परिवर्तन का व कसे? (भाग १)
लेख क्र. ७ ११ जून २०२५ मागील दोन लेखात आपण ‘वटपौर्णिमा व वटसावित्री व्रत’ याविषयी माहिती बघितली व आजच्या काळानुसार व्रतात काय व कसे बदल आवश्यक आहेत ते बघितले. परिवर्तनाच्या या हेतूला अनुसरून श्री. यशवंतराव लेले व प्रज्ञा जेरे (अंजळ) यांनी ‘धर्मविधींच्या अंतरंगात’ हे पुस्तक लिहिले व ज्ञान प्रबोधिनीने प्रकाशित केले. या पुस्तकातील ‘परिवर्तन का व कसे?’ हा भाग येथे देत आहोत. धार्मिक विधीतील परिवर्तन केव्हा व कधीपासून सुरु झाले? त्यासाठी कोणी कोणी काम केले? धर्मनिर्णय मंडळाची स्थापना कशी व कधी झाली? इ. प्रश्नांचे विवेचन या लेखात आले आहे. हा परिवर्तनाचा विषय समजावून घेतला की नंतर आपण तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. धर्मामधे स्थल-कालातीत तत्त्वांप्रमाणेच, स्थलकालसापेक्ष सत्यासारखे तत्त्व एका ठिकाणी लागू असून अन्य कोठे ते लागू पडत नाही असे नाही याला म्हणतात ‘स्थलनिरपेक्ष’. अमक्या वेळी हे तत्त्व योग्य आणि अन्य वेळी अयोग्य याचा अर्थ ‘कालनिरपेक्ष’. आचारधर्म मात्र जागोजागी, वेळोवेळी बदलताना दिसतात व तसे ते पुढेही दिसणार याचा अर्थ ‘स्थलकालसापेक्ष’. धर्मविधींमधे स्थलकालानुसार परिवर्तन करण्याची काय आवश्यकता आहे, हे परिवर्तन करण्याला आधार कोणता व ते कसे केले पाहिजे हे समजावून घेतले पाहिजे. धार्मिक क्षेत्रामधे परिवर्तनीयतेची परंपरा महाराष्ट्रात ज्ञानदेवांच्या काळापासून चालत आलेली आहे. गीतेसारख्या ग्रंथाचा मायमराठीत सर्वजनसुलभ असा आविष्कार करून ज्ञानदेवांनी या परंपरेचा पाया घातला आहे. त्यांच्या अवती-भवती अठरापगड जातींच्या संतांची मांदियाळी उभी राहिली व त्यात स्पृश्यास्पृश्यतेची रूढी अर्धमेली होऊन गेली. मग संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, इत्यादींनी मराठी भूमीवर औदार्याचे, माणुसकीचे गंगाजल शिंपून तिची मशागत केली. समर्थ रामदासांनी भेटो कोणी एक नर । धेड महार चांभार । राखावे तयाचे अंतर। या नाव भजन ।। (समर्थ रामदासांच्या सवाया) अशा शब्दांत भक्तिमार्गातील समतेचा डांगोरा पिटला, तर छळाबळाने बाटवलेल्यांना पुनश्च स्वधर्मात स्वीकारून छत्रपती शिवरायांनी आणखी पुढचे पाऊल टाकले. पेशवाईत राजकीय प्रगती झाली पण काहीसे सामाजिक विषमतेचे दृश्यही दिसले. इंग्रज राजवटीच्या आरंभीच श्री. बाळशास्त्री जांभेकरांनी धर्मभ्रष्टांना पुन्हा स्वधर्मात घेण्यास प्रारंभ केला. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापून नवीन दृष्टीने, नवीन पद्धतीने धर्मसंस्कार करण्यास सुरुवात केली. धर्मसंस्कारांमधे त्यांनी लोकभाषेचा वापर करून सुलभता आणली. पुरोहित वर्गाचे महत्त्व कमी करून समतेची चळवळ उभी केली. न्यायमूर्ती रानडे यांनी संतपरंपरेचा धागा पकडून पारमार्थिक लोकशाहीची परंपरा धर्मक्षेत्रात आणण्यासाठी प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि दयानंद सरस्वतींच्या परिवर्तनवादी आर्य समाजासही पाठिंबा दिला. श्री शाहू छत्रपतींनीही दयानंद सरस्वतींना मोठा पाठिंबा दिला. कोल्हापुरात