प्रकट चिंतन

११. नव्या पर्वासाठी राष्ट्रजीवनाची पुनर्मांडणी

राष्ट्र पुन्हा उभविणे : देशजीवनाच्या विविध क्षेत्रांत आवश्यकतेप्रमाणे नेतृत्वाची जबाबदारी घेतील असे कार्यकर्ते घडवणाऱ्या शिक्षण-प्रणालीची निर्मिती करणे व ती वापरात आणणे हे प्रबोधिनीच्या घटनेतील पहिल्या सहा परिच्छेदांचे सार आहे. ते प्रबोधिनीचे सर्वात नजिकचे उद्दिष्ट आहे. नेतृत्व विकसन व शिक्षणप्रणालीची निर्मिती ज्यासाठी करायची ती पुढची सर्व उद्दिष्टे ‘स्वदेशात विचार प्रबोधन व कार्य प्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, येथे पुनरुज्जीवन होऊन देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे असा हेतू आहे’, या एकाच वाक्यात घटनेच्या सातव्या परिच्छेदात एकत्र मांडली आहेत. कार्य प्रबोधन आणि विचार प्रबोधन समाजात जेवढ्या प्रमाणात होत जाईल तेवढ्या प्रमाणात देशाचा कायापालट होत जातो. परंतु कार्य व विचार प्रबोधनाचे सातत्य कार्यकर्त्यांची मने घडण्यावर अवलंबून असते. कार्यकर्त्यांची मने घडविणारी शिक्षण-प्रणाली निर्दोष करत जाणे व मने घडत असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वंकष नेतृत्वाचे गुण विकसित करणे यातून कार्य व विचार प्रबोधनाच्या उद्दिष्टाकडे वाटचाल होणार आहे. कार्य प्रबोधन व्हावे : कृतिशीलता, उपक्रमशीलता, व्यवहारातील प्रश्न सोडवणे, कामाचा पसारा वाढवणे, आव्हाने स्वीकारणे, कामाच्या पद्धती बसवणे, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ अशी उदाहरणे घालून देणे व असे वातावरण तयार करणे, ‘असाध्य ते साध्य करिता सायास’ असे कर्तृत्वाचे मानदंड तयार करणे आणि जो जो वरीलपैकी काहीही स्वतःच्या आयुष्यात करू इच्छित असेल त्याला मदत करणे हे सर्व म्हणजे कार्य प्रबोधन. ‘आपण करावे, करवावे’ हे सूत्र ज्यांनी आपल्या आयुष्याचे मार्गदर्शक सूत्र केले आहे तेच, कार्य प्रबोधन म्हणजे काहीतरी करावे अशी प्रेरणा जागविणे व त्याला अनुकूल वृत्ती घडविणे असे करू शकतील. एखाद्या नेत्याने त्याच्या प्रदेशातील प्रशासन कसे गतिशील केले हे त्यांच्याच शब्दात वाचले की वाचणाऱ्याच्या मनात कार्य प्रबोधन होते. ‘कथा इस्रोची’ तिच्या लेखकाच्या तोंडून ऐकली की ऐकणाऱ्याच्या मनात कार्य प्रबोधन होते. ‘अमूल’ डेअरी कशी उभी केली यावरचा मंथन हा चित्रपट पाहिला की कार्य प्रबोधन होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या संयोजनात आठवडाभर काम केले की कार्य प्रबोधन होते. चित्रकूट प्रकल्पाच्या उभारणीची कथा ऐकली की कार्य प्रबोधन होते. डांग जिल्ह्यातील शबरी कुंभाच्या पूर्वतयारीची चित्रफीत पाहिली की कार्य प्रबोधन होते. प्रबोधिनीतील आपल्याहून जास्त अनुभवी कार्यकर्त्यांबरोबर काही दिवस काम केले, की कार्य प्रबोधन होते. कार्य प्रबोधनाची एकदा पेटलेली ज्योत पेटती राहायची असेल तर विचार प्रबोधनाचा प्राणवायू लागतो आणि कार्यकर्ता म्हणून घडलेल्या मनाचे इंधनही लागते. विचार-प्रबोधन व्हावे : देशाच्या काया-पालटासाठी लोकांची कार्यसंस्कृती बदलावी लागते. काय काम करायचे, कसे करायचे, का करायचे, काम चांगले झाल्याचे निकष काय, यासंबंधी लोक स्वतः जाणीवपूर्वक विचार करू लागले, इतरांचे विचार तावून-सुलाखून घेऊ लागले, व त्या प्रमाणे वागू लागले म्हणजे विचार-प्रबोधन झाले. एकोणिसाव्या शतकात राजा राम मोहन राय, महात्मा फुले यांनी विचार-प्रबोधन केले. केरळात नारायण गुरूंनी, महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, गाडगे महाराज यांनी विचार प्रबोधन केले. स्वातंत्र्योत्तर काळात बाबा आमटेंनी युवकांसाठी विचार प्रबोधन केले. नवनिर्माण चळवळीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी विचार प्रबोधन केले. जगातील सर्वात मोठी कामगार संघटना उभारताना दत्तोपंत्त ठेंगडी यांनी विचार प्रबोधन केले. केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या शेकडो सदस्यांनी केरळात वैज्ञानिक विचार पद्धतीचे प्रबोधन केले. सुंदरलाल बहुगुणांनी उत्तरांचलात पर्यावरणविषयक विचार-प्रबोधन केले. काहीतरी कृतीसह विचार प्रबोधन करणे आणि अनेकांनी संघटितपणे विचार प्रबोधन करणे असे दोन नवीन प्रवाह स्वातंत्र्योत्तर काळात दिसतात. एका विचारसुत्राचे किंवा एखाद्या विचारसरणीचे महत्त्व ठसवून विचार प्रबोधन करण्याची रीत दिसते. आपण न्याय प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहोत. समता प्रस्थापित करण्यासाठी काम करत आहोत, समृद्धीसाठी काम करत आहोत. बुद्धीचे प्राधान्य मानून काम करत आहोत, व्यक्तीची प्रतिष्ठा वाढावी म्हणून काम करत आहोत, वैज्ञानिक जाणीव वाढावी यासाठी काम करत आहोत, प्रयत्नबादाचे महत्त्व ठसवण्यासाठी काम करत आहोत, बंधुभाव वाढवण्यासाठी काम करत आहोत असे वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्या कामाला विशिष्ट विचाराचा आधार असल्याचे लोक सांगत असतात. हे सगळे उद्देश एखाद्या राजकीय-आर्थिक-सामाजिक विचारसरणीतून आलेले असतात. सगळ्याच विचारसरणींतून ग्राह्यांश घ्यावा व कामाला विवेकयुक्त विचारांचा आधार द्यावा हे विचार प्रबोधन आहे. देशाचा कायापालट व्हावा, येथे पुनरुज्जीवन व्हावे, देशात आणि लोक मानसात नवचैतन्य निर्माण व्हावे ही सर्व याहून दीर्घ पल्ल्याची उद्दिष्टे आहेत. ती समजून घेण्यासाठी स्वाध्याय, उपासना, स्वतःचे चिंतन आणि समकृती व समकार्य असणाऱ्यांशी संवाद यांचा उपयोग होतो. त्यामुळे घटनेतील उद्देशांच्या एकेका परिच्छेदाविषयी प्रकट चिंतन येथे संपवतो. ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.७ नेतृत्व-विकसन, शिक्षणप्रणालीची निर्मिती इत्यादी वर ग्रथित केलेल्या उद्देशांच्या मुळाशी स्वदेशात विचारप्रबोधन व कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, येथे पुनरुज्जीवन होऊन देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे असा हेतू आहे. तो साध्य होईल अशा त-हेचे कार्य घडविणे.

११. नव्या पर्वासाठी राष्ट्रजीवनाची पुनर्मांडणी Read More »

