभंग क्रमांक – १२ Read More »

 घेई घेई माझे वाचे – अभंग क्रमांक – ११

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥ धृ ॥डोळे तुम्ही घ्यारे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥ १ ॥तुम्ही आईका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥ २ ॥मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पाई ॥ ३ ॥तुका म्हणे जीवा । नको सांडू या केशवा ॥ ४ ॥ प्रबोधिनीत एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्याचे स्वतंत्र आठ पानी वृत्त छापले होते. त्यातला एक पूर्ण परिच्छेद कार्यक्रमाच्यावेळी म्हटल्या गेलेल्या पद्यासंबंधी होता. पद्य अतिशय सुरेल झाले होते. त्या परिच्छेदाला शीर्षक दिले होते ‘तुम्ही आईका रे कान…’ स्वतंत्रपणे शीर्षक म्हणून ते फारच अर्थपूर्ण होते. ती ओळ कुठल्या पद्यातली आहे अशी शोधाशोध मी केली. कुणालाच हे पद्य आठवेना. सुरुवातीला अभंग शोधायचे सुचलेच नाही. दोन-तीन वर्षांनी एका भजनामध्ये ही ओळ ऐकायला मिळाली. भजन संपल्यावर लक्षात आले की आपण शोधत होतो ती ओळ एका अभंगातली आहे. पण तेव्हा भजनाच्या वेळी ऐकलेला पूर्ण अभंग आठवेना. मग गाथा धुंडाळून तो अभंग शोधून काढला. या निरूपणमालेतले पहिले दहाही अभंग मी आधी म्हटले होते. आणि मग अर्थावर विचार केला होता. हा अभंग मात्र आधी वाचला, त्यावर विचार केला आणि मग एका भजनाच्या वेळी म्हटला. प्रबोधिनीतल्या भजनांमध्ये आधी आठ-दहा वर्षे ‘पापाची वासना नको दावू डोळा त्याहुनी आंधळा बराच मी ।’ हा अभंग बऱ्याच वेळा म्हटला होता. यात नकाराचा जोर आहे. पण मग पाहायचे काय ते कळत नाही. काय पाहू नका हे सांगितल्यावर काय पाहा हे ही सांगितले पाहिजे ते या अभंगात सापडले. पापाची वासना निर्माण होईल असे पाहायला नको म्हणून आंधळेपण मागण्यापेक्षा ‘तुम्ही घ्या रे डोळा सुख पाहा विठोबाचे मुख’ ही सकारात्मक दिशा मला आवडली. अंधश्रद्धा निर्मूलन याच्यात आंधळी श्रद्धा आणि तिचे निर्मूलन असा नकारात्मक आशय दोन वेळा आला आहे. त्यापेक्षा विज्ञानदृष्टी विस्तार हे पूर्ण सकारात्मक काम मला जास्त योग्य वाटते. भ्रष्टाचार निर्मूलन यामध्ये भ्रष्टाचार आणि त्याचे निर्मूलन असा नकारात्मक आशय दोनदा येतो. त्यापेक्षा सदाचार संवर्धन हा पूर्ण सकारात्मक कार्यक्रम आहे. तसा हा अभंग पूर्णपणे सकारात्मक आशयाचा आहे. ‘अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याहूनी मुका बराच मी’ ॥ यामध्ये ‘अपवित्र वाणी’ आणि ‘नको माझे मुखा’ असा दोन वेळा नकारात्मक आशय आला आहे. त्यापेक्षा ‘घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे’ यामध्ये पूर्ण सकारात्मक आशय आहे. आपल्या वाणीने फक्त विठोबाचे नाव घ्यायचे तर मग व्यवहारातली कामे करण्यासाठी बोलायचे की नाही असा प्रश्न येतो. मौनाचे दोन प्रकार सांगतात. एक अंतर्मौन आणि एक बाह्यमौन. आतमध्ये सतत विचाराची आवर्तने चालू नसतील तर बाहेर मौन नसले तरी चालेल. कामापुरते मोजके बोलले तरी चालेल. याला मौनच मानले जाते. पण तोंडातून चकार शब्द येत नाही आणि आत विचारांची वावटळ चालू आहे असल्या मौनाला मौन म्हणण्यात काही अर्थ नाही. तसे मनात सतत रामनामाचा जप चालू आहे आणि प्रकटपणे व्यवहारातले बोलणे चालू आहे असे असेल तर आपली वाणी अखंड रामनामच घेते आहे असे म्हणता येईल. महात्मा गांधींना असा रामनामाचा जप साधला होता. पण असा जप साधण्यासाठी सुरुवातीला मोठ्याने सुद्धा देवाचे नाव घेतल्याचा उपयोग होतो. ‘तनूमनात एक ध्यान’ या पद्याच्या धृपदात चार वेळा ‘हिंदुस्थान’ हा शब्द येतो. ‘हे वीर विवेकानंद’ या पद्यात सुरुवातीला पाच वेळा ‘हे वीर विवेकानंद’ म्हणतात ते जिभेला आधी वळण लागले पाहिजे यासाठी. तसेच आधी विठ्ठल नामाचा जप मोठ्याने केला की तो गोड वाटायला लागतो आणि मग आतल्या आतही तो चालू राहतो. ‘निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधीर करून ठेवी देवा’ ॥ यामध्ये ‘निंदेचे श्रवण’ आणि ‘नको माझे कानी’ असा दुहेरी सकारात्मक आशय आहे. त्याऐवजी ‘तुम्ही आईका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥’ हे पूर्ण सकारात्मक विधान आहे. समर्थ रामदासांनी परमेश्वराचे वर्णन ‘चोवीस नामी, सहस्त्रनामी । अनंत नामी तो अनामी।’ असे केले आहे. म्हणजे जो जो सकारात्मक शब्द आहे ते देवाचेच नाव आहे. त्यामुळे सर्व व्यक्तींंचे गुणग्रहण आणि सर्व प्रसंगांमधले रसग्रहण करणारे शब्द ऐकत राहावे म्हणजे आपण आपल्या कानांना विठोबाचेच गुण ऐकवत आहोत असे होते. आपले डोळे, आपले कान आणि आपली वाणी ही शेवटी इंद्रिये आहेत. इंद्रिये ही घोड्यांसारखी आहेत असे म्हणतात, आणि मन त्या घोड्यांचा लगाम आहे. लगाम सैल सोडला की इंद्रिये त्यांना जे नवेनवलाचे वाटते तिकडे धावत, उधळत किंवा भरकटत जातात. लगाम खेचलेला असेल की इंद्रिये मन सांगेल तेच करतात. त्यामुळे वाचेने विठ्ठलाचे नाव घ्यायचे असेल, डोळ्यांनी विठ्ठलाचे रूप पाहायचे असेल आणि कानांनी विठ्ठलाचे गुण ऐकायचे असतील तर मन विठ्ठलाच्या पायाकडे लागले पाहिजे. ते सुद्धा जमेल तेव्हा किंवा सवडीने पाहू असे नाही तर मनाने धावत जाऊन विठ्ठलाच्या पायापाशी स्थिर झाले पाहिजे. हा सगळा अभंगच मनाला वळण देण्यासाठी आहे. बुद्धीला कळते, मन वळते. या अभंगात बुद्धीचा उल्लेख नाही. मन विठ्ठलाकडे लागले की बुद्धी त्याचेच चिंतन, त्याचेच स्मरण आणि त्याची प्राप्ती कशी होईल याचा विचार करायला लागते. पण मन विठ्ठलाच्या रंगाने रंगून जायचे असेल तर इंद्रियांनाही आधी त्याची गोडी लावावी लागते. विठ्ठलाचे भजन एकदा ऐकले, वारकऱ्यांचा मेळा एकदा पाहिला की त्यामुळे मनात उमटलेले चांगल्या भावनांचे तरंग काही काळ तरी रेंगाळत राहतात. आधी कोऱ्या मनावर विठ्ठलाच्या नावारूपाचे पहिले ठसे उमटतात. पुढच्या वेळी विठ्ठलाचे ते नामरूप ऐकले, पाहिले, की आधीच्या आनंदाच्या आठवणी लवकर जाग्या होतात. पुन्हा पुन्हा असे अनुभव आले तर मन इतके संवेदनशील होते की केवळ आठवणीनेच किंवा सहज, निर्हेतुक पाहण्या ऐकण्यानेही त्या भावना जाग्या होतात. यासाठी पुन्हा पुन्हा ऐकणे, पुन्हा पुन्हा पाहणे, पुन्हा पुन्हा उच्चारणे अशा जाणीवपूर्वक कृतीने इंद्रियांना विठ्ठलामध्ये गुंतवावे लागते. मग मनही तिथे स्थिर होते. मग बुद्धी त्याच दिशेने विचार करायला लागते. इतर सर्व गोष्टींंचा कंटाळा आणि फक्त विठ्ठलाचीच आवड असे होईपर्यंत ‘घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥’ असा अभ्यास, सराव, कवायत, रियाज, साधना, तपश्चर्या यापैकी जो शब्द आपल्याला रुचेल ते करावे लागते. ‘तुका म्हणे जीवा । नको सांडू या केशवा’ ॥ असा या अभंगाचा शेवट होतो. ‘विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी’ मध्ये टाळ आणि दिंडी म्हणजे वीणा, ही भजनाची साधने म्हणजेही विठ्ठल आहेत. पुन्हा ‘विठ्ठल तोंडी उच्चार’. ‘विठ्ठल अवघ्या आवडाला’. केवळ विठ्ठलाच्या भरवशावरच सर्व आयुष्य जगायचे आहे. ‘विठ्ठल बोला विठ्ठल’ असे करत जगायचे आहे. विठ्ठलाचाच नाद लागलेला आहे, विठ्ठलाचेच वेड लागलेले आहे. विठ्ठलाचाच छंद लागला आहे; सुखातही विठ्ठलकृपा असते असे वाटणे आणि दुःखातही विठ्ठल परीक्षा घेतो आहे असे वाटणे, असे सर्व वेळ सर्व कृतींंमध्ये विठ्ठलमय होण्याची अशी स्थिती झाली म्हणजे विठ्ठलाला आपल्या ओंजळीत पूर्ण धरला. यात थोडे दुर्लक्ष झाले तर ओंजळीत साठवलेला विठ्ठल बोटांच्या फटींतून सांडून जातो. म्हणून तुकाराम म्हणतात, आपल्या जीवाला सांगतात की त्या केशवाला कायमसाठी साठवून ठेव, अजिबात त्याच्यावरचं लक्ष ढळू देऊ नको. तरच विठ्ठल तुझा जीवभाव होईल. त्यातच आयुष्याचे सार्थक आहे.  गिरीश श्री. बापट

