पद्य

पद्य क्र. ४ – बनें हम हिंद के योगी

निरूपण – काही पद्ये सोप्या शब्दांची व सोप्या चालीची असतात. म्हणायला सोपी, सांगायला सोपी आणि त्यांचा  सरळ शब्दार्थही समजायला सोपा. आजचे पद्य तसे आहे. पण जसा काळ गेला, जसे या पद्यावर चिंतन होत गेले, तसे या पद्यात एक मोठे सूत्र दडलेले आहे असे लक्षात आले, मागे ‘विकसता, विकसता ….’ या पद्याच्या निरूपणात आप्पांनी मांडलेले दर्शन (exposure) आणि आव्हान (challenge) हे शिक्षणातील दोन कळीचे शब्द सांगितले होते. शालेय वयासाठी ते पुरेसे आहेत. पण आयुष्यभरासाठी आणखी काही पायऱ्या हव्यात. औपचारिक शिक्षण संपल्यावर पुढील आयुष्यात आपण अनुभवातूनच शिकत असतो. साध्या साध्या कौशल्यांपासून सवयी, वृत्ती आणि पूर्ण स्वभाव अनुभवातून शिकण्याने घडू शकतो. एका राष्ट्रसमर्पित कार्यकर्त्याच्या घडणीचे टप्पे या पद्यात मांडले आहेत असे मला जाणवले. बनें हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का उठाकर धर्म का झंडा, करेंगे मान भारत का ॥धृ॥ हिंद के योगी, म्हणजे देशभक्त बनूया, अशी इच्छा सुरुवातीलाच व्यक्त केली आहे. योगी म्हटल्यामुळे देशभक्ताचा वेष, वागणे, बोलणे, काम करणे या सर्वांचे वर्णन योग्याच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धतीने केले आहे. योगी ध्यान करतो. मग आपणही आपल्या देशाचे, भारताचे, ध्यान करूया. एकाग्रतेने सतत भारताचाच विचार करूया. भारताचा मान वाढेल अशा प्रकारचे काम करूया. विवेकानंदांनी भारतातील धर्माचा संदेश जगाला दिला, धर्माचा झेंडा जगभर फिरवला. कारण त्यांच्या दृष्टीने धर्म हाच भारताचा प्राण आहे. तसे आपणही भारतातील सर्वोत्कृष्ट गोष्टींचा झेंडा जगभर फिरवूया. त्यागी, योगी, राष्ट्रभक्त संत पाहिल्यावर, त्यांच्यासारखे व्हावे असे मनात येणे इथूनच स्वत:मधील बदलांना सुरुवात होते. नवीन किंवा वेगळ्या गोष्टींचे दर्शन झाले की तसे करून पाहावेसे, व्हावेसे वाटते. इथे इतर देशभक्तांची चरित्रे वाचून किंवा ऐकून आपण देशभक्त व्हावे, हिंद के योगी व्हावे, असा संकल्प करावासा वाटले आहे. हाच दर्शनाचा परिणाम आहे.  गले में शील की माला, पहनकर ज्ञान की कफनीपकडकर त्याग का डंडा, करेंगे मान भारतका ॥१॥ योगी म्हटले की त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आली. अंगावर भगवी कफनी आली. हातात दंड आला. योगी व्हायचे ठरवले तर सगळ्यात आधी करण्यासारखे म्हणजे त्याच्या बाहेरून किंवा वरून दिसणाऱ्या रूपाचे अनुकरण करणे. लहान मुलांच्या आकर्षक पोशाखाच्या स्पर्धा होतात. तेव्हा कोणी झाशीची राणी, कोणी भगतसिंह, कोणी सुभाषबाबू, कोणी सैनिक, कोणी वकील बनतात. तेव्हा फक्त त्यांच्या सारखा पोशाख ती मुले करतात. वरवरचे अनुकरण करतात. देशभक्ताला शील किंवा उत्तम चारित्र्य, अद्ययावत ज्ञान आणि स्वार्थत्यागाची आवश्यकता आहे. त्या गुणांनाच अनुक्रमे माळ, कफनी आणि दंडाची उपमा दिली आहे, हे गुण देशभक्तामध्ये आले तरच तो देशाचा मान जगात वाढवू शकेल. अनुकरण म्हणजे फक्त बाहेरून वागणे बदलणे नाही. ते बदलल्यावर आतून पण बदल होऊ लागेल अशी अपेक्षा आहे. आण्णा पूर्वी धोतर नेसायचे. प्रबोधिनीचे प्रतिनिधी म्हणून लष्करी संशोधन प्रयोगशाळेत जाताना आप्पांनी त्यांना सुरवार घालायला सांगितली. मी पूर्वी पायजमा वापरायचो. मलाही परदेशात प्रबोधिनीचा प्रतिनिधी म्हणून वावरायचे आहे, यासाठी सुरवार वापरायला सांगितली. पूर्वी व्यापार उद्योग विभागाच्या प्रतिनिधींनी विक्रीसाठी भारतभर हिंडताना सुटाबुटात न जाता सुरवार-झब्ब्यात गेले पाहिजे अशी त्यांना सूचना होती. बहिरंगाचे अनुकरण करण्यासाठी, त्या भूमिकेत शिरण्यासाठी काही वेळा दर्शनानंतर मार्गदर्शन किंवा प्रशिक्षणाची गरज असते. आवश्यक तर कोणाचे तरी मार्गदर्शन घेऊन अनुकरण करणे ही अनुभव शिक्षणाची दुसरी पायरी आहे. जलाकर कष्ट की होली, उठाकर इष्ट की झोलीजमाकर संत की टोली, करेंगे मान भारतका ॥२॥             संत म्हणजे ही योगी किंवा देशभक्तच. त्यांची टोळी म्हणजे संघटना करून भारताचा मान आम्ही वाढवू. देशाचा मान वाढवणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही, समानशील लोकांची संघटना करणे हे देशभक्तीचेच काम आहे. योगी यज्ञ करताना मंत्र म्हणतात. सर्वसामान्य लोकांसाठी  बिनमंत्रांची होळी म्हणजे यज्ञच. होळीत कष्टाच्या गोवऱ्या आणि लाकडे अर्पण करायची. देशासाठी कष्ट केल्यावर त्याचा परिणाम प्रसाद म्हणून घ्यायचा असतो. प्रसाद चवीसाठी घ्यायचा नसतो. तसे इष्ट म्हणजे यश-अपयश दोन्ही. यश मिळाले तर कष्ट कारणी लागले. अपयश आले तर कष्टात काय सुधारणा केली पाहिजे हे शिकण्याची संधी मिळाली. योग्याच्या वेषाच्या बहिरंगाकडून अंतरंगाकडे जाताना योग्याच्या मानसिक भूमिकेतून वागणे ही आले पाहिजे. यश मिळवण्यासाठी कष्ट करायचे आणि अपयशावर मात करण्यासाठीही कष्ट करायचे, हे आव्हान स्वीकारायचे असते. नंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करून योग्याच्या भूमिकेशी आतून बाहेरून एकरूप व्हायचे आहे. आव्हान स्वीकारून काही काळ उद्दिष्टाशी एकरूप होणे ही अनुभव शिक्षणाची तिसरी पायरी आहे. स्वरों में तान भारत की, है मुख में आन भारत की नसों में रक्त भारत का, नयन में मूर्ति भारत की ॥३॥             नटाची भूमिकेशी एकरूपता नाटकापुरती असते. नाटक संपले की तो मूळ स्वभावावर येतो. आव्हान पूर्ण झाले की शिथिलता येते. गणेशोत्सव, प्रात्यक्षिके, एखादे अभियान संपल्यावर युवक-युवती कार्यकर्ते काही काळ निद्रितावस्थेत जातात. कारण ती भूमिका, त्यासाठी आलेली एकरूपता हे उसने अवसान असते. आव्हान संपल्यावर ते अवसान गळून पडते. रामायण मालिकेतील राम आणि सीतेची भूमिका उत्तम वठवलेले नट-नटी, मालिकेनंतरच्या आयुष्यात आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे जगले. ‘संत तुकाराम’ या चित्रपटात तुकारामांची भूमिका करणारे नट विष्णुपंत पागनीस हे मात्र चित्रीकरण संपले तरी तुकारामांच्या मनोभूमिकेतून बाहेर आले नाहीत. त्यांनी चित्रपटातील कामाचे मानधन तर स्वीकारले नाहीच. पण पुढे ही तुकारामांची भूमिका करत असल्यासारखेच ते लौकिक आयुष्यात विरक्त वृत्तीने जगले. ‌‘हिंद के योगी‌’ होऊ इच्छिणारे देशभक्त देशाशी एकरूप झाल्यावर ती देशभक्ती अंगात भिनवू इच्छितात. देशभक्ती अंगात भिनली की ती डोळे, बोलणे, गाणे या सगळ्यातून कायम व्यक्त होत राहते. मग बोलायला वेगळा विषय राहत नाही. ही एकरूपतेच्या पुढची पायरी. तिला तन्मयता किंवा कायाकल्प म्हणता येईल. असा देशभक्त ‘मी काही काळ देशभक्ती केली’ असे म्हणूच शकत नाही. तो देशभक्तीचाच सजीव पुतळा बनतो. एखाद्या विषयाने आपला कायाकल्प होणे, व्यक्तिमत्त्व ध्येयमय होऊन पूर्णपणे ध्येयरूप होणे, ही अनुभवशिक्षणाची चौथी पायरी आहे. हमारे जन्म का सार्थक, हमारे स्वर्ग का कारण हमारे मोक्ष का साधन, यही उत्थान भारत का ॥४॥ काही जणांच्या बाबतीत देशभक्ती अंगात भिनते आणि त्यांचे आयुष्य त्यांच्यापुरते बदलून जाते. पण काही जणांच्या बाबतीत ‌‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी‌’ या न्यायाने आपला अनुभव इतरांना सांगितल्याशिवाय त्यांना राहवत नाही. माझ्या जन्माचे सार्थक देशाच्या पुनर्उभारणीसाठी – उत्थानासाठी – काम करण्यातून झाले, तसे तूही तुझ्या जन्माचे सार्थक  कर, असे सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मी देश उभारणीसाठी काम करत आहे, त्यामुळे स्वर्गातील माझी जागा आरक्षित झाली आहे, यावर काही जण समाधानी असतात. काही जण मात्र माझ्या मार्गाने तुम्ही तुमची स्वर्गातली जागा आरक्षित करा, असे इतरांना सांगितल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. जन्म-मरणाच्या फेऱ्यांतून सुटण्यासाठी – मोक्ष मिळवण्यासाठी – देशाच्या उत्थानाकरता काम करणे, हे साधन मला सापडले आहे, ते सर्वांनी वापरले पाहिजे, असा आग्रह करणारेही काही जण असतात. देशभक्तीचे सक्रिय प्रचारक, विस्तारक, उपदेशक बनणारे किंवा इतरांना आपल्यासारखे बनण्याचे आवाहन करणारे अनुभव शिक्षणाच्या पाचव्या पायरीवर जातात. दर्शन – सहभाग किंवा अनुकरण – आव्हान आणि एकरूपता – कायाकल्प – इतरांना आवाहन, या अनुभव शिक्षणाच्या पाच पायऱ्या मला या पद्यात दिसल्या. पद्य – बनें हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का उठाकर धर्म का झंडा, करेंगे मान भारत का ॥धृ॥गले में शील