१०. आयुष्यभर राष्ट्राघडणीच्या कामाची प्रेरणा

कृतज्ञता बुद्धी आणि जाणती कार्यशक्ती : दोन-चार बौद्धिक कसोट्यांवर उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे, त्यांनी दोन-चार सार्वत्रिक परीक्षा व स्पर्धा परीक्षांमध्ये उच्च यश मिळविण्यासाठी, व त्यांना चार-दोन लक्षवेधक प्रकल्प करता येण्यासाठी, चार-सहा वर्षे शिक्षण योजणे ही प्रबोधिनीच्या कामाची अगदी सुरुवातीची पायरी होती. प्रबोधिनीच्या घटनेच्या सहाव्या परिच्छेदात विद्यार्थ्यांचे प्रबोधिनीशी निर्माण झालेले विद्याव्रताचे नाते आयुष्यभराचे ठरावे असे उद्दिष्ट मांडले आहे. ते वरील सुरुवातीच्या पायरीच्या पलीकडे बरचे काही करायचे आहे, हे दर्शविते. प्रबोधिनीशी विद्याव्रताचे नाते आयुष्यभर का राहावे? व्यक्तिमत्त्व विकासाचा परिच्छेद समजून घेताना आपण पाहिले की व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंच्या विकासाचा परिणाम म्हणून स्वतःवरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव मनात सतत स्फुरणे अपेक्षित आहे. हा राष्ट्रीय स्फूर्तीचा झरा केवळ कृतज्ञता बुद्धीतूनच स्फुरावा का? कोणताही झरा वाहता राहायचा असेल तर आतून पाण्याचा दाब लागतो. बाहेर पाणी वाहत जाण्यासाठी मोकळी जागा लागते. प्रबोधिनी हा विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्फूर्तीचा झरा ठरावा या उद्देशाच्या पूर्तीकरता विद्यार्थिदशेत कृतज्ञता बुद्धी विकसित होऊन राष्ट्रीय ऋणाची जाणीव व्हायला पाहिजे. ही जाणीव म्हणजे वाहत्या झऱ्याच्या आतला पाण्याचा दाब आहे. परंतु विद्यार्थिदशेत आणि त्यानंतरही सामाजिक व राष्ट्रीय कृतज्ञता व्यक्त करण्याच्या बरोबर कर्तृत्वाच्या संधीही दिसल्या पाहिजेत. जाणत्या कार्यशक्तीचे प्रकटीकरण राष्ट्ररचनेसाठी करण्याचे मार्ग दिसले पाहिजेत. कृतज्ञताबुद्धी आणि जाणती कार्यशक्ती पूर्ण विकसित असेल तर राष्ट्रीय स्फूर्ती आपोआप प्रवाहित होईल. विद्यार्थि-दशा संपताना कृतज्ञता बुद्धी असेल आणि जाणती कार्यशक्ती अजून विकसित होत असेल तर झऱ्याचे तोंड दुसऱ्या कोणीतरी मोकळे करायला लागेल. म्हणजेच कार्याचे क्षेत्र व जाणत्या कार्यशक्तीच्या प्रकटीकरणाचा मार्ग दाखवावा लागेल. कार्यशक्ती प्रकट करण्याची क्षेत्रे : प्रबोधिनीच्या घटनेतील उद्देशांनंतर येणारे उपक्रमांचे सर्व परिच्छेद अशी कार्यक्षेत्रे दाखवणारे आहेत. त्यातले कोणतेच काम शालेय स्तरावरचे विद्यार्थी पूर्णतः करू शकतील असे नाही. त्यातली अनेक क्षेत्रे शालेय विद्यार्थ्यांशी संबंध येतील अशी ही नाहीत. शालेय व महाविद्यालयीन दशा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर कोणत्या प्रकारच्या कामातून आपली कृतज्ञताबुद्धी व जाणती कार्यशक्ती प्रकट करत मातृभूमी या दैवताची पूजा करायची आहे हे या परिच्छेदांतून मांडले आहे. उपक्रमांचे सर्व परिच्छेद (पृष्ठ ४४ ते ४६) पाहिले तर त्यात १) व्यापार, उद्योगधंदा, कारखानदारी आणि शेती-बागाईत, २) ग्रामीण व शहरी जनतेच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उन्नतीचे प्रकल्प, ३) आरोग्य आणि वैद्यकी विषयक प्रकल्प, ४) स्थापत्य, मास कम्युनिकेशन, संगणक शास्त्र, संदेशवहन शास्त्र, सायबरनेटिक्स इ. शास्त्रे, ५) वाङ्मय प्रकाशन, युवक-युवती कार्य, क्रीडाकेंद्रांचे संचालन, अनौपचारिक शिक्षण, राष्ट्रीय अथवा सामाजिक ऐक्याचे उपक्रम आणि सामाजिक समतेचे उपक्रम, ६) विविध विद्याशाखांचा शास्त्रीय, तात्विक आणि तांत्रिक अभ्यास व संशोधन, ७) भारतातील व भारताबाहेरील शिक्षण व संशोधन संस्था, औद्योगिक व शेतकी संस्था, धार्मिक व सामाजिक संस्था, बँका व विमा कंपन्या, नाविक कंपन्या, सरकारी, खाजगी व निमसरकारी संस्था यांच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारे काम करणे, ८) व्याख्यानमाला, चर्चासत्रे, व नियतकालिके चालवणे, ९) पुस्तके व पत्रके काढणे, १०) व्यवसाय मार्गदर्शन व व्यवसाय माहिती केंद्रे चालवणे; अशी अनेक कार्यक्षेत्रे नमुन्यादाखल सुचविली आहेत. वरील सर्व कार्यक्षेत्रे ही कर्तृत्वाची क्षितिजे आहेत. या क्षितिजांपर्यंत दौडत जाण्याचा उत्साह प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा, विद्यार्थिदशेनंतरही तो टिकावा आणि वाढावा, हे प्रबोधिनीचे काम आहे. यासाठी अशा विद्यार्थ्यांचा परस्परांशी, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी, त्या त्या क्षेत्रात नव्या वाटा निर्माण करणाऱ्या प्रतिभावंतांशी संपर्क वा संवाद वाढावा, अशी तंत्रे व पद्धती विकसित करणे हे आयुष्यभर चालणाऱ्या शिक्षणाचे काम आहे. यातूनच शालेय वयात निर्माण झालेले विद्याव्रताचे नाते आयुष्यभर टिकेल. स्फुरणाने प्रारंभ, प्रेरणेने सातत्य : प्रबोधिनीत शिकत असताना स्वतः वरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव ज्याला झाली आणि देशासाठी पराक्रम करण्याची परिस्थितीने घातलेली साद ज्याला कळली त्याच्यासाठी प्रबोधिनी हा राष्ट्रीय स्फूर्तीचा झरा झाला. एकदा झरा मोकळा झाला की तो वाहत वाहत समुद्रापर्यंत जायला पाहिजे. देशासाठी पराक्रम करण्याची क्षितिजे खुणावू लागली की त्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणाही टिकून राहिली पाहिजे. लहान वयातील राष्ट्रीय स्फूर्तीला स्वार्थाचा स्पर्श झालेला नसतो. तिच्यामध्ये सहज किंवा उपजत निःस्वार्थता असते. औपचारिक शिक्षणाचे वय संपले आणि धकाधकीच्या व्यावहारिक जीवनात उतरले की आजूबाजूच्या लोकांच्या मनातील स्वार्थाचा संसर्ग होतो. संसर्गाने निर्माण होणारा स्वार्थ व त्यातून उत्पन्न होणारे स्पर्धा, असूया, अहंता, मत्सर असे विकार यांना तोंड देऊन लहान वयातील उपजत निःस्वार्थतेचे रूपांतर स्वकष्टार्जित निःस्वार्थतेत करावे लागते. देशाच्या सेवेत अखंड राहता यावे यासाठी अशा निःस्वार्थ सेवारत लोकांकडून प्रेरणा घेण्याचे आणि स्वतः मध्येच प्रेरणेचा स्रोत शोधण्याचे काम करावे लागते. राष्ट्रीय ऋणाची जाणीव होणे, सारे कर्तृत्व राष्ट्राला वाहिलेले जीवन जगावेसे वाटणे आणि राष्ट्रार्थ म्हणजेच निःस्वार्थ कामाचे सातत्य राखता येणे हे टप्पे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या वयात येऊ शकतात. त्यामुळे सर्व वयांसाठी म्हणजे आयुष्यभरासाठी राष्ट्रघडणीची वाटचाल करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात उत्पन्न व्हावी यासाठी आवश्यक अशा कल्पना व तंत्रे उदित करणे हा प्रबोधिनीच्या कामाचा उद्देश आहे. हे दीर्घ काळाचे काम आहे. यातले काही थोडे प्रयोग आजपर्यंत करून झाले आहेत. ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.६ प्रबोधिनीतील विद्याव्रताचे नाते हे अल्पकालीन असणार नाही. शक्य झाल्यास हे नाते आयुष्यभराचे ठरावे अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या केवळ शालेय शिक्षणाच्या कालावधीतच नव्हे, तर त्यांच्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणकालात आणि तदनंतरदेखील प्रबोधिनी हा त्यांच्या राष्ट्रीय स्फूर्तीचा झरा ठरावा आणि त्यातून राष्ट्रघडणीची वाटचाल करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात उत्पन्न व्हावी अशी अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक अशा कल्पना आणि तंत्रे उदित करणे.

१०. आयुष्यभर राष्ट्राघडणीच्या कामाची प्रेरणा Read More »

९. अभ्यास, प्रयोग आणि प्रतिभेतून शिक्षणप्रणालीची निर्मिती

स्वीकार, रूपांतर आणि प्रतिभा : प्रबोधिनीत रूढ असलेल्या दैनंदिन उपासनेची रचना हळूहळू विकसित होत गेली आहे. तिच्यामधले विरजा मंत्र थिऑसॉफिकल सोसायटीच्या प्रार्थनेतून घेतले आहेत. सामूहिक उपासना करण्याची पद्धत गांधीजींच्या आश्रम-प्रार्थनेच्या प्रभावामुळे स्वीकारली आहे. या स्वीकारशीलतेबरोबरच गायत्री मंत्राबरोबर उच्चारायच्या सात व्याहृती म्हणजे जणू सप्तलोक असा अर्थ नवीन दृष्टीने मांडून विचाराची वेगळी दिशा दाखविली आहे. अशा सर्व प्रयोगांनंतर उपासनेतील सामाजिक आशय कमी वाटला म्हणून कै. आप्पांनी स्वतःला स्फुरलेल्या शक्ती मंत्रांची भर त्यात घातली. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बाहेरून स्वीकारणे, असलेल्याचे रूपांतर करणे व आपल्या प्रतिभेने भर घालणे या तीनही पद्धती वापराव्या लागतात आणि त्या वापरल्या पाहिजेत. उपासनेप्रमाणे शिक्षण पद्धतीतही : सैन्यातल्या अधिकाऱ्यांसाठी चालणाऱ्या वाचन-वेगाच्या वर्गातून प्रबोधिनीत वाचन कौशल्यांचे संशोधन व प्रशिक्षण सुरू झाले. टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरमधले समस्या परिहाराचे वर्ग पाहून प्रश्न विचारणे, सामुदायिक समस्या परिहार, कल्पनास्फोट, इ. तंत्रे प्रबोधिनीत आली. प्रकल्प-पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दोन अध्यापिका ब्रिटिश कौन्सिलची शिष्यवृत्ती घेऊन सहा-सहा महिने इंग्लंडला जाऊन आल्या. बर्चीनृत्य हे लेझिमच्या प्रकारांमध्ये केलेले आमूलाग्र रूपांतर आहे. वर्षारंभ, वर्षान्त, विद्याव्रत हे अनुक्रमे प्राचीन उपाकर्म, उत्सर्जन आणि उपनयन या संस्कारांचे आधुनिक रूपांतर आहे. अनेक ठिकाणची तंत्रे शोधून स्वयं-अध्ययन कौशल्यांचा अभ्यासक्रम आपल्या सोयीने आपण बनवला आहे. परिस्थिती ज्ञानाचे तास, गटकार्यांचा अभ्यासक्रम, निर्णय कौशल्यांचे संशोधन, प्रतिभा विकसनाचे अभ्यासक्रम, पुण्यातील इयत्ता सातवीसाठीची शिष्यवृत्ती योजना, सोलापूरची विद्याव्रत शिबिरे, निगडीतील देह-परिचय उपक्रम, हराळीची समाज-संपर्क अभियाने, साळुंब्यातील पवनामाईचा उत्सव हे सर्व प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रतिभेने फुलवलेले उपक्रम आहेत. प्रयोगातून उद्देशाचा अर्थविस्तार : परिच्छेद ३.४ मध्ये दिलेल्या चारित्र्य-गुणांचा विचार करताना आपण संघटन-चातुर्य हा एक गुण पाहिला. त्यामध्ये कै. आप्पांनी मांडलेले बुद्धीचे दहा पैलू दिले आहेत. परंतु गिल्फर्ड या मानसशास्त्रज्ञाने बुद्धीचे १२० पैलू सांगितले होते. १९८२ ते १९९२ या काळात प्रबोधिनीमध्ये त्यावर संशोधन होऊन त्यातील प्रत्येक पैलू स्वतंत्रपणे मोजणाऱ्या १२० चाचण्या तयार झाल्या. या चाचण्या प्रमाणित करण्यासाठी त्या महाराष्ट्रात एकूण सुमारे २५००० विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यातून असे लक्षात आले की बऱ्याच जणांच्या बुद्धीचा कोणता तरी पैलू सरासरीपेक्षा अधिक विकसित असतो. त्यामुळे ‘कुशाग्र बुद्धीचे कोण?’ या ऐवजी ‘प्रत्येकाच्या बुद्धीचा कोणता पैलू कुशाग्र आहे?’ असा प्रश्न विचारायला पाहिजे हे लक्षात आले. अर्थातच १९९२ नंतर या संशोधनाच्या आधारे प्रबोधिनीचे विद्यार्थी-निवडीचे क्षेत्र ‘रूढार्थाने बुद्धिमान विद्यार्थी शोधणे’ या ऐवजी ‘सर्व समाजातील बुद्धिमत्ता शोधणे’ असे झाले. प्रबोधिनी : एक प्रयोगभूमी : १९६२ ते १९९२ या तीस वर्षांत सर्वांगीण शिक्षणातल्या अनेक अभिनव कल्पना प्रबोधिनीत आकाराला आल्या. १९९२ नंतरच्या पंधरा वर्षांत मात्र ‘सर्व समाजातील प्रत्येकाच्या बुद्धीचे कुशाग्र पैलू शोधणे’ अशा विस्तारित अर्थाच्या उद्देशाने नवे प्रकल्प सुरू झाले. नवे प्रकल्प, योजना आणि विभाग : १) छात्र प्रबोधन मासिक व २) स्पर्धा परीक्षा केंद्र हे नव्याने निर्माण झालेले विभाग आहेत. मासिकाद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क प्रस्थापित करून शिबिरे, सहली व प्रशिक्षण वर्ग यांतून विद्यार्थ्यांची कौशल्ये व प्रेरणा वाढवणारे शिक्षण देणे हा छात्र प्रबोधन मासिकाचा हेतू होता. स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण हा प्रबोधिनीच्या घटनेत लिहिलेलाच उपक्रम आहे. स्वयंअध्ययन कौशल्ये, गटचर्चा आणि मौनाभ्यास ही अभ्यासाची तंत्रे व वृत्ति-घडणीसाठी उपासना, मुलाखती, अभ्यास सहली आणि शिबिरे यांचा, विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात येतील त्या प्रमाणे, सुयोग्य मेळ घालत स्पर्धा परीक्षा केंद्र दृढ होत गेले. त्याचप्रमाणे ३) साखरशाळा, ४) ग्रामीण प्रज्ञा विकास योजना व५) किशोरी विकास योजना हे तीनही नवीन कृति संशोधनाचे उपक्रम आहेत. व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारे शिक्षण ज्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही असे गट शोधून काढून त्यांच्यासाठी हे प्रकल्प सुरू झाले. साखरशाळा प्रकल्पातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालेच परंतु त्याशिवाय प्रशिक्षण सााहित्य, प्रशिक्षण वर्गाचा अभ्यासक्रम व पद्धती, शैक्षणिक साहित्याची निर्मिती असेही मोठे काम झाले. प्रज्ञा मानस संशोधिकेमध्ये ६) बाल प्रज्ञा विकास प्रकल्प व ७) बाल-युवक व्यक्तिमत्त्व विकास प्रकल्प गेल्या काही वर्षांत झाले. या दोन्ही प्रकल्पातून वेगवेगळ्या वयोगटांसाठी शाळा-महाविद्यालयांच्या वेळा सोडून साप्ताहिक किंवा मोठ्या सुट्ट्यांमध्ये घेता येतील असे प्रशिक्षण वर्गांचे आराखडे तयार झाले. चालू विभागांचा विस्तार : प्रबोधिनीच्या निगडी केंद्रामध्ये सुरू झालेले ८) क्रीडाकुल तसेच ९) पंचकोशाधारित गुरुकुल हेही कृति-संशोधनाचे दीर्घकालीन प्रकल्प आहेत. दीर्घकालीन प्रकल्पासाठी आवश्यक अशी भौतिक रचनाही त्यासाठी उभी राहिली आहे. क्रीडाकुलाला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारे खेळाडू तयार करणे, असे नेमके उद्दिष्ट आहे. आत्तापर्यंत उल्लेखिलेल्या पहिल्या आठ उपक्रमांमध्ये शारीरिक, भावनिक, बौद्धिक, प्रेरणात्मक, सामाजिक किंवा कौशल्यात्मक अशा व्यक्तिमत्त्वाच्या सुट्यासुट्या अंगांचा विचार केला आहे. या उपक्रमांमध्ये योजना करताना दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्त्वाचे पैलू पंचकोशाधारित गुरुकुलाच्या उपक्रमांमध्ये सहज लक्षात येतात. व्यक्तिविकसनासाठी सुयोग्य अशी शैक्षणिक पद्धत शोधण्यासाठी आणि व्यवहारात आणण्यासाठी अ) जगातील प्रगत देशांच्या शैक्षणिक कल्पना व प्रणाली यांचा अद्ययावत अभ्यास करणे, आ) भारताच्या दृष्टीने त्यातील योग्य ते स्वीकारणे आणि इ) प्रयोगशील राहून आपल्या प्रतिभेतून आपली प्रणाली निर्माण करणे व ती निर्दोष करणे हा प्रबोधिनीच्या घटनेतील उद्दिष्टांचा पाचवा परिच्छेद आहे. त्यातील न) व आ) हे भाग आपण फारसे जाणीवपूर्वक अजून केलेले नाहीत. इ) हा भाग मात्र सदैव करत असतो. ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.५ प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित अशी गुणसंपदा निर्माण होण्यासाठी, म्हणजेच व्यक्तिविकसनासाठी सुयोग्य अशी शिक्षणपद्धती शोधणे आणि व्यवहारात आणणे. हे साधण्यासाठी …अ) जगातील प्रगत देशांच्या शैक्षणिक कल्पना व प्रणाली यांचा अद्ययावत तौलनिक अभ्यास करणे, आ) त्या अभ्यासातून भारताच्या दृष्टीने योग्य ती शैक्षणिक तत्त्वे स्वीकारणे आणि इ) प्रयोगशील राहून आपल्या प्रतिभेतून आपली प्रणाली निर्माण करणे व ती निर्दोष करणे.