 घेई घेई माझे वाचे – अभंग क्रमांक – ११ Read More »

उंबरातील कीटका – अभंग क्रमांक – १०

उंबरातील कीटका । हेचि ब्रह्मांड ऐसे लेखा ॥ धृ ॥ऐसी उंबरे किती झाडी । ऐशी झाडे किती नवखंडींं ॥ १ ॥हेचि ब्रह्मांड आम्हासी । ऐसी अगणित अंडे केसींं ॥ २ ॥विराटाचे अंगी तैसें । मोजू जाता अगणित केश ॥ ३ ॥ऐशा विराटाच्या कोटी । साठविल्या ज्याच्या पोटी ॥ ४ ॥तो हा नंदाचा बालमुकुंद । तान्हा म्हणवी परमानंद ॥ ५ ॥ऐसी अगम्य ईश्वरी लीला । ब्रह्मानंदी गम्य तुक्याला ॥ ६ ॥ १९७८ साली आषाढी एकादशीला आप्पांनी ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ या अभंगावर प्रवचन केले होते. या अभंगाचा अर्थविस्तार करताना जे आणखी चार-पाच अभंग सांगितले होते त्यातला ‘उंबरातील कीटका’ हा शेवटचा अभंग होता. त्यावेळी त्या अभंगाचा अर्थ फारसा कळला नव्हता. त्याच्या पुढच्या वर्षी आमचे गीतारहस्य अभ्यास शिबिर झाले. त्या शिबिरानंतर गीतारहस्यामध्ये मांडलेले ‘अद्वैत तत्त्वज्ञान’ आणि ‘आधुनिक विज्ञान’ या विषयावर आप्पांनी मला इंग्रजीतून एक लेख लिहायला सांगितला होता. तो लेख मी लिहून दिला आणि त्यानंतर त्याबद्दल विसरून गेलो. चार-पाच महिन्यांनी खेड शिवापूर जवळ रांझ्याला एक दिवसभराची बैठक झाली. बैठक झाल्यावर बाकीचे सगळे गटामध्ये संचलन करत शिवापूरपर्यंत गेले. आप्पांनी त्यांची गाडी पुढे पाठवून दिली. आणि मला त्यांच्याबरोबर थांबायला सांगितले. आम्ही दोघेच रांझे ते शिवापूर चालत गेलो. साधारण ३५-४० मिनिटांचे अंतर आहे. चालायला सुरुवात केल्यावर त्यांनी माझ्या इंग्रजी लेखाचा विषय काढला. त्यात काय काय भर घालायला पाहिजे असे सांगायला सुरुवात केली. त्यात ‘उंबरातील किटका’ या अभंगाचीही भर घालायला सांगितली. मग त्या अभंगाची फोड करून त्यांनी मला सांगितली. उंबरातील कीटका । हेचि ब्रह्मांड ऐसे लेखा – उंबरातील किड्याचे जन्मापासून मृत्युपर्यंत सर्व जीवनचक्र एका उंबरातच पूर्ण होते. त्याच्या दृष्टीने ते उंबर म्हणजेच जणू सारे ब्रह्मांड असते, ‘ऐसे लेखा’, म्हणजे असे तुम्ही समजा. ऐसी उंबरे किती झाडी । ऐशी झाडे किती नवखंडीं – त्या बिचाऱ्या किड्याला हे माहीत नसते की त्याला ब्रह्मांड वाटणाऱ्या उंबरासारखी शेकडो उंबरे एका झाडावर असतात. आणि अशी हजारो झाडे नवखंड पृथ्वीवर आहेत. हेचि ब्रह्मांड आम्हासी । ऐसी अगणित अंडे केसींं – आपणही उंबरातल्या किड्यासारखेच आहोत. आपली पृथ्वी आणि आपल्याला दिसणारे सूर्य, चंद्र, ग्रह, यांची सूर्यमाला म्हणजेच सारे ब्रह्मांड असे आपल्याला वाटते. अशी अगणित, म्हणजे गणना न करता येण्याइतकी किंवा मोजता न येण्याइतकी अंडे म्हणजे ब्रह्मांडे (विराटाच्या) एका केसावर आहेत. विराटाचे अंगी तैसें । मोजू जाता अगणित केश – एका केसावर जितकी ब्रह्मांडे आहेत तसे विराट पुरुषाच्या अंगावरचे केस मोजू गेल्यावर ते ही अगणित वाटतील. (दृश्य विश्वाला भारतीय तत्त्वज्ञानामध्ये विराट म्हणतात. ते विराट म्हणजे विराट पुरुष अशी कल्पना केली आहे.) ऐशा विराटाच्या कोटी । साठविल्या ज्याच्या पोटी – असे कोट्यवधी विराट पुरुष ज्याच्या पोटामध्ये साठवले आहेत – तो हा नंदाचा बालमुकुंद । तान्हा म्हणवी परमानंद – तो परमानंद, किंवा परब्रह्म, गोकुळामध्ये नंदाच्या घरी बालमुकुंद म्हणजेच बाळकृष्णाचे तान्हे रूप घेऊनही खेळत असतो. ऐसी अगम्य ईश्वरी लीला । ब्रह्मानंदी गम्य तुक्याला – मोठ्यात मोठे परब्रह्म तान्ह्या बाळकृष्णाचेही रूप घेते ही ईश्वराची लीला, म्हणजे खेळ, अगम्य, म्हणजे बुद्धीला न समजणारा आहे. पण तो तुक्याला, म्हणजे मला तुकारामाला, ब्रह्मानंदात, म्हणजे समाधी अवस्थेत, गम्य झाला, म्हणजे अनुभवता आला. असा हा अभंगाचा अर्थ थोडक्यात सांगून आप्पांनी मला सांगितले की आपली सूर्यमाला, हेच आपले ब्रह्मांड. अशी अनेक ब्रह्मांडे विराटाच्या अंगावरच्या एका केसावर आहेत. विराटाच्या अंगावरचा एक केस म्हणजे जणू एक आकशगंगा. विराटाच्या अंगावरचे अगणित केस हे जणू अनंत आकाशगंगा. आपल्या ज्ञात विश्वासारखे म्हणजे विराटासारखे कोट्यवधी विराट ज्याने आपल्या पोटात सामावून घेतले आहेत तो परमानंद म्हणजेच