संत्रिका

पाकिस्तानी शाळांमधून असा इतिहास शिकवला जातो

श्री. यशवंतराव लेले इतिहास हे राष्ट्रनिर्मितीचे फार मोठे साधन आहे, याचा आपल्या राज्यकर्त्यांना विसर पडलेला असला आणि आपल्या राष्ट्रीय इतिहासाचा विकृत जातीय विपर्यास खपवून घेण्यापर्यंत आपल्याकडील अनेक विचारवंतांचीही मजल गेलेली असली तरी पाकिस्तानात मात्र त्यांच्याच दृष्टीने इतिहास शिकवला जातो. त्यात काय काय सांगितले जाते, याचा एका पाठ्यपुस्तकाच्या निमित्ताने घेतलेला आढावा. बरेच दिवस जिज्ञासा होती की पाकिस्तानात, म्हणजेच त्या सिंधुसरितेच्या परिसरातील शाळांमधून कसला इतिहास शिकवण्यात येत असेल ? त्या सिंधुदेशात, सिंध प्रांतात दाहीरचे नाव नि त्या देवल ऋषींचे नाव इतिहासात सांगत असतील का ? ती व्यास नदी, ती असक्नवी, ती रावी, ती शतद्रू अन् ती सिंधुसरिता ! या परमपावन पंच नद्यांच्या आसपास तरी कुणी सांगत असेल का की जगातील तो प्राचीनतम ग्रंथ ऋग्वेद-ऋषींना स्फुरला ? ग्रंथालयात शोधाशोध करता Pakistan Studies हे पुस्तक हाती लागले. ११ वी – १२ वी साठी हे अनिवार्य पुस्तक म्हणून नेमलेले असून पाकिस्तानच्या सर्व प्रांतांमध्ये ते शिकवावे लागते. पहिलेच प्रकरण आहे, The Basis of Pakistan पाकिस्तानचा पाया म्हणजे इस्लामचे पृथगात्म तत्त्वज्ञान असे प्रथम प्रकरणात सांगण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखकमंडळात पाचातील तीन डॉक्टर मंडळी आहेत. दुसऱ्या प्रकरणात पाकिस्तानची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करताना लेखकांनी कायदे-आझम जीनांचे वचन उद्धृत केले आहे. जीना म्हणतात ‘या उपखंडावर (म्हणजे भारतात) ज्या दिवशी पहिल्या मुसलमानाचा पाय पडला व पहिल्या हिंदूने इस्लामचा स्वीकार केला त्याच दिवशी पाकिस्तानची स्थापना झाली.’ दक्षिण आशियात मुस्लीम समाजाची निर्मिती महंमद बिन कासीमने राजा दाहीरचा पराभव करून सिंध प्रांत जिकल्यानंतर झाली. व्यापारार्थ आलेल्या अरबांच्या जीवनाचा स्थानिक लोकांवर असा काही प्रभाव पडला की त्यांच्यापैकी बहुसंख्य लोकांनी इस्लामचा स्वीकार करून मुस्लीम समाजात मोठी भर टाकली. ११ व्या शतकात दक्षिण पंजाबात सतत मुसलमान येत राहिले. लाहोरच्या हिंदू राजाने म्हणजे जयपालने सातत्याने जे विश्वासघाताचे वर्तन चालू ठेवले त्यामुळे महम्मद गझनीला राग आला व त्याने लागोपाठ स्वाऱ्या करून त्याचे राज्य खालसा करून आपल्या राज्यास जोडले. मुसलमानी समाजाचा दक्षिण आशियाच्या उत्तर व मध्य-भागात जो प्रसार झाला तो मुख्यतः महंमद घोरीच्या पराक्रमामुळे. त्याने तरेण (Tarain) युद्धभूमीवर राजा पृथ्वीराजाचा पराभव केला व थोड्याच अवधीत दिल्ली व अजमीर मुसलमानी अंमलाखाली आले. महंमद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने गुजरात व ग्वाल्हेरचे राज्य मुसलमानी अंमलाखाली आणले, तर बख्त्यार खिलजी बिहार-बंगाल मुस्लीम अधिसत्तेखाली आणण्यात यशस्वी झाला. १२०६ मध्ये कुतुबुद्दीन ऐबक हा गादीवर आला- तो दक्षिण अशियाच्या मोठ्या थोरल्या भागावरील मुस्लीम राजा म्हणून ! त्याने दिल्लीस ‘दार उल खिलाफा’ बनवले. त्याने उभारलेल्या प्रचंड मशिदीचा उर्वरित एकमेव मिनार म्हणजे आजही पहावयास मिळणारा कुतुबमिनार होय ! अशा प्रकारे दीर्घकालीन मुस्लिम अधिराज्याचा द. अशियावरील पाया घातला गेला अन् १८५७ पर्यंत हे अधिराज्य चालले. मोगली सिंहासनावरून बहादूरशहा जफरला पदच्युत करण्यात आल्यानंतर हे अधिराज्य संपले. आध्यात्मिक भूमिकेतून राज्य करणाऱ्या इल्तमश व नासिर उद्दीन मोहंमदसारख्या प्रगल्भ राजांनी जसा इस्लामचा प्रसार केला तसाच प्रामाणिक, सच्चे असे जे सूफी संत त्यांनीही