अभंग निरुपण

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल -अभंग क्रमांक ५

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥ धृ ॥ भावभक्ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥१॥ दया, क्षमा, शांती हेचि वाळवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥२॥ ज्ञान, ध्यान, पूजा, विवेक, आनंद । हाचि वेणु नाद शोभतसे ॥३॥ दश इंद्रियांचा एक मेळा केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥४॥देही देखिली पंढरी जनी वनी । एका जनार्दनी वारी करी ॥५॥ आत्मिक विकसनाच्या पहिल्या तीन पायऱ्या महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात असताना १९७४ साली विद्याव्रताची उपासना पहिल्यांदा मनःपूर्वक ऐकली आणि म्हटली. त्यावेळी हा अभंगही पहिल्यांदा म्हटला. या अभंगाचा अर्थ हळूहळू उलगडत गेला. तीर्थक्षेत्रामधल्या मंदिराचे महत्त्व विशेष असते. कारण त्या मंदिरातील देव जागृत असतो अशी भक्तांची समजूत असते. देह देवाचे मंदिर असे म्हणत असले, तरी संतांना ते मंदिर ज्या तीर्थक्षेत्रात आहे ते सगळे गावच देवाचे निवासस्थान वाटते. त्यामुळे या अभंगात काया म्हणजे शरीर, मंदिर आहे असे म्हणण्याऐवजी ते पंढरपूर आहे असे म्हटले आहे. पंढरपूरचे महत्त्व तिथल्या विठ्ठलामुळे आहे. तसे शरीराचे महत्त्व त्यातल्या आत्म्यामुळे आहे. शरीर जर पंढरपूर आहे, तर आत्मा विठ्ठल असला पाहिजे. विठ्ठल म्हणजेच पांडुरंग. शरीरात पांडुरंग नांदतो आहे म्हणजे आपल्या शरीराचे सर्व व्यवहार त्यातील आत्म्याचा म्हणजे पांडुरंगाचा आनंदमय खेळ आहे. पंढरपूरला भीमा नदी वाहते. शरीररूपी पंढरपुरातील भीमा नदी कोणती? ‘आत्मा हा विठ्ठल’ हा आपल्या अंतःकरणातील विश्वास म्हणजे भाव आणि आपले शरीर पंढरपूरला साजेसे पवित्र ठेवायची धडपड म्हणजे भक्ती. हा भाव आणि ही भक्ती जोपर्यंत ओसंडून व्यक्त होत आहे तोपर्यंत तो जणू शरीररूपी पंढरीतील भीमेचा प्रवाह आहे. भावभक्तिरूपी भीमेने चंद्रभागेने आत्मारूपी विठ्ठलाभोवती चंद्रकोरीसारखे वळण घेतल्याने तो विठ्ठल शोभून दिसतो आहे. सगळ्याच नद्यांचे प्रवाह ऋतुकालानुसार कमी जास्ती होत असतात. तसे भाव आणि भक्ती सतत वाहत असली तरी त्यांनाही शरीरधर्मानुसार कधी दुथडी भरून वाहावेसे वाटते तर कधी तो प्रवाह आटल्यामुळे क्षीण होतो. नदी आटली की नदीचे पात्र उघडे पडते आणि नदीच्या दोन्ही काठांना वाळूची मैदाने किंवा वाळवंट दिसू लागते. भक्ताच्या मनातील भावभक्ती वेगवेगळ्या कारणांनी क्षीण झाली तरी आपल्या आतमध्ये पांडुरंग नांदतो आहे या जाणिवेमुळे त्याच्या वागण्यामध्ये दया, क्षमा, शांती हे दैवी संपत्तीचे गुण दिसत राहतात. त्या गुणांच्यामुळे त्याच्या भोवती त्याच्यासारखेच भक्त भाविक लोक जमा होतात. विठ्ठलाचे भक्त ते सर्व वैष्णव. आणि वैष्णवांचा थाट म्हणजे वैष्णवांचा मेळा. चंद्रभागेच्या किंवा भीमेच्या वाळवंटात जसे वारकरी जमा होतात तसे एका वैष्णवाच्या दया, क्षमा, शांती या गुणांमुळे त्याच्याभोवती समानधर्मी वैष्णव गोळा होतात. भाव भक्तीला भीमा असे म्हटले आहे. म्हणून त्यांचे भरते कमी झाल्यावर दिसणारे दया, क्षमा, शांती हे गुणधर्म भीमेच्या पात्रातील वाळवंट. तिथे जमलेल्या या वैष्णवांच्या मेळ्यातही पांडुरंग नांदत असतो. आत्मिक विकसनाच्या पुढच्या दोन पायऱ्या भजन कीर्तनाचा रंग देखील कधीतरी संपतो आणि वारकऱ्यांची पांगापांग होते. विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच एक रूप. श्रीकृष्ण जसा गोकुळात असताना कधी वनात एकटाच जाऊन मुरली वाजवत बसायचा, तसे शरीरातील आत्मारूपी विठ्ठलही वैष्णवांचा मेळा पांगल्यानंतर एकटाच मुरली वाजवतो आहे, अशी कल्पना तिसऱ्या कडव्यात केली आहे. त्याच्या मुरलीचे स्वर म्हणजे वेणुनाद, शरीरातील आत्म्याचा वेणुनाद शरीरातून कसा प्रकट होईल? तर तो भक्ताच्या ज्ञानार्जनाच्या क्रियेतून, ध्यानातून, पूजेच्या क्रियेतून, आजूबाजूच्या जगातील सार काय आणि असार काय, विठ्ठलाची भक्ती वाढवण्याला कशाची मदत होईल आणि कशाचा अडथळा होईल, याचा विवेक करण्यातून व्यक्त होईल. कृष्ण जसा स्वतःच्या आनंदासाठी मुरली वाजवायचा तसा शरीरातील आत्म्याला ज्ञानार्जन, ध्यान, पूजा आणि विवेक करणे या सर्वांतून जणू वेणूचे स्वर ऐकल्याचा आनंद मिळतो. वैष्णवांच्या मेळ्यात असो की एकांतात असो