परब्रह्म. असे सगळे विवरण करून मग हा अभंग लेखामध्ये का घालायचा हे मला आप्पांनी सांगितलं. मी तो लेख सांगितलेले काम म्हणूनच लिहिलेला असल्यामुळे आप्पांनी सांगितल्यावर अभंग आणि त्यावरील भाष्य यांची ही भर त्या लेखात त्यांनी सांगितल्याप्रमाणे घातली. पण त्या वेळेला मला तो अर्थ फारसा समजलेला नव्हता. नंतर माझ्या वाचनात दोन चरित्रे आली. तुकारामांनंतर साधारण अडीचशे वर्षांनंतर बंगालमध्ये होऊन गेलेले रामकृष्ण परमहंसांचे शिष्य आणि स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी अद्‍भुतानंद यांचे चरित्र हे त्यातील पहिले. त्यांना लाटू महाराजही म्हणत. ते जवळजवळ निरक्षरच होते. रामकृष्णांच्या सहवासात राहून आणि त्यांच्या मार्गदर्शनाने लाटू महाराजांनी ध्यानसाधना केली होती व समाधीचा अनुभवही घेतला होता. एकदा ते त्यांचे आणखी एक गुरुबंधू स्वामी तुरीयानंद यांचे उपनिषदांवरील प्रवचन ऐकत होते. त्यात उपनिषदांमध्ये आलेले विश्वरचनेचे वर्णन आले होते. प्रवचन झाल्यावर लाटू महाराज स्वामी तुरीयानंदांना म्हणाले की, अरे! मला समाधी अवस्थेत जे दिसले, बरोबर त्याचेच वर्णन तू तुझ्या प्रवचनात करत होतास. उपनिषदांचा अभ्यास न केलेल्या लाटू महाराजांना त्या प्रवचनामुळे आपल्याला अनुभवातून मिळालेले ज्ञानच धर्मग्रंथांमधून सांगितलेले आहे हे लक्षात आले. गंमत म्हणजे ॐ भूः ते ॐ सत्यम् याचा अर्थ लावताना आप्पांनी पृथ्वी ते अनंत आकाशगंगा आणि परब्रह्म अशी शिडी मांडली आहे; अशीच श्रेणी एका उपनिषदातही मांडली आहे आणि ती मांडताना चक्क ही दृश्य जगातली किंवा भौतिक जगातली शिडी वापरूनही चिंतन करता येईल असे म्हटले आहे. दुसरे चरित्र बेळगाव, धारवाड, हुबळी या भागात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ज्यांचा संचार होता त्या कलावती आईंचे. त्यांचेही आधुनिक पद्धतीचे शिक्षण झालेले नव्हते. एकदा एका प्राध्यापकाने त्यांना आधुनिक विज्ञानाने शोधून काढलेली विश्वाची रचना कशी आहे ते समजावून सांगितले. त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले व नंतर त्याला म्हणाल्या, तू अगदी बरोबर वर्णन केलेस. मला ध्यानामध्ये ही अशीच रचना परमेश्वराने दाखवली आहे. तुकाराम महाराज, लाटू महाराज आणि कलावती आई हे तीन वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या तीन वेगवेगळ्या भागात तीन वेगवेगळ्या परंपरांमध्ये होऊन गेलेले साक्षात्कारी संत आहेत. तिघांचेही लौकिक अर्थाने आधुनिक उच्च शिक्षण झाले नव्हते. त्यांनी एकमेकांचे वाचलेले असायची शक्यताही फारच कमी आहे. पण ते तिघेही म्हणतात की मला समाधी अवस्थेत किंवा ध्यानाच्या अवस्थेत विश्वाची रचना कळली.  ती आजच्या विज्ञानाने शोधून काढलेल्या रचनांच्या चढत्या भांजणीशी जुळणारी आहे असे आपल्याला लक्षात येते. तुकारामांना समाधी अवस्थेत दिसलेली दृश्य विश्वासारखी (विराट) असंख्य विश्वे (विराटाच्या कोटी) ही शेवटची पायरी तर दृश्य विश्वाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला अजून एक चर्चा करण्यासाठीची कल्पनाच आहे. तुकाराम महाराजांच्या काळात आकाशात प्रत्यक्ष दिसणारी एकच आकाशगंगा माहीत होती. अनंत आकाशगंगा आहेत हा शोध १९२२ सालानंतर लागला. त्यामुळे तुकाराम महाराजांना या अभंगातील विश्वाच्या विस्ताराची चढती भांजणी मांडताना दृश्य जगातील सूर्यमाला ते अनंत आकाशगंगा ही रचना निरीक्षणातून किंवा अभ्यासातून समजली नव्हती हे नक्की. त्यांना जो अनुभव समाधी अवस्थेत आला, तो त्यांनी तेव्हाच्या माहीत असलेल्या विराट आणि बालमुकुंद अशा देवतांशी संबंधित भाषेत मांडायचा प्रयत्न केला. तो ही अर्थ सगळ्यांना समजणार नाही म्हणून सुरुवातीलाच उंबरातील कीटकाचा सर्वांना परिचित दृष्टांत दिला. माहिती असणे, कल्पना करता येणे आणि प्रत्यक्ष अनुभव येणे या मन-बुद्धीच्या विकासाच्या पुढच्या पुढच्या पायऱ्या आहेत. दिसणाऱ्या आणि माहीत असलेल्या विश्वातील अधिकाधिक मोठ्या रचनांची माहिती आज पाहून, वाचून किंवा ऐकून मिळते. उपासना करताना गायत्री मंत्राच्या पूर्वी ॐ भूः, ॐ भुवः, ॐ स्वः, ॐ महः, ॐ जनः, ॐ तपः, ॐ सत्यम् अशी सात

