प्रबोधिनीत एक पद्य म्हटले जाते. त्याचे शेवटचे कडवे आहे –
‘मर्यादांनी मर्यादुन? छे ! त्यांना उल्लंघुनी
पुढे पुढे चालणे असू दे हेच ध्येय तव मनी ॥’
हे पद्य लिहिले गेले त्याच सुमारास प्रबोधिनीच्या उद्योगांमध्ये खंडेनवमीच्या यंत्रपूजनाच्या उपासनेची पोथी तयार झाली. त्या उपासनेमध्ये उपासनेचे सूत्रचालक किंवा अध्वर्यू असे म्हणतात की ‘सीमोल्लंघन म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्या देशाच्या, राज्याच्या किंवा गावाच्या सीमा ओलांडून जाणे आणि समोरच्या शत्रूवर विजय मिळवणे’. (यंत्रपूजन उपासना – पान ४,५ ) पुढे अध्वर्यू म्हणतात, ‘आजच्या काळात सीमोल्लंघन म्हणजेच स्वतःच्या मर्यादा ओलांडणे आणि प्रगतिपथावर सतत घोडदौड करणे, म्हणजे स्वतःच स्वतःचा उद्धार करणे’. भगवद्गीतेत याच अर्थाचा श्लोक आहे.
गीता ६.५ : उद्धरेत् आत्मनात्मानं नात्मानम् अवसादयेत् |
आत्मैव हि आत्मनो बन्धुः आत्मैव रिपुः आत्मनः ॥
गीतार्ई ६.५ : उद्धरावा स्वये आत्मा, खचू देऊ नये कधी
आत्मा चि आपुला बन्धु, आत्मा चि रिपु आपुला
यंत्रपूजनाची पोथी प्रबोधिनीच्या ग्रामीण व शहरी भागातल्या उद्योगांमधील अल्पशिक्षित व निरक्षर, अकुशल व कुशल कर्मचारी सदस्यांसाठी व पदवीधर व्यवस्थापक सदस्यांसाठी म्हणजे सर्व पार्श्वभूमींच्या प्रौढ सदस्यांसाठी रचली होती. आता प्रबोधिनीचे उद्योग हस्तांतरित किंवा बंद झाल्याने या पोथीचा वापर करणारे कमी झाले. म्हणून सर्व विभागांतील व केंद्रांतील प्रौढ सदस्यांसाठी केलेल्या वर्षान्त उपासनेच्या नवीन पोथीमध्ये (पान ४) या श्लोकाचा समावेश केला आहे.
‘प्रबोधकांसाठी गीता-सूत्रा’च्या पहिल्या श्लोकात ‘निवर्य तू नको होऊ’ असे सांगितले आहे. तेच या श्लोकाच्या पहिल्या ओळीत ‘न आत्मानम् अवसादयेत्’, ‘स्वतःला खच्ची करू नये’, म्हणून सांगितले आहे. पहिल्या श्लोकात ‘दुबळी वृत्ती सोडून तू ऊठ’असे सांगितले आहे. तेच या श्लोकात ‘उद्धरेत् आत्मना आत्मानम्’, ‘आपणच आपल्याला वर उठवावे’, म्हणून सांगितले आहे. मग या श्लोकात नेमके जास्तीचे काय सांगितले आहे? ‘तुला निवर्य होणे शोभत नाही, तू ऊठ कसा’ हे आपल्याला सांगायला दुसऱ्या कोणाची वाट कशाला पाहायची? आपणच आपल्याला सांगायचे. ‘आत्मैव हि आत्मनो बन्धुः’ म्हणजे आपणच आपला बन्धु-मित्र व्हायचे. आणि आपण असे नाही केले, दुसऱ्यावर अवलंबून राहिलो तर ‘आत्मैव रिपुः आत्मनः’ आपणच आपले शत्रू झालो. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
या श्लोकानंतर सूत्रचालक पुढे म्हणतात की ‘राष्ट्र उभे करणे म्हणजे स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करणे’. राष्ट्र उभे करायला राष्ट्रासाठी मेक इन इंडिया जेवढे आवश्यक आहे, तेवढेच व्यक्ती उभी राहण्यासाठी व्यक्तीने स्वतःच स्वतःचा उद्धार-प्रगती-विकास करणे आवश्यक आहे.
आपल्या व आपल्या समाजाच्या विकासाचा मार्ग स्वावलंबनात आहे असे हा श्लोक सांगतो. प्रथमोपचार आणि सामान्य उपचारांची माहिती झाली की आपण आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी होतो. स्वयंअध्ययन कौशल्ये हस्तगत झाली की अभ्यासाच्या बाबतीत स्वावलंबी होतो. अर्थार्जनासाठी कौशल्य आल्यावर उपजीविकेच्या बाबतीत स्वावलंबी होतो. थोडा आत्मविश्वास आणि विचारशक्ती मिळवल्यावर स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात. भावना ओळखता व नियंत्रित करता आल्या म्हणजे भावनिक स्वावलंबन येते. प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधू लागलो की विचारांचे स्वावलंबन येते. आणि एखाद्या विषयाचा ध्यास घेता आला की प्रेरणेचे स्वावलंबन येते. असे स्वावलंबन असेल तर निरंतर प्रगती करता येते. कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर उपक्रम करणे हे कार्यकर्त्यांचे उपक्रमांबाबतचे स्वावलंबन. संघटनेने आपल्यासाठी स्वतःच नवीन कार्यकर्ते घडवणे हे संघटनेचे कार्यकर्त्यांबाबतचे स्वावलंबन. स्वतःवर अवलंबून राहण्याची क्षमता हीच प्रबोधिनीची व प्रबोधकांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. ती नेहमीच तशी राहिली पाहिजे.