सुवर्णा गोखले

मागे वळून बघताना: २६ काही वेगळे प्रयोग!

ग्रामीण भागात काम करायचे तर ते फक्त त्या व्यक्ती सोबत कधीच नसते, त्यांच्या कुटुंबा सोबतचे समाजासोबतचे, गावासोबतचे काम असते. शहरातली सगळीच माणसे जेवढी स्वयंपूर्ण असतात त्यामुळे एकटी असतात तेवढी गावातली नसतात. त्यामुळे ‘विकास’ कामात आलेल्या अनेक अडचणी या समाजिक बंधनामुळेही असतात. रूढार्थाने म्हणायचे तर ‘लोक काय म्हणतील?’ यामुळेही असतात. या सगळ्यांचा विचार करत आपल्या भागात केलेले २ वेगळे प्रयत्न.. बांबूपासून वस्तू उत्पादन : वेल्हे तालुक्यात बांबू मुबलक मिळत असल्यामुळे बांबू पासून विविध गोष्टी बनवायला शिकवण्याचे वर्ग १९९६ पासून आपण घेतले; जेणे करून बांबूमुळे स्वयंरोजगार संधी निर्माण होईल. केंद्र सरकारच्यावतीने त्रिपूरामध्ये बांबू पासून वस्तू निर्मिती करायला शिकवणारा त्याकाळी एकमेव वर्ग चालवला जायचा. वर्ग ६ महिने कालावधीचा असायचा. १९९६-२००० या काळात ३ युवकांना त्या वर्गाला पाठवले. या वर्गाला जाणे म्हणजे महा कठीण कारण तिथली भाषा कळणे अवघड आणि एकदा वर्गाला गेले की ६ महिन्यांनी परत यायचे मध्ये घरी येणे नाही! त्यासाठी जाणाऱ्याची व घरच्यांच्या मनाची तयारी करून घेणे फारच अवघड होते. कारण वर्ग होता ते गाव नकाशावर दाखवले तरी म्हणजे कुठे? ही कळणे अवघड.. आणि ‘तिथे काही झाले तर आम्ही कसे पोचायचे?’ हा प्रश्न मलाच निरुत्तरीत करायचा पण प्रबोधिनीवरच्या विश्वासाने आपण जमवले! वर्गाला शुल्क नसले तरी एकट्याने त्रिपुरात ठरलेल्या ठिकाणी त्याकाळी (गुगल मॅप नसताना) पोचणे धाडसाचेच होते. ३ जणांनी वेगवेगळ्या वेळेला जाऊन वेगवेगळ्या तुकड्यांत हा वर्ग यशस्वीरीत्या पूर्ण केला. वेल्हयात बांबूवर काम करताना येणारी अडचण अजूनच वेगळी होती कारण बांबूसंबंधी काम हे ‘बुरूड’ किंवा ‘कैकाडी’ जाती/जमातीचे काम समजले जाई, त्याला अन्य समाजातील मुलांना पैसे मिळणारी रोजगार संधी असली तरी प्रशिक्षणाला तयार करणे खूपच अवघड होते. तरीही आपण करत राहिलो. वर्ग घेत राहिलो. बांबूपासून वस्तू उत्पादन करणे म्हणजे फक्त पारंपारिक सुपे, टोप बनवणे नसून अनेक सुंदर भेटवस्तू असू शकतात किंवा अगदी घरही बांधणी असू शकते हे आपण शिकवले. सगळ्यांनी रोजगाराचा हा मार्ग स्वीकारला नाही पण वर्गाला आलेल्यांच्या जाणीव जागृतीतून उद्योग करणाऱ्यांचे बळ वाढत गेले. आजही त्यातला एक जण, निवृत्ती वेल्हयात बांबू उद्योगातून अर्थार्जन करत आहे. तालुक्यातंच काय पण निमंत्रण आले तर महाराष्ट्रभरही प्रशिक्षक म्हणून जात आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहे, मोठी ऑर्डर मिळवून भागातल्या महिला-युवकांना रोजगार संधी देत आहे!.. सर्व अडचणींवर मात करून आजही स्वतःच्या हिमतीवर बांबू उद्योगात टिकून आहे. अस एखादं उदाहरण टिकलं तरी समाधान वाटते!! होम नर्सिंग वर्ग चालवण्याचा प्रयोग : एकूणच आरोग्य क्षेत्रात दिवसेंदिवस रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत. सुपर स्पेशालिटी जशी वाढते आहे तशी थोडेसे शिकून नर्सिंग संबंधी कामाची संधीही वाढते आहे. मोठ्या हॉस्पिटल सोबत छोट्या हॉस्पिटल मधली नर्सिंग संबंधी मनुष्यबळाची मागणी सुद्धा प्रचंड संख्येने वाढते आहे. नर्सिंगच्या शिक्षणामुळे खात्रीने रोजगार मिळेल. अगदी ८ वी झालेल्या गावातल्या मुलीला सुद्धा एरवी कधीच मिळणार नाही अशी या शिक्षणामुळे नोकरीची संधी मिळेल, या हेतूने आपण युवतींसाठी होम नर्सिंग/ असिस्टंट नर्सिंगचे प्रशिक्षण देण्याची योजना केली. पहिला वर्ग सुरू करताना एकत्र माहिती सांगितली तरी फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मुलींना गावागावांतून आणायची सोय केली, वर्ग संपल्यावर पुन्हा पोचवण्याची सोय केली. वर्ग पूर्णतः निशुक्ल केला तरीही थंड प्रतिसाद.. मग ज्या गावात वर्गाला येऊ शकतील अशा वयातल्या मुली होत्या त्या एकेकीच्या घरी जाऊन बागेश्रीताई असे शिक्षण मिळाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये सन्मानाने कसे काम करता येईल असे सांगितले. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मावशींच्या कामापेक्षा हे वेगळे आहे असेही पटवले. मग एक एक करत पहिल्या वर्गांसाठी १३ जणी जमल्या आणि स्व-रूप वर्धिनी सोबत पहिला वर्ग सुरू झाला. ६ महिन्यांची एक बॅच असायची. मुलींना विषयात रुळायलाच त्यातला महिना लागायचा. कोणाला रक्त बघून चक्कर यायची तर कोणाला अभ्यासातले शब्द पाठ करणे अवघड जायचे, कोणाला हॉस्पिटलची भीती वाटायची तर कोणाला इंजेक्शनची! या सगळ्या दिव्यातून पार होणे अवघड .. त्यात ‘घरी नुसती बसेन पण असे ‘सेवे’ची काम करणार नाही’ अशी सामाजिक मनोवृत्ती! या वर मात करणे फार अवघड गेले. प्रत्येक तुकडीसाठी मुली मिळवणे ही जणू आपलीच जबाबदारी होती. हा वर्ग पूर्ण केलेली एकही जण वर्ग संपल्यावर घरी बसली नाही, ६ महिन्यांचा वर्ग करून परीक्षा दिली की निकाल लागायच्या आधीच नोकरी लागलेली असायची तरीही प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. जसजशा लग्ना आधी मुली कामावत्या व्हायला लागल्या तसतसा हळूहळू बदल घडायला लागला. आपण प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या गावात प्रवेश अभियान करून पहिल्या ६ तुकड्या १०० पेक्षा जास्त संखेच्या यशस्वी रित्या पूर्ण केल्या. मग आपण आंबावण्याच्या स्टरलाईट कंपनीने चालवलेल्या जीवन ज्योती महिला प्रशिक्षण केंद्रात काम केले तेव्हा हा वर्ग त्या संस्थेच्या अभ्यासक्रमाचा भाग केल्यावर हा विषय तेथे सुपूर्द केला. आपण केल्यामुळे नर्सिंग या विषयाचे जनजागरण एवढे झाले की १२ वी शास्त्र शाखेत शिकलेल्या ५-६ जणींनी नर्सिंगचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यातल्या बहुतेक जणी पुण्यातल्या उत्तम हॉस्पिटलमध्ये नोकरी करत आहेत. आज पर्यंत त्यांच्या घरात शिक्षण घेऊन नोकरी करायला लागल्यावर मिळालेला सगळ्यात जास्त पगार या मुलींना आहे ! ज्ञान प्रबोधिनीच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणामुळे अनेकांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली, आपल्या प्रयत्नांमुळे नवीन विषयातल्या रोजगार संधी लक्षात आल्या असे नक्की झाले.. एखादी गोष्ट पहिल्यांदाच करताना आपले सगळे पणाला लागते कारण आपण बोलतो/ सांगतो/पटवतो ते यापूर्वी कधी त्या गटाने ऐकलेले नसते ना अनुभवलेले, असे केलेल् कोणीसुद्धा परिचयातले नसते. अशा वेळी ‘पटण्याला’ उपयोगी पडतो तो प्रशिक्षणार्थीचा आपल्यावर असणारा विश्वास! .. एकदा जमले की अनुकरण करणे तुलनेने सोपे असते. अशा प्रकारचे एक-एक उदाहरण तयार करताना समाज शिक्षण करावे लागते. सहभागी प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण करता करता त्यांच्या कुटुंबाचे, नातेवाईकांचे, जवळच्यांचेही शिक्षण करावे लागते. आपण अनेक वर्ष त्याच कार्यकर्त्यासंचाच्या मदतीने भागात काम करत असल्यामुळे जो विश्वास निर्माण झाला आहे त्यामुळे आपले असे पहिले प्रयत्नही यशस्वी होतात यांचे समाधान आहे! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना: २६ काही वेगळे प्रयोग! Read More »

मागे वळून बघताना: २५  – गुंतवणूक वाढत जाते!