९. अभ्यास, प्रयोग आणि प्रतिभेतून शिक्षणप्रणालीची निर्मिती Read More »

८. कर्तृत्वाला बांधिलकीचा कणा

विवेकानंदांचा राष्ट्रधर्म : स्वामी विवेकानंदांनी युरोपमधून परतल्यावर मद्रास येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात ‘माझ्या मोहिमेची योजना’ या विषयावर एक व्याख्यान दिले होते. या व्याख्यानाचा शेवट करताना देशभक्तीसाठी आवश्यक अशा तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. देशवासीयांची दुर्दशा पाहून ती दूर करण्यासाठी हृदयाची तळमळ ही पहिली गोष्ट. दुर्दशा दूर करण्यासाठी मार्ग शोधून काढणे ही दुसरी गोष्ट. त्या मार्गाने जाताना पर्वतप्राय विघ्नांना तोंड देता येईल असा दृढनिश्चय असणे ही तिसरी गोष्ट. ज्याच्या ठायी या तीन गोष्टी आहेत असा प्रत्येक जण अचाट कामे करणारा देशभक्त होईल असे स्वामीजींनी म्हटले आहे. प्रबोधिनीलाही कर्मवीर देशभक्तांच्या व्यक्तिमत्त्व विकसनाचा विचार करायचा आहे. तळमळ मार्ग शोधणे-दृढनिश्चय या पायऱ्या म्हणजेच आपण करतो आहोत तो आस्था-क्षमता-बांधिलकी यांचा विचार. त्यापैकी बांधिलकी व्यक्त करणारे पाच गुण क्रमशः विस्ताराने पाहू. सदाचार : स्वतःशी प्रामाणिक राहून वागणे म्हणजे सदाचार. अप्रामाणिकपणा शिकायच्या आधीच सदाचार सुरू होतो. सत् म्हणजे काय याची जाणीव जशी वाढत जाते त्या प्रमाणात सदाचार (सत् ला अनुकूल आचार) विकसित होत जातो. अगदी प्रारंभीच्या काळात सदाचारामध्ये १) खरे बोलणे, २) स्वतःच्या चुका व मर्यादा मान्य करणे, ३) मदत करण्याची सदैव तयारी असणे, ४) इतरांशी जुळवून घेण्याची नेहमी तयारी असणे आणि ५) सर्वांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणे असे पाच प्रकारचे वागणे अपेक्षित करता येईल. इतरांमधील अप्रामाणिकपणाची जाणीव होऊ लागल्यावर आपण तसे न वागण्याचाही समावेश सदाचारात करावा लागतो. सदाचाराच्या सुरुवातीच्या पायऱ्यांनंतर ‘विकसता विकसता विकसावे’ या पद्यातील १) तपविता तपविता तपवावे …, २) झिजविता झिजविता झिजवावे…, ३) वितरता वितरता वितरावे … आणि ४) भरडिता भरडिता भरडावे या चार कडव्यांमधील आचार म्हणजे प्रबोधिनीच्या दृष्टीने सदाचाराच्या पुढच्या पुढच्या पायऱ्या आहेत. सत्प्रवृत्ती : सदाचारासाठी लागणारी तत्परता सत्प्रवृत्तीतून निर्माण होते. आरंभीचा सदाचार हा अनुकरणातून, प्रिय किंवा आदरणीय व्यक्तीच्या सांगण्यावरून, आजूबाजूचे सर्वच तसे वागतात म्हणून होतो. पण हळूहळू सदाचाराचा आग्रह बाहेरच्या कोणत्याही कारणापेक्षा स्वतःच्या प्रेरणेने व्हायला लागतो. ही स्वतःमधील प्रेरणा म्हणजेच सत्प्रवृत्ती. ‘आमची विद्या ही सज्जनांना अभय देण्यासाठी व दुष्टांचे दमन करण्यासाठी असेल. परमेश्वरी शक्तीचे अवतरण सर्व मानव समाजात होण्यासाठी आम्ही आमच्या विद्येचा उपयोग करू’, आणि ‘आमचा कणन् कण आणि क्षणन् क्षण तुझ्याच इच्छेने सार्थकी लागू देत’, असे संकल्प प्रबोधिनीच्या विद्याव्रत संस्काराच्या उपासनेत आणि वर्षारंभ-वर्षान्ताच्या उपासनेत अध्वर्यूने सांगितल्यावर सर्वजण म्हणतात. हेच संकल्प अध्वर्यूने सांगितले म्हणून नाही, तर स्वतःला वाटते म्हणून, मनात स्फुरू लागले म्हणजे सत्प्रवृत्ती जागृत झाली. सदाचार आणि सत्प्रवृत्ती म्हणजे सत्शी बांधिलकी. कोणत्याही कामाशी, ध्येयाशी, तत्त्वाशी बांधिलकी म्हणजे सत्शी बांधिलकीचाच एकेक अंश आहे. राष्ट्रीय चारित्र्य : नदीच्या प्रवाहामधील पाण्याच्या थेंबांना समुद्राकडे जाण्याची गती असते आणि प्रवाहातील पाण्याचे सर्व थेंब मिळून नदी होते. या प्रमाणेच प्रत्येक भारतीयाच्या वागण्यातला जो सारखेपणा ते भारतीयांचे राष्ट्रीय चारित्र्य. हा सारखेपणा भाषा, जेवण, उत्सव, कपडे इ. मधून लक्षात येतो. पण पाण्याच्या थेंबाप्रमाणे सर्व भारतीय फक्त एकत्र केले की त्यातून भारत हे राष्ट्र तयार होत नाही. त्यासाठी प्रत्येक भारतीयाला राष्ट्र घडवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडावे लागते. भारतीय लोकसमूहाचा गौरव वाढवण्यासाठी, ओळख टिकवण्यासाठी आणि दुर्लोकिक धुऊन काढण्यासाठी स्वतःचा गौरव, ओळख, दुलौंकिक यांची फिकीर न करता धडपड करणे म्हणजे राष्ट्रीय स्वभाव घडविणे. राष्ट्रीय स्वभाव आपल्याद्वारे प्रकट व्हावा आणि आपण राष्ट्रीय स्वभाव घडवावा या दोन्ही साठी देशाच्या वर्तमान परिस्थितीची समतोल जाणीव असायला लागते. तसेच स्वार्थ कमी होऊन निःस्वार्थी वृत्ती वाढावी लागते. राष्ट्रीय प्रेरणा : राष्ट्रीय प्रेरणा निर्माण होण्यासाठी देशाच्या भविष्यकाळाचे एक वास्तवपूर्ण पण वैभवशाली चित्र डोळ्यांसमोर उभे राहावे लागते. Vision २०२० हा दस्तऐवज असे चित्र उभे करणारा आहे. अशा बाह्य साधनांचा उपयोग होतोच. परंतु स्वतःमधील राष्ट्रीय प्रेरणा वाढवण्यासाठी स्वतःच देशाच्या भवितव्याचे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी कोणतीही गोष्ट किंवा प्रयत्न ‘मला किती व कशा प्रकारे आणि लगेच उपयोगी होणार आहे का?’ असा विचार करणे कमी झाले पाहिजे. सार्वजनिक हिताचे आणि परिणाम दीर्घकाळाने दिसणारे कामही आज करायला तयार असले पाहिजे. म्हणजेच ध्येयनिष्ठा. राष्ट्रीय प्रेरणा अशी ध्येयनिष्ठा व्यक्तीला देते. ध्येय गाठण्याच्या आकांक्षेने मन सदैव प्रफुल्ल व कार्यरत राहिले म्हणजे राष्ट्रीय प्रेरणा विकसित झाली. उज्ज्वल भारतीय संस्कृतीचा व परंपरेचा अभिमान : भारतीय कालगणनेप्रमाणे भगवद्‌गीता कुरुक्षेत्रावर सांगितली गेली त्याला पाच हजार वर्षे झाली. हे भारतीय संस्कृतीचे किमान आयुष्य आहे. हे राष्ट्र १९४७ साली निर्माण झाले असे म्हणणे म्हणजे भारतीय परंपरेचे अज्ञान आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे व ज्ञानाकडून अभिमानाकडे प्रवास झाला पाहिजे. हजारो वर्षांच्या परंपरेत काळे पांढरे बरेच घडले असणार. पांढरे निवडणे, काळे पुसून टाकणे ही कामे करायला राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय प्रेरणा दोन्ही लागतात. परंतु या दोन्हीसाठी लागणारी ऊर्जा भूतकाळाविषयीच्या उचित आदरातूनच मिळते. आत्मकेन्द्रिततेच्या जागी समाजाचे भूत-भविष्य-वर्तमान व्यक्तीच्या विचाराच्या केंद्रस्थानी आले की उज्ज्वलतेची परंपरा हृदयात अभिमान जागृत करते. राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रीय प्रेरणा व राष्ट्रीय परंपरेचा अभिमान हे सत्शी बांधिलकीचाच भाग आहेत. संघटन-चातुर्य : घटनेच्या चौथ्या परिच्छेदात बुद्धीच्या विकासाबरोबर ज्या आणखी अकरा गुणांची आवश्यकता मांडली आहे त्यातील शेवटचा गुण आहे संघटन-चातुर्य. कार्यकर्त्याला नेतृत्वासाठी अतिशय आवश्यक असा हा गुण आहे. ‘बुद्धिविकास म्हणजे काय?’ या विषयावर एकदा इ. ९वी ते इ. १२वीच्या विद्यार्थ्यांसमोर कै. आप्पांचे स्वतंत्र वैचारिक झाले होते. त्यावेळी त्यांनी निरीक्षण, आकलन, स्मरण, गूढार्थ-संशोधन, प्रत्युत्पन्नमती, कार्याकार्यविवेक, प्रतिभा, दूरग्रहण, दूरप्रक्षेपण आणि शक्तिप्रदानता हे बुद्धीचे दहा पैलू सांगितले होते. १) दूरग्रहण (म्हणजेच इतरांच्या अंतःस्थितीची जाणीव), २) सामाजिक प्रज्ञा (म्हणजे सामाजिक संबंध व समाजव्यवहार या क्षेत्रात, निरीक्षण ते प्रतिभा हे सात पैलू), ३) सामाजिक संबंध व समाजव्यवहार या शिवाय चिन्हांनी होणारे व्यवहार, प्रतिमांनी होणारे व्यवहार व भाषिक व्यवहार, या बुद्धीचे कार्य चालते त्या उरलेल्या सर्व क्षेत्रात कार्याकार्यविवेक, आणि ४) बुद्धीच्या या सर्व विशिष्ट पैलूंच्या जोडीला प्रेरणा, यांचे एकत्र चालणारे काम म्हणजे संघटन-बुद्धी अशी कल्पना त्यांनी मांडली होती. गोड भाषणाने व समजूतदारपणाने कोणत्याही गटामध्ये वागता येणे, स्वतः सदैव आशावादी राहून इतरांना आशावादी बनवता येणे, सर्व व्यक्तींना माणूस म्हणून प्रतिष्ठा देणे, अशा वागण्याने या संघटन-बुद्धीचे रूपांतर संघटन-चातुर्यात होते. कोणत्याही व्यक्तीच्या बुद्धीला क्षमता आणि बांधिलकी वाढविणाऱ्या या एकूण अकरा चारित्र्य-गुणांची जोड दिली तर बुद्धीचा विकास समाजोपयोगी होईल असा आशावाद प्रबोधिनीच्या शैक्षणिक उद्देशांमधून व्यक्त होतो.

