धर्मकार्यातील विविध संकल्पना आपणास माहिती असतात. परंतु त्यांचे प्रयोजन माहिती नसते. या प्रकरणात अशा विविध संकल्पनांचे स्पष्टिकरण केले आहे. धर्मकार्यात वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी या औषधी आहेत असे दिसते. अशा रोगनाशक गोष्टींची लोकांना ओळख राहावी यासाठी त्या धर्माशी जोडल्या असाव्यात असे वाटते. गणपतीच्या आवडीची म्हणून जी पत्री सांगतात ती सारीच्या सारी औषधी वनस्पतींची आहे हे सिद्ध झालेच आहे. खाली दिलेल्या गोष्टींमध्येही आपणास हे सूत्रच दिसून येईल. जे जे माणसाला सुखदायक – दुःखनिवारक ते ते देवाला देऊ करण्यात येते यात काही संदेह नाही. १) अक्षता – भोक, भोके पडलेले म्हणजेच किडलेले ! कीड नसलेले ते अक्षत ! अक्षता म्हणजे न मोडलेले अखंड तांदूळ. कुंकू किंवा केशर लावलेले तांदूळ धर्मविधीत वापरले जातात. पूजेमधे एखादे द्रव्य नसेल तर त्याऐवजी उदा.- आसन, अलंकार यासाठी अक्षता वापरल्या जातात. विवाहविधीत वधूवरांवर आशीर्वाद म्हणून अक्षता टाकल्या जातात. औक्षण करताना अक्षता टाकण्यामागेही हाच भाव असतो. पूर्वीपासून धान्य हे संपन्नतेचे प्रतीक समजले जाते. वधूवरांचा विवाह संततीने सुफलित व्हावा हा उद्देश अक्षता टाकण्यात असावा. अक्षता या बल, समृद्धी व दीर्घायुष्य देणाऱ्या आहेत असे समजले जाते. २) अक्षतारोपण – वधूवरांनी परस्परांविषयीच्या गृहस्थाश्रमातील अपेक्षा व्यक्त करणे आणि त्या पूर्ण करण्याचे अभिवचन देणे असा हा विवाहविधीतील एक भाग आहे. यामधे वधूवर यश, संतती, संपत्ती, इ. इच्छा पूर्ण होवोत अशी भावना व्यक्त करतात व ‘तथास्तु! ही इच्छा मी पूर्ण करीन’ असे अभिवचन, एकमेकांवर अक्षता टाकताना, ते देतात. याला अक्षतारोपण म्हणतात. आजच्या काळात वधूवरांनी आपापल्या एकमेकांविषयीच्या अपेक्षा शब्दबद्ध करून त्यांचाही उल्लेख अक्षतारोपण प्रसंगी अवश्य करावा. ३) अग्नी /होम – अग्नी ही ऋग्वेदकाळापासून महत्त्वाची देवता मानली गेली आहे. अग्नी आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोचवतो अशी पूर्वी समजूत होती. कोणत्याही धर्मकृत्यात अग्नी प्रज्ज्वलित करणे महत्त्वाचे मानले जाते. उपनयन, विवाह यांसारख्या प्रसंगी जी प्रतिज्ञा केली जाते तीदेखील अग्निसाक्षीने करावी अशी कल्पना असते. अग्नीच्या वर उसळणाऱ्या तेजस्वी ज्वाळा पाहून मनातही उदात्त विचार आल्यावाचून राहात नाहीत. विविध देवतांना उद्देशून अग्नीत मंत्रपूर्वक तूप, समिधा यांसारखे द्रव्य समर्पित करणे याला होम म्हणतात. याने पर्यावरणशुद्धी होते. ४) अभिषेक, प्रोक्षण – अभिषेक म्हणजे सर्व बाजूंनी सिंचन करणे. देवाला पंचामृताने अथवा शुद्ध जलाने मंत्रपूर्वक स्नान घातले जाते तो अभिषेक होय. विवाहविधीत