पद्य

पद्य क्र. १० – आज तन, मन और जीवन

निरूपण – लौकिक जीवनात वाढदिवस, लग्न-समारंभ, सत्कार-समारंभ अशा प्रसंगी उत्तमातली उत्तम, सर्वात शोभिवंत, सगळ्यांपेक्षा वेगळी अशी भेटवस्तू उत्सवमूर्ती व्यक्तीला देण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. यासाठी केलेल्या कष्टांना, खर्चाला कोणी समर्पण किंवा त्याग म्हणत नाही. उत्सवमूर्तीला मोठा पुष्पगुच्छ, आकर्षक शुभेच्छापत्र किंवा सुंदर कलाकृती भेट देण्यासाठी जेवढे धडपडू, तेवढे स्वतःचे बलसंपन्न शरीर, सुदृढ मन आणि तरल बुद्धी समाजाकरता, राष्ट्राकरता किंवा देवाकरता देण्यासाठी धडपडणारे लोक कमी दिसतात. असे करताना भेट देत आहोत, असे न वाटता त्याग करत आहोत असे अनेकांना  वाटते. जणू काही भेटी देणे हे आनंददायक आणि त्याग होणे क्लेशकारक अशी समजूत अनेकांची झालेली असते. खरे तर सर्व बाजूंनी संपन्न आयुष्यही संपणार असतेच. सर्व फुले पूर्ण उमलल्यावर सुकून जातातच. सर्व फळे झाडावर पूर्ण पिकली की नंतर सडून जातातच. उमललेले फूल आणि पिकलेले फळ कोणाला दिले, तर आनंद होतो.  देण्यातून, समर्पणातून  दिलेल्या वस्तूचा त्याग होतो पण देण्याचा आनंद मिळतो. आपले सारे जीवन पूर्ण विकसित करून देण्याचा आनंद आपण घ्यावा व त्या जीवनातील सर्व प्रकारच्या कमाईचा त्याग झालेला लोकांना दिसला तर दिसू  द्यावा, यासंबंधीचे हे पद्य आहे. ज्यांना देतो त्यांच्याबद्दल आपल्यामध्ये प्रेम असेल, तर ‘त्याग केल्याचे’ दुःख होत नाही. तर आपल्याला योग्य विनियोग करता आल्याचे समाधान मिळते. ‘त्याग केल्याचे’ इतरांना वाटते. जे उत्तमोत्तम आहे, ते देण्याला समर्पण म्हणतात. इतरांना समर्पणाची कृती कळत नाही. काय दिले हेच ते पाहतात आणि त्यावरचा आपला हक्क सोडण्याला ते त्याग म्हणतात. इतरांना त्यागमय वाटणारे जीवन आम्हाला मात्र समर्पणमय वाटते त्याबद्दलचे हे प्रबोधन गीत आहे. आज तन, मन और जीवन, धन सभी कुछ हो समर्पणराष्ट्र-हित की साधना में हम करें सर्वस्व अर्पण ॥ धृ. ॥ आपले तन म्हणजे शरीर आणि मन घेऊन आपण जन्माला येतो. त्या शरीरात प्राण असतो, तो पर्यंत आपले जीवन असते. यापैकी काहीच आपण मिळवलेले नाही. ते ज्या ईश्वराने तयार केले, ते त्याचे आहे, माझे नाही, याची जाणीव ठेवणे म्हणजे समर्पण करणे. या शरीर-मनाच्या साहाय्याने जमा झालेले धनही मग ईश्वराचेच आहे, याचीही जाणीव ठेवली पाहिजे. त्या ईश्वराचे एक प्रतीक म्हणजे आपले राष्ट्र. दिसणाऱ्या व मनात येणाऱ्या ज्या सर्व गोष्टी आपल्या वाटतात, त्या सर्व रोज राष्ट्रासाठी वापरण्याची सवय लागणे म्हणजे राष्ट्र‌हिताची साधना. मीच जर ईश्वराचा, राष्ट्रदेवाचा आहे, तर माझे सर्वच त्याचे आहे. सर्वस्व अर्पण म्हणजेच समर्पण. एक-एक गोष्ट अर्पण करत जायची. सर्व अर्पण करता आले की  समर्पण झाले. त्याग कर हम शेष जीवन की सुसंचित कामनायें।ध्येय के अनुरूप जीवन हम सभी अपना बनायें।पूर्ण विकसित शुद्ध जीवन-पुष्प से हो राष्ट्र अर्चन ॥ १ ॥ सुसंचित कामनायें म्हणजे मी काय करीन आणि काय मिळवीन अशा सर्व अपूर्ण इच्छांचा साठा. त्याला सध्या ‘बकेट लिस्ट’ म्हणतात. राष्ट्रहिताची साधना करणे हे आमचे ध्येय. त्यासाठी आवश्यक तेवढ्या गोष्टी ‘बकेट लिस्ट’ मधून काढून घ्यायच्या आणि आपले व्यक्तिमत्त्व राष्ट्रहिताची कामे करायला योग्य बनवायचे. असे ध्येयसाधनेसाठी योग्य बनवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे पूर्ण विकसित जीवन-पुष्प. ते राष्ट्रहितासाठी वापरणे म्हणजेच राष्ट्र अर्चना करणे. राष्ट्र अर्चनेसाठी सर्व व्यक्तिमत्त्व अर्पण करण्याचा आनंद इतका असतो, की बकेट लिस्ट मध्ये मागे राहिलेल्या, म्हणजे शेष राहिलेल्या गोष्टींची आठवणही राहत नाही. त्याला इतर लोक त्याग केला असे म्हणतात. आपल्याला त्याग करावा लागत नाही, तो सहज घडतो. यज्ञ-हित हो पूर्ण आहु‌ति, व्यक्तिगत संसार स्वाहा ।देश के कल्याण में हो, अतुल धन भंडार स्वाहा ।कर सकें विचलित न किंचित मोह के ये कठीण बंधन ॥२॥ राष्ट्र‌अर्चना करणे हाच यज्ञ. यज्ञ-हित म्हणजे यज्ञासाठी. यज्ञात आहुती अर्पण करताना स्वाहा म्हणतात. या यज्ञात आहुती द्यायची ती व्यक्तिगत संसाराची. म्हणजे राष्ट्रासाठी व्यक्तिगत संसारातील कामे, ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे’  या पद्धतीने, बाजूला ठेवायची. स्वतःची सगळी संपत्ती भामाशाहने राणा प्रतापला सैन्याची पुन्हा उभारणी करण्यासाठी दिली. म्हणजे आपले धन भांडार देशाच्या कल्याणासाठी अर्पण केले. अलीकडचे उदाहरण लडाख-सियाचिनमध्ये सैनिकांना प्राणवायू पुरवणारी यंत्रे पोचवण्यासाठी आयुष्यभराची कमाई देणाऱ्या कुटुंबाचे आहे. व्यक्तिगत संसार आणि स्वतःची संपत्ती सर्वात महत्त्वाची वाटणे म्हणजे मोहाचे बंधन. आपल्याला या बंधनामुळे राष्ट्रअर्चनेसाठी पुढे होण्यात चालढकल कराविशी वाटली, म्हणजे आपले लक्ष यज्ञातून विचलित झाले किंवा ढळले. तसे होऊ नये हा आमचा संकल्प आहे. हो रहा आह्वान तो फिर कौन असमंजस हमें है|उच्चतम आदर्श जीवन प्राप्त युग-युग से हमें है|हम ग्रहण कर ले पुनर् वह त्यागमय परिपूर्ण जीवन ॥३॥ विकसित जीवन म्हणजे सर्व क्षमता व कौशल्ये मिळवलेले जीवन.  ते राष्ट्राला समर्पित करता आले म्हणजे जीवन परिपूर्ण झाले. समर्पण करताना व्यक्तिगत संसार आणि धनसंपदा यांच्या मोहात अडकलो नाही, की लोक त्याला त्यागमय म्हणतात. अशा राष्ट्रसमर्पित जीवनाचा आदर्श युगा-युगांपासून, म्हणजे पुरातन काळापासून आपल्यासमोर आहे. तो आदर्शच पुन्हा पुन्हा आपल्यासमोर ठेवूया. हा आदर्श स्वीकारण्याचे आह्वान, सध्याची परिस्थिती आपल्या समोर ठेवत आहे. ते स्वीकारण्यात ‘कौन असमंजस’ म्हणजे करावे की करू नये असा गोंधळ आमच्या मनात कसा असू शकेल ? अर्थात हे आह्वान आम्ही स्वीकारणारच. पद्य – आज तन, मन और जीवन, धन सभी कुछ हो समर्पणराष्ट्र-हित की साधना में हम करें सर्वस्व अर्पण ॥ धृ. ॥त्याग कर हम शेष जीवन की सुसंचित कामनायें।ध्येय के अनुरूप जीवन हम सभी अपना बनायें।पूर्ण विकसित शुद्ध जीवन-पुष्प से हो राष्ट्र अर्चन ॥ १ ॥यज्ञ-हित हो पूर्ण आहु‌ति, व्यक्तिगत संसार स्वाहा ।देश के कल्याण में हो, अतुल धन भंडार स्वाहा ।कर सकें विचलित न किंचित मोह के ये कठीण बंधन ॥२॥हो रहा आह्वान तो फिर कौन असमंजस हमें है|उच्चतम आदर्श जीवन प्राप्त युग-युग से हमें है|हम ग्रहण कर ले पुनर् वह त्यागमय परिपूर्ण जीवन ॥३॥

