१.भीरुता तुम्हाला शोभत नाही. कडवे, शूर व्हा.

स्वामी विवेकानंदांनी एकदा बेलुर मठामधल्या तरुण ब्रह्मचारी व संन्याशांना भगवद्गीता शिकवायचे ठरवले. गीतेचे रचनाकार व भाष्यकार यांची माहिती सांगत सांगत त्यांनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायावर बोलायला सुरुवात केली. पहिल्या दोन श्लोकांचा साधा शब्दार्थ सांगून तिसऱ्या श्लोकावर ते बोलू लागले. त्याचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करून ते म्हणाले की संपूर्ण गीता वाचल्याचे पुण्य हा एक श्लोक वाचल्याने मिळते. या एका श्लोकात गीतेचा संपूर्ण संदेश सामावलेला आहे. एवढे बोलून त्यांनी त्यांचा त्या दिवशीचा पाठच संपवला. तो श्लोक असा आहे –                        

गीता २.३ : क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्‌‍ त्वयि उपपद्यते |

                            क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥

गीतार्ई २.३ :  निवर्य तू नको होऊ न शोभे हे मुळी तुज

                  भिकार दुबळी वृत्ती सोडुनी ऊठ तू कसा 

ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक-संचालक डॉ. वि. वि. पेंडसे म्हणजेच कै. आप्पांच्या एका भाषणाचा शेवटही याच श्लोकाच्या पहिल्या ओळीने झाला आहे. (राष्ट्रदेवो भव, दुसरी आवृत्ती, पान ११८ ) कै. आप्पांनी (डॉ. पेंडसे यांचा उल्लेख या व पुढील निरूपणांमध्ये आप्पा असाच येईल.) पहिल्या ओळीचे केलेले भाषांतर या लेखाचे शीर्षक म्हणून दिले आहे. त्या भाषणाच्या शेवटच्या भागात आप्पांनी एका संभाषणाचा उल्लेख केला आहे.  ते म्हणतात, “काल शिक्षक कक्षात गेलो. एका प्राध्यापिकेशी बोललो. त्यांनी लिहिलंय की मला मर्यादा आहेत. अमुक प्रकारे काम करता येईल असे नाही. त्यांना म्हटलं की कुणी सांगितलं तुमच्याकडे ताकद नाही म्हणून? तुमच्याकडे मोठी शक्ती आहे. मनात आणलं तर तुम्ही मोठं कार्य करू शकाल. व्योम व्यापून टाकू अशी आकांक्षा धरा.”

आपल्याकडे ताकद नाही, आपल्याला मोठे कार्य जमणार नाही असे वाटणे, म्हणजेच क्लैब्य असणे, निवर्यता असणे किंवा भीरुता, भित्रेपणा, असणे. ‌‘मा स्म गमः‌’ म्हणजे त्या वाटेला जाऊ नकोस. भीरुतेच्या – मला जमणार नाही, अशा वृत्तीच्या – वाटेला जाऊ नकोस. हेच कै. आप्पा ‌‘कडवे, शूर व्हा‌’ असे सकारात्मक भाषेत सांगतात. ‌‘न त्वयि उपपद्यते‌’ म्हणजे तुला शोभत नाही. ‌‘मला जमणार नाही‌’ असे वाटणे शोभत नाही. हेच सकारात्मक भाषेत ‌‘व्योम – आकाश – व्यापून टाकू अशी आकांक्षा धरा‌’ असे सांगितलेआहे. क्लैब्य म्हणजेच क्षुद्र हृदयदौर्बल्य म्हणजेच भिकार दुबळी वृत्ती. ती टाकून द्या. आधी, युद्ध करणार नाही असे म्हणणारा अर्जुन गीता सांगून झाल्यावर युद्धाला सज्ज झाला. म्हणून या सुरुवातीच्या श्लोकातच गीतेच्या संदेशाचे सार आले आहे असे विवेकानंद म्हणतात. प्रबोधकांनी देखील हेच सार आपल्यामध्ये ठासून भरायचे आहे. ‌‘रूप पालटू देशाचे‌’ अशी मोठी आकांक्षा ठेवा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ‌‘उठा! कामाला लागा!‌’

या श्लोकात अर्जुनाला उद्देशून ‌‘परंतप‌’ असे संबोधन वापरले आहे. सूर्याचा ताप वाढला की उन्हातून दूर सावलीत जावेसे वाटते. आपल्या पराक्रमाने जो ‌‘पर‌’ म्हणजे शत्रूंना ताप देतो, पळून जायला लावतो, तो परंतप. अर्जुन असा होता. ‌‘लढू कसा?‌’ असे म्हणायचे त्याला काही कारण नाही याची आठवण मुद्दाम परंतप हे संबोधन वापरून कृष्ण करून देतो आहे. कै. आप्पाही विविध वैचारिकांमध्ये अशीच आठवण करून देत असत. ते म्हणतात “आपण वाघ-सिंहांच्या कुळात जन्माला आला आहात. मग आपण पुरुषव्याघ्र होऊन दाखवा. पुरुषसिंह होऊन दाखवा” हेच एका पद्यातही सांगितले आहे. “गिरिकुहरातिल गर्द बनातिल सिंहाच्या छाव्यांनो, तुमच्या शुभकर सामर्थ्याची आज प्रचीती द्या.”