आशीर्वादपर मंत्र म्हणत वधूवरांवर ज्येष्ठ मंडळी पाण्याने सिंचन करतात त्यालाही अभिषेक म्हणतात. पाणी शिंपडणे म्हणजेच प्रोक्षण करणे होय. अभिषेक /प्रोक्षण प्रसंगी मनानेच आपण शुद्ध होत आहोत असा अनुभव घ्यायचा असतो. ५) अवक्षारण – ५) अवक्षारण – व्रत संक्रमित करणे. विवाह विधीमधे वधूच्या ओंजळीतील जल खाली वराच्या ओंजळीत सोडले जाते. १. मुलीचे दायित्व वडिलांकडून तिच्या पतीकडे दिले जाणे याचे सूचक असे हे अवक्षारण असते. २. अव म्हणजे खाली व क्षारण म्हणजे गाळणे. ३. गुरूंचे व्रत शिष्याला देतानाही असेच सूचक अवक्षारण केले जाते. ६) अश्मारोहण – ‘अश्मन्’ म्हणजे दगड आणि ‘आरोहण’ म्हणजे चढणे, भरभक्कम अशा दगडी पाट्यावर किंवा सहाणेवर वधूला उभे राहाण्यास सांगून वराने पुढील मंत्र म्हणणे म्हणजेच अश्मारोहण होय . इमम् अश्मानम् आरोह अश्मा इव त्वं स्थिरा भव | सहस्व पृतनायतः अभितिष्ठ पृतन्यतः ॥ (आश्वलायन गृह्यसूत्र 1.7.7) ‘या घडीव दगडावर आरूढ हो. तू पाषाणखंडाप्रमाणे स्थिर हो. तुझ्याशी शत्रुत्व करणाऱ्याच्या छातीवर पाय देऊन उभी राहा व त्याचा पराभव कर.’ अशा अर्थाचा मंत्र वर वधूला उद्देशून म्हणतो. स्त्री ही अबला नाही. संसार करताना ज्या काही भल्या बुऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल त्यांना खंबीरपणे तोंड देण्याचे सामर्थ्य तिच्यामधे असावे अशी अपेक्षा होती. आजही आपण अशी अपेक्षा ठेवत असू तर हा मंत्र नीट समजावून घेणे आवश्यक वाटते. ७) अस्थिसंचय – मरणानंतर शवाची व्यवस्था लावण्यासाठी हिंदू समाजात अग्नी देण्याची पद्धत आहे. अग्निसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी उरलेल्या अस्थी गोळा करणे याला अस्थिसंचय म्हणतात. त्या अस्थी नंतर संगमावर तीर्थक्षेत्री नदीमधे विसर्जित करण्याची पद्धत आहे. यामधे मृत व्यक्तिविषयी आदर, प्रेम व्यक्त होते. तसेच त्या व्यक्तीला मरणोत्तर सद्गती मिळावी ही सदिच्छा व्यक्त होते. ८) आचमन – धर्मविधीच्या प्रारंभी परमेश्वराचे नामस्मरण करून तीनदा पळीभर पाणी प्राशन करून चौथ्या वेळी हातावरून पाणी सोडले जाते. या क्रियेला आचमन म्हणतात. ही एक शुद्धिक्रिया आहे. स्वरेंद्रिय, जीभ यांना पळीभर पाण्याने ओलावा यावा, अंतरंग शुद्धीचा अनुभव यावा यासाठी आचमन करतात. परमेश्वराच्या नामोच्चाराने मन पवित्र होते, शुद्ध होते. देवर्षिपितृमनुष्याणां जलाञ्जलीदानेन तृप्तिसम्पादनम् | देव, ऋषी, पितर व मनुष्य यांना जलांजली देऊन तृप्त करणे म्हणजेच तर्पण होय. दैनंदिन संध्येत तर्पण केले जाते. आचमन केल्यानंतर उजव्या हाताच्या बोटांवरून समोर पाणी सोडले जाते, तो भाग म्हणजे देवतीर्थ, अंगठा व तर्जनी यांच्यामधील भाग म्हणजे पितृतीर्थ, करंगळीच्या