सत्यार्थप्रकाश या दयानंद सरस्वतींच्या ग्रंथाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले. धार्मिक बाबतीतील सुधारणांचे प्रयत्न अशाप्रकारे चालू असतानाच पाश्चात्य पद्धतीने शिक्षण घेतलेल्या काही नवशिक्षितांनी भारतीय संस्कृती, धर्म, आचार-विचार यांना कनिष्ठ किंवा अगदी टाकाऊ समजण्यास सुरुवात केली होती. तरीही काळानुसार आवश्यक ते फेरबदल करून योग्य तो आचारधर्म चालू ठेवण्याचे औचित्य दाखवणारा वर्गही समाजात होता. धर्मातील दोन प्रमुख भाग म्हणजे तात्त्विक धर्म आणि आचारधर्म. सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती, इ. तत्त्वे स्थलकालातीत असली तरी ती तत्त्वे व्यवहारात उतरवण्याची साधने म्हणजे आचारधर्म हा स्थलकालसापेक्षच असतो हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील परिवर्तनवादी पंडितांनी १९३४ मधे ‘तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदे’ची स्थापना केली. या परिषदेचे बहुतेक संस्थापक हे हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास केलेले व काहीजण इंग्रजीचाही अभ्यास केलेले असे होते. त्यांचा मुख्य विचार असा – ‘हिंदू धर्मात अनेक स्मृती रचल्या गेल्या याचे कारण त्या त्या परिस्थितीला आवश्यक असे बदल मूळच्या आचारधर्मात करावे लागतात. (उदा. इस्लाम भारतात आल्यानंतर जबरदस्तीने धर्मांतरित झालेल्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्यासाठी देवल स्मृतीचा जन्म झाला.) आचारधर्मातील परिवर्तनाची ही आवश्यकता लक्षात घेऊन आजच्या काळातही ते करण्यात आले पाहिजे.’ समाजामधे अशा परिवर्तनवादी लोकांप्रमाणेच स्थितिवादी म्हणजे ‘जुने मोडू नये आणि नवे करू नये’ असे म्हणणारेही काही लोक असतात. त्यांना सनातनी म्हणतात. त्यांची धर्मनिष्ठा खोटी नसते. आपल्या धर्ममतांशी ते प्रामाणिकच असतात. तसे लोक त्या काळीही होते. या सनातनी मंडळींनी आपल्या धोरणांत काही लवचिकता ठेवली असती तर महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा अधिक परिवर्तन होणे शक्य होते. या काळी सनातनी मतांचे समर्थन करणारे लेखन सुरू झाले. हे लेखन परिवर्तनास प्रतिकूल होत आहे हे पाहून पं. नारायणशास्त्री मराठे यांनी धर्मकोशाची रचना करण्याचे ठरवले. पं. नारायणशास्त्री मराठे हे परिवर्तनवादी पक्षाचे होते व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे त्यांचे उजवे हात! इ.स. १९२७ मधे प्रयाग येथील कुंभमेळ्याच्या प्रसंगी पं. मदनमोहन मालवीय यांनी बोलावलेल्या पंडित परिषदेस पं. नारायणशास्त्री मराठे व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे उपस्थित राहिले व त्यांनी शास्त्रचर्चेत परिवर्तनवादी पक्षाची भूमिका समर्थपणे मांडली. श्री. रा. स. भागवतांच्या पुढाकाराने ठाणे येथे ७, ८ एप्रिल १९३४ या दोन दिवशी तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेचे प्रथम अधिवेशन भरले. म. म. पाठकशास्त्री हे अध्यक्षस्थानी होते. या पहिल्याच परिषदेने ‘वेद’ हे अपौरुषेय नव्हेत तर मनुष्यकृतच असल्याचा स्पष्ट निर्णय केला. पुणे