प्रकट चिंतन

१. सर्व शक्तींच्या विकासाकरिता विशेष शिक्षण

नवे मार्ग शोधताना : रोजच्या सवयीच्या रस्त्याने जायचे असेल तर अंधारातही चालत जाता येते. व्यवस्थित आखलेला, खाणाखुणा दाखवणारा, प्रकाशित असलेला रस्ता असला तर नव्या रस्त्यानेही न चुकता जाता येते. रुळलेली, मळलेली वाट जिथे संपते तिथून पुढे अंदाज घेत घेतच जावे लागते. स्वतः वाट तयार करत जावे लागते. एखादा मोठा गट किंवा एखादी महत्त्वाची व्यक्ती कुठे जाणार असेल तर पुढे रस्ता निर्वेध करणारी पथके पाठवतात. कोणीतरी पुढे जाऊन रस्त्यावर, वळणांवर, फाट्यांवर खुणा करून ठेवाव्या लागतात. नवीन रस्ता शोधणाऱ्यांना तर रोजच अज्ञात प्रदेशात पुढे शिरायचे असते. समुद्र-प्रवास करणारे दर्यावर्दी असोत, जंगलातून किंवा वाळवंटातून जाणारे प्रवासी असोत, उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर जाणारे संशोधक असोत, गुहा आणि भुयारे यांचे दुसरे टोक शोधणारे गिर्यारोहक असोत, सर्वांना स्वतःवर विश्वास ठेवून नव्या प्रदेशात प्रत्येक पुढचे पाऊल टाकावे लागते. अशा लोकांना मागे टाकलेल्या वाटेचा फारसा उपयोग नसतो. त्यांना नवे. शोधण्याच्या अनुभवाचा उपयोग असतो. प्रबोधिनी ही एक नवे मार्ग शोधणाऱ्यांची संघटना आहे. मार्ग शोधायचा आहे शिक्षण क्षेत्रातला. शिक्षणातून मनुष्यघडण करण्याचा. मनुष्यघडणीतून संघटन करण्याचा. संघटनातून विकास करण्याचा. विकासातून व्यक्तीच्या व समाजाच्या मूळ रूपाचे प्रकटन करण्याचा. त्या मार्गाने पुढे जात राहायचे आहे. जुन्या आकृतिबंधात रेंगाळणे हानिकारक : ज्यांना मार्ग शोधायचा आहे, नव्या वाटा पाडायच्या आहेत, त्यांना आधीच्या रस्त्यावर रेंगाळून चालत नाही. आधीचा रस्ता रुळलेला आहे, तो सोयीचा आहे व तो वहिवाटीत ठेवायचा आहे हे खरे. तो अनेकांना वापरता यावा यासाठीच शोधून काढला आहे हे ही खरे. एक गट पुढचा रस्ता शोधत असताना दुसऱ्या एका गटाने आतापर्यंत तयार केलेला रस्ता राखावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. असा रस्ता राखणाऱ्यांना त्या कामावर प्रेम करावे लागते, त्या कामाशी निष्ठा ठेवावी लागते. तयार रस्त्यावरून अनेकांना जाता येईल अशी व्यवस्था करणे याला शिक्षण क्षेत्रात म्हणतात पाठ्यपुस्तकी शिक्षण. आजवर उजेडात आलेले उपयुक्त ज्ञान निश्चित करून, समजण्याच्या दृष्टीने त्याचे सोयिस्कर भाग करून, या भागांचा एक क्रम निश्चित केला की, त्याला म्हणतात अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम. हा अभ्यासक्रम सगळ्यांना सारख्या पद्धतीने मिळावा यासाठी केलेली सोय म्हणजे पाठ्यपुस्तके, या पुस्तकांमध्ये क्रमाने मांडलेले उपयुक्त ज्ञान कोणाकोणापर्यंत किती पोहोचले हे तपासण्याची व्यवस्था म्हणजे परीक्षा. आणि या परीक्षेत सर्वांनी यशस्वी व्हावे म्हणून केलेले प्रयत्न म्हणजे पाठ्य-पुस्तकी शिक्षण. प्रबोधिनी नावाच्या ज्या कार्यसंघाने नवे मार्ग शोधायचे आणि घडवायचे आहेत त्यांनी रेखीव परिघाच्या पाठ्यपुस्तकी शिक्षणात रमून गेलेले चालेल का? अर्थातच नाही! आपण मार्ग वाहता ठेवण्याच्या कामात गुंतून पडू नये म्हणूनच प्रबोधिनीच्या घटनेत प्रबोधिनीचे उद्देश मांडताना पहिल्या परिच्छेदातील पहिलेच वाक्य आहे – ‘ज्ञान प्रबोधिनी म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांचे शिक्षण देणारी सामान्य प्रतीची शिक्षणसंस्था नव्हे.’ सामान्य म्हणजेच सर्वांना ओळखू येणारी किंवा सर्वांना समजणारी. सामान्य म्हणजे कमी गुणवत्तेची किंवा हलक्या दर्जाची असा अर्थ नाही. सामान्य आणि विशेषातील पूल : जे सर्वांना माहीत आहे ते सामान्य. जे अनेकांना नवलाईचे आहे ते विशेष. ज्या विशेषाची नवलाई संपली ते सामान्य झाले. नवा मार्ग नवलाईचा असतो. कोकण रेल्वे पूर्ण झाल्यावर किंवा पुणे-मुंबई जलदगती मार्ग झाल्यावर अनेकांनी केवळ नव्याचा अनुभव घेण्यासाठी त्या रेल्वेने किंवा त्या मार्गाने प्रवास केला. आता तो अनेकांनी गृहीत धरलेला आहे. विशेषाचे सामान्य होणे एका बाजूला चालू असते. त्याचबरोबर नवे विशेष निर्माण होत राहिले पाहिजे. विशेषाचे सामान्यीकरण ही प्रबोधिनीची जबाबदारी आहे. नवीन विशेषाची निर्मिती हा प्रबोधिनीच्या स्थापनेचा उद्देश आहे. पाठ्य-पुस्तकांचे शिक्षण उजेडात आलेल्या ज्ञानावर बेतलेले आहे. उजेडात न आलेले उजेडात आणणे हे प्रबोधिनीचे काम आहे. माणसाच्या अनेक क्षमतांपैकी स्मरणशक्ती व तर्कशक्तीवर पाठ्यपुस्तकांचे शिक्षण अवलंबून आहे. याशिवाय शरीराच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या अनेक शक्तींचा विकास करण्याचे मार्ग शोधणे ही प्रबोधिनीतील विशेष शिक्षणाची कल्पना आहे. प्रबोधिनीच्या घटनेत पुढे म्हटले आहे – …. सामान्य प्रतीची शिक्षण-संस्था नव्हे. म्हणून प्रबोधिनीतील विद्यार्थी शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक अशा सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न होईल अशा प्रकारचे शिक्षण देणे.’ विशेष शिक्षणाचे स्वरूप : असे विशेष शिक्षण देण्यासाठी कोणत्या तरी शिक्षण मंडळाने किंवा परीक्षा मंडळाने किंवा अगदी प्रबोधिनीने तयार केलेला अभ्यासक्रम शिकवून पुरत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या विकासासाठी स्वतःचा अभ्यासक्रम वेळोवेळी स्वतःच तयार करायला शिकवले पाहिजे. त्या अभ्यासक्रमानुसार अनुभव घेत त्यातून स्वतःमध्ये विकासाला अनुकूल बदल घडवण्याचे शिक्षण देणे हा प्रबोधिनीचा उद्देश आहे. ज्ञान प्रबोधिनी घटना परिच्छेद ३.१ ज्ञान प्रबोधिनी म्हणजे केवळ पाठ्य-पुस्तकांचे शिक्षण देणारी सामान्य प्रतीची शिक्षणसंस्था नव्हे. म्हणून प्रबोधिनीतील विद्यार्थी शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक अशा सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न होईल अशा प्रकारचे शिक्षण देणे.