पद्य क्र. ४ – बनें हम हिंद के योगी Read More »

आम्ही जाउच जाऊ

निरूपण – प्रबोधन गीते म्हणजेच पद्ये गायची असतात अशीच सर्वसाधारण रीत आहे. पण पद्याचे अभिवाचनही प्रभावी होऊ शकते. एक पद्य आम्हाला शिकवतानाच ‘हे गायचे नाही, ठेक्यात आणि जोशात म्हणायचे आहे’, असे सांगून शिकवले होते. नंतर कोणीतरी या पद्याला चाल लावली. मला मात्र आधी शिकलो होतो तसेच, हे पद्य अभिवाचन करत म्हणायला आवडते. गेली काही वर्षे, विद्याव्रत शिबिरात मी सर्वांकडून अभिवाचन स्वरूपातच हे पद्य म्हणून घेऊन, मग व्रत घेऊन आयुष्यात काय करायचे हे सांगतो. प्रबोधिनीचा पहिला भवितव्य लेख तयार केला, तेव्हा त्यातल्या परिच्छेदांची शीर्षके म्हणून, या पद्याच्या ओळीच सहजपणे सुचल्या होत्या, इतके या पद्यातील विचार माझ्या मनावर ठसले आहेत. अदम्य अपुल्या आकांक्षांचे गीत आजला गाऊजिथे जायचे ठरले तेथे, तेथे जाउच जाऊआम्ही जाउच जाऊ  ||धृ.|| अदम्य म्हणजे कशानेही न दबणारे, कोणीही दाबून टाकू शकणार नाही, असे. आपल्या मनातील आकांक्षा म्हणजे ज्या तीव्र इच्छा आहेत, त्या मोकळेपणे सांगायला गेलो, तर गाण्याच्या स्वरूपात बाहेर पडतात. म्हणून आपल्या अदम्य आकांक्षा आम्ही आज जगाला गात गातच सांगणार आहोत. आयुष्यात काय करायचे, काय मिळवायचे, याबाबतच्या या आकांक्षा आहेत. एखादे काम करायचे ठरल्यावर, आप्पा ‌‘करूच करू‌’, म्हणजे पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सर्वांना म्हणायला लावायचे. त्याच पद्धतीने, ठरलेले उद्दिष्ट गाठेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही उद्दिष्टापर्यंत जाऊच आणि आमच्या प्रयत्नांनेच जाऊ असा ‌‘जाऊच जाउ‌’चा अर्थ आहे. नवतेजाप्रत नवक्षितिजांच्या दौडत दौडत जाऊक्षणभर सांगुनि मनिचे हितगुज स्वप्ने नव रंगवूनवीन कवने,  नव्या कहाण्या नवस्फूर्तीने गाऊ ॥१॥ ‘जाउच जाऊ‌’ म्हणून चालायला सुरुवात केली की काय होते? तर क्षितिज पुढे पुढे सरकताना दिसते.  म्हणजे नवे क्षितिज दिसते. आणि अंतरिक्षातून लांबचा प्रवास चालू असेल, तर नवीन सूर्य-तारे दिसायला लागतात. म्हणजेच तेजाचे नवे स्रोत दिसायला लागतात. मग नव्या क्षितिजावरच्या तेजाच्या नवीन स्रोतांकडे जाण्याची आपली उत्कंठा वाढते आणि सावकाश चालत जाण्या ऐवजी आपण दौडत म्हणजे वेगाने पळत जाऊ लागतो. प्रबोधिनीचा पहिला भवितव्य लेख लिहिण्यापूर्वी आपण प्रबोधिनीच्या शिक्षण, संशोधन, ग्रामविकसन व उद्योग अशा चार कार्यदिशा सांगायचो. तो भवितव्य लेख तयार झाल्यावर आता आठ कार्यदिशांनी काम करायचे, असे ठरले. राष्ट्रीय एकात्मता, स्त्री-शक्ती प्रबोधन, नेतृत्वविकसन आणि प्रसार माध्यमे या नव्या चार कार्यदिशा म्हणजे दिसलेली नवी क्षितिजे. ‌‘मनिचे हितगुज‌’ म्हणजेच धृपदातील ‌‘अदम्य आकांक्षा‌’. आजवर मनात ठरवलेले उद्दिष्ट तर सांगूच. पण ते सांगितल्यावर नवीन कार्यदिशांनी काय करायचे याचीही भविष्यचित्रे – नवीन स्वप्ने – रंगवायला लागू. त्यातूनच शिक्षणाऐवजी शैक्षणिक विस्तार आणि उद्योगाऐवजी प्रशिक्षण व उत्पादन असे आधीच्या कार्यदिशांचे नव्याने नामकरण झाले. ही नवीन स्वप्ने, नवीन योजना म्हणजेच नवीन कवने आणि नव्या कहाण्या. आजवरच्या आकांक्षांचे गीत गाऊच, पण नव्याने दिसलेली उद्दिष्टेही नवस्फूर्तीने म्हणजे नव्या उत्साहाने गाऊन जगजाहीर करू. नसति भाषणे, जीवन ध्येये ही तर अमुची सारीयत्न शिंपुनी फुलवू क्षेत्रे कर्तृत्वाची न्यारीइतिहासाची दिशा पालटू महान मानव घडवू ॥२॥ आम्ही ज्या अदम्य आकांक्षा आणि नवीन स्वप्ने गात आहोत, सांगत आहोत, ती केवळ भाषण आकर्षक करायच्या युक्त्या नाहीत. आमच्या आयुष्यात काय करायचे ठरवले आहे, ते आमचे जीवनध्येयच आम्ही सांगत आहोत. अनेक दिशांनी काय करू हे सांगत असलो, तरी ते एकाच जीवनध्येयाचे न्यारे म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण असे वेगवेगळे पैलू आहेत. एकेक कार्यदिशा म्हणजे कर्तृत्व दाखवण्याचे एकेक कार्यक्षेत्र आहे. त्या प्रत्येक कार्यक्षेत्रात आमचे यत्न शिंपून म्हणजे कष्ट करून आम्ही उत्तमतेचे नवे उच्चांक फुलवणार म्हणजे प्रस्थापित करणार आहोत. प्रबोधिनीच्या दुसऱ्या भवितव्य लेखात प्रशिक्षण व उत्पादन या कार्यदिशेऐवजी आर्थिक स्वायत्तता व उद्योजकता विकास या वेगळ्या दिशा