उंबरातील कीटका – अभंग क्रमांक – १० Read More »

जेथें जातों तेथें तू माझा सांगाती – अभंग क्रमांक – ९

जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातींं धरूनिया ॥ धृ ॥चालो वाटें आम्ही तुझाची आधार । चालविसी भार सवे माझा ॥ १ ॥बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा ॥ २ ॥अवघे जन मज झाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥ ३ ॥तुका म्हणे आता खेळतो कौतुकें । झाले तुझे सुख अंतर्बाहींं ॥ ४ ॥ आषाढी एकादशीला प्रबोधिनीमध्ये नेहमी भजन होते. दोन वेळा प्रशालेतील सहावी सातवीतल्या कीर्तन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी भजनाच्या ऐवजी कीर्तन केल्याचेही मला आठवते. १९७८ साली आषाढी एकादशीला आप्पांनी प्रवचन केले होते. ते वर्ष विशेष होते. आषाढी एकादशीला प्रवचन झाले आणि नंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपासना मंदिरात अखंड हिंदुस्थानच्या चित्रमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. प्रतिष्ठापनेच्या वेळी ‘मातृभूमी हेच दैवत’ हे मुख्य सूत्र होते. आणि आषाढीच्या प्रवचनाचे सूत्र देशभक्तीचे रूपांतर अखेर ईश्वरभक्तीत झाले पाहिजे हे होते. प्रवचनासाठी निवडलेल्या अभंगाच्या अर्थाचा विस्तार करताना आप्पांनी आणखीही चार-पाच अभंग घेतले होते. ते अभंग म्हणताना त्यांच्या मागे वारकरी भजन-कीर्तनाच्या पद्धतीने काही टाळकऱ्यांनी त्यांच्या मागे उभे राहायचे अशी योजना त्यांनी केली होती. त्या पाच-सहा टाळकऱ्यांमध्ये उभे राहायची संधी मला मिळाली. ते पूर्ण प्रवचन आप्पांच्या मागे उभे राहून मी ऐकले. ईश्वरभक्तीचे मर्म सांगण्यासाठी आप्पांनी ‘जेथे जातो तेथे’ हा अभंग निवडला होता. आदिमानवाला सूर्य, पाऊस, वीज, वृक्ष आणि काही प्राणी यांच्यामध्ये काही विशेष शक्ती आहे असे जाणवले. त्यांचा कोप आपल्यावर होऊ नये, त्यांनी आपल्यावर प्रसन्न राहावे, यासाठी त्याने त्यांची पूजा सुरू केली. मग या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक देव आहे अशी कल्पना त्याला सुचली. सूर्याची पूजा करायच्या ऐवजी सूर्याला तेज आणि उष्णता देणाऱ्या सूर्यदेवाची पूजा सुरू झाली. वृक्षाची पूजा करण्याऐवजी वृक्षांवर रसाळ फळे निर्माण करणाऱ्या वृक्षदेवाची पूजा सुरू झाली. नंतर हे सगळे देव एकाच मुख्य देवाची विविध रूपे आहेत अशी कल्पना निघाली. एकाच मुख्य देवाला लोक वेगवेगळ्या नावाने संबोधतात असे सूत्र वेदांनी जाहीर केले. हा मुख्य देव केवळ रागावणारा, शिक्षा करणारा किंवा प्रसन्न होऊन बक्षीस देणारा, असा नसून तो आपल्या सर्वांचा सुहृद, सखा किंवा मित्रही होऊ शकतो असा शोध लागला. देवाच्या कल्पनेविषयीची ही सगळी स्थित्यंतरे केवळ कल्पना किंवा विचार करून झालेली नाहीत. देवाचा शोध घेणाऱ्यांचे मन जसे विकसित होत गेले तसे त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवरचे अनुभव स्वतः घेतले. असे अनुभव घेतलेल्या अनेकांनी एकमेकांचे अनुभव पडताळून पाहिले आणि त्यातून काही आध्यात्मिक तथ्ये निश्चित केली. परमेश्वर आपल्याबरोबर कायम सखा, साहाय्यकर्ता, कृपाछत्र धरणारा म्हणून कसा असतो या अनुभवाचे वर्णन करणारा हा अभंग आहे. तुकाराम महाराजांना सगळीकडे प्रवास करत असताना परमेश्वर कायम आपला सोबती आहे असे जाणवत होते. तो आपला हात धरून आपल्याला योग्य मार्गाने नेतो, वाट चुकू देत नाही असे त्यांना जाणवत होते. त्याच्या अखंड सोबतीचा आनंद आणि कृतज्ञता ते धृपदामध्ये सांगत आहेत. ‘चालो वाटें’ म्हणजे वाटेने चालत असताना. ही वाट परमार्थाची किंवा भक्तीची आहे. तुकाराम महाराजांना कोणी मानवी गुरू नव्हता. पुढची वाट कशी आहे हे सांगणारा कोणी नव्हता. परमेश्वरावर भरवसा ठेवून त्याच्या आधारानेच ते भक्तिमार्गावरचा एकेक टप्पा पुढे जात होते. भक्तिमार्गावरून पुढे जाताना आधार देणारा परमेश्वर, आपला आणि आपल्या कुटुंबाच्या योगक्षेमाचा भारही वाहत आहे, योगक्षेमाची त्याने जबाबदारी घेतली आहे, असेही त्यांना वाटत होते. योग म्हणजे ज्या गोष्टी जगण्यासाठी जेव्हा आवश्यक तेव्हा त्या मिळणे. आणि क्षेम म्हणजे मिळालेल्या गोष्टी सांभाळणे. विवेकानंदांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचे खूपच हाल व्हायला लागले. तेव्हा रामकृष्णांनी त्यांना सांगितले की कालीमाता तुमच्या कुटुंबाच्या भात आमटीेची सोय बघेल. म्हणजे भरपूर देईल असे नाही. पण उपासमारही होऊ देणार नाही.  तुकारामांनाही आपल्या कुटुंबाची उपासमार होत नाही म्हणजेच परमेश्वर आपला भार वाहत आहे आणि भक्तिमार्गात आपल्याला पुढे नेत आहे याचाच आनंद होता. तुकाराम महाराज हे काही लौकिक अर्थाने खूप शिकलेले विद्वान किंवा पंडित असे नव्हते. पण भक्तिमार्गावरच्या त्यांच्या वाटचालीत अचानक त्यांना अभंग स्फुरू लागले. आपण तर काही फार विचार करून बोलत नाही. पण आपल्या तोंडून चरणांमागून चरण जे बाहेर पडतात ते लोकांना मात्र महत्त्वाचे वाटतात आणि ते लिहून घेतात, याचे त्यांना वाटणारे आश्चर्य त्यांनी अनेक अभंगांमधून व्यक्त केले आहे. मी काय बोलतो आहे हे मला कळायच्या आत शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतात, या अनुभवाला त्यांनी ‘बोलो जाता बरळ’ असे म्हटले आहे.  ऐकणाऱ्यांना ते महत्त्वाचे वाटतात, याचा अर्थ परमेश्वरच ते शब्द तोंडातून बाहेर पडत असताना शुद्ध आणि सुसंगत करून घेतोे, ते नीट करतो, असे तुकाराम महाराजांना वाटते. आपल्या तोंडून परमेश्वर काही गैर बाहेर पडू देणार नाही असा विश्वास परमेश्वरावर असल्यामुळे आता मी बोलू की नको असा मनातला संकोच किंवा लाज परमेश्वराने काढून घेतली आहे. आणि आजूबाजूला कोण आणि किती जण ऐकत आहेत याची फिकीर न करता बोलण्याचा धीटपणा आला आहे, असे त्यांना वाटते. परमेश्वर आपल्याद्वारे बोलत आहे, ही जशी खात्री झाली, तसे ऐकणारे सगळे लोकही आपलेच आहेत, असे वाटायला लागल्याने, त्यांच्यासमोर कसे बोलू ही लाजही गेली. आजूबाजूचे सगळेच लोक सोयरे म्हणजे नातेवाईक, प्राणसखे म्हणजे जीवाला जीव देणारे मित्र आणि लोकपाळ म्हणजे या इहलोकाचे किंवा भौतिक जगाचे पालन करणारे, त्याचा सांभाळ करणारे देवच आहेत, असे तुकाराम महाराजांना वाटायला लागले. आपलेच नातेवाईक, मित्र किंवा पालनकर्ते हे सगळे आपल्याला सांभाळून घेतील, त्यामुळे घाबरायचे काही कारण नाही. त्यामुळे भक्तिमार्गाने पुढे जाण्याचा आणि मुखातून अभंगांचा प्रवाह चालू राहू देण्याचा धीटपणा तुकाराम महाराजांना आलेला आहे. लौकिक व्यवहारात प्रवास करताना परमेश्वर सोबती आहे. भक्तिमार्गाने जाताना परमेश्वर वाटाड्या आहे. त्यामार्गाने जात असताना योगक्षेमाची जबाबदारीही त्याने घेतली आहे आणि आजूबाजूच्या सर्व लोकांच्या रूपाने तोच जणू आपल्या नातेवाईक, मित्र आणि पालनकर्त्यांसारखा आपल्या बरोबर आहे. असा बाहेर सर्वत्र परमेश्वर आपल्याबरोबर असल्याचे सुख तुकाराम महाराज अनुभवत आहेत. तोंडातून बाहेर पडणारी अभंगवाणी आपली नाही. आपण केवळ ध्वनिक्षेपक आहोत आणि परमेश्वरच आतून बोलत आहे. असा आपल्या आतही परमेश्वर असल्याचे सुख तुकाराम महाराज अनुभवत आहेत. म्हणून ते म्हणतात ‘झाले तुझे सुख अंतर्बाहीं’ म्हणजे आतही सुख आणि बाहेरही सुख. या सुखाच्या सागरात आपण नुसते डुंबायचे किंवा हुंदडायचे. कौतुक या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक आनंद आणि दुसरा लाड. परमेश्वर आपला योगक्षेम बघतोय, मार्गदर्शन करतोय; आपले असंबद्ध बोलणे सुसंबद्ध करतोय, म्हणजे तो आपले लाडच करतोय. वडिलधाऱ्या सोबत्याने लाड करावेत आणि लहानग्याने करून घ्यावेत यालाही ‘खेळतो कौतुके’ म्हणता येईल. किंवा आत बाहेर सुखच सुख आहे त्यामुळे आता फक्त आनंदात खेळ सुरू आहे असाही अर्थ घेता येईल. आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, ‘तुका म्हणे विठो आता तुझे माझे राज्य’. म्हणजे आता आपण दोघेच आनंदात खेळूया. भक्तिमार्गावरच्या या टप्प्याला समीपता, म्हणजेच परमेश्वर जवळ असल्याची वारंवार जाणीव होणे, असे म्हणतात. विराट समाजरूपी परमेश्वर आपली सर्व काळजी घेईल, आपण फक्त मनसोक्त देशसेवा करायची, ही देशभक्तीतील समीपता. आषाढी एकादशीला या समीपता भक्तीवरती प्रवचन झाल्यावर मग चार दिवसांनी, गुरुपौर्णिमेला ‘मातृभूमि हेच दैवत’ असे म्हणून चित्रमूर्तीची प्रतिष्ठापना प्रबोधिनीत झाली आहे. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ असा अनुभव तुकारामांना विठ्ठलाच्या बाबतीत

जेथें जातों तेथें तू माझा सांगाती – अभंग क्रमांक – ९ Read More »