तो केला. त्यांची दारे हिंदू नि मुसलमान सर्वांनाच खुली असत ! एखाद्या मुसलमानाने आपले वर्तन सुधारण्यामुळे त्यांना जसा आनंद होई तसाच हिंदूने इस्लामचा स्वीकार केल्याने होत असे. पण सर्वांचीच आध्यात्मिक उन्नती करणे हे त्यांचे ध्येय होते. मुसलमानी सत्ताधीशांनी येथील मुस्लिम समाजास भक्कम राजकीय आधार दिला तर सूफींनी त्यांना नैतिक व आध्यात्मिक बळ दिले. अजमीरचे ख्वाजा मुइउद्दीन, बाबा फरीदगंज शकर, स्वाजा निजामुद्दीन अवलिया, शेख बहाउद्दीन झकेरिया, हजरत मखदुम-इ-जहानिआन इ. जहान गंश्त आणि शेख रूखउद्दीन या सूफी संतांचे काम इस्लाम प्रसाराच्या दृष्टीने स्मरणीय आहे. आठशे वर्षांच्या मुसलमानी सत्तेने या उपखंडाचे केवढे कल्याण केले ते सांगताना लेखक म्हणतात ‘शांतता, न्याय, भौतिक विकास, एक नवीन संस्कृती आणि जीवनपद्धती या गोष्टी उपखंडास मुस्लीम कालखंडाची देणगी म्हणता येईल.’ दक्षिण आशियाई मुस्लिम राजसत्तेचा कणा तैमूरलंगाच्या स्वारीमुळे मोडून पडला व फिरोजशहा तुघलकापासून ते अकबर बादशहा होईपर्यंतच्या सुमारे दीडशे वर्षात सिकंदर लोदीच्या राज्याची २८ वर्षे वगळता स्थिर असे केन्द्रीय शासनच अस्तित्वात नव्हते. अखेरीस तर राजस्थानात व विजयानगरात हिंदू बंडखोरीचे ओंगळ भूत उभे राहिले. पुढे तर रजपुतांनी (Seditious methods) राजद्रोहाचा विडा उचलून त्याबरोबर धार्मिक क्षेत्रातही अशी काही उलथापालथ आरंभिली की एकीकडे भक्ती संप्रदायाच्या मिशाने त्यांनी इस्लामच्या आध्यात्मिक पायासच सुरूंग लावला तर दुसरीकडे त्यांनी मुस्लीम समाजास उघड उघड धर्मत्यागाचीच ओढ उत्पन्न करण्यास प्रारंभ केला. ‘ त्यात भर पडली ती अकबराच्या अतिउदार धार्मिक धोरणाची ! द. अशियातील इस्लामचे त्यामुळे अस्तित्वच धोक्यात आले होते. अकबराने हिंदू वेषभूषा केलेली पाहून एतद्देशीयांना काय आनंद झाला असेल याची कल्पना करून पहावी. पण ख्वाजा बाकी-बिल्ला आणि मुजाद्दिद अल्फीथानी यांनी मुस्लीम धर्माच्या जागरणाचे काम आघाडीवर राहून सुरू केले. त्यांचे काम अवघड होते. अकबराच्या दिने इलाही या गोधडी धर्माचे खूळ निपटून काढणे हे एक आवश्यक काम बनले होते तर दुसरीकडे भक्त कबीर, बाबा नानक व त्यांचे सहकारी यांनी इस्लाम व पाखंडी विचार एक करून राम व रहीम ही एकाच शक्तीची दोन नावे असल्याचा भ्रम पैदा करण्याचा जो खटाटोप चालवला होता त्याच्याशी मुकाबला आवश्यक झाला होता ! ‘पायाभूत तत्त्वावरील श्रद्धा एकदा गोंधळली की माणसाची क्रमाने पाखंडाकडे मार्गक्रमणा सुरू झाली हे गृहीत धरावे.’ ‘मुस्लिम पुनरुज्जीवनाचे काम करणाऱ्यांत तत्कालीन दिल्लीच्या शेख अब्दुल हक्क यांचाही उल्लेख केला पाहिजे. मुसलमानांनी हादिथ (Hadith) चा अभ्यास करण्यास त्यांना गोडी वाटावी असे प्रयत्न त्यांनी केले. ‘ शाहजहान व औरंगजेब यांचे विशेष कार्य काय होते त्याबद्दल लेखक म्हणतात, ‘समाजात इस्लाम धर्माची श्रद्धा वाढीस लागावी यासाठी शहाजहानचे प्रयत्न विशेष कारणीभूत ठरले आहेत. दैनिक नमाजावर त्याचा कटाक्ष असे. धमनि सांगितलेले उपवास तो करीत असे. उलेमा व प्रतिष्ठित मुसलमानांचा गौरव तो नेहमी करीत असे आणि शरियतच्या कायद्याप्रमाणे तो आपले निर्णय करीत असे. हे सारे जरी खरे तरी मुस्लिम साम्राज्याची उभारणी शरियतच्या आधारावर करणे, साऱ्या देशभर उलेमांकडे न्यायदान सोपवणे, आणि बादशाही आसन हे साऱ्या नास्तिकतेतून किंवा अनेक देवतावादातून पूर्णतः मुक्त करण्याचे महत्कार्य मात्र औरंगजेब अलमगीर याच्या हातूनच व्हायचे होते हे खरे! ते त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले ‘फतवा-इ-अलमगिरी’मध्ये औरंगजेबाने शरियतच्या आधारे आपल्या राज्याचे कायदे मांडून दाखवले आहेत. त्याच्या काळात मोगली साम्राज्याच्या सीमा खूपच विस्तारल्या हे जरी खरे तरी त्या क्षेत्रात सत्ता दृढमूल होण्याआधीच दक्षिणेत मराठ्यांनी बंडाळी केली व औरंगजेबाच्या वारसांना त्यावर नियंत्रण ठेवणे जमले नाही.’ याच वेळी जर अहंमदशहा अब्दालीची स्वारी होऊन त्यारे पानपतावर मराठ्यांचा पराभव केला नसता तर मुसलमानी सत्ता हिंदूंच्या हाती पडण्याचे दुःस्वप्न खरे ठरले असते !’ तिकडे वायव्य सरहद्द प्रांतात सय्यद अहमद आणि शहा इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली जिहादचा पुकारा करून मुस्लिम जनतेने शिखांचा उठाव दडपून टाकण्याचे प्रयत्नात हौतात्म्य पत्करले. बंगालमध्ये सिराज उद्दौला आणि दक्षिणेत हैदरअली आणि टिपू सुलतान यांचे इस्लामस्थापनेचे सारे प्रयास विश्वासघातक्यांनी व्यर्थ ठरवले ! आणि सुमारे ८०० वर्षाच्या कालखंडानंतर द. आशियात मुसलमान सत्ताभ्रष्ट झाले. द. आशियात विजेते म्हणून आलेले नि शतकानुशतके येथे राज्यकर्ते म्हणून राहिलेले, भरभराटीस आलेले मुसलमान दूरदृष्टीच्या अभावी अन् इंग्रजांच्या कुचक्रात सापडून अधोगतीला पोचले !’ पाकिस्तानची चळवळ – तेहरिक-ए-पाकिस्तान ! याविषयी लेखक सांगतात, ‘मुसलमानांची राजकीय

पाकिस्तानी शाळांमधून असा इतिहास शिकवला जातो Read More »

अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी विवाह

मैत्री वधुवरांची ! मैत्रीची परीक्षा संकटाच्या प्रसंगाने होते हे खरेच आहे. हौसेमौजेच्या प्रसंगी जमा होणारे सारेच खरे मित्र असतात असे नाही. आपण आपत्तीत सापडलो की त्या मंडळींपैकी जे कोणी धावून येतील आणि आपत्ती दूर करण्यासाठी साहाय्य करतील त्या मोजक्या व्यक्तींना खरे मित्र म्हणून समजण्यास प्रत्यवाय नाही. लग्नानंतर एकत्र येणाऱ्या युवक-युवतींना आपण परस्परांचे खरे मित्र व्हावयाचे आहे, याचे भान नसते. तसे भान निर्माण होण्यासाठी कोणी प्रयत्न करतात असेही नाही. वधुवरांना ही गोष्ट लग्नाआधी सांगण्याची काही व्यवस्थाही नसते, प्रत्यक्ष लग्नविधीत यासाठी योग्य स्थान आहे खरे, पण आपला लग्नविधी संस्कृतात असल्याने त्याचा बोध होणे कठीण जाते. विधी सुरू असताना मंत्रांचा उच्चार गुरुजी करणार तोही इतक्या घाईने की संस्कृत पदवी घेतलेल्यांनाही त्यातले शब्द कळणे कठीण होते. ज्यांना शब्द कळत असतील त्यांनी मधेच अर्थ विचारण्याची सोय नाही. अर्थ समजावून सांगणारे गुरुजीही अत्यंत दुर्मिळ. अशा परिस्थितीत खरोखरी सुखी संसाराची स्वप्ने साकार करण्यासाठी लग्नापूर्वी शक्यतो ‘विवाहवेद (लेखिका डॉ. ऋतुजा विनोद) यासारख्या पुस्तकाचे वाचन करावे, सकृतदर्शनी पसंत पडलेल्या भावी जीवनसाथीस नीट समजावून घेण्यासाठी परस्पर बोलावे, शंकांचे शक्यतो आधीच निरसन करून घ्यावे. आपल्यातील गुणदोषांचे आपल्याला भान असावे म्हणजे आपल्याला आवडलेली व्यक्तीही अशीच गुणदोषांनी युक्त असणार हे गृहीत धरून वागता येईल व परिणामी फारसा अपेक्षाभंगही होणार नाही. शिक्षित उच्चवर्णीयांमध्येही रूप, वेतन, विदेशी वास्तव्य असल्या बाह्य गोष्टी पाहून झटपट निर्णय होताना दिसतात आणि अनेकदा शोकांतिकांना सामोरे जाणे भाग पडते. सन्मित्र लक्षण भर्तृहरीने सन्मित्र लक्षणे सांगितली आहेत. ती आपल्याला आवडतील अशीच आहेत. पण आपण असे सन्मित्र आहोत का, हे आपले आपण आधी पहावे व मग दुसऱ्याकडून तशा प्रकारची अपेक्षा ठेवावी. भर्तृहरीने म्हटले आहे- पापात् निवारयति योजयते हिताय | गुह्यं निगूहति गुणान् प्रकटीकरोति|| आपद्वतं न जहाति ददाति काले| सन्मित्रलक्षणम् इदं प्रवदन्ति सन्तः ॥ येथे उत्तम मित्राची खरे पाहता लक्षणे सांगितली आहेत पापापासून म्हणजेच वाईट कार्यापासून परावृत्त करतो तो खरा मित्र केवळ नकारात्मक लक्षण हे उपयोगाचे नाही. कुकर्मापासून परावृत्त करून स्वहितकारक अशा सत्कर्मात जो गुंतवतो तो मित्र ! आपल्यापाशी जगापासून लपवून ठेवाव्यात अशा काही गोष्टी, उणीवा, रहस्ये असतात. त्यांची वाच्यता चारचौघांत चुकूनही करणार नाही तो खराखुरा मित्र. आपले सद्गुण, आपले विजय, आपली सत्कर्मे अशा गोष्टी आपण आपल्या तोंडाने सांगायच्या नसतात. पण आपल्या या सर्व गोष्टी चारचौघांमध्ये प्रेमाने सांगायला ज्याला आवडते तो आपला स्नेही हे नक्की! आपण अडचणीत सापडलो असता आपली साथ सोडणारा मित्र कसला? आपली अडचण ही ज्याला स्वत:वरचे संकट वाटते तो मित्र ! अशा संकटप्रसंगी कोरडी सहानुभूती दाखवून न थांबता प्रत्यक्षात हवी असेल ती मदत मिळवून देतो तो सच्चा स्नेही म्हणावा, अशी सहा लक्षणे सांगून अखेर “सज्जनांनी ही उत्तम मित्राची खूण सांगितली आहे” असे भर्तृहरी म्हणतो. म्हणजे सन्मित्रात सहाही गुण हवेतच हा त्याचा आग्रह आहे. साप्तपदीन स्नेह विवाहविधीतील सप्तपदीमध्ये सातवे पाऊल टाकताना वराने वधूला उद्देशून म्हणावयाचे असते ‘सखा सप्तपदी भव’ सख्यासाठी, मैत्रीसाठी, आपल्या दोघांच्या निरंतर स्नेहासाठी सातवे पाऊल टाका. गुरुजींनी सप्तपदीच्या वेळी शक्यतो हा परस्पर मैत्रीचा अपेक्षित अर्थ स्पष्ट करून सांगावा. त्याचा काहीना काही उपयोग अवश्य होईल. सप्तपदीतील पहिले ‘पाऊल अन्नलाभासाठी आहे. त्याचवेळी एकपत्नीव्रत आणि एकपतिव्रत पाळण्याचे वचन उपस्थितांच्या साक्षीने पतिपत्नीने घ्यावे. सामर्थ्यसंपादनासाठी दुसरे पाऊल टाकावयाचे असते. ते टाकताच ‘आमची संपत्ती ही आम्हा उभयतांची आहे. दोघांचाही तिच्यावर सारखाच अधिकार आहे” असे वधुवरांनी प्रकटपणे म्हणावे, मग धनसंवर्धनासाठी तिसरे पाऊल टाकले जावे. सुखसमृद्धीसाठी चौथे पाऊल टाकताना परस्परांची प्रतिष्ठा राखण्याचा निश्चय दोघांनी सांगावा. पाचवे पाऊल हे संततीसाठीचे आहे. ते टाकताना वधुवर निर्व्यसनी राहण्याचा निर्धार प्रकट करतील, तर संततीसही व्यसनमुक्त राहण्याचे वातावरण प्राप्त होऊ शकेल. सहाही ऋतूंचा सारखाच आनंद उपभोगण्याची मानसिकता सहावे पाऊल टाकत असताना व्यक्त व्हावी आणि बरोबरीने परस्परांच्या गुणदोषांचाही आनंदाने स्वीकार व्हावा. दुर्गुण दूर अवश्य करावेत पण ते आपले आहेत हे समजून हळूवारपणाने ते काम केले जावे हे बरे ! सप्तपदी झाल्याशिवाय रूढी, शास्त्र, कायदा, याप्रमाणे हिंदू विवाह सिद्ध होऊ शकत नाही हे ध्यानी ठेवून त्याच्यासाठी थोडा अधिक वेळ देऊन मैत्रीचा खुलासा सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे गुरुजींनी अगत्यमेव करावा. लाजाहोमाचे औचित्य विवाहात लाजाहोमाचा विधी केला जातो लाजा म्हणजे लाह्या विशेषतः भाताच्या लाह्या! ज्या होमात भांताच्या लाह्यांची आहुती त्रिवार देण्यात येते त्यास लाजाहोम म्हणतात. तुपाच्या आहुत्या किंवा समिधांच्या आहुत्या देण्याची व्यवस्था असूनही लग्नविधीत भाताच्या लाह्या आहुतींसाठी का सांगितल्या गेल्या ? भात हे असे धान्य आहे की ज्याची लावणी करावी लागते. त्या भाताच्या लाह्या या अग्निपरीक्षेतून तयार होत असतात, माहेरचे बीजगुण घेऊन आलेल्या वधूची सासरी एक प्रकारे लावणीच होत असते. नवीन माती, नवी परिस्थिती अन् अनोखं पर्यावरण अनुकूल करून घेणं ही अग्निपरीक्षा वधूलाच द्यावी लागते ! त्यामुळे तिला उदंड आर्द्रतेची, , हृदयाच्या ओलाव्याची अपेक्षा असते याची जाणीव सासरच्या परिजनांनी व मुख्यत: यजमानांनी ठेवायला हवी. नाहीतर मग तर मग रोप जीव धरत नाही, हवं तसं वाढत नाही, कोमेजू लागतं. हे आपण पाहतोच! लक्ष्मीपूजन करून जिला घरात