१. सर्व शक्तींच्या विकासाकरिता विशेष शिक्षण Read More »

७. असा वारसा पेलायास्तव वज्राचे बल दे

वंश आणि वारसा एका निवृत्त न्यायाधीशांशी बोलताना मृत्युपत्रांमधील वेगवेगळ्या गंमती-जंमती ते सांगत होते. मृत्युपत्रांसंबंधीचे अनेक वाद त्यांच्या समोर निवाड्यासाठी आलेले होते. त्यातले अनुभव सांगता सांगता त्यांनी एक सूत्र सांगितले. ते म्हणाले की “तुम्ही स्वतः मिळवलेली संपत्तीं तुम्ही तुमच्या मुला-मुलींना, नातेवाईकांना, मित्रांना, सहकाऱ्यांना, नोकरांना, कोणालाही देऊ शकता. परंतु आधीच्या पिढीतील कोणीतरी तुम्हाला अधिकृत वारसदार म्हणून दिलेली संपत्ती तुम्ही तुमच्या कुटुंबातील पुढच्या पिढीतील अधिकृत वारसदारालाच दिली पाहिजे.” या सूत्राला अपवादही त्यांनी अनेक सांगितले. परंतु वंशपरंपरेने म्हणजे वारसा हक्काने आलेली संपत्ती ही स्वतःच्या मर्जीप्रमाणे वापरण्यासाठी नाही, हा त्या सूत्रातला मुख्य अर्थ मला समजला. संपत्तीप्रमाणेच ज्ञानाच्या बाबतीत बृहदारण्यक या नावाचे एक मोठे उपनिषद आहे. त्याच्या सहा प्रकरणांपैकी तीन प्रकरणांच्या शेवटी आगळ्या-वेगळ्या याद्या मला बघायला मिळाल्या. सध्या ‘लायसेन्स्ड् सॉफ्टवेअर’ व ‘फ्रीवेअर’ असे दोन प्रकार संगणक क्षेत्रात आढळतात. ‘लायसेन्स्ड् सॉफ्टवेअर’ म्हणजे संगणक प्रणाली तयार करणाऱ्या कंपनीकडून तुम्हाला विकत घेऊन वापरावे लागते ते. ‘फ्रीवेअर’ म्हणजे तुम्ही इंटरनेटवरून कोणाच्या परवानगीशिवाय फुकट घेऊ शकता ते. या उपनिषदात जे मंत्र संग्रहित झाले ते संग्रहित करणाऱ्या ऋषींनी आपला ज्ञान-वंश त्याच्यात सांगितला आहे. तेव्हापासून ते मंत्र ‘फ्री-वेअर’ झाले असा मी त्याचा अर्थ केला. त्यापूर्वी ते मंत्र ‘लायसेन्स्ड् सॉफ्टवेअर’ होते. तीन प्रकरणांच्या शेवटी असलेल्या या ज्ञान-वंशांच्या याद्या पन्नास ते साठ पिढ्यांच्या आहेत. पहिल्या गुरूने त्याच्या शिष्याला, त्याने त्याच्या शिष्याला असे हे ज्ञान परंपरेने दिले. साठाव्या शिष्याने ते सर्वांना खुले केले. पंधरा वर्षांची एक पिढी धरली तर साठ पिढ्या म्हणजे नऊशे वर्षे तरी होतात. राजांच्या वंशावळी पुराणांमध्ये आहेत, ब्रिटिश काळातील गव्हर्नर जनरलांच्या याद्या इतिहासामध्ये असतात. अशा राजवंशांपेक्षा उपनिषदातील हे ज्ञान-वंश मला आवडले. ज्ञान-वारसा आणि सांस्कृतिक वारसा उपनिषदांमधील या याद्यांप्रमाणेच अध्यात्म, योग, आयुर्वेद, संगीत, नृत्य, शिल्प या बाबतीतही गुरु-शिष्यांच्या परंपरेच्या सात-आठ पिढ्यांच्या अनेक याद्या बघायला मिळतात. ते ज्ञान त्या परंपरेने टिकवले आणि वाढवले. आठव्या शिष्याने पहिल्या गुरूंपासून आठव्या गुरूंपर्यंत सर्वांनी मिळवलेले ज्ञान टिकवले आणि वाढवले. जसे ज्ञानाच्या बाबतीत असते तसे आचारांच्या बाबतीतही असते. महाराष्ट्रातल्या अनेक घरांच्या देव्हाऱ्यात तीनशे, चारशे, पाचशे वर्षे पूजेत असलेले देव आहेत. ही पूजा चालू ठेवणे म्हणजे कुळाचा वारसा चालू ठेवणे. घरा-घरांमध्ये कुळधर्म-कुळाचार चालू ठेवणे म्हणजे कुळाचा वारसा चालू ठेवणे. हे आचार म्हणजे कुळाचा सांस्कृतिक वारसा. तसेच समाजाचाही सांस्कृतिक वारसा असतो. समाजातील उत्सव, सण, लोककथा हा समाजाचा सांस्कृतिक वारसा असतो. भारतातले राजवंश पूर्वी आपली परंपरा सूर्यापर्यंत किंवा चंद्रापर्यंत नेऊन भिडवीत. परंतु सर्वसामान्य लोक ऋषींचे ‘गोत्र’ सांगतात. हा सांस्कृतिक वारसा आहे. ज्यांना ऋषींचे ‘गोत्र’ माहीत नाही अशी अनेक कुटुंबे आपली ओळख म्हणून कोणत्या झाडांच्या पानांचे ‘देवक’ हे सांगतात. हा सांस्कृतिक वारसा आहे. डोळस राष्ट्रीय वारसा ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, पारसी, कन्फ्यूशिअस, शिंतो, ताओ हे जगातील विविध धर्मपंथ अस्तित्वात येण्याच्याही पूर्वी भारतात वेद, उपनिषदे व गीता हे ग्रंथ निर्माण झाले. त्यामुळे जगातला कोणताही धर्मपथ मानणाऱ्या भारतीयांचा हे ग्रंथ म्हणजे राष्ट्रीय वारसा आहे. ज्ञानाबरोबर येणारे आचार व त्यांच्या मागचा विचार बदलत जातात. काही बदलत्या काळात अप्रस्तुत होतात. काही नवीन काळात समाजाला अडचणीचे व घातकही ठरतात. समाजातल्या त्या त्या वेळच्या धुरीणांनी आचार व त्याचे स्पष्टीकरण बदलण्याचे काम करायचे असते. सृष्टीचा अभ्यास वाढतो तसे ज्ञान म्हणून सांगितलेले जुने आडाखे, जुने अंदाज, जुने निष्कर्षही बाजूला करावे लागतात. प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित ज्ञान स्वीकारावे लागते. हे काम हल्ली समाजातील वैज्ञानिक करत आहेत. ऋषी-मुनी व साधु-संतांच्या वचनांमधील व लेखनामधील काही ज्ञानही अप्रस्तुत किंवा अवैज्ञानिक वाटेल. ते ही बाजूला सारावे लागेल. बाह्यसृष्टीचे ज्ञान विज्ञानाने नेमके होत जाते. तो ही राष्ट्रीय वारसाच आहे. जगदीशचंद्र बसूंचे वैज्ञानिक संशोधन हा आपला राष्ट्रीय वारसाच आहे. वनस्पतींना आपल्या सारख्याच संवेदना असतात हे त्यांचे संशोधन ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी ….’ किंवा ‘ईशावास्यम् इदं सर्वम्….’ या चिंतनातून आणि अनुभवातून आलेल्या उद्‌गारांशी जुळणारेच आहे. कोणत्याही धर्मपंथाच्या भारतीयांना जगदीशचंद्रांच्या संशोधनाएवढेच तुकारामांचे अभंग व ईशावास्य उपनिषदातले मंत्र आपल्या राष्ट्रीय वारशाचा भाग आहेत हे समजले पाहिजे. राष्ट्रीय वृत्ती ‘सनातन धर्म’ हे शब्द पूर्वी वैदिकांनी आणि बौद्धांनीही वापरले आहेत. कारण तो आपल्या राष्ट्रीय वारशाचा भाग आहे. ‘सनातन धर्म’ म्हणजे ‘शाश्वत व समग्र विकासासाठी व्यक्तीची, समाजाची व शासनाची कर्तव्ये’ असा अर्थ आधुनिक भाषेत सांगता येईल. वेदकाळापासूनचा सनातन धर्माचा हा राष्ट्रीय वारसा माहीत झाला, तो समजला, तो आपला वाटला, म्हणजे आपल्या देशाच्या भूमीप्रमाणे आपल्या राष्ट्रीय वारशाचेही रक्षण आपण केले पाहिजे हे कळते. आपला राष्ट्रीय वारसा वाढविणाऱ्या व राखणाऱ्यांची परंपरा श्रीराम व श्रीकृष्ण, व्यास व बुद्ध यांच्यापासून एपीजे अब्दुल कलामांसारख्या शास्त्रज्ञ राष्ट्रपतींपर्यंत येऊन पोचते. राष्ट्रीय वृत्ती म्हणजे आपण या सर्वांचे वारसदार आहोत याचा सार्थ व सक्रिय अभिमान वाटणे.

