जीवनात जे सहजपणे प्राप्त झाले त्यात समाधान मानून राहणार्यास शारीरिक वा बौद्धिक सामर्थ्य वाढवण्यासाठी विशेष काही साधना करण्याची आवश्यकता जाणवत नाही. याउलट आयुष्यात आपण आज आहोत त्यापेक्षा अधिक काही बनावे, खूप मोठे व्हावे, उत्तुंग व्यक्तिमत्त्व घडवावे अशी आस ज्याला असते ती व्यक्ती आपली निसर्गप्राप्त साधनसामग्री काय आहे याची नीट माहिती घेऊन शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक विकासाची कमाल मर्यादा गाठण्यासाठी प्रयत्नशील असते. या प्रयत्नांनाच साधना किंवा उपासना म्हणतात.
‘यत्नाचा पुरुष भाग्याचा, यत्नेविण दरिद्रता’ या वचनात रामदासांनी परिस्थितीवर मात करून मोठेपण मिळवणार्यांना भाग्यवंत म्हटले आहे आणि आहे त्या परिस्थितीत निमूटपणे जगणार्यांना दरिद्री म्हटले आहे. आपल्या भोवतालची जीवसृष्टी खरोखरी केवढी तरी संपन्न आहे! पण पाच-पाच डोळे असणार्या मधमाशीचे वैभव अभ्यासण्याबरोबर सूक्ष्मदर्शक आणि दुर्बीण बनवून माणसाने आपल्या दोन डोळ्यांचे सामर्थ्य विकसित करण्याची ज्ञानसाधना वर्षानुवर्षे चालवीत असल्याने तो भाग्यवान बनला आहे. वटवाघुळाची श्रवणशक्ती अद्भुत आहे असे केवळ म्हणत न बसता माणसाने त्याची शक्तीही ‘रडार’ बनवून आत्मसात केली आहे.
पंचज्ञानेंद्रियांची शक्ती वाढवत राहणे हे माणसाचे काम वर्षानुवर्षे चालूच आहे. पण माणसाच्या मेंदूची, त्याच्या बुद्धीची, स्मरणाची, प्रतिभेची शक्ती वाढवणेही शक्य आहे. मनाचे सामर्थ्य, आत्मिक बळ वाढवणेही शक्य आणि आवश्यक आहे. त्यासाठी विशेष साधनेची गरज आहे. संगणकाने मानवी मेंदूची प्रतिकृती बनवली तरीही त्या यंत्रापेक्षा असे यंत्र घडवणार्या मानवी मेंदूचे सामर्थ्य कल्पनातीत आहे हे सत्य स्वीकारून प्रयत्नशील बनल्यास व्यक्तीमधील सुप्त क्षमतांचा विकास होणार आहे यात संशय नाही.
यासाठी प्रथम आपण हे समजून घ्यायला हवे की प्रचंड क्षमतांचा अज्ञात ठेवा घेऊन या जगी आलेले हे शरीर आहे. कित्येक एकर भूमीला वळण घालू शकणार्या वटवृक्षाचे बीज डोळ्यालाही न दिसण्यासारखे सूक्ष्म असते, प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी हे सूक्ष्म बीज आहेच. त्या बीजशक्तीवर विश्वास ठेवणारी व्यक्ती दशदिशांना व्यापून टाकणारे वटवृक्षासारखे व्यक्तिमत्त्व साकार करू शकते. वाढणे हा जीवनाचा स्वभाव आहे. जे गतिहीन ते मात्र मरणपंथास लागले आहे असे खुशाल समजावे असे स्वामी विवेकानंद सांगून गेले. ते असेही म्हणाले होते की स्वतःवर विश्वास असणार्या व्यक्तीस आस्तिक म्हणावे, केवळ वेगवेगळ्या देवदेवतांना भजणारा माणूस आस्तिक असेलच असे नाही.’
स्वतःवर विश्वास ठेवणार्या माणसाने अस्तिपक्षी विचार करायला हवा, भावात्मक चिंतन करायला हवे. आपल्या ठिकाणी पूर्णत्वाचे बीज आहे, देवत्वाची दिव्य ज्योत आपल्या हृदयमंदिरात तेवते आहे यावर त्याचा विश्वास हवा. यासाठी ‘काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल’ हा भाव स्थिर व्हायला हवा. ही गोष्ट आपोआप होणार नाही, प्रयत्नसाध्य आहे. त्यासाठी रोज त्या आत्मारामाशी मनाने बसायला हवे, त्याच्याशी संवाद साधायला हवा, यालाच उपासना म्हणतात. स्त्री-पुरुषांनी दैनंदिन जीवनात यासाठी काहीना काही वेळ द्यायला हवा. स्त्रियांनी जर उपासनेची महती ओळखली तर त्यांच्या द्वारे कुटुंबावर, परिसरावर त्याचा मोठा प्रभाव पडणार आहे.