ग्रामीण महिलांसोबत काम करायला लागल्यावर, पहिल्यांदा कुठली गोष्ट लक्षात आली तर तिच्या आयुष्यातली एकही गोष्ट ‘ती’च्या मार्जिने झालेली नसते, लग्न तर सोडाच पण जन्म घेऊनही जणू ‘ती’ने काहीतरी चूकच केली आहे. त्यामुळे ‘ती’च्या मनासारखे होण्याची ‘ती’ची अपेक्षाही नसते. कारण संस्कार! त्याकाळात बचत गटातील महिलांची नावे पाहिली तर दगडाबाई, धोंडाबाई, नकोशी अशी एखाद-दुसरी गटात असायचीच! आता काळ बदलला आहे. पण तेव्हा जी गटात आली ती, ‘मी निर्णय करू शकते!’ या  कल्पनेचा कधीही विचार केलेला नाही अशी होती, त्यामुळे नेतृत्वाचे काम एकदम सुरू करता आले नाही.. आधी व्यक्ती विकासाचे काम करावे लागले. अनेक जणी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाच्या कामासाठी जो मानसिक प्रवास करावा लागला त्याने सुद्धा दमून गेल्या. ‘ती’ला जबाबदारी घेण्याबद्दल स्वाभाविकच अडचण नसायची पण ‘अधिकार’ समजायला थोडा वेळ लागायचा. हा नेतृत्वाचा पहिला टप्पा होता! प्रबोधिनी गावातच गावातल्याच महिलांच्या मदतीने काम करत असल्यामुळे उपक्रमाची कमी नव्हती. भरपूर उपक्रमाची योजना आखलेली असायची. उपक्रम कुठलाही असला तरी महिलांच्या मानसिकतेत हळूहळू बदल घडत होते. अनेक उपक्रमांनी पहिल्यांदाच सहभागी होऊन घराबाहेर पडणाऱ्या महिलांचे भावविश्व विस्तारण्याचे काम केले. भावविश्व समृद्ध झाल्याशिवाय विकासाची गरज निर्माण होत नाही. विकासाची गरज निर्माण होणे ही ‘महिलांनी विकास कामात स्वेच्छेने येण्यासाठीची प्राथमिक गरज’ आहे ही बाब आधी समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आपण गेल्या भागात जो ‘सहल’ उपक्रम पाहिला तो महिलांचे भावविश्व समृद्ध करायला कशी मदत करणारा ठरू शकतो हे समजून घेतले.    बाह्य पेहेराव जरी बदलला, नऊवारी जाऊन पंचवारी आली.. क्वचित प्रसंगी पंजाबी ड्रेस आला तरी विचार करायची पद्धती कालानुरूप बदललेली असेलच असे नाही. आता ‘नकोशी’, दगडा.. धोंडा या सापडत नाहीत. आता मुलींची नावे कोमल, अपेक्षा, आकांक्षा असतात.. या बदललेल्या नावाचे सुद्धा त्यामुळे मला महत्व वाटते. हे जरी खरे असले तरी जिने ही नावे ठेवली त्या सविता/ कविता/ सुरेखा यांच्यांशी ‘कुटुंबामधले महिलेचे स्थान काय असावे?’ यावर चर्चा करताना संस्काराने घालून दिलेली ‘कुटुंबाची’ मर्यादा लक्षात आली. घरातल्या ‘बाई’च्या स्थानाचे त्यांचे वेगवेगळे विचार ऐकायला मिळाले. कौटुंबिक हिंसाचार हा खूपच मोठा विषय आहे, पोलिस स्टेशन सोबत महिला दक्षता समितीची स्थापना करून आपण हे काम करायला बचत गटाच्या महिलांसाठी सुरुवात केली. जी कौटुंबिक हिंसाचाराची बळी असते ती या विषयावर बोलायला सुद्धा पहिल्यांदा तयार नसते. याचे नक्की कारण काय असावे अशी खात्री करायला आपण करोना नंतर एक छोटेसे सर्वेक्षण केले. त्यात अनेक प्रश्न होते. त्यापैकी एक प्रश्न होता की नवऱ्याने बायकोला मारले तर.. अ) शिस्त लागण्यासाठी मारले तर ठीक ब) चूक झाली म्हणून मारले तर हरकत नाही आणि शेवटचा क) पर्याय होता मारता कामा नये. अजूनही लग्न झालेल्या तिशी ओलांडलेल्या ८०% महिलांना अ/ब पर्याय योग्य वाटतात. मुलांसामोर मारू नये असा अनेकींचा सूर होता. पूर्वी नवऱ्याची ओळख ‘मालक’ म्हणून करून दिली जायची, आता जरा शिकलेली ‘मालक’ म्हणत नाही मिस्टर म्हणते पण आजही ‘ती’ने स्वीकारलेली त्यांची ‘मालकी’ मनातून पूर्ण गेलेली नाही. जरा खोलात जाऊन चर्चा केली तर त्या ‘वाटण्यात’ सुरक्षितता दडलेली आहे असे लक्षात येते. सर्व सिध्द्धीस नेण्यात ‘तो’ समर्थ आहे.. ही भावना आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचारांच्या प्रश्नाचे उत्तर बादलायचे असेल तर मनातला ‘स्वीकार’ बदलण्याची गरज आहे, ‘ती’ची मानसिकता बदलायला हवी. मानसिकता क्रांती केल्यासारखी कमी काळात बदलत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, या पिढीसाठी काम केले तर पुढच्या पिढीमध्ये दिसून येते.       बचत गट हे निमित्त आहे हे त्यासाठीच! त्यामुळे असा वेगळा विचार करायची संधी मिळते. कधी गटात कर्ज मागणी जास्त झाली तर गटाशी बोलावे लागते, कोणाला कर्ज हवंय त्यांच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून कर्ज वाटप करावे लागते तर कधी एखादीची सहलीला येण्याची परवानगी काढण्यासाठी तिच्या घरी जाऊन सासू-सासरा किंवा नवऱ्याशी बोलावे लागते, कधी कधीच न गेलेल्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन प्रतिनिधित्व करावे लागते तर कधी स्वतःच्या घरी पाहुणे असले तरी बँक कर्जाचा हप्ता वेळेत गेला पाहिजे म्हणून बँकेत जावे लागते. बचत गटाच्या बैठकीनंतर उगाचच रेंगळणारे गटात कोण-कोण आहे, त्या काय बोलतात त्यावर खरेतर गटाचा परिणाम अवलंबून असतो. एरवी अशा क्षुल्लक वाटणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ‘ती’चे अस्तित्व, ‘ती’ची स्वकल्पना तयार करायला उपयोगी पडतात. ‘मी माझ्या वेळाचा निर्णय घेऊ शकते’ असे वाटल्या शिवाय ‘मी माझे निर्णय करू शकते’ असे वाटत नाही .. मग गावासंबंधी निर्णय करण्याचा टप्पा येतो. गटाचे आर्थिक काम झाले तरी मैत्रिणींसोबत रेंगाळण्यासाठी जिच्याकडे वेळ आहे ती स्वतः पलीकडे पाहू शकते. पण स्वतःच्या किरकोळ वेळेचा सुद्धा निर्णय सुद्धा जी करू शकत नाही ‘ती’ गावाचे निर्णयही करू शकत नाही असे सार्वत्रिक चित्र आपण बघतो.   त्यामुळे ‘ती’ची स्वतः पलीकडच्या कामात गुंतवणूक जसजशी वाढत जाते तसतसा ‘ती’चा आत्मविश्वास वाढला आहे असे इतरांच्याही लक्षात यायला लागते. आणि ‘ती’चा नेतृत्वाकडे प्रवास सुरू होतो. नेतृत्व करण्यासाठी फक्त राखीव जागा दिल्या पण असे प्रयत्न झाले नाहीत तर त्या पदावर जाऊनही हक्क बाजावता येत नाही मानसिकता आड येते. असा आत्मविश्वासाचा प्रवास झाला असला की पद मिळाले नाही तरी ‘गावच्या महिला राखीव पदासाठी कोणाला उभे करूया?’ यावर चर्चा करण्याच्या बैठकीचे सन्मानाचे निमंत्रण नक्की येते. लोकांना दिसेल अशी समाजाभिमुख वेळेची गुंतवणूक वाढत गेली की नेतृत्वाला व्यापाकता येते. बचत गट अशी स्वतः ठरवून स्वतःच्या वाढीची संधी देतो त्यामुळे समाधानकारक असते!    सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना: २५  – गुंतवणूक वाढत जाते! Read More »

मागे वळून बघताना: २४ – अभ्यास दौरा!

ग्रामीण महिलांचा अभ्यास दौरा हा जरा वेगळाच! अभ्यास हा साधारणतः पाठ्यपुस्तकांशी संबंधीत विषय वाटतो पण दौरा म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायला घर सोडून गटाने बाहेर पडायचे. बाहेर पडताना ‘पर्यटन’ दृष्टीकोन ठेवायचा नाही तर काहीतरी शिकायचा अनुभवायचा असा दृष्टीकोन ठेवायचा. पहिला दौरा ‘दिल्ली राजधानी अभ्यास दौरा’ १९९८ साली झाला. त्या काळात नुकतेच महिलांना आरक्षण मिळाले होते. अनेक जणी सरपंच/ उपसरपंच/ ग्राम पंचायत सदस्य झाल्या होत्या, काही जणी गावातील शिक्षण समितीच्या किंवा पाणलोट कामाच्या पदाधिकारी झाल्या होत्या, काही बचत गटाच्या अध्यक्ष, खजिनदार होत्या. ही पदे खूप मोठी होती अशातला भाग नव्हता पण महिला अशा पदावर जबाबदारी घेऊन प्रथमच विराजमान होत होत्या. त्यामुळे ‘आपल्याला अशी जबाबरीची कामे जमतील का?’ अशी धास्ती वाटत होती. एखादीलाच नाही तर ‘ग्रामीण महिला’ म्हणून संगळ्यांनाच आत्मविश्वासाचा प्रश्न होता. पहिला दिल्ली दौरा अशा २५ जणींसाठी योजला होता की जिच्याकडे स्वतःच्या पदाचा शिक्का आहे! पण साधारण ६५ जणींनी नावे दिली. ४ महीने दौऱ्याची तयारी चालू होती. दर १५ दिवसांनी प्रशिक्षणे होत होती. गटाला पूर्वतयारीची व्याख्याने, माहिती सांगणे चालू होते. अगदी नकाशा दाखवून रेल्वे कशी जाणार ही सुद्धा दाखवले गेले. अनेकींनी आयुष्यात नकाशा सुद्धा प्रथमच पाहिला होता. एक छोटा प्रसंग सांगते महिलांना प्रवासाची अजिबात सवय नव्हती, साधा कात्रजचा घाट चढताना सुद्धा उलटी येत होती. नकाशात दिल्ली किती ‘वर’ आहे असे सांगितले तर घाट किती मोठ्ठा असेल असे वाटून काही नावे कमी झाली होती. इतक्या प्राथमिक गोष्टींपासून सुरुवात होती. गटाच्या कानावर हिंदी भाषा पडण्याची व्यवस्था केली होती कारण तो पर्यन्त टिव्ही घराघरात पोचले नव्हते. हे प्रशिक्षण बघून दौरा झेपणार नाही असे वाटणाऱ्या १० जणी गळल्या. ५५ जणींचा ८ दिवसांचा दौरा झाला. संसद भवन पाहिले, खासदार शरद पवार, विठ्ठलराव गाडगीळ, निर्मला देशपांडे यांची दिल्लीतल्या घरी भेट घेतली, आकाशवाणीच्या दिल्ली-वार्तापत्र सादर करणाऱ्यांची भेट घेतली, महाराष्ट्र सदन पाहिले, महिला आरक्षणावर काम करणाऱ्या  IIPA (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिसट्रेशन) येथे जाऊन आलो. मग प्रेक्षणीय स्थळ म्हणून राजघाट पाहिले कारण बातम्यात परदेशी पाहुणे तिथे जातात असे दिसले, मग लाल किल्ला, मथुरेचे कृष्ण मंदिर, ताजमहाल सगळे पाहिले. परत आल्यावर लक्षात आले दौरा अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी झाला. दौऱ्यात सहभागी अनेकजणी ९ वारी साडी नेसणाऱ्या होत्या.. त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला कारण प्रत्येकीला वाटत होते की ‘इतरांनी जे पाहण्याची कल्पनाही केली नव्हती ते मी प्रत्यक्ष पाहून आले!’ राजधानी सहलीच्या परिणामामुळे महिलांमध्ये झालेला बदल इतका उठून दिसणारा होता की “आम्हालाही ‘त्यांच्या’ सारखे व्हायचंय, चला पुन्हा दिल्लीला जाऊ..” या आग्रहाने पुन्हा दिल्ली दौरा झाला या दौऱ्यात पहिल्या सारख्या अनेक गोष्टी दौऱ्यात होत्याच पण सोबत राष्ट्रपती भवन बघण्यापासून परतीचा प्रवास विमानाचा करण्यापर्यन्त भर होती. हा दौरा साधारण १० वर्षाने झाला तो पर्यन्त ग्रामीण महिलेची ‘मला नेतृत्व करायचे आहे’ असे म्हणण्याची भीड चेपली होती. त्यामुळे कमी पूर्वतयारीने दौरा झाला. पूर्णतः स्वखर्चाने झालेल्या या दौऱ्यात चकाचक दिल्लीचे दर्शन होते तसेच दिल्लीतील वस्तीचेही दर्शन होते..  पहिल्या दौऱ्यात येणाऱ्या महिलांना हिन्दी बोलणे तर सोडाच पण समजणेही अवघड होते म्हणून बहुतेक भेटी मराठीत होतील असे पाहिले होते. दुसऱ्या दौऱ्यात असे लक्षात आले की सिनेमा बघून बघून निदान गटाला हिन्दी बोलता येत नसले तरी समजत होते! त्यामुळे अवघड वाटले नाही. दौऱ्याचा परिणाम चांगला झाला. दिल्ली दौरा जास्त दिवसांचा काढावा लागतो म्हणून सगळ्यांना इच्छा असूनही जमत नाही मग ‘मुंबई दौरा’ काढला! अनेक गट मुंबई बघून आले अगदी समुद्र दर्शन, गेट वे ऑफ इंडिया, मोनो रेल प्रवासापासून ते थेट भुलेश्वरच्या घाऊक बाजारपेठेपर्यंतचे दर्शन ! मुंबई ही आर्थिक राजधानी आहे म्हणजे काय यांचे ही दर्शन घेतले! असे दौरे फक्त महिलांचेच नव्हते तर युवती सुद्धा मुंबईला जाऊन आल्या. विधान भवन, विधान परिषदही बघून आल्या. मग त्या सोबत तारांगण, मत्स्यालय असेही बघणे झाले. कार्यकर्त्यांचे दौरे वेगळेच! एकदा दक्षिण भारत बघायला तिरूअनंतपूरम मधून देवदर्शन करून विवेकानंद केंद्राचे काम व शिलास्मारक बघायला कन्याकुमारीला मुक्काम केला. संस्था कार्यकर्त्यांच्या भेटी तर होत्याच आणि मग बंगलोर वरून परत! कार्यकर्त्यांचा पुढचा दौरा अरुणाचलला काढला! हा दौरा पश्चिम बंगालची राजधानी कलकत्यापासून सुरू झाला. गंगेतीरी असणाऱ्या रामकृष्ण मठाच्या बेलूर मठात राहून नावेने गंगापार करून कालीमातेचे दर्शन घेतले, छट पूजा पाहिली. तेथून थेट अरुणाचलच्या चीन-तिबेट टोकाला तवांगला गेलो. बर्फाछादित प्रदेश पाहिला, सीमेवर सैन्य कसे काम करते ते पाहून आसाममध्ये गुवाहाटी कामाख्या मंदिर पाहून परतीचा प्रवास सुरू केला. प्रदेश बदलला की भौगोलिक परिस्थिती बदलते तसेच लोकांची विचार करायची पद्धतही कशी बदलते यांचा तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटीतून अनुभव घेतला. करोंना काळात आणि नंतर राजस्थानला २ दौरे गेले. जयपूर जवळचे तिलोनीया येथिल रॉय यांचे ग्रामीण महिलांसोबत चालू असणारे सौर ऊर्जा व अन्य काम पाहिले त्यातून प्रेरणा घेतली नंतर उदयपूर.. चितोड, हळदीघाटी सगळे पाहिले! पर्यटना पासून संस्कृती दर्शन बघताना पद्मिनी आणि हजारो महिलांच्या ‘जौहार’चा सल घेऊन स्त्री शक्ती प्रबोधनचा गट परतला. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचे काम म्हणजे नक्की काय केले हे या दौऱ्याला गेल्यामुळे शिवप्रदेशात राहाणाऱ्या महिलांना नेमके कळले असे नंतरच्या निवेदनात समजत होते. त्यामुळे राजस्थानात महिलांचा रस्त्यावर वावर कमी होता..आम्ही मोठ्यांदा हसलो तरी लोक बघत होते अशी बारीक निरीक्षणे महिला शोधबोध बैठकीत सांगत होत्या. आपला समाज महिलांना खूपच स्वतंत्र देतो. तिथल्या गावातल्या घराच्या भीती सुद्धा खूप उंच इतक्या की आतले काहीच दिसत नाही.. जणू त्यात महिला कोंडल्या होत्या. आम्ही एकट्या ‘महिला’ आलो यांचे त्यांना खूपच आश्चर्य वाटले. असे दौऱ्याला जाऊन आल्यावर समजणे महत्वाचे फिरले की अशी समज वाढते, ‘यात्रा कंपनीतून’ गेल्यावर असे काही समजेलच याची खात्री नाही म्हणून याला दौरा म्हणायचे! मग बाजारात गुलाबांचे पाणी, तेल, अत्तर बघून मागे असणारे गुलाब फुलावर प्रक्रिया करणारे केंद्र पहावेसे वाटणे म्हणजे दौरा यशस्वी होणे!     त्यामुळे दौऱ्याची योजना म्हणजे फक्त प्रवास, निवासाची व्यवस्था करणे एवढेच मर्यादीत नसते ते तर काय यात्रा कंपनी सुद्धा करतात. दौरा म्हणजे सोबत येणाऱ्या महिलांनी काय पाहायला हवे ते आधी ठरवणे, त्याचे नियोजन करणे असते. प्रवासात समविचारी संस्था-कार्यकर्त्यांच्या भेटी होतील असे बघणे म्हणजे कन्याकुमारीला गेले तर ग्रामीण प्रकल्पात तिथल्या कार्यकर्त्यांनी कमी खर्चात घर बांधायचे तंत्र कसे विकसित केले आहे ते बघायचे तर गुवाहाटीला कार्यकर्त्यांशी बोलताना शिक्षणाचे महत्व कसे पटवून द्यावे लागते हे समजून घ्यायचे, बेलूर मठात गेल्यावर एका आध्यात्मिक संघटनेचा परिचय करून घ्यायचा तर तिलोनीयाला रॉय यांच्या भेटीत आंतरराष्ट्रीय काम समर्पण वृत्तेने लोकाभिमुख कसे उभे करता येते ते बघायचे. असे सगळे बघितले की रोज रात्री गटाने एकत्र बसून त्यावर चर्चा करायची, प्रत्येकीच्या वहीत या सगळ्या नोंदी होत आहेत ना? याची खात्री करायची. परत आल्यावर दौऱ्याचे प्रत्येकीने वृत्त लिहायचे त्यात नवीन काय अनुभवले, काय भावले पासून काय शिकले असे सगळे लिहायचे. त्याचे गटागटात जाऊन अनुभव कथन करायचे मग दौरा ‘संपतो’ बहुतेकदा दौरा संपतो तो पुढच्या वेळी कुठे जायचे असे ठरवूनच!      सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना: २४ – अभ्यास दौरा! Read More »