बाजूची हाताची कड म्हणजे ऋषितीर्थ, तर मनगटाच्या बाजूने जल प्राशन केले जाते तो भाग म्हणजे आत्मतीर्थ. असे हाताचे भाग सोयीसाठी केले आहेत. ९) आरती – ताम्हनामधे नीरांजने ठेवून त्यांनी देवाला ओवाळणे याला आरती म्हणतात. आरती ओवाळताना देवाची स्तुतिपर पद्ये म्हणण्यात येतात. रामदासादि संतांनी रचलेल्या आरती. अतिशय भावमधुर व भक्तिपूर्ण आहेत. सगुणोपासक भक्तांनी आपल्या मनातील भाव प्रकट करण्याकरता या रचना केल्या आहेत. आरती, म्हणजे ‘नीराजन’ असा मूळ, संस्कृत शब्द आपण मराठीत आणताना ‘नीरांजन’असा केला आहे. १०) आसन – कोणतेही धर्मकार्य करत असताना शक्यतो पद्मासनामध्ये ताठ बसावे. पद्मासनाची सवय होईपर्यंत साधी मांडी घालून बसावे. बसण्यासाठी जो पाट आपण वापरतो तो धर्मशास्त्रात सांगितलेला नाही. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे हरिणाजिन (हरणाचे कातडे), चटई / सुती वस्त्राची घडी बसण्यासाठी घ्यावी. स्वतंत्र तंत्र ग्रंथामधे पांढरे-काळे कांबळे हे चांगले आसन मानले असून लाल कांबळे हे सर्वोत्तम आसन सांगितले आहे. ११) आहुती/समिधा – समिधा अथवा तूप अग्नीमधे अर्पण करणे या कृतीला आहुती देणे असे म्हणतात. वड, पिंपळ,औदुंबर, पळस, खैर,रुई, शमी, आघाडा, बेल, चंदन, सरल (पाईन), सालवृक्ष, देवदार, खदीर अशा औषधी वनस्पतींच्या काड्या अग्नीत अर्पण केल्या जातात त्यांना समिधा म्हणतात. दूर्वा व दर्भांचाही असा वापर कधीकधी केला जातो. या समिधांचे काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. त्या अग्नीत अर्पण केल्याने पर्यावरण प्रसन्न होते. १२) आश्रम – ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम होत. विद्याभ्यास करणे हे ब्रह्मचर्य आश्रमातील प्रमुख कर्तव्य आहे. शरीरबल, बुद्धिबल, नैतिक बल मिळवणे ब्रह्मचाऱ्यास अगत्याचे असते. विवाह करून कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणे, धनार्जन, अपत्यसंगोपन, अतिथिसत्कार ही गृहस्थाश्रमातील कर्तव्ये आहेत. पूर्वी गावाबाहेर एखाद्या निवांत जागी राहून दुरूनच लोकांना मार्गदर्शन करणे, जास्तीत जास्त वेळ आत्मचिंतनात व्यतीत करणे अशी वानप्रस्थाश्रमाची कल्पना होती. आता वनात जाऊन राहणे शक्य नसले तरी सांसारिक जबाबदाऱ्या पुढील पिढीवर सोपवून घरातच अलिप्तपणे, परोपकारी वृत्तीने राहाणे शक्य आहे. संन्यास म्हणजे सर्वसंग परित्याग होय. अन्य सर्व गोष्टींचा त्याग करून केवळ आत्मचिंतनात उर्वरित आयुष्य जगणे म्हणजे संन्यास. १३) एकोद्दिष्ट – केवळ दिवंगत व्यक्तीस उद्देशून केलेले श्राद्ध म्हणजे एकोद्दिष्ट. या श्राद्धात मृत व्यक्तीच्या मागच्या दोन पिढ्यांचा समावेश नसतो. अन्य श्राद्धांमधे तो असतो. १४) ओंकार – अ, उ आणि