समुद्र आणि कालव्यातील झडपा (लॉक) : १९९१ साली एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात एका नामवंत शिक्षण तज्ज्ञांना मुख्य भाषण द्यायला निमंत्रित केले होते. त्यांच्या व्याख्यानाचे शीर्षक होते ‘Rising Tide Raises All Ships’. समुद्राला भरती आली की छोट्या होडक्यापासून तेलवाहू टँकरपर्यंतच्या सर्व आकाराच्या जहाजांची पातळी वर जाते असा त्या शीर्षकाचा अर्थ. प्रज्ञावंतांच्या शिक्षणात सापडलेली प्रज्ञा-विकासाची सूत्रे सार्वत्रिक शिक्षण पद्धतीत वापरा व सर्वांचा प्रज्ञा-विकास करा हा त्यांच्या प्रतिपादनाचा सारांश होता.
त्यांच्या शीर्षकाची निवड अतिशय उत्तम होती. सर्वांचा प्रज्ञा-विकास व्हावा ही कळकळ त्यातून व्यक्त होत होती. पण ज्या देशात प्रज्ञावंतांच्या प्रज्ञा-विकासाची चळवळ ६५-७० वर्षे चालू होती त्या देशातले अनुभव ते सांगत होते. त्यांच्या शीर्षकातून दिशा उत्तम व्यक्त झाली. परंतु समुद्राला भरती आणण्याचे काम आज तरी माणूस करू शकत नाही हे वास्तव आहे. समुद्रातली किंवा मोठ्या सरोवरातली जहाजे कालव्यातून नेताना त्यांना काही वेळा उचलावे लागते. पनामा कालव्यातून किंवा सुवेज कालव्यातून जहाजे एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात जाताना दोन्ही समुद्रातील पाण्याची पातळी सारख्या उंचीची नसल्याने जहाजांना उचलून दुसऱ्या समुद्रात ठेवावे लागते. या साठी कालव्यात दारे बसवून, दोन्ही बाजूंची दारे बंद करून त्यांच्यामधल्या भागात पंपाच्या किंवा गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने पाण्याची पातळी वाढविण्याची सोय काही ठिकाणी केलेली असते. कालव्यातील अशा जागांना झडपा किंवा लॉक (lock) असे म्हणतात. पाश्चात्य देशांमध्ये १९२५ च्या सुमारास प्रज्ञावंतांना निवडून त्यांच्या प्रज्ञा-विकासाचे जे प्रयोग सुरू झाले ते अशा झडपांसारखे होते. समुद्राला भरती आणून सर्व जहाजे वरती उचलता येत नाहीत म्हणून झडपांमधली मोजकी जहाजे उचलण्यासारखे हे प्रयोग होते.
भारतातील चिंतन : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रबोधिनीच्या संस्थापकांनी जे चिंतन सुरू केले त्याचे थोडक्यात सार असे मांडता येईल विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात देशात प्रगती घडवून आणायची असेल तर शिक्षण हेच त्या प्रगतीचे मूलभूत साधन आहे. शिक्षणामुळे अनेक विचारवंत व नेते पुढे आले पाहिजेत. विचाराने व कर्तृत्वाने जे मोठे आहेत तेच देशाच्या प्रगतीचे कर्णधार होऊ शकतात. असे नेते पुढे आणण्यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रयत्न झाले पाहिजेत. ज्या क्षेत्रातले प्रश्न समजण्यासाठी उच्च कोटीची बुद्धिमत्ता लागते, त्या क्षेत्रातले नेते घडण्यासाठी उच्च कोटीच्या बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली पाहिजे. उच्च बुद्धिमत्ता, स्वयंप्रज्ञा, दूरदृष्टी, उत्साह अशा क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांमधून तरुणपणीच देशाच्या प्रगतीची जबाबदारी घेणारे नेते कसे तयार होतील याच्या पद्धती शिक्षण क्षेत्रातील जाणकार लोकांनी शोधून काढल्या पाहिजेत.
प्रबोधिनीच्या स्थापनेच्या वेळी औद्योगिकीकरण, शेतीचे आधुनिकीकरण इ. आव्हानांपासून अणुशक्ती विकास व अंतरिक्ष क्षेत्रातील स्वावलंबनाच्या आव्हानांपर्यंतची आव्हाने भारतासमोर होती. ही आव्हाने घेणारे नेते कुशाग्र बुद्धीचे असायला लागतील. आजचे प्रश्न ऊर्जेचे स्वस्त, स्वच्छ व शाश्वत स्रोत हस्तगत करणे, पृथ्वीच्या पर्यावरणाचा तोल सांभाळणे, नॅनो तंत्रज्ञानाचा विकास करणे असे असतील. प्रश्न किंवा आव्हाने बदलली तरी त्या क्षेत्रात कुशाग्र बुद्धीचे नेते लागतीलच. संपत्तीची निर्मिती आणि संपत्तीचे न्याय्य वितरण किंवा सुखसोयी आणि सुखसाधने यांच्या मुबलकतेत मनाने स्थिर राहणे असे सामाजिक व मानसिक प्रश्न सोडवायलाही कुशाग्र बुद्धीच्या व्यक्तींची आवश्यकता आहे. म्हणून कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांमधून असे नेते कसे घडतील हा प्रबोधिनीच्या संस्थापकांनी आरंभिलेला शैक्षणिक प्रयोग आहे.
