‘सप्त-सेविका’ भारताच्या 

सात ह्या संख्येत काय जादू आहे! रंगांची उधळण सप्त रंगात, आठवड्याची विभागणी सात दिवसात आणि सात सूरातून मधूर संगीत तयार होते. सात आश्चर्येसुद्धा सात आहेत. म्हणूनच आपण वेगळ्या वाटेवरून जाणार्‍या सातासमुद्रा पलिकडून भारतात आलेल्या सात तेजस्विनींची, सप्त सेविकांची ओळख येथे करून घेणार आहोत. 

१. अ‍ॅनी बेझंट –  ह्या आयरिश होत्या. ‘बायबल’ परस्पर विसंगत तत्त्वाने भरले आहे असे त्यांना वाटू लागले. धार्मिक परंपरा व श्रद्धा यावरचा विश्वास कमी होऊ लागला. त्यातच थॉमस स्कॉट ह्या लेखक व धर्मसुधारकाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. ब्रॅड लॉ ह्यांचा सुद्धा त्यांच्यावर पगडा होता. ब्रॅड लॉ हे तर नास्तिकांचे शिरोमणी म्हणूनच ओळखले जात, ते स्वतः वर्तमानपत्र चालवत. अ‍ॅनी त्यांच्याबरोबर काम करत असत. ब्लॅव्हट्स्की हे थिओसॉफीतील त्यांचे गुरू होते. अल्कॉट, ब्लॅव्हट्स्की अ‍ॅनी ह्या तिघांनी १८७५ मध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. धर्म म्हणजे अनुभूतीचे विश्व आहे हा विवेकानंदांच्या विचारांशी जुळणारा विचार त्यांना भावला होता व त्यामुळे हिंदू तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. १८९३ मध्ये त्या प्रथमच भारतात आल्या. सुरुवातीची १०-१२ वर्षे त्यांनी फक्त शिक्षण क्षेत्रात काम केले, धर्माचा व संस्कृत विषयाचा अभ्यास केला. त्यांनी गीतेचे समश्लोकी भाषांतर इंग्रजीत केले. जेव्हा त्या पहिल्यांदा कलकत्त्यात गेल्या तेव्हा बिपिनचंद्रांची व त्यांची भेट झाली. त्यांना त्यांच्या भोवती तेजोवलय दिसले असा उल्लेख आहे. अ‍ॅनी बेझंट यांनी काशीत महिला शिक्षणासाठी महाविद्यालय काढले, तसेच विना-अनुदानी अनेक शाळा काढल्या. १९०७ मध्ये अल्कॉट यांच्या मृत्यूनंतर थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या अध्यक्षा झाल्या. 

साधारण १९१३ पासून त्यांनी हिंदुस्थानाच्या राजकारणात काम करायला सुरुवात केली. ‘न्यू इंडिया’ व ‘नॅशनल कंव्हेंशन’ ही वर्तमानपत्रे काढली. महात्मा गांधींच्या असहकार चळवळीस त्यांचा विरोध होता, पण त्यांच्याबरोबर काम करताना त्या सूत कताई शिकल्या. त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली, तसेच त्या काही काळ टिळक पक्षाच्या धुरिणी होत्या. १९१९ मध्ये मॉंटेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा झाल्या, त्या कमिटीसमोर अ‍ॅनी बेझंट यांनी आपले विचार मांडले. अशाप्रकारे त्या राजकारणात सक्रिय होत्या. अर्थात इंग्लंड मधील जडणघडणीचा, विचारांचा त्यांना उपयोग झाला. त्यांचे वक्तृत्व इतके चांगले होते की बर्नाड शॉ यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांनी काढलेले षड्चक्राचे चिह्न चेन्नईच्या थिओसॉफिकल सोसायटीचे बोधचिह्न म्हणून स्वीकारले गेले, ते आजही तिथे प्रचलित आहे. 

२. भगिनी निवेदिता – ह्या स्वामी विवेकानंदांच्या मानसकन्या व हिंदू धर्माच्या थोर प्रचारिका होत्या. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव मार्गारेट नोबेल होते. त्या जन्माने आयरिश होत्या. त्यांचे वडील ख्रिश्चन धर्मोपदेशक होते. २२ ऑक्टोबर १८९५ रोजी त्यांची स्वामी विवेकानंदांशी भेट झाली. पहिल्याच दर्शनाने त्या प्रभावित झाल्या. स्वामीजींना सुद्धा तिच्यातल्या अदृश्य कर्तृत्वगुणांचा साक्षात्कार झाला. त्यांनी त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून शिष्यपरिवारात दाखल केले. मार्गारेटने आपण करीत असलेल्या साहसाचा पूर्णपणे साधक-बाधक विचार केला, त्यानंतरच १८९८ च्या जानेवारीत भारतात पाऊल टाकले. 