७. असा वारसा पेलायास्तव वज्राचे बल दे Read More »

६. विमल हेतु स्फुरो नवनीत

राष्ट्रीयत्वाचे शिक्षण उत्तम इंग्रजी लिहायला – वाचायला शिकविणे, उत्तम इंग्रजीत भाषण – संभाषण करायला शिकविणे म्हणजे समाजाला सेवा पुरविणे आहे असे मी मागच्या लेखात लिहिले होते. आपण सेवा पुरविण्यापेक्षा समाजाची सेवा अधिक केली पाहिजे असेही मी लिहिले होते. हे लिहून झाल्यावर गेला महिनाभर ‘विद्या’ आणि ‘अविद्या’ हे दोन शब्द माझ्या डोक्यात घोळत होते. विचार मांडण्यात स्पष्टता यावी म्हणून मी विद्या ऐवजी ‘सद्विद्या’, ‘अविद्या’ आणि ‘कुविद्या’ असे तीन शब्द वापरतो. माझ्या मागच्या लेखातील चिंतनाचा सारांश मांडायचा झाला तर ‘इंग्रजी माध्यमातून शिकविणे ही अविद्या आणि मातृभाषेतून शिकविणे ही सद्विद्या’ असा तो मांडता येईल. पण या सारांशाचा विस्तार अविद्या आणि सद्विद्याच्या संदर्भात करायचा झाला तर ‘समाजात प्रतिष्ठा व झटपट पैसा मिळावा म्हणून इंग्रजी शिकविणे ही अविद्या आणि विवेकानंद व अरविंदांचे विचार इंग्रजीतून मुळातून वाचण्यासाठी इंग्रजी शिकविणे ही सद्विद्या’ असा विस्तार करता येईल. त्याचप्रमाणे ‘केवळ मनोरंजनासाठी कथा-कादंबऱ्या वाचण्याकरता मातृभाषेतून शिक्षण ही अविद्या आणि समाज, निसर्ग व ईश्वरी शक्ती यांच्याशी एकरूपता अनुभवण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण ही सद्विद्या’ असाही विस्तार करता येईल. भ्रष्टाचारासाठी, शोषणासाठी, नफेखोरीसाठी, फसवणुकीसाठी, निंदा करण्यासाठी, दुही माजविण्यासाठी, अराजक निर्माण करण्यासाठी, आत्मकेंद्रितता, स्वार्थ, उपयुक्ततावाद आणि समाजबांधवांविषयी अनास्था निर्माण करण्यासाठी, द्वेषभावना वाढविण्यासाठी इंग्रजी किंवा मातृभाषा कोणतीही भाषा शिकविली तरी ती कुविद्याच आहे. कुविद्या शिकवा असे कोणीच सांगत नाही. अविद्या शिकवू नका असे प्रबोधिनीने आदर्श मानलेल्या कोणत्याही राष्ट्रसंताने सांगितलेले नाही. पण समाजाला सेवा पुरविणे म्हणजे फक्त अविद्येचा व्यासंग करणे आहे. ज्यांना अविद्या आणि सद्विद्या या दोन्हीचा समतोल मेळ घालता येतो त्यांनीच अविद्या वाढवावी. हा समतोल मेळ घालणे हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. ‘अविद्यया मृत्यु ती विद्यया अमृतम् अश्नुते’ हे प्रबोधिनीचे ध्येयवाक्य आहे. अविद्येचे प्रत्येक पाऊल टाकताना सद्विद्येचे एक तरी पाऊल टाकायची योजना केली पाहिजे. ‘मी’ आणि ‘राष्ट्र’ चा एकत्र विचार अविद्या आणि सद्विद्या यांचा समतोल मेळ घालण्याचा विचार म्हणजे प्रबोधिनीचा शैक्षणिक विचार. गेल्या महिन्यात प्रतिज्ञाग्रहणाचे चार कार्यक्रम झाले. पहिल्या तीनात सूचक पद्धतीने, व चौथ्या कार्यक्रमात स्पष्टपणे, ‘मी’ आणि ‘राष्ट्र’चा एकत्र विचार करण्याचा संकल्प म्हणजे प्रथम प्रतिज्ञा घेणे असे मी सांगितले. ‘मी’ हे अविद्येचे प्रतीक आहे. ‘राष्ट्र’ हे सद्विद्येचे प्रतीक आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण ‘मी’ पण पोसण्यासाठी आवश्यक वाटते. मातृभाषेतून शिक्षण ‘राष्ट्र’ पण जोपासण्यासाठी आवश्यक आहे. दहावीच्या परीक्षेत ‘स्कोअरिंग सब्जेक्ट’ आहे म्हणून संस्कृत शिकणे-शिकविणे ही देखील अविद्याच आहे. गीता आणि उपनिषदे मुळातून समजून घेण्यासाठी, रामायण-महाभारत मुळातून वाचण्यासाठी संस्कृत शिकणे-शिकविणे म्हणजे सद्विद्या. ‘मी’चा विचार म्हणजे मला अधिक गुण मिळाले पाहिजेत, अधिक महत्त्व मिळाले पाहिजे, अधिक ‘स्कोप’ मिळाला पाहिजे, अधिक अधिकार मिळाला पाहिजे, अधिक संधी मिळाली पाहिजे, अधिक सन्मान मिळाला पाहिजे, अधिक प्रसिद्धी मिळाली पाहिजे याचा विचार. ही अविद्या. ‘राष्ट्राचा’ विचार म्हणजे इतरांना अधिक स्वातंत्र्य, संधी, मान, न्याय,अधिकार, महत्त्व, ‘स्कोप’ मिळाला पाहिजे याचा विचार. हे शिकविण्यासाठी आमच्या मुलांना इंग्रजीतून शिकवा असे कोण म्हणते आहे ? मला तरी अजून कोणी आढळले नाहीत. ‘तुम्ही सद्विद्येची काळजी करता म्हणून आम्ही अविद्येची काळजी करतो’ असे म्हणणारेही मला अजून भेटलेले नाहीत. ‘तुम्हाला सद्विद्येची काळजी करायची असेल तर करा आम्ही अविद्येचीच करणार’ अशा थाटात बोलणारेच अधिक असतात. अशांनाही ‘विद्यां च अविद्यां च यस्तद् वेद उभयं सह’ – सद्विद्या आणि अविद्या या दोन्हीला जो एकत्र जाणतो – असे बनवायचे आहे. असे बनणे म्हणजे ‘मी’ व ‘राष्ट्र’ यांचा समतोल मेळ घालणे. विद्याव्रत संस्कार आणि मातृभूमीपूजन विद्याव्रत संस्कारात जी सहा व्रते आहेत त्यामध्ये राष्ट्रअर्चना व्रताचा समावेश आहे. ‘मी’ आणि ‘राष्ट्र’चा समतोल मेळ घालण्याच्या म्हणजे राष्ट्रीयत्वाच्या शिक्षणाचा तिथून प्रारंभ होतो. ज्या प्रौढांना विद्याव्रत संस्काराची संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी मातृभूमी-पूजनाच्या कार्यक्रमाची रचना केली आहे. त्या पूजेतील विविध सामूहिक आणि व्यक्तिगत संकल्प ‘मी’ आणि ‘राष्ट्र’चा समतोल मेळ घालण्याचेच संकल्प आहेत. थोडक्यात इंग्रजी माध्यम आणि मातृभाषा माध्यम याचा संबंध अनुक्रमे ‘मी’ आणि ‘राष्ट्र’शी म्हणजेच अनुक्रमे ‘अविद्या’ आणि ‘सद्विद्या’शी आहे. भारताचे राष्ट्रीयत्व ‘उभयं सह’ या भूमिकेत आहे. आपण सद्विद्या आणि अविद्या यांचा मेळ घालायचा आणि इतरांनी त्यातून फक्त अविद्या काढून घ्यायची असे होणार नाही यासाठी सावध राहिले पाहिजे. आपल्या उपक्रमातील सावधानता गेल्या महिन्यात निगडीला माध्यमिक विभागाची क्रीडा प्रात्यक्षिके झाली. पुण्यात युवक विभागाच्या प्रात्यक्षिकांची तयारी चालू आहे. क्रीडा प्रात्यक्षिके ही प्रबोधिनीतच सुचलेली कल्पना. कोणाच्या मागणीवरून सुरू झालेली नाहीत. आमची हौस म्हणून केलेली प्रात्यक्षिके ही अविद्या. समाजाला उत्तम नियोजन व संघटित प्रयत्नांचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी केलेली प्रात्यक्षिके ही सद्विद्या. समाजाला काही दाखविण्यासाठी प्रात्यक्षिके ही अविद्या. विवेकानंदांच्या संदेशाचे आम्हाला स्मरण होण्यासाठी प्रात्यक्षिके ही सद्विद्या. विवेकानंदांच्या विचारांच्या केवळ आपल्या स्मरणासाठी प्रात्यक्षिके ही अविद्या. विवेकानंदांच्या विचारांची समाजाला आठवण म्हणून प्रात्यक्षिके ही सद्विद्या. थोडा अधिक खोलात जाऊन विचार केला तर अगदी समाजाला आठवण करायला जाणे ही सुद्धा अविद्या. प्रात्यक्षिकांच्या रूपाने आपल्यातील उत्तम क्रीडा, नियोजन, संघटन-कौशल्यांचे मातृभूमीला समर्पण ही सद्विद्या. अविद्या-सद्विद्येच्या रेषेवर आपण सद्विद्येच्या दिशेने सरकत राहिले पाहिजे. अविद्येची साथ राहणारच आहे. तुम्ही कसा विचार करता ?