पद्य क्र. १० – आज तन, मन और जीवन Read More »

हे कर्मयोगिन्

हे कर्मयोगिन्, तुम्ही मानसी या असंख्यात ज्योतिर्दळे लावली जरी दाट अंधार आहे सभोती तरी आमुची वाट तेजाळली ॥ ध्रु. ॥दिली ध्येयनिष्ठा दिली कार्यनिष्ठा, मनी रेखलेली श्रमाची प्रतिष्ठा समाजार्थ निःस्वार्थ सेवा कराया तुम्ही त्यागदीक्षा आम्हाला दिली हे कर्मयोगिन्, तुम्ही मानसी या कृतीने नवी प्रेरणा कोरली ॥ १ ॥ जेथे घोर अन्याय थैमान घाली तिथे धावुनी जा तुम्ही निर्भय पटे सत्य तेथे तुम्ही ठाण मांडा युवाशक्ति आहे जगी दुर्जय उद्या‍च्या जगाचे नवे स्वप्न देखा, दिसू दे तुम्हाला उषःकालरेखा अरे आज जे गांजले-पोळलेले मिळू दे सुखाची तयां सावली हे कर्मयोगिन, तुम्ही मानसी या अशी ध्येयसृष्टीच साकारली ॥‌ २॥ तपस्वी मनस्वी जरी आकृती ती नसे आज साक्षात् समोरी उभी स्मृतींच्या कृतींच्या हजारो शलाका तरी चेतलेल्या मनाच्या नभी वसा टाकुनी दूर जाणार नाही, रणातून माघार घेणार नाही अम्हि अंतरात्म्यास साक्षी करोनी मनाने प्रतिज्ञा अशी घेतली हे कर्मयोगिन, तुम्ही मानसी या नवी वज्रबीजेच ही पेरली ॥ ३ ॥

हे कर्मयोगिन् Read More »

हे ऋषिवर श्रीअरविंद

हे ऋषिवर श्रीअरविंद, हे चिन्मय मधुरा माते युवशक्ति हिंदुराष्ट्राची, वंदिते आज तुम्हाते ॥ ध्रु. ॥ वेड एक होते तुम्हा, मातृभूमिच्या मुक्तीचे उग्र खड्ग झाला तुम्ही, जागृत भारतशक्तीचे ‘व्हा सिद्ध संगरा’, वदला, ‘सांडूनि भ्रांति-मोहाते’ ॥ १ ॥द्रष्ट्या प्रतिभेने तुमच्या, स्वप्ने आम्हासी दिधली ‘ही अखंड होइल भूमी, जरि खंडित आता दिसली,संजीवन अध्यात्माचे, देईल तृषित विश्वाते’ ॥ २ ॥ ‘हा हिंदुधर्म-हे राष्ट्र, अद्वैत असे उभयांचे राष्ट्रार्थ तनुमने झटणे हे धर्माचरणचि साचे’ या धर्मसाधनेलागी, पथदर्शी तुमची चरिते ॥ ३ ॥तनुतीर्थे शुचितम तुमची, की मूर्त अभीप्सा झालीअतिमानस उतरुन आले, त्या पुण्यबलाने खाली जड हलले-हसले-धाले ! लाहुनिया चैतन्याते ॥ ४ ॥जगदंतरि आहा तुम्ही, चैतन्यस्वरूपी नटुनी हृदयांतरि यावे अमुच्या, प्रेरणामंत्र होवोनीअम्हि पथिक देवसंघाचे, द्या आशीर्वच आम्हाते ॥ ५ ॥

हे ऋषिवर श्रीअरविंद Read More »

हे वीर विवेकानंद हिंदी

हे वीर विवेकानंद हिन्दुयशमूर्ति… हिन्दुयशमूर्ति… हे युवकप्रवर, तुम युवहृदयों की स्फूर्ती ॥ ध्रु. ॥ माँ विश्वधर्म की देखी जब बन्धन में तुम क्षुब्ध सिंह से व्याकुल थे अंतर में उसके मुक्ती की प्रखर आस मन में थी ॥ १ ॥ शत आघातों से मर्माहत थी कब की वह हिन्दुचेतना तुमने संजीवित की अर्पण की उसको निर्भयता-यश-किर्ती ॥ २ ॥ स्मरते ह तेरे घनगर्जित से शब्द मन वज्र बनें, तन बन जायें फौलाद दस दिशा जीतने सिद्ध बने वीरव्रती ॥ ३ ॥ है पुकारती तव अमृतवाणी हमको रे, अतुलबलस्वी करो मातृभूमी को युवशक्ति चाहिये कार्यशरण, पुरुषार्थी ॥ ४ ॥ जो सतेज सुन्दर जीवनपुष्प खिलता है उससे ही पूजा स्वदेश की करनी है अब धर्मजागरण बने ध्येय की ज्योती ॥ ५ ॥

हे वीर विवेकानंद हिंदी Read More »

हे वीर विवेकानंद

हे वीर विवेकानंद हिंदुयशमूर्ती हे युवकप्रवर तू युवहृदयांची स्फूर्ती ॥ ध्रु. ॥ दास्यात पाहनी विश्वधर्मजननी ही तू क्षुब्ध सिंहसा व्याकुळ अंतर्यामी मुक्तीचा तिचिया ध्यास तुला दिनराती ॥ १ ॥शत आघातांनी कुंठित मूर्छित झाली ती हिंदुचेतना फिरून तू चेतविली तिज उन्नत मस्तक निर्भय केले जगती ॥ २ ॥स्मरतात तुझे ते घनगर्जितसे शब्द ‘मन वज्र हवे अन् मनगट ते पोलाद जग जिंकायाची ईर्ष्या दाटो चित्ती ॥ ३ ॥ तव अमृतवाणी हाक देत आम्हाते रे अतुल बलस्वी करू हिंदुराष्ट्राते युवशक्ति हवी मज कार्यशरण पुरुषार्थी ॥ ४ ॥ जी जीवनपुष्पे सतेज नव रक्ताची स्थापावा त्यांनी धर्म आत्म अर्पूनी त्यानेच अर्चना होत राष्ट्रदेवाची ॥ ५ ॥

हे वीर विवेकानंद Read More »