माधव माली एक सयाना- अभंग क्रमांक ८

माधव माली एक सयाना । अंतरिगत रहै लुकाना ॥ धृ ॥आपै बाडी आपै माली । कली कली कर जोडै ।पाके काचे काचे पाके । मनिमानै ते तोडै ॥ १ ॥आपै पवन आपै पाणी । आपै बरिषै मेहा ।आपै पुरिष नारि पुनि आपै । आपै नेह सनेहा ॥ २ ॥आपै चंद सूर पुनि आपै । आपै धरनि अकासारचनहार विधि ऐसी रची है । प्रणवै नामदेव दासा ॥ ३ ॥ १९७७-७८ साली माननीय आप्पा त्रिवेंद्रम आणि कन्याकुमारीच्या दौऱ्यावर जाऊन आले. तिथून आल्यानंतर केरळ आणि पंजाब या दोन राज्यांमधून सर्व पक्षांना आणि संघटनांना कार्यकर्ते मिळतात म्हणून त्रिवेंद्रम, पुणे, चंडीगढ अशा रेषेमध्ये प्रबोधिनीची केंद्रे असावीत अशी कल्पना बैठकीं मधून ते मांडत असत. तेव्हापासून पंजाबचा विषय त्यांच्या डोक्यात बहुदा कायमच असावा. त्यानंतर एक-दोनदा नामदेवांची ६१ पदे गुरू ग्रंथसाहेब मध्ये आहेत, तर आपल्या भजनात सुद्धा आपण इतर अभंगांबरोबर नामदेवांची हिंदी पदे का नाही म्हणायची? असे त्यांनी विचारले. त्यावर कोणीच काही स्पष्ट प्रतिसाद दिला नाही. मग पुढच्या वर्षी मला म्हणाले की तुम्ही नामदेवांचे चरित्र सांगितले आहे. आषाढीच्या भजनात तुमच्या दलाने नामदेवांचे हिंदी भजन म्हणायला काय हरकत आहे? त्यांनी पुन्हा एकदा आठवण केली; सराव चालू झाला का? तेव्हा मग मी आप्पा बळवंत चौकात जाऊन नामदेवांच्या हिंदी पदांचे पुस्तक घेऊन आलो.  त्यात दिलेला अर्थ न पाहता, त्यातल्या त्यात ज्या पदाचा अर्थ मला समजला, ते पद आम्ही निवडले आणि सराव सुरू केला. हिंदी पद असल्याने दलातील एक एक सदस्य गळत गेला आणि शेवटी मी एकट्यानेच, निरूपण करून, मी लावलेल्या चालीत, हे पद १९७९ च्या आषाढी एकादशीला सांगितले. माधव माली एक सयाना – माधव म्हणजे कृष्ण हा एक सयाना म्हणजे शहाणा किंवा चतुर माळी आहे. अंतरिगत रहै लुकाना – तो सगळ्यांच्या अंतःकरणात लुकाना म्हणजे लपून राहिलेला आहे. आपै बाडी आपै माली – तो स्वतःच बाडी म्हणजे विश्वाचे विशाल उद्यान बनला आहे आणि तो स्वतःच त्या उद्यानातला माळी आहे. कली कली कर जोडै – त्या उद्यानातील प्रत्येक झाडावरील प्रत्येक कळीची एक एक करून तो स्वतंत्रपणे जोपासना करतो आहे. पाके काचे काचे पाके – त्या प्रत्येक कळीची फुले होऊन फळे होईपर्यंत, कळी उमलण्यापूर्वी किंवा उमलल्यावर, किंवा फळ कच्चे असताना किंवा पिकल्यावर, कच्चे आहे की पिकलेले याचा विचार न करता – मनिमानै ते तोडै – (कच्ची किंवा पिकलेली फळे) तो मन मानेल तसे तोडत असतो. कोणते फळ तोडायचे हे तो कसे ठरवतो हे त्याचे त्यालाच माहीत. आपै पवन आपै पाणी – ढग घेऊन येणारा वारा तो स्वतःच आहे आणि ढगातून येणारा पाऊसही तो स्वतःच आहे. आपै बारिषै मेहा – एवढेच काय तर ते पावसाचे पाणी बरसणारे मेहा म्हणजे ढगही तोच आहे. आपै पुरिष नारि पुनि आपै – या विश्वाच्या उद्यानात विहार करणारे सर्व पुरुष तो स्वतःच झालेला आहे आणि पुन्हा नारि म्हणजे स्त्रिया देखील तोच झालेला आहे. आपै नेह सनेहा – १) तो स्वतःच ‘सनेहा’ म्हणजे प्रेमी जन आणि ‘नेह’ म्हणजे त्यांच्यामधले प्रेम बनला आहे. किंवा २) तो स्वतःच ‘नेह’ म्हणजे शृंगार आणि ‘सनेहा’ म्हणजे वात्सल्य या स्त्री-पुरुषांमधील भावना बनला आहे. (विविध कोशांमध्ये पाहिल्यावर १) व २) हे दोन्ही अर्थ होऊ शकतात असे लक्षात आले. मला व्यक्तिशः पहिला अर्थ पुरेसा वाटतो.) आपै चंद सूर पुनि आपै – तो स्वतःच चंद्र बनला आहे आणि पुन्हा स्वतःच सूर्य बनला आहे. आपै धरनि अकासा – हे उद्यान ज्यावर फुलले आहे ती धरनि म्हणजे पृथ्वी, आणि अकासा म्हणजे आकाशही तो स्वतःच बनला आहे. रचनहार विधि ऐसी रची है – रचनहार म्हणजे निर्माणकर्ता. विधि म्हणजे ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाने ही अशी सगळी सृष्टी निर्माण केली आहे. प्रणवै नामदेव दासा – माधवाचा दास नामदेव ‘प्रणवै’ म्हणजे नम्रतापूर्वक त्याला प्रणाम करतो. प्रणाम त्या ब्रह्मदेवामध्ये पण लपलेल्या माधवाला आहे. महाराष्ट्रातल्या संतांनी सर्व विश्व हे परमेश्वराचीच सगुण साकार मूर्ती आहे, हे सांगणारे अद्वैत तत्त्वज्ञान, ओवी-अभंगांच्या द्वारा मराठीमध्ये सांगितले. नामदेवांनी तेच तत्त्वज्ञान उत्तर भारतातील त्या काळात प्रचलित बोली हिंदीमध्ये राजस्थान, दिल्ली, पंजाब, या भागामध्ये, ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर तिथे जाऊन, जवळजवळ तीस वर्षे राहून सांगितले. उत्तर भारतातील रामानंद, कबीर, दादू, गुरु नानक, रविदास हे सगळे संत नामदेवांनंतरच्या काळातले. त्या सगळ्यांवर नामदेवांनी त्यावेळच्या लोकभाषेतून सांगितलेल्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला. गुरू ग्रंथसाहेबातील ६१ पदांशिवाय नामदेवांची आणखी दीडशे ते दोनशे हिंदी पदे उपलब्ध आहेत. त्या सर्वांतून राम, विठ्ठल, कृष्ण, गोविंद, माधव अशा नावांनी सर्वांमध्ये एकच असलेल्या परमेश्वराची भक्ती सांगितली आहे. हे पद गुरू ग्रंथसाहेबमध्ये समाविष्ट नाही. पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठल मूर्ती म्हणजेच देव आहे, असं मानणारे नामदेव त्याच्याशी बोलत होते, भांडत होते, हट्ट धरत होते, खेळत होते. हे लहानपणचे भक्त नामदेव त्याच्या या सगुण मूर्तीला कोणाचीही दृष्ट लागू नये म्हणून ‘झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा’ असे एका अभंगात म्हणतात. आणि त्याच्यासाठी व्याकूळ होऊन ‘नामा म्हणे जीवे करीन लिंबलोण’ असे स्वतः च्या प्राणांनीच विठ्ठलाची दृष्ट काढायला जातात. पण ज्ञानेश्वर, विसोबा खेचर असे गुरु भेटल्यावर तेच नामदेव ज्ञानी भक्त झाले. मग वेगवेगळ्या अभंगांमध्ये ‘बाहेरी भीतरी तुजचि मी देखें’ ‘आहेसि तितुकें तूचि सर्वागत’ ‘बाहेरी भीतरींं पाहतां दिसे एकु । उभा असे व्यापकु पंढरिरावो ।’ असे विठ्ठलाचे वर्णन करायला लागले. आणखी एका अभंगामध्ये म्हटल्याप्रमाणे ‘सर्व जीव तू जालासी आपण’ असे सर्वत्र सर्वांमध्ये परमेश्वर दर्शन झाल्यावर साक्षात्कारी संत नामदेव भागवत धर्माचे प्रचारक म्हणून उत्तर भारतात गेले. तिथल्या लोकांना समजतील अशी उदाहरणे देत सर्वत्र हरी दर्शन घ्यायला शिका आणि मी त्या माधवाला प्रणाम करतो, तसा तुम्हीही प्रणाम करा. असे नामदेव त्यांच्यासमोरील लोकांना या पदातून सुचवत आहेत. या पदात उद्यानातील झाडाफुलांमध्ये, वारा, पाऊस, पृथ्वी, आकाश अशा महाभूतांमध्ये, स्त्री-पुरुषांमध्ये, त्यांच्या भावभावनांमध्ये आणि आकाशातील ग्रहगोलांमध्ये, या सर्वांमध्ये एकच माधव लपलेला आहे, हेच वरील मराठी अभंगांच्या चरणांमध्ये असलेल्या त्यांच्या अनुभवाप्रमाणे सांगायचे आहे. त्याची लीला किंवा खेळ असा आहे की तो लपलेला असल्यामुळे सगळ्यांना आपण आपल्या शक्तीनेच पिकतो, बरसतो, वाहतो, प्रेम करतो, संतती निर्माण करतो किंवा प्रकाश देतो, असे वाटत असते. नामदेव माधवाला, त्याच्या या सर्व निर्मितीला, आणि सगळ्यांच्या मागे राहून चतुराईने चाललेल्या त्याच्या खेळाला नम्रतेने प्रणाम करत आहेत. गिरीश श्री. बापट