‘एका परधर्मी स्त्रीला हिंदू धर्मसाधनेचा अधिकार नाही व तिने मंदिरात प्रवेश करता कामा नये’ अशी विरोधी विचारांची वादळे अनेक लोकांनी उठवली. परंतु स्वामीजींनी सर्वांची समजूत पटवून ती शमवली. भारतात राहून मार्गारेटने हिंदुत्वाचे अनेक संस्कार प्राप्त करून घेतले. २९ मार्च १८९८ ला स्वामीजींनी मार्गारेटला विधिपूर्वक ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा दिली व तिचे नाव ‘निवेदिता’ ठेवले. त्यांनी निवेदिताला हिंदू समाजाचे मानबिंदू समजावून दिले. तिला बरोबर घेऊन प्रवास करत देशाच्या तसू-तसू भूमीचे तीर्थरूपत्व तिच्या प्रत्ययाला आणून दिले. ह्या प्रवासावर आधारित निवेदितांनी ‘द मास्टर अ‍ॅज आय सॉ हिम (the master as I saw him)’ पुस्तक लिहिले. ‘योग संघटना’ हे त्यांचे स्वप्न होते. बंगालमधील क्रांतीकार्यात अग्रेसर असलेल्या त्या अनुशीलन समितीच्या सभासद होत्या. चित्रकला, स्थापत्यशास्त्र ह्या विषयात त्यांना रुची होती. 

१२ नोव्हेंबर १८९८ रोजी निवेदितांनी बालिका विद्यालयाची स्थापना केली. या शाळेतील शिक्षण स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा याविषयी प्रेम व अभिमान निर्माण करणारे होते. १८९९ मध्ये कलकत्त्यात प्लेगने थैमान घातले तेव्हा निवेदितांनी सर्वप्रकारच्या लोकसेवेत अग्रभाग घेतला. स्वामीजींच्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने पुढील धोरण आखले. त्यांची राष्ट्रप्रेरणा व्यक्तिगत साधनेच्या इच्छेपेक्षा अधिक प्रबळ होती. देशभक्त व स्वार्थत्यागी वृत्तीच्या तरुणांचे संघ त्यांनी उभे केले. अरविंदबाबू, बारिंद्र भूपेंद्र, लोकमान्य टिळक, नामदार गोखले, रवींद्रनाथ ठाकूर, इ. नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संपर्क होता. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले तेव्हा त्यांनी प्रखर विरोध दाखविला. भारताच्या क्रांतिचक्राला त्यांनी गती दिली. तसेच रवींद्रनाथ ठाकूर, जगदीशचंद्र यांच्या यशामागे निवेदितांचा हात होता. जगदीशचंद्रांच्या अनेक पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले. आरंभी त्यांना मूर्तिपूजा मान्य नव्हती पण ‘काली द मदर’ हे पुस्तक त्यांनी लिहिले ज्यात त्यांनी इतिहासावरही बरेच लिखाण केले आहे. 

३. आयडा स्कडर – ह्या मूळच्या अमेरिकन होत्या. त्यांचे वडील दक्षिण भारतातील बेलूर येथे मिशनरी डॉक्टर होते. आयडा मात्र शिक्षणासाठी अमेरिकेत राहत होत्या. आई-वडील दोघेही भारतात समाजसेवा करत होते. त्या वयाच्या १६-१७ व्या वर्षी भारतात आल्या, ते आईला भेटायला. एका रात्री आयडा ह्यांच्या घराचे दार तीनदा वेगवेगळ्या वेळी वाजले. प्रत्येक वेळी वेगळी व्यक्ती आपल्या बायकोची अडलेल्या बाळंतपणातून सुटका करण्यास मदत मागत होती. आयडाने त्यांना सांगितले की मी डॉक्टर नाही, माझे वडील डॉक्टर आहेत त्यांच्याबरोबर मी येते. पण परपुरुषासमोर येण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे असा विचार त्या प्रत्येकाचा होता. अर्थातच ते मदत न घेता गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी दारावरून तीन प्रेतयात्रा गेल्या, तेव्हा आयडाने नोकराकडून खात्री करून घेतली की त्या त्याच बायका आहेत. ह्या प्रसंगामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलले. त्यांनी कलाशाखेतील शिक्षण सोडून १८९५ मध्ये अमेरिकेत गेल्यावर फिलाडेल्फिया येथील मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. १९०० साली त्यांनी M.D. पदवी मिळवली. 