मागे वळून बघताना – २३ भावविश्व विस्तारताना!

आपल्या कामात महिलेचे भावविश्व विस्तारण्यासाठी ‘अनुभव सहलीं’चा खूप मोठा वाटा आहे. एखादी गोष्ट शब्दामध्ये समजावून देण्यात येणाऱ्या मर्यादा, डोळ्याने पाहिले की नाहीशा होतात या अनुभवासाठी सहल हा जणू एक अभ्यासक्रमाचा भाग आहे. वयाने मोठे झाल्यावर एखादी गोष्ट शिकायला सुरुवात करायची तर ती गोष्ट शिकणे रंजकही असावे लागते. अनुभव सहली अशी शिक्षण संधी देतात.  ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक विभागात लहान वयोगटातील सहाध्याय दिन हा उपक्रम अशाच प्रकारे चालतो त्यावरून कल्पना घेऊन ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आपण अनुभव सहली काढल्या, अभ्यास दौरे काढले. आधी कार्यकर्त्या शहाण्या झाल्या पाहिजेत म्हणून त्यांचे अभ्यास दौरे काढले आपल्या सारखे काम अजून कुठली संस्था करते ही बघणे हा सुद्धा प्रशिक्षणाचाच भाग होता. उदाहरण द्यायचे तर श्रावण महिन्यात भीमाशंकरला भोळेनाथ दर्शनाची सहल काढली की सोबत त्याभागात काम करणाऱ्या चैतन्य संस्थेच्या एखाद्या बचत गटाला भेट द्यायची असे आवर्जून वेळापत्रकात घातलेले असायचे.   बचत गटातील महिलांनी फक्त महिला-महिलांच्या सहली काढल्या कारण घरातल्या बजेटमध्ये महिलेला घराबाहेर पडण्यासाठी कधी पैसे नसतात. सुरुवातीला फक्त ‘एकट्या’ महिलांच्या सहली काढणे इतके अशक्य वाटत होते की महिलांनी सहलेला जाण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रकल्पातून निधी उभा करायला लागत होता. वेगवेगळ्या सहलींना नेल्यानंतर सामाजिक काम बघत असताना लक्षात आले की किमान फिरणे सुद्धा झाले नसल्यामुळे एकदम सामाजिक काम बघण्याची मनोभूमिका तयार होत नाही  त्यामुळे आधी देवदर्शनासारख्या त्यांच्या आवडीच्या ठिकाणी सहली काढण्याची गरज आहे. त्यासाठी प्रकल्पातून खर्च उभा करण्याऐवजी त्यांनीच स्वतः खर्च केला पाहिजे पण जोपर्यंत फिरल्याने ‘नवीन बघायला मिळतं’, यांची गोडी लागत नाही तोपर्यंत तरी मदत करावीच लागते. असा अगदी या वर्षाचा सुद्धा अनुभव आहे या अनुभवाचा विचार करून लक्षात आले की देवदर्शनाच्या सहली काढल्या तर मात्र त्यासाठी घरातून रक्कम मिळते किंवा दोन-चार रुपये बाजूला टाकून गुपचूप सहली इतके पैसे ‘ती’ आवडीने जमा करते. कधी कर्ज घेऊन सहल करते मग हप्त्याहप्त्यात फेडते. अशा खूप सहली गेल्या की ज्या सहलीचा पूर्ण खर्च बचत गटाने केला म्हणजे सभासदाच्या व्याजातून.. उद्या मिळणाऱ्या व्याजाची रक्कम आजच सहलीसाठी खर्च केली तरी हरकत नाही असा निर्णय घ्यायला गटामुळे महिला शिकल्या. आता दरवर्षी अशा हौसेच्या किमान दहा-पंधरा सहली तरी सहज निघतात. आता सहली इतक्या अंगवळणी पडल्या की भागातले वाहनचालक सुद्धा तयार झाले. १-२ दिवसात जाऊन येण्याच्या सहलींचे पॅकेज ते गावातल्या महिलांसोबत बोलू लागले. शंभर टक्के महिला सहभागी आहेत अशा सहलींचे आयोजन अनुभवाच्या आधारावर ते सुद्धा करू शकले.   आपले काम शिवप्रदेशात राजगड तोरणा पुरंदर या किल्ल्यांच्या परिसरात चालते तरी महिला कधी गडावर गेल्या नव्हत्या. लाकूड फाटा आणायला आणायला गडावर जाणे वेगळे आणि तोरण गड म्हणजेच प्रचंडगडाचा इतिहास ऐकत गडावर जाणे वेगळे यातला फरक त्यांनी सहलीमुळे अनुभवला. अशा स्थानिक ठिकाणांच्या सहली पासून पराराज्यातील सहली सुद्धा अनुभवल्या! गावाबाहेरच्या कार्यकर्तीने गावात जाऊन सहलीसाठी महिलांना तयार करणे वेगळे. गावातल्याच एखाद्या गट प्रमुख महिलेने आग्रहाने, हौसेने कधीच घराबाहेर पडलेली नाही अशा ‘ती’ला घराबाहेर पडण्याचा अनुभव देण्यासाठी सहल काढणे वेगळे.  सहलीसाठी एका दिवसात सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणे अशी जेजुरी, भीमाशंकरची देवदर्शनाची सहल काढण्यापासून सुरुवात होते ते थेट बालाजी दर्शनाची ६ दिवसाची सहल! सहलीत विविधता असते जेव्हा हंडाभर पाण्यासाठी २-४ तास वणवण करणाऱ्या महिला मुंबईला राज्याची राजधानी बघताना, अथांग समुद्राचे दर्शन घेतात तेव्हा सहलीहून परतल्यावरही अनेक दिवस समुद्राचे दृश्य डोळ्यांसामोरून हालतच नाही असे सांगतात .. हा अनुभवच घ्यावा लागतो. तिरूपती बालाजीच्या दर्शनाला जाणे हा एक वेगळाच अनुभव कारण या सहली मधला ३ दिवसाचा काळ ‘आउट ऑफ रेंज’ असायचा. गेल्या २५ वर्षात बालाजी दर्शनाच्या अशा १८ सहली काढल्या ज्यात किमान ६०० जणी स्वखर्चाने केल्या. ६ दिवस ५ रात्रीच्या या सहलीला स्वतःची परवानगी काढणे हेच मोठे आव्हान असते अशी शिकवण या सहलींनी दिली. एका पुढाऱ्याने आर्थिक मदत केल्यामुळे ३७ गावातल्या ८०० महिला एकाच दिवशी १६ गाड्यांमधून एकाच वेळी जेव्हा कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनाला गेल्या तेव्हा सर्व आर्थिक, सामाजिक सीमांचे भान कसे विरघळून गेले असे सहभागी महिलांनी अनुभवले, तेव्हा करता गट सहलींचे विक्रमही सहज करू शकतो असा विश्वास आला.  २००९ पासून आपल्या प्रयत्नांने प्रकल्पातून निधी उभा करून वेगवेगळ्या गावातील महिलांच्या ३१ ठिकाणी ४२ सहली काढल्या ज्यात १७३६ जणी सहभागी झाल्या, प्रकल्पासाठी यांची नोंद केली आहे. कधी पावस पाहिले तर कधी कोल्हापूर, कधी तुळजापूर तर कधी पंढरपूर सगळी ठिकाणे आली. यातली प्रत्येक सहल ‘पहिली’ होती! समुद्र बघायला कोकणात गेले तर मुंबईपेक्षा खर्च कमी होतो, देवस्थानच्या निवासात राहिले तर निवास खर्च कमी होतो, अनेकदा प्रसादाच्या वेळेत पोचले तर जेवणाचीही सोय होते. बघण्याचा अनुभव तोच असला तरी खर्चाच्या या छटांच्या माहितीची देवाण घेवाण होत होती. एकदा प्रमुखाने बघितले की जायचे कुठे, तिथे काय बघायचे आणि सहलीच्या ठिकाणचे संपर्क मिळाले की मग या सहलीला आलेल्या प्रमुखांनी पुढच्या गावपातळीच्या सहली काढायच्या, असे नियोजन होते. सहलीतले अनुभव म्हणजे अगदी पोटभर खरेदी करणे असेल किंवा प्रेक्षणीय ठिकाणी ‘ती’चा काढलेला फोटो असेल, अशातून आयुष्याच्या सुखद आठवणी तयार करायच्या हा छुपा हेतू तर होताच. असे सगळे केले ते केवळ बचत गटाने दिलेल्या विश्वासाने, गटाच्या ताकदीमुळे! जेव्हा असे सहज करता येते तेव्हा संघटनेचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरजच भासत नाही. मग याच संघटनेचा उपयोग घरातील महिलेचा सन्मान वाढण्यात होतो.  बचत गटाचे काम सुरू केले तेव्हा कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या अनेक महिला होत्या पण जशी बचत गटाच्या संघटनेची ताकद लक्षात यायला लागली, महिलांचे अनुभव विश्व समृद्ध व्हायला लागले तसतसा या परिस्थितीत विधायक फरक पडायला लागला. जग बघितल्यावर विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला. ‘पूर्वी माझ्या बाबतीतही सांगू नये असे काही घडत होते पण तसे घडणारच असे वाटायचे!’ पण  परिस्थिती बदलल्यावर पूर्वीची परिस्थिती मोकळेपणाने मान्य करायला लागल्या. मनातून एखादी गोष्ट पटत नसली तरीही अगतिकतेमुळे ती स्वीकारावी लागते असा अनुभव पदोपदी यायचा. घरातून ‘बाहेर’ पडल्यानंतर नवीन गावं बघताना नव्याने खूप काही कळतंच कळतं पण त्याच बरोबर कळतं ते, ‘माझ्या वाचून घर चालू शकतं!’ हे समजणं खूप महत्त्वाचं असतं. स्वयंपाक घरात अडकून पडलेल्या बाईला हे शब्दाने पटवून देणं केवळ अशक्य असते!  अशा सहलीत आपण कोणाशी बोलतोय हे बघायला सुद्धा कोणी जवळपास नाही असा स्वातंत्र्याचा अनुभवही खूप काही शिकवून जातो. गप्पागप्पात समजते की ‘माझ्यासारखीच परिस्थिती इतरांच्याही घरात असते!’ याची समज वाढली की आयुष्याचा एकटेपणा जातो. त्यामुळे सुखद आठवणी सोबत सहलीतून मिळतात त्या जिवाभावाच्या मैत्रिणी! एरवी जसे ‘सहल’ म्हंटले की ‘मज्जा करायला बाहेर जाणे’ अशी जणू व्याख्याच बनली आहे, पण ग्रामीण महिलांच्या सहली जरा वेगळ्याच .. या सहली महिलांची समज वाढवायला, दृष्टी व्यापक करायला उपयोगी पडणाऱ्या असतात हे नक्की!  सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना – २३ भावविश्व विस्तारताना! Read More »