पद्य क्र. ९ – असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका…

निरूपण – प्रबोधिनीतील पहिल्या वर्षातच दलावर म्हटलेले हे पद्य. पहिल्यांदा म्हटले तेव्हाच आवडले. एकट्याने सुद्धा ते स्वतःशीच अनेक वेळा म्हटले. न राहवून त्याच्या कवीचा शोध घेतला. ‘Psalm of life’ (जीवनाचे स्तोत्र) या इंग्रजी कवितेचे ते मुक्त भाषांतर असल्याचे तेव्हा कळले. मूळ इंग्रजी कविताही इतकी प्रभावी आहे की एका जुन्या मराठी चित्रपटातली नायिका ती इंग्रजी कविता गात असल्याचे दाखवले आहे. ग्रामोफोनच्या जमान्यात त्या गाण्याची रेकॉर्ड मिळवून ती मी ऐकली, एवढी या कवितेबद्दल उत्सुकता होती. त्यातील अनेक विचार प्रबोधिनीत अनुभवायला मिळाले. त्यामुळे सर्वसाधारण प्रबोधिनीपणाची सूत्रे जेव्हा तयार केली, तेव्हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यातील तीन सूत्रे या पद्यातील ओळींपासून निर्माण झाली. असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नकाघेई झोपा तो नर मेला संशय याचा धरू नका॥ धृ॥ ‘कोल्ह्याला न मिळणारी द्राक्षे आंबट‌’ या वाक्‌‍प्रचाराप्रमाणे जे आपले आयुष्य पराभूत वृत्तीने किंवा नकारात्मक भूमिकेतून जगतात तेच या जीविताला म्हणजे जगण्याला काही अर्थ नाही, ते असार आहे, केवळ माया, म्हणजे एक प्रकारचे संमोहन आहे, असे म्हणतात. असे म्हणणे रडतराउताने गाण्यासारखे आहे. आणि जे पराभव होण्यासाठीही काही हातपाय हलवत नाहीत, प्रयत्न सुरूही करत नाहीत, जागे असून झोपल्यासारखे समोर येईल त्याची नोंदही न घेणारे असतात, ते तर जिवंतपणीच जगाच्या दृष्टीने मेले आहेत असे निश्चित समजा. वस्तुस्थिती ही असार भासे परि अंतरि बहू सार असेजाणुनिया हे निजकर्तव्ये मन लावुनिया करा असे  ||१.१|| झोपलेल्यांना किंवा रडणाऱ्यांना आजूबाजूचा भवताल आणि त्यातील घडामोडींमध्ये म्हणजेच वस्तुस्थितीमध्ये काही रस नसतो. जे आयुष्याकडे होकारात्मक दृष्टीने बघतात त्यांना मात्र त्यात खूपच अर्थ दिसतो.  तसे तुम्हीही होकारात्मक दृष्टीचे बना आणि आजूबाजूच्या घडामोडींना योग्य वळण देण्यासाठी तुम्ही जे करणे आवश्यक असेल, ते तुमचे स्वतःचे कर्तव्य समजून, मनःपूर्वक पार पाडा. ‌‘मेलो म्हणजे मिळविली झाले‌’ सार्थक न धरा मनी असे‌‘माती असशी मातित मिळशी‌’ आत्म्याला हे लागू नसे  ||१.२|| नीट जगता येत नाही म्हणून मरणाची वाट पाहत आयुष्य ढकलणे हेच आपल्या जगण्याचे कर्तव्य आहे असे मानू नका. अन्नापासून बनलेला देह कोणाचे तरी अन्न बनतो हा नियम फक्त देहासाठी असतो. देहाचा जन्म होतो आणि देह मरतो. पण त्या देहातील आत्मा जन्मतही नाही आणि मरतही नाही. सुख दुःखाचे भोग भोगणे हा मुळि जीवित हेतू नसेउद्या आजच्या पेक्षा काही पुढेच जाऊ करू असे  ||१.३||‌ त्या आत्म्याला जसे जन्म-मरण नाही तसे सुख-दुःखही नाही. सुख-दुःखाची जाणीव देहाला होते. जो देह जाणारच आहे, तो जिवंत असताना त्याला सुख व्हावे व दुःख न व्हावे यासाठी धडपडणे हा काही तुझ्या जगण्याचा हेतू नाही. तू आत्मा आहेस आणि तुझे अनंत गुण प्रकट करण्यासाठी तू या देहाचा उपयोग करत आहेस. आज जे गुण, जेवढे प्रकट झाले, त्या पेक्षा उद्या आणखी गुण अधिक अंशांनी प्रकट होतील असे प्रयत्न कर. सर्वसाधारण प्रबोधिनीपणातील ‌‘कालच्या पेक्षा आज पुढे गेलेच पाहिजे‌’ हे सूत्र ‌‘उद्या आजच्या पेक्षा काही ….‌’ या शेवटच्या ओळीतूनच सुचले.   अपार विद्या काळ अल्प हा झरझर कैसा चालतसेशूर छातिचे कितिहि असाना हळु हळु मृत्यू गाठितसे ||१.४|| तुमचे अनंत गुण प्रकट करण्यासाठी ज्या विद्या शिकायला लागणार आहेत, त्यांनाही मर्यादा नाही. त्यातील जास्तीत जास्त विद्या शिकण्यासाठी प्रयत्नांना लागा. वाळूच्या घड्याळातून भुरभुर पडणारी वाळू काळ झरझर पुढे सरकत असल्याचे लक्षात आणून देते. घड्याळामधल्या वाळूचा एकएक कण खाली पडला की तेवढा तुमचा मृत्यू जवळ आला हे कायम ध्यानात ठेवा. अफाट ऐशा विश्वरणांगणि जीवित युद्धचि चालतसेत्यात लढोनि बहु धीराने नाव गाजवा शूर असे ||१.५|| तुम्ही मृत्यूला कितीही शौर्याने सामोरे गेलात तरी तुमचा मृत्यू ठरलेलाच आहे. या जगात आपल्याला आपले कर्तव्य पार पाडत जगायचे असेल, तर ते रणांगणात लढण्यासारखेच आहे. मृत्यू कधी येईल याची काळजी न करता तुम्ही तुमचे कर्तव्य आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पार पाडत राहण्यातच खरे शौर्य आहे. तुम्ही प्रयत्न सोडणारे नाही, झुंजणारे आहात, अशी तुमची ख्याती होऊ दे. ‌‘मुकी बिचारी कुणी हाका‌’,अशी मेंढरे बनू नका,गत काळाचा शोक फुकापुढचा भासो कितिहि सुखाचा काळ भरवसा ठेवू नका  ||१.६|| ज्यांच्या जगण्याला काही हेतू नाही, ज्यांना आतून काही करण्याची प्रेरणा होत नाही, असे मेषपात्र, म्हणजे मनुष्याच्या रूपातील मेंढी, तुम्ही बनू नका. आजपर्यंत समजा नकळत असे जगला असलात तर त्याचे दुःख मानू नका. भविष्यकाळ सुखाचा जाईल या आशेवरही राहू नका. आपले कर्तव्य ओळखून ते मृत्यू येईपर्यंत पार पाडण्यातच कर्तव्य करत राहिल्याचा किंवा पूर्ण केल्याचा आनंद आहे. जाते घडि ही अपुली साधा करा काय ते आता कराचित्तामध्ये धैर्य धरा रे हरिवर ठेवा भाव पुरा  ||२.१|| काळ झरझर पुढे सरकतो आहे. कर्तव्यपूर्तीसाठी जे काही करायचे ते वर्तमानकाळातच करा. सर्वसाधारण प्रबोधिनीपणातील ‌‘आजचे काम उद्यावर नाही‌’, हे सूत्र ‌‘करा काय ते आता करा‌’ या ओळीचेच प्रतिबिंब आहे. आपण काम करत राहायचे. आपण एक पाऊल पुढे टाकल्यावर परमेश्वर दहा पावले आपल्याजवळ येतो यावर पूर्ण विश्वास ठेवून, निराशावाद आणि हातावर हात ठेवून निष्क्रिय बसणे टाळा. हे दोन्ही टाळून कामाला लागणे यातच खरे धैर्य आहे. सर्वसाधारण प्रबोधिनीपणातला ‌‘रोज उपासना झालीच पाहिजे‌’ या सूत्राला ‌‘चित्तामध्ये धैर्य‌’ आणि ‌‘हरिवर भाव‌’ हे शब्द अप्रत्यक्षपणे कारण ठरले आहेत. धैर्य आणि भाव वाढणे हा उपासनेचा एक परिणाम आहे. थोर महात्मे होऊनि गेले चरित्र त्यांचे पहा जराआपण त्यांच्या समान व्हावे हाचि सापडे बोध खरा  ||२.२|| जे थोर लोक आजवर होऊन गेले ते प्रबोधिनीपणाच्या या दोन सूत्रांप्रमाणेच वागले, असे त्यांचे चरित्र पाहिल्यावर दिसून येईल. ते आपल्यासमोर वर्तनादर्श (रोल मॉडेल) आहेत. त्यांच्याकडे पाहून आपणही पुढच्या पिढ्यांसाठी वर्तनादर्श बनले पाहिजे हे कळले, तर त्यांची चरित्रे अभ्यासण्याचा उपयोग आहे. जग हे त्यजिता भवसागरिच्या वाळवंटीवर तरि जराचार पाऊले उमटवू अपुली हाच खुणेचा मार्ग बरा ||२.३||             आपण हे जग त्यजताना, म्हणजे सोडून जाताना, असे काम करू की मागून येणाऱ्यांना त्यातून कसे जगायचे याचे अनुकरणीय उदाहरण मिळेल. भवसागर म्हणजेच वर्तमानकाळातील वस्तुस्थिती. वर्तमानकाळ पुढे सरकल्यावर मागे उरतो इतिहास. त्यालाच इथे वाळवंट म्हटले आहे. त्या वाळवंटावर आपली चार पावले उमटवायची म्हणजे इतिहासात आपल्या कामाची ठळक अक्षरांत नोंद होईल असे आयुष्य जगायचे. या पाऊलखुणाच मागून येणाऱ्यांना पुढची वाट दाखवतील.  जीवित सागर दुस्तर मोठा त्यातुनि जाण्या पैलतिराखटपट करितो गोते खातो निराश होऊनि जाय पुरा ||२.४|| आपल्या आधीच्या आदर्श व्यक्तींचे आणि त्यांचे अनुकरण करणाऱ्या आपल्या सारख्यांचे चरित्र आपल्यानंतरच्या गोंधळलेल्या लोकांना मार्गदर्शक ठरू शकेल.  जीवित सागर म्हणजेही भवसागर. तो ओलांडून जाणे अवघड आहे. जो असा प्रयत्न करतो त्याला आपण पुढे जात आहोत की नाही हे कळत नाही. हे पाण्यात जागच्या जागी गटांगळ्या खाण्यासारखेच गोंधळून टाकणारे होते. असे प्रयत्न करणारी व्यक्ती हातपाय गाळून आता काही करणे नको अशा मनःस्थितीत येते. अशा नराच्या दृष्टिस पडता तीच पाऊले जरा जराकोणि म्हणावे नाही म्हणूनि येईल त्याला धीर जरा ||२.५|| अशा वेळी त्या व्यक्तीला आपल्या पाऊलखुणा दिसल्या, तर आपल्या आधी कोणीतरी पुढे गेले आहे, आपण ही जाऊ शकू, असा त्याला धीर येतो. आपल्या आधी गेलेल्यांना वाट पुसत आपणही पुढे जाऊया. उठा उठा तर निजू नका, होईल कैसे म्हणू नका,कशाही विघ्ना भिऊ नका, धीर