येथे गीताधर्म मंडळात परिषदेचे दुसरे अधिवेशन भरले ते २७ डिसेंबर १९३५ या दिवशी! याच्या आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे अस्पृश्यता निवारणावर या अधिवेशनात विशेष भर देण्यात आला. डॉ. कुर्तकोटी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ४ ते ६ जून १९३६ रोजी नगर येथे स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन झाले. या परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. नानासाहेब सप्तर्षी यांनी आपल्या भाषणात, ‘जुनी परंपरा न सोडता आजच्या आचारांत फरक कसा घडवून आणावा याचा विचार करण्यासाठी हे अधिवेशन भरवण्यात आले आहे’ असे सांगितले. समाजधारणा होऊन उत्कर्ष साधावा यासाठी श्रुती, स्मृती आणि सदाचाराचे अनुषंगाने आचार परिवर्तनाचे धोरण नगरला निश्चित केले गेले. १६ ऑक्टोबर १९३८ या दिवशी लोणावळ्यात चौथे अधिवेशन पार पडले. त्याचेही अध्यक्ष स्वामी केवलानंदच होते. या अधिवेशनात जे स्वागतगीत म्हणण्यात आले ते मोठे अर्थपूर्ण होते – श्रुती – स्मृतींचे मंथन करुनी, तत्त्वामृत जे देति अम्हातें, समाजधारण, समाजोन्नती, ध्येय हेच धर्माचे मानिति । धर्मां साधन मानुनि करिती, परिवर्तन जे आचारांचे, तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी, नाम असे हे सार्थ तयांचे ।। या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात स्वामी केवलानंद सरस्वतींनी परिवर्तनवाद्यांच्या एकत्र काम करण्याच्या आवाहनास प्रतिसाद न देता सनातन्यांनी ‘वर्णाश्रम-स्वराज्य-संघा’ची स्थापना करून सवता सुभा स्थापल्याबद्दल व त्यात परिवर्तनवाद्यांना प्रवेश देऊ नये असे ठरवल्याबद्दल खेद व्यक्त केला. यानंतर ‘उपनयनादि-संस्कार’ यावर चर्चा झाली. याच अधिवेशनात तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेने ‘धर्मनिर्णय मंडळ’ हे नाव धारण केले व संस्थेची संक्षिप्त घटना निर्माण करून तिलाही मान्यता देण्यात आली. आता वर्षातून एक अधिवेशन घेण्याची जुनी कार्यपद्धती बदलून वर्षभर कार्यरत राहाण्याच्या हेतूने कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली. १९३९ पासूनच मंडळाचे कार्यवाह तर्कसांख्यतीर्थ पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांनी काम पाहिले. यांचे पूर्ण नाव रघुनाथ गोपाळ कोकजे. ते वाईच्या प्राज्ञपाठशाळेत शिकले. वेदशास्त्रसंपन्न नारायणशास्त्री मराठे यांचे ते विद्यार्थी. पुढे ते लोणावळ्यातील कैवल्यधाम या योगशास्त्रासाठी काम करणाऱ्या संस्थेत तत्त्वज्ञान हा विषय शिकवत. अध्यापन, ग्रंथसंशोधन याबरोबर आयुष्यभर त्यांनी धर्म निर्णय मंडळाच्या प्रचाराचे, संस्कार कार्याचे काम केले. यांनी ठिकठिकाणच्या आपल्या भाषणांमधून सामूहिक प्रार्थनेच्या प्रचारास प्रारंभ केला. उपनयन, विवाह व संध्येची छोटी पुस्तिका प्रकाशित झाली. अशा प्रकारे विचारमंथनास कृतीचीही जोड मिळू लागली. यानंतरच्या अधिवेशनांमधे शास्त्रचर्चेसाठी एक सत्र राखून ठेवून खुल्या सत्रात सर्वसामान्य जनतेस मंडळाची भूमिका
परिवर्तन का व कसे? (भाग १) Read More »