सौर कालदर्शिकेची कथा

लेख क्र. १३

१७/६/२०२५

धर्मनिर्णय मंडळाचे संत्रिकेने जे जे काम स्वीकारले त्यात आजही सवय