पद्य क्र. ९ – असार जीवित केवळ माया रडगाणे हे गाऊ नका… Read More »

पद्य क्र. ८ – हम करें राष्ट्र आराधन

निरूपण – प्रबोधिनीमधील वर्षान्त उपासनेमध्ये ‌‘राष्ट्रदेवा भवेम‌’ असे आपण सर्वजण म्हणतो. ‘आम्ही राष्ट्राला देव मानणारे होऊ’ असा त्याचा अर्थ. असे झाले पाहिजे हे स्वामी विवेकानंदांनी सर्वप्रथम अतिशय आग्रहाने सांगितले. तेव्हा त्यांच्या समोर ‘वंदे मातरम्‌‍’ हे गीत होतेच. त्याशिवाय सर्व जीवांची सेवा म्हणजे ईश्वराची पूजा हे त्यांच्या गुरूंचे वचनही होते. सर्व जीवांची सेवा करायच्या आधी आपल्या देशातील लोकांची सेवा केली पाहिजे, हे त्यांच्या भारत यात्रेच्या शेवटी त्यांनी कन्याकुमारीला केलेल्या तीन दिवसांच्या ध्यानामध्ये त्यांना स्पष्ट झाले. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करणारे भारतातील सर्वच लोक राष्ट्राला देव मानून राष्ट्राची आराधना करण्याचा प्रयत्न करत असतात. ती आराधना कशी करायची हेच या पद्यामध्ये सांगितले आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १९४५ साली लिहिलेल्या या पद्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर करायच्या पुढच्या समाजसंस्थापानेच्या कामासाठी राष्ट्राची आराधना करूया असे आवाहन कवीने केले आहे. आराधनेचा सर्वसाधारण अर्थ पूजा असा आहे. पण एखाद्याला सन्मान देऊन, आदरपूर्वक, त्याला प्रसन्न करण्यासाठी, त्याची आळवणी करणे हा आराधनेचा विशेष अर्थ आहे. आळवणीमध्ये तळमळ, उत्कंठा, तीव्र इच्छा, आर्तता अशा सगळ्या भावना असतात. आपल्या राष्ट्राविषयी या सर्व भावना आपले शरीर, आपले मन आणि आपली सर्व संपत्ती राष्ट्रासाठी वापरायची तयारी दर्शवून व्यक्त करायच्या असतात. शरीर, मन, संपत्ती ही आपली साधने आहेत. ती साधने वापरून आपण आपले व्यक्तिगत व कौटुंबिक आयुष्य जगत असतो. पण त्याशिवाय उरलेला सर्व वेळ राष्ट्रासाठी म्हणजे आपल्या देशातल्या समाजासाठी वापरणे म्हणजे राष्ट्राची आराधना करणे. या आराधनेने राष्ट्रदेव प्रसन्न होणे म्हणजे या देशातील समाज एकात्म, संघटित, सतत विजयाची इच्छा बाळगणारा आणि जगाचे कल्याण व्हावे अशी इच्छा करणारा होणे. यासाठीचे सर्व प्रयत्न म्हणजे राष्ट्राची आराधना. तन, मन, धन ही तर कायमची साधने आहेत. आपल्या साऱ्या जीवनाने राष्ट्राची आराधना कशी करायची हे या कडव्यात विस्ताराने सांगितले आहे. आपल्या मनातील विचार, त्या विचारांचा उच्चार आणि उच्चाराप्रमाणे प्रत्यक्ष कृती, यांच्यात एकवाक्यता किंवा सुसंगती असायला हवी. त्यात विसंगती किंवा दुटप्पीपणा आला, मनात एक, बोलतोय दुसरे आणि करतोय तिसरेच असे वागणे सुरू झाले की आपली बुद्धी अशुद्ध किंवा मलीन झाली असे म्हणतात. या सर्वांमधून एकच आशय व्यक्त होत असेल तर आपली बुद्धी निर्मल किंवा शुद्ध होते. निर्मल बुद्धी एकाच विचारावर किंवा उद्दिष्टावर एकाग्र होण्यास म्हणजे निश्चल किंवा स्थिर होण्यास सोपे जाते. विचार, उच्चार आणि आचार यातील एकवाक्यता आणि बुद्धीची स्थिरता आणायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. या प्रयत्नांचा निश्चित चांगला परिणाम होणार आहे, अशा विश्वासाने म्हणजे श्रद्धेने आम्ही प्रयत्न करू. आमच्या प्रयत्नांत जे काही कमी पडेल ते राष्ट्रदेवाने म्हणजे समाजातील सर्व अनुकूल घटकांनी पूर्ण करून घ्यावे, अशी प्रार्थना आम्ही नतमस्तक होऊन, म्हणजे नम्रपणे आणि अभिवादनपूर्वक, म्हणजे नमस्कार करून, करत आहोत. आराधनेमध्ये जसे अभिवादन येते तसेच अर्चनाही येते. अर्चनेचाही सर्वसाधारण अर्थ पूजा असाच आहे. पण आपल्या जवळच्या सर्व उत्तमोत्तम मौल्यवान वस्तू वापरून आपले आराध्य दैवत सुशोभित करणे किंवा त्याच्या भोवती आरास करणे हा अर्चनेचा विशेष अर्थ आहे. गोकुळाष्टमीला अन्नकोट करणे, शाकंभरी देवीची सर्व भाज्यांनी आरास करणे, गौरीपूजन किंवा नवरात्रामध्ये देवी सजवणे हे अर्चनेचेच प्रकार आहेत. देवाच्या प्रतिमेवर गुलाल, भंडारा किंवा कुंकू उधळणे हेही अर्चनच. आमच्या बालपणातील निरागसपणा, आमच्या तारुण्यातील सळसळणारा उत्साह आणि आमच्या प्रौढपणाच्या काळातील विवेकशक्ती या आयुष्याच्या सर्व