विठ्ठलाचा आनंदमय खेळ चालूच असतो. मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाला देखील गुरे चरायला घेऊन जावे लागते. तसे ज्ञानार्जन, ध्यान, पूजा, विवेक करणे या आत्म्याच्या आनंद प्रकट करणाऱ्या क्रिया देखील कधीतरी थंडावल्या, तरी शरीरातील पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांच्या शरीर टिकवण्यासाठीच्या क्रिया मात्र चालू राहाव्या लागतात. इंद्रियांच्या क्रिया चालू असण्यानेच शरीरात चैतन्य खेळत असल्याचे कळते. कृष्णाच्या बरोबर गुरे चरायला घेऊन जाणाऱ्या सगळ्या गुराख्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून मग त्या खायच्या अशी पद्धत कृष्णाने सुरु केली होती. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र कालवल्यावर जो पदार्थ तयार होईल तो गोपाळकाला. प्रत्येकाच्या शिदोरीची वेगवेगळी चव मिसळून जऊन गोपाळकाल्याची एकच वेगळी चव तयार होते. तसे दहाही इंद्रियांच्या स्वतंत्रपणे चालणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया एका दिशेने वळल्या, विठ्ठलाची उपासना ही एकच धून त्यांना लागली, की त्या इंद्रियांच्या क्रियांचाही गोपाळकाला होऊन जातो. मनामध्ये भावभक्ती असेल, दया, क्षमा, शांती हे गुण वसत असतील; ज्ञान, ध्यान, पूजा, विवेक या कामातच मन गुंतलेले असेल; तर सगळ्या इंद्रियांनाही तेच वळण लागते. ‘पडिले वळण इंद्रियां सकळा। भावा तो निराळा नाही दुजा॥’ अशी इंद्रियांची स्थिती होते. म्हणजेच इंद्रियांना विठ्ठलाचे एकच वळण लागल्यामुळे त्यांचा मेळा हाच गोपाळकाला झाला. सर्व इंद्रियांच्या व्यवहारातूनही मग विठ्ठलाचे आनंदस्वरूप व्यक्त होते. आत्मिक विकसनाची शेवटची पायरी या पहिल्या चार कडव्यांचा अर्थ फार कष्ट न पडता कळत गेला. शेवटच्या कडव्यातील शब्द सोपे असूनही त्यांचा अर्थ कळायला मात्र काही वर्षे जायला लगली. माझा वर्गमित्र अकरावीत असताना आप्पांच्या घरीच राहत होता. मागच्या वेळचा अभंग जसा आप्पांनी मला शिकवायचा प्रयत्न केला तसे विद्याव्रत पोथीतील श्लोक व अभंगाची चाल निश्चित करताना हा अभंग त्याला व त्याच्या बरोबरच्या दोन-चार जणांना शिकवला होता. त्यामुळे हा अभंग त्याच्या मनात पक्का बसला होता. त्याचे शिक्षण संपल्यानंतर काही वर्षे तो शेतकरी संघटनेचे काम पूर्ण वेळ करत होता. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे हा त्यांच्या सर्व आंदोलनांचा मुख्य मुद्दा असायचा. आंदोलनांसाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी त्यांचे जे मेळावे व्हायचे ते नेहमी पंढरपूर, शिर्डी, परळी अशा तीर्थक्षेत्रांजवळ व्हायचे. सभा संपल्यावर जरी नेते गेले नाहीत, तरी सगळे शेतकरी मात्र तिथल्या तिथल्या दैवताच्या दर्शनासाठी रांगा लावायचे. माझा मित्र म्हणाला की स्वतःमधला आत्मा म्हणजे विठ्ठल हे बुद्धीला कळले. पण या सगळ्या लाखो शेतकऱ्यांच्या देहामध्येही विठ्ठलच आहे, आणि ते सगळे जेव्हा एकत्र जमलेले दिसायचे तेव्हा त्यांच्या संघटित शक्तीतून देवच प्रकट होतो आहे, असे वाटायचे. स्वतःच्या देहाला पंढरी म्हटले तर या सगळ्यांच्या म्हणजे जनांच्या देहामध्ये सुद्धा पंढरी आहे, हे विराट जनसमुदाय पाहिल्यावर लक्षात येते. हाच मित्र भटक्याही आहे. प्रबोधिनीत लागलेले डोंगर-दऱ्या भटकण्याचे वेड त्याने पुढेही जोपासले होते. गड-किल्ल्यांवरून भटकताना सर्व ऋतूंमध्ये बदलणारी निसर्गाची रूपेही त्याने पाहिली होती. अव्याहत चालणाऱ्या ऋतुचक्रातून देवाचीच शक्ती प्रकट होते आहे, हे त्याला सुचले. निसर्गामध्ये विशेषतः जंगलांमध्ये किंवा वनांमध्ये देखील विठ्ठलच आहे हे त्याला हळूहळू उमगत गेले. त्यामुळे आपला देह म्हणजे जशी पंढरी, सगळा जनसमुदाय म्हणजे जशी पंढरी, तशी डोंगर-दऱ्या, नदी-नाले, पशुपक्षी, झाडेवेली यांनी बनलेली वने ही देखील पंढरीच असे एक दिवस त्याने मला तासभर समजावून सांगितले. त्याचे ऐकत असताना मलाही मी घेतलेले गर्दीचे अनुभव आणि तुडवलेली रानेवने आठवत गेली. ‘देही देखिली पंढरी जनी वनी’ याचा अर्थ अनेक वर्षांनी आमच्या या गप्पांमुळे मला उलगडला. आधी स्वतःचे शरीर हे पंढरी, मग सर्वांची शरीरेही पंढरी आणि या सगळ्यांसकट हा निसर्गही पंढरीच. देहामध्ये, जनांमध्ये आणि वनामध्ये सगळीकडे पंढरी दिसायला लागल्यावर तुम्ही कुठल्याही दिशेने चालायला लागलात