मागे वळून बघताना- २२ आरोग्य सखी!

स्वयंरोजगार करून किंवा बचत गटातून बाईच्या हातात पैसा का यायला पाहिजे तर जर ‘ती’ने मिळवलेला पैसा असेल तरच ‘ती’ला तो पैसा ‘ती’चा वाटतो. नाहीतर एरवी ‘ती’च्या आरोग्यासाठी केलेला खर्च ‘ती’च्यासाठी जरी गरजेचा असला तरी तिच्या कुटुंबाच्या दृष्टीने वायफळ वाटतो. ‘ती’ कमावती झाली तर स्वतःच्या आरोग्यासाठी खर्च करणे, स्वतःकडे लक्ष देणे ‘ती’ला परवडते! भारतातल्या गावागावात ‘आशा’ आरोग्य सेविकांची नेमणूक होण्यापूर्वी जो पथदर्शी प्रकल्प निवडक ठिकाणी झाला त्यात ज्ञान प्रबोधिनी होती, तेव्हा आपण वेल्हे तालुक्यातील पासली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गावात आरोग्य सेवेची योजना, स्थानिक ग्रामीण महिलांच्या मदतीने राबवली होती व गावपातळीवर आरोग्य सेविकेची परिणामकारकता दाखवून दिली होती.  १९९६ पासून वेलहयातील महिलांसाठी सातत्याने केलेल्या आरोग्य कामाचा परिणाम असा होता की ‘मागच्याचे ऱ्हाऊद्या म्होरचे सुधारा!’ या न्यायाने पुढची पिढी आरोग्याबद्दल जास्त जागरूक झालेली दिसते आहे. या ‘आरोग्य’ विषयाच्या भांडवलावर २०१९ पासून आपण बजाजच्या CSRअर्थसहाय्यामुळे ५० गावासाठी आरोग्य जागृती करणारा ‘आरोग्य सखी’ असा प्रकल्प केला. वर्षभरात जाणीव जागृती व डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी करून तालुका पिंजून काढला. त्यातच करोना आला आपले नेटवर्क गावोगावी तयार असल्याने करोना काळात किती महत्वाचे काम करू शकलो त्याबद्दल आधी लिहिलेच आहे. ही गावागावात आरोग्याची जी रचना उभी राहिली ती ‘आरोग्य सखी’या प्रकल्पामुळे! पहिल्या वर्षीचा नियोजनाप्रमाणे काम केल्याचा चांगला परिणाम पाहून पुढील वर्षी बजाजने ५० गावांऐवजी  ८० गावात काम करायचा प्रस्ताव मंजूर केला. गावागावात ‘आशा’ आरोग्य कार्यकर्ती शिवाय प्रशिक्षण देऊन अशी एक-एक कार्यकर्ती उभी राहिली जी स्थानिक भाषेत, स्थानिक संदर्भासह बोलेल! हिला आपण ‘आरोग्य सखी’ म्हणायचे ठरवले.  ही ‘आरोग्य सखी’ गावात जाऊन प्रकल्पात जाणीव जागृती करण्यासाठी कशाकशावर बोलत होती तर नव मातांसोबत आपले बाळ सुधृढ होण्यासाठी बाळाला सकस आहार काय द्यावा यावर बोलत होती, किशोरींसोबत मासिक पाळीचे चक्र समजावून देउन अगदी सॅनिटरी पॅड कसे वापरून त्याची विल्हेवाट कशी लावायची या नाजूक विषयावर बोलत होती. गृहीणींसोबत दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जंत संसर्गाची माहिती देउन जंत निर्मूलन करायची गोळी सगळ्यांनी जाणीव जागृती सत्रातच एकत्र घेतली जाईल असे पहात होती तर व्यसन म्हणून तंबाखू खाणाऱ्यांशी त्याचे गंभीर परिणाम सांगून सावध करत होती अगदी महिलांनी मेशरी मुक्त होण्यासाठी आवाहन करत होती.  लहान मुलांसाठी ‘चांगला-वाईट स्पर्श’ यावर गोष्ट सांगून माहिती देत होती तर गावातल्या सगळ्यात दुर्लक्षित घटक असणाऱ्या ज्येष्ठ महिलांसाठी ‘रजोनिवृत्ती नंतर घ्यायची काळजी’ काय असते हे सांगताना त्रास होत असेल तर डॉक्टर कधी येणार आहेत ते सांगून फुकट काम होईल असेही सांगत होती! गावातल्या महिलांवर येणारे मानसिक ताण कुठले यावर चर्चा घेउन उपचाराचे गरज कोणाला आहे का याचा अंदाज घेत होती. जाणीव जागृतीच्या या सत्रात जे विषय हाताळले जात होते ते सगळे विषय असे होते की जे एरवी कधीही बोलले जात नाहीत पण महत्वाचे आहेत!  या संवादात लक्षात असे आले की यासाठी फक्त आरोग्य विषयी माहिती देवाण-घेवाण पुरेशी नव्हती तर बोलणारी वरचा विश्वास महत्वाचा होता. ८० गावात काम करणाऱ्या सगळ्या मिळून आम्ही ६३ जणी होतो, यापैकी ४०-४५ जणी तरी असे आरोग्यकाम प्रथमच करत होत्या तरी कुठेही बिघडले नाही कारण त्या त्याच परिसरात रहात होत्या. आरोग्य जागृतीची माहिती ५-७ जणींच्या किंवा मुलांच्या गटात खाजगी बोलल्यासारखी बोलल्यामुळे नेमके बोलता येत होते. छोट्या गटामुळे मोकळेपणाने  शंका सुद्धा विचारल्या जात होत्या. अगदी, ‘त्रास होतोय पण गावात नको दुसऱ्या गावात तपासणी असेल तर सांग… उगाच गावात बोभाटा नको!’ असे सुरक्षित संवादही व्हायचे. या मोकळ्या संवादातून काही रुग्ण लक्षात यायचे जे पूढे डॉक्टरांच्या तपासणीला यायचे. डॉक्टर आणि उपचार जरी काही पैसे न देता होणार असले तरी विश्वास किती महत्वाचा हे या प्रकल्पातून शिकायला मिळाले.  आरोग्य विषयी सगळे सांगू शकणारी, सहज बोलता येईल अशी (resourceful) ताई गावात असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत धरून आपण पहिल्या वर्षी २५८ प्रशिक्षणातून ६४५६ लोकांपर्यंत पोचलो तर दुसऱ्या वर्षी गावे व मनुष्यबळ वाढल्यामुळे २४३४ प्रशिक्षणे/ तपासणीतून २१०७१ जणांपर्यंत पोचलो. एकूण २७,५२७ अशा विक्रमी संख्येपर्यंत पोचलो. यात अनेकांनी एका पेक्षा जास्त उपचार घेतल्याची गाव-वय अशी १२००० पेक्षा जास्त जणांची नोंद आहे! या आरोग्य जाणीव जागृती सोबत केलेल्या तपासणींमुळे तालुक्यातला पहिला दातांचा दवाखाना मार्गी लागला. ‘दात दुखला तर painkiller खायची’ या सवयीतून दवाखान्यात जायची सवय लावणे सोपे नव्हते, अनेकांना तर दाताचा वेगळा दवाखाना असतो हे सुद्धा यामुळे प्रथमच कळले. माता-पालिकांच्या मागणीमुळे बालआरोग्य तपासणी गावोगावी जाऊन नियमित करणे शक्य झाले ज्याचा परिणाम शासनाचा लहान मुलांच्या लसिकरणाचा प्रतिसाद वाढण्यात झाला. ‘लसीकरण या शासनाच्या कार्यक्रमात आपला सहभाग’ असे नसून ‘आपल्या बाळाची शासन काळजी घेते म्हणून हजर राहायचे’ असे माता पालिका शिकल्या. प्रश्न असला तरी यौनीमुखाच्या कर्करोगा बद्दल आतून तपासणीला तयार होणे फारच अवघड होते. आधी मनाची तयारी करून तपासणी करायला  टप्प्याटप्यात गावोगावच्या शेकडो महिला आल्या. अनेकींनी उपचारासाठी आवश्यक ती ऑपरेशनस दीनानाथ रुग्णालयातून करून घेतली. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा अजून एक प्रश्न म्हणजे मोतीबिंदू! त्याचे रुग्ण शोधून त्यांना दवाखान्या पर्यंत नेउन ऑपरेशन करून परत गावात सोडायची सोय प्रकल्पात केली होती तरी धिटाईने गाडीत बसणारे ‘आज्जी / आजोबा’ तयार करणे सोपे काम नव्हते …. ‘माझे मेलीचे असे आता किती दिवस राहिले?’ या प्रश्ना पलीकडे जिला जिला नेउन तिच्यावर उपचार करून घेतले त्या प्रत्येकीची जीवन गुणवत्ता सुधारली होती. अनेकींची आयुष्य आरोग्य सखी प्रकल्पामुळे सुखकर झाली, काहींची आयुष्य काही वर्षाने का होईना नक्कीच वाढली, जगण्याला हुरूप आला!  जागतिक पातळीवर HDI (human development index) मध्ये ‘मागास’ असणाऱ्या भारत देशाला पुढे न्यायचे तर ज्या ज्या घटकामुळे ‘बाई’ची आयुर्मर्यादा कमी होते त्या त्या घटकावर काम करायला हवे होते  आजही हवे आहे. गावातील आरोग्य सखींनी प्रकल्पात ते काम कसे करायचे हे शिकले आणि आजही त्या ते काम वसा घेतल्या सारखे करत आहेत याचा अतिशय आनंद वाटतो.  सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना- २२ आरोग्य सखी! Read More »

मागे वळून बघताना – २१ स्वयंरोजगार हेच विकासाचे माध्यम !