अवस्थांमधील आमच्या सर्व गुणांचा, शक्तींचा आणि संपत्तीचा उपयोग करून होणाऱ्या अर्चनेने आम्ही आयुष्यभर राष्ट्रदेवाला म्हणजेच समाजाला प्रसन्न करणार आहोत. समाजाच्या समृद्धीबरोबर, समाजाची संस्कृती अधिक श्रेष्ठ व निर्दोष करणे हीच राष्ट्रअर्चना आहे. प्रौढ वयामध्ये विवेकाने राष्ट्र अर्चना करायची म्हणजे देशस्थितीचा अभ्यास व त्यावर चिंतन केले पाहिजे. ‘अपने अतीत को पढकर’ म्हणजे इतिहासाचा अभ्यास करून. आणि पुन्हा ‘इतिहास उलटकर’, इतिहास उलटवून असेही म्हटले आहे. इतिहासाचा अभ्यास करायचा तो इतिहासातील गौरवाची स्थाने समजून घेण्यासाठी आणि त्यातून आजच्या कामासाठी प्रेरणा मिळविण्याकरता. अभ्यासाचा दुसरा हेतू इतिहासातील चुका आणि उणिवा शोधून काढणे हा असतो. या चुका दुरुस्त करणे आणि उणिवा भरून काढणे म्हणजे इतिहास उलटवणे. पुन्हा तशा चुका होणार नाहीत याची व्यवस्था करणे. पण चुका दुरुस्त करणे हे खड्डे भरून काढण्यासारखे काम आहे. खड्डे भरून जमीन सपाट झाली की त्याबरोबर त्या सपाट जमिनीवर कशाची उभारणी करायची याचाही विचार केला पाहिजे. म्हणजेच देशाच्या भवितव्याचा किंवा भविष्यकाळाचा विचार केला पाहिजे. भविष्यात आपण काय करू शकू याची स्वप्ने पाहिली पाहिजेत आणि आपल्या बलस्थानांचा उपयोग करून ती स्वप्ने प्रत्यक्षात कशी आणायची याचाही विचार केला पाहिजे. इतिहास अभ्यासण्याचा, वर्तमानात त्या इतिहासातील चुका दुरुस्त करण्याचा आणि भविष्यकाळ सुधारण्याचा असा विचार करणे, म्हणजेच राष्ट्राचे चिंतन करणे. या पद्याचे शेवटचे कडवे बरेच मोठे आहे. त्याचा अर्थ तीन भागांमध्ये पाहूया.            आपल्या देशाचा इतिहास समजून घेतल्यानंतर, युगायुगांमध्ये म्हणजे अनेक कालखंडांमध्ये आपल्या राष्ट्रावर आलेल्या अनेक आपत्तींची आठवण होत राहते. आपल्या राष्ट्राच्या अपमानांचा दाह मनाला अस्वस्थ करत राहतो. आपल्या देशाची सेवा करणाऱ्यांच्या मार्गामध्ये अडथळे आणणारे अनेक शत्रू आठवतात. भारतीय संस्कृतीमध्ये परमेश्वराचे शांत रूपही आहे आणि त्याच परमेश्वराचे रौद्र-भीषण रूपही आहे. महाकाली हे देवीचे रौद्र रूप. भारतमाता ही पण त्याच देवीचे एक रूप. भारतमातेच्या शत्रूंना ठार केल्यावर त्या शत्रूंचे रक्त म्हणजेच अरि-शोणित या देशाच्या भूमीवर सांडले. तोच भारतमातेला केलेला अभिषेक. महाकालीने विविध अवतारांमध्ये असुरांचा म्हणजे दुष्ट शक्तींचा नाश केला व त्या दुष्टांची  मुंडकी आपल्या गळ्यामध्ये माळ करून घातली, अशी वर्णने पुराणांमध्ये आहेत. ज्यांना हा रौद्ररस झेपत नाही त्यांना ही असुरांची मुंडकी म्हणजे शत्रूंचा अहंकार किंवा गर्व नष्ट केल्याची प्रतीके आहेत, हे रूपक समजून घ्यावे लागते. इतिहास काळात आम्ही म्हणजे, आमच्यासारखीच भारतमातेची आराधना करणाऱ्या आमच्या पूर्वजांनी मातेला, दुष्टांच्या गळालेल्या अहंकारांची मुंडकी वाहून तिला सजवले होते. हा इतिहास आम्हाला आठवतो आहे. दुष्ट शक्तींचा नाश करून आमच्या पूर्वजांनी भारतीय संस्कृती जगातील त्या-त्या काळातल्या इतर संस्कृतींपेक्षा श्रेष्ठ बनवली. जणू काही भारतमाता सर्व संस्कृतींमध्ये सर्वोच्च स्थानावर बसून साऱ्या जगाचे शासन करत होती. म्हणजे साऱ्या जगाला मार्गदर्शन करत होती. यानंतर काळाच्या ओघामध्ये साऱ्या संस्कृतींमध्ये सर्वश्रेष्ठ असे भारताचे स्थान ढळलेले आहे. संस्कृतीच्या श्रेष्ठतेसाठी अध्यात्म आणि उच्च विचारांच्या बरोबर शक्ती, संघटना आणि चौफेर सावध दृष्टी याही गोष्टी आवश्यक असतात. त्यातील शक्ती, संघटना आणि सावधपणा या गोष्टींमध्ये आमची घसरण झाली. पण आता आम्ही ठाम निश्चय केला आहे की आमच्याकडची सर्व साधने वापरून भारतमातेला जगातील सुसंस्कृत देशांमधले सर्वश्रेष्ठ स्थान पुन्हा मिळवून देऊ. असे करण्यालाच पूर्वीपासून धर्मसंस्थापना करणे असा शब्द वापरला आहे. धर्माची स्थापना करणे म्हणजेच समाजात पुन्हा उत्तम शाश्वत मूल्यांची स्थापना करणे किंवा समाजसंस्थापना करणे. समाजसंस्थापनेचे ध्येय समोर ठेवून भारतामातेला अभिवादन करणे, तिची अर्चना करणे आणि तिचे चिंतन करणे हीच राष्ट्र आराधना प्रबोधिनीमध्ये करायची आहे. पद्य –