त्याच सुमारास भारतात प्लेगची साथ पसरली. हे कळल्यावर त्यांनी भारतात येण्याचे ठरवले. चर्चमधील लोकांकडून आर्थिक मदत मिळवून भारतात आल्या, येताना वैद्यकीय  उपकरणे सुद्धा घेऊन आल्या. प्रथम वडिलांच्या हाताखाली काम करण्यास सुरुवात केली. १९०१ मधल्या एका महिन्यात त्यांनी १७७ गृहचाचण्या केल्या. त्यांनी नर्सिंग स्कूल, फिरता दवाखाना काढला, स्त्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालय काढले. ह्या महाविद्यालयासाठी मदत मिळावी म्हणून त्यांनी १४ नोव्हेंबर १९१४ ते १५ एप्रिल १९१५ ह्या दिवसांत अमेरिकेत सतत सभा व व्याख्यानातून आपले विचार मांडले व मदतीसाठी आवाहन केले. त्यांनी स्कडर कुटुंबातील सदस्यांना सुद्धा मदतीसाठी भारतात बोलावले. त्यांचे योगदानही मोठे होते. त्या स्वतः मिशनरी असूनही कधीही ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी काम केले नाही. समाजसेवा हेच त्यांचे मिशन होते. वयाच्या ७५-८० वयापर्यंत कॉलेजच्या कामात मग्न होत्या. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक सेविका तयार झाल्या. २४ मे १९६० रोजी त्यांचे निधन झाले. 

४. भगिनी ख्रिश्चाईन (Christina Greentidel) – ह्यांचा जन्म अमेरिकेत नुरेम्बर्ग (Nuremberg) मध्ये १८६६ साली झाला. त्यांचे आई-वडील जर्मन होते. त्या १७ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पाच लहान बहिणी व आई अशा सहा जणींचे दायित्व त्यांच्याकडे आले. ते निभावण्यासाठी त्यांनी शिक्षिकेची नोकरी केली. १८७४ मध्ये मैत्रिणीबरोबर विवेकानंदांच्या भाषणास त्या गेल्या. ऐकलेल्या त्या पहिल्या भाषणानेच त्या इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी नंतर सर्वच भाषणांत आपली हजेरी लावला. त्या ‘ख्रिश्चन सायन्स’ नावाच्या मानसोपचार पद्धतीच्या जाणकार होत्या. स्वामीजींना पाहिल्यावर त्यांच्या मनाने त्यांना ‘we had found our teacher’ अशी ग्वाही दिली व स्वामीजींनी ‘brave girl’ असे तिचे मनोवायन केले. 

आपल्या पाचही बहिणींची लग्ने पार पाडून १९०२ मध्ये त्या भारतात आल्या. प्रथम त्या हिमालयात मायावती आश्रमात राहिल्या. नंतर ‘House of Sisters’ नावाने काढलेल्या संस्थेत भारतीय स्त्री-शिक्षणाचे काम केले. त्यांनी १९०२-१९१० पर्यंत ही जबाबदारी पूर्णपणे सांभाळली. ‘हिंदुस्थानातील शिक्षण व भारतीय स्त्री-शिक्षण’ या विषयावर त्यांनी अभ्यास केला. १९१४ साली म्हणजे भारतात आल्यानंतर १२ वर्षांनी त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अमेरिकेला गेल्या. पण त्यावेळी पहिले महायुद्ध चालू होते तेव्हा प्रवासावर बंधने होती त्यामुळे परत येणे जमले नाही. पण अखेर १९२४ मध्ये त्या भारतात परत आल्या व अखेर पर्यंत कार्य करत राहिल्या. 

५. माताजी – ह्या फ्रेंच होत्या. त्यांचे मूळ नाव मीरा रिचर्ड. त्यांचे काम अध्यात्माकडे वळणारे होते. त्यांना लहानपणी नेहमी कृष्णाचे दर्शन व्हायचे. त्यांचे पती रिचर्ड हे फ्रान्स मधील राजकीय व्यक्तिमत्त्व होते. १९१० साली त्या नवर्‍याबरोबर त्याच्या कामाच्या निमित्ताने भारतात प्रथमच आल्या. त्यांना तेव्हा योगी अरविंदांची मिळाली होती. त्या फ्रान्सला परत गेल्या तेव्हा त्यांना योगी अरविंदांचे दर्शन होऊ लागले. त्यांच्या प्ररणेने त्या भारतात स्थायिक झाल्या. त्या योगी अरविंदांना भेटल्या. तेव्हा योगी अरविंदांनी त्यांना ‘माताजी’ असे संबोधले. नंतर त्यांनी अरविंदांच्या अध्यात्माचा अभ्यास केला. पॉंडिचेरीच्या ‘अरविंदाश्रमाच्या’  उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. वेळेचे नियोजन, आश्रमाची व तेथे येणार्‍या  लोकांची व्यवस्था त्या स्वतः बघत. त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले. शिक्षण, संस्कार, योग या तीनही क्षेत्रात त्यांनी काम केले. शैक्षणिक लेखन जास्त केले. अरविंदांच्या बरोबरीने त्या लोकांना मार्गदर्शन करत. अरविंदांच्या साधनेला शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले. पॉंडिचेरीतील आंतरराष्ट्रीय योगकेंद्रात योगसाधनेच्या बरोबरीने खेळावर भर दिला जाईल असे त्यांनी आवर्जून बघितले. आदर्शाचा व्यवहाराशी संबंध जोडणे अवघड असते पण तो प्रयत्न त्यांनी यशस्वी केला. अरविंदांच्या लिखाणाला माताजींची मोठी साथ होती. एकूणच त्या स्वयंप्रेरणेने भारतात आल्या व भारताच्याच झाल्या.

