संस्कृत संस्कृति संशोधिका – संत्रिका

२२ जुलै १९७५ ते २२ जुलै २०२५

वाचस्पती विनायक विश्वनाथ पेंडसे तथा आदरणीय आप्पा पेंडसे यांनी पुण्यात ज्ञान प्रबोधिनीची स्थापना इ. स. १९६२ साली केली.  ती. आप्पांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या दूरदृष्टीतून हळुहळू प्रबोधिनीचे रोपटे घट्ट रुजले, त्याला एकेक फांदी फुटत गेली व ते आता उत्तम बहरले आहे. प्रबोधिनीच्या स्थापनेनंतर  २२ जुलै १९७५ या दिवशी ‘संस्कृत संस्कृति संशोधिका’ म्हणजेच ‘संत्रिका’ या नावाने एका नव्या विभागाची स्थापना झाली. पुण्यातील काही मोजक्या ज्येष्ठ संस्कृत विद्वानांच्या उपस्थितीत, प्रसिद्धी व संशोधन अशा दोन्ही स्तरांवर संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीचा विकास व्हावा; त्याद्वारे समाजात संवाद सेतू बांधले जाऊन सामाजिक एकात्मता साधता यावी यासाठी या विभागाची निर्मिती झाली.  या नव्याने उदयास आलेल्या विभागाचे संगोपन तिच्या वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यातून करण्याचे काम प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर,जे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते व प्रबोधिनीशी सुरुवातीपासून जोडले गेले होते, यांच्याकडे सोपविण्यात आले. तीन ‘सं’ म्हणून ‘संत्रिका’ याचा अर्थ संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीच्या विविध आयामांचा अभ्यास व संशोधन होईल.

आज पन्नास वर्षानंतर ‘संत्रिका’ विभाग लोकांच्या हृदयात प्रेम, कौतुक व आदराचे स्थान मिळवत आहे. प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर, यांनी बंगाली भाषा वर्ग, संस्कृतमधील शुभेच्छापत्र, संस्कृत साहित्य चर्चा, सौर कालदर्शिका, पारशी धर्मग्रंथ ‘अवेस्ता’ अशा उपक्रमातून सुरुवातीला केलेल्या कामातून संत्रिका विभागाचे काम मूळ धरू लागले होते. प्रा. यशवंतराव लेले व प्रा. विश्वनाथ गुर्जर यांनी हे कार्य बहुआयामी केले, विविधांगी कामाच्या कल्पना फुलवल्या. राष्ट्रीय एकात्मता विषयावरील मुक्त चर्चेस वाव देणारे ‘राष्ट्रवाद अभ्यास मंडळ’ किंवा सर्वांसाठी खुला असलेला ‘जनतंत्र उद्बोधन मंच’, अथवा प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांनी ‘आंतरविद्याशाखीय अभ्यास’ समजून घ्यावा यासाठीची ‘मासिक वैचारिक योजना’ अशा उपक्रमांमुळे विविध क्षेत्रातील व विविध विचारसरणींचे सय्यद भाई, असगरअली इंजिनिअर यांच्यासारखे ज्येष्ठ सदस्य संत्रिकेच्या मंचावर आपले विचार खुलेपणाने मांडून गेले. अलीकडच्या काळात अन्य धर्मीय समाजाला समजून घेण्यासाठी कुरआन अभ्यास, मुस्लिम महिलांना शिक्षणामुळे मिळणारी प्रेरणा व संधी याविषयावरील मुलाखती असेही उपक्रम झाले.

याप्रकारच्या वैचारिक घुसळणीतून ‘सामाजिक शास्त्र अध्ययन केंद्र’ असे आंतरविद्याशाखीय काम आता स्वतंत्रपणे सुरू झाले आहे.

संत्रिका विभागाचा पौरोहित्य उपक्रम – महाराष्ट्रातील धर्मशास्त्राचे विद्वान अभ्यासक पं. नारायणशास्त्री मराठे, तर्कसांख्यतीर्थ पं. रघुनाथशास्त्री कोकजे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इत्यादींनी इ.स. १९३४ मध्ये सुरू केलेल्या धार्मिक विधीतील कालानुकूल परिवर्तनाचा ‘धर्म निर्णय मंडळाचा’ वारसा संत्रिकेने नुसताच पुढे नेला असे नाही तर त्यात कालोचित मूल्यांची भर घालून तो अधिक समयोचित केला. बुरूड समाजातील सामूहिक विवाह, अंध -अपंग वधू वर विवाह, परीट समाजातील महिलांसाठी कार्यक्रम, सोमवंशीय क्षत्रिय समाजातील सामूहिक उपनयन संस्कार, अशा सर्व समाजगटातील सामूहिक व कौटुंबिक संस्कारांत संत्रिकेचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी अजून बरेच प्रयत्न करायचे आहेत. वटपौर्णिमा, मार्गशीर्षातील गुरुवार, विहीर लोकार्पण विधींच्याद्वारे नवीन विचार देणारे सामाजिक सामूहिक संस्कार निर्माण झाले. देश-विदेशात आता ज्ञान प्रबोधिनीची संस्कार पद्धती पोहोचली आहे. परदेशस्थ भारतीय दूरस्थ (online) पद्धतीने या संस्कारसेवांचा लाभ घेतात. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजगटातील महिला व पुरुषांना ‘स्वयं पौरोहित्य’ करता यावे यासाठी दिले जाणारे प्रशिक्षण.  

ग्रंथालय व प्रकाशने – वेद, पुराणे, कोश, विविध भाषा व लिपीमधील रामायणे, असे सात हजारपेक्षा अधिक पुस्तके असलेले समृद्ध ग्रंथालय संत्रिकेत आहे. संस्कार विधींच्या पोथ्या, विविध अभ्यासकांच्या संशोधनातून तयार झालेली ग्रंथसंपदा उदा:- ‘गरुड पुराणातील आयुर्वेद’ किंवा ‘भूकंप’ (प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंपाबाबतचे संदर्भ), ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ या पुस्तकाचे १ ते १० भाग अशी संत्रिकेची प्रकाशने आहेत. दोन सदस्यांच्या ‘भारतीय संस्कृतिमधील कासव’ व ‘श्राद्धामधील दान संकल्पना’ या विद्यावाचस्पती (Ph.D) साठीच्या संशोधनाचे काम संत्रिकेत पूर्ण झाले आहे.

संत्रिका विभागाला आता २२ जुलै २०२५ ला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने गेल्या पन्नास वर्षातील कामाचे निवडक दर्शन पुढील ५० दिवस लेख, छायाचित्रे, ध्वनीमुद्रित व्याख्याने याद्वारे आपल्यासमोर आणत आहोत. आपला प्रतिसाद, सूचना यांचे स्वागत आहे.

संत्रिका फेसबुक पेजला जरूर फॉलो करा.

https://www.facebook.com/share/1Fpk12pa7z/?mibextid=qi2Omg

वाच. मनीषा शेटे

संत्रिका