पद्य क्र. ८ – हम करें राष्ट्र आराधन Read More »

पद्य क्र. ७ – बलसागर भारत होवो

निरूपण – साने गुरुजींच्या १६३ कवितांचा संग्रह १९३५ साली ‌‘पत्री‌’ या नावाने प्रकाशित झाला होता. पत्री म्हणजे देवपूजेत वाहतो ती विविध वनस्पतींची पाने. जगन्मातेला, भारतमातेला, जन्मदात्री आईला वाहिलेल्या कविता म्हणजेच पत्री. त्यातले एक पान म्हणजे ‌‘बलसागर भारत होवो‌’ ही कविता. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात लिहिलेली असल्याने त्यात परदास्यातून मुक्तीचा, स्वातंत्र्याचा संदर्भ असलेले काही शब्द होते. असे दोन-तीन शब्द बदलून स्वातंत्र्यानंतरही हे पद्य ध्येयगीत म्हणून सर्व मराठी भाषिकांमध्ये प्रचलित झाले आहे. प्रबोधिनीच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त महापुरुष व सर्वधर्मग्रंथ पूजा केली होती. त्या पूजेच्या शेवटी हे पद्य म्हटले गेले. आधी बऱ्याच वेळा म्हटले होते. पण त्या पूजेच्या शेवटी ऐकलेले कायमचे लक्षात राहिले. प्रबोधिनीच्या स्थापनेच्या सुमारे अठ्ठावीस-तीस वर्षे आधी लिहिलेल्या या पद्यामुळे ‌‘ध्येय एक जरि भिन्न साधने‌’ याचीच प्रचीती येते. या पद्यात मांडलेल्या ध्येयासाठीच वेगळ्या काळात, वेगळ्या साधनांनी प्रबोधिनी काम करत आहे. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ॥धृ.॥ बलवान म्हणजे ज्याच्याकडे बल आहे असा. बलवानाकडे खूप बल असते. पण त्या बलालाही मर्यादा आहे. सागराला मर्यादा नाही. बलसागर म्हणजे अमर्याद बल असलेला. देशाला बलसागर म्हटले म्हणजे सर्वात आधी अमर्याद सैनिकी बळ किंवा अमर्याद संपत्तीचे बळ डोळ्यांसमोर येते. ही दोन्ही बळे देशाकडे हवीतच. पण त्यांनाही मर्यादा असते. शास्त्र-संशोधनाचे, ज्ञान-विज्ञानाचे, यंत्र-तंत्राचे बळही देशाकडे हवे. पण त्यांनाही मर्यादा आहे. देश विश्वात शोभून राहायचा असेल, म्हणजे विश्वाला खरी शोभा भारतामुळे येते असे इतर सर्व देशांना वाटायचे असेल, तर नैतिक बळाच्या बाबतीत आणि आत्मबळाच्या बाबतीत भारत बलसागर व्हायला हवा. पाकिस्तान, इराण, उत्तर कोरिया, इस्राएल या देशांनी आम्ही फक्त स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रे बनवली आहेत असे म्हटले, तर जग त्याकडे संशयाने पाहील. भारताने स्वतःहून आम्ही कोणाविरुद्ध अण्वस्त्रांचा पहिला वापर करणार नाही असे जाहीर केले. त्यावर मात्र जगाने विश्वास ठेवला. आपल्या हेतूतील सद्भावावर आणि त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल इतरांना विश्वास वाटणे, हेच भारताचे नैतिक बळ. आत्मबळ म्हणजे निर्भयता आणि निर्वैरता. आम्ही कोणाला भीत नाही आणि आम्हाला ही कोणी निष्कारण भीत नाही, म्हणजे निर्भयता. आमचे कोणाशी भांडण नाही आणि मतभेद असले तरी आम्हाला कोणी खोडसाळपणे विरोध करत नाही. ‌‘सर्वेषाम्‌‍ अविरोधेन‌’ आमची प्रगती चालू असते, ही निर्वैरता. नैतिक बळ आणि आत्मबळाच्या बाबतीत भारत बलसागर होवो, ही मुख्य प्रार्थना आहे. इतर सर्व बळांचे त्याला पूरक महत्त्व आहे. हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधलेराष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ॥१॥ देशातील सर्व लोकांचे शरीर सुंदर, सतेज करणे; मन पवित्र, सुदृढ करणे; बुद्धी कुशाग्र, विशाल करणे; आत्मा निर्भय, निर्वैर करणे, हीच त्या लोकांची सेवा. या जनसेवेसाठी शेतीपासून अंतराळ विज्ञानापर्यंत, आणि समानतेपासून सामाजिक न्यायापर्यंत देशाच्या प्रगतीकरिता, आणि सर्वांच्या मधील विषमता, ‌दारिद्र्य, फुटीरता दूर करण्याकरिता प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजेच राष्ट्रार्थ प्रयत्न करायला हवेत. ‌‘कंकण करि बांधियले‌’ म्हणजे असे प्रयत्न करण्याची मी शपथ घेतली आहे. माझ्यात प्राण असेपर्यंत मी जनसेवेसाठी आणि राष्ट्रार्थच काम करणार आहे. ते काम करत करतच मी मृत्यूला सामोरे जायला तयार आहे. म्हणजेच आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रार्थ काम करणार आहे. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीनतिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो ॥२॥ राष्ट्रार्थ प्राण वेचायचे, म्हणजे देशाला सर्व प्रकारे वैभवसंपन्न करायचे काम, मी आजीवन करायचे ठरवले आहे. त्या कामासाठी माझी शक्ती-युक्ती-बुद्धी, माझा वेळ, धन आणि मन, म्हणजेच माझे सर्वस्व अर्पण करायचे मी ठरवले आहे. पूर्वी देश पारतंत्र्यात होता. आज आर्थिक उत्पन्नामध्ये भारत जगात पाचवा देश आहे. इतर अनेक क्षेत्रांत मात्र, वेगवेगळ्या निर्देशांकांवर भारत जगात विसावा, पन्नासावा, शंभरावा, दीडशेवा आहे. म्हणजेच देशाचा समतोल विकास झालेला नाही. पारतंत्र्य हा घोर तिमिर, म्हणजेच भीषण अंधार होता. तसा हा वेगवेगळ्या क्षेत्रातील विकासाचा असमतोलही अजून सारा अंधार फिटलेला नसल्याचे सांगतो. तो असमतोल दूर करण्यालाही मी बांधील आहे. पण हे काम माझे एकट्याचे नाही. सर्व देशवासीयांना या कामात सहभागी होण्याचे मी आवाहन करतो. हातात हात घालून, हृदयास हृदय जोडूनऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायला हो ॥३॥ भारत बलसागर बनवण्याचा राष्ट्रयोग साधायचा असेल, तर सर्व देशवासीयांची श्रमशक्ती एकवटली पाहिजे. त्यासाठी परस्परांशी हातमिळवणी करून काम करता आले पाहिजे. सर्वांची मने जोडली गेली पाहिजेत. संशय, दुरावा, अविश्वास, द्वेष, सूड किंवा बदला, उच्च-नीचतेच्या कल्पना, या भावना मनातून काढून टाकल्या तरच परस्परांची मनमिळणी होईल. त्यालाच ‘हृदयास हृदय जोडून’ असे म्हटले आहे. परस्परांपासून वेगळेपणा राखण्याची निमित्ते किंवा सबबी आपली बुद्धी शोधू शकते. तसेच एकत्र येण्यासाठी समान मुद्देही शोधू शकते. समानता शोधण्यासाठीच बुद्धी वापरणे म्हणजे ऐक्याचा मंत्र जपणे. कामासाठी हातमिळवणी करण्याचे, जोडले राहण्यासाठी मनमिळणी करण्याचे आणि जुळेल तेवढ्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्यासाठी बुद्धी वापरण्याचे, सर्व देशवासीयांना मी आवाहन करत आहे. करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊविश्वात पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो ॥४॥ एकत्र काम करण्यासाठी सर्वांची शारीरिक श्रमशक्ती, हृदये आणि बुद्धी एकवटली तरी ती एकजूट तशीच टिकून राहण्यासाठी सर्वांच्या समोर मोठे, लांब पल्ल्याचे समान ध्येय लागते. ‘माय निजपदा लाहो‘ म्हणजेच भारतमाता, विश्वात सतत शोभून राहील, असे स्थान प्राप्त करो, हेच ते ध्येय आहे. त्यासाठी सर्व क्षेत्रात अग्रगण्य होऊनही भारत साऱ्या जगामध्ये विश्वासार्ह, निर्भय, निर्वैर राहील असा पराक्रम जगाला दाखवायचा आहे, याची आठवण आपल्याला सतत राहिली पाहिजे. अशी आठवण जागी ठेवणारीच गीते आपण गाऊया. भारताची कीर्ती वाढवणारा झेंडा आपल्या हातात ठेवूया. म्हणजेच कीर्ती वाढेल असे वागूया. या उठा, करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थहे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो ॥५॥ पुरुषार्थाचा रूढ अर्थ पराक्रम असा आहे. पण मनुष्याने आयुष्यात मिळवाव्यात अशा गोष्टी म्हणजे पुरुषार्थ हा पुरुषार्थाचा मूळ अर्थ आहे. एकेका व्यक्तीसाठी पुरुषार्थ मिळवायचा. राष्ट्रासाठी दिव्य पुरुषार्थ मिळवायचा. राष्ट्राचा दिव्य पुरुषार्थ म्हणजे विश्वात ध्रुव ताऱ्यासारखे अढळपणे शोभून राहणे. ते स्थान देशाला मिळावे या साठी आपण शर्थ म्हणजे सर्व शक्तीनिशी प्रयत्न करूया. असे आपण केले नाही तर आपले आयुष्य फुकट गेले असे होईल. रात्रीच्या वेळी ध्रुवतारा अढळ असतो. दिवसभर सूर्य तळपत असतो. ‘भाग्यसूर्य तळपत राहो’ म्हणजे देशाचे स्थान मात्र अहोरात्र, चोवीस तास, सर्व जगाला शोभा आणत राहील, असे आपण आपल्या प्रयत्नांनी करूया. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेलजगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो ॥६॥ भारत थोर म्हणजेच बलसागर व्हावा. त्याच्या वैभवाची कीर्ती जगभर पसरावी. पण भारताच्या बळामध्ये आत्मबळ मुख्य आहे. पूर्वी ऋषी-मुनींच्या आश्रमांच्या परिसरात जंगलातील प्राणी त्या ऋषींच्या आत्मबळाच्या प्रभावाने, आपला भित्रेपणा किंवा हिंस्रपणा विसरून जाऊन गुण्या-गोविंदाने एकत्र राहत, अशी वर्णने आहेत. भारताच्या आत्मबळाच्या प्रभावाने जगातील राष्ट्रे सुद्धा परस्पर वैर विसरून शांततेने नांदू लागली असे जेव्हा होईल, तो खरा सोन्याचा दिवस असेल. ‘वसुधैव कुटुम्बकम्‌‍’ याचा सगळ्या जगाला अनुभव येणे हाच भारत बलसागर होण्याचा हेतू आहे.  पद्य – बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो ॥धृ.॥हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधलेराष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ॥१॥वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीनतिमिर घोर संहारीन, या बंधू सहाय्याला हो ॥२॥हातात हात घालून, हृदयास हृदय जोडूनऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायला हो ॥३॥करि दिव्य पताका घेऊ,

पद्य क्र. ७ – बलसागर भारत होवो Read More »