माधव माली एक सयाना- अभंग क्रमांक ८ Read More »

राम आकाशीं पाताळी- अभंग क्रमांक ७

राम आकाशीं पाताळी । राम नांदे भूमंडळी ।राम योगियांचे मेळी । सर्व काळी शोभतो ॥धृ ॥राम नित्य निरंतरी । राम सबाह्य अंतरी l राम विवेकाचे घरी । भक्तीवरी सांपडे ॥ १ ॥राम भावे ठायींं पडे । राम भक्तांसी सांपडे ।राम मीपणें नातुडे । मौन घडे श्रुतींंसी ॥ २ ॥राम योग्यांचे मंडण । राम भक्तांचे भूषण ।राम आनंदरक्षण । संरक्षण दासाचें ॥ ३ ॥ १९७६-७७ च्या थंडीच्या महिन्यांमध्ये युवक विभागाच्या सर्व दलांची सज्जनगडावर निवासी सहल गेली होती. गडावरच्या कार्यक्रमांमध्ये रात्री भजन ठेवले होते. त्यावेळी हा अभंग पहिल्यांदा म्हटला. १९८७ साली युवकांचे एक अभ्यास शिबिर कन्याकुमारीला झाले. तिथे एका संध्याकाळी, पाचशे जण बसतील एवढ्या मोठ्या सभागृहात, समयांच्या मंद प्रकाशात, तीस-पस्तीस जणांच्या गटात मा. आण्णांनी हा अभंग सांगितला. तोपर्यंत म्हणत असलेल्या चालीतच आण्णांनी अभंग सांगितला. मात्र प्रत्येक कडव्यानंतर ते काही काळ थांबायचे आणि मग धृपद सुरू करायचे. संगीतातल्या निःशब्द क्षणांचा अनुभव तेव्हा प्रथम घेतला. प्रत्येक कडव्यानंतर त्या क्षण दोन क्षण शांततेच्या काळातच त्या आधीची दहा वर्षे फक्त म्हणत असलेल्या अभंगाचा अर्थ उलगडत गेला. सत् म्हणजे अस्तित्व धृपदामध्ये रामाचे अस्तित्व सर्व ठिकाणी आहे असे सांगितले आहे. इथे स्वर्ग आणि पाताळ हे काल्पनिक लोक सांगितलेले नाहीत. अंतरिक्षाच्या पोकळीचे पृथ्वीमुळे दोन भाग होतात. पृथ्वीच्या वर आकाश आणि पृथ्वीच्या खाली पाताळ. पृथ्वी नसती तर आकाश पाताळ असे भाग न होता केवळ अंतरिक्षच असते. ते अंतरिक्षच पूर्णपणे रामाच्या अस्तित्वाने भरून गेलेले आहे. पृथ्वी आहे, म्हणून राम आकाशात आहे आणि पाताळात आहे असे म्हटले आहे. भूमंडळ म्हणजे पृथ्वीदेखील रामाच्या अस्तित्वाने भरून गेलेली आहे. हे पृथ्वी आणि अंतरिक्षातले अस्तित्व कळणे जरा कठीण. परंतु जिथे जिथे योगी एकत्र जमलेले असतात तिथे रामाचे अस्तित्व लवकर जाणवते. जे शोभून दिसते त्यात राम आहे असे आपण म्हणतो. चैतन्यमय शरीराने चैतन्यमय जगात जगण्यातच राम आहे. चैतन्य हरपले की कशात काही राम नाही असे आपण म्हणतो. सर्व नष्ट झाल्यावरही जे राहते ते अस्तित्व म्हणजे सत् म्हणजेच राम. म्हणून राम सर्वकाळी शोभतो. चित् म्हणजे जाणीव या अभंगाच्या पहिल्या दोन कडव्यांमध्ये धृपदामध्ये ओळखू आलेलं रामाचं अस्तित्व समजून कसे घ्यायचे हे सांगितले आहे. सर्वत्र भरून राहिलेला राम काही काळ असतो आणि काही काळ नसतो असे नाही. आपण त्याच्याशी एकरूप झालो नाही तरी तो असतोच. म्हणून त्याला नित्य म्हटले आहे. तो निरंतरही आहे. त्याच्या नित्यपणाबद्दल शंका येऊ नये म्हणून निरंतर असे सांगितले आहे. आपल्याला जे चलचित्र दिसते ते खरे तर अनेक स्थिर प्रतिमा आपल्या डोळ्यासमोरून वेगाने जातात म्हणून ते चलचित्र वाटते. चित्रपट्टिकेचा वेग कमी झाला तर सुट्या सुट्या प्रतिमा दिसतील आणि चलचित्रामध्ये जाणवणारी एकसंध हालचाल तुटक जाणवायला लागेल. म्हणजे चलचित्रातली दृश्ये मुळात एकसंध नसून तुटक असतात. दाखवण्याच्या वेगामुळे ती एकसंध वाटतात. रामाचे अस्तित्व कशाच्या तरी वेगावर अवलंबून असल्यामुळे नित्य भासते असे नाही. म्हणून त्याला, मध्ये किंचितही अंतर नसलेले असे सलग, म्हणून निरंतर म्हटलेले आहे. अंतर काळाचे नाही तसेच स्थळाचेही नाही. आकाश, पृथ्वी आणि पाताळ या सगळ्यांमध्ये जसा राम आरपार भरलेला आहे तसाच तो आपल्या शरीराच्या बाहेर आणि आतही आहे. त्याला पृथ्वी अडवू शकत नाही. तसेच आपली त्वचा आणि आतले अवयव पण अडवू शकत नाही. तो बाहेर, आत आणि त्वचा व सर्व अवयवांमध्येही म्हणजेच सबाह्य अंतरी आहे. प्रथम शरीरात स्थिर काय व बदलते काय याचा शोध घेतल्यावर, म्हणजे विवेक केल्यावर, म्हणजेच विवेकाच्या घरी गेल्यावर, त्याची जाणीव होते. बाहेरील जगातील नित्य निरंतर राम आणि आपल्या शरीरातील स्थिर किंवा नित्य तत्त्व वेगळे नाहीत, विभक्त नाहीत, हे अनुभवल्यावर म्हणजे भक्ती केल्यावरच राम खरा सापडतो. जो विभक्त नाही तो भक्त, अशी व्याख्याच रामदासांनी केली आहे. रामाचे अस्तित्व विभक्तपणे म्हणजे वेगळेपणाने सापडणार नाही. रामाशी एकरूप होऊन रामाचे अस्तित्व अनुभवाला येईल. आधी विवेक, विवेकानंतर भाव भाव म्हणजे विश्वास. प्रल्हादाचा विश्वास होता की राम आकाशी, पाताळी, भूमंडळी, नित्य, निरंतर, सबाह्य अंतरी आहे. म्हणून तो समोरच्या खांबातही आहे. त्याचा तसा भाव असल्यामुळे खांबातून नृसिंह प्रकट झाला. जिथे जिथे राम आहे असा आपला विश्वास असेल त्या ‘ठायी’, म्हणजे स्थळी, राम ‘पडे’, म्हणजेच प्रकटे किंवा प्रकट होतो. आपण मनाने रामाशी एकरूप झालेलो असलो तरच आपल्या मनात भाव निर्माण होतो. म्हणून राम केवळ भक्तांनाच सापडतो असे म्हटले आहे. रामाशी एकरूप होणे म्हणजे आपले ‘मी’ पण विसरून जाणे. मी रामापेक्षा वेगळा आहे असे थोडेसे जरी मनात असेल, तर मी आहे याच्याबद्दल विश्वास असतो, पण राम आहे की नाही अशी शंका मधून मधून मनात येऊन जाते. मीपणाची जाणीव शिल्लक ठेवून राम शोधायला गेलो तर तो ‘नातुडे’, म्हणजेच सापडत नाही. श्रुती म्हणजे वेद. आम्हाला राम सापडला असे वेद सांगू पाहतात, तेव्हा त्यांना काहीच सांगता येत नाही. सांगायचे झाले तर राम म्हणजे हे नाही, ते नाही, ‘नेति’, ‘नेति’ अशा नकारात्मक भाषेतच सांगावे लागते. वेदातले एक ऋषी सांगायला गेले तेव्हा ‘हाऽवु हाऽऽवु हाऽऽऽवु’ असे आनंददर्शक उद्गार फक्त त्यांना काढता आले. शब्दात सांगता आले नाही. त्यांनाही मौन घडले. आम्ही रामाबद्दल सांगतो असे वेदांनी म्हणणे म्हणजे त्यांच्यामधले मीपण शिल्लक आहे. म्हणून त्यांना मौन घडते. आनंद म्हणजे ज्यात दुःखाचा स्पर्शही होत नाही असे नित्य निरंतर सुख राम सर्वत्र आणि सर्वकाळ आहे हे स्वतःचे वेगळेपण विसरून गेलेल्यांना कळते. ध्यानाच्या मार्गाने जाणारे योगी आणि भक्तीच्या मार्गाने जाणारे भक्त या दोघांच्या जाणीवेमध्ये केवळ रामच भरून राहिलेला असतो. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या कोणत्याही इच्छा शिल्लक राहिलेल्या नसतात. काही शिल्लक राहिल्याची रुखरुख मनात असेल तर मनात दुःख असते. ज्यांना काहीच इच्छा शिल्लक नाही, मिळावे किंवा मिळवावे असे वाटत नाही, त्यांना सतत अवघा आनंदी आनंदच असतो. अशी स्थिती असणे हेच त्यांच्या असण्याला शोभा आणते. मंडण आणि भूषण म्हणजेच त्यांच्या अस्तित्वाची शोभा. त्यांची ही आनंदमय स्थिती त्यांच्यामध्ये राम भरून राहिलेला असल्यामुळे आणि ते रामाच्या अस्तित्वात पूर्ण बुडून गेल्यामुळे असते. राम आनंदरक्षण ‘सदा सर्वदा देव सन्नीध’ आहे या चरणाने सुरू होणारा एक मनाचा श्लोक आहे. ‘सदा सर्वदा’ म्हणजेच ‘नित्य निरंतर’. ‘सन्नीध’ म्हणजेच ‘अंतरी’. असा ‘देव’ म्हणजेच ‘राम’. त्याच श्लोकात राम ‘सुखानंद आनंद कैवल्यदानी’ आहे, असाही चरण आहे. हवी ती गोष्ट मिळाल्यावर जो आनंद होतो तो ‘सुखानंद’. संकटे पळून गेल्यावर होतो तो नुसता ‘आनंद’. राम आणि आपण एकच आहोत ह्या आनंदाचा अनुभव तो ‘कैवल्य’. या तीन्हीमध्ये सर्वांचा सर्व प्रकारचा आनंद आला. सर्वांना अमर्याद आनंद देणाऱ्या आनंदाचेच रूप असलेल्या रामाकडे जणू आनंदाचा न संपणारा ठेवा आहे. जो कोणी योगाने किंवा भक्तीने रामाशी एकरूप होईल, त्याच्यासाठी रामाने जणू काही आनंद राखून ठेवला आहे. तो रामाशी एकरूप होईपर्यंत त्याच्या वाटच्या आनंदाचे राम जणू रक्षण करतो आहे. म्हणून ‘राम आनंदरक्षण’ म्हटले आहे. जे भक्त किंवा योगी अजून रामाशी अनन्य झालेले नाहीत, परंतु रामाला शरण गेले आहेत, आपले बरे वाईट जे काही व्हायचे ते रामाच्या इच्छेने होऊ दे असा ज्यांचा निश्चय झाला आहे, ते स्वतःला रामाचे दास म्हणवतात. ज्यांनी रामाचे असे