६. विमल हेतु स्फुरो नवनीत Read More »

५ . तयामागुनी धावणे हे ततः किम् ?

सेवा करणे आणि पुरविणे काही दिवसांपूर्वी एका बी.एड्. महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट झाली. ते प्रबोधिनीचे हितचिंतक आहेत. ओळख झाल्या झाल्याच त्यांनी प्रश्न विचारला, “प्रबोधिनीची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याची काही योजना आहे का ?” मी उत्तर दिले, “नाइलाज झाला तर योजना बनविण्याचा विचार करू.” त्यांनी त्यावर अतिशय आस्थेने मला समजावले, “तुम्ही नकारात्मक विचार करू नका. नाइलाज झाला तर असे का म्हणता ? आता समाजाची ती गरज आहे. तुमच्या सारख्यांनी नाही सुरू केली तर व्यापारी वृत्तीचे लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करतील.” मी म्हटले, “नाइलाज झाला तर योजना करण्याचा विचार करू ही सकारात्मकच भूमिका आहे. इंग्रजीशी आमचे भांडण नाही. राष्ट्रीय वृत्तीचे शिक्षण देण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणे एवढा एकच मार्ग आता शिल्लक आहे असे वाटले तर तसे अवश्य करू.” त्यांनी पुन्हा एकदा म्हणून पाहिले, “समाजातला महत्त्वाकांक्षी व क्षमतावान गट सध्या इंग्रजी माध्यमाची मागणी करतो आहे. तुम्हीच त्यांना उत्तम शिक्षण देऊ शकाल.” मी मुद्दा न सोडता सांगितले, “राष्ट्रीय वृत्ती निर्माण करण्यासाठी भारतीय भाषांमधूनच व्यवहार करणे जास्त सोयीचे आहे.” आपल्या उद्दिष्टांना पोषक पद्धतीने काम करण्याने आपण समाजाची सेवा करतो. सेवा करता येत असेल तर त्याला बाधा न येता सेवा पुरवायला अडचण नाही. पण इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सेवा पुरविणे म्हणजे समाजाची सेवा करणे नाही. प्रज्ञावंतांपासून प्रारंभ आणि प्रभावशालींवर प्रभाव ‘We start with the gifted but we do not stop with them. We want to carry our message to the last person in the social ladder,’ असे फार पूर्वी आपण छापून ठेवले आहे. ‘प्रज्ञावतापासूनच प्रारंभ का ?’ याला उत्तर म्हणून ‘उच्च क्षमतावाल्यांना प्रेरित करता आले तर ते इतर अनेकांमध्ये परिवर्तन करू शकतील’, असा युक्तिवाद मांडला होता. युक्तिवाद म्हणून तो आजही खरा आहे. पण उच्चक्षमतावाल्यांना प्रेरित करताना, प्रेरक प्रयत्नांमधला किती भाग ते स्वार्थ साधनेला पूरक म्हणून ग्रहण करतील व किती भाग समाज-घडणीसाठी आवश्यक निःस्वार्थता वाढविणारा म्हणून ग्रहण करतील हे आधी सांगणे शक्य नसते. निःस्वार्थ कार्यक्षमता वाढविणारा भाग अधिक प्रमाणात ग्रहण केला जावा यासाठी शास्त्रशुद्ध प्रयत्न करत राहणे हा प्रबोधिनीचा शैक्षणिक प्रयोग चालूच आहे. आपल्या सुरुवातीच्या कार्यपद्धतीचे वर्णन ‘प्रभावशालींवर प्रभाव टाकणे’ या पद्धतीने केले होते त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. आपणच कधीतरी वापरलेल्या शब्दांची आठवण देऊन कोणी ‘समाजातील महत्त्वाकांक्षी, प्रभावशाली किंवा कार्यक्षम गटाला आज इंग्रजी माध्यमाची शाळा हवी आहे म्हणून तुम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा काढा’ असे सांगायला लागला तर आपण त्याला सावध प्रतिसाद द्यायला पाहिजे. प्रबोधिनीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे जाताना We start with the gifted च्या बरोबरीने We want to reach the last person in the social ladder याकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. समाजातील प्रभावशाली व्यक्ती इतर अनेकांवर समाजहिताचा प्रभाव नंतर टाकतील, यावर केवळ विसंबून राहणे बरोबर नाही. तर ‘प्रभावशालींवर प्रभाव टाकण्यासाठी’ च्या बरोबरीने ‘आवाज उमटत नसलेल्यांचा आवाज ऐकता येण्यासाठी’ आपले प्रयत्न वाढवले पाहिजेत. कारण समाजातल्या काही प्रकारच्या प्रभावशाली गटांच्या परिवर्तनासाठी नव्हे तर कायमच्या शोषणाखाली सापडलेल्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. ‘व्यक्त मागणीप्रमाणे पुरवठा’ च्या आधी ‘अव्यक्त गरजेप्रमाणे सेवा’ आज शहरांमधल्या झोपडपट्ट्यांमधून आणि लहान लहान खेड्यांमधून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची मागणी होत आहे. हा वाढता आवाज ऐकून आपण इंग्रजी माध्यमाचा पुरवठा करावा असा एका बाजूने आग्रह दिसतो. परंतु आपले मुख्य काम व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण करण्यासाठी; उद्योजकता आणि स्वयंरोजगाराकरिता आवश्यक वृत्ती आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी; गटकार्य आणि सामूहिक पराक्रमाची नवनवीन क्षेत्रे शोधण्यासाठी; राष्ट्रीय व जागतिक स्तरावरची गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी; स्व-प्रतिभेने तांत्रिक व सामाजिक समस्यांचा परिहार करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आपल्या आतमध्येच आहे याची जाणीव व प्रत्यंतर प्रत्येकाला देणे हे आहे. सध्याच्या सेमी, मिश्र, पूर्ण इंग्रजी माध्यमाच्या तुकड्या सुरुवातीला ज्या प्राचार्यांशी झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला त्यांच्याशी पुढे चर्चा करताना मी पुन्हा त्यांच्या पहिल्या प्रश्नाकडे आलो. मी म्हटले, “प्रबोधिनीची सर्वप्रथम सुरू झालेली शाळा इंग्रजी-हिंदी मिश्र माध्यमाची आहे. त्यानंतर सुरू झालेल्या शाळेला इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून आधी मान्यता मिळाली आणि नंतर तिला मराठी माध्यमाच्या तुकड्या जोडल्या. ही पंचवीस-तीस-चाळीस वर्षांपूर्वीची, समाजात इंग्रजी माध्यमाचे वेड निर्माण होण्यापूर्वीची गोष्ट आहे.” मग ते मी काय सांगतो ते उत्सुकतेने ऐकू लागले. “वर्गातल्या अध्यापनाचे माध्यम इंग्रजी आणि इतर व्यवहार व संस्कारांचे माध्यम मराठी अशीच रचना दोन्ही शाळांमध्ये आहे.” इतर इंग्रजी माध्यमाच्या ” इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पाहून अध्यापनाशिवाय इतर व्यवहारांसाठी इंग्रजीची सक्ती करा असा पालकांचा आग्रह मधून मधून असतो. पण उत्तम इंग्रजी बोलता येणे हे प्रबोधिनीच्या दृष्टीने एक साधन आहे, उद्दिष्ट नाही. प्रेरणादायी शिक्षक असतील तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधूनही देशाच्या भूमीच्या सुरक्षेची आच निर्माण होऊ शकते आणि देशवासीयांच्या दुःखाविषयी कृतिशील करुणा निर्माण होऊ शकते. समाजाच्या समृद्ध भवितव्यासाठी झटण्याची ईर्षाही निर्माण होऊ शकते. पण भारतीय इतिहास, परंपरा, संस्कृती, ऋषी-मुनी-आचार्य-संतांचे योगदान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म हे सर्व ते जगल्यानेच म्हणजे भारतीय भाषांमधून व्यवहार केल्यानेच समजते. हे मुख्य उद्दिष्ट साधण्याचे प्रयत्न सर्वाधिक महत्त्वाचे. प्रथम ही देशसेवा करायची आहे. इंग्रजी लिहिण्या-बोलण्याची सफाई शिकविणे ही सेवा त्यानंतर पुरवता येईल. सेवा करणे आणि पुरवणे ही विभागणी व त्यांचा क्रम याबाबत तुम्ही कसा विचार करता ?