घेतली तिला, त्या प्रत्यक्ष लक्ष्मीला सुकवून सुख कसं वाढेल? संस्कार व्हावा मंत्रांमधील अक्षरही न कळता तीन तीन दिवस लग्न चालले किंवा तीन तीन तास विविध विधी केले तर यथासांग भरपूर काही केल्यासारखे वाटते. हजारो लोक जेवतात, लक्षावधींचा खर्च होतो, कर्जाचा डोंगर वधू पक्षाच्या माथी येतो आणि अखेर संसार यशस्वी होईल की नाही हे काही सांगवत नाही. त्यासाठी लग्नाकडे केवळ गंमत म्हणून, देण्याघेण्याचा, हौसमौजेचा, खाण्यापिण्याचा समारंभ म्हणून पाहणे थांबवून एक दीर्घकालीत सुख दांपत्यासाठी, दोन्ही कुटुंबांसाठी आणि पर्यायाने समाजासाठी ज्यामुळे लाभेल असा सु-संस्कार म्हणूनच त्याकडे पहावे.

अवघाचि संसार सुखाचा करण्यासाठी विवाह Read More »

युवती विभाग

ज्ञान प्रबोधिनी युवती विभाग ‘संघटन हे सर्व देशप्रश्नांसाठीचे योग्य उत्तर आहे’ ही भूमिका ज्ञान प्रबोधिनीमध्ये सुरुवातीपासून स्वीकारलेली आहे. त्याच भूमिकेने युवतींचे संघटन करण्यासाठी युवती विभाग काम करतो. युवती विभाग म्हणजे वय वर्षे १० ते ६० मधील ‘युवतींसाठी’ संघटनात्मक रचना! १९६४ पासून युवतींच्या संघटनाची सुरुवात स्वतः प्रबोधिनीचे आद्य संचालक संस्थापक कै. आप्पासाहेब पेंडसे यांनी तेव्हाच्या युवती कार्यकर्त्यांबरोबर केली. त्यानंतरच्या काळात युवागटासाठी ‘युवती विभाग’, मध्यमवयीन स्त्रियांसाठी ‘संवादिनी’ गट तसेच ज्येष्ठ महिला सदस्यांसाठी ‘जिजामाता दल’ कार्यरत आहे. युवती विभागाद्वारे ‘संघटना हे सूत्र बनावे’ या उद्देशाने स्वयंप्रेरणेच्या तत्त्वावर आधारित गटबांधणी केली जाते. यासाठी विविध वयोगटातील व विषयांभोवती गुंफलेल्या दलांच्या माध्यमातून काम होते. या दलांमध्ये स्वतःचे शिक्षण/ नोकरी/ व्यवसाय सांभाळून स्वतःच्या, समाजाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या युवतींचा समावेश होतो. विभागातून नियमित व प्रासंगिक कामांच्या माध्यमातून शालेय तसेच महाविद्यालयीन युवतींच्या सर्वांगीण विकसनासाठी म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकसनासाठी आणि गटात एकत्र काम करता येण्याच्या गुणांच्या विकसनासाठी तसेच नेतृत्व विकसनासाठी योजना केली जाते. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात चालू असलेली नियमित दले:- (१) शालेय वयोगटासाठी भरणारी दले- १.१ प्रशालेय दले- सोमवार ते शुक्रवार ५:४५-७:०० ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे येथील इयत्ता पाचवी ते दहावीतील २४० विद्यार्थिनींसाठीचे उपक्रम. मुख्यतः क्रीडा हे माध्यम दलासाठी घेतले जाते आणि गटात काम करण्याचे गुण तसेच नेतृत्वगुणांचे विकसन करण्यासाठी दैनंदिन उपक्रमांची योजना केली जाते. त्यामध्ये दैनंदिन व प्रासंगिक उपक्रम- क्रीडा शिबिरे, ग्रामीण परिचय शिबिरे, इतिहास अभ्यास शिबिरे, सहली, वारी, गणेशोत्सव व अन्य सार्वजनिक उत्सवांतील सहभाग तसेच संचलन, पद्यगायन, विविध वैचारिक व नैमित्तिक विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि गटकार्ये असे उपक्रम योजले जातात. संपर्क : गार्गी देवचके – ९४२०८८८६५३ १.२ प्रबोध शालेय दल- साप्ताहिक वारंवारितेने हे दल दर शनिवारी ज्ञान प्रबोधिनी भवन येथे भरवले जाते. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेव्यतिरिक्त अन्य शाळांतील मुलींसाठी चालणारे दल, ज्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकसनासाठी विविध उपक्रम योजले जातात. त्याअंतर्गत मुख्यतः गटकार्य, गटचर्चा, व्यायाम-खेळ, कला-प्रशिक्षण अशा माध्यमांचा उपयोग होतो. संपर्क : ऋचा जोशी – ९१४५६६०४१२ १.