८. कर्तृत्वाला बांधिलकीचा कणा Read More »

७. आस्थेला कर्तृत्वाची जोड

कार्यकर्ता किंवा नेता कार्यक्षम असला पाहिजे. यासाठी त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेच्या जोडीला पुढील पाच गुण आवश्यक आहेत असे प्रबोधिनीच्या घटनेत सांगितले आहे. अभ्यासशीलता : एखाद्या विषयाचा १) सर्व बाजूंनी अभ्यास करणे, २) त्याच्या मुख्य गाभ्याचा आणि शाखा-उपशाखांचा अभ्यास करणे, ३) मुळापासून अभ्यास करणे, ४) अनुभव घेऊन व समजून घेऊन अभ्यास करणे, ५) इतर अभ्यासकांचे अनुभव व मते यांचा पडताळा घेणे, ६) अभ्यासलेली तत्त्वे व तपशील विविध प्रसंगी वापरून पाहणे, ७) अनुत्तरित प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासलेली तत्त्वे उपयोजून पाहणे, ८) पूर्वी अभ्यासलेल्या इतर विषयांशी तुलना करून साम्य आणि भेद शोधणे, अशा अभ्यासाच्या व चिंतनाच्या उत्तम पद्धतींचा उपयोग करण्याची सवय लावून घेणे म्हणजे अभ्यासशीलता. उद्योगप्रियता : निरलसपणे व अविश्रांतपणे बुद्धीने व शरीराने काम करण्याची सिद्धता व एकांतिक निष्ठेने यश मिळेपर्यंत सतत परिश्रम करणे म्हणजे उद्योगप्रियता. उत्पादनक्षमता, उत्पादकता, उत्पादनातील विविधता, गुणवत्ता वाढ, यासाठी सतत प्रयत्न करत राहणे म्हणजे उद्योगप्रियता. ज्या ज्या गोष्टी होणे शक्य नाही असे इतर सांगत असतील त्या करून पाहण्याच्या खटपटीला तयार असणे म्हणजे उद्योगप्रियता. ‘केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे’ या सूत्रावर विश्वास ठेवून काम करणे म्हणजे उद्योगप्रियता. स्वावलंबन : स्वतःचा दिनक्रम स्वतः ठरवून तो पार पाडण्यापासून स्वतःचा आयुष्यक्रम ठरवून तो पार पाडण्यापर्यंत स्वावलंबनाची व्याप्ती आहे. दिनक्रमातील सर्व कामे पार पाडण्याचे कौशल्य मिळवणे म्हणजे स्वावलंबन. आपले आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय, यासंबंधीचे निर्णय घेणे; कुटुंबियांसंबंधी व सहकाऱ्यांसंबंधी आवश्यक ते ते निर्णय घेण्यासाठीचे कौशल्य व आत्मविश्वास मिळवणे म्हणजे स्वावलंबन; आजारपण, अपघात, नैसर्गिक आपत्ती, अनपेक्षित परिस्थिती यांना धीराने सामोरे जाऊन, त्यातून वाट काढण्याचे कौशल्य मिळवणे म्हणजे स्वावलंबन, आपले भवितव्य आपणच ठरवून त्यासाठी झटणे म्हणजे स्वावलंबन. उत्स्फूर्तिसंपन्नता (पुढाकार, इनिशिएटिव्ह) : परिस्थितीला प्रतिसाद देण्याइतकेच परिस्थितीला वळण देण्याचा स्वतः प्रयत्न करणे ही महत्त्वाचे आहे. अनेक वेळा, १) काही न होणे, २) अपेक्षेप्रमाणे होणे व ३) अपेक्षेपेक्षा वेगळे होणे, या तीनही शक्यता सारख्या प्रमाणात असतात. आपण सुरुवात केली तर आपल्या अपेक्षेप्रमाणे होते. इतर कोणी सुरुवात केली तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे होते. ‘मी परिस्थिती पालटीन’, ‘मी नवयुग निर्मिन’, ‘मी परिस्थिती कापून काढीन’ असे म्हणून सुरुवात करणारा त्या प्रमाणे घडवण्याची शक्यता जास्त असते. परिचय करून घेणे, संवाद सुरू करणे, भांडण किंवा अबोला संपवणे, आवराआवर सुरू करणे, मांडामांड सुरू करणे, नवीन प्रथा सुरू करणे, प्रवाह वळवणे, प्रतिकार करणे या सर्व बाबतीतच पुढाकार घेणे हे व्यक्तीला, कार्यकर्त्याला व नेत्याला आवश्यक आहे. अंतःप्रेरणा (इण्ट्युशन) : नवीन सुचणे दोन प्रकारचे असते. तर्कविचाराने, पूर्वनिश्चित शिस्तीने विचार करून, बदलाच्या पद्धती ठरवून त्यानुसार क्रमाने बदल करत गेल्यावर नवीन सुचते. हा पहिला प्रकार. या प्रकारच्या प्रतिभाशक्तीच्या किंवा सर्जनशीलतेच्या विकासाचे शास्त्र हळूहळू तयार होते आहे. या प्रकारच्या सुचण्याला परिवर्तनपद्धती म्हणता येईल. सर्व विचार शांत झाल्यावर, जाणीवपूर्वक सुचण्याचा प्रयत्न थांबल्यावर, जागृत मनाच्या पलीकडून जे एकदम जाणवते तो सुचण्याचा दुसरा प्रकार. त्याला येथे अंतःप्रेरणा म्हटले आहे. इथे बाहेरील परिवर्तन न होता आपल्या आत असलेल्या कल्पनांचे प्रकटन होते. कामाशी तद्रूपता किंवा तन्मयता या अवस्थांनंतर अंतःप्रेरणा काम करायला लागते. परिवर्तनपद्धतीच्या प्रतिभेने तात्पुरती नवनिर्मिती होते, ती निर्मिती शिळी होऊ शकते. प्रकटन पद्धतीच्या प्रतिभेने म्हणजे अंतःप्रेरणेने दीर्घकाळ ताजी राहणारी नवनिर्मिती होते. वेद, उपनिषदे, गीता यांची रचना; वेरूळ, कैलासची शिल्पे; विवेकानंदांची भाषणे; आइन्स्टाइनचे शोध ही सर्व त्या त्या वेळी झालेली सदैव ताजी राहणारी नवनिर्मिती आहे. असे सदा ताज्या नवनिर्मितीचे काम करू इच्छिणाऱ्याची अंतःप्रेरणा वाढायला हवी. कामाबाबत आस्था, कामाची क्षमता व कामाशी बांधिलकी या सगळ्याचीच व्यक्तीला आवश्यकता असते. कार्यक्षमता वाढायला अनेक गुण अंगी बाणायला लागतात, त्यापैकी प्रबोधिनीच्या घटनेत लिहिलेले पाच पायाभूत गुण आपण पाहिले. बांधिलकी व्यक्त करणारे गुण पुढील भागात पाहू.