५ . तयामागुनी धावणे हे ततः किम् ? Read More »

४. सर्व समाज माझा, मी सर्व समाजाचा

आदरणीय आणि आत्मीय आपल्या समाजाची सभ्यता, संस्कृती, परंपरा आणि वारसा या संबंधी काही चिंतन गेले दोन-तीन महिने मांडत आहे. सर्व भौतिक आणि संस्थात्मक रचनांमधून समाजाच्या सभ्यतेची पातळी निश्चित होते. ‘इंडियात गुणांची कदर नाही’, ‘इंडियात प्रमाणिकपणे काम करणाऱ्याला काही स्कोप नाही’, असे म्हणत विदेशाची वाट धरणारे काही जण असतात. त्यांच्या मनातल्या उत्तमतेच्या स्वप्नांशी जुळणारे वास्तव त्यांना अनुभवायला येत नाही. म्हणून असे लोक ते सभ्येतेचे वास्तव माझे नाहीच, असे म्हणतात. आपले सामूहिक आदर्श काय होते व आजही अनेक जण कोणते आदर्श मानतात याची गंधवार्ता भारतात राहून नाही असेही अनेक जण असतात. यज्ञ, दान, तप, स्वधर्म, श्रेयस, निःश्रेयस, उपासना, धर्मसंस्थापना, योग, अभ्युदय, त्याग, विद्या, अविद्या, पुरुषार्थ, आश्रम अशा संकल्पनांबद्दल गाढ अज्ञान असण्यात आधुनिकता आहे असे त्यांना वाटते. त्यांना भारतातील संस्कृती आपली वाटत नाही. प्राचीन ऋषी, मुनी, चक्रवर्ती, संत, आचार्य, प्रवर्तक, प्रचारक, शास्त्रज्ञ, वीर, तत्त्वज्ञ यांची नावेही माहीत नाहीत असे अनेक जण असतात. त्यांना आपली परंपरा माहीत नसते. आपल्या आधीच्या पिढ्यांची ध्येये, स्वप्ने, उद्दिष्टे आपली आहेत असे मानणे म्हणजे त्यांचा वारसा आपला मानणे, आज अनेकांना ‘माझे करीअर गोल्स’ आणि ‘माझे करीअर ऑप्शन्स’ यांचीच काळजी लागलेली असते. ते आपल्या सांस्कृतिक वारशाची फार काळजी करत नाहीत. अशा अनेक गोष्टींची आपल्याला माहितीच नसते. माहिती असेल तर त्या आदरणीय आहेत किंवा नाही याचा प्रश्न येतो. आदरणीय असो वा नसो ते ‘माझे’, ‘आमचे’, ‘आपले’ आहे असे वाटले तर ते चालू ठेवणे, वाढवणे, बदलणे, वगळणे ही आपली जबाबदारी आहे हे लक्षात येते. ‘माझे’ वाटणे म्हणजेच आत्मीयता वाटणे. आपल्या समाजाची सभ्यता, संस्कृती, परंपरा आणि वारसा याबद्दल अशी आत्मीयता वाटू लागली तर एक स्वतंत्र व्यक्ती राष्ट्राचा घटकही बनते. नव्या परंपरा आणि विस्तारित वारसा राष्ट्राचा घटक बनणे म्हणजे समाजाच्या प्रवाहाबरोबर राहणे. मृत घटक प्रवाहाबरोबर नुसते वाहत जातात. जिवंत घटक प्रवाहाबरोबर जाता जाता प्रवाहाला दिशा आणि गती देण्याचेही काम करतात. समाज-प्रवाहाबरोबर आहोत म्हणूनच त्या समाजाचे आनंदाचे आणि दुःखाचे, अभिमानाचे आणि अपमानाचे प्रसंगही त्यांना आपले वाटतात. समाजातील कर्तृत्ववान आणि प्रतिभावान व्यक्तींची दखल आपण किती घेतो यावरून आपण समाजाशी किती एकरूप झालेलो आहोत हे लक्षात येते. एकोणिसाव्या शतकामध्ये ब्रिटिशांचे राज्य आल्यावर त्यांच्या विरोधात व त्यांच्या राज्य-पद्धतीमुळे आपल्या समाजातले अनेक जणांचे गुण प्रकट होण्याची संधी मिळाली. नव्या परंपरा सुरू झाल्या व जुन्या वारशात नव्या वारशाची भर पडली. स्वातंत्र्ययोद्धे, समाजसुधारक, कर्तृत्ववान लोकांची नावे घेताना उमाजी नाईक, लहूजी वस्ताद साळवे, जोतिबा फुले, रखमाबाई शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, भाऊराव पाटील, नाना पाटील, दादासाहेब गायकवाड, आण्णाभाऊ साठे अशी अनेक नावे ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे पुढे आली. महाराष्ट्राबाहेर डोकावले तर बिरसा मुंडा, नारायण गुरू अशी नावे दिसतात. दयानंद, विवेकानंद, अरविंद किंवा वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर किंवा टिळक, गांधी, नेताजी या परंपरांची आठवण ठेवताना त्यात या नव्या परंपरांची भर पडली आहे याचे भान ठेवले पाहिजे. या नव्या परंपरांचा अभिमान बाळगणाऱ्याना जुन्या परंपरांबद्दल आत्मीयता वाटली पाहिजे. निवडीचे व्यापक क्षेत्र स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे की शिक्षणाचा प्रसार समाजात जेवढा वाढेल

४. सर्व समाज माझा, मी सर्व समाजाचा Read More »