स्वयंरोजगार केल्याशिवाय बाईच्या हातात पैसे खेळते रहाणार नाहीत त्यामुळे स्वयंरोजगारासाठी गेली ३० वर्ष सातत्याने काम चालू आहे. स्वयंरोजगार प्रशिक्षण वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या गटातील महिलांसाठी घेतले म्हणजे सहभागी महिलांचा गट जरी बदलत गेला तरी आपले काम चालू राहिले. ग्रामीण महिलेसाठी घरातील स्थान उंचावणे, घरातल्या माणसांनी तिची दाखल घेणे असे कुटुंब पातळीवर ‘ती’ कमावती झाल्यामुळे होणारे बदल इतके महत्वाचे असतात की बचत गटाच्या उपक्रमातून आपल्या संपर्कात आलेली महिला काही काळ तरी या उत्पादकतेच्या गटात काम करतेच करते. ‘ती’ला ‘ती’च्या मनासारखे घरात स्थान मिळाले की हट्ट करून पुढे जात रहातेच असेही नाही पण सहभागी होते ही मात्र नक्की! प्रबोधनाच्या कामासाठी हे फार गरजेचे आहे असे वाटून आपण स्वयंरोजगाराचे काम करत आहोत. अनेक वर्ष सातत्याने काम केल्यामुळे आता थोडक्या दिवसांत काय कसे करायचे याचे शास्त्र बसले. भारतीताईंनी ते नवीन गावात करून बघायचे ठरवले. सायबेज कंपनीने असे करण्याची संधी दिली. आणि डिसेंबर २०२२ पासून सायबेजच्या आर्थिक मदतीने ‘सायबेज संपदा’ प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पात मार्च २०२४ पर्यंत काय करू शकलो त्यातल्या काही निवडक गोष्टींचा हा आढावा.  एखादी गोष्ट सिद्ध झाली असे म्हणायचे तर आधी ठरवून तसे करून दाखवले पाहिजे, म्हणून वेल्हे तालुक्यातील पण प्रबोधिनीच्या संपर्कात अजिबात नाहीत अशा ९ गावात हा प्रकल्प करायची संधी घेतली. ही सगळी गावे इतकी छोटी होती की कुठल्याही गावाची लोकसंख्या ५०० पेक्षा जास्त नव्हती, गावात एस टी येत नाही, ९ गावात मिळून १० वीची एकंच शाळा, ११ वी शिकायचे तर किमान रोज १०-१२ किलोमीटर चालत जावे लागेल अशी परिस्थिती. जेवढे गाव दुर्गम तेवढा विकास संथगतीने होतो ही लक्षात यावे म्हणून ही माहिती मुद्दाम नोंदवली.  तर कामाला सुरुवात कराची तर अर्थातच बचत गटापासून! म्हणून प्रत्येक गावात १ गट करायचा ठरवला होता, पण महिलांचा प्रतिसाद चांगला मिळाला ९ गावात १३ गट तयार झाले. मग त्या १३ गटांचा मिळून एक गट ज्याला आपण विभाग म्हणतो असा तयार केला. त्या विभागाला ‘संपदा’ असे नाव ठेवले. त्या विभागाचे बँकेत खाते काढले; सर्व व्यवहार बचत गट प्रमुखांद्वारे होतील असे पाहिले. बँकेत जाणे, चेकने व्यवहार करणे अशा वरवर किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा पहिल्यांदाच जेव्हा महिला करतात तेव्हा त्यांना ‘करण्याचा वेगळाच आनंद’ मिळतो.. तशी संधी योजावी लागते. प्रकल्पानिमित्ताने असे सगळे नियोजनपूर्वक केले.     गावातील बाईमध्ये बदल घडायला हवा असेल तर ‘ती’ने उंबरा ओलांडायला हवा. अगदी गावातल्या गावात जरी घराबाहेर पडली तरीही बदल घडायला सुरुवात होतात. संपदा प्रकल्पात ९ गावात स्वयंरोजगारांच्या २०-२२ प्रकारची २५१ प्रशिक्षणे या कालावधीत घेतली. प्रशिक्षणाची संख्या खूपच जास्त असली तरी छोट्या गावात गावपातळीवर ५-७ जणींसाठीच्या प्रशिक्षणाच्या या अभिनव कल्पनेला उदंड प्रतिसाद मिळाला. गावातल्या गावात सुद्धा प्रतिसादी होणं सोप्पं नसतं! सर्व वर्गांची मिळून सहभागी संख्या ८०० होती. अनेक जणी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या वर्गांना आल्या. त्याच धडपड्या आहेत असे लक्षात आले त्यांनी भरीव काम स्वयंरोजगारात केले, कोणी स्टॉलची जबाबदारी घेतली तर कोणी वैयक्तीक पातळीवर गुंतवणूक करून शेवई मशीन घेतली, गिरणी घेतली..  असे गावागावात जाऊन कमी उपस्थितीच्या महिलांचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षक महिलाही जवळपासच्या गावातीलच होत्या. प्रशिक्षक म्हणूनही अनेकींचा हा पहिला अनुभव होता. या निमित्ताने येणाऱ्यांनी व घेणाऱ्यांनी ‘घराबाहेर पडायची’ संधी घेतली. आता त्यातल्या अनेक जणी त्यांना आवडलेले गाणे आवडीने गुणगुणताना दिसतात ..’आता पुरे झाले घरात बसून, उठ हक्कासाठी कंबर कसून!’  एकदा का महिला घराबाहेर पडली की तिला पुन्हा पुन्हा घराबाहेर पडावे असे वाटायला लागते हे आपल्याला अनुभवाने माहिती होते. त्यामुळे सायबेजला सादर केलेल्या प्रकल्पातच असे नियोजन केले होते! अशा घराबाहेर पडणाऱ्या महिलांची दृष्टी जरा विशाल व्हावी म्हणून आपण प्रकल्प काळात ठरवून १९ अनुभव सहली काढल्या. अगदी पुण्यातल्या रविवार पेठेतील घाऊक दुकाने दाखवण्यापासून मुंबईची घाऊक बाजारपेठ दाखवणे असेल किंवा प्रकल्पात भरतकाम शिकवले म्हणून गुजरातमधल्या कच्छ भागात हाताने भरतकाम करून ४ लाख किमतीची साडी कशी बनते असे बघणे असे सुद्धा योजले होते, अशा सहलीला साधारण २०० जणी सहभागी झाल्या.  सायबेजला दिलेला प्रकल्प स्वयंरोजगाराचा होता त्यामुळे उत्पादन करणे व विकणे हा  त्याचा अविभाज्य घटक होता. प्रकल्प काळात ४३ स्टॉल लावले, ज्यावर ८.५ लाख रुपयांपेक्षा जास्त विक्री झाली. स्टॉलशिवायसुद्धा साधारण २० लाख रुपयांचे उत्पादन ७५ महिलांनी केले. गावातच काढलेल्या ३९ शेतसहलीतून २.५ लाख रुपयांची उलाढाल २०-२५ महिलांनी केली. बहुतेकींच्या आयुष्यातला अशा प्रकारच्या पाहुणचाराचा हा पहिलाच अनुभव होता. या शिवाय स्वतंत्र व्यवसाय करायचा म्हणून एका गटाने डाएट-किट बनवून ४ लाखांपेक्षा जास्त उलाढाल केली तर दुसऱ्या गटाने ३ लाख रुपयांचा दिवाळी फराळ उत्पादन करून विकला. सायबेज कंपनीने फक्त आर्थिक मदत दिली नाही तर कंपनीत वर्षभर साप्ताहिक स्टॉल लाऊन विक्रीसाठी सुद्धा मदत केली. त्यामुळे थेट ग्राहकांशी संवाद कसा करायचा याचेही प्रशिक्षण झाले.  प्रकल्पानिमित्ताने स्वयंरोजगाराचे काम प्रथमच करणाऱ्या ८१महिलांनी या कालावधीत  १३ लाखांपेक्षा जास्त उत्पादन केले. यामुळे अशी धडपड करणाऱ्या महिला आर्थिक प्रवाहात आल्या. मग लक्षात आले की कोणाचे आधार कार्ड अपडेट करायला हवे होते तर कोणाला PAN काढायला हवे होते. कोणाला पोस्टाच्या बचत खात्यांची माहिती हवी होती तर कोणाला बँकेत स्वतःचे खाते काढावे वाटत होते. अशी १६१ कामे अर्थसखीच्या मदतीने केली.   प्रकल्पासाठी केलेल्या १३ बचत गटाच्या रचनेतून जवळ जवळ २२ लाख रुपये माफक दरातले सुरक्षित कर्ज ६४ महिलांनी घेतले. व्यवस्थित व्याजासह होणारी परतफेड बघून सायबेज कंपनीने त्यात ९ लाख रुपयांच्या खेळत्या भांडवलाची भर घातली. ‘कर्ज माफी’ मिळवण्याच्या राजकीय खेळाच्या या जमान्यात, सन्मानाने कर्ज घेऊन व्याजाने फेडायला शिकवणे हे आव्हानच होते पण ‘विकास’ स्वतःच्या हिमतीवर होतो ‘अनुदानावर’ नाही हे मूल्य समजावून द्यायला आपण काही अंशी यशस्वी झालो. मला खात्री आहे अशा आर्थिक ‘इंजेक्शन’मुळे अनेकींच्या घरातली परिस्थिती सुधारली आहे. हे काम जरी महिलांच्या माध्यमातून केले असले तरी नेमक्या प्रयत्नाने अनेक कुटुंबात थोड्याशा काळात बदल झाला आहे.  प्रकल्पामुळे ‘करणारा’ गट काय शिकला तर वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक उपक्रमातून  सुद्धा ‘सुरक्षित संधी’ची योजना केली तर अगदी कमी कालावधीत ग्रामीण बाईचे आयुष्य बदलायला सुरुवात होऊ शकते! प्रबोधनाची ही पहिली पायरी! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना – २१ स्वयंरोजगार हेच विकासाचे माध्यम ! Read More »

मागे वळून बघताना २०:ग्रामीण महिलांची नेतृत्व विकासाची शाळा!

