अ )प्रस्तावना –
हिंदू समाजातील अनेकांना विविध निमित्तांनी घरात अथवा संस्थेत काही धार्मिक संस्कार करवून घेण्याची गरज वाटत असते. हे संस्कार त्यातील अर्थ समजून घेऊन व्हावेत, नवशिक्षितांना संस्कारामधील उदात्त आशय कळावा, जे लोक कर्मकांडास कंटाळले आहेत त्यांना आधुनिक काळाला योग्य असे महत्त्वाचे पण सुटसुटीत विधी करता यावेत या हेतूंनी ज्ञानप्रबोधिनीने ‘धर्मनिर्णय मंड़ळ, लोणावळा’ यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विविध संस्कारांच्या (मंत्र आणि अर्थ यांनी युक्त अशा) पोथ्यांची रचना केली आहे.
ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने पौरोहित्य करू इच्छिणार्या अथवा केवळ ही पद्धत समजून घेण्याची इच्छा असणार्या स्त्री-पुरूषांसाठी ज्ञानप्रबोधिनीत १९९० सालापासून पौरोहित्य प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत. या वर्गांमधून प्रशिक्षित झालेल्या महिला आणि पुरूष-पुरोहितांचा एक संच ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने संस्कारविधी करण्याचे कार्य करीत आहे. त्या शिवाय या वर्गामधून प्रशिक्षित झालेले अनेक स्त्री-पुरूष स्वयंपुरोहित म्हणून स्वत:च्या घरातील संस्कार स्वत:च ज्ञानप्रबोधिनीच्या पोथ्यांच्या आधारे करीत आहेत.
ब) पौरोहित्य वर्गाचे उद्देश –
१) मंत्रांचे, श्लोकांचे अर्थ उपस्थितांना समजावून देत विधी करणारे पुरोहित तयार व्हावेत.
२) शुद्ध आचार, विचार,उच्चार असणार्या सर्वांनाच पौरोहित्याचा अधिकार आहे,आणि पुरूषांप्रमाणे स्त्रियांनीसुद्धा तसेच सर्व जातींच्या व पंथांच्या व्यक्तींनीही संस्कारविधींचे पौरोहित्य करण्यास हरकत नाही हा विचार समाजात रुजावा.
३) संस्कारांच्या पद्धतीत कालोचित बदल करणे हे धर्मशास्त्रदृष्ट्या अयोग्य नाही किंबहुना आवश्यक आहे हे ज्ञान प्रबोधिनीच्या पुरोहितांच्या माध्यमातून लोकांना कळावे.
४) धार्मिक संस्कारांच्या माध्यमातून समाजात डोळस सद्भावना, ईश्वरनिष्ठा, ऐक्यभावना इ. सदगुणांचे बीजारोपण करणारा पुरोहितवर्ग निर्माण व्हावा.
क)पौरोहित्य वर्गाचे स्वरूप –
ज्ञानप्रबोधिनीच्या ‘संस्कृत संस्कृति संशोधिका’ या विभागाने आत्तापर्यंत गेल्या काही वर्षांमधे विविध पूजा, शांती,आणि संस्कारांच्या सुमारे २१ पोथ्या प्रकाशित केल्या आहेत. अनेक विधींमध्ये काही कालोचित बदल केले आहेत. या पोथ्यांच्या आधारे संस्कारविधी करणे, मंत्र आणि श्लोक यांचे शुद्ध उच्चारण करणे ,त्या त्या संस्कारविधींचे महत्त्व आणि त्यातील आशय लोकांना समजावून सांगणे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण या पौरोहित्यवर्गात दिले जाते. संस्कारांचे प्रात्यक्षिकसुद्धा करून दाखविले जाते. शक्य असेल तेव्हा प्रशिक्षणार्थींकडून करवून घेतले जाते.
प्रवेश पात्रता – इ. १२ वी उत्तीर्ण; संस्कृत भाषेचा प्राथमिक परिचय असल्यास उपयुक्त, रामरक्षा अथवा अन्य संस्कृत स्तोत्र, गीताध्याय शुद्ध म्हणता येणे, गद्य वाचन शुद्ध, सुस्पष्ट आणि भाव समजून करता येणे.
ड) महत्वाची सूचना –
१) धर्मसंस्कार करण्याची ज्ञान प्रबोधिनीची पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी असून संस्थेच्या पोथ्यांच्या आधारेच संस्कारविधी शिकवले जातील.
२) संस्कारांचे पौरोहित्य करण्यास पात्र ठरण्यासाठी वर्गातील नियमित उपस्थिती, शुद्ध उच्चारण, पौरोहित्याच्या वेळी सांगितल्या जाणार्या माहितीची तयारी इ. विविध गोष्टींचा विचार केला जातो.
३) ज्ञान प्रबोधिनीचे अधिकृत पुरोहित म्हणून काम करण्यापूर्वी ज्या गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक असते त्याची माहिती वर्गामध्ये दिली जाईल.