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल -अभंग क्रमांक ५ Read More »

माझे मज कळों येती अवगुण – अभंग क्रमांक ४

 माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥आतां आड उभा राहें नारायण । दयासिंधुपणा साच करी ॥वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन झालों देवा ॥तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा॥ या निरूपणमालेतील पहिले दोन अभंग मी आठवीत असताना माझ्या परिचयाचे झाले. तिसरा अभंग मी अकरावी झाल्यानंतर मला ऐकायला मिळाला. आता आजच्या अभंगाची ओळख कशी झाली याविषयी आधी थोडेसे निवेदन. प्रबोधिनीत दर रविवारी रात्री युवकांची एक अभ्यासबैठक चालायची. दहावीच्या दुसऱ्या सत्रानंतर मी त्या बैठकीला जायला लागलो. बैठक झाल्यावर त्या रात्री प्रबोधिनीत म्हणजे आप्पांच्या निवासस्थानी मुक्काम असायचा. रात्री बैठक झाल्यावर आणि अनेक वेळा सकाळी उपासना झाल्यावर आप्पा कोणता तरी अभंग किंवा पद्य म्हणत असायचे. त्यात ऐकलेला हा अभंग. हा अभंग लक्षात राहायचे कारण म्हणजे त्या एक दोन वर्षांच्या काळात हा अभंग आप्पांनी मला त्यांच्या चालीत म्हणायला शिकवायचा प्रयत्न चार पाच वेळा केला होता. हा अभंग शिकण्याबाबत माझ्या मनात मात्र फार उत्साह नव्हता. निरुत्साहाचे कारण प्रबोधिनीत भजनाच्या वेळी अभंग म्हणणाऱ्याने त्याला समजलेला अभंगाचा अर्थ आधी थोडक्यात सांगायचा आणि मग अभंग म्हणायचा अशी पद्धत ठेवली आहे. हा अभंग म्हणणारा त्याचे थोडक्यात निरूपण असे करेल – ‘माझे अवगुण मज कळो येती. माझ्यातले दुर्गुण, उणिवा मला समजतात. पण काय करू? माझे मन मला आवरता येत नाही. ते पुन्हा पुन्हा चुकीच्या मार्गाने जाते. मन चुकीच्या मार्गाने जायला लागले की आता नारायणा तूच त्याच्या चुकीच्या रस्त्यावर त्याला आडवा जा आणि थांबव. तुझे दयेचा सागर हे नाव माझ्या मनाला अडवून तू खरे करून दाखव. मी संयमाच्या गोष्टी खूप बोलतो पण त्याप्रमाणे मला वागता येत नाही. माझे कान, डोळे, जीभ त्यांना आवडते त्या गोष्टींकडे बऱ्या-वाईट परिणामांचा विचार न करता धाव घेतात आणि मन त्यांच्या मागे फरफटत जाते. तुकाराम महाराज म्हणतात मी जसा आहे तसा माझ्या गुण-दोषांसकट नारायणा तुला शरण आलो आहे. तू माझी उपेक्षा करू नकोस. आई वडिलांसारखे तू ही मला सांभाळून घे’. पण हा अर्थ मला सुरुवातीला पचेना. उत्तर भारतात सगळीकडे ‘ओम जय जगदीश हरे’ ही आरती प्रसिद्ध आहे. या आरतीतील ‘मैं मूरख खल कामी’ हे शब्द मला खटकायचे. ‘स्वतःला कमी लेखू नका’ ही प्रबोधिनीतील शिकवण होती. आणि असं सांगणारे आप्पा ‘मैं मूरख खल कामी’ असाच भाव असलेला अभंग स्वतः का म्हणतात? आणि मला का शिकवतात? हा प्रश्न मला पडायचा. परमेश्वराकडे दयेची भीक मागणारा अभंग मी का म्हणायचा? असा प्रश्न मला पडला होता. हळूहळू लक्षात येत गेलं की अभंगाचा अर्थ अभंग लिहिणाऱ्याच्या किंवा रचणाऱ्याच्या त्यावेळच्या मनःस्थितीवरून समजून घ्यायचा असतो. गैरसमज दूर झाला शंतनुराव किर्लोस्कर हे प्रबोधिनीचे जवळजवळ पंधरा वर्ष अध्यक्ष होते. ते अतिशय चिकित्सक आणि प्रयत्नवादी होते. आपल्या एका वर्षारंभ उपासनेला आल्यानंतर त्यांना घरी पोहोचवायला त्यांच्या बरोबर गेलेल्या कार्यकर्त्याला ते म्हणाले होते की तुमच्या प्रार्थनेमध्ये ‘हे घडू दे ना’, ‘असे होऊ दे’ अशी वाक्ये का आहेत? प्रार्थनेत सुद्धा ‘आम्ही करू’, ‘आम्ही घडवू’ असेच म्हटले पाहिजे. त्या कार्यकर्त्याकडून नंतर कधीतरी मला हा संवाद ऐकयला मिळाला. हे ऐकणाऱ्या माझ्या बरोबरीच्या युवक मित्रांना आपल्या मनातलेच शंतनुराव बोलले याचा आनंद झाला. सर्वांनी ‘शंतनुरावांचे म्हणणे बरोबर आहे. आपण वर्षारंभाच्या गद्य प्रार्थनेत बदल करूया’, असा शंतनुरावांच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्यावर आप्पांनी केलेल्या खुलाशानंतर मला मात्र या अभंगाच्या अर्थाची किल्ली सापडली. एखादे स्वच्छ कापड त्याच्याकडे भिंगातून पाहायला लागल्यावर इतके स्वच्छ नाही असे कळते. त्यावर धुळीचे