३ विज्ञान दल- सध्या पाक्षिक वारंवारितेने हे दल नियमितपणे ज्ञान प्रबोधिनी भवन येथे भरवले जाते. प्रामुख्याने विज्ञानाच्या माध्यमातून संघटन व्हावे यासाठी हे दल भरणार आहे. याअंतर्गत मुलींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी विविध प्रयोग करण्यात येतात व विज्ञान-अभ्यासाची व प्रकल्पाची पद्धत शिकवली जाते. संपर्क : श्रद्धा केळकर – ९८२२५१५५२८ (२) महाविद्यालयीन व पदव्युत्तर (व्यावसायिक) युवतींसाठी भरणारी दले- २.१ अहिल्याबाई होळकर युवती दल- साप्ताहिक वारंवारितेने हे दल दर शनिवारी ज्ञान प्रबोधिनी भवन येथे भरवले जाते. महाविद्यालयीन (व व्यावसायिक) युवतींचे संघटन या दलाद्वारे होते. या दलामागील उद्दिष्टे- अ. युवतींमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणे. आ. युवतींच्या शारीरिक क्षमता ओळखणे आणि ताणणे. इ. युवतींचे वृत्तीघडण तसेच गटात काम करण्याचे गुण तसेच नेतृत्वगुणांचे विकसन होणे व त्यासाठी कौशल्य-प्रशिक्षण करणे. ई. दलातील युवतींना प्रबोधिनी परिचय करून देणे. या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी कला, क्रीडा, विविध विषयांचा अभ्यास, चर्चा, कौशल्य विकसन अशा माध्यमातून उपक्रम दलांवर घेतले जातात. संपर्क : केतकी भट – ७५८८२२८८१३ वरील विषयांच्या/ माध्यमांच्या व्यतिरिक्तही शालेय, महाविद्यालयीन व व्यावसायिक गटांतील युवतींनी एकत्र येण्यासाठी विविध उपक्रम वर्षभर व सुट्टीत योजले जातात. या सर्व उपक्रमात किंवा उपक्रमांच्या नियोजनात काही जबाबदारी घेऊन सहभागी व्हायचे असेल तर संपर्क साधू शकता. पुण्यात जसे काम चालते, तसेच प्रबोधिनीच्या अन्य केंद्रांवरही युवती संघटनाचे काम चालू असते. तरी सर्वांचे मनापासून स्वागत. संपर्क:- १. प्रज्ञा प्रभुदेसाई – अक्कलकोटकर : ८९८३४०१५०७ २. मेधाविनी वाटवे : ९४२३१६२१३४

युवती विभाग Read More »

प्रत्यक्ष धर्मविधी करताना ….

मागील चार प्रकरणांमधे आपण पाहिले की  धर्माचे दोन भाग असतात. तात्त्विक धर्म आणि आचारधर्म. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे अनुष्ठाने व प्रतीके यांच्याद्वारे तत्त्वज्ञानाला दिलेले मूर्त रूप होय. विविध संस्कार, शांती, पूजा म्हणजे तत्त्वज्ञानाला मूर्त रूप देण्याचाच एक प्रयत्न  होय. मात्र या सर्व विधींमधे स्थलकालानुरूप परिवर्तन झाले पाहिजे. ते का व कसे झाले पाहिजे हेही आपण पाहिले. या प्रकरणात आपण प्रत्यक्ष धर्मविधी करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात ते पाहू. हे सर्व विवेचन म्हणजे धर्मविधींमधील परिवर्तन कसे झाले पाहिजे ते दाखवण्याचाच एक प्रयत्न आहे. १.  पुरोहित ‌‘पुरोहित‌’ हा शब्द पुरस्‌‍ + हित (‌‘धा‌’ (ठेवणे) या धातूपासून बनलेले भूतकाळवाचक   विशेषण) असा बनलेला आहे. पुरस्‌‍ म्हणजे पुढे आणि हित म्हणजे ठेवलेला. पूर्वीच्या काळी युद्धात, राज्यकारभारात, धर्मकृत्यात अग्रभागी राहून राजास मदत करणाऱ्या व्यक्तीला पुरोहित म्हटले जाई. हा शब्द ऋग्वेदकाळापासून प्रचलित आहे. उदा. अग्नीला पुरोहित हे विशेषण लावले आहे. बृहस्पती हा देवांचा पुरोहित होय असे उल्लेख आढळतात. पुरोहित युद्धामध्ये  सैन्याच्या पुढे  राहात असे व आपल्या सैन्याला विजय मिळावा म्हणून प्रार्थना करीत असे. राज्यकारभारातही पुरोहिताचा सल्ला महत्त्वाचा मानला जाई. यज्ञयागादि धर्मकृत्यांमधे मंत्रपठण करणे व तदनुषंगिक कृतींचे मार्गदर्शन करणे हे पुरोहिताचे काम असे. यावरून पुरोहित ही समाजाचे नेतृत्व करणारी महत्त्वाची व्यक्ती मानली जात होती हे लक्षात येते.               ‌‘वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः| (शुक्ल यजु. ९-२३)        ‌‘आम्ही पुरोहित राष्ट्रामधे जागृत राहू‌’ ही पुरोहितांची महत्त्वाची उद्घोषणा होती.        