३. समाज – संस्थापनेचे ध्येय

सद्यःस्थिती आणि राजकारण गेले तीन महिने वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्यांच्या आधारे कार्यकर्त्यांच्या काही गटांनी केलेले टिपण व त्यावरील चर्चेची एक दिशा प्रकट चिंतनामधून मांडली होती. त्याचे वाचन करून काही गटांनी चर्चा केल्याचेही कळले. सद्यः स्थितीमध्ये अनेक तपशील येतात. बाजारभाव आणि हवामानातले बदल, बँकांचे व्याजदर आणि शेअरबाजारातील निर्देशांकांतील बदल, आंदोलने, बंद, संप, नव्या कामांची उद्घाटने, स्मृतिसोहळे, सत्कार-समारंभ, पुरस्कार वितरण, बैठकी, सभा-संमेलने, सार्वजनिक उत्सव, सत्तांतरे, सत्तेसाठीचे डावपेच, गावपातळीपासून युनोच्या सरचिटणीसपदापर्यंतच्या निवडणुका, नेत्यांच्या घोषणा आणि आश्वासने, गुन्हे, अपघात, सत्कार्याची आणि विधायकतेची उदाहरणे, सदाचाराचे आणि भ्रष्टाचाराचे किस्से, कला व क्रीडा क्षेत्रातील सामने, प्रदर्शन आणि नवनिर्मिती या सवपैिकी आपण जे व जेवढे ग्रहण करू शकू त्यातून आपली सद्यः स्थितीची जाणीव तयार होते. जाणवणाऱ्या सद्यःस्थितीला कसा प्रतिसाद द्यायचा हे आपण आपले शिक्षण, व्यवसाय, आवड, परिपक्वता आणि संपर्क-वर्तुळ यातून ठरवत असतो. सद्यःस्थितीची नेमकी व अद्ययावत जाणीव असणे खूपच उपयुक्त आहे. परंतु या जाणिवेतून होणारी कृतीही महत्त्वाची आहे. अनेक जणांना असे वाटते की सद्य:स्थितीला नेमका प्रतिसाद आपण राजकारणातून देऊ शकू. राजकारण करून सद्य:स्थिती आपल्याला पाहिजे तशी बदलू शकू. अनेक राजकीय नेते अशा पद्धतीने सद्यःस्थितीवर परिणाम करतानाही दिसतात. काही परिणाम तर दूरगामीही असतात. अर्थकारण आणि प्रशासन राजकीय नेत्यांचे अनेक निर्णय त्यांच्या आर्थिक परिणामांवर लक्ष ठेवून केलेले असतात. जिथे लगेच किंवा कालांतराने आर्थिक लाभ दिसतो आहे असे राजकीय निर्णय लगेच किंवा योजनापूर्वक घेतले जातात. राजकीय पातळीवर घेतलेल्या निर्णयांची कार्यवाही प्रशासनाकडून होत असते. विवेकी व कार्यक्षम प्रशासन राजकीय निर्णयांची दाहकता कमी करू शकते किंवा परिणामकारकता वाढवू शकते. त्यामुळे सद्य:स्थिती बदलायची असेल तर अर्थकारण व प्रशासनावर पकड पाहिजे असेही बऱ्याच जणांना वाटते. उत्पादन वाढ, तंत्रज्ञान आणि पायाभूत भौतिक रचना अजूनही भारतात पाऊस चांगला झाला नाही की शेतीचे उत्पादन कमी होते. शेती उत्पादन कमी झाले की शेतकऱ्यांची क्रय-शक्ती कमी होते. त्यांची क्रय-शक्ती कमी झाली की देशाचे अर्थकारण मंदावते. कारखान्यांतील उत्पादनवाढ व निर्यातक्षम संगणक-सेवा यामुळे शेती उत्पादनावर अर्थकारण अवलंबून असणे, आता कमी होत आहे. तरीही शेतीचे उत्पादन वाढले की अर्थ-व्यवस्थेला तुकतुकी येतेच. यांत्रिक आणि संगणकीय तंत्रज्ञानामुळे अर्थकारण आणि प्रशासन हे दोन्ही गतिशील होताना पाहतो आहोत. शेती उत्पादन, शेतमालाची विक्री, यांत्रिक उत्पादन आणि संगणक व इतर आधुनिक क्षेत्रातील उत्पादन हे सर्व पाणी, वीज, रस्ते, रेल्वे, दूरसंचार जाळे या पायाभूत भौतिक रचनेवर अवलंबून असते हे देखील अनुभवाला येते. त्यामुळे अनेकांना राजकारण, अर्थकारण, प्रशासनाआधी उत्पादनवाढ, तंत्रज्ञान-सुधारणा आणि पायाभूत भौतिक रचना यांना महत्त्व दिले पाहिजे असे वाटते. शिक्षण आणि संशोधन सद्य:स्थिती म्हणजे प्रवासाच्या विशिष्ट टप्प्याला दिसणारे सभोवताल; राजकारण म्हणजे प्रवासी वाहनाचे नियंत्रण करणारे वाहतूक पोलीस; अर्थकारण व प्रशासन म्हणजे वाहन; उत्पादन, तंत्रज्ञान व पायाभूत रचना म्हणजे वाहनातील इंजिन असे मानले तर शिक्षण आणि संशोधन हे त्या इंजिनाचे इंधन आहेत. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण आवाक्यात येऊ शकेल असे दिसू लागल्यावर अर्थपूर्ण माध्यमिक शिक्षणाचा विचार देशातील शिक्षणतज्ज्ञ करू लागले आहेत. प्रबोधिनीत हा विचार आधीच सुरू होऊन त्याप्रमाणे कृतीही सुरू झाली आहे. व्यवसायाभिमुख उच्च शिक्षण देणे शक्य आहे हे आता लक्षात येऊ लागले आहे. समस्यापरिहारक्षमता वाढवणारे संशोधनाभिमुख शिक्षण म्हणजेही उच्च शिक्षण हे देखील कधीतरी कळले पाहिजे. असे उच्च शिक्षण दिले तर नंतर विद्यापीठे, संशोधन-संस्था, कारखाने, राष्ट्रीय प्रयोगशाळा येथील संशोधन वाढेल. चांगले शिक्षण व संशोधन झाले तर नवीन कौशल्ये, नवीन तंत्रे, नव्या कल्पना, नव्या पद्धती, नव्या वाटा, नवीन क्षितिजे व नवीन आव्हाने दिसतात. हे सर्व म्हणजेच विकासाचे व पराक्रमाचे इंधन आहे. समाजकारण, संस्कृति-संवर्धन आणि समाजसंस्थापना समाजकारण हा शब्द अनेक ठिकाणी अनेक जण वापरतात. समाजसंस्थापना हा शब्द अजून तरी आपण प्रबोधिनीतच कधी कधी वापरतो. व्यक्तीचे आणि समाजगटाचे संबंध आणि समाजगटांमधील परस्परांचे संबंध सौहार्दपूर्ण, आरोग्यपूर्ण, परस्परपूरक आणि परस्परपोषक असण्यासाठी काम करणे म्हणजे समाजकारण असे म्हणता येईल. शिक्षण संशोधनाचे इंधन ज्या अर्थकारण-प्रशासनाच्या वाहनाला गती देते ते वाहन वापरणारा समाजच असतो. समाजच या वाहनात बसणार आणि वाहनाचा सभोवताल म्हणजेही समाजच. समाजातील सगळ्यांना या वाहनात बसणे किंवा त्यातून उतरणे स्वेच्छेने शक्य व्हावे यासाठी समाजकारण करायचे. संस्कृति-संवर्धन म्हणजे या वाहनाने कुठे जायचे याचा एकच निश्चय सर्वांच्या मनात तयार करणे. समाजकारण आणि संस्कृति-संवर्धन करेल अशी संघटना निर्माण करणे हे शिक्षण-संशोधनाच्या आधी केले पाहिजे असेही काही जणांना वाटते. सद्यःस्थितीच्या जाणिवेपासून संस्कृति-संवर्धनापर्यंतच्या एकेक किंवा एकाहून अधिक गोष्टी करणाऱ्या अनेक संघटना समाजात हव्यात. अनेक संघटनांनी मिळून या सर्व गोष्टी करणे म्हणजे समाज-संस्थापना. सद्यःस्थिती समजून घेऊन तिला आपला प्रतिसाद निश्चित करताना आपले ध्येय समाज-संस्थापनेचे आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

३. समाज – संस्थापनेचे ध्येय Read More »