६. मदर तेरेसा – ह्या वयाच्या १८ व्या १९२९ च्या अखेरीस भारतात आल्या. प्रथम कलकत्त्याची हवा त्यांना मानवली नाही, म्हणून त्या दार्जिलिंगला जिथे आता भगिनी निवेदितांची समाधी त्या ठिकाणी राहिल्या. १९३७ मध्ये त्यांनी मिशनरी सेवेची दीक्षा घेतली आणि ‘नन्’ म्हणून कामाला प्रारंभ केला. इतिहास, भूगोल अशा विषयांबरोबरच ख्रिश्चन धर्माचे सखोल शिक्षण घेतले. त्या अधिक शिस्तप्रिय होत्या. सातत्याने प्रयत्न करून समंवयाची भूमिका ठेवून त्यांनी आपल्या कामाला मान्यता मिळवली. भारतातील दारिद्र्य, फाळणीनंतरचे दंगे, प्रचंड अत्याचार अशा वातावरणात त्यांनी काम केले. बांग्लादेश निर्मितीच्या वेळी पाकिस्तानी अत्याचारातून जन्मलेल्या अर्भकांचे संगोपन व मातांना आधार देण्याचे अत्यंत गरजेचे व निकडीचे काम त्यांनी केले. स्वामी अखंडानंदांच्या साहाय्याने अनाथ आश्रम चालू केला, अनाथ मुलांसाठी दवाखान्याची त्यांनी सोय केली. ज्या कामाची सर्वसामान्यांना किळस वाटते अशी अनेकांची सेवा त्यांनी केली. ‘सेवेतले साहस’ ही दुर्मिळ गोष्ट त्यांच्याकडे होती. त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले हा त्या साहसाचा मोठा सन्मानच आहे!

७. शार्लोट एलिझाबेथ झेवियर – ह्यांनी इंग्लंडला विवेकानंदांचे भाषण ऐकले. त्या विचारांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की त्या भारतात आल्या. त्यांचे पती कॅप्टन जे. एच्. झेवियर सुद्धा  त्यांच्याबरोबर भारतात आले. दोघांनी एकमेकांच्या संमतीने विवेकानंदांचे शिष्यत्व घेतले. शार्लोट यांनी विवेकानंदांच्या भाषणांचे, व्याख्यानांचे संकलन व संपादन केले, त्यांच्या पतीने मुद्रणाचे काम सांभाळले. ते प्रबुद्ध भारताचे व्यवस्थापक झाले. १९०३ मध्ये मुक्तद्वार दवाखाना सुरू केला, धर्मार्थ रुग्णालय चालवले. ‘अद्वैत आश्रम’ व ‘मायावती आश्रम’ उभारणीस त्यांनी मदत केली. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एत्तदेशीय लोकांचा अपमान कधीही केला नाही. कॅप्टन झेवियर गेले तेव्हा हिंदू धर्माप्रमाणे त्यांच्यावर संस्कार करण्यात आले. त्यानंतरही शार्लोट १७ वर्षे काम करत होत्या. वयाच्या ८३ व्या वर्षी त्या निवर्तल्या. 

अशा ह्या ‘सप्त-सेविका’ सातासमुद्रा पलिकडून आल्या. त्यांची भारतात येण्याची कारणे वेगळी असली तरी मानस एकच होता, तो म्हणजे सेवेचा! कलकत्ता ह्या शहरातून जास्त करून त्यांच्या कामाला प्रारंभ झाला. शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय, वैद्यकीय, संगोपन अशा विविध क्षेत्रात ह्या सेविकांनी काम केले. सेवाभाव व कामावरची निष्ठा खरी होती. माणूस ही एकच जात आहे व सेवा हा एकच धर्म आहे हीच त्यांची शिकवण!