आणि कचऱ्याचे बारीक बारीक कण चिकटलेले दिसायला लागतात. त्याप्रामाणेच ज्याची संवेदनशक्ती वाढलेली आहे त्याला आपल्या स्वभावातले बारीकसारीक दोषही भिंगातून पाहिल्यासारखे मोठे वाटायला लागतात. ज्याची जशी उपासनेत प्रगती होते तशी त्याची चित्तशुद्धी होत जाते. मग त्याला आपल्या चित्तातले बारीकसारीक दोषही खपत नाहीत. हे बारीकसारीक दोष गेल्याशिवाय आपली पूर्ण चित्तशुद्धी होणार नाही आणि त्याशिवाय आपल्याला परमेश्वरदर्शन होणार नाही अशा शंकेमुळे तो भक्त किंवा साधक व्याकुळ झालेला असतो. कितीही प्रयत्न केले तरी जे दोष दूर होत नाहीत ते दोष मोठे वाटायला लागतात. आरतीमध्ये ‘मैं मूरख खल कामी’ म्हणणारा लोकांच्या दृष्टीने शहाणा, सज्जन आणि निःस्पृहच असतो. पण त्याला आपल्या आतले कुसळाएवढे दोष मुसळासारखे वाटतात. तो स्वतःला मूर्ख, दुष्ट, लोभी अशी विशेषणे लावून आत्मनिंदा करायला लागतो. ते उरलेले शेवटचे दोष माझ्याच्याने दूर होत नाहीत. म्हणून आता तूच ते दूर कर, अशी प्रार्थना त्याला करावीशी वाटते. शंतनुरावांच्या आक्षेपावर आप्पांनी आमच्याजवळ खुलासा केला. सगळे प्रयत्न झाल्यानंतर काहीतरी अचानक विघ्न येऊ नये, आपल्या नियंत्रणाबाहेरील घटकांनी आपल्या योजना विस्कटून टाकू नयेत, म्हणून शेवटी परमेश्वराला ‘हे होऊ दे’, ‘हे घडू दे ना’ अशी प्रार्थना करायची. आप्पांच्या खुलाशानंतर बहुतेक सगळ्या युवकांच्या मनातल्या शंका गेल्या. शंतनुरावांना उत्तर द्यायला कोणी गेले नाही. परंतु मला हा अभंग आवडू लागला. खुलाशावर माझा विचार आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातसुद्धा शुद्धतेसाठी parts per million असे मोजमाप किंवा अचूकतेसाठी six sigma असे तंत्र वापरतात. दशलक्षात एखादी चूक एवढी अचूकता आली तरी दशलक्षामध्ये एखादी चूक राहू शकतेच. ती ही दूर करण्याचा प्रयत्न करत राहायचं. पण ती दूर करता येईपर्यंत काम थांबवता येत नाही. म्हणून नियंत्रणाबाहेरील घटक अनुकूल व्हावेत अशी प्रार्थना परमेश्वराला करायची. ‘यत्न तो देव जाणावा’ असे सांगणाऱ्या समर्थ रामदासांनीही असे म्हटले आहे, म्हणून कर्म आरंभिले । काही एक सांग घडलेजेथे जेथे अंतर पडिले । तेथे हरिस्मरण करावे ।। सांग म्हणजे सर्व बारीकसारीक गोष्टींचा विचार करून. सांग काम केले तरी कुठेतरी फट राहून जाते. हे अंतर भरून यावे त्याच्यासाठी हरिस्मरण करायचे. आपले सगळे प्रयत्न झाल्यावर आपण यशस्वी होऊ असा सकारात्मक विचार करायचा असतो. स्वतःवर विसंबून राहणाऱ्या लोकांना तेवढेच करता येते. स्वतःच्या नियंत्रणात नसलेली आपल्याहून मोठी शक्ती आहे असे मानणारे लोक केवळ सकारात्मक विचारापलीकडे त्याच्या पुढच्या कृतीची आणखी एक पायरी जाऊ शकतात. ती कृती म्हणजे देवाची प्रार्थना करणे. प्रगत साधकाची प्रार्थना तुकारामांनी परमेश्वरदर्शन होण्याच्या आधी परंतु साधनेच्या प्रगत अवस्थेत हा अभंग लिहिला असला पाहिजे. मला मनाला मागे खेचता येत नाही. परमेश्वरानेच मन आणि इंद्रियांच्या मध्ये आडवे उभे राहून मनाला विषयांकडे जाऊ देऊ नये आणि अशा रितीने आपण दयेचा सागर आहोत हे सिद्ध करावं अशी प्रार्थना या अभंगात केली आहे. जुनी वाहने विकताना ती ‘as is where is’ तत्त्वावर विकायची आहेत अशी जाहिरात असते. तसे तुकाराम म्हणतात मी तुझा दास जसा आहे तसा गुणदोषांसकट त्याला आपला म्हण. उदास म्हणजे खूप उंचावरून तटस्थतेने निरीक्षण करणे. तसा तू उदास राहू नको. माझी उपेक्षा करू नकोस. मला आपलं म्हण. माझे मन बहिर्मुख होऊन इंद्रियांमागे धावत असते, त्याऐवजी ते अंतर्मुख होऊन तुझ्याकडे लागेल असे आता तूच कर. एव्हरेस्ट शिखरावर जाणारे बहुतेक सर्व गिर्यारोहक शेवटचे २०-२५ फूट राहिल्यावर प्रयत्नांची शर्थ करत असताना आता ढग येऊ नयेत, वादळ होऊ नये, बर्फ घसरू नये आणि आपण शिखरावर पोहोचावे अशी प्रार्थना करू लागतात. हा अभंग त्या स्थितीत म्हणजे साधनेच्या शेवटच्या टप्प्यावर लिहिलेला असणार. एव्हरेस्टच्या तळावरच्या शिबिरामध्ये उभे राहून रचलेला किंवा म्हणायचा