इ) या वर्गामध्ये पुढील पोथ्यांचे प्रशिक्षण दिले जाते –
१) पूजा – २) शांती –
१) वटसावित्री पूजा १) साठी शांती
२) श्रीसत्यनारायण पूजा २) सहस्रचंद्रदर्शन शांती
३) हरितालिका पूजा ३) वेदपूजन उपासना (उदकशांती)
४) श्रीगणेशस्थापना पूजा ४) वास्तुशांती
५) दीपावलीतील लक्ष्मीपूजन
३) संस्कार –
१) नामकरण उपासना (बारसे)
२) विवाह संस्कार
३) उपनयन
४) श्राद्ध
पौरोहित्य : सामाजिक समुपदेशनाचे साधन
लेख क्र. ४१ १५/०७/२०२५ कटुता न ठेवता, राग लोभ दूर सारून पुरोहितांना संघटनाचे म्हणजेच जोडण्याचे काम करायला लागते. ‘पुरोहित’ या
एकात्मतेचा अंतर्गत तरल प्रवाह…
लेख क्र. ४० १४/७/२०२५ संत्रिकेमध्ये निरंतर सुरू असलेले संस्कारसेवेचे काम विविध समाजगटात पोहोचविण्याचा प्रयत्न असतो. सुरुवातीच्या काळातील बुरुड समाजातील सामूहिक
स्त्री-उपनयन : एक संस्कार, एक परंपरा
लेख क्र. ३९ १३/०७/२०२५ मुलींचे उपनयन अगदी अल्पप्रमाणात का होईना पुन्हा एकदा समाजमान्य होऊ लागले आहे. वास्तविक पाहता उत्तम शिक्षण
प्रबोधिनीचा आगळा-वेगळा ‘पौरोहित्य’ उपक्रम
लेख क्र. ३७ ११/७/२०२५ ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड ३ (१९८८) या ग्रंथात संस्कृत-संस्कृति-संशोधिका (संत्रिका) विभागाचे माजी
सार्थ, समंत्रक विवाहसंस्काराविषयी मनोगत
लेख क्र. ३५ ९/७/२०२५ संत्रिकेच्या पौरोहित्य उपक्रमाबद्दल आपण मागच्या काही लेखांमध्ये बघितले. पोथ्यांचे प्रशिक्षण देऊन विभागाने अनेक पुरोहित घडवले. हे
संस्कारांचे पुनरुज्जीवन
लेख क्र. ३४ ०८/०७/२०२५ प्रा. विश्वनाथ गुर्जर यांनी संस्कारांमागील तात्त्विक भूमिकेचा विचार मांडला. त्यानंतर महिला पुरोहितांचा धार्मिक कार्यातील सहभाग समजून
स्त्री-पौरोहित्य : एक परिवर्तन
लेख क्र. ३३ ०७/०७/२०२५ मागील लेखात आपण ज्ञान प्रबोधिनीच्या धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका समजून घेतली, पौरोहित्य उपक्रमातील सार्थता, सामूहिकता, शिस्तबद्धता
ज्ञानप्रबोधिनी-प्रणीत धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका
लेख क्र. ३२ ६/७/२०२५ ‘संत्रिका’ विभागात जसे संस्कृत संवर्धन व संशोधनावर काम चालू होते, त्यालाच समांतर ‘धर्मनिर्णय मंडळ, लोणावळा’ यांच्या
संत्रिकेच्या सुवर्ण महोत्स्तवानिमित्त माधुरीताई कोटीभास्कर यांनी रचिलेले पद्य
रूप पालटू देशाचे हा ध्यास घेऊनी मना
संस्कृत संस्कृती संशोधनपर न्यासाची स्थापना।।धृ।।
पुराण वेदातूनी संस्कृती साकल्ये जाणूनी
अनिष्ट रूढी परंपरांना समूळ उच्चाटूनी
विश्वमान्यता संस्कृत संस्कृती संस्कारा देण्या
संस्कृत संस्कृती संशोधनपर न्यासाची स्थापना ।।१।।
आचारासह विचारात जी रुजवी उत्तमता
भारतीय संस्कृतीची संस्कृत वाङ्मयीन माता
उद्धरण्या तिज पुनर्स्थापण्या गतवैभव देण्या
संस्कृत संस्कृती संशोधनपर..।।२।।
मधुर ऋचानी रचिला अमुच्या संस्कृतिचा पाया
यज्ञयाग अन् पूजा शान्ति संस्कारांचा गाभा
जुने जपोनी स्थलकालोचित धर्मविधी साधण्या…..
संस्कृत संस्कृती….।।३।।
अर्थासह शुद्धता स्पष्टता इष्टाला धरुनी
आशयघन संस्कार साधता सुयोग्य शब्दातूनी
परिवर्तनशील विचारातूनी घेऊनिया प्रेरणा
संस्कृत संस्कृती संशोधनपर ..।।४।।
मातृभूमीचे ऋण आम्हावर, सदैव तिजला पूजू
मनोबलाने उद्धरण्या तिज जीवन सेवा रुजू
धर्मविधींच्या माध्यमातूनी संस्कृती जोपासण्या
संस्कृत संस्कृतीl।५।।
जाति पंथ खुलवती संस्कृती भेदा नाही वाव
परस्परांना पूरक होईल एकत्वाचा भाव
मातृभूमी ही जगति साऱ्या वंदनीय करण्या
संस्कृत संस्कृती संशोधनपर न्यासाची स्थापना l। ६।।
- रूप पालटू देशाचे