३.शक्तिसंग्रहासाठी स्वयं-अनुशासन
पहिले दोन श्लोक प्रौढांना जेवढे मार्गदर्शक तेवढेच ते युवक-युवती आणि किशोर-किशोरींनाही मार्गदर्शक आहेत. त्या मार्गाने जायचे तर सुरुवात कुठून करायची हे या तिसऱ्या श्लोकात सांगितले आहे. किशोर-किशोरींसाठी आपण विद्याव्रत संस्कार योजतो. त्याच्यासाठी रचलेल्या पोथीतील हा श्लोक आहे. (विद्याव्रत उपासना पोथी, चौथी आवृत्ती, २०१७, पान १७) स्वतः स्वतःचा उद्धार करायचा, आहोत त्या स्थितीतून स्वतःला वर उचलायचे, तर त्यासाठी स्वतःमध्ये शक्ती पाहिजे. आपण प्रतिकूल परिस्थितीत खचू नये यासाठी धीर धरता यावा लागतो. स्वतःच्या प्रयत्नाने वर जाण्यासाठी उत्साह लागतो. नुसतीच नाईलाजाने किंवा सवयीने काहीतरी कृती करणारा, त्याच्यामध्ये धीर आणि उत्साह आल्यावर, कर्मनिष्ठ बनतो. व्यायाम, अध्ययन, कौशल्ये मिळवणे, संकल्प करणे, संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे, यातून स्वतःच्या उद्धाराची धीर आणि उत्साहयुक्त शक्ती आपल्यामध्ये एकत्रित व्हायला सुरुवात होते. प्रथम नाईलाजाने किंवा यांत्रिक कृती करणारा कर्मनिष्ठ होतो. मग तो कर्मवीर बनतो. कर्मवीर बनणे हे कर्मयोगी बनण्यासाठीचे पुढचे पाऊल आहे.
सतार, तंबोरा, वीणा, व्हायोलिन, गिटार, सारंगी या साऱ्या तंतुवाद्यांमध्ये ज्या तारा असतात, त्या छेडल्यावर त्यातून सूर निर्माण होतात. त्या तारा ताणल्या नसल्या तर पाहिजे तो सूर येत नाही. त्या जास्त ताणल्या गेल्या तर तुटतात. हवा तो सूर येण्यासाठी त्या योग्य तेवढ्याच ताणाव्या लागतात. गणेशोत्सवात वापरल्या जाणाऱ्या ढोल-ताशांची कातडी पाने ही योग्य तेवढी ताणली तर त्यातून पाहिजे तसा नाद मिळतो. कमी ताणली तर त्यातून आवाज येत नाही. जास्त ताणली तर पान फाटते. ताणल्यानंतरही काही वेळा कातडी पाने गरम करावी लागतात. ताण आणि तापमान दोन्ही बघावे लागते. ते योग्य प्रमाणात असेल तर ढोल-ताशाचा आवाज चांगला येतो. आवाजावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टींचे प्रमाण आवश्यक तेच असण्याला, ‘युक्त’ असा शब्द आहे. स्वतःचा उद्धार करण्यासाठी आवश्यक ती शक्ती व गुण स्वतःमध्ये असण्यासाठी काय काय ‘युक्त’ असले पाहिजे या संबंधी पुढचा श्लोक गीतेत आला आहे –
गीता ६.१७ : युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु |
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥
गीतार्ई ६.१७ : निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि
मोजूनि करितो त्यास योग हा दुःखनाशन
ज्याचे खाणे आणि फिरणे योग्य प्रमाणात आहे, कामांमध्ये ज्याचे योग्य प्रमाणात प्रयत्न होतात, ज्याची झोप आणि जागेपणाचा काळ योग्य प्रमाणात आहे, त्याचा योग दुःख नष्ट करणारा होतो. सगळे मोजून-मापून आवश्यक तेवढेच करणे, कमी ही नाही आणि जास्त ही नाही म्हणजे युक्त. आणि हवा तो परिणाम घडण्यासाठी साऱ्या गोष्टी जुळून येणे म्हणजे योग. विद्याव्रत संस्काराच्या पोथीत या श्लोकाच्या पहिल्या शब्दावरून युक्ताहारविहार हाच ब्रह्मचर्याश्रमाचा पहिला नियम सांगितला आहे. ज्याचे खाणे-पिणे, खेळणे-फिरणे, झोपणे आणि काम करणे आवश्यक तेवढे, नियमित, म्हणजेच युक्त आहे, त्याला दुःखापासून दूर राहता येते. त्याला सर्व क्रियांचा योग साधल्यामुळे त्याच्या शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धीच्या शक्तींना वळण लागते. प्रगतीची दिशा सापडते, त्याच्या व्यक्तिविकासाला गती मिळते. नेमक्या कृतीचे एवढे महत्त्व आहे. आठवीतल्या विद्याव्रताथना सांगितले असले तरी विद्यार्थिदशा संपल्यावर प्रौढांना ही आयुष्यभर पुरेल असे हे सूत्र आहे.
कर्मसु म्हणजे कामामध्ये. युक्तचेष्टस्य म्हणजे योग्य ते प्रयत्न करणाऱ्याचा. योग्य प्रयत्नांमध्ये कामाचे नियोजन, नियोजनाप्रमाणे काम, चालू कामाची गुणवत्ता वेळोवेळी तपासणे व राखणे, परिस्थितीवर, इतरांवर आणि स्वतःवरही कामाचा अपेक्षित परिणाम होतो आहे ना हे शोधणे व आवश्यकतेप्रमाणे स्वतःला बदलणे, हे सर्व येते. त्यामुळे आपण प्रगतिपथावर पुढे पुढे जात राहतो. कर्मनिष्ठाचे कर्मवीर बनतो. योग साधला नाही तर प्रगती खुंटते आणि त्याचे आपल्याला दुःख होते. योग साधला म्हणजे प्रगती चालू राहते. स्वतःला सर्व दृष्टीने अधिकाधिक योग्य बनवण्याची युक्तचेष्टा करणाऱ्याला शेवटी कर्मयोग ही साधतो. दुःख होण्याचे कारणच राहत नाही. म्हणून आपल्या सर्व युक्त क्रियांचा योग दुःखाचा नाश करतो.