माझे मज कळों येती अवगुण – अभंग क्रमांक ४ Read More »

एक तत्त्व नाम दृढ धरी मना – अभंग क्रमांक – ३

एक तत्त्व नाम दृढ धरी मना एक तत्त्व नाम दृढ धरी मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥ ध्रु ॥ ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥ २ ॥ नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशी झणी ॥३॥ ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥ ४ ॥ वारकरी पद्धतीच्या भजनाची सुरुवात पंचपदीने होते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हा श्लोक, जय जय राम कृष्ण हर हा नाम गजर, रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग आणि जय जय विठ्ठल रखुमाई हा नाम गजर अशी पंचपदीची साधारण रचन नसते. आधी विठ्ठलाचे रूप दिसते. शेवटी विठ्ठलाचे ध्यान लागले पाहिजे. रूपाकडून ध्यानाकडे जाताना मध्ये नामाचा आधार घ्यावा लागतो. या अभंगात नामाच्या आधाराने ध्यानापर्यंत जाण्यासाठी काय करावे लागते हे सांगितले आहे. ज्ञानदेवांच्या हरिपाठात अठ्ठावीस अभंग आहेत. त्यातला हा सव्वीसावा अभंग. एक तत्त्व नाम दृढ धरी मना तत् म्हणजे ते. त्व म्हणजे पणा. तत्त्व म्हणजे ते पण. कोणत्याही गोष्टीचा सार भाग. ज्याच्यामुळे एखाद्या गोष्टीची ओळख पटते ते तत्त्व. विश्वाचे तत्त्व कोणते ? याचा शोध अनेक जणांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्रज्ञांनी आपल्या पद्धतीने शोध घेतला आणि साऱ्या विश्वाचे तत्त्व म्हणजे एक वैश्विक ऊर्जा असे निश्चित केले. अनेक संतांनी आणि ऋषी मुनींनी आपल्या पद्धतीने शोध घेतला आणि साऱ्या विश्वाचे तत्त्व म्हणजेच जिच्यामध्ये जाणीव शक्ती आहे आणि जी आनंदस्वरूप आहे अशी वैश्विक ऊर्जा असे निश्चित केले. हा अभंग ज्या काळात प्रबोधिनीत मला ऐकायला मिळाला त्याच वर्षी कधीतरी एका कीर्तनकारांनी प्रबोधिनीत केलेल्या कीर्तनात एकनाथांच्या अभंगातली एक छान ओळ कीर्तनाच्या ओघात सांगितली – ” आधी कोठेचि नव्हते काही। चंद्र सूर्य तारा नाही । अवघे शून्यचि होते पाही । कान्होबा ते रे ते रे ते ” एका ओळीत संतांनी ते तत्त्व कोणते ते सांगून टाकले आहे. जेव्हा काहीच निर्माण झाले नव्हते तेव्हा जे तत्त्व अस्तित्वात होते ते साऱ्या विश्वातले एकमेव मूळ तत्व. या तत्त्वाला ‘ते रे ते रे ते’ असे प्रत्येक वेळी कुठे म्हणणार ? म्हणून त्याला काहीतरी नाव दिले पाहिजे. त्या तत्त्वाला सर्वसामान्य लोक रोजच्या भाषेत देव म्हणतात आणि त्या देवाचे नाव म्हणजे नाम. ते तत्त्व कोणते आहे? कसे आहे ? हे कळेपर्यंत त्याचे नावच आपल्या आवाक्यातले आहे. म्हणून ते घट्ट धरून ठेव असं ज्ञानदेव पहिल्या चरणात आपल्या मनालाच सांगतात. हरीसी करुणा येईल तुझी आपल्याला आधी आनंदाची जाणीव होते आणि मग विचारांची जाणीव होते. आपल्यापेक्षा कोणामध्ये आनंद कमी असला तर त्याचीही जाणीव होते आणि त्याच्यामधली आनंदाची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला विचार करायच्या आधीच धावून जावेसे वाटते. ते वाटणे आणि धावणे म्हणजे करुणा. सर्वसाधारण लोक करुणा म्हणजे दया असे म्हणतात. पण मी करुणेचा विचार करत असतो तेव्हा मला करुणेची अनेक रूपे दिसतात. करुणा म्हणजे काय ? करुणा म्हणजे सामाजिक जाणीव. करुणा म्हणजे आपल्या वाटचे इतरांसाठी सोडणे. करुणा म्हणजे संवेदनशीलता. करुणा म्हणजे इतरांसाठीची धडपड. करुणा म्हणजे इतरांचे प्रश्न पाहून स्वतः ते सोडवायला धावणे. करुणा म्हणजे भवतालचे दारिद्य, अज्ञान, दुर्बलता, असहायता पाहून आपण ते दूर करायला पुढे होणे. करुणा म्हणजे रांगेच्या शेवटी जाऊन थांबण्याची तयारी असणे. करुणा म्हणजे स्वतः उभे राहून इतरांना बसायला देणे. करुणा म्हणजे रुग्णाची सेवा. करुणा म्हणजे जे भीतीने बोलत नाहीत त्यांच्या मनातले ओळखणे. करुणा म्हणजे हातातले काम सोडून मदतीला धावणे. करुणा म्हणजे अन्यायाला वाचा फोडणे. करुणा म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध उभे राहणे. करुणा म्हणजे इतरांच्या हितसुखामध्ये स्वतःचे हितसुख पाहणे. जगाचे मूळ तत्त्व जाणीवयुक्त आणि आनंद स्वरूप आहे असे संतांनी शोधून काढले आहे. ज्याने नाम दृढ धरून ठेवले आहे आणि त्याच्या मदतीने जो त्या तत्त्वापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे त्याला अर्थातच ते तत्त्व अजून सापडायचे आहे. म्हणजे त्याला खरा आनंद अजुन सापडायचा आहे. पाणी जसं उंचावरून खाली वाहत जाते तसा आनंद-स्वरुप हरि आनंदस्वरुप तत्त्वाचा शोध घेणाऱ्या व्यक्तीकडे त्याच्यामधला आनंदाचा खळगा खणून काढण्यासाठी सहज जाईल असे ज्ञानदेव या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥ त्या एका तत्वाचे नाव इतके सोपे आहे की त्याला हाक मारतो आहे एवढे समजले तरी पुरे. त्याचा कसाही उच्चार झालेला चालेल. त्यामुळे हरी ऐवजी राम, कृष्ण, गोविंद काहीही म्हटले तरी चालेल. नाव कोणते आहे यापेक्षा ते नाव त्या एका मूळ तत्त्वाला उद्देशून आहे एवढे असले म्हणजे झाले. नामाच्या साहाय्याने तत्त्वापर्यंत पोहोचण्याची सर्व तळमळ तुम्ही हे नाव कसं उच्चारता यातून व्यक्त मात्र झाली पाहिजे. सद्गद म्हणजे तुमच्या जिभेबरोबर सगळं शरीरच ते नाव घ्यायला लागले. याला शरीरामध्ये सत्त्विक भाव जागृत होणे असं म्हणतात. नामाचा उच्चार किंवा जप करता करता कपाळावरती घामाचे थेंब तयार होणे, अंगावरचे केस उभे राहणे, डोळे अश्रृंनी भरून जाणे, गळा भरून येऊन आवाज बदलणे, शरीराला कंप सुटणे अशी लक्षणे जप करताना अंगावरती दिसणे म्हणजे सद्गद होऊन जप करणे. हरिदर्शनाची ओढ वाढली, त्यामुळे व्याकुळता आली की वाणी सद्गद होते. नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा विश्वाच्या मुळाशी असलेले एक तत्त्व कोणते आहे याचा फार विचार न करता ते नामच तत्त्व आहे असं मानणे म्हणजे नामापरते तत्त्व नाही असा दृढ निश्चय करणे. हे नामच मला त्या तत्त्वापर्यंत घेऊन जाईल असा विश्वास असला की मग शोधाशोध थांबते. त्यामुळे त्या तत्त्वापर्यंत पोहोचण्याचा नामजप करण्याशिवाय आणखी कोणता मार्ग आहे याची चौकशीही करू नकोस असं ज्ञानदेव सांगतात. वाया म्हणजे विनाकारण. जाशी झणी म्हणजे जाऊ नकोस. अन्यथा तत्त्व म्हणजे दुसरे किंवा वेगळे तत्त्व. नामापरते अन्यथा तत्त्व नाही रे आणिक पंथा वाया जाशी झणी अशी या दोन चरणांची दोन सरळ वाक्ये होतात. श्रीहरिच जप करेल चौथ्या कडव्यातील दोन चरणांचा साधा सरळ अर्थच सर्व लोकांनी सांगितला आहे. सुरुवातीला मोठ्याने उच्चार करत, सद्गद होऊन जप करणारे ज्ञानदेव हळूहळू फक्त स्वतःला ऐकू येईल एवढ्या हळू आवाजात जप करू लागले आणि शेवटी ओठाची, जिभेची हालचाल पूर्ण थांबली. बाहेरून ज्ञानदेवांचे पूर्ण मौन आहे असे दिसू लागले. परंतु मनातल्या मनात जणू काही जपमाळ हातात घेऊन ज्ञानदेवांचा हरि नामाचा जप सतत चालू आहे. नामाचा जप एक तत्त्व सापडेपर्यंत केला पाहिजे. त्यामुळे बाहेरून मौन असले तरी तो जप  सतत चालू राहूदे असं ज्ञानदेव स्वतःचे उदाहरण देऊन सांगतात. हा अर्थ योग्यच आहे. परंतु मला त्याच्या पुढचा आणखी एक अर्थ सुचतो. तो मला अजून कुठे वाचायला मिळालेला नाही.  जगाच्या मुळाशी एकच तत्त्व असेल तर वेगळे ज्ञानदेव कुठून असणार? आणि ज्ञानदेवांना जर ते तत्त्व सापडलं असेल तर ज्ञानदेव जप कोठून करणार? म्हणून ज्ञानदेव मौन झाले. पण ते मूळ तत्त्व अत्यंत ऊर्जास्वरूप असल्यामुळे ती ऊर्जा सतत स्पंदन करत असणार. त्याचे वर्णन कसे करणार? तर  ज्ञानदेव मौन आहेत आणि त्यांच्या आतमध्ये ते तत्त्व म्हणजे श्रीहरी जणू काही जपामाळ हातात घेऊन स्वतःच स्वतःच्या नावाचा जप करत आहे. ज्ञानदेव त्या तत्त्वामध्ये मिसळून गेले आहेत अशी स्थिती जेव्हा येईल तेव्हाच ज्ञानदेवांना तत्त्व सापडले

एक तत्त्व नाम दृढ धरी मना – अभंग क्रमांक – ३ Read More »