ठरल्या. त्यात आरोग्य या कार्यदिशेची भर पडली. नेतृत्वविकसनाच्या जोडीला समूहगुणविकसन या दिशेची भर पडली. शैक्षणिक विस्तार ही वेगळी दिशा व माध्यमिक शिक्षण ही वेगळी कार्यदिशा ठरली. तर प्रबोधिनीच्या तिसऱ्या भवितव्य लेखात माध्यमिक शिक्षणाच्या जोडीने पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षण ही आणखी वेगळी दिशा ठरली. कर्तृत्वाची अनेक क्षेत्रे, म्हणजे अनेक कार्यदिशा असल्या, तरी त्या सर्व एकाच जीवनध्येयाचे भाग आहेत. ते ध्येय म्हणजे महान मानव घडवणे, म्हणजेच मानवाचा देवमानव अर्थात श्रेष्ठ किंवा प्रगत मानव घडवणे. आजपर्यंतचा इतिहास जीवशक्तीच्या नैसर्गिक उत्क्रांतीचा आहे. आता ती उत्क्रांतीची दिशा पालटून, नैसर्गिक उत्क्रांतीची वाट पाहत न बसता, होईल तेव्हा होईल, असे न म्हणता, मानवी प्रयत्नांनी मानवाची मानसिक, बौद्धिक, सामाजिक व आध्यात्मिक उत्क्रांती आम्ही घडवूच घडवू. त्यातूनच प्रगत असा महान मानव घडेल असा आमचा विश्वास आहे. कधी न रुसणे, कधी न रडणेना कधी थकणे, सदा पुढे चालणेएकचि निश्चय झाला अमुचा राष्ट्र पुन्हा उभविणेदुर्गमतेची तमा न आम्हा पाउल पुढेच ठेवू ॥ ३॥ जीवनध्येयाची केवळ गाणी न गाता, केवळ तोंडाने घोषणा न देता, यत्न शिंपून ध्येय गाठायचे तर ठरले. मग मनाविरुद्ध घडलेल्या एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून रुसणे, कोणाचे वागणे, बोलणे, विचार पटले नाहीत म्हणून अबोला धरणे, कुठे दुखले-खुपले किंवा अल्प यश आले तर रडत बसणे, प्रयत्न चालू असूनही यश नजरेच्या टप्प्यात दिसत नाही म्हणून धीर सुटून थकणे, यातले काहीच चालणार नाही. अनेक कामांच्या शासकीय परवानग्या कोणालाही लाच न देता मिळवणे ही काही वर्षांची तपश्चर्या आपले अनेक विभागप्रमुख न थकता करत असतात. ग्रामविकसन विभागातर्फे गावात विहीर, बंधारा किंवा टाकी बांधताना त्याच्या खर्चाचा वाटा गावकऱ्यांनी श्रमदान किंवा लोकवर्गणीच्या रूपाने उचलावा यासाठी त्यांचा होकार येण्यासाठी महिनोन महिने किंवा काही वर्षे न कंटाळता वाट पाहिली जाते. ‘जाउच जाऊ’ म्हणत ध्येय गाठेपर्यंत सतत चालत राहिले पाहिजे. त्यामुळेच पुण्यातील प्रशालेच्या अस्तित्वासाठी अकरा वर्षे सर्वोच्च न्यायालयात लढा चालू आहे. तर निगडी केंद्राने महानगरपालिकेच्या अन्याय्य कर आकारणी विरुध्द तेरा वर्षे न्यायालयात खटला चालवून आपल्या अनुकूल निर्णय मिळवला. यालाच ‘सदा पुढे चालणे’ म्हणतात. महान मानव घडवण्याचे आमचे ध्येय आहे. जगभरातल्या मानवांना श्रेष्ठ बनवण्याआधी हिंदुस्थानच्या प्रयोगशाळेत आपण ते करून दाखवले पाहिजे. त्यासाठी हिंदुस्थानातल्या सर्व लोकांना श्रेष्ठ मानव बनवणे, म्हणजेच हिंदुस्थानला पुन्हा राष्ट्र म्हणून सशक्त बनवणे, हे आमचे पहिले काम आम्ही निश्चित केले आहे. हे काम सुरुवातीला कितीही दुर्गम, म्हणजे पुढे जाण्यास अवघड वाटले, तरी त्याची तमा, म्हणजे काळजी किंवा पर्वा, आम्हाला नाही. राष्ट्र पुन्हा सशक्त करण्याचा आमचा निश्चय झाला आहे. त्या दिशेने ‘जाऊच जाऊ’ म्हणून पुढचे पुढचे पाऊल टाकत राहणार आहोत. निश्चय, निष्ठा, नीती यांचे कंकण बांधुन हातीव्रतस्थ होउन व्यापुनि टाकू विश्वाच्याही मितीविश्वविजेते हिंदुराष्ट्र ते पुन्हा जगाला दावू ॥४॥ जे काही  करायचे आहे ते स्वतःच करायचे आहे, हे ठरवणे म्हणजे निश्चय करणे. त्या निश्चयाला सर्व परिस्थितीत चिकटून राहणे म्हणजे निष्ठा ठेवणे. आणि ध्येय न बदलता, वाटेतल्या परिस्थितीप्रमाणे लागेल तसा मार्ग बदलणे म्हणजे नीती. या तीन्हीचे कंकण हातावर बांधणे, म्हणजे या तीन्ही गोष्टींनुसार वागायचे व्रत घेणे. व्रतस्थ होऊन म्हणजे व्रतपालन करतच, विश्वाच्या मिती म्हणजे सर्व दिशा, आम्ही व्यापून टाकू, म्हणजे सर्व दिशांना पसरू, आमच्या कामाचा विस्तार करू. या साठीच प्रबोधिनीच्या तिसऱ्या भवितव्य लेखात महाराष्ट्राशिवायच्या सहा राज्यांमध्ये प्रबोधिनीचे काम सुरू करण्याचे साध्यसूत्र मांडले आहे. हिंदुस्थानात श्रेष्ठ माणसे कशी घडतात याचे प्रात्यक्षिक आम्ही सर्व जगाला दाखवू. म्हणूनच देशभर जाण्याआधी महाराष्ट्राच्या सर्व विभागांमध्ये प्रत्येकी एक मनुष्यघडणीचे केंद्र उभारण्याचे ही आपण ठरवले आहे. श्रेष्ठ मानव घडवण्याचे हिंदुस्थानातील काम पाहून साऱ्या

आम्ही जाउच जाऊ Read More »

दीपक तू हरदम जलता जा

निरूपण – पूर्वी पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत वर्गशः पद्य गायनाच्या स्पर्धा होत असत. आजचे पद्य मी नववीत असताना आमच्या वर्गाने अशा एका स्पर्धेत म्हटलेले होते. तेव्हा आम्हाला पुणे विद्यापीठात हिंदी शिकवणारे दोन प्राध्यापक हिंदी शिकवायला यायचे. आम्ही हे पद्य म्हणतो आहोत, हे पाहिल्यावर दोघांनीही खोलात जाऊन वेगवेगळ्या प्रकारे, या पद्याचा अर्थ समजावून सांगितला होता. त्यामुळे कवीच्या मनात एक अर्थ असला, तरी आपल्याला त्या पद्यातून वेगळा अर्थ समजू शकतो, असे तेव्हाच लक्षात आले होते. दिवा किंवा दिव्याची ज्योत हा प्रकाशाचा आणि ऊर्जेचा स्रोत आहे. प्रकाश ज्ञानाचे प्रतीक आहे. तर ऊर्जा प्रेरणेचे प्रतीक आहे. भगवान बुद्धांनी ‘अत्त दीपो भव’ (आत्मदीपो भव) असे सांगितले आहे. म्हणजे स्वत:च स्वत:ला प्रकाश देणारा दीप बना. अशा  तेवत असणाऱ्या दिव्याला उद्देशून आजचे पद्य आहे. दीपक तू हरदम जलता जाजल जल आलोकित कर जगकोदूर अंधेरा तू करता जा || धृ.||          दिव्याचे रूपक अनेक वेळा केले जाते. आपल्या उपासनेतही विरजा मंत्रामध्ये आपण ‘ज्योतिरहं’, म्हणजे ‘मी दिव्याची ज्योत आहे’ असेच म्हणतो. ‘हा दिवा म्हणजे आपले प्रेरणाकेंद्र असलेला आत्मा. त्याची ज्योत प्रकाश, ऊब, तेज आणि ज्ञान यांचेही प्रतीक आहे. दिव्याला म्हणजेच आपल्याला, असे सांगितले आहे की तू हरदम किंवा प्रतिक्षण जळत राहा. तरच तुझ्यापासून निघणारा प्रकाश सगळ्या जगाला आलोकित म्हणजे सतत प्रकाशित करेल. प्रकाशाबरोबर ऊब आणि तेज म्हणजेच प्रेरणाही मिळते. स्वतःला बजावले आहे की तू सतत जळत राहा, म्हणजे साऱ्या जगाला तुझ्याकडे पाहून व तुझ्या केवळ तेवत राहण्याने, तुझ्या असण्यानेच प्रेरणा मिळेल. साऱ्यांच्या मनातला अंधार, म्हणजे अज्ञान, अगतिकता, निरुत्साह, हतबलता आणि निराशा दूर करत राहणे हेच दिव्याचे काम आहे. ते काम तू करत राहा. राजस्थानात महाराणा प्रतापसिंहाने स्वातंत्र्याच्या प्रेरणेची ज्योत तेवत ठेवली, म्हणून नंतर अनेकांना स्वातंत्र्य मिळवण्याची आठवण राहिली. त्यांच्या प्रेरणेच्या प्रकाशात त्यांचाच वंशज राजसिंहाने त्यांच्यानंतर शतकभराने मेवाडचे राज्य औरंगजेबाकडून परत मिळवले. महाराणा प्रतापने स्वत: जळून जगाला स्वातंत्र्याचा प्रकाश दाखवला, असे त्याचे पुण्यस्मरण आजही राजस्थानात करतात. जलना ही है काम दीप कापथ दिखलाना काम दीप काइससे उज्ज्वल नाम दीप कातुझपर शत शत शलभ निछावरउनकी स्मृति में तू जलता जा ।। १ ।।          शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न सुरू झाल्यापासून बाजी पासलकर, बाजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, शिवा न्हावी, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर आणि त्यांच्याबरोबरचे सहा सरदार, अशा अनेकांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यांची आठवण राज्याभिषेक होताना शिवाजी महाराजांच्या मनात जागी असणार असे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन करणाऱ्या अनेक शाहिरांनी व लेखकांनी लिहिले आहे. त्यांच्या आठवणीने आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराचे प्रयत्न राज्याभिषेकानंतरही चालू राहिले. या पद्यामध्ये दिव्याचे रूपक असल्यामुळे दिव्याला सांगितले आहे की ‘तुझ्या ज्योतीवर शेकडो शलभ म्हणजे पतंगाचे किडे झेप घेऊन आपले आयुष्य संपवतात. ते त्यांचे बलिदान लक्षात ठेवून, ते व्यर्थ जाऊ नये म्हणून, तू जळत राहिले पाहिजे.’ कारण जळत राहणे यातच दिव्याचे जीवन आहे. जो दिवा जळत राहतो त्याचीच आठवण लोक काढतात. विझून गेलेल्या दिव्याला कोणी विचारत नाही. आपले कर्तव्य पूर्ण करताना आपल्या आधी अनेकांचे आयुष्य संपले असले, तरी आपण आपले कर्तव्य करतच राहिले पाहिजे. दिवा जळत राहिल्यानेच पुढील अनेकांनाही तो सतत प्रकाश देत राहणार आहे. यासाठी आपण जगायचे आहे व प्रसंगी मृत्यूलाही सामोरे जायची तयारी ठेवली पाहिजे, याची आठवण आधीच्या बलिदानांच्या स्मरणाने तू जागी ठेवली पाहिजेस. म्हणून तू तेवत राहा. वायु तुझको विकल बनावेझंझाके झोके झपकावेवर्षा तुझे बुझाने आवेफिर भी मत कर्तव्य भूलनाकण कण जीवन बन जलता जा ।। २ ।। दिवा जळत असताना तो विझण्याचे अनेक प्रसंग येतात. कधी वाऱ्याने दिव्याची ज्योत विकल होते म्हणजे फडफडते. कधी सोसाट्याचा वारा येतो आणि त्याच्या झोताने दिवा विझून जाणार की काय असे वाटते. कधी पाऊस सुरू होतो आणि त्यामुळे दिवा आता विझतो की काय असे वाटते. तसे आपल्याही जीवनात कर्तव्य पार पाडत असताना अनेक अडचणी येतात. अनेक संकटे येतात. कधी आपले सगळे प्रयत्न वाया जातात आणि पुन्हा कामाला सुरुवात करावी लागते. दिव्याला म्हणजे आपल्यालाच सांगितले आहे की कितीही अस्मानी सुलतानी संकटे आली तरी आलेल्या संकटांपासून आपण दूर पळायचे नाही. दिव्यातील तेलाचा एक एक कण जणू काही त्याचे जीवन असते. जोपर्यंत दिव्यात तेल आहे तोपर्यंत दिवा जळत राहतो. आपणही आपली प्रेरणा सतत जागी ठेवून आपले कर्तव्य करत राहिले पाहिजे. लोकमान्य टिळकांनी ‘पुनश्च हरि ॐ’ म्हणून पहिल्या तुरुंगवासातून बाहेर आल्यावर काम सुरू करणे, मंडालेतून सुटून आल्यावर होमरूल चळवळ सुरू करणे, राजकीय कामांना बंदी होती तर सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबध्द असताना सामाजिक सुधारणांचे काम करणे, पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेले सर्व किल्ले आग्र्याहून परत आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा जिंकणे आणि चांद्रयान – २ मोहीम फसल्यावर चांद्रयान – ३  मोहीम जिद्दीने पूर्ण करणे ही सर्व कितीही अडचणी आल्या, तरी कर्तव्य विसरायचे नाही, याचीच उदाहरणे आहेत. ‘रूप पालटू देशाचे’ हेच साऱ्या प्रबोधकांचे कर्तव्य आहे आणि ते करताना ‘मी सतत तेवत राहणाऱ्या दिव्याची ज्योत आहे’ असे स्वतःला बजावत आपला प्रत्येक क्षण वापरायचा आहे. या पद्यातील दिव्याला केलेले कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन आपल्या स्वतःसाठीच आहे असे आपण जाणून घ्यायचे आहे. आपल्या  वर्षारंभ-वर्षान्ताच्या उपासनांमधील गद्य प्रार्थनेच्या शेवटी परमेश्वराला म्हटले आहे, “आमचा कणन् कण आणि क्षणन् क्षण तुझ्याच इच्छेने सार्थकी लागू देत’. ‘कण कण जीवन बन जलता जा’ या ओळीचा तोच अर्थ आहे. पद्य – दीपक तू हरदम जलता जाजल जल आलोकित कर जगकोदूर अंधेरा तू करता जा || धृ.||जलना ही है काम दीप कापथ दिखलाना काम दीप काइससे उज्ज्वल नाम दीप कातुझपर शत शत शलभ निछावरउनकी स्मृति में तू जलता जा ।। १ ।।वायु तुझको विकल बनावेझंझाके झोके झपकावेवर्षा तुझे बुझाने आवेफिर भी मत कर्तव्य भूलनाकण कण जीवन बन जलता जा ।। २ ।।

दीपक तू हरदम जलता जा Read More »

अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ : भाग – २

निरूपण – या पद्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या कडव्यात अनुक्रमे मनाच्या व प्राणशक्तीच्या विकासाबद्दल सांगितले आहे, असे आपण मागच्या भागात पाहिले. आता चवथ्या कडव्यात तपाने शुद्ध झालेल्या शरीराचे सार्थक कशात आहे, ते सांगितलेले आहे.  झिजविता झिजविता झिजवावेझिजुनि जीवनि महायश घ्यावेतनु झिजो जगती जणू चंदनमनो बनो विजयी अति पावन ||४|| शरीर या शब्दाचा अर्थच मुळी जे झिजते ते, असा आहे. आपण काही न करता सुद्धा जे झिजणारच आहे, ते चांगल्या कारणासाठी झिजवावे. पहिल्या सगळ्या कडव्यांप्रमाणेच, तीन वेळा झिजवावे म्हटलेले आहे, ते आयुष्यभर शरीर झिजवतच राहावे, यासाठी सांगितले आहे. भारतीय संतांचा आवडता दृष्टांत चंदनाच्या लाकडाचा आहे. चंदनाचे खोड सहाणेवर उगाळले की ते झिजत जाते. परंतु त्या झिजलेल्या चंदनाच्या कणांपासून जे गंध तयार होते ते शीतलता आणि सुगंध दोन्ही देते. तसे आपले शरीर परोपकाराच्या कामात सतत वापरावे म्हणजेच शरीर झिजवावे, आणि त्यातून आपल्या कीर्तीचा सुगंध आपोआप पसरत जावा.  प्रसिद्धी करावी न लागता आपली कीर्ती सगळीकडे पसरणे म्हणजेच आपल्या आयुष्यात यशस्वी किंवा विजयी होणे.  तप करून जसे आपले शरीर शुद्ध होते, तसे कर्तव्यभावनेने आणि आनंदाने इतरांच्या सेवेत शरीर झिजवण्याने, आपले मन ही अति पावन, म्हणजे अतिशय शुद्ध होते. मन शुद्ध होणे म्हणजेच इतरांशी विनाकारण स्पर्धा, इतरांचे दोष काढत बसणे, फक्त लगेचची उपयुक्तता पाहून निर्णय घेणे, इतरांच्या अस्तित्वाची दखल न घेणे, स्वार्थ आणि अहंकार असे मनातील दोष  कमी होत जाणे. मन, प्राणशक्ती, आणि शरीर यांचा खरा विकास कशात आहे हे सांगितल्यानंतर, आता पुढच्या कडव्यात बुद्धीचा विकास कशात आहे, ते सांगितले आहे.  वितरता वितरता वितरावेजनमनी विपुल ज्ञान करावेजन प्रचोदित असे घडवावेजन सुसंघटनार्थ विणावे  ||५|| सृष्टीतील रहस्ये शोधून काढणारी बुद्धी ही विकसित झालेली बुद्धी आहे. परंतु प्रबोधिनी मध्ये आपण बुद्धी कर्ती होणे, म्हणजे परिस्थितीत चांगले बदल करणारी होणे, असा बुद्धीचा विकास झाला पाहिजे असे म्हणतो. प्रबोधिनीच्या उपासनेत ‘अमुच्या बुद्धीला प्रचोदना मिळो’ अशी प्रार्थना आपण करतो. प्रचोदना मिळणे म्हणजे बुद्धीची प्रतिभा आणि प्रेरणा दोन्ही वाढणे. तपाने बुद्धीची प्रतिभा वाढते हे आधीच्या कडव्यात आलेच आहे. या कडव्यात बुद्धीला काय करण्याची प्रेरणा मिळावी, हे सांगितले आहे.  आपले ज्ञान इतरांना वाटण्याने कमी न होता वाढतेच. आपलेही वाढते आणि इतरांचे ही वाढते. त्यामुळे ज्ञानाचे वितरण किंवा वाटप अखंड करत राहायचे आहे. त्यातून लोकांमध्ये ही विपुल ज्ञान होईल, म्हणजे ज्ञान वाढत राहील. ज्ञान वाढणे हे बुद्धी विकसित झाल्याचे एक लक्षण आहे. परंतु खरी विकसित बुद्धी ही कर्ती बुद्धी झाली पाहिजे हा प्रबोधिनीचा  सिद्धांत आहे. स्वतःमधले आणि लोकांमधले ज्ञान वाढले, याचे सार्थक लोकांमधील प्रेरणा वाढल्याने होणार आहे. लोकांची प्रेरणा वाढल्यावर त्या प्रेरणेच्या बळावर लोकांमध्ये सुसंघटना झाली पाहिजे. एकत्र आलेले म्हणजेच जोडले किंवा विणले गेलेले लोक झुंडशाही किंवा विध्वंसही करू शकतात. सुसंघटनेसाठी परस्परांशी जोडले गेलेले लोक आपले राष्ट्र घडवत असतात. ‘ही हिंदुभू परम श्रेष्ठ पदास न्याया, आम्ही कृती नित करू झिजवोनि काया’, असे आपण प्रार्थनेत म्हणतो. ‘झिजवोनि काया’ शब्दांत शरीर, मन आणि बुद्धी झिजवणे हे सर्वच आले.  ज्ञानाचे वितरण करून बुद्धी झिजवयाची आहे, ती आपले राष्ट्र परम श्रेष्ठ पदावर नेण्यासाठी आणि त्याचा मार्ग समाज सुसंघटित करण्यातून जातो. पुढच्या कडव्यामध्ये सर्व प्रकारच्या संघर्षांना सामोरे जाण्याचा आप्पांचा लढाऊ बाणा व्यक्त होतो. भरडिता भरडिता भरडावेअरिजना भुइसपाट करावेहटविता हटविता हटवावेतुडविता तुडविता तुडवावे ||६|| भरडणे म्हणजे पीठ करणे किंवा चुरा करणे, जे अखंड आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करणे. अरिजन म्हणजे शत्रू. परक्यांबरोबरचा संघर्ष समजायला सोपा असतो आणि बहुतेकांना तो करणे आवश्यक आहे हे जास्त लवकर समजू शकते. १९७१ साली बांगला देश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने बांगला देशातील पाकिस्तानी सैन्याला कुठे एकत्र येऊच दिले नाही. सगळया तुकड्या वेगळ्या वेगळ्या राहिल्या आणि शेवटी ९० हजार पाकिस्तानी सैनिक भारताचे युद्धकैदी बनले. पाकिस्तानी सैन्य आपले शत्रू होते. त्यांना भरडून आपण भुईसपाट केले. पाकिस्तानी सैन्य आणि त्या बरोबर पाकिस्तानची पूर्व बंगाल मधील राजवट भुईसपाट झाली म्हणजे पूर्णपणे संपली. काही वेळा शत्रूला आपल्या प्रतिकारक्षमतेची चुणूक दाखवावी लागते. चिनी सैन्याने लडाख मध्ये गलवान नदीच्या खोऱ्यात सैन्य घुसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याने त्यांना नियंत्रण रेषेवर मागे जाणे भाग पाडले. असाच प्रकार भूतानच्या सीमेवर डोकलाम येथे ही झाला होता. दोन्ही ठिकाणी आपण शत्रूला मागे हटवले. संघर्षामध्ये काही वेळा शत्रूला मागे हटवणे पुरेसे असते. अलीकडच्या भारतीय इतिहासात कुरापती सहन केल्या जाणार नाहीत हे दाखवण्यासाठी शत्रूला तुडवून टाकण्याची आपली शक्ती दाखवावी लागली. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी उरी येथे हल्ला केला. त्याचे उत्तर म्हणून दहा दिवसांच्या आत भारतीय सैन्याच्या तुकडीने पाकव्याप्त काश्मीर मध्ये जाऊन तिथला दहशतवाद्यांचा एक तळ उद्ध्वस्त करून टाकला. तसेच दहशतवाद्यांनी पुलवामा येथे ४० जवानांचा प्राण घेतल्यावर प्रत्युत्तर म्हणून पुन्हा दहा दिवसांच्या आत पाकिस्तानात बालाकोट येथील दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र त्यातील ३५० दहशतवाद्यांसह हवाई हल्ला करून नष्ट केले. परकीयांच्या बाबतीतले भरडणे, भुईसपाट करणे, हटवणे, तुडवणे समजू शकते. पण काही वेळा अरिजन हे स्वकीयच असतात. पांडवांनी कौरवांची अकरा अक्षौहिणी सेना भरडून भुईसपाट केली. चंबळच्या खोऱ्यातील अनेक डाकू आणि दंडकारण्यातले नक्षलवादी यांना हटवत हटवत पोलिसांसमोर शस्त्र खाली ठेवून शरण जायला लावणे हाच पहिला पर्याय वापरला गेला व जातो. तो त्यांनी मानला नाही तर मग त्यांनाही तुडवावे लागते. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे, बाजी घोरपडे अशा स्वकीयांना, ते समजावून सांगून सरळ होत नाहीत, हे पाहिल्यावर तुडवूनच संपवले. परकीय आणि स्वकीय शत्रू जसे असतात तसे आपल्यातील दुर्गुण हे सुद्धा आपले शत्रूच असतात. आपल्यातील दुर्गुण नाहीसे करण्यासाठी आप्पा चार टप्पे सांगायचे. आधी स्वतःचे निरीक्षण. मग स्वतःचे परीक्षण. स्वतःमधले बरे–वाईट ठरवून त्यातले दुर्गुण दूर करणे. त्यांना हटवणे. अधिक चिवट दुर्गुणांसाठी स्वतःवर टीका करणे. म्हणजे दुर्गुणांना भरडणे. अगदीच नाठाळ दुर्गुणांसाठी नाईलाजाने स्वतःची निंदा आणि स्वतःला शिक्षा म्हणजे दुर्गुणांना तुडवणे. कामातील अडचणीही आपल्या शत्रूच. समस्यापरिहाराच्या साध्या तंत्रांनी त्या दूर झाल्या नाहीत तर जालीम उपाय करावे लागतात आणि तसे करायची तयारी आपण आयुष्यभर ठेवावी लागते हेच या कडव्यात सांगितले आहे. दुष्ट व्यक्ती किंवा कामातील अडचणी यांच्याशी विविध प्रकारे सतत संघर्ष करावा लागतो. संघर्ष करताना मन, प्राणशक्ती, शरीर आणि बुद्धी ही सर्व एकवटावी लागतात. नवनिर्माण करतानाही ही सर्व तशीच एकवटावी लागतात, हे शेवटच्या कडव्यात सांगतिले आहे.  समकृती समकृती समकार्यहृदय स्पंदन घडो मन एकविमल हेतु स्फुरो नवनीतविमल राष्ट्र घडो अभिजात ||७|| समाज संघटित करणे किंवा राष्ट्र निर्माण करणे हे एकट्या दुकट्याचे काम नाही. अनेकांनी सम म्हणजे एकसारखी कृती आधी करावी लागते. अशी समकृती करता करता, आपण सगळे एक आहोत अशी भावना सर्वांच्या मनात तयार होऊ लागते. मग सर्वांनी आपण कशासाठी संघटित झालो आहोत हा विचार समजून घ्यावा लागतो. तो विचार म्हणजे कार्य. ते ही सर्वांचे समानच असले पाहिजे. समकार्य, म्हणजेच समान उद्दिष्टासाठी, आपल्याला समान कृती करायची आहे याचा विचार सुरू झाला आणि त्या विचाराबरोबर कृती होत राहिली, म्हणजे जणू सगळ्यांच्या हृदयाचे ठोके एकाच तालात पडू लागतात. असे झाल्यावर सगळ्या समूहाचे एक सामूहिक मन सुध्दा असल्याचे सगळ्यांना जाणवायला लागते. समान कृती, समान कार्य आणि सामूहिक मन

अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ : भाग – २ Read More »

अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ : भाग – १

निरूपण – मी प्रबोधिनीत पद्य म्हणायला लागलो, त्या काळात पद्य कोणी लिहिले आहे हे विचारायची आणि सांगायची पद्धत नव्हती. पद्य गायचे असते. ते स्फूर्तीगीत तरी असते किंवा समरगीत तरी असते किंवा संचलनगीत तरी असते, आणि म्हणताना वैयक्तिक गीत असते किंवा समूहगीत असते, एवढेच पद्यांचे प्रकार माहीत असत. ‘विकसता विकसता विकसावे’ हे पद्य दहा-बारा वर्षे म्हणत होतो आणि सांगतही होतो. कैलासवासी आप्पांचे एके दिवशी पहाटे निधन झाले. संध्याकाळी त्यांच्या देहावर अग्निसंस्कार झाले. दुसऱ्या दिवशी अस्थीविसर्जनासाठी आठ-दहा जण आळंदीला गेलो होतो. अस्थीविसर्जन झाल्यावर तिथेच सर्वजण गोलाकारात बसलो होतो. कोणीतरी म्हणाले, आप्पांनी लिहिलेले पद्य म्हणूया आणि सगळ्यांनी ‘विकसता विकसता विकसावे’ हे पद्य म्हणायला सुरवात केली. प्रबोधिनीत आल्यावर चौदा वर्षांनी मला कळले की हे पद्य आप्पांनी लिहिलेले होते. विकसता विकसता विकसावेघडविता घडविता घडवावेमिळविता मिळविता मिळवावेविजय प्राप्त असे तळपावे ||१|| प्रबोधिनीचे काम काय? त्याचेच वर्णन पहिल्या कडव्यापासून सुरू होते. प्रत्येक क्रियापद तीन-तीन वेळा आले आहे. प्रत्येक क्रिया सतत अखंडपणे चालू ठेवायची आहे हे सुचविण्यासाठी तसे केले आहे. आधी स्वतःचा विकास आयुष्यभर करत राहायचे. ‘माझे शिकणे संपले किंवा माझा आणखी विकास होणे शक्य नाही’ असे कधीही म्हणायचे नाही. स्वतःचा विकास करता करता काय करायचे? तर, घडवायचे. म्हणजे सतत उत्तम नवनिर्मिती करत राहायची आणि इतरांना घडवायचे. म्हणजे इतरांच्या विकासात त्यांना मदत करायची. त्यांनाही ‘माझे शिक्षण संपले किंवा माझा आणखी विकास शक्य नाही’ असे कधी म्हणू द्यायचे नाही. स्वतःच्या विकासाला, नवनिर्मिती करायला आणि इतरांच्या विकासात मदत करायला अनेक प्रकारची साधन सामग्री लागते. संपत्ती लागते, तंत्रज्ञान लागते आणि विविध कला, शास्त्रे आणि विद्या यांचे ज्ञानही लागते. या तीनही गोष्टी सतत नवीन नवीन आणि अधिकाधिक मिळवत राहायच्या. असा सातत्याने आयुष्यभर चालणारा स्वतःचा विकास करणे,  इतरांना घडायला मदत करणे आणि साधन सामग्री मिळवत राहून कामे घडवणे, हे जो करतो, त्याचा चेहरा तळपतो म्हणजे त्यावर तेज दिसते. त्याच्या वागण्या-बोलण्यात आत्मविश्वास दिसतो. आणि कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची आकांक्षा त्याच्या डोळ्यांमध्ये दिसते. असे आपले व्यक्तिमत्त्व होण्यासाठी काय काय करायचे हे पुढच्या कडव्यांमध्ये सांगितले आहे. मन विशाल समृद्ध करावेमन प्रफुल्ल सदाचि हसावेमन विवेकबळे उमलावेमन त्वरे जनपदी रमवावे ||२|| व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंच्या वर्णनाला इथे मानसिक विकसनापासून सुरुवात केली आहे. कारण पहिल्या कडव्यातील कृतीचे सातत्य, विजयाकांक्षा आणि तेज हे मुख्यतः मनाचे गुण आहेत. ‘मिळविता मिळविता मिळवावे’ हे कशासाठी? तर मन विशाल आणि समृद्ध व्हावे ह्यासाठी. ‘हे विश्वचि माझे घर’ किंवा ‘वसुधैव कुटुंबकम्’ असे वाटणे म्हणजे मन भावनेने विशाल करणे. पण विश्वामध्ये जे जे आहे ते ते जाणून घेतले पाहिजे, असे कुतूहल किंवा जिज्ञासाही मनात सतत जागी असली पाहिजे. कोणत्या विश्वाला आपले घर म्हणायचे आहे, ते विश्व जाणून घेण्यासाठी, मन विशाल करावे लागते. दर्शन आणि आह्वान (Exposure and challenge) ही प्रबोधिनीच्या शिक्षणाची सूत्रे आहेत असे आप्पा म्हणायचे. नवनवीन अनुभवांना सामोरे जाणे, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मुद्दाम ठरवून घेणे, म्हणजे मनाला विश्वातील विविधतेचे दर्शन घडवणे (exposure देणे). पूर्वी, “केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार”, अशा भाषेत हेच सांगायचे. ह्यामुळे मन समृद्ध होते. समृद्धी म्हणजे अनुभवांच्या श्रीमंतीची भरभराट. भरभराट होणे म्हणजे, सतत भर पडत राहणे. असे होण्याला समृद्धी असे म्हणतात. मन विशाल व समृद्ध करण्याच्या नादात काहीवेळा चेहऱ्यावर ‘करीनच करीन’ अशी त्वेषाची आणि एकाग्रतेची भावना दिसायला लागते. असा चेहरा पाहून इतरांना आपल्यापासून अंतर ठेवावेसे वाटते. त्यामुळे या त्वेष आणि एकाग्रतेबरोबर मन प्रफुल्ल असावे, असे म्हटले आहे. म्हणजे जे मिळालेले आहे त्याचा आनंद मानणारे असावे. आणि तो आनंद चेहऱ्यावरच्या स्मित हास्याने सदैव दिसत राहावा असे मुद्दाम सांगितले आहे. ‘आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे’ असे म्हटले जाते. आहे तितक्याचा आनंद हा चेहऱ्यावरच्या हास्यातून कळला पाहिजे. तर आणखी विशाल आणि समृद्ध होण्याची इच्छा मनाच्या आतमध्येच राहिलेली चालेल. आहे त्याचे समाधान, आणि मिळवायचे आहे त्याबाबतचे असमाधान, याचा समतोल राखता येणे, ह्यालाच विवेक करणे असे म्हणतात. समाधानचे हास्य आणि असमाधानाचा त्वेष यांच्या समतोलाला, ‘मन विवेकबळे उमलावे’ असे म्हटले आहे. काय करावे व काय करू नये, काय धरावे व काय सोडून द्यावे, कशाच्या मागे पळावे आणि कशाकडे दुर्लक्ष करावे, ह्याची निवड करता येणे म्हणजेच विवेकाचे बळ आपल्याला मिळणे. या बळामुळे समाधान आणि असमाधान असे दोन्ही मनात मावू शकले की मग मन प्रफुल्ल झाले, विशाल आणि समृद्ध झाले, असे होते. असे विशाल, समृद्ध, प्रफुल्ल आणि विवेकाने उमललेले म्हणजे विकसित झालेले मन, ‘त्वरे’ म्हणजे अतिशय वेगाने लोकांचे हित करण्यात गुंतवावे, असे चौथ्या ओळीत सांगितले आहे. पंढरपूरला पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायावर डोके ठेवले म्हणजे यात्रा सफल झाली असे मानतात. आपला पांडुरंग म्हणजे आपले राष्ट्र, आपला समाज, या समाजातील सर्व लोक. त्यांच्या पायावर डोके ठेवणे, म्हणजे आपले सर्व विजय व मनाची सर्व श्रीमंती त्यांच्या हितासाठी उपयोगी आणणे. यालाच ‘मन जनपदी रमवावे’ असे म्हटले आहे. जनपदी म्हणजे लोकांच्या हितासाठी. रमवावे म्हणजे त्याचेच चिंतन करण्यात, त्याचाच विचार करण्यात, त्यासाठीच काम करण्यात आनंद मानणे. तपविता तपविता तपवावेतपपुनीत शरीर करावेतपवुनी प्रतिभे उजळावेतपगुणे मन मना मिळवावे ||३||             कोणाचीही कुशाग्र बुद्धी, विशाल मन आणि बळकट शरीर ह्याचा उपयोग कुठपर्यंत होतो? तर शरीरात प्राण असेपर्यंत. प्राण आहेत तो पर्यंत शरीर, मन, बुद्धीच्या सर्व गुणांचे सामर्थ्य आहे आणि त्यांना अर्थ आहे. असलेली प्राणशक्ती चांगल्या रितीने वापरण्यासाठी, तिचा विकास करण्यासाठी, तप हे साधन आपल्याकडे सांगितले आहे. आपल्याकडे जी काही क्षमता आहे त्यापेक्षा थोडे अधिकचे उद्दिष्ट ठेवून, त्यासाठी धडपडणे म्हणजे तप करणे. या धडपडीचा त्रास वाटून न घेता ती आनंदाने सहन करणे म्हणजे तप. तपाशिवाय प्रगती नाही. आणि ‘तपविता तपविता तपवावे’ म्हणजे आयुष्यभर सतत कुठले तरी उद्दिष्ट गाठण्यासाठीचा प्रयत्न करत राहणे. प्राण तर आपल्याला दिसत नाहीत, ते आपल्याला फक्त जाणवतात. तपाने सबल व सक्रिय झालेल्या प्राणाचा परिणाम आपल्या शरीर, मन व बुद्धीवर झालेला दिसतो. तपाने काय होते? तर शरीर पुनीत होते, म्हणजे शुद्ध होते. शुद्ध शरीर म्हणजे निरोगी, आरोग्यसंपन्न, सामर्थ्यसंपन्न, चपळ, लवचिक, सहनशक्ती असलेले, असे शरीर होय. तपाने आणखी काय  होते? तर बुद्धीमध्ये प्रतिभाशक्ती वाढू लागते. सतत नवनवीन कल्पना, कामाच्या नवीन शक्यता, कर्तृत्वाची नवीन क्षितिजे, आपल्याला दिसायला लागली, म्हणजे बुद्धी प्रतिभेने उजळून निघाली. सूर्योदय झाल्यावर सर्व दिशांना प्रकाश पडतो, म्हणजे सर्व दिशा उजळतात. तसेच बुद्धीमध्ये प्रतिभा उजळली की आपल्या सगळ्या प्रयत्नांना, कामांना नाविन्याचा प्रकाश मिळतो. तपाने आणखी काय झाले पाहिजे? पुराणातल्या अनेक गोष्टींमध्ये तपस्वी ऋषी एवढ्या तेवढ्या कारणांनी रागावून जाऊन लोकांना शाप देतात असे वाचायला मिळते. तप हाताबाहेर गेल्याचे किंवा त्यावर नियंत्रण न राहिल्याचे हे परिणाम आहेत. तप नियंत्रणात राहिले, म्हणजे आपले मन इतरांमधील त्रुटी न पाहता त्यांच्यातले गुण पाहू लागते, आणि त्या गुणांसाठी त्यांच्याशी मैत्री करावी असे वाटू लागते. तप नियंत्रणात राहिले म्हणजे आपली संवेदनशीलता वाढून इतरांच्या अडचणी त्यांनी न सांगताच लक्षात येऊ लागतात. त्या दूर करण्याला आपण सहज प्रवृत्त होतो. इतरांच्या यशाचा आनंद वाटायला  लागतो. आणि इतरांच्या उपयोगी पडताना स्वतःला होणाऱ्या कष्टांकडे आपण दुर्लक्ष करू लागतो. ‘तपगुणे

अपेक्षा- ‘विकसता विकसता विकसावे’ : भाग – १ Read More »