२. भारतीय जीवनपद्धतीचा गाभा

बाहेरील सुधारणा म्हणजे सभ्यता सध्या सभ्यता (सिव्हिलायझेशन) आणि संस्कृती (कल्चर) असे दोन शब्द मानवी समाजाची प्रगती दर्शविण्यासाठी वापरले जातात. सभ्यता म्हणजे माणसांनी सामुदायिक रित्या नैसर्गिक शक्तींना नियंत्रणात आणून आपल्या सामुदायिक जीवनात घडवलेली सुधारणा. रानात उगवलेले धान्य वेचण्यापेक्षा बियाणे वापरून पाहिजे ती पिके घेणे ही सुधारणा. शेतात बियाणे विखरून टाकण्यापेक्षा शेत नांगरून बी जमिनीत पेरणे ही सुधारणा. पावसाच्या पाण्यावर शेती करण्यापेक्षा बागायती शेती करणे ही सुधारणा. रान तोडून एका भागात काही वर्षे शेती करणे व नंतर दुसरे रान तोडून पहिल्या शेतात रान माजू देणे ही सुधारणाच. पण एकाच शेतात खते वापरून आणि पिके बदलून शतकानुशतके जमिनीचा कस टिकवणे ही त्यापुढची सुधारणा. अन्नासाठी शेती करण्याऐवजी नगदी पिके घेणे ही देखील सुधारणा आणि हरितगृहात पाहिजे तसे वातावरण नियंत्रित करून शेती करणे ही त्यापुढची सुधारणा. शेतीत सुधारणा करून मानवी समाजाची सभ्यता वाढली तसेच घरे, वाहने, चुली, इंधन, ऊर्जासाधने, रस्ते, पूल, रेल्वे, विमाने, कालवे, अंतरिक्षयाने यात सुधारणा होऊनही सभ्यता वाढली. प्रमाणित वजने मापे, चलन व्यवस्था, बँका, विमा, कर्जपद्धती, क्रेडिटकार्ड, डेबिट कार्ड यात सुधारणा होऊनही सभ्यता वाढली. निसर्गावर नियंत्रणाबरोबरच सर्व मानवी व्यवहार नियंत्रित करण्यालाही सभ्यता म्हणतात. लिखित घटना व कायदे, निवडणुका, लोकशाही, न्यायालये, पंचायती, जिल्हा परिषदा, संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय करार-मदार ही देखील सुधारणा व सभ्यताच. लोकांचे विविध प्रकारचे हक्क मान्य करणे व त्यांच्या रक्षणाची व्यवस्था करणे ही देखील सभ्यताच. सामुदायिक पाणवठे, गावाची गायराने, वहिवाटीचे रस्ते, बौद्धिक स्वामित्व या सर्व रचना म्हणजेही सभ्यताच. भौतिक सुख-दुःखांचे नियंत्रण सभ्यतेने होते. मनातील सुधारणा म्हणजे संस्कृती मानसिक सुख-दुःखे भौतिक सुख-दुःखांशी काही प्रमाणात जोडलेली असतात. परंतु ती बऱ्याच प्रमाणात वेगळीही असतात. माझी भौतिक सुख-दुःखे मी इतरांशी कशी व किती वाटून घ्यायची आणि इतरांच्या सुखासाठी माझी सुख-दुःखे मी कधी बाजूला ठेवायची हे ज्या नियमांमधून कळते, त्याला सभ्यतेपलिकडची संस्कृती म्हणता येईल. कर्तव्य, संयम, त्याग, समर्पण, सेवा, आदर, कृतज्ञता, निष्ठा, श्रद्धा, विवेक, बंधुभाव, मैत्री, प्रेम, भक्ती, शरणता या सर्व गुणांच्या आधारे आणि त्यांच्यासाठी जगण्याच्या प्रयत्नातून मानवी समाजाने संस्कृती निर्माण केली आहे. समाजातील चाली-रीती, सण-उत्सव, रूढी-परंपरा या सगळ्यांमधून संस्कृती कळत असते. केळीच्या खुंटांचे खांब आणि आंब्याच्या पानांची तोरणे म्हणजे मांगल्य, बुक्का म्हणजे भजन, गुलाल म्हणजे गणेशोत्सव किंवा विजयोत्सव आणि भंडारा म्हणजे खंडोबा, तीर्थ-प्रसाद म्हणजे कोणतीतरी पूजा आणि रांगोळी म्हणजे स्वागत अशा प्रतीकांमधून संस्कृती व्यक्त होत असते. संस्कृतीमधून नीती-अनीतीचा बोध होतो तसेच सौंदर्य आणि कुरूपतेचाही निर्देश होतो. सभ्यता आणि संस्कृती मिळून जीवनप्रणाली सभ्यता आणि संस्कृती मिळून जीवनप्रणाली तयार होते. भारतीय जीवनप्रणालीचे वैशिष्ट्य असे आहे की नीतिबोध आणि सौंदर्यबोध याबरोबरच येथे आत्मबोधालाही महत्त्व दिले गेले आहे. सभ्यता जशी फुलत जाते तसे सहिष्णुता, स्वीकारशीलता, इतरांचा आदर; आणि समाजव्यवहार व नैसर्गिक घडामोडींमध्ये अधिकाधिक नियोजन, व्यवस्थापन व दूरदृष्टी प्रकट होत जाते. संस्कृती जशी फुलत जाते तशी नीती आणि सौंदर्य यांच्या बोधाबरोबरच त्यांचे अनेक प्रकारे प्रकटीकरण व अभिव्यक्तीही होत जाते. जगभरच्या अनेक समाजांमध्ये सभ्यता व संस्कृतीच्या फुलण्याचे वेगवेगळे टप्पे व त्यातून तयार झालेल्या अनेक जीवनप्रणाल्या दिसतात. भारताच्या जीवनप्रणालीत काही गोष्टी इतरांच्यापेक्षा कुठे प्रमाणाने व प्रकाराने वेगळ्या असतील. भारतातील सभ्यतेची म्हणजे भौतिक सुधारणेची पातळी अनेक बाबतीत आज इतरांच्या खाली असेल, ते प्रमाणाचे वेगळेपण आहे. ते भरून काढता येईल. भारतीय संगीत, नृत्य, चित्रकला, खेळ, खाद्य-पदार्थ, वेषभूषा, इतरांच्या बाबतीत प्रकाराने वेगळे आहेत. तिथे संस्कृतीची सौंदर्य-मूल्येही वेगळी आहेत आणि त्यांची अभिव्यक्तीही वेगळी आहे. हे वेगळेपण टिकवून ठेवले पाहिजे आणि इतरांच्या वेगळेपणाचे रसग्रहणही केले पाहिजे. या सर्वांच्या पलिकडे भारतीय जीवनप्रणालीत इंद्रियांनी न कळणाऱ्या पण बुद्धीला जाणवणाऱ्या शरीर-इंद्रिये मन-बुद्धी यांचे नियंत्रण करणाऱ्या स्वतःमधील एका स्वतंत्र केंद्राचा विचार सतत होत आला आहे. या केंद्राची ओळख होण्यासाठी स्वतःच्या दिनक्रमाला आणि संपूर्ण आयुष्याला काही वेगळे वळण देण्याचा उपयोग होईल का याचा विचार भारतीय लोक फार पूर्वी पासून करत आले आहेत. याबाबतीत भारतीय लोकांइतके प्रयोग इतर कोणत्याही देशात झाल्याची जगाच्या इतिहासात नोंद नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे हे केंद्र सापडणे म्हणजे ‘आत्मबोध’. त्या केंद्राची ओळख होणे म्हणजे आत्मसाक्षात्कार. या आत्मसाक्षात्कारासाठी स्वतःची इंद्रिये, मन व बुद्धी यावर नियंत्रण मिळवण्याचा, स्वतःचे अनुभवविश्व, भावविश्व आणि विचारविश्व यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची अखंड परंपरा व त्यांचे असंख्य प्रयोग हे भारतीय जीवनप्रणालीचे वेगळेपण आहे. आत्मबोधाभोवती फिरणारे संस्कृति-संवर्धनाचे प्रयोग हे आपल्या जीवनप्रणालीचे भाग आहेत. यातून तयार होणारी आपली जीवन-प्रणाली सदैव प्रगति-पथावर राहावी ही आपली जीवनदृष्टी आहे. या जीवनदृष्टीतून समाजजीवन घडविण्याला आपल्याकडे समाजसंस्थापना असे म्हणतात.

२. भारतीय जीवनपद्धतीचा गाभा Read More »