हरिभजनावीण काळ घालवू नको रे – अभंग क्र. २

हरिभजनावीण काळ घालवू नको रे हरिभजनावीण काळ घालवू नको रे । ज्ञानार्जनावीण काळ घालवू नको रे ।।धृ।। दोरीच्या सापा भिउनि भवा, भेटि न होती जीवा शिवा । अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ।।१।। विवेकाची ठरेल ओल ऐसे बोलावे की बोल । अपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ।।२।। संतसंगतीने उमज पाडुनि मनि उरते समज । अनुभवावीण मान डोलवू नको रे ।।३।। सोहिरा म्हणे ज्ञानज्योति तेथे कैची दिवसराती । तयेवीण नेत्रपाती हालवू नको रे ।।४।। वर्षारंभ उपासनेची पोथी मी पहिल्यांदा जेव्हा ऐकली तेव्हा त्यातला व्यसनानि सन्ति बहूनि, व्यसनद्वयमेव केवलं व्यसनम् ।विद्याभ्यसनं व्यसनं अथवा हरिपादसेवनं व्यसनम् ।। हा श्लोकच माझ्या लक्षात राहिला. तो ही त्याच्या अर्थापेक्षा उपासनेत देखील व्यसन हा शब्द येऊ शकतो या कल्पनेमुळे. त्यावर्षी वर्षान्ताच्या उपासनेमध्ये ‘हरिभजनावीण काळ …’ हा अभंग ऐकला. श्लोकातल्या दुसऱ्या ओळीचा अर्थ या अभंगाच्या धृपदामुळे चांगला लक्षात आला. ‘विद्याभ्यासनं व्यसनं’ म्हणजे ‘ज्ञानार्जनावीण काळ घालवू नको रे’ आणि ‘हरिपादसेवनं व्यसनं’ म्हणजे ‘हरिभजनावीण काळ घालवू नको रे’ हे चांगले लक्षात आले. वर्षान्त उपासनेच्या पोथीमध्ये या अभंगाच्या आधी ‘परमेश्वर स्मरण, ज्ञानार्जन आणि राष्ट्रपूजन हाच आमचा स्थायीभाव होवो’ असे वाक्य अध्वर्यूच्या तोंडी आलेले आहे. अभंगामध्ये राष्ट्रपूजनाचा उल्लेख कुठेही आलेला नाही. पण हिंदू राष्ट्राच्या बाबतीत ज्ञानार्जनाबरोबर परमेश्वरस्मरणही राष्ट्रपूजनाचा अविभाज्य भाग आहे ही दिशा त्यामुळे विचारांना मिळाली. धृपदापुढची अभंगातली चारही कडवी पहिल्या म्हणण्यामध्ये समजणे अवघडच होते. व्यसन या शब्दामुळे आधीचा श्लोक लक्षात राहिला. त्याचप्रमाणे या अभंगातील ‘दोरीचा साप’, ‘चिखल कालवू नको’ आणि ‘मान डोलवू नको’ या शब्दप्रतिमांच्या वेगळेपणामुळे हा अभंगही कायमचा लक्षात राहिला. या प्रतिमांचा अर्थ हळूहळू लक्षात येत गेला. अपुऱ्या प्रकाशामध्ये आपल्या पासून थोड्याश्या अंतरावर एखादी जाड दोरी पडली असेल तर त्या ठिकाणी साप आहे असे आपल्याला वाटू शकते. डोळ्यांना दोरीच दिसत असते. पण आपल्या मनातली सापाची भीती दोरीवरती टाकते आणि मनातल्या भितीचा पुन्हा एकदा अनुभव घेते. दोरीच्या जागी साप दिसणे आणि काळोख्या रात्री दूरवरच्या झाडाचा बुंधा माणसासारखा वाटणे ही उदाहरणे भारतीय तत्त्वज्ञानात अनेक वेळा वापरलेली आहेत. प्रत्यक्षात दोरी असूनही सापाचा भास होतो, तसेच प्रत्यक्ष शिव असून भवाचा भास होतो. भव म्हणजे सतत बदल होत असणारे, ज्यात काहीतरी घडते आहे आणि काहीतरी बिघडते आहे, ज्यात रचना आणि संहार सतत सुरू आहे, असे विश्व. दोरीच्या जागी साप पाहून मन जसा भितीचा अनुभव घेते तसे चिदानंदरूपी शिवाच्या ठिकाणी भवाचा भास होऊन जीव घाबरून जातो. खरे तर जीव वेगळा नसून शिवाचाच भाग आहे. परंतु ते माहीत नसल्यामुळे जीव स्वतःला भवामध्ये म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेला समजतो. मनाच्या अगदी आतल्या भागातील हे अज्ञान जाऊन ज्ञानरूपी दिवा लागला की भवाच्या जागी शिवच दिसायला लागतो आणि आपण भव पाहणारा, अनुभवणारा जीव नसून शिवच आहोत याचीही खात्री पटते. ‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ असे म्हटले असले तरी ते जीव आणि शिव एकच असल्याचा अनुभव घेतलेल्यांसाठी म्हटलेले आहे. हा अनुभव न घेतलेल्या अज्ञानी लोकांसाठी ‘ज्ञानदिवा मालवू नको’ याचा अर्थ सतत हरिभजन करत लवकरात लवकर ज्ञानदिवा उजळून टाक असा आहे. दोरी आणि सापाच्या अगदी साध्या उदाहरणावरून तत्त्वज्ञानातली एक अवघड गोष्ट सांगितली आहे. अंतरीचा ज्ञानदिवा पेटविण्यासाठी सतत हरिभजन करायला हवे. तसेच वास्तव आणि भास यातला फरक ओळखण्यासाठी ज्ञानार्जनाने विवेकशक्ती जागृत करायची असते. कै. आप्पा अनेक वेळा सांगायचे की ज्याला न सांगता समजते तो शहाणा. शहाणा