राम आकाशीं पाताळी- अभंग क्रमांक ७ Read More »

  दुर्लभ नरदेह जाला तुम्हां आम्हां – अभंग क्रमांक ६

दुर्लभ नरदेह जाला तुम्हां आम्हां । येथें साधूं प्रेमा राघोबाचा ॥१॥अवघे हातोहातींं तरों भवसिंधु । आवडी गोविंदु गाऊं गीतींं ॥२॥हिताचिया गोष्टी सांगूं एकमेकां । शोक मोह दुःख निरसूं तेणें ॥३॥ एकमेकां करूं सदा सावधान । नामी अनुसंधान तुटों नेदूं ॥४॥घेऊं सर्वभावें रामनाम दीक्षा । विश्वासें सकळिकां हेंचि सांगों ॥५॥नामा म्हणे शरण रिघों पंढरीनाथा । नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥६॥ जनी जनार्दन ऐसा भाव पूर्वी प्रबोधिनीमध्ये गणेशोत्सवाच्या काळात बर्ची नृत्याच्या बरोबर व्याख्यानमाला आणि परिसंवादही व्हायचे. १९७५ साली ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतांच्या चरित्र आणि तत्त्वज्ञानावर व्याख्यानमाला झाली. एकेका युवकाने चरित्र सांगायचे आणि त्याबरोबर बाहेरच्या एका ज्येष्ठ अभ्यासकाने तत्त्वज्ञान सांगायचे अशी योजना होती. गणेशोत्सवापूर्वीच्या एका बैठकीमध्ये आप्पांनी असे सांगितले की समाजसंस्थापनेचे काम करताना त्यामध्ये भागवत धर्माचा प्रसार कसा करायचा याचा विचार करायला लागेल. भागवत धर्म म्हणजे वरील पाच संतांनी सांगितलेला अद्वैत तत्त्वज्ञानावर आधारित ईश्वरभक्तीचा मार्ग. या व्याख्यानमालेत मला नामदेवांवर भाषण द्यायचे होते. चरित्र सांगताना ‘जनी जनार्दन ऐसा भाव’ हा चरण असलेला नामदेवांचाच ‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान’ हा अभंग आणि आजचा ‘दुर्लभ नरदेह’ हा अभंग मध्यवर्ती ठेवून चरित्र सांगावे, असे आप्पांनी सांगितले होते. त्यावेळी मी महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षात होतो. भाषण काही आप्पांच्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही. पण त्या अभंगांवर झालेला विचार कायमसाठी माझ्या लक्षात राहिला. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधुबंधू आयुष्याच्या पूर्वार्धात पंढरपुरातच राहणाऱ्या नामदेवांना रोज विठ्ठल दर्शन घेता घेता केवळ जनांमध्ये नाही तर कुत्र्यामध्येही जनार्दन म्हणजे विठ्ठल आहे हे कळले. कुत्र्याला पोळीबरोबर तूप द्यायला धावलेले नामदेव कदाचित आख्यायिकेत असतील. परंतु जनी जनार्दन हा मनातला भाव आयुष्याच्या उत्तरार्धात उत्तर भारतामध्ये अनेक वर्षे राहून भागवत धर्माचा प्रचार करून त्यांनी कृतीत आणला. भागवत धर्माचा असा प्रचार करताना लोकांमधले होऊन लोकांच्याबरोबर राहून तुम्ही आम्ही एकत्र येऊन काय केले पाहिजे हे प्रचारकाला सांगावे लागते. त्याला उपदेशकाच्या भूमिकेत राहून चालत नाही. असा प्रचारक हा संघटकही असायला लागतो. म्हणूनच या अभंगाची सुरुवात ‘तुम्हां-आम्हां’ म्हणजे आपल्या सर्वांनाच हे मनुष्य शरीर मिळालेले आहे ही अतिशय दुर्मिळ संधी आहे असे म्हणून केली आहे. या संधीचा फायदा घेऊन आयुष्यात करण्यासारखी सर्वश्रेष्ठ गोष्ट आपण करूया. राघोबाचे म्हणजे राघवाचे किंवा रामाचे प्रेम आपण मिळवूया. संसारात न बुडता ‘अवघे’ म्हणजे पुन्हा आपण सर्व. ‘हातोहाती’ म्हणजे अगदी थोडक्या वेळात. ‘भवसिंधू’ म्हणजे हा संसार तरून जाऊ. हा संसार तरून गेल्यावरच राघवाचे प्रेम किंवा कृपा लाभते. संसार तरून जाणे म्हणजे पलीकडच्या काठाला लागणे असाही अर्थ होतो. आणि संसारात तरून किंवा तरंगून म्हणजे न बुडता राघवाचे प्रेम संपादूया असाही अर्थ होऊ शकतो. तुम्ही आम्ही चे वर्तुळ वाढवत गेले तरच भागवत धर्माचा प्रसार होईल. त्यामुळे पलीकडच्या काठाला लागून संसारातून बाहेर पडण्यापेक्षा अनेकांना संसारात तरण्याची म्हणजे न बुडण्याची विद्या शिकवली पाहिजे. ‘अविद्यया मृत्युं तीर्त्वा’ म्हणजे ‘भौतिक ज्ञानाने भौतिक जगात यशस्वी होऊ’ हेच अवघ्यांनी भवसिंधू तरून जाण्याचे मर्म आहे. संसारात न बुडण्यासाठी गीतांमध्ये गोविंदाचे नाव सतत आवडीने गात राहिले पाहिजे. राम, कृष्ण, गोविंद कोणतेही नाव आवडीने घेत राहिले की संसारापलीकडचे तत्त्व मिळते. ते तत्त्व म्हणजेच राम, राघोबा किंवा गोविंद.    