बुद्धी कुशाग्र व्यापक : एखादी गोष्ट वेगाने समजून घेणे, एखादी गोष्ट वेगाने स्मृतीत साठवणे, स्मृतीत साठवलेली एखादी गोष्ट वेगाने आठवणे आणि नवीन व पर्यायी कल्पना वेगाने सुचणे, अशी कार्यक्षम बुद्धीचा वेग दर्शविणारी विविध कार्ये आहेत. गुंतागुंतीची समस्या किंवा परिस्थिती थोडक्या वेळात लक्षात येणे, एखाद्या समस्येतील काही प्रकट घटकांवरून अन्य प्रकट गोष्टींचा अंदाज येणे आणि विविध स्थळ-काळ-प्रसंगांमधली साम्यस्थळे लक्षात येणे, अशी कार्यक्षम बुद्धीची जटिलता जाणण्याची क्षमता दर्शविणारी विविध कार्ये आहेत. वेग आणि जटिलता जाणण्याची क्षमता असलेल्या बुद्धीला कुशाग्र बुद्धी म्हणता येईल.
अनेक वेगवेगळे विषय, माहिती आणि कामे हाताळण्याची क्षमता म्हणजे बुद्धीचा आवाका होय. कोणतीही गोष्ट तिच्याहून अधिक मोठ्या अशा कोणत्या गोष्टीचा भाग कशी आहे हे लक्षात येणे आणि सतत अधिक मोठ्या गोष्टीचा शोध घेत राहणे म्हणजे बुद्धीचे साकल्य. मोठा आवाका आणि साकल्य असलेल्या बुद्धीला व्यापक बुद्धी म्हणता येईल. प्रत्येकाला दोन्ही प्रकारची बुद्धी लागतेच परंतु ढोबळमानाने चिंतकाला व्यापक बुद्धीची अधिक जरूर आहे. तर कर्त्या व्यक्तीला कुशाग्र बुद्धीची अधिक गरज आहे असे म्हणता येईल.
देशाच्या विविध क्षेत्रांमधील परिस्थितीला प्रतिसाद देणाऱ्या नेत्याकडेही व्यापक बुद्धी लागेलच. पण ती कमी जास्त असली तरी त्याला कुशाग्र बुद्धी निश्चितच हवी. हे अभिप्रेत नेतृत्व उपलब्ध होण्याचे उगमस्थान म्हणजे या राष्ट्रातील कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या होत असे प्रबोधिनीचे गृहीत आहे. प्रबोधिनीतील संशोधनानुसारच कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी म्हणजे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी. (पाहा पान ३१ : प्रयोगातून उद्देशाचा अर्थविस्तार) त्यांच्या त्यांच्या बुद्धीचा विकसित पैलू लक्षात आला की ते ही नेतृत्व उपलब्ध होण्याचे उगमस्थान झाले.
राष्ट्रीय वृत्तीच्या नेतृत्वासाठी कुशाग्र बुद्धी: अभ्यासक्रमातील परीक्षांमधील यश, व्यावहारिक यश, संशोधनातील यश यासाठी आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्व आणि प्रतिभा यासाठी लागणारी बुद्धिमत्ता कुशाग्र असतेच. परंतु या सगळ्यामध्ये बुद्धिमत्तेचा उपयोग वरवरचा आणि तात्पुरता होतो. मोठ्या संख्येने लोक एकत्र करणे, त्यांना एक विचाराचे करणे, त्यांना समान ध्येयाने प्रेरित करणे, त्यांच्यासह मोठे व्याप उभारणे व व्यापक कामे शेवटाला नेणे याला लागणारी बुद्धिमत्ताही मानवी स्वभावातील वैविध्याचा, मानवी आशा-आकांक्षांचा, मानवी हित-संबंधांचा वेध घेणारी कुशाग्र बुद्धीमत्ताच आहे. राष्ट्राला अशी कामे करू शकणाऱ्या नेत्यांची आवश्यकता आहे. इथे बुद्धिमत्तेचा उपयोग अधिक टिकाऊ परिणामांसाठी होतो.
यासाठी समुद्राला भरती आणण्याचे ध्येय ठेवून अधिकाधिक मोठ्या आकाराच्या झडपांमध्ये भरती आणण्याचे म्हणजेच समाजाच्या दुर्लक्षित गटांमध्ये दडलेली कुशाग्र बुद्धिमत्ता शोधून काढून तिचा विकास करण्याचे काम करत राहिले पाहिजे.