होण्यासाठी जी मेहनत करायला लागते तिलाच धृपदामध्ये ज्ञानार्जन असे म्हटले आहे. शहाणपण येण्यासाठी प्रथम रास्त माहितीचा साठा आपल्याकडे तयार व्हावा लागतो. मग विचार करून, विश्लेषण करून, माहितीवर प्रक्रिया करून, त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर होते. ते ज्ञान अनुभवाशी ताडून पाहिल्यानंतर त्याचे शहाणपणात रूपांतर होते. अर्धवट किंवा ऐकीव माहितीच्या आधारे फार विचार न करता, विश्लेषण न करता, प्रत्यक्ष अनुभवाशी ताडून न पहाता, एखाद्या संवादामध्ये, संभाषणामध्ये किंवा सभेमध्ये आपले मत मांडले म्हणजे लोकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. यालाच मतामतांचा चिखल कालवणे म्हटले आहे. धुळीने भरलेल्या अंगणामध्ये कसेही पाणी टाकले की चिखल होतो. योग्य रितीने सडा टाकला की धूळ खाली बसते. मातामतांचा गोंधळ शांत होईल, लोकांच्या मनातील संशय दूर होईल असे आणि एवढेच बोलणे म्हणजे विवेकाची ओल पुरविणे. सर्व परिस्थितीत आपल्याला ही विवेकाची ओल पुरवता यावी म्हणून माहितीचे ज्ञानात आणि ज्ञाानचे शहाणपणात रूपांतर करण्यासाठी सतत ज्ञानार्जन केले पाहिजे. शहाण्या लोकांच्या संगतीत शहाणपण लवकर येते. व्यवहारातील दोरी आणि सापातील विवेक आणि तत्त्वज्ञानातील शिव आणि भवाचा विवेक करणे हा संतांचा स्वभाव झालेला असतो. या दोन्ही प्रकारचा विवेक जो करू शकतो तोच खरा संत. अशा संतांच्या संगतीत राहिले, त्यांचा सहवास सतत लाभला की आपल्यासाठी विवेक कसा करायचा हे अनुभवातून कळल्यामुळे खात्री पटते. त्याला ‘उमजणे’ असे म्हणतात. आणि अनुभव न घेता केवळ शाब्दिक ज्ञान झाल्यामुळे जे आपल्याला कळले असे वाटते त्याला ‘समजणे’ असे म्हणतात. एखादी गोष्ट समजून उमजून कर असे आपण बोलताना म्हणतो म्हणजे सिद्धांत समजून घे आणि अनुभवही घे. समजून उमजून साठीच इथे ‘पुरते समज’ असे शब्द वापरले आहेत. संत आपल्याला सिद्धांतही सांगू शकतात आणि प्रात्यक्षिकही दाखवू शकतात. म्हणून त्यांच्या संगतीत राहून पुरते समजून घ्यायचे असते. एखादे भाषण ऐकताना वक्त्याचे शब्द ऐकल्यावर त्यावेळी श्रोत्यांना समजल्यासारखे वाटते आणि ते मान डोलावतात. पण ते श्रोत्यांना झालेले केवळ शब्दज्ञान असते. त्यांना अनुभव नसतो. वक्त्याचे भाषण ऐकून समजल्यासारखी मान डोलवू नको. संतांच्या संगतीमध्ये स्वतः अनुभव घे आणि पुरते समजून घे. गुरूचे सांगणे किंवा दाखविणे, स्वतःचा अनुभव आणि इतर अनेकांच्या अनुभवातून तयार झालेले सिद्धांत हे सर्व एकमेकांशी जुळले की पुरते समजले असे म्हणतात. तीन सोप्या उदाहरणांच्या साहाय्याने तत्त्वज्ञानातल्या गहन गोष्टी संत सोहिरोबा यांनी इथे सांगितल्या आहेत. संत सोहिरोबा हे पेशवाईच्या काळातील कोकणातील संत होते. ह्या अभंगातील तीन कडव्यांमधील गहन गोष्टी म्हणजे जीवाशिवाचे ऐक्य अनुभवणे, व्यवहारात विवेकाने लोकांमधील मतभेद संपवता येणे आणि अनुभवासहित सिद्धांत समजून घेणे. या तीन्ही गोष्टी प्रयत्नाने साध्य करायच्या आहेत. अखंड हरिभजन आणि ज्ञानार्जन ही त्या साध्य करण्याची साधने आहेत. आपण साधनाकडे लक्ष द्यावे. साध्यापर्यंत एक दिवस आपण पोहोचणारच आहोत. तिथे पोहोचण्याची खूण सोहिरोबा शेवटच्या कडव्यात सांगतात. ज्याच्या अंतरीचा ज्ञानदिवा सतत तेवतो आहे, त्याला कुठे अंधार दिसतच नाही. म्हणजे त्याला कधी भ्रम होतच नाही. त्याला व्यवहारातील वास्तवच नेहमी कळते. आणि तत्त्वज्ञानातील वास्तव अनुभवाला येते. त्याच्या दृष्टीने सर्व ज्ञानाच्या प्रकाशात म्हणजे दिवसाउजेडीच होते. चोवीस तास उजेडच असल्यामुळे त्याच्या दृष्टीने दिवस रात्र असा भेदच नसतो. तो दोरीला साप मानत नाही. मतामतांचा चिखल कालवत नाही आणि अनुभवाशिवाय उगीच समजल्यासारखी मान डोलवत नाही. इतकेच काय त्याच्या पापण्यांची उघड-झापही अनवधानाने होत नाही. तो सर्वकाळ सावधान राहून साध्य गाठले असले तरी साधन करत असल्यासारखे आपले सर्व व्यवहार इतर साधकांच्यासाठी उदाहरण म्हणून करत असतो. गिरीश श्री. बापट