उपासना कशी करावी? – शुचिर्भूत होऊन आपणच स्वच्छ केलेल्या जागी स्वच्छ, मऊ अशा आसनावर धूतवस्त्रे परिधान करून शक्यतो प्रातःसंध्येस वा सायंसंध्येस बसावे. हे न जमल्यास जमेल तेव्हा जमेल तिथे ताठ बसावे. डोळे मिटून सर्व हालचाल थांबवून केवळ आपल्या हिताचा विचार करावा. लक्ष एकाग्र होण्यासाठी समोर इष्ट देवता किंवा ओंकारचिह्न असेल तर चांगले. गडबड गोंधळ आसपास नसेल तर चांगले. एखादी उदबत्ती लावली तर वातावरण प्रसन्न होऊन मनाला प्रसन्नता येईल.
‘चिदानंदरूपी शिव मी शिव मी (चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहं।)’ हे वचन आद्य शंकराचार्यांचे आहे. ‘मी मूर्तिमंत चैतन्य आहे, आनंदाचे मूर्तरूप मी आहे, मांगल्याची मूर्ती मी आहे’ असा या मंत्राचा अर्थ आहे. हा अर्थ समजून घेऊन पाच वेळा तरी दररोज म्हणावा. उपासनेस तीनदा ओंकार म्हणून प्रारंभ करावा. सर्व देवदेवतांचे प्रतिनिधित्व ‘प्रणव म्हणजे ओंकार’ करत असल्याने त्याच्या उच्चाराने तुम्ही जे म्हणणार आहात त्यास मंत्राचे सामर्थ्य येत असते. उपासनेनंतरही त्यातील आशय मनोमन घोळत ठेवावा. मग आळस, खिन्नता, नैराश्य अन् अशुभ विचारांना दूर ठेवण्याची क्षमता येईल.
गायत्री उपासना ईश्वर-उपासनेचा एक उत्तम, सरळ आणि लवकर फळ देणारा मार्ग आहे. मृतप्राय व्यक्ती विश्वासाने बरी होते. विश्वासाने, श्रद्धेने म्हटल्यावर गायत्री मंत्र अद्वितीय शक्ती देतो, सद्बुद्धी देतो, रजोगुण व तमोगुण कमी करतो. त्यामुळे शुद्ध सात्त्विक गुणाची वाढ होते, शरीरात विशुद्ध रक्तीची वाढ होते, चर्या बदलते, सात्त्विक आहार आवडू लागतो. हा फलदायक गायत्री मंत्र स्त्रियांनी म्हणू नये असे म्हटले जाते, परंतु, यमस्मृती, वासिष्ठस्मृती यांमध्ये म्हटले आहे की स्त्रियांनी गायत्री मंत्राचा जप केल्यास त्यांना इष्ट फलप्राप्ती होते. नंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी माई भगवती, ठकुराणी यांसारख्या साध्वींना प्रकटपणे गायत्री मंत्र दिला.
म्हणून सर्वांनीच विधिपूर्वक विद्याव्रत घेऊन गायत्री मंत्र शिकावा व त्याचा अर्थ समजून घेऊन नित्य उपासना करावी.
मी स्वतः शक्ती आहे, मी माझ्या बुद्धीचे, प्रतिभेचे, मनाचे बळ अधिकाधिक प्रकट करण्याचे ठरवले आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मी बलहीन राहणार नाही, कारण ‘नायमात्मा बलहीनेन लभ्यः’ हे मला पटले आहे. सार्या उपनिषदांचे सार ‘सामर्थ्य’ हे आहे. ‘शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांचे बळ मी मिळवीनच मिळवीन’ अशा अर्थाचे चिंतन गायत्री मंत्रानंतरच्या ध्यानामध्ये करणे हिताचे होईल.
उपासना देवावर विश्वास असणार्यांनी करावी अशी ती नास्तिकांनीही करावी. त्यांचा स्वतःवर, स्वतःच्या आत्मशक्तीवर विश्वास असला म्हणजे झाले. ‘माझ्या हातून माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या समाजासाठी किंवा सर्व मानवतेसाठी काही ना काही सेवा घडावी’ अशी उत्कट इच्छा उपासनेतून प्रबळ व्हावी. व्यक्तीच्या आत्मिक विकसनासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी उपासनेसारखे साधन नाही. म्हणून समर्थ रामदास आग्रह धरतात, “उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांस सदा नमावे। सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वा मुखी मंगल बोलवावे॥