पद्य क्र. ६ – जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है

निरूपण – आजचे पद्य मी संचलन करत असताना सर्व प्रथम म्हटले होते. संचलनाच्या तालावर म्हणता येणाऱ्या पद्यांमध्ये एक विशेष जोर असतो. गटात सर्वांबरोबर एकसारखे चालण्याची कृती करत असताना पद्य म्हणायचे असल्याने त्यात वर्णनपर, स्तुतीपर शब्दच जास्त असतात. समजून घ्यायला फार विचार करावा लागेल अशा कल्पना संचलन गीतामध्ये फारशा नसतात. सिंहगडावर झालेल्या एका अभ्यास शिबिरानंतर सिंहगड पायथा ते आय. ए. टी. संस्थेचे प्रवेशद्वार, असे काही किलोमीटर अंतर संचलन करत जाताना, हे जोषपूर्ण पद्य म्हणत गेल्याने संचलनाचा शीण गेल्याचेही आठवते. जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है इसके वास्ते यह तन है, मन है और प्राण है ॥धृ.॥ ‘जननी आणि जन्मभूमी या दोन्ही तर स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्यांच्या पुढे सोन्याची लंका मला आकर्षित करू शकत नाही‌’. या अर्थाचा संस्कृत श्लोक रामायणामध्ये रामाच्या तोंडी आहे. जननी म्हणजे आई. जन्मभूमी ही तर मोठी आई. या पद्यात त्या श्लोकाच्या धर्तीवर आई आणि मोठी आई असे न म्हणता माझी आणि माझ्या आईचीही आई अशी आमची जन्मभूमी स्वर्गाहून मोठी आहे असे म्हटले आहे. मातृऋण हे सर्वात आधी फेडायचे असते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जन्मदात्या आईला सांगितले की आपल्या जन्मभूमीचे ऋण मी फेडले तर तुझेही ऋण फेडल्यासारखे होईल. स्वातंत्र्यानंतरही आपले शरीर, मन, आणि प्राण प्रथम आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी वापरायचे आहेत असे या धृपदामध्ये सांगितले आहे. इसके कण कण पर लिखा रामकृष्ण नाम हैहुतात्माओं के रुधिर से भूमि सस्य श्याम हैधर्म का यह धाम है, सदा इसे प्रणाम हैस्वतंत्र है यह धरा, स्वतंत्र आसमान है ॥१॥ आमची मातृभूमी आम्हाला स्वर्गाहूनही श्रेष्ठ वाटते. कारण इथे धर्माचे धाम म्हणजे कायमचे निवासस्थान आहे. महाभारतात एक मुंगुसाची गोष्ट आहे. अतिथीला आपले जेवण देऊन स्वतः उपासमारीने मृत्यू पावलेल्या गृहस्थाच्या घरच्या जमिनीवर सांडलेल्या अन्नाच्या कणांमध्ये लोळल्यामुळे त्या मुंगूसाचे अर्धे शरीर सोनेरी झाले होते. अतिथीसाठी देहत्याग हे धर्माचे श्रेष्ठ आचरण. तसे आचरण आणखी कुठे होते का हे शोधत ते मुंगूस युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ झाला तिथे आले होते. तिथल्या जमिनीवर लोळून उरलेले अर्धे अंग सोनेरी होते का हे त्याने पाहिले. तिथेही त्याची निराशा झाली. कारण त्या यज्ञात फक्त संपत्तीचे दान झाले होते. कोणी आपणहून दुसऱ्यासाठी प्राणत्याग केला नव्हता. पण आमची मातृभूमी मात्र शेकडो हुतात्म्यांच्या रक्ताने, म्हणजे स्वातंत्र्यासाठी प्राण देण्याने, धर्मभूमी झाली आहे. त्यांच्या रक्ताच्या सिंचनानेच ही भूमी सुपीक होऊन ‘सस्या’ने म्हणजे धान्याच्या भरघोस पिकाने डवरून, ‘श्याम’ म्हणजे गडद रंगाची झाली आहे. जन्म देणारी भारतमाता अन्न देणारी पण आहे. मुंगुसाच्या सोनेरी रंगापेक्षा जीवन देणाऱ्या अन्नाचा गडद रंग जास्त मौल्यवान आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्म्यांच्याही आधी या भूमीवर राम, कृष्ण असे पुरुषोत्तम होऊन गेले आहेत. रामाने आपल्या वनवासातील प्रवासाने भारत उत्तर-दक्षिण जोडला आहे. तर कृष्णाने दुष्ट निर्दालनासाठी केलेल्या प्रवासात भारत पूर्व-पश्चिम जोडला आहे. ते जणू कापडाचे उभे-आडवे धागे आहेत. या उभ्या-आडव्या धाग्यांनी बनलेल्या वस्त्ररूपी देशाचा प्रत्येक बिंदू जणू या दोघांच्या पराक्रमांच्या कथांनीच बनला आहे. हा देश त्यांच्या श्रेष्ठ कर्माने धर्मभूमी बनला आहे. आज आता ही मातृभूमी आणि तिच्यावरील आकाश स्वतंत्र आहे. तिला आम्ही रोज, नव्हे, कायमच नमस्कार करतो. इसकी आन पर अगर जो बात कोई आ पडेइसके सामने जो जुल्म के पहाड हो खडेशत्रु सब जहान हो, विरुद्ध विधि विधान होमुकाबला करेंगे जब तक जान में यह जान है ॥२॥ आमच्या स्वतंत्र देशाच्या ‌‘आन‌’वर म्हणजे गौरवावर कुठला अपमानस्पद किंवा निंदास्पद डाग पडलेला आम्हाला चालणार नाही. आमच्या देशावर ‌‘जुल्म के पहाड‌’ म्हणजे कोणी अत्याचार केलेला आम्हाला चालणार नाही. ‌‘जहान‌’ म्हणजे सारे जग शत्रू म्हणून उभे राहिले, किंवा ‘विधि विधान’ म्हणजे ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेले भविष्य, किंवा नियती आमच्या देशाच्या प्रतिकूल असली तरी आमच्या जिवात जीव असेपर्यंत आम्ही सर्व प्रतिकूलतेचा सामना करू. चाणक्य, शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह, नेताजी सुभाषचंद्र बोस या साऱ्यांनीच नियतीचा धाक न बाळगता परिस्थिती पालटली. आम्हीही तसेच होऊ. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर स्वार होऊ. ‌‘विरुद्ध विधि विधान हो‌’ ऐवजी ‌‘विरुद्ध आसमान हो‌’ असा एक पाठभेद या पद्यात आहे. पण नियतीची सबब सांगण्याची भारतीयांची मानसिकता आहे. त्यावर उपाय म्हणून विधि विधानाच्या सुद्धा विरुद्ध जाऊ हा पाठच योग्य वाटतो. इसकी गोद में हजारों गंगा-यमुना झूमतीइसके पर्वतों की चोटियाँ गगन को चूमतीभूमि ये महान है, निराली इसकी शान हैइसकी जय पताका ही स्वयं विजय निशान है ॥३॥ इथल्या हजारो नद्या आणि उंच पर्वत शिखरे यामुळे आमच्या मातृभूमीची निसर्गशोभा आकर्षक झाली आहे. पण केवळ तेवढ्याच कारणामुळे आमचा देश महान झालेला नाही. त्याच्या ‘शान’ म्हणजे वैभवाचे कारण निराळेच आहे. आमची मातृभूमी धर्मभूमी आहे हे जगातल्या साऱ्या देशांपेक्षा तिचे वेगळेपण आहे. आमच्या मातृभूमीचा ध्वज फडकताना दिसला की आमची मातृभूमी विश्वविजयी झाल्याची ती खूण समजावी. धर्मभूमी भारत विश्वविजयी झाल्याची जय पताका आम्हाला बघायला मिळावी हीच आमची इच्छा आहे.   पद्य – जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है इसके वास्ते यह तन है, मन है और प्राण है ॥धृ.॥इसके कण कण पर लिखा रामकृष्ण नाम हैहुतात्माओं के रुधिर से भूमि सस्य श्याम हैधर्म का यह धाम है, सदा इसे प्रणाम हैस्वतंत्र है यह धरा, स्वतंत्र आसमान है ॥१॥इसकी आन पर अगर जो बात कोई आ पडेइसके सामने जो जुल्म के पहाड हो खडेशत्रु सब जहान हो, विरुद्ध विधि विधान होमुकाबला करेंगे जब तक जान में यह जान है ॥२॥इसकी गोद में हजारों गंगा-यमुना झूमतीइसके पर्वतों की चोटियाँ गगन को चूमतीभूमि ये महान है, निराली इसकी शान हैइसकी जय पताका ही स्वयं विजय निशान है ॥३॥

पद्य क्र. ६ – जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है Read More »