१. विमल राष्ट्र घडो अभिजात

प्रबोधिनीचे विकसनशील चिंतन काळ बदलतो तसे शब्दांचे अर्थ बदलतात. प्राधान्यक्रम बदलतात. दीर्घ काळ काम करू इच्छिणाऱ्या संघटनांना त्यामुळे आपली उद्दिष्टे त्या त्या काळातील अर्थवाही शब्दांमध्ये मांडावी लागतात. ‌‘मनुष्यघडण‌’ ऐवजी ‌‘देशातील सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान वाढविणे‌’ अशी पुनर्मांडणी आपण या करताच केली. हे आपले मध्यंतर उद्दिष्ट आहे. त्याहून लांबच्या दीर्घकालीन उद्दिष्टाची नवीनभाषेत पुनर्मांडणी करावी लागेल का, असा विचार करत होतो. त्या दृष्टीने प्रबोधिनीतील प्रकाशित साहित्य वाचत होतो. प्रबोधिनीच्या संस्थापक संचालकांना अशी गरज जाणवली होती का ? त्यांनी या दिशेने काही प्रयत्न केले होते का ? याची उत्तरे शोधण्याकरिता केलेल्या वाचनातून असा एक प्रयत्न झाला असावा असे वाटले. मला जाणवलेला पुनर्मांडणीचा प्रयत्न पुढे दिलेला आहे. कोणत्या प्रकारचे दोनशे कार्यकर्ते ? डिसेंबर 1975 मध्ये मा. उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‌‘एक्सलन्स्‌‍ ॲवॉर्ड‌’ स्वीकारताना कै. आप्पांनी प्रबोधिनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट पुढील शब्दांत मांडले होते – This ideal of equality, fraternity, social justice, excellence in science blended with Indian spiritualism is the basis of all work at JP. To give to the Nation at least 200 young men and women who are inspired with the above ideals, is the ‘not-too-distant’ goal or objective of Jnana Prabodhini. समता, बंधुता, सामाजिक न्याय ही भारतीय घटनेच्या सरनाम्यातील तत्त्वे आहेत. विज्ञानातील उत्तमता आणि भारतीय शैलीची आध्यात्मिकता यांच्यासह त्यांचा स्पष्ट उल्लेख आणि तोही प्रबोधिनीच्या उद्दिष्टांच्या संदर्भात जाहीरपणे याच कार्यक्रमात पहिल्यांदा झाला. या पाच तत्त्वांपासून प्रेरणा घेणारे दोनशे युवक-युवती प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशासाठी काम करू लागावेत हे प्रबोधिनीचे मध्यंतर उद्दिष्ट आहे, असे त्यावेळी प्रबोधिनीच्या संस्थापकांनी सांगितले. प्रबोधिनीचे मध्यंतर उद्दिष्ट देशाला दोनशे कार्यकर्ते देणे हे उद्दिष्ट कै. आप्पा आधीपासूनच मांडत होते. हे दोनशे कार्यकर्ते कसे असावेत याचे तपशील या भाषणाच्या निमित्ताने प्रथमच मांडले गेले. या पुरस्काराच्या निमित्ताने पूर्वीपासून मांडलेल्या कल्पनाच कै. आप्पांनी लोकांना जास्त परिचित शब्दांध्ये मांडल्या आहेत असे म्हटले पाहिजे. प्रबोधिनीच्या घटनेमध्ये मांडलेल्या प्रबोधिनीच्या उद्देशांच्या अंतिमपरिच्छेदात पुढील हेतू मांडला आहे. ‌‘स्वदेशात विचारप्रबोधन व कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, येथे पुनरुज्जीवन होऊन देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे असा हेतू आहे. तो साध्य होईल अशा तऱ्हेने कार्य घडविणे‌’. घटनेतील या उद्देशांध्ये ‌‘येथे पुनरुज्जीवन व्हावे‌’ हा उद्देश अर्थातच वरील पाच तत्त्वांधील भारतीय शैलीची आध्यात्मिकता याला समांतर आहे. ‌‘देशाचा कायापालट व्हावा‌’ याचा संबंध वरील पाच तत्त्वांपैकी विज्ञानातील उत्तमतेशी येतो. ‌‘विचारप्रबोधन, कार्यप्रबोधन व देशात आणि लोकमानसात नवचैतन्य निर्माण‌’ अर्थातच समाजामध्ये समता, बंधुता व सामाजिक न्याय ही मूल्ये प्रतिष्ठित झाली तर होईल. प्रेरक मूल्ये आणि अपेक्षित परिणाम ज्ञान प्रबोधिनीचे उद्दिष्ट ‌‘धर्मसंस्थापना‌’ या शब्दातही कै. आप्पा मांडायचे. प्रबोधिनीच्या घटनेच्या परिशिष्टातच ‌‘स्वदेशात विचारप्रबोधन व कार्यप्रबोधन व्हावे,…… नवचैतन्य निर्माण व्हावे‌’, ही धर्मसंस्थापना या अंतिम ध्येयाची स्पष्ट मांडणी आहे असे म्हटले आहे. कै. आप्पांना धर्मसंस्थापना म्हणजेच समाजसंस्थापना म्हणजेच राष्ट्रनिर्माण असे स्पष्टीकरण कालांतराने करावेसे वाटले. समाजसंस्थापना करणे म्हणजे समाज-रचना काही मूल्यांवर प्रतिष्ठित करणे. समाजसंस्थापनेचे कवा धर्मसंस्थापनेचे स्पष्टीकरण देताना घटनेध्ये समाजात विचारप्रबोधन ते नवचैतन्य निर्माण असे पाच परिणाम दिसले पाहिजेत असे म्हटले आहे. हे पाच परिणाम दिसण्यासाठीच समता, बंधुता, सामाजिक न्याय, विज्ञान आणि आध्यात्मिकता या मूल्यांची मांडणी केली आहे. 1983 साली विवेकानंद जयंतीच्या प्रबोधिनीच्याच कार्यक्रमात केलेल्या भाषणामध्ये कै. आप्पांनी देशापुढील प्रश्नांची सहा विभागांध्ये मांडणी केली होती. त्यामधील एक परिच्छेद पुढीलप्रमाणे आहे. ‌‘तिसरा प्रश्नसमूह म्हणजे नव्या समाजरचनेचा. नव्या प्रकारच्या समाजरचना यायला हव्यात ज्या सामंजस्यावर आधरलेल्या आहेत, समतेवर आधारलेल्या आहेत, बंधुत्वावर आधारलेल्या आहेत, असे झाले पाहिजे. या टोकापासून त्या टोकापर्यंत बंधुत्वाचे नाते निर्माण करणारे, एकच एक झेंडा फिरवणारे जे हिंदुत्व आहे, त्याचे काम करणाऱ्या समाजरचना पाहिजेत.‌’ उद्दिष्ट तेच, शब्द कालोचित प्रबोधिनीचे दोनशे कार्यकर्ते ज्या पाच तत्त्वांच्या समूहाने प्रेरित झाले पाहिजेत ती १९७५ मध्ये सांगितलेली तत्त्वे व नव्या समाजरचनेविषयी १९८३ साली व्यक्त केलेली अपेक्षा यातील साम्य पाहिले म्हणजे कै. आप्पांनी ती तत्त्वे किमान आठ वर्षांच्या दीर्घचिंतनातून मनःपूर्वक स्वीकारली होती, हेच दिसते. समता, बंधुता, सामाजिक न्याय व विज्ञानातील उत्तमता ही खरे तर युरोपातील सामाजिक, राजकीय व वैचारिक चळवळींतून पुढे आलेली तत्त्वे. म्हणूनच या चार तत्त्वांबरोबर पाचवे तत्त्व सांगताना Spiritualism आध्यात्मिकता असे न म्हणता Indian spiritualism – भारतीय शैलीची आध्यात्मिकता असे शब्द कै. आप्पांनी वापरले. भारतीय आध्यात्मिकता मुख्य. तो पाया पक्का असेल तर अध्यात्माचे व्यावहारिक जीवनात उपयोजन करताना मदतीसाठी इतरत्र विकसित झालेली तत्त्वे चालतील असेच जणू सुचवायचे आहे. यासाठी प्रबोधिनीचे मध्यंतर उद्दिष्ट (not-too-distant goal) म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या पुढील वचनाचा अनुवाद आहे असे कै. आप्पांनी १९७५ मधल्या भाषणातच सांगितले होते. स्वामी विवेकानंद म्हणतात, “समानता, स्वातंत्र्य, उद्योग आणि उत्साह यात पाश्चात्यांतील पाश्चात्य आणि त्याच वेळी धर्म, संस्कृती, सहज प्रेरणा यात कट्टर हिंदू तुम्ही होऊ शकाल का ?” प्रबोधिनीतील चिंतन असे विकसनशील असले पाहिजे, हे मला कै. आप्पांच्या या वैचारिक प्रवासातून कळले. तुम्हाला या प्रवासासंबंधी काय वाटते ?

१. विमल राष्ट्र घडो अभिजात Read More »

प्रबोधकांची प्रेरणा – प्रकट चिंतन पुस्तिका ७

प्रस्तावना ज्ञान प्रबोधिनीचे संचालक माननीय डॉ. गिरीशराव बापट यांचा कार्यकर्त्यांशी सहसंवाद संस्थेच्या मासिक प्रतिवृत्तामधून नेहमी चालू असतो. अनेक प्रासंगिक घडामोडींना प्रतिसाद देताना प्रबोधकांनी कसा व कोणता विचार केला पाहिजे, प्रबोधिनीच्या मूळ तात्त्विक भूमिकेशी त्या प्रतिसादाचा धागा कसा पोहोचतो याचे मार्मिक विलेषण ते या प्रकट चिंतनातून करीत असतात. दरमहा मर्यादित वर्तुळात वितरित होत असलेल्या या लिखाणातील काही निवडक विषय सर्वच वाचकांसाठी उपयुक्त वाटल्याने त्यांचे वर्गीकरण करून पुस्तिकेच्या स्वरूपात प्रकाशित केले जातात. त्या मालिकेतील हे 7 वे पुष्प वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे. कार्यकर्त्यांना वारंवार मनन करण्यासाठी तर ही पुस्तिका उपयोगी पडेलच, परंतु सर्वच वाचकांना ज्ञान प्रबोधिनीचे वैचारिक अंतरंग त्यामुळे अधिकाधिक सखोलपणे परिचित होईल यात शंका नाही. वि.शं. /सुभाष देशपांडे कार्यवाह

प्रबोधकांची प्रेरणा – प्रकट चिंतन पुस्तिका ७ Read More »