एकदा बचत गटाची घडी बसल्यावर गेले पंचवीस वर्ष आपण दर एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक वर्ष संपल्यावर वार्षिक हिशोब करून गाव पातळीवर गटाच्या हिशोबयचे जाहीर वाचन करतो. या निमित्ताने गटातून कोणी किती कर्ज घेतले, कोणाचे किती देणे बाकी आहे, बचत किती आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचते. एखादी महिला आपण शिकवल्याप्रमाणे जरी वागत नसली तरी ज्ञान प्रबोधिनी आर्थिक विषयातही पारदर्शक व्यवहाराचा आग्रह धरते हे गावातल्या सभासद महिलांपर्यंतच काय दूरून ऐकणाऱ्या पुरुषांपर्यंतही पोहोचते. असे पोचल्याचा सगळ्यात मोठा परिणाम गटाचे सामाजिक बळ वाढण्यात झाला होता. एखादीच्या कुटुंबाने किती मोठे आर्थिक निर्णय घेतले, त्याला बचत गट नेमका कसा आणि किती सहाय्यभूत झाला हे सुद्धा या निमित्ताने गावभर जाहीर होत होते. गटाच्या निमित्ताने ग्रामीण महिलांचा बँकांशी होणारा संवाद हा सुद्धा ‘ती’ची गावपातळीवरची निर्णय क्षमता वाढण्यासाठी उपयोगी पडला आहे असे मेळाव्या निमित्ताने गावाला दिसायचा. नेतृत्व विकासाचा जाणीवपूर्वक विचार करायला लागल्यावर अशा गावपातळीवर काम करणाऱ्या माहिलांसाठी कार्यक्रमाची आखणी केली. तेव्हा अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात केली. किती छोट्या गोष्टी तर गावातच २०-२५ जणींचा दोन-तीन तास चालणारा मेळावा घ्यायचा अशा उपक्रमाची सुरुवात केली. शेती कामे उरकल्यावर नवरात्रात या मेळाव्याची योजना केली. गेली १० वर्ष असे मेळावे योजनापूर्वक घेतले तेव्हा असे लक्षात आले की रोजंच गावात भेटणाऱ्या गावातल्याच महिलांसाठी मेळावा योजला तर मेळाव्याचे काम पैशाच्या हिशोबा पलीकडे असल्यामुळे एरवी पुढाकार न घेणाऱ्या चार जणी पुढाकार घ्यायला तयार होतात. बचत गटाच्या कामामुळे आर्थिक घडी तर बसली होती पण सामाजिक परिणाम घडवण्यासाठी अशा पद्धतीच्या कामांचा खूपच उपयोग झाला. गाव पातळीवर घेतले जाणारे असे मेळावे गावातल्याच महिलांसाठी, गावातल्याच महिलांनी घेतलेले असायचे, नवरात्रीच्या ठरावीक दिवसांत एकाच वेळी ३०-४० गावांमध्ये जाण्यापासून सुरुवात झाली एक वर्ष हा आकडा ८२ गावापर्यंत पोचला. या जवळपासच्या गावांमध्ये जबाबदारी घेऊन, नियोजनपूर्वक जाण्यामुळे गटाचा आत्मविश्वास उल्लेखनीय वाढला. असाच एक कामाचा मैलाचा दगड म्हणजे द्विदशक पूर्ती निमित्त घेतलेला महामेळावा! हा जवळजवळ चार-साडेचार हजार महिलांचा होता या मेळाव्याने कार्यकर्त्या गटाचा आत्मविश्वास दुणावला. त्याचा अधिक तपशील स्वतंत्र लेखात दिला आहे.   ग्रामीण महिला एकत्रितपणे अनुभव किंवा सराव नसल्याने फार दूरचे नियोजन करू शकत नव्हत्या तरी चालू कामांमध्ये बारकावे लक्षात घेऊन, नेटकेपणाने मन लाऊन काम करतात. अशा कामामुळे त्या गावात उठून दिसायला लागतात. शासनाने जरी महिला आरक्षण दिले असले तरी त्यासाठी पात्र होण्यासाठीची प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली नाही. बचत गट अशी संधी देतो. असे नेतृत्व संधी देणारे मेळावे, महिलांना मुख्य प्रवाहात आणायला मदत करतात. ‘कोणाला तरी महिलेला ५०% महिला आरक्षणामुळे संधी मिळणार आहे मग मी का नको?’ असे वाटणारी महिला गावासाठी धडपडून काहीतरी करताना दिसते मग गावातील महत्त्वाच्या पदांवर अशा महिलांची वर्णी लागायला सुरुवात होते. कोणी पाण्याच्या गाव पातळीवरच्या समितीची सभासद होते तर कोणी शाळेच्या शिक्षण समितीची सदस्य होते. कोणी पालक संघासाठी काम करू लागते तर कोणी बालवाडी ताईला मदत करू लागते.   हळदीकुंकवासाठी जमणे वेगळे आणि गाव विकासासाठी आपणच पुढाकार घेऊन काहीतरी करणे वेगळे. एकदा का सामाजात उतरून अशी नेतृत्व संधी घ्यायची ठरवली तर खूप शिकावे लागणार होते. अनुभवाने अनेकींच्या ही गोष्ट लक्षात आली. मग बैठकीचे विषय बदलले. छोटे भाषण गटांसामोर उभे राहून कसे करायचे या पासून अधिकाऱ्यांशी बोलायचे कसे ही अनुभवाने शिकायला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या, कुठली कामे कोण करते यांचे माहिती घेतली. गंमत म्हणजे ‘पुरुष’ पुढारी ‘शहरात’ जाऊन काय काय करतात यांचा महिलांनी बारकाईने अभ्यास केला. मग थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहाण्या पासून हॉटेलमध्ये जाऊन पंजाबी जेवण कसे मागवायचे यांचाही अनुभव स्वखर्चाने सुरक्षित छोट्या गटात महिलांनी घेतला. एकीकडे असे अनुभव घेताना आपण आपल्या प्रयत्नाने अनेक गावात महिला ग्रामसभा घेतल्या. गटातील महिला सरपंच नंतर होऊ देत पण आधी गावगाडा कसा चालतो ते समजले पाहिजे. रचनेचा भाग व्हायचे असेल तर रचना आधी नीट समजून घेतली पाहिजे असा साधा हेतू त्यात होता. ज्यांना पुढे जायचे होते त्यांनी अशा गटकार्यात हिरीरीने भाग घेतला. त्यामुळे नेतृत्व करण्याची उर्मी एकेकीच्या मनात जागी व्हायला लागली आहे असे लक्षात आले. ज्ञान प्रबोधिनी म्हणून आपण सोबत आहोतच पण आता बचत गटाला फक्त मार्गदर्शन करूया असे ठरवले. या प्रशिक्षणातून तयार झालेल्या काही जणींनी ‘जिजामाता प्रबोधन केंद्र’ अशा स्वतंत्र न्यासाची सुरुवात केली. गटाची जबाबदारी या न्यासाने घेतली. तरीही गटांची संख्या कमी करून, गट स्वयंपूर्ण होऊन आपापला आर्थिक व्यवहार बघेल असे बघतो आहोत. मग शासनाच्या योजनांना गाव प्रतिनिधी म्हणून त्या आपल्या मार्गदर्शनाने अर्ज करत आहेत. अगदी परवाच्या लोकसभेच्या निवडणूकीला ‘मला पटते त्या उमेदवाराचा प्रचार मी करते आहे!’ असे म्हणणाऱ्या सर्व पक्षात असणाऱ्या आपल्याच कार्यक्रमातून तयार झालेल्या महिला आहेत यांचे समाधान आहे. सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना २०:ग्रामीण महिलांची नेतृत्व विकासाची शाळा! Read More »

भाजी-विक्री, एक मदतकार्य !

आभाळात मान्सून पूर्व ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा आला. दोन दिवस उन्हाने तापलेल्या वातावरणात एकदम सुखकर फरक पडला तेवढ्यात कावेरीताईंचा फोन आला, ‘ताई पाउस येणार असे दिसतंय! नुकताच काढलेला कांदा शेतात चांगला वाळला आहे पावसाने भिजला तर आज २०-२५ रुपयाने जाणाऱ्या कांद्याला किलोला २ रुपये सुद्धा मिळणार नाहीत! काही तरी करा आणि कांदा लवकर म्हणजे उद्याच विकता येईल असे बघा!’ मी नेमकी अडचण समजावी म्हणून विचारले की ‘किती आहे?’ त्या म्हणाल्या, ‘फार नाही ५० किलोची १०० पोती तरी भरतील!’ …. एकीला मदत करायची तर ५००० किलो… ५००० किलो नुसता विचारही मला झेपेना. पण काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं. कावेरीताईंनी मला एकटीला नाही तर अनेक ताईंना फोन केले होते. सगळ्यांनी एकत्र बोलून मदत करायचे ठरवले! गटातल्या वंदनाताईंनी पुढाकार घेतला. एरवी त्रास वाटणारी प्रसार माध्यमे या वेळी कामी आली आणि कांदे विक्रीचा निरोप झपाट्याने फिरला. पुण्यात ३५ रुपये किलो कांदे मिळत असताना गावात १०रु ने विकला जात होता. म्हणून १८ रु किलो असा विक्रीचा भाव ठरवला पण किमान ५ किलो तरी घ्यायचा असं ठरवलं आणि म्हणता म्हणता १००० किलोच्या ऑर्डर बुक झाल्या आणि दुसऱ्या दिवशी वाटप करायचे ठरवून कावेरीताईंची मुले छोटा टेम्पो घेउन पुण्यात आलीही. वंदनाताईंनी कसं कुठून जायचे हे सांगितले आणि ग्राहकांना कुठे थांबा हेही सांगितले. तसे घडले आणि कांदा बघून लोकांनी ‘अजून द्या’ ‘अजून द्या’ अशी मागणी केली, ती अर्थातच पूर्णही झाली आणि एका दिवसात व्हॉटस अॅप कृपेने एका दिवसात १५००किलो कांदा विकला गेला.  लॉकडाउनमुळे सगळे घरात होते रोजचे भाजीवाले येत नव्हते त्यामुळे कांदा विक्रीला उदंड प्रतिसाद मिळाला. घेणारा आणि विकणारा दिघेही खुश झाले. घेणाऱ्याची गरज भागताना कमी दरात कांदा मिळाला आणि शेतकऱ्याला मदत झाली असे समाधान मिळाले तर विकणाऱ्याला चार पैसे जास्त मिळाले, कटकट न करता समाधानाने कांदे घेणारे ग्राहक मिळाले, रोख पैसे लगेच हातात आले. पाउस लागायच्या आत कांद्याचे पैसे झाले. सगळा खर्च निघाल्याचे समाधानहे त्या सोबत मिळाले! संध्याकाळी कावेरीताईंचा फोन आला, ‘ताई, कांदा करताना झालेला सर्व खर्च भरून आला. कालच्या फेरीत मुलांनी काही कांदा हॉटेलला विकला, काही भाजीवाल्यांनी ऑर्डर दिल्या. उद्या पुन्हा फेरी केली की संपेल सारं. बर वाटलं लोकांनी कांदा घेतला तेव्हा कोणी जेवण दिले तर कोणी उन्हाचे गार पाणी दिले, तर कोणी सरबत भरून बाटली दिली… सन्मानाने विक्री झाली! फार बर वाटलं. कांद्यामुळे नवीन कर्ज होणार नाही… आधीच लॉकडाउन त्याला चांगला आधार मिळाला!’ एरवी वर्तमान पत्रात बातमी वाचतो ‘अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे नुकसान’ म्हणजे काय हे कांदा घेणाऱ्या प्रत्येकाला थोडं तरी कळलं! ….प्रश्न सगळ्यांना होता आताकुठे एकीचा प्रश्न मार्गी लागला! तो पर्यत प्रबोधिनीने कांदा विकला ही ‘बातमी’ पुण्यात आणि बचत गट घेत आहोत त्या गावात पसरली. मग काय भारतीताईला फोन आले, ‘ताई आमची भाजी विकायची आहे. करोनामुळे बाजार बंद आहेत म्हणून शेतात गुर सोडायची का? असा प्रश्न आहे. देउ का पाठवून?’ आशाताईना फळवाले म्हणाले आमचे अंजीर, चिक्कू पण घ्याकी…. घेत असलात तरच तोडा करतो नाहीतर पक्षी येतीलच की…. मग कार्यकर्त्यांना स्वस्थ बसवेना, आशाताई म्हणाल्या मीच जाते कांद्याच्या टेम्पोत भाजी-फळे घेउन …. तोवर भारतीताईंनी एका अपार्टमेंटमध्ये स्टॉल ठरवला आणि दुसरे दिवशी २ गाड्या भाजी, कांदे घेउन निघाल्या. एक स्टॉल लागला त्यावर फक्त भाजीच विकली. सोसायटीतल्या पदाधिकाऱ्यांनी वजन करायला सुद्धा मदत केली. तीन तासात १५० किलोपेक्षा जास्त विक्री केली. तर कांद्याचा टेम्पो आज भाजी घेउन मागणी पुरवत पुणेभर फिरला त्याने ४०० किलो पेक्षा जास्त विक्री केली सकाळी ७ वाजता निघालेली गाडी शेवटची भाजी रात्री ९,३० वाजता देउन गावी परतली. दिवस भरात एकूण ५५६ किलो भाजी व १२०० किलो कांदे विकून झाले! वर्तमानपत्रे चालू नसली तरी आपल्या या उपक्रमाचा दोन दिवसात वाऱ्याच्या गतीने पुण्यात आणि गावात प्रसार झाला. देणारे आणि घेणारे दोघेही आग्रह करत होते. आता रचना बसवण्याची गरज वाटायला लागली. आधी मागणी नोंदवायची१ त्या प्रमाणे शेतकऱ्याला भाजी मागणी प्रमाणे काढायला२ सांगायची, गावागावातून गोळा करायची३. आणि पुणेभर वितरण करायचे४ …. कामेही त्याच क्रमाने करायची, तसे काही सोपे नव्हते, कारण लॉकडाउन चालू होते. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. गावातला टेम्पो भाजी घेउन बाहेर पडायला परवानगी लागतं होती, त्यामुळे आपल्या वाहनाला ‘अत्यावश्यक सेवा’ परवाना काढायचा, वितरकांनी करोना काळजी घेत सारे करायचे आणि काही शे किलो भाजी व फळे असे नाशवंत सामान मागणी केलेल्या व्यक्तींपर्यंत पोचवायचे ठरवले.  मग प्रबोधीनीय कार्यकर्ते कामालाच लागले! मागणी नोंदवण्यासाठी अॅप बनवले गेले. व्हॉटस अॅपने प्रचार सुरु झाला. सिंहगड रोड, सातारा रोड, कोथरूड, गावभाग असे व्हॉटस अॅपचे गट केले म्हणता म्हणता एकेका गटात २५७ सभासद होउन गट पूर्ण झाले, मग दुसरा गट असे एकूण ७ गट तयार केले. साधारण १३००+ सभासद गटात सहभागी झाले. भरपूर मागणी नोंदवली गेली.  आता मात्र पुरवठ्याची रचना अपुरी पडणार का काय असे वाटायला लागले. युद्धपातळीवर कामाला सुरुवात झाली. मागणी नुसार विभागवार पुणे शहरात भाजी वितारण करण्यासाठी रस्ते माहिती असणारे युवक, युवक विभागाने शोधून कामाला लावले तर ग्रामीण महिलांनी भाजी-फळे मिळवून वजन करून क्रेटमध्ये बसतील असे पाहिले. वांगी, दुधी, टॅमाटो, भेंडी असा कीट तयार करणे चिक्कू, अंजीर अर्धा एक किलोत पॅकिंग करणे असे ५००-५५० किलोचे पॅकिंग एकेका दिवशी सुरु झाले. हे चालू काम जे लांबून बघत होते ते सुद्धा उत्साहाने मदतीला धाउन आले. मनुष्यशक्ती कामाला लावायची पण करोना लॉकडाउनचे सर्व नियम पाळून, त्यामुळे गाडीत डिलिव्हरी द्यायला जातानाही दोन पेक्षा जास्त जणांनी एकत्र बसायचे नाही, मास्क हवेत हे सारे केले.  काम सुरु झाल्यावर प्रश्नही सुरु झाले. पहिल्या दिवशी सारे प्लॅस्टिक पिशवीत भरले तर दुसऱ्या दिवशी भाजी भरायला पिशव्याच नव्हत्या, दुकाने बंद त्यामुळे मिळणारही नव्हत्या, असे लक्षात आले मग रद्दी गोळा केली, त्याच्या पिशव्या तयार केल्या अगदी स्टेपलरच्या पिना संपल्या लॉकडाउनमुले त्याही मिळणार नाहीत मग पिशव्या पुरवायची जबाबदारी युवती विभागाने सांभाळली. कागदी पिशव्यात फळे भरली, भाजीसाठी कापडी पिशव्या वापरल्या पण त्याही खूप नव्हत्या एकीकडे गावात निरोप देउन त्याचे उत्पादन सुरु केले, तर ग्राहकांना सांगितले की भाजी घ्यायला येताना पिशवी घेउन या पिशवीत भाजी ओतून घ्या. कापडी पिशवी हवी असेल तर वर १० रुपये द्यावे लागतील पण पिशवी परत केलीत तर हवी आहे. ग्राहकांनी साथ दिली बहुतेक पिशव्या परत आल्या.  ग्राहकांनी फक्त मागणी देउन मदत केली असं नाही तर युवक गट भाजी वाटप करताना ‘भाजी’च्या वेळेला म्हणजे सकाळी-संध्याकाळी पोचला असे झाले नाही, कधी ऐन दुपारी सुद्धा पोचला तरी फोनवर बोलणे झाल्या प्रमाणे ठरलेल्या ठिकाणी बहुतेक जण आले. पोलिसांनी रस्ते बंद केले असताना मोकळे रस्ते शोधत एखाद्या पत्याच्या जवळपास जाणे सुद्धा लॉकडाउनमध्ये सोपे नव्हते. त्यामुळे कधी वेळ पुढेमागे झाली तर कधी एखादी मागणी केलेली भाजी एवढ्या डिलिव्हरी करताना पुढेमागे झाली तरी कोणी तक्रार केली नाही. हे ग्राहकांचे सहकार्य खूप महत्वाचे होते. भाजी-फळे वितरण करताना ज्याला डिलिव्हरी द्यायची त्याचा फोन लागला नाही म्हणून जर एखाद्या घरी जावे