नामदेवांनी उत्तर भारतात जाऊन वैष्णवांची संघटना केली. सगळ्या वैष्णवांनी एकमेकांना धरून एकत्र संसार तरून जायचे आहे. त्यासाठी संसारातल्या शोक, मोह, दुःख देणाऱ्या प्रसंगांना कसे तोंड द्यायचे ते कळले पाहिजे. ‘आवडी गोविंदु गाऊं गीतींं’ हे जमले की शोक, मोह, दुःखाचे प्रसंग आले आणि येत राहिले तरी बाधत नाहीत. ‘निरसू तेणें’ म्हणजे प्रसंग नाहीसे करू असे नाही. तर त्यांचा त्रास जाणवणार नाही असे करू. याचा ज्याला जेवढा अनुभव आला आहे त्याने तो अनुभव इतरांना सांगावा. असे एकमेकांना अनुभव सांगून धीर देणे म्हणजेच हिताच्या गोष्टी एकमेकांना सांगणे. शोक, मोह, दुःख दूर करून आनंद वाढवणे हेच सगळ्यांच्या हिताचे आहे. कृतीचे ध्येयाशी अनुसंधान गोविंदाची गीते गायली की शोक, मोह, दुःख देणारे प्रसंग आपल्यावर परिणाम करत नाहीत हा अनुभव प्रत्येकाने घेण्यासाठी परमेश्वराचा नामजप प्रकटपणे किंवा मनातल्या मनात अखंड चालू राहिला पाहिजे. ज्या हिताच्या गोष्टी एकमेकांना सांगायच्या त्यामध्ये नामजपात खंड पडू देऊ नकोस असे ‘एकमेकांना सावधान करणे’ हे देखील आलेच. ‘अनुसंधान’ म्हणजे प्रेम. पण हे प्रेम सततच्या सहवासाने किंवा संपर्काने निर्माण झालेले असते. नामजप अखंड चालू राहिला तरच नामाबद्दलचे आणि त्यातून परमेश्वराबद्दलचे प्रेम निर्माण होते. नामजप करणे ही कृती आहे आणि परमेश्वराचे प्रेम मिळवणे हे ध्येय आहे. संघटनेमध्ये हे कृतीचे ध्येयाशी अनुसंधान महत्त्वाचे आहे. ‘अनुसंधान’ म्हणजे अखंड जोडले राहणे. एखादा प्रकल्प पूर्ण झाला किंवा एखादे अभियान झाले की त्यातून अनेक गोष्टी निघतात. ज्यांचा आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी उपयोग आपल्या लक्षात आला त्या पुढे पुन्हा वापरण्यासाठी आपण आपल्या जवळ ठेवल्या. त्या गोष्टींंचे ध्येयाशी अनुसंधान आपल्या लक्षात आले. आपल्या कृतीचे ध्येयाशी अनुसंधान राखणे ही चोख व्यवहार करण्यासारखी आणखी वेगळ्या प्रकारची उत्तमता आहे. व्यापारी संघटनांना चोख व्यवहारातील उत्तमता पुरते. ध्येयवादी संघटनांना कृतीचे ध्येयाशी सतत अनुसंधान राखणारी उत्तमता देखील लागते. स्वतःचा संकल्प हीच दीक्षा कृतीचे ध्येयाशी अनुसंधान राहण्यासाठी ध्येयाचे चिंतन आणि स्मरण सतत करावे लागते. कृतीचे काय काय अनुकूल परिणाम होतील याचा एका मर्यादेपर्यंत विचार करता येतो. पण त्यापुढे अंधारातच उडी मारावी लागते. प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत श्रद्धेच्या बळावरच आपण ध्येय निश्चित गाठणार ही सकारात्मक भावना मनात ठेवावी लागते. ही भावना बळकट करण्यासाठी जी उपासना करायची तीच रामनामदीक्षा. ‘सर्वभावे’ म्हणजे होईलच अशा विश्वासाने किंवा श्रद्धेने. नामदेवांसारखा विठ्ठलाशी प्रत्यक्ष संवाद करणारा भक्तही प्रचारक आणि संघटक या भूमिकेतून आपण सर्व ‘रामनामदीक्षा घेऊ’ असे सर्वांमधील एक होऊन आवाहन करतो. दीक्षा किंवा अनुग्रह या शब्दांभोवती ध्यानमार्गाचे आचरण करणाऱ्यांमुळे पवित्रतेचे एक गूढ वलय निर्माण झाले आहे. मला मंगलोरचे विसाव्या शतकातील संत रामदास यांचे आत्मचरित्र आठवते. ते एका कारखान्याचे मालक. तिथल्या अडचणींवर उपाय म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना सहज म्हटले – ‘मग राम नाम का घेत नाहीस?’ हीच त्यांची रामनामदीक्षा झाली. त्यांनी अनुसंधान तुटू न देता रामनामाचा जप सुरू केला आणि काही वर्षांतच त्यांना ईश्वर साक्षात्कार झाला. भक्तिमार्गात तरी अशी सहज सूचना आपण मनाने स्वीकारणे हीच दीक्षा असते. आपण मनःपूर्वक संकल्प करून त्याचे आचरण करायचे असते. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ असे रोज म्हणायचे ठरविणे हीच माझी रामनामदीक्षा झाली, असा माझा अनुभव आहे. ज्यांना ज्यांना असे ध्येयाचे चिंतन करत कृतीचे ध्येयाशी अनुसंधान राखता येते त्यांनी हेच अनुभवाचे बोल सगळ्यांना सांगायचे असतात. आपण अनुभव घ्यायचे असतात आणि ‘विश्वासाने सकाळिकांना सांगायचे’ असतात. अनुभव घेऊया आणि विश्वासाने सांगूया असे नामदेव म्हणतात. स्वतः आधी अनुभव घेतल्यावर सुद्धा इतरांबरोबर पुन्हा अनुभव घ्यायला तयार असणे ही देखील प्रचारकाची आणि संघटकाची भूमिका आहे. कार्यशरण आम्ही, ध्येयशरण आम्ही, तत्त्वशरण आम्ही शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक दृष्ट्या किंवा सत्तेमुळे आपल्यापेक्षा बलवान असलेल्याच्या अधीन किंवा अंकित होणे म्हणजे व्यवहारातील शरणता (submission). विवेकानंद आणि अरविंदांनी भक्तिमार्गातील शरणतेसाठी surrender असा शब्द वापरला आहे. कोणाच्या शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक शक्तीमुळे नाईलाजाने किंवा नकळत त्यांच्या अधीन व्हायचे नाही. ‘मात्र खलांच्या सत्तेपुढती जुळोत ना कधि हात’ असेच राहिले पाहिजे. आपला

  दुर्लभ नरदेह जाला तुम्हां आम्हां – अभंग क्रमांक ६ Read More »