हरिभजनावीण काळ घालवू नको रे – अभंग क्र. २ Read More »

हेची थोर भक्ती – अभंग १

हेचि थोर भक्ति हेचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची।। ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।धृ।। वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।। तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहू हा संसार देवापायी ।। जून १९६९ मध्ये ज्ञान प्रबोधिनी प्रशाला सुरू झाली आणि मी ही प्रशालेत दाखल झालो. पुढच्याच महिन्यात आषाढी एकादशीची तयारी सुरू झाली. आमच्या इयत्ता आठवीच्या वर्गाला ‘हेचि थोर भक्ती’ हा अभंग म्हणायचा होता. माझ्या आयुष्यात मी म्हटलेला हा पहिलाच अभंग. हा अभंग लक्षात राहण्याचे हे पहिले कारण. आणि दुसरे कारण म्हणजे या अभंगाचा लोकांमध्ये रूढ असलेला चुकीचा अर्थ. आमच्या अभंगाचे परीक्षण करताना मा. आण्णांनी त्याचा खरा अर्थ थोडक्यात सांगितला होता. भक्ती करणे म्हणजे आपल्या जवळचे जे सर्वात उत्तम असेल ते देवाला अर्पण करणे. संकल्पावी म्हणजे अर्पण करावी. सर्वसामान्य लोकांचे संसारावरील प्रेम, म्हणजे संसाराची माया, त्यांचा जीव की प्राण असते. ते संसारावरील प्रेम देवाला अर्पण करणे हीच सर्वात मोठी भक्ती आहे असे पहिल्या दोन चरणांमध्ये सांगितले आहे. हा अभंग माझ्या लक्षात राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे इथे देवाला अनंत म्हटले आहे. मला अनंत हा शब्द तोपर्यंत माहीत नव्हता. परंतु त्याचा अर्थ चौथी-पाचवीत असतानाच कळला होता. माझ्या प्रबोधिनीपूर्वीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रोज जी प्रार्थना म्हणायचो त्याची सुरुवात Eternal God, Creator of All अशी होती. आम्हाला एक अँग्लोइंडियन क्रीडा शिक्षक होते. त्यांच्या भोवती खेळाचा तास संपल्यावरही विद्यार्थ्यांचा घोळका असायचा. एका विद्यार्थ्याने त्यांना Eternal चा अर्थ विचारला. त्यांनी त्यावर त्यांच्या चर्च मधल्या फादरने सांगितलेली गोष्ट सांगितली. एक मैल उंचीचा एक काळाकाभिन्न कातळाचा डोंगर आहे. दर शंभर वर्षांनी त्याच्या वरून एक पक्षी उडत जातो. त्याच्या पंखांचा वारा कातळाच्या वरच्या भागाला स्पर्श करून जातो. त्या वाऱ्यामुळे त्या कातळाची थोडी झीज होते. असे दर १०० वर्षांनी जवळून पक्षी गेल्यावर, कातळाची झीज होत राहते. अशी झीज होता होता सर्व कातळ संपून जायला जेवढा वेळ लागेल तो वेळ म्हणजे Eternal असा अर्थ त्यांनी सांगितला. ही गोष्ट आणि हा अर्थ मनात पक्का बसला होता. हा अभंग म्हणताना Eternal म्हणजेच अनंत हे लक्षात आले. काळाच्या बाबतीत अनंत, विस्ताराच्या बाबतीत अनंत, गुणांच्या बाबतीत अनंत आहे, तो देव. त्याच्या शक्तीपुढे एका माणसाची शक्ती नगण्य आहे. त्यामुळे त्या अनंत अशा देवाने जसे तुम्हाला ठेवले आहे, त्यात समाधानाने राहावे असे या अभंगाच्या दुसऱ्या दोन चरणांमध्ये सांगितले आहे. इथेच या अर्थाचा घोटाळा होतो. देवाने ठेवले आहे तसे राहावे, म्हणजे काही हातपाय न हलवता स्वस्थ बसून राहावे, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असे म्हणत खाटेवर लोळत राहावे, असा अर्थ लोक घेतात. पण त्याचा खरा अर्थ अगदी उलट आहे. एखादे काम उत्तम रितीने पूर्ण होण्यासाठी, जे जे प्रयत्न करणे आवश्यक आहे, ते करा, आणि मग त्या प्रयत्नांचे फळ म्हणून जे मिळेल, ते परमेश्वराने दिले आहे असे समजून समाधानाने स्वीकारा, असा ‘ठेविले अनंते…’ या चरणांचा अर्थ आहे. पुढील दोन चरणांचा अर्थ पाहिल्यावर हा अर्थ असाच आहे आणि बहुसंख्य लोक जसा मानतात तसा निष्क्रियता सांगणारा नाही असे लक्षात येते. एखादे काम सुरू करताना मनासारखी साधने जवळ नाहीत, काळ, वेळ सोयीची नाही, म्हणून चिडचिड करणे म्हणजे उद्वेग वाहणे. काम करणे चालू असताना ते अपेक्षित गतीने आणि पद्धतीने पुढे सरकत नाही म्हणून वैतागणे, आदळआपट करणे म्हणजे उद्वेग वाहणे. काम संपल्यावर अपेक्षित ते, तेवढे आणि अपेक्षित तेव्हा, त्याचे फळ मिळाले नाही म्हणून कुरकुरत बसणे म्हणजे उद्वेग वाहणे. काम सुरू करताना, काम चालू असताना, काम संपल्यावर आणि काही जणांच्या बाबतीत तर काम न करता, उद्वेग वाहणे म्हणजे असमाधानाला किंवा दुःखाला निमंत्रण असते. परंतु, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की त्या त्या वेळी फक्त त्यावेळच्या कामाचे परिणाम दिसतात असे नाही. तर आपण आधी केलेल्या अनेक कामांचे अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम आताच्या कामाच्या परिणामांमध्ये मिसळलेले असतात. प्रत्येक कामाचे काही तात्कालिक परिणाम असतात व काही दीर्घकालीन परिणाम असतात. काम झाले आहे आणि दीर्घकालीन परिणाम अजून दिसायचे आहेत, अशा अजून दिसायच्या असणाऱ्या परिणामांना संचित असा पारिभाषिक किंवा शास्त्रीय भाषेतील शब्द आहे. लहानपणी कुपोषण झाले आहे आणि दहा वर्षांनी तुम्ही पोषक आहार घेतला तर त्या पोषक आहाराचे परिणाम लगेच दिसत नाहीत. आधीच्या कुपोषणाचे परिणामच दिसत राहतात. अशा जुन्या कुपोषणाचे परिणाम अनुभवण्याला संचिताचे फळ अनुभवणे असे म्हणतात. आज उत्तम काम केले व अपेक्षित परिणाम मिळाला नाही याचा अर्थ आधीच्या चुका किंवा उणिवा, किंवा वेगळ्या दिशेने केलेले प्रयत्न यांचे परिणाम आजच्या कामाच्या परिणामांबरोबर मिसळले गेले आहेत. त्यामुळे अपेक्षित फळ मिळत नाही. यालाच ‘भोगणे ते फळ संचिताचे’ असे म्हणतात. तुम्ही देव मानत असलात तर ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ आणि देव मानत नसलात तर ‘भोगणे ते फळ संचिताचे’. तुम्ही काहीही मानत असलात तरी ‘वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ’ हे लक्षात घेऊन ‘चित्ती असू द्यावे समाधान’ असे राहायला शिकले पाहिजे. या अभंगाच्या मधल्या चार चरणांचा अर्थ असा एकत्र पाहिला पाहिजे. तुकाराम महाराज देव मानणारे होते. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ असा मूर्तीतला देव पाहण्याइतके ते भावसमृद्ध होते. आणि ‘मागे पुढे विठ्ठल भरला, रिता ठाव नाही उरला’ याचे भान असण्याइतके ते ज्ञानसमृद्धही होते. त्यांच्या दृष्टीने तर केवळ या जन्मातल्या नाही, तर आधीच्या जन्मांमधल्या कामांचे, अजून दिसून यायचे परिणाम म्हणजे संचित होते. त्यामुळे चित्तामध्ये सतत समाधान राखायचे असेल, आणि उद्वेग व त्यामुळे होणारे दुःख याचा स्पर्शही मनाला होऊ द्यायचा नसेल, तर कुठल्या कामाचे परिणाम कधी, कसे दिसतील याची जबाबदारी किंवा भार देवावर सोपवावा. संसारावरील फक्त प्रेमच नाही तर सगळा संसारच देवाला अर्पण करावा, आणि आपण मोकळेपणाने आपला स्वधर्म आचरत राहावे, असे शेवटच्या दोन चरणांमध्ये तुकाराम महाराज म्हणतात. अपेक्षित परिणाम व्हावेत यासाठी आपल्या बाजूने अचूक आणि परिपूर्ण प्रयत्न करणे आणि परिणामांची काळजी देवाला करू देणे हीच थोर भक्ती आहे. असा मला या अभंगाचा आपण स्वीकारण्यासारखा तथ्यांश वाटतो. गिरीश श्री. बापट

हेची थोर भक्ती – अभंग १ Read More »