भाजी-विक्री, एक मदतकार्य ! Read More »

मागे वळून बघताना १९ – करोना.. मदत करताना….. 

वेल्ह्यात एकूणातच आरोग्याची ऐशी-तैशी आहे. त्यातही महिलाच्या आरोग्याला कोणी वालीच नाही म्हणून गेली २५ वर्ष आपण वेल्हे तालुक्यात खपून काम करत आहोत. डॉक्टरांपेक्षाही जाणीव जागृतीचीच गरज जास्त आहे हे पुन्हा पुन्हा लक्षात येत होतं म्हणून 2020 मध्ये कामाच्या पंचविशी निमित्ताने महिला दिनाला ‘आरोग्य दौड’ काढली.. ६ ते ७२ या वयातल्या ८९० जणी ६३ गावातून सहभागी झाल्या होत्या. विंझर ते वेल्हे असे १० किमी अंतर पळून अनेकींनी पार केले त्यात अनेक जणी नउवारी साडीतल्याही होत्या. ….. या कार्यक्रमाला गावागावातून बायकांना दौडला घेउन आलेल्या वाहन चालकांचा अजून हिशोबही पूर्ण झाला नव्हता तेवढ्यात करोना संकट आले…  अचानक आलेल्या संकटात आधी स्वतःला सावरायचे मग इतरांना मदत करायची तसे झाले. हे करोना संकट इतके अचानक आले की स्वतःला सावरण्यात थोडा वेळ गेला कारण पुणे-मुंबई या मोठ्ठ्या शहरात लॉकडाउन केल्यावर पोटासाठी तिथे स्थलांतरीत झालेली गावातली मुले म्हणजे पुरुष मंडळी आपापल्या गावी घरी दीर्घ मुक्कामासाठी बायका-पोरांसह परतली होती. गावाची लोकसंख्या सात-आठशे असताना अचानक त्यात दोन-अडीचशेने त्यात एकदम वाढ झाली …… स्थानिक किराणा मालाच्या दुकानदाराचे साहित्यच संपले… असेही झाले. यामुळे करोनाचे गांभीर्य गावागावातच काय पण घराघरात पोचले. स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण विभागातल्य सर्व जणी फोनवर संपर्क करत होत्या. रोज झूमवर मिटिंग होत होती त्यामुळे ग्रामीण भागातली परिस्थिती समजत होती. पुण्यात एवढेच माहिती होते की फक्त ‘अत्यावश्यक सेवा’ चालू आहेत. याचा ग्रामीण अर्थ, जे फुले करणारे शेतकरी होते म्हणजे ज्यांनी झेंडूचे किंवा मोगरा, निशिगंध याचे शेत केले होते अशांचे ‘फुल बाजार बंद’ (कारण फुले अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने) नुकसान झाले. कारण फुलांसाठी पाडवा झाला नाही की रामनवमी अगदी हनुमान जयंती सुद्धा झाली नाही या उत्सवांचा पक्वान्ना बरोबरच फुलांशीही संबंध असतो! गावाकडून व्हॉट्सअप वर आलेले झेंडूच्या फुललेल्या शेताचे फोटो या काळ्या किनारीमुळे पहावत नव्हते! गावांनी ठरवून पुण्यात जाणाऱ्या गवळी लोकांना सुद्धा सांगितले ‘जीव महत्वाचा असला तर दूध घालायला जाउ नका, त्यांच्या अत्यावश्यक सेवेपेक्षा जीव महत्वाचा आहे’ रोज ६० ते ८० लिटर दूध मोटारसायकलवर येउन दूध घालणारे बंद झाले. त्यांचे दूध जवळच्या डेअरीला घातले गेले म्हणजेच लिटर मागे १५-२० रुपयाचा फटका! आता कर्ज कसे फिटणार ही वेगळीच चिंता. शासनाने हप्ता ३ महिने लांबवला तरी व्याजाचे काय? आज कोणालाच उत्तर माहित नाही. अशा कशाकशाचे समाजावर आर्थिक ताण.  जसे दूध बंदी केली तसे गावाबाहेर जाण्यास गावानेच शासनाने सांगण्याआधीच आपापली बंदी केली. भाज्या शेतात पण तोडा करून मार्केटला जाउ नका, घरच्या लागतील तेवढ्याच काढा पण पुण्याचे मार्केट नको…. पुण्यातून येताना करोना आला तर? याची भीती! अगदीच योग्य होती…. कारण सगळे काळजी घेत आहेत असे चित्र नाही…. हे टीव्ही वर सारखे दिसते आहे. तर काय…. गावात एकूणच उदासीन वातावरण आहे! तरीही थोडे सावरल्यावर गावातली कार्यकर्ती गावातच बाहेर पडली. गावात कोणाला मदतीची जास्त गरज आहे ते पहायला सुरुवात झाली. ज्यांची मुले घरी परतली नव्हती अशा किंवा ज्यांना मुलेच नव्हती अशा वयोवृध्द दांपत्यांना मदतीची गरज होती, हातावरच पोट असणाऱ्या एकल महिला; त्यांच्या कुटुंबाला मदतीची गरज होती. गावातल्या कार्यकर्तीला यादी पाठवायला सांगितली. तर म्हणता म्हणता ५० कुटुंबे झाली. तोवर पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी थोडी देणगी उभी केली. पुण्यातून प्रत्यक्ष कोणी जाउ शकणार नव्हते हे जरी नक्की असले तरी होईल तेवढे सगळे जण मदत करत होते.  एरवी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना बैठकीला गावागावातून आणायचे काम खुटवडदादा नेहमी करायचे मग त्यांना विचारले, ‘गावोगावी जाल का?’ त्यांनी आनंदाने ‘हो’ म्हंटले. नसरापूर गटातल्या महिलांनी घाउक दुकानाचा संदर्भ दिला तिथे खुटवड दादा गेले व पहिली ५० मदतीची पाकिटे बनवायला सांगितली. त्याचे e-payment केले (नोटाबंदीने सगळ्यांना e-payment करायला शिकवले त्याचा आत्ता उपयोग झाला) आणि पहिली मदत कार्याचे सामान घेउन गाडी निघाली!  शासन परवानगी लागेल हे लक्षातच आले नाही. गाडीने वेल्हे तालुक्यात प्रवेश केला आणि आंबवणे गावात पोलिसांनी गाडी अडवली. मदत कार्याचे पत्र हवे असे सांगितले मग pdf फॉर्म मधले e-पत्र व्हॉटस-अॅप वरून खुटवडदादांना पुण्यातून पाठवले. पण त्यावर शासकीय शिक्का नव्हता. हे होई पर्यंत वेळ गेला. पण स्थानिक कार्यकर्त्या निमाताई दादांना माहिती होत्या त्यांना दादांनी पोलीसांपाशी बोलावले. ‘हो हे संस्थेचे मदत कार्य आहे… सोडा की त्यांना’ निमाताई त्याच गावात रहात असल्याने पोलीस ओळखत होते…. तोवर वेल्हे कार्यालयातल्या निवासी कार्यकर्त्या प्रतिभाताई तहसील कार्ययालायात पोचल्या. नायब तहसिलदार होते. त्यांना गाडी आडवल्याचे सांगितले. त्यांनी आंबवणे गावात असलेल्या पोलिसांना खात्री करून मदत कार्याची गाडी सोडा… असे सांगितले.  पोलिसांनी खुटवडदादांना मदत घेउन जायच्या गावांची व कुटुंबाची यादी मागितली. त्यांनी त्या त्या गावच्या तलाठ्यांना फोन करून माहितीची खातर जमा करायला सांगितली मग तलाठ्यांनी सरपंचांना फोन केले, सरपंचांनी गावातल्या आपल्या कार्यकर्तीला बोलावून यादी मागितली. तिनेच ती दिली असल्याने चोख जुळली…. पुन्हा सगळे उलटे फोन झाले आणि खुटवडदादांना पोलीस म्हणाले, ‘आज सोडतो पण उद्या आलात तर शासन शिक्याचे पत्र असेल तरच सोडीन!’    हे सगळे करायला सगळं चोख होतं तरी तास गेला मग दादांनी निघताना पुन्हा कार्यकर्त्यांना फोन केले. ‘आंबवणे येथून निघालो’ सांगितले … तर त्या म्हणाल्या, ‘गावात कसे येणार रस्ता झाड पाडून आडवला आहे’, तर कोणी म्हणाले ‘दगडी टाकली आहेत आम्ही!, ….मग मात्र सांगितले ‘सगळ्यांना घेउनच मुख्य रस्त्यावर येते. तुम्ही आम्ही येईपर्यंत थांबा’ दादा पोचेपर्यंत सगळ्यांना गोळा करून तोंडाला मास्क घालून एक एक कार्यकर्ती जिच्या तिच्या फाट्यावर पोचली. गाडी आल्यावर सामान घेतले…. अगदीच ज्यांना चालताही येत नव्हते त्यांचे सामान त्यांनी स्वतःच गावापर्यंत वाहून नेले आणि प्रत्येकीला दिले. संच मोजून दिले होते. ‘कशाची मदत करायची?’ हे ठरवताना सगळ्याच बायका असल्यामुळे नेमके जिन्नस निवडले. शासन रेशन देत होती त्यात गहू तांदूळ होते. त्यामुळे तेल, मसाला, बेसन, साखर, साबण आणि मुख्य म्हणजे चहा असा शिधा आपण दिला होता. घरात बसले की दूध नसले तरी चालेल एकवेळ पण चहा हवाच! हे समजून सामान भरले. काही ठिकाणी इतरही मदत पोचली होती पण ज्यांना मदत मिळत/ मिळाली/ मिळवता आली नव्हती अशा घरात आपली मदत पोचली! पहिला दिवस खूप शिकवून संपला…. दिवस भरात फक्त ७ गावातल्या नेमक्या ५० कुटुंबांना ही मदत मिळाली. समाधान वाटले. ज्यांनी वाटप केले अशा एकीनेही स्वतःचे नाव त्या यादीत घातले नव्हते हे विशेष!  आता मदत कार्यासाठी तहसील कार्यालयातून आपल्या वाहनासाठी ‘अत्यावश्यक सेवा’ असे पत्र मिळवले. तेव्हा आपली योजना तहसीलदारांना सांगितली. त्यांनी स्थानिक नसल्यामुळे ज्यांना रेशन देता येत नाही अशा मजुरांची यादी दिली यांनाही मदत करा असे आवाहन केले. तलाठी संपर्क करतील असे सांगितले. वाटपाचा दुसरा दिवस होता. आता गाडी सोबत कार्याकर्त्याही गेल्या. सामान बरोबर आहे ना… घाऊकात घेतले म्हणून दर्जा घसरला नाही ना हे तपासले. मदत कार्य करताना गावागावाच्या वेशीवर आता खडा पहारा होता. पोलीस कुठे कुठे पुरणार? आता शासनाने शिक्षकांना कामाला लावले आहे. आपण किशोरी विकास करताना शाळेत जातो तेव्हा सारे शिक्षक आपल्या स्थानिक ताईना ओळखत होते. ‘अत्यावश्यक सेवा’ पत्र होते पण चेहेरेच ओळखीचे होते त्यामुळे कुठेही आडवणूक झाली नाही. अगदी गरजू कोण आहे… आणि राजकारणी घराशेजारी

मागे वळून बघताना १९ – करोना.. मदत करताना…..  Read More »

मागे वळून बघताना १८ – कृषी पर्यटन एक स्वयंरोजगार संधी! 