पद्य क्र. ५ – असू आम्ही सुखाने

निरूपण एक संस्कृत सुभाषित आहे.  त्याचा आशय असा की एखाद्या व्यक्तीचे मूल्य किंवा त्याची उत्तमता त्याच्या स्थानावरून निश्चित होत नाही तर त्याच्या गुणांवरून निश्चित होत असते. हे स्पष्ट करण्याकरता उदाहरण दिले आहे की राजवाड्याच्या शिखरावर बसला आहे म्हणून कावळ्याला कोणी पक्षीराज गरुड म्हणत नाहीत. आपल्या पदामुळे किंवा पदव्यांमुळे आपली श्रेष्ठता ठरत नाही. आपले कर्तृत्व, हृदयगुण आणि चारित्र्यगुणांमुळे आपले खरे मूल्य ठरत असते. आजचे पद्य पहिल्यांदा म्हटले त्याच वर्षी हे संस्कृत सुभाषित शिकलो होतो. दोन्हीची सांगड तेव्हापासून मनात पक्की बसून गेली. असु अम्ही सुखाने पत्थर पायातीलमंदीर उभविणे हेच आमुचे शील ॥धृ.॥ शील म्हणजे जी गोष्ट करण्याकडे आपल्या मनाचा सहज कल आहे आणि जी करायची आपण विचारपूर्वक ठरवले आहे अशी आपली ओळख. सर्वांना क्षमा करणारा तो क्षमाशील. सर्व प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणारा तो धैर्यशील. तसे या पद्यात राष्ट्रमंदिर उभे करणे हेच ज्यांचे काम, स्वभाव, ध्येय आणि व्रत आहे ते म्हणतात की मंदिर उभे करणे, निर्माण करणे हीच आमची ओळख आहे. आम्ही निर्मितीशील आहोत. राष्ट्रमंदिर उभे राहणे हे महत्त्वाचे. आम्ही कळसाचे दगड आहोत, की भिंतीतला चिरा आहोत की पायाचा दगड आहोत हे महत्त्वाचे नाही. इतर कोणी तयार नसेल तर आम्ही आनंदाने पायाचे दगड व्हायला तयार आहोत. मंदिरासाठी त्याची भौतिक रचना आणि आतली मूर्ती दोन्ही लागते. मंदिर कोणाचेही असू शकते. आम्ही राष्ट्रमंदिर उभे करू इच्छिणारे असे राष्ट्रनिर्मितीशील आहोत हे या धृपदानंतरच्या पहिल्या कडव्यात सांगितले आहे.  आम्हास नको मुळी मानमरातब काहीकीर्तीची आम्हा चाड मुळीही नाहीसर्वस्व अर्पिले मातृभूमिचे ठायीहे दैवत अमुचे ध्येय मंदिरातील ॥१॥   राष्ट्र उभविणे हे आमचे ध्येय आहे. राष्ट्र उभे करणे, त्याची नव्याने उभारणी करणे हे मंदिर उभे करण्यासारखेच काम आहे. ध्येयमंदिर म्हणजेच ज्यांचे राष्ट्रमंदिर उभे करण्याचे ध्येय आहे अशांनी उभे केलेले मंदिर. त्याच्या गाभाऱ्यामध्ये आमच्या आराध्य दैवताची म्हणजेच मातृभूमीची मूर्ती आहे. त्या मातृभूमीच्या पायावर आम्ही आमची, शक्ती, पैसा, वक्तृत्व, प्रतिभा आणि मनही, म्हणजेच सर्व काही  अर्पण केले आहे. त्यामुळेच राष्ट्रमंदिर उभारणे हेच आमचे शील झाले आहे. सर्वस्व अर्पण करण्यात जो आनंद असतो, त्यापुढे राष्ट्रासाठी काम करताना आपले सत्कार होतात की नाही, आपले कौतुक होते की नाही, आपले नाव आणि छायाचित्र छापून येते की नाही, ‌‘सेलेब्रिटीं‌’च्या यादीत आपल्याला मोजले जाते की नाही, याकडे आमचे लक्षच जात नाही. वृक्षांच्या शाखा उंच नभांतरि जावोविश्रांति सुखाने विहगवृंद तैं घेवोजरि देईल टकरा नाग बळाने देवोकरू अमर पाजुनि रस पाताळातील ॥२॥ मंदिर कितीही भव्य आणि आकर्षक झाले, तरी ती स्थिर, निर्जीव रचना आहे. त्याच्या पायाचा दगड होण्याची तयारी आहेच. पण आम्ही सतत वाढणाऱ्या सजीव रचनेचाही भाग होऊ शकतो. आकाशाकडे झेपावणाऱ्या झाडांच्या शेंड्यांकडे सर्वांचे लक्ष जाते. त्या झाडाच्या अंगा-खांद्यांवर म्हणजे फांदी-फांदीवर शेकडो पक्ष्यांचे थवे म्हणजे विहगवृंद, आसरा घेतात. त्यांनी तिथे विश्रांती घ्यावीच.  राष्ट्रातील सर्व लोकही रोज रात्री भरल्या पोटी समाधानाने झोपी जाणारे असावेत. असा अनेक जीवांना आधार देणारी झाडे मजबूत पाहिजेत. त्यांच्या खोडांना-बुंध्यांना ‌‘नाग‌’ म्हणजे मदाने माजलेले, पिसाळलेले हत्ती आपल्या भव्य कपाळाने टकरा द्यायला लागले, तरी ती झाडे टिकली पाहिजेत. मोडून किंवा मुळापासून उखडली जायला नकोत. झाडाची मुळे जेवढी खोल तेवढी झाडाची धक्का सहन करण्याची ताकद वाढते. मग आम्ही त्या झाडाची खोलवर, अगदी पाताळापर्यंत जाणारी मुळे व्हायला तयार आहोत. पायाच्या दगडासारखे फक्त आधार देण्याचेच काम नाही, तर जमिनीतली सर्व पोषक द्रव्ये शोषून त्या झाडांच्या सर्वांगांचे पोषणही आम्ही दीर्घ काळ करत राहू.  पोषणाअभावी त्यांना मरू देणार नाही. जमिनीखाली मुळांचे काम करताना आमच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही तरी चालेल. जरि असेल ठरले देवत्वाप्रत जाणेसोसून टाकीचे घाव बदलवू जिणेगुणसुमने आम्ही विकसित करू यत्नानेपावित्र्ये जीवन का न होइ तेजाळ ॥३॥ या कडव्याची पहिली ओळ मुळात ‌‘जरि असेल अमुचे रूपहि ओंगळवाणे‌’ अशी होती. एकदा आप्पांनी या ओळीत बदल सुचवला.  पायाचे दगड किंवा जमिनीखालची मुळे आहोत असे म्हणण्यात नम्रता आहे. रूप ओंगळवाणे आहे म्हणण्यात नम्रता नसून, आपण काहीतरी कमी आहोत असा न्यूनगंड आहे. आमचे ते रूप आम्ही बदलू एवढी संकुचित आकांक्षा का ठेवायची ? नम्रतेच्या बरोबर ‘रूप पालटू देशाचे’ ही मोठी आकांक्षा पाहिजे. पहिल्या दोन कडव्यांत निर्जीव मंदिराचा दृष्टान्त झाला, सजीव वृक्षाचा दृष्टान्त  झाला, पद्याच्या शेवटी आणखी काहीतरी मोठा विचार हवा. सुरुवातीला म्हटले तसे कावळ्याला गरूड व्हावेसे वाटले, तर नुसते राजवाड्याच्या शिखरावर बसून तो बदल होणार नाही. कावळ्याला स्वतःमध्ये गरुडाचे गुण आणण्यासाठी प्रयत्न करायला लागतील. कावळ्याला असे प्रयत्न करता येतील की नाही हे माहीत नाही. पण माणसाला प्रयत्न करून आपले दोष घालवता येतात, गुणही वाढवता येतात. निर्दोष, गुणसंपन्न माणूस म्हणजेच देवमाणूस. राष्ट्र उभारायचे म्हणजे खरे तर साऱ्या समाजाने, राष्ट्रातल्या सर्वांनी देवमाणूस बनायला हवे. मंदिर, वृक्ष यापेक्षा देवमाणसांचा संघटित समाज या शब्दांत राष्ट्राचे अधिक यथार्थ वर्णन होईल. पायाचे दगड किंवा झाडाची मुळेही व्हायची आमची तयारी आहे. पण राष्ट्रातल्या सर्वांनी देवत्वाचे गुण मिळवायचे असतील तर आमच्यापासूनच आम्ही सुरुवात करतो. दगडातून मूर्ती घडवताना टाकीचे, म्हणजे छिन्नीचे, घाव घालून नको असलेला भाग काढून टाकावा लागतो. तसे आमच्यातले दुर्गुण आम्ही काढून टाकू. ते काढून टाकताना दगड जसे छिन्नीचे घाव सोसतो, तसे आम्हाला जो काही त्रास होईल, तो आम्ही सहन करू. आमचे जिणे, म्हणजे जीवन निर्दोष म्हणजे शुद्ध, आणि पवित्र म्हणजे इतरांचे दुर्गुण घालवणारे करू. आमचे दोष घालवूच. पण त्या शिवाय आमच्यामध्ये प्रयत्नपूर्वक अनेक सद्गुण मिळवायचा प्रयत्न करू. दोष घालवून पवित्र होऊ. सद्गुण मिळवून तेजाळ म्हणजे तेजस्वी होऊ. पवित्र आणि तेजस्वी होणे म्हणजेच देवत्वाप्रत जाणे. आधी स्वतः देवत्वाप्रत जाण्याचा प्रयत्न करू. मग इतरांना त्यासाठी मदत करू. पायाचा दगड बनून आधार देणे, झाडाचे मूळ बनून आधार देणे व पोषण करणे, याच्या पुढची पायरी म्हणजे स्वतःमधले देवत्व वाढवून इतरांमधले वाढवायला मदत करणे. या तीन्ही गोष्टी आम्हाला समान आहेत. भौतिक आधार देणारे, पोषण करणारे आणि सर्वांना श्रेष्ठत्वाकडे  नेणारे ही तीन्ही कामे आम्ही आमच्यावर प्रसिद्धीचा प्रकाशझोत पडला नाही तरी प्रसन्नतेने करू. हेच आमचे शील, आमचे चारित्र्य, आमच्या व्यक्तिमत्त्वाचे बरोबर असे वर्णन आहे. पद्य – असु अम्ही सुखाने पत्थर पायातीलमंदीर उभविणे हेच आमुचे शील ॥धृ.॥आम्हास नको मुळी मानमरातब काहीकीर्तीची आम्हा चाड मुळीही नाहीसर्वस्व अर्पिले मातृभूमिचे ठायीहे दैवत अमुचे ध्येय मंदिरातील ॥१॥वृक्षांच्या शाखा उंच नभांतरि जावोविश्रांति सुखाने विहगवृंद तैं घेवोजरि देईल टकरा नाग बळाने देवोकरू अमर पाजुनि रस पाताळातील ॥२॥जरि असेल ठरले देवत्वाप्रत जाणेसोसून टाकीचे घाव बदलवू जिणेगुणसुमने आम्ही विकसित करू यत्नानेपावित्र्ये जीवन का न होइ तेजाळ ॥३॥

पद्य क्र. ५ – असू आम्ही सुखाने Read More »