आम्ही पुरोहित होऊन राष्ट्रकल्याणार्थ सदैव  सावध राहू. आम्ही पुरोहित म्हणजे कोणी पोटार्थी भिक्षुक नाही तर समाजाच्या अग्रभागी राहून  सत्याचे नेतृत्व करणारे आहोत.               संशितं क्षत्रं जिष्णु यस्याहमस्मि पुरोहितः ॥   (शुक्ल यजु. ११-८१) ‌‘शास्त्रशुद्ध आचरणाने मी माझे ब्रह्मतेज अत्यंत तीक्ष्ण व कडकडीत राखले आहे. मी माझे शरीरसामर्थ्य व इंद्रियांच्या शक्ती कार्यक्षम ठेवल्या आहेत. ज्या राजाचा मी पुरोहित आहे त्याचे क्षात्रतेजही मी वृद्धिंगत केले आहे.‌’ असा आत्मविश्वास वैदिक काळी पुरोहितांच्या ठायी होता. वैदिक काळात पुरोहितांच्या शक्तीने राजशक्तीवरही प्रभाव गाजवल्याचे दिसते. पुढे बौद्ध धर्माचा उदय झाल्यावर पुरोहितांचे महत्त्व कमी झाले. पुढे भारतावर मुस्लिमांचे व नंतर ब्रिटीशांचे राज्य आल्यावर पुरोहित वर्गाचे पूर्ण पतन होऊन केवळ विवाहादि संस्कार, पूजाअर्चा हेच त्यांचे काम शिल्लक राहिले. आजच्या काळातही पुरोहितवर्गाचे हेच चित्र दिसत आहे. प्रत्यक्षात पुरोहितांची मुले आज वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करताना दिसतात. त्यांना बहुतेक पौराहित्यात प्रतिष्ठा वाटत नाही. आपण तंत्रज्ञ आहोत किंवा अधिकारी आहोत हे सांगताना जसे बरे वाटते तसे पुरोहित असल्याचे सांगताना वाटत नाही असे दिसते. त्यामुळे आपण धर्माचा अभ्यास करावा, तो लोकांपर्यंत पोचवावा, त्यासाठी स्वतः पुरोहित व्हावे असे ज्यांना वाटते आहे त्यांना पुरोहित शब्दामागील ही सगळी पार्श्वभूमी माहिती पाहिजे. उत्तर काळामधे पुरोहितांचे पतन कोणत्या गोष्टींमुळे झाले ते ओळखून आता ते दोष निर्माण न होण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. धर्माच्या क्षेत्रात समाजाचे नेते, मार्गदर्शक होण्यासाठी आवश्यक ते आचरण पुरोहिताचे असावे. त्यासाठी – १) पुरोहिताचा निदान उपनयन संस्कार झालेला असणे, त्याने स्वतःची  दैनंदिन उपासना करणे, सदाचारी असणे आवश्यक आहे.स्पष्ट व उच्चार त्याच्याकडून अपेक्षित आहेत. २) धर्म लोकांपर्यंत पोचवण्याचे एक माध्यम म्हणजे संस्कार, शांती, पूजा इ. विधी असल्यामुळे सर्व जाति-जमातींच्या लोकांकडे जाऊन हे काम अवश्य  करावे. ३) वाचन, श्रवण, चर्चा, इ.द्वारे धर्मशास्त्र व अन्य विषयांमधीलही व्यासंग वाढता ठेवावा. म्हणजे लोकांच्या प्रश्नांचे योग्य समाधान करता येईल. ४) स्वतःच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी पुरोहिताने प्रयत्नशील असावे. व्यक्तीच्या आंतरिक गुणांचा बाह्य दर्शनावर परिणाम होतो हे लक्षात ठेवून स्वतः चारित्र्यसंपन्न असावे. ५) पुरोहिताने निःस्पृह असणे आवश्यक आहे. समाजाने दिलेली दक्षिणा अवश्य स्वीकारावी मात्र धनलालसा असू नये. ६) कोणत्याही धर्मविधीची ठरलेली वेळ पुरोहिताने काटेकोरपणे पाळली पाहिजे आणि यजमानांकडेही तसा आग्रह धरला पाहिजे.  स्त्री पौरोहित्य- पौरोहित्यासंबंधी वरील सर्व विवेचन करीत असताना एक गोष्ट जरूर सांगावीशी वाटते की पुरोहितांचे वर्चस्व स्थापन करण्याचा हा प्रयत्न नाही. धर्मविधींच्या बाबतीत लोकांनी स्वावलंबीच असले पाहिजे. गणेशस्थापना, सत्यनारायण, लक्ष्मीपूजन, इ. पूजा व वर्षश्राद्धासारख्या विधींमधे खरे तर घरातीलच कोणी ज्येष्ठ व्यक्तीने पुरोहित म्हणून काम करावे. विवाह, वास्तुशांती इ.बाबत पुरोहितांची आवश्यक ती मदत घ्यावी.        आजच्या काळात सर्व जाति-जमातींच्या व्यक्तींना पौरोहित्याचा अधिकार आहे. केरळमध्ये देवस्थान संस्थांचे नियुक्त मंडळ असते व पुजाऱ्यांसाठी परीक्षा असतात. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या कोणासही, मग तो कोणत्याही जातीचा असो, पुजारी म्हणून, पुरोहित म्हणून नोकरी मिळते. (पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही पौरोहित्य करता येते. ऋग्वेदामधे ‌‘विश्वावरा‌’ ही यज्ञाचे पौरोहित्य करणारी स्त्री आढळून येते. नव्या काळात स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना करून स्त्री पौरोहित्याचा नव्याने प्रारंभ केला. माई भगवती व श्रीमती ठकुरानी यांचे उपनयन करून त्यांना दीक्षा देण्याचा अधिकार दयानंदांनी दिला.        आजच्या काळातही शिर्डीपाशी साकुरी येथे एक आश्रम असून श्री साईबाबांचे शिष्य उपासनी महाराज आणि त्यांच्या शिष्या गोदावरी माताजी यांच्यापासून तेथे स्त्रियांची वेदपठणाची परंपरा चालत आली आहे. या स्त्रिया मोठमोठ्या यज्ञांचे पौरोहित्यही करतात.        पुण्यात कै. शंकरराव थत्ते यांनी उद्यान प्रसाद कार्यालयात स्त्रियांसाठी पौरोहित्याचा वर्ग चालवून कित्येक स्त्रियांना पौरोहित्याची दीक्षा दिली. वर नमूद केलेल्या प्रयत्नांव्यतिरिक्त अन्यही ठिकाणी असे वर्ग चालू असतील. ते निश्चितच अभिनंदनीय आहेत. ज्या पुण्यामधे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याला मुलींची शाळा चालवल्याबद्दल समाजाच्या जहरी टीकेला तोंड द्यावे लागले त्याच पुण्यात आज स्त्री पुरोहितांचे कौतुक होताना दिसते. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अन्यत्र स्त्री पौरोहित्याचा हा प्रयोग अभिनव व यशस्वी ठरला आहे.  हिंदू धर्माच्या लवचिकतेचे हे द्योतक आहे.        ज्ञान प्रबोधिनीमधे १९९० पासून सर्व जाति-जमातींच्या स्त्रीपुरुषांसाठी पौरोहित्य वर्ग चालू असून पुरुषांप्रमाणे महिलाही अन्त्येष्टीसह विविध संस्कार, शांती व पूजा यांचे पौरोहित्य  परिवर्तनाच्या धोरणाला अनुसरून करत असतात.)        स्त्रियांनी आणि तथाकथित ब्राह्मणेतर समाजाच्या लोकांनीही पौरोहित्याचा अधिकार कोणी ठराव करून देण्याची वाट बघत न बसता किंवा कोणाकडे मागत न बसता आत्मविश्वासपूर्वक स्वतःच घेतला पाहिजे असे वाटते. २. शुचिता विचार शुचिता म्हणजे शुद्धता, निर्मळता, पावित्र्य. याबाबतीत पुढील वचनाचा विचार करण्यासारखा आहे – देशकालक्रियाद्रव्यकर्तृणां शुद्धता यदि |             मन्त्राणां च तदा पूर्णं कर्मणां फलमश्नुते |   (बृहन्नारायणीय उपनिषद्‌‍  उत्तर  भा. ३३ – ६३, ६४) स्थान, समय, कृती, साधने, कर्ता व मंत्र यांच्या ठिकाणी शुद्धता असेल तर कोणत्याही कामात संपूर्ण यश मिळते. यावर सविस्तर विचार करणे योग्य होईल. १) देश म्हणजे जेथे, ज्या जागी धर्मविधी केला जातो ती जागा स्वच्छ असणे आवश्यक आहे. जमीन एकसारखी सपाट असावी व ती कोरडी असावी. सुंदर रांगोळी घातलेली असावी. शुभचिह्ने रेखाटलेली असावीत. त्या जागी दुर्गंधी उत्पन्न होईल अशी परिस्थिती नसावी. मंद धूप जळत असावा. तोरणे, पुष्पमाला, पताका या सर्वांच्या साहाय्याने वातावरणनिर्मिती करावी. प्रसंगोचित अशा संगीताचा वापर करावा. सर्वत्र स्वच्छ उजेड असावा. ज्यामुळे मांगल्याचा, पावित्र्याचा भाव मनात उत्पन्न होईल असे वातावरण त्या जागी राखणे म्हणजे देशशुद्धी. अन्त्येष्टी, श्राद्धविधी असले तरी तेथेही टापटीप व स्वच्छता आवश्यकच ! धर्मविधींमधे  कोणी कोणत्या दिशेला तोंड करून बसावे याबाबत चर्चा केली जाते.       सदा संतुष्टमनसः सर्वाः सुखमयः दिशः| (भागवत ७-१५-१७) ‌       ‘संतुष्टचित्त मनुष्याला सर्व दिशा चांगल्याच आहेत‌’ असा आपला विचार आहे. तथापि पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या

प्रत्यक्ष धर्मविधी करताना …. Read More »