७. आस्थेला कर्तृत्वाची जोड Read More »

६. समाजाला वगळून एकट्या व्यक्तीचा विकास अशक्य

बांधिलकी आणि कार्यक्षमता: दहा-बारा वर्षांपूर्वी प्रबोधिनीतील तेव्हाच्या महाविद्यालयीन सदस्यांमध्ये एक वाद रंगलेला होता. समाजातील विविध कामे, कार्यकर्ते व संस्था यांना भेटी द्यायला ते जायचे. भेटीहून परत आल्यानंतर प्रत्येक वेळी वाद व्हायचा की ‘कमिटमेंट’ (म्हणजे ध्येयाशी निष्ठा किंवा बांधिलकी) आधी निर्माण झाली पाहिजे की ‘कॉम्पिटन्स्’ (कार्यक्षमता) आधी निर्माण करायला पाहिजे? भेट द्यायला जाणाऱ्याचा स्वभाव आणि भेट दिलेल्या कामाचा किंवा कार्यकर्त्याचा प्रभाव यानुसार झोका कधी कमिटमेंटकडे झुकायचा तर कधी कॉम्पिटन्सकडे झुकायचा. या वादाची तीव्रता एवढी होती की दहावीतल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे दोन शब्द पोचले होते. आधी आस्था हवी : केरळमध्ये तिरुअनंतपुरम् जवळ मित्रनिकेतन नावाची एक संस्था आहे. तिचे संचालक श्री. विश्वनाथन् वरील वादाच्या काळात एक दिवस पुण्यात प्रबोधिनीला भेट द्यायला आले होते. त्यांना मी दहावीच्या वर्गात घेऊन गेलो. त्यांची मुलांबरोबर प्रश्नोत्तरे झाली. त्यामध्ये एका विद्यार्थ्याने त्यांना वरील वादातला प्रश्न विचाला, “तुम्हाला कमिटमेंट महत्त्वाची वाटते की कॉम्पिटन्स्?” उत्तरादाखल त्यांनी त्यांची आणि कै. आप्पांची विमान प्रवासात कशी भेट झाली, त्या वेळी काय बोलणे झाले, त्यांना प्रबोधिनीचे कार्यकर्ते कसे भेटत गेले असा इतिहास सांगितला व शेवटी ते म्हणाले, ‘I agree with Dr. Pendse. First you must feel concern. Commitment, competence and all other things come afterwards. ‘मी डॉ. पेंडसेंशी सहमत आहे. तुम्हाला प्रथम आस्था (कन्सर्न) वाटली पाहिजे. बांधिलकी (कमिटमेंट), कार्यक्षमता (कॉम्पिटन्स) आणि इतर सर्व गोष्टी नंतर येतात.’ श्री. विश्वनाथन् आणि कै. आप्पांची एकदाच विमान प्रवासात दोन तास भेट झाली होती. त्यानंतर सुमारे सतरा अठरा वर्षांनी प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांसमोर आल्यावर त्यांना त्या भेटीतला ‘कन्सर्न’ (आस्था) हा शब्द आठवला. आस्था शिकवली पाहिजे : कै. आप्पा १९७२ साली इंग्लंडमध्ये गेले होते. तेव्हा तेथील एका परिसंवादात ते सहभागी झाले होते. त्यानंतर लंडन टाइम्स्च्या प्रतिनिधीने त्यांची मुलाखत घेतली होती. लंडन टाइम्स्च्या शैक्षणिक पुरवणीत ती प्रसिद्ध झाली होती. कै. आप्पांच्या बोलण्यातील एक वाक्य “Gifted should be taught concern” हे त्या बातमीचे शीर्षक म्हणून छापले होते. बुद्धिमान विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता देशाच्या व समाजाच्या कारणी लागायची असेल तर समाजघटकांबद्दल मनात आस्था धारण करायला त्यांना शिकवले पाहिजे, हा त्याचा अर्थ. समाजाबद्दल, देशाबद्दल आणि समाजघटकांबद्दल मनात आस्था वाटणे म्हणजे त्यांच्याशी आपले नाते आहे असे वाटणे. आपले आजचे जीवन त्यांच्या जीवनाशी, आपले भवितव्य त्यांच्या भवितव्याशी जोडले आहे असे वाटणे. आपले आयुष्य इतरांशी जोडलेले आहे याची जाणीव जितकी प्रखर व सातत्याने होत राहील त्या प्रमाणात निष्ठा, कार्यक्षमता हे सगळे नंतर निर्माण होतात किंवा मिळवता येतात, हा कै. आप्पांच्या किंवा श्री. विश्वनाथन् यांच्या बोलण्यातला सारांश. आस्थेचे विकसित रूप : आस्थेचेच आणखी एक रूप म्हणजे आपले अस्तित्व इतरांवर अवलंबून असल्यामुळे आपण त्यांच्या ऋणात आहोत असे वाटणे. भारतीय परंपरेनुसार ऋषिऋण, देवऋण व पितृऋण अशी तीन ऋणे घेऊनच प्रत्येक जण जन्माला येतो. या ऋणांतून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. ऋणांची जाणीव ठेवण्याची कृतज्ञता व ऋण फेडण्याची तळमळ हे आस्थेचेच विकसित रूप आहे. परंपरेतील या तीन ऋणांना प्रबोधिनीची घटना लिहिणाऱ्यांनी राष्ट्रीय ऋणाची जोड दिली आहे. प्रबोधिनीच्या घटनेच्या चौथ्या परिच्छेदामध्ये बुद्धीच्या विकासाला आणखी कोणत्या गुणांची जोड दिली तर सर्वंकष नेतृत्वाची क्षमता वेगाने विकसित होऊ शकेल याची यादी दिली आहे…..हे गुण विकसित होऊन स्वतःवरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात सदैव स्फुरेल असे करणे, असा या परिच्छेदाचा शेवट केला आहे. राष्ट्रीय ऋणाची जाणीव जर सतत असेल, ते फेडण्याची तीव्र तळमळ जर मनात असेल तर व्यक्तिमत्त्वाचे इतर गुण विकसित झाल्याचा उपयोग आहे. या राष्ट्रीय ऋणाच्या जाणीवेमुळेच गुणसंपन्न व्यक्तीचे कार्यकर्त्यात रूपांतर होते. नारदमुनींची गोष्ट : छांदोग्य उपनिषद या जुन्या ग्रंथामध्ये नारदमुनींचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीचा एक प्रसंग वर्णन केला आहे. ‘मी इतके सर्व विषय शिकलो तरी मनात काहीतरी बाकी राहिल्याची अस्वस्थता आहे. त्यामुळे मी व्याकूळ झालो आहे’ असे नारद सनत्कुमार या गुरूंना सांगतात. सनत्कुमार नारदांना, ‘तुझा केवळ पुस्तकी अभ्यास झाला आहे. तुला त्या अभ्यासाच्या विषयांचा अनुभव नाही’, असे उत्तर देतात. मग गुरु-शिष्यांचा लांबलचक संवाद सुरू होतो. शब्दज्ञानाकडून अनुभवज्ञानाकडे जाण्याचे टप्पे सनत्कुमार नारदांना समजावून सांगतात. या संवादाचा शेवट, ‘स्वतःपुरता संकुचित विचार करायचे सोडून व्यापक विचार कर म्हणजे तुझी अस्वस्थता संपेल,’ अशा उत्तराने होतो. असा व्यापक विचार करण्याची सुरुवात म्हणजे इतरांशी असलेला आपला संबंध ओळखणे. कौटुंबिक नात्यांपासून मानवतेपर्यंतच्या नात्यांची ओळख होत गेल्यावर सर्वांविषयी आस्था वाढत जाते. आस्थेचे विकसित रूप म्हणजे स्वतःवरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव हे आपण पाहिले. आता कार्यक्षमता आधी की कामाशी बांधिलकी आधी या वादाकडे पुन्हा वळू. नारद-सनत्कुमार संवादात असे सांगितले आहे की व्यापकावर लक्ष केंद्रित केले की व्यापकासाठी जगण्यात सुख आहे असे वाटू लागते. हे सुख मिळवण्यासाठी काम सुरू होते. काम करता करता निष्ठा किंवा कामाशी बांधिलकी तयार होते. त्यामुळे आधी आस्था, मग काम; आणि पूर्ण क्षमतेने काम केल्यावर त्यातून बांधिलकी असा क्रम आहे. ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.४ व्यक्तिविकसनाच्या कल्पना अधिक स्पष्ट करणे उपयुक्त आहे. व्यक्तिविकसन करणे म्हणजे प्रखर बुद्धिमत्तेच्या या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये विशेष गुणसंपदा निर्माण करणे. या गुणसंपदेमध्ये सदाचार, सत्प्रवृत्ती, अभ्यासशीलता, उद्योगप्रियता, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रीय प्रेरणा, उज्वल भारतीय संस्कृतीचा व परंपरेचा अभिमान, स्वावलंबन, उत्स्फूर्तिसंपन्नता (इनिशिएटिव्ह), अंतः प्रेरणा (इण्ट्युशन), संघटन-चातुर्य इत्यादी चारित्र्य गुणांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. हे गुण विकसित होऊन स्वतः वरील राष्ट्रीय ऋणाची जाणीव त्यांच्या मनात सदैव स्फुरेल असे करणे.

६. समाजाला वगळून एकट्या व्यक्तीचा विकास अशक्य Read More »