बचत गटाचं काम सुरू झालं तेव्हा बचतीची रक्कम ठरवताना चर्चा इथूनच सुरु व्हायची की बचत करणं हे जरी चांगलं असलं तरी बचतीसाठी वर्षभर रोख रक्कम आणायची कुठून? महिनाभर कष्ट केलेल्या बाईला तिच्या मिळकतीच्या एका दिवसाच्या मजूरीवर सुद्धा हक्क नसतो. त्यामुळे काहीतरी उत्पादन करून रोख पैसे मिळवणे यामधला महिलांचा सहभाग वाढवायला हवा या निमित्ताने स्वयंरोजगाराच्या कामाला सुरुवात झाली. ‘जे मला जमेल त्या वैध मार्गाने मी पैसे मिळावीन!’ असे म्हणायला ग्रामीण महिलेला खूपच हिम्मत लागते असेही लक्षात आले, म्हणून या मानसिक बदलाच्या कामाला स्वयंरोजगाराच्या निमित्ताने सुरुवात केली.    रोखीत पैसे मिळवण्यातील भीड चेपणे यावर काम करावे लागणार होते आत्मविश्वास पुरेसा नसेल तर कुठलेही काम करताना अडचणी येतात याचा प्रत्यय वारंवार यायचा. अपरिहार्यपणे करावे लागणाऱ्या कष्टाच्या कामाच्या भारामुळे ‘उद्योगी’ असायला मनाची मोकळीक नव्हती. ‘मला काही येत नाही, तुम्ही सांगा ते करण्याची माझी तयारी आहे’ असा सूर स्वयंरोजगारात फारसा उपयोगी पडत नाही म्हणून ‘तुला नक्की येतं तेच तू स्वतःच्या जबाबदारीवर करुन कमवू शकतेस’ याचा अनुभव द्यायचा ठरवावं.  २० वर्षांपूर्वी माझी मैत्रीण सुप्रिया हिने कल्पना मांडले की ‘जे काम महिला करतंच आहेत, त्याच कामाचं व्यवसायात रूपांतर केलं तर?’ या कल्पनेला वेल्ह्याची सुरेखा तयार झाली आणि पहिला ‘भात लावणी’ करायचा अनुभव देणारा पुण्यातल्या कुटुंबाच्या सहलीचा घाट सुप्रियाने यशस्वी केला. सहलीत सहभागी झालेली मुले यथेच्छ चिखलात खेळली, पावसात भिजली, धमाल केली! २० वर्षांपूर्वी अशी कल्पनाही कोणाला सूचली नव्हती ती करून दाखवली! चिखलातून चालणे किती अवघड गोष्ट आहे हे पर्यटकांना कळत होते तेव्हाच भात लावणीच्या दिवसांमध्ये रोख रक्कम हाताशी नसल्याने येणारी अडचण या पर्यटनाच्या पैशातून पूर्ण होत होती. अनेक वर्ष भात लावणीच्या दिवसांमध्ये अशा सहली आपण काढल्या आणि लाखो रुपयाची उलाढाल केली. सर्व रक्कम महिलेच्या हातात पोचली! किती रकमेची उलाढाल हे माझ्यासाठी फारसं महत्त्वाचं नव्हतं अशा पाहुणचारातून रोख रक्कम मिळवू शकतो हा विश्वास ग्रामीण महिलेला मिळाला तो महत्त्वाचा होता! पुढच्या टप्प्यामध्ये विजयाताई रसाळ यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या सहली काढल्या! करवंद, फणस, जांभूळ, खायला चला अशा नावाने ‘ग्रामीण पर्यटन सहली’ यात विशेष आकर्षण होते बैलगाडीमधून  चक्कर मारणे, विहिरीवर जाऊन पाणी भरणे, नैसर्गिक पाण्याच्या बंधाऱ्यामध्ये पोहणे यापासून संध्याकाळी निघताना धारोष्ण दूध पिणे. सहलीच्या जेवणाचा मेनू झुणका-भाकरी, चुलीवरचा भात, खीर असा साधासा असायचा. कोणालाही करता येईल इतका सोपा पण ‘मी करीन’ म्हणण्याची तयारी करायला लावणारा. अशाच काही सहली खास मुलांसाठीही काढल्या. या सहलीमध्ये झाडावरून आंबे काढून फोडी न करता खाणे, गरज पडली तर शिडी वापरून पण झाडावर चढणे, पारंब्यांचा झोका खेळणे, मासे पकडायचा प्रयत्न करणे, ससे-शेळी अशा प्राण्यांना हाताळणे अशी वेगळीच आकर्षणे होती. अशा काही सहलींना तर शाळांनी सुद्धा प्रतिसाद दिला मग त्या सहलीत ग्राम पंचायत दाखवणे, शेती अवजाराचे प्रदर्शन मांडणे, पंचायत सदस्यांच्या मुलाखती असे काही शैक्षणिक विषयही जोडले. या सहलीला १००-१२५ मुले सुद्धा आली एवढ्या सगळ्यांची न्याहारी, जेवण, अन्य कार्यक्रमाची योजना करताना पैसे मिळवण्या बरोबरच नियोजन कौशल्य शिकल्या, गटाने काम करायला, सगळ्यांना सामावून घ्यायला शिकल्या. अशा सहली भरभरून नफा देणाऱ्या ठरल्या आणि नफ्यासोबतच कुटुंबांना आत्मविश्वास देणाऱ्या ठरल्या. बाईने कमावले तरी ‘ती’चे सगळे घर ‘ती’लाही मदत करते हे ‘ती’नेही अनुभवले.  २०१२-१३ मध्ये रिझर्व बँकेची पंच्याहत्तरी झाली. त्यावर्षी आपण त्यांच्या सोबत गावोगावी कार्यक्रम केले आपल्या या कृषी पर्यटन करणाऱ्या महिलांनी या गटाच्या जेवणाची व्यवस्था केली. त्या चवदार जेवणामुळे या महिलांना संधी देण्यासाठी, रिझर्व बँकेच्या पुण्याच्या कार्यालयाने त्यांच्या ७००-८०० जणांच्या कौटुंबिक मेळाव्याचा मेनू त्यांच्या लॉनवर आपल्या मदतीने ठरवला. त्या वेळी सिंहगडावर दही विकणाऱ्या आपल्या गटाच्या महिलांना बोलावले होते तर गावरान चिकन बरोबरच गावरान मसालेदार आमटीसह पुरणपोळीचा स्टॉल सुद्धा बुफेमध्ये लावायची योजना केली. सगळे यशस्वी झाले. वेगळ्याच मेनूचा जरा ‘हटके’ असा आस्वाद घेऊन लोकं समाधानी झाली. या संधीमुळे असे वाटले की करायला लागले की मदतीचे हातही येतात. तोपर्यन्त कुठल्याही शासकीय योजनेत ‘कृषी पर्यटन’ अशी सोय नव्हती.  त्या नंतरच्या कोरोनाचा काळात तर बहुतेक घरातली आज पर्यन्त साठवलेली सगळीच बचत संपून गेली. व्यवहारिक निर्बंधांमुळे नवी कमाई कशी कधी होईल याचीही काही कल्पना येत नव्हती, तेव्हा ‘मामाच्या गावाला जाऊया’ अशासारख्या चार-पाच जणांच्या कौटुंबिक सहली, ‘चला शेती करूया’ अशा योजना आखून २.५-३ लाख रुपयांची उलाढाल केली. ५० कुटुंबांनी या सहल योजनेचे यजमानपद घेऊन नफा मिळवला.   नंतर थंडीच्या दिवसांत ‘चला पावटा भात खायला’ अशा सहली ठरवल्या. कोवळ्या उन्हात शेतात फिरायचे, स्वतः पावटा, वांगी, काकडी शेतांतून काढून आपलंच जेवण चुलीवर बनवायला मदत करायची. या पर्यटन उद्योगात ३०-४० कुटुंब नव्याने सहभागी झाली. पर्यटक येण्याच्या दिवशी गावातच शेतमालाचा स्टॉल लावायचा व थेट शेतकाऱ्यांकडून ताजा माल खरेदीचा आनंद गटाला द्यायचा हेही केले.  आता छोट्याशा कुटुंबाची वर्षभराची किमान आर्थिक गरज बंगायला ४/५ सहली पुरतात अशी रचना बसली.  ‘आपल्या घरात पाहुणे जेवले तर जेवणाचे पैसे घ्यायचे कसे?’ या विचारा पासून ‘पर्यटक म्हणून पाहुणे आले तर पैसे घ्यायला हरकत नाही’ या टप्प्यापर्यंत पोचल्या. संकोच कमी झाला. पैशाचे व्यवहार करतानाच्या मानसिकतेत बदल झाला. ज्या महिला पैसे घ्यायला शिकल्या त्यांची गावातली उधारीही चुकती व्हायला लागली म्हणजे ‘पैसे द्यायलाही शिकल्या!’ मग तिच्याकडे पाहुणे आले तर मजूरी करायला ‘नक्की वेळेत पैसे मिळणार’ या विश्वासाने मदतीचे हात वाढले. मग पापड, मसाले, भाजणी असे उद्योग सुरू झाले. नुसत भांडवल मिळून गिरणी उद्योग यशस्वी होत नाही, ‘माझ्याकडे दळायला टाकतील’ असे वाटणारीचा गिरणी उद्योग यशस्वी होतो असे स्वतःच्या उदाहरणाने अनेकींनी सिद्ध केले.  अतिशय महत्त्वाचा असणारा मानसिक बदल भारतीताईंनी एकीत-दोघीत नाहीत तर अनेकींमध्ये घडवला. बचत गटाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा टिकणारा बदल करणं सोपं गेलं. एकीला दुसरीची मदत होऊन जिला स्वयंपाक येतो तीनच ते चांगल्या प्रकाराने करणं हे वर वर सोप्पं वाटलं तरी व्यवसाय म्हणून जमायला मानसिक बदल व्हावे लागतात. मग जाता जाता जमून जातं.  स्त्री शक्ती प्रबोधनाच्या कामाचा भाग म्हणून जेव्हा आपण स्वयंरोजगार शिकवतो तेव्हा यशस्वी उद्योग झाला की तो तिचा हे आपल्याला स्पष्ट असते. तरीही एकेकीचा आत्मविश्वास वाढल्या शिवाय, समाजात सन्मानाने वावरता यायला लागल्या शिवाय, अभिव्यक्ती सुधारल्या शिवाय स्वयंरोजगारही यशस्वी होत नाही.  प्रबोधनाचे सगळ्यात प्रभावी आणि दृश्य माध्यम म्हणून आपण स्वयंरोजगाराचे काम केले आहे आणि करत आहोत ही नक्की!   सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना १८ – कृषी पर्यटन एक स्वयंरोजगार संधी!  Read More »