५. कृतिशील बुद्धीला विकसित व्यक्तिमत्वाचे कोंदण

एका आंतरराष्ट्रीय संघटनेचा अनुभव ‘मेन्सा’ नावाची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. चाळीस-पंचेचाळीस देशांमध्ये तिच्या शाखा आहेत. भारतीय मेन्साचे कार्यालय प्रबोधिनीच्या पुण्यातील वास्तूमध्ये १९७२ पासून आहे. भारतीय मेन्साचा अध्यक्ष म्हणून दहा-बारा वर्षे वेगवेगळ्या देशातील मेन्सातर्फे प्रकाशित होणारी नियतकालिके माझ्याकडे सस्नेह भेट म्हणून येत असतात. समाजातल्या प्रातिनिधिक दहा हजार लोकांनी बुद्धिमत्ता चाचणी दिली तर त्यांतील गुणानुक्रमे पहिल्या दोनशे जणांना मेन्साचे सदस्य होता येते. म्हणजेच समाजातल्या बुद्धिमान गटाचे प्रतिनिधी मेन्साचे सदस्य होत असतात. मेन्साच्या अशा सदस्यांनी लिहिलेले लेख, पत्रे, चुटके, कोडी, इ. या सप्रेम भेट येणाऱ्या नियतकालिकांमध्ये छापलेली असतात. ही नियतकालिके चाळली तर लक्षात येते की आपला वेळ चांगला जावा, चांगले मित्र-मैत्रिणी मिळावेत एवढ्याच कारणासाठी बहुसंख्य लोक मेन्साचे सदस्य होतात. मेन्सा ही संस्था एखाद्या क्लबसारखी वाटते. मेन्साच्याच सदस्यांनी आपापसात बोलून सर्वांना आवडणारे कार्यक्रम करायचे असतात. खेळ, सहली, गप्पा, सहभोजन, गंमत-जत्रा, असेच बहुतांश कार्यक्रम असतात. समोर काही सामूहिक ध्येय नसेल तर बुद्धिमान लोकसुद्धा त्या त्या देशातील समाजाचा मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा किंवा व्यक्तिगत आयुष्यातील वेळ घालविण्याच्या कल्पनांचा जो काही स्तर असेल, त्या प्रमाणेच वागतात, असे ही मेन्साची नियतकालिके पाहून वाटते. आधी कळले पाहिजे: प्रबोधिनीच्या कामाचा प्रारंभही समाजातले बुद्धिमान विद्यार्थी निवडून घेऊन झाला. मेन्साच्या सदस्यत्वासाठी जशी बुद्धिमत्ता चाचाण्यांवरील गुणांची अट होती तशी प्रबोधिनीच्या प्रबोध – वर्गांसाठीही होती. . परंतु मेन्साचे सदस्यत्व घेतलेल्या बुद्धिमान सदस्यांनी काय करायचे हे इतर सदस्यांशी बोलून ठरवायचे असते. काय करावे या बाबत मेन्साचे काहीच म्हणणे नसते. प्रबोधिनीच्या सदस्यांनी काय करावे याबाबत प्रबोधिनीचे मात्र निश्चित म्हणणे आहे. ‘रूप पालटू देशाचे’ हाच ध्यास प्रबोधिनीच्या सदस्यांनी घ्यावा, असे प्रबोधिनीचे ध्येय ठरलेले आहे. देशाचे रूप पालटायचे तर देशाचे आजचे रूप कळले पाहिजे. ते असे का हे कळले पाहिजे; हे रूप पालटून नवे रूप कसे असले पाहिजे हे कळले पाहिजे; नवे रूप कसे आणायचे हे कळले पाहिजे; नवे रूप आणण्यात अडचणी कोणत्या ते कळले पाहिजे; अडचणी दूर कशा करायच्या हे कळले पाहिजे; हे काम आपण स्वतःच करायचे आहे हे कळले पाहिजे; आणि शेवटी कळल्याप्रमाणे वागता आले पाहिजे. कळणे आणि त्याप्रमाणे वागणे हे महत्त्वाचे ! या सर्व गोष्टी कोणाला लवकर कळतील? प्रबोधिनीच्या प्रारंभी या प्रश्नाचे पहिले उत्तर आले ज्यांना कळण्याची विशेष शक्ती म्हणजे कुशाग्र बुद्धी आहे त्यांना. सुरुवातीला नवीन, उपयुक्त आणि आवाक्यातील आरंभबिंदू वाटला म्हणून बुद्धिमान विद्यार्थ्यांपासून प्रारंभ झाला. परंतु सर्व विद्यार्थ्यांसाठी काम करायचा संकल्प पहिल्यापासून होता. त्रयस्थाच्या दृष्टीतून प्रबोधिनी: प्रबोधिनीचे शिक्षण कार्य पाहण्यासाठी एक अमेरिकन विदुषी काही वर्षांपूर्वी आल्या होत्या. आठवडाभर राहून त्यांनी चिकित्सक दृष्टीने पुणे, शिवापूर व थेऊरच्या साखरशाळेतील आपले काम पाहिले. अमेरिकेत गेल्यावर त्यांनी आठवडाभराच्या निरीक्षणांवर लेख लिहिला. त्या लेखात त्यांनी बुद्धिमंतांच्या शिक्षणातील अमेरिकेतील अनुभव व प्रबोधिनीच्या कामाची तुलना केली आहे. अशी तुलना करताना अमेरिकेतील शिक्षण तज्ज्ञांना त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की, ‘मी प्रबोधिनीमध्ये पाहिलेले तीन आग्रहाचे मुद्दे बौद्धिक विकास, आत्मिक विकास आणि सामाजिक कृतिशीलता – अमेरिकेत का बघायला मिळत नाहीत?’ पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, ‘अमेरिकेत आपण फक्त बौद्धिक विकासावर भर देतो, तो ही प्रमाणित चाचण्यांवरील गुण वाढवण्यासाठी. आणि बुद्धिमान विद्यार्थी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग ज्यामध्ये फार कष्ट आणि त्याग करायला लागणार नाही असे व्यवसाय आणि जीवनशैली निवडण्यासाठी करतात. आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग ते समाजाशी जुळवून घेण्यासाठी करतात. समाज बदलण्यासाठीची कृतिशीलता शिकवणे आमच्या गावीही नसते.’ या विदुषीने आत्मपरीक्षणाच्या मनःस्थितीत स्वतःच्या देशाचे अमेरिकेचे चित्र जास्त काळे आणि प्रबोधिनीचे जास्त उजळ रंगवले असे क्षणभर गृहीत धरू. पण अमेरिकेने जो आदर्शही समोर ठेवला नाही तो प्रबोधिनीने ठेवला आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्या आदर्शाची आठवण सतत केली आहे हे त्या विदुषीचे निरीक्षण खरेच आहे. कै. आप्पांनीही पाश्चात्य देशातील आणि प्रबोधिनीतील बुद्धिमंतांच्या शिक्षणातील फरक स्पष्ट करताना ‘Ours is a school with a purpose’, असेच म्हटले आहे. हा purpose किंवा हेतू समाजकेंद्रित आहे, व्यक्तिकेंद्रित नाही. बुद्धी आणि अन्य व्यक्तिमत्त्व गुणांचा एकत्रित विकास : १) विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, २) कार्यकर्ते घडणीसाठी विद्यार्थ्यांचे वृत्ति-घडण व प्रेरणा जागरण, आणि ३) नेतृत्व विकसनासाठी कार्यकर्ते घडण अशी अधिकाधिक नेमकी व अवघड उद्दिष्टे प्रबोधिनीच्या घटनेतील पहिल्या दोन परिच्छेदात क्रमाने आली आहेत, हे आपण यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये पाहिले. नेतृत्वविकसनासाठी विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास पुरणार नाही, हे देखील आधीपासून माहीत होते. त्यामुळेच प्रबोधिनीच्या घटनेतील तिसऱ्या परिच्छेदात पुढचे उद्दिष्ट मांडले आहे – या उगवत्या पिढीच्या निसर्गप्राप्त कुशाग्र बुद्धिमत्तेला आवश्यक त्या अन्य गुणांची व साधनांची जोड मिळू शकल्यास वर अभिप्रेत असलेले (परिच्छेद ३.२ मध्ये मांडलेले) सर्वंकष नेतृत्व अधिक द्रुतगतीने विकसित होऊ शकेल. म्हणून तसे गुण संपादन करण्याची आणि व्यक्तिविकसन करण्याची संधी व सोय नवोदित पिढीला उपलब्ध करून देणे.

५. कृतिशील बुद्धीला विकसित व्यक्तिमत्वाचे कोंदण Read More »

४. बुद्धी कुशाग्र व्यापक : राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी

समुद्र आणि कालव्यातील झडपा (लॉक) : १९९१ साली एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात एका नामवंत शिक्षण तज्ज्ञांना मुख्य भाषण द्यायला निमंत्रित केले होते. त्यांच्या व्याख्यानाचे शीर्षक होते ‘Rising Tide Raises All Ships’. समुद्राला भरती आली की छोट्या होडक्यापासून तेलवाहू टँकरपर्यंतच्या सर्व आकाराच्या जहाजांची पातळी वर जाते असा त्या शीर्षकाचा अर्थ. प्रज्ञावंतांच्या शिक्षणात सापडलेली प्रज्ञा-विकासाची सूत्रे सार्वत्रिक शिक्षण पद्धतीत वापरा व सर्वांचा प्रज्ञा-विकास करा हा त्यांच्या प्रतिपादनाचा सारांश होता. त्यांच्या शीर्षकाची निवड अतिशय उत्तम होती. सर्वांचा प्रज्ञा-विकास व्हावा ही कळकळ त्यातून व्यक्त होत होती. पण ज्या देशात प्रज्ञावंतांच्या प्रज्ञा-विकासाची चळवळ ६५-७० वर्षे चालू होती त्या देशातले अनुभव ते सांगत होते. त्यांच्या शीर्षकातून दिशा उत्तम व्यक्त झाली. परंतु समुद्राला भरती आणण्याचे काम आज तरी माणूस करू शकत नाही हे वास्तव आहे. समुद्रातली किंवा मोठ्या सरोवरातली जहाजे कालव्यातून नेताना त्यांना काही वेळा उचलावे लागते. पनामा कालव्यातून किंवा सुवेज कालव्यातून जहाजे एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात जाताना दोन्ही समुद्रातील पाण्याची पातळी सारख्या उंचीची नसल्याने जहाजांना उचलून दुसऱ्या समुद्रात ठेवावे लागते. या साठी कालव्यात दारे बसवून, दोन्ही बाजूंची दारे बंद करून त्यांच्यामधल्या भागात पंपाच्या किंवा गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने पाण्याची पातळी वाढविण्याची सोय काही ठिकाणी केलेली असते. कालव्यातील अशा जागांना झडपा किंवा लॉक (lock) असे म्हणतात. पाश्चात्य देशांमध्ये १९२५ च्या सुमारास प्रज्ञावंतांना निवडून त्यांच्या प्रज्ञा-विकासाचे जे प्रयोग सुरू झाले ते अशा झडपांसारखे होते. समुद्राला भरती आणून सर्व जहाजे वरती उचलता येत नाहीत म्हणून झडपांमधली मोजकी जहाजे उचलण्यासारखे हे प्रयोग होते. भारतातील चिंतन : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रबोधिनीच्या संस्थापकांनी जे चिंतन सुरू केले त्याचे थोडक्यात सार असे मांडता येईल विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात देशात प्रगती घडवून आणायची असेल तर शिक्षण हेच त्या प्रगतीचे मूलभूत साधन आहे. शिक्षणामुळे अनेक विचारवंत व नेते पुढे आले पाहिजेत. विचाराने व कर्तृत्वाने जे मोठे आहेत तेच देशाच्या प्रगतीचे कर्णधार होऊ शकतात. असे नेते पुढे आणण्यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रयत्न झाले पाहिजेत. ज्या क्षेत्रातले प्रश्न समजण्यासाठी उच्च कोटीची बुद्धिमत्ता लागते, त्या क्षेत्रातले नेते घडण्यासाठी उच्च कोटीच्या बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली पाहिजे. उच्च बुद्धिमत्ता, स्वयंप्रज्ञा, दूरदृष्टी, उत्साह अशा क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांमधून तरुणपणीच देशाच्या प्रगतीची जबाबदारी घेणारे नेते कसे तयार होतील याच्या पद्धती शिक्षण क्षेत्रातील जाणकार लोकांनी शोधून काढल्या पाहिजेत. प्रबोधिनीच्या स्थापनेच्या वेळी औद्योगिकीकरण, शेतीचे आधुनिकीकरण इ. आव्हानांपासून अणुशक्ती विकास व अंतरिक्ष क्षेत्रातील स्वावलंबनाच्या आव्हानांपर्यंतची आव्हाने भारतासमोर होती. ही आव्हाने घेणारे नेते कुशाग्र बुद्धीचे असायला लागतील. आजचे प्रश्न ऊर्जेचे स्वस्त, स्वच्छ व शाश्वत स्रोत हस्तगत करणे, पृथ्वीच्या पर्यावरणाचा तोल सांभाळणे, नॅनो तंत्रज्ञानाचा विकास करणे असे असतील. प्रश्न किंवा आव्हाने बदलली तरी त्या क्षेत्रात कुशाग्र बुद्धीचे नेते लागतीलच. संपत्तीची निर्मिती आणि संपत्तीचे न्याय्य वितरण किंवा सुखसोयी आणि सुखसाधने यांच्या मुबलकतेत मनाने स्थिर राहणे असे सामाजिक व मानसिक प्रश्न सोडवायलाही कुशाग्र बुद्धीच्या व्यक्तींची आवश्यकता आहे. म्हणून कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांमधून असे नेते कसे घडतील हा प्रबोधिनीच्या संस्थापकांनी आरंभिलेला शैक्षणिक प्रयोग आहे. बुद्धी कुशाग्र व्यापक : एखादी गोष्ट वेगाने समजून घेणे, एखादी गोष्ट वेगाने स्मृतीत साठवणे, स्मृतीत साठवलेली एखादी गोष्ट वेगाने आठवणे आणि नवीन व पर्यायी कल्पना वेगाने सुचणे, अशी कार्यक्षम बुद्धीचा वेग दर्शविणारी विविध कार्ये आहेत. गुंतागुंतीची समस्या किंवा परिस्थिती थोडक्या वेळात लक्षात येणे, एखाद्या समस्येतील काही प्रकट घटकांवरून अन्य प्रकट गोष्टींचा अंदाज येणे आणि विविध स्थळ-काळ-प्रसंगांमधली साम्यस्थळे लक्षात येणे, अशी कार्यक्षम बुद्धीची जटिलता जाणण्याची क्षमता दर्शविणारी विविध कार्ये आहेत. वेग आणि जटिलता जाणण्याची क्षमता असलेल्या बुद्धीला कुशाग्र बुद्धी म्हणता येईल. अनेक वेगवेगळे विषय, माहिती आणि कामे हाताळण्याची क्षमता म्हणजे बुद्धीचा आवाका होय. कोणतीही गोष्ट तिच्याहून अधिक मोठ्या अशा कोणत्या गोष्टीचा भाग कशी आहे हे लक्षात येणे आणि सतत अधिक मोठ्या गोष्टीचा शोध घेत राहणे म्हणजे बुद्धीचे साकल्य. मोठा आवाका आणि साकल्य असलेल्या बुद्धीला व्यापक बुद्धी म्हणता येईल. प्रत्येकाला दोन्ही प्रकारची बुद्धी लागतेच परंतु ढोबळमानाने चिंतकाला व्यापक बुद्धीची अधिक जरूर आहे. तर कर्त्या व्यक्तीला कुशाग्र बुद्धीची अधिक गरज आहे असे म्हणता येईल. देशाच्या विविध क्षेत्रांमधील परिस्थितीला प्रतिसाद देणाऱ्या नेत्याकडेही व्यापक बुद्धी लागेलच. पण ती कमी जास्त असली तरी त्याला कुशाग्र बुद्धी निश्चितच हवी. हे अभिप्रेत नेतृत्व उपलब्ध होण्याचे उगमस्थान म्हणजे या राष्ट्रातील कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या होत असे प्रबोधिनीचे गृहीत आहे. प्रबोधिनीतील संशोधनानुसारच कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी म्हणजे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी. (पाहा पान ३१ : प्रयोगातून उद्देशाचा अर्थविस्तार) त्यांच्या त्यांच्या बुद्धीचा विकसित पैलू लक्षात आला की ते ही नेतृत्व उपलब्ध होण्याचे उगमस्थान झाले. राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी कुशाग्र बुद्धी: अभ्यासक्रमातील परीक्षांमधील यश, व्यावहारिक यश, संशोधनातील यश यासाठी आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्व आणि प्रतिभा यासाठी लागणारी बुद्धिमत्ता कुशाग्र असतेच. परंतु या सगळ्यामध्ये बुद्धिमत्तेचा उपयोग वरवरचा आणि तात्पुरता होतो. मोठ्या संख्येने लोक एकत्र करणे, त्यांना एक विचाराचे करणे, त्यांना समान ध्येयाने प्रेरित करणे, त्यांच्यासह मोठे व्याप उभारणे व व्यापक कामे शेवटाला नेणे याला लागणारी बुद्धिमत्ताही मानवी स्वभावातील वैविध्याचा, मानवी आशा-आकांक्षांचा, मानवी हित-संबंधांचा वेध घेणारी कुशाग्र बुद्धीमत्ताच आहे. राष्ट्राला अशी कामे करू शकणाऱ्या नेत्यांची आवश्यकता आहे. इथे बुद्धिमत्तेचा उपयोग अधिक टिकाऊ परिणामांसाठी होतो. यासाठी समुद्राला भरती आणण्याचे ध्येय ठेवून अधिकाधिक मोठ्या आकाराच्या झडपांमध्ये भरती आणण्याचे म्हणजेच समाजाच्या दुर्लक्षित गटांमध्ये दडलेली कुशाग्र बुद्धिमत्ता शोधून काढून तिचा विकास करण्याचे काम करत राहिले पाहिजे.

४. बुद्धी कुशाग्र व्यापक : राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी Read More »

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II

सूर्याजी मालुसरे व आनंदराव गुजर : शिवकालातील दोन प्रसंगांवर अनेक पोवाडे आणि कविता लिहिल्या गेल्या आहेत. पहिला प्रसंग आहे कोंडाणा जिंकण्याचा आणि दुसरा प्रसंग आहे प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांच्या बलिदानाचा. कोंडाणा जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांची होती. पण लढाईत त्यांचा मृत्यू झाल्यावर मराठा फौजेची पळापळ सुरू झाली. त्यावेळी सूर्याजी मालुसरे यांनी पळणाऱ्या मावळ्यांना थोपवले, पुन्हा लढाईकडे वळवले आणि त्यांना धीर व प्रेरणा देत लढाईत विजय मिळवला. प्रतापराव गुजर व त्यांचे सहा सरदार, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या कवितेमुळे अनेकांना माहीत झाले आहेत. हे सात वीर हुतात्मा झाल्यानंतर आठवा सरदार, प्रतापरावांचा भाऊ आनंदराव गुजर पुढे आला आणि त्याने मराठी सैन्यासह आदिलशाही फौजेशी लढा चालू ठेवला. मागे राहिलेल्या फौजेने या सातांना मारणाऱ्या बहलोलखानाच्या फौजेचा नंतर पूर्ण पराभव केला आहे. सूर्याजी व आनंदराव यांनी प्रसंगाची गरज ओळखून आपापल्या फौजेचे नेतृत्व करायची जबाबदारी अंगावर घेतली व ती पार पाडली. त्यांचे नेतृत्वगुण प्रसंगानुसार प्रकट झाले. परंतु ते गुण काही आयत्या वेळी निर्माण झाले नाहीत. जे गुण त्यांच्यामध्ये आधीपासूनच गुप्तपणे होते, ते प्रसंगानुसार प्रकट झाले. प्रतिसादातून नेतृत्वाचे प्रकटीकरण : नेतृत्वगुण प्रकट होणे हे काही प्रमाणात परिस्थितीवर अवलंबून असते व काही प्रमाणात नेत्याच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. परिस्थितीला प्रतिसाद देणे हा व्यक्तिमत्त्वाचा एक गुण आहे. तो सूर्याजी व आनंदराव या दोघांकडे होता. प्राप्त परिस्थितीत आपल्या गटाला त्या वेळचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणे व प्रेरित करणे हा व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक गुण आहे. तो ही सूर्याजी व आनंदराव यांच्याकडे होता. परिस्थिती व व्यक्तिमत्त्व या दोन्हीचा परिणाम म्हणून त्यांचे नेतृत्वगुण प्रकट झाले. त्यांच्याकडे स्वराज्यनिष्ठा, शत्रूच्या अन्यायाची चीड, शौर्य, लष्करी डावपेचांचे ज्ञान, आत्मविश्वास हे सर्व गुण होतेच. पण त्यांच्यावर नेतृत्व करण्याचा प्रसंग आल्यावर त्यांनी परिस्थितीची हाक ऐकली व ‘ओ’ दिली हे महत्त्वाचे. स्वतःवर एकट्यावर कठीण प्रसंग ओढवल्यावर त्यातून वाट काढण्याला हिकमतीपणा (रिसोर्सफुलनेस) म्हणतात. पण आपल्या गटावर, समाजावर आणि देशावर किंवा आपल्या धर्मावर, तत्त्वावर आणि ध्येयावर आपत्तीचा प्रसंग ओढवला तर त्यातून गटाला पार नेणे याला नेतृत्व म्हणतात. केवळ प्रतिसाद पुरेसा नाही: नेतृत्व परिस्थितीनुसार प्रकट होते. शासनात आणि सैन्यात एका प्रमुखाला काम करणे अशक्य झाले तर कोणी जबाबदारी घ्यायची याचा क्रम ठरलेला असतो. तिथला प्रत्येकजण परिस्थितीला नियोजित प्रतिसाद देतो. मोठ्या समाजामध्ये व समाजातल्या शासन आणि सैन्याशिवाय अन्य विविध क्षेत्रांमध्ये त्या त्या परिस्थितीला आवश्यक नेतृत्व उत्स्फूर्त प्रतिसादातून येते. एखाद्या गटाचे नेतृत्व करायचे म्हणजे गटातील सर्वांबरोबर परस्पर सहकार्याची, व एकजुटीने कामाची, आवड व सवय असावी लागते. सूर्याजी व आनंदरावांकडे हे गुण असणार. आपले नेतृत्वगुण प्रकट करण्याचा त्यांच्यावर प्रसंग येईपर्यंत ते त्यांच्या फौजेमध्ये मिळून मिसळून वागत असणार. त्यांचे युद्धकौशल्य आणि स्वराज्यनिष्ठा यांची सर्वांना खात्री असणार. म्हणूनच त्यांनी आपणहून अंगावर घेतलेली नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्या फौजेने मानली. एका प्रसंगाच्या वेळी प्रकर्षाने पुढे आलेले त्यांचे नेतृत्वगुण नंतरच्या इतिहासात मात्र पुन्हा प्रकट झाले व नोंदले गेले असे दिसत नाही. सातत्याने नेतृत्व करण्यासाठी प्रतिसाद देणे, जबाबदारी घेणे, सहकार्य भावना जोपासणे यांच्याबरोबर वेगवेगळ्या परिस्थितीत प्रतिभापूर्ण, नाविन्यपूर्ण कामकाजाची पद्धत वापरावी लागते. इतरांमध्ये प्रेरणा जागवावी लागते. पंतप्रधान कै. लालबहादूर शास्त्री यांचे नेतृत्वगुण : लाल बहादूर शास्त्रींकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी अचानकच आली. त्यांनी त्या परिस्थितीचा स्वीकार केला. स्वतःच्या उदाहरणाने व भावनास्पर्शी आवाहनाने, सगळ्या मंत्रीमंडळाला, काँग्रेस पक्षाला व सर्वसामान्य जनतेला परस्पर सहकार्याने काम करण्याला उद्युक्त केले. धाडसी व अनपेक्षित निर्णय घेतले. त्यांच्या ठामपणामुळे इतरांमध्ये ठामपणा निर्माण झाला. पंतप्रधान होऊन नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे येईपर्यंत सर्वजण त्यांना पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता असेच समजत होते. कार्यकर्ताच नेता बनावा : उद्दिष्ट ठरवण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी, योजना करण्यासाठी नेत्याकडे बुद्धी लागते. त्याशिवाय प्रतिसाद देणे, जबाबदारी घेणे, सहकार्य करणे, चाकोरी सोडून लवचिकतेने नवे मार्ग शोधणे आणि इतरांमध्ये प्रेरणा जागवणे हे मनाचे भावनिक गुणही लागतात. ज्याचे मन-बुद्धीचे असे गुण विकसित झाले आहेत तोच सर्वंकष नेतृत्व करू शकेल. परिस्थितीची गरज ओळखून जो पुढे होतो, तो ती वेळ येईपर्यंत त्याच गटात राहून त्या गटाचे काम करत असतो. असे काम करणाऱ्याला कार्यकर्ता म्हणतात. श्रेष्ठ चारित्र्याचे, कणखर राष्ट्रीय वृत्तीचे कार्यकर्तेच वरील मन-बुद्धीचे गुण अंगी बाणवून सर्वंकष नेतृत्व करू शकतील. प्रबोधिनीच्या घटनेत प्रबोधिनीचा दुसरा उद्देश मांडणाऱ्या परिच्छेदाचा शेवट पुढील प्रकारे केला आहे – अशा नेत्यांची आवश्यकता ही केवळ प्रचलित कालापुरतीच नसून ती नित्याचीच निकड आहे. म्हणून सर्वंकष नेतृत्वाची धुरा आपापल्या क्षेत्रात स्वीकारतील आणि राष्ट्राच्या हाकेला ‘ओ’ देतील असे कार्यकर्ते निर्माण करणे.

३. धुराच करोनि सोडणे I कार्यकर्ते अनेक II Read More »

२. आत्मिक शक्तीचे सामाजिक प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व

भारताच्या भवितव्याचे कर्णधार : १) भारत हा समृद्ध देश व्हावा. प्रत्येक भारतीय कुटुंबात समृद्धी यावी. २) भारतात सर्व प्रकारची उत्पादने तयार करणारे उद्योग असावेत. या उद्योगांनी कोणाही व्यक्तीचे, समाज-गटाचे व निसर्गाचेही शोषण न करता उत्पादन करावे. ३) भारतातील शेती सर्वांना भरपूर अन्न, उद्योगांना कच्चा माल व अनेकांच्या हातांना सन्मानाचे काम देणारी असावी. ४) भारतात सर्वांना स्वावलंबी, स्वाभिमानी, उद्यमशील, समूहशील बनवणारे शिक्षण सर्व वयोगटांना मिळावे. ५) भारतातील वैज्ञानिक संशोधन जगाला दिशा दाखवणारे व देशाचे सर्व व्यावहारिक प्रश्न सोडवणारे असावे. ६) भारतातील शासन लोकाभिमुख, पारदर्शक, लोकांना निर्भय बनवणारे व लोकांच्या न्याय्य उपक्रमशीलतेला मदत करणारे असावे. ७) भारतातील शेती, उद्योग, विज्ञान संशोधन, शिक्षण, अर्थव्यवहार आणि प्रशासन, सुलभ व योग्य गतीने होण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान भारतातच तयार व्हावे. ८) भारताची संरक्षण क्षमता बाह्य व अंतर्गत शत्रूना जरब बसण्याइतकी तत्पर, सुसज्ज व आधुनिक असावी. वर एकेका वाक्यात ज्या आठ क्षेत्रांतील प्रगतीची दिशा मांडली आहे, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञच त्या वाक्यांचा विस्तार करू शकतील. या आठ क्षेत्रांमध्ये अन्य क्षेत्रांची भरही घालता येईल. या सर्व क्षेत्रांमध्ये भारत सतत प्रगतिशील राहावा यासाठी त्या त्या क्षेत्रातील उद्दिष्टांची मांडणी आणि फेरमांडणी पुन्हा पुन्हा कोणीतरी करायला लागेल. त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि कार्यक्रमही सांगायला लागेल. त्या कार्यक्रमानुसार काम करताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या ते ही सांगावे लागेल. प्रत्येक क्षेत्रात असे शेकडो, हजारो लोक लागतील. प्रत्येक क्षेत्रातील त्या त्या वेळची गरज ओळखून नेमके जे करायला हवे असेल ते करायला जे पुढे सरसावतील ते सर्व त्या क्षेत्रातील नेते. स्थानिक स्तरापासून देशाच्या स्तरापर्यंत अशा नेत्यांची आवश्यकता नेहमीच असते. ही जबाबदारी स्वीकारण्याची व पार पाडण्याची शक्ती म्हणजे नेतृत्व शक्ती. मागील लेखात मांडलेल्या विशेष शिक्षणाद्वारे अशी नेतृत्वशक्ती विकसित करणे हे प्रबोधिनीचे उद्दिष्ट आहे. नेतृत्वशक्तीचे स्रोत : दुसरे महायुद्ध संपताना दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचे सरसेनापती असलेले जनरल आयसेनहॉवर यांनी नंतर नेतृत्वावर एक पुस्तक लिहिले आहे. युद्धातील नेतृत्व, उद्योगातील नेतृत्व, राजकारणातील नेतृत्व यांच्या पैलूंची चर्चा करत करत शेवटी त्यांनी म्हटले आहे, की या सर्व प्रकारचे नेतृत्व हे तात्पुरते असते. खरे नेतृत्व येशू ख्रिस्त व गौतम बुद्धाने केले. कारण अशा नेत्यांचे लोकांच्या मनावरील अधिराज्य अनेक पिढ्या टिकते. शेकडो वर्षे ते लोकांच्या मनाला दिशा देतात. नेपोलियन ब्रिटिशांच्या तुरुंगात असताना त्याला आत्मपरीक्षण करायची बरीच संधी मिळाली. सहा वर्षे तुरुंगवास झाल्यावर त्याने लिहून ठेवले की ‘सीझर, शार्ले मॅग्ने, नेपोलिअन जगज्जेते व्हायला निघाले. काही काळ ते यशस्वी झाल्यासारखे दिसले. आज त्यांना कोणी विचारत नाही. परंतु येशू ख्रिस्त मात्र हजार वर्षे होऊन गेली तरी सर्वांना आकर्षित करत असतो.’ या दोन्ही सेनानींच्या लिखाणात नेतृत्वाच्या दोन प्रकारांची तुलना केलेली आहे. पहिल्या प्रकारात मन-बुद्धीच्या अनेक शक्ती वापराव्या लागतात. दुसऱ्या प्रकारात आत्मिक शक्ती वापरली जाते. पहिल्या प्रकारचे नेतृत्व लवकर समजणारे आहे. दुसरे लक्षात यायला दोन्ही सेनानींना आत्मपरीक्षण करायला लागले. पहिल्या प्रकारात आपल्या मन-बुद्धीच्या सर्व शक्तींचा योग्य वेळी उपयोग करता यावा लागतो. त्यात परिस्थिती बदलली जाते व इतर लोकांचा त्या कामातील साधन म्हणून उपयोग केला जातो. दुसऱ्या प्रकारात सर्व व्यक्तींना सारखेच महत्त्व देऊन प्रत्येक व्यक्तीला सत्प्रवृत्त करणे हेच साध्य असते. पहिल्या प्रकारच्या नेत्यांना पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, सत्ता किंवा अहंकार सुखावणे अशा कुठल्या तरी पद्धतीने आपल्या नेतृत्वाचा मोबदला हवा असतो. उद्योग, शासन आणि सैन्यात यासाठी अधिकारानुसार बंगला, गाडी, नोकर, दूरभाष, पर्यटनाच्या सवलती, क्रेडिटकार्ड, क्लबचे सभासदत्व, अशा अप्रत्यक्ष सुख-सोयींची (perks) व्यवस्था केली जाते. या सुखसोर्याच्या अपेक्षेने व त्यांच्या लाभाने अनेकांचे कर्तृत्व फुलते. इतर क्षेत्रात अन्य मार्गांनी ही गरज पूर्ण होते. या सगळ्यांचा तात्कालिक उपयोग मान्य करून प्रबोधिनीला मात्र नेतृत्वशक्तीचा दुसराही स्रोत विकसित करायचा आहे. त्यासाठी नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या नेतृत्वशक्तीचा स्रोत मन-बुद्धीच्या शक्तीऐवजी आत्मशक्तीमध्ये कसा शोधायचा, हे शिकायची दिशा दाखवायची आहे. दुसऱ्या स्रोताकडे जाण्याचे टप्पे : प्रबोधिनीच्या घटनेत प्रबोधिनीचा दुसरा उद्देश मांडताना पहिलेच वाक्य असे आहे—- भारताच्या आर्थिक, औद्योगिक, शेतकी, शैक्षणिक, वैज्ञानिक, शासकीय, तांत्रिक, सैनिकी इत्यादी प्रांगणात श्रेष्ठ चारित्र्याचे आणि कणखर राष्ट्रीय वृत्तीचे नेते पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाहीत. नेतृत्वशक्तीचा पहिला स्रोत वापरणारे अनेक जण त्यांचे चारित्र्य आणि राष्ट्रीय वृत्ती प्रकट न होताही नेतृत्व करताना दिसू शकतात. क्वचित ते आपापल्या क्षेत्रातील काम काही प्रमाणात पुढेही नेतात. परंतु ते काम राष्ट्र-जीवनाच्या इतर क्षेत्रांशी सुसंगत राहतेच असे नाही. ते काम भारतीय समाजाच्या हिताला पोषक होते असेही नाही. वरील आठही क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणाऱ्यांनी समाजाच्या सांस्कृतिक चौकटीत आपल्या क्षेत्राचा व कामाचा विचार केला पाहिजे. भारतीय संस्कृतीतून प्रेरणा घेऊन आणि भारतीय समाजाचे हित सर्व प्रथम डोळ्यासमोर ठेवून काम करणारी नेतृत्वशक्ती प्रबोधिनीला विकसित करायची आहे. भारतीय संस्कृतीतून प्रेरणा घेणाऱ्या व्यक्तीचे चारित्र्य श्रेष्ठ दर्जाचेच असेल. भारतीय समाजाचे हित सर्वप्रथम डोळ्यासमोर ठेवून काम करणारी व्यक्ती राष्ट्रीय वृत्तीचीच असेल. प्रबोधिनीला श्रेष्ठ चारित्र्य आणि कणखर राष्ट्रीय वृत्तीच्या बरोबर राहणारी नेतृत्वशक्ती विकसित करायची आहे. ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.२ भारताच्या आर्थिक, औद्योगिक, शेतकी, शैक्षणिक, वैज्ञानिक, शासकीय, तांत्रिक, सैनिकी इत्यादी प्रांगणांत श्रेष्ठ चारित्र्याचे आणि कणखर राष्ट्रीय वृत्तीचे नेते पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाहीत. अशा नेत्यांची आवश्यकता ही केवळ प्रचलित कालापुरतीच नसून ती नित्याचीच निकड आहे. म्हणून सर्वंकष नेतृत्वाची धुरा आपापल्या क्षेत्रात स्वीकारतील आणि राष्ट्राच्या हाकेला ‘ओ’ देतील असे कार्यकर्ते निर्माण करणे.

२. आत्मिक शक्तीचे सामाजिक प्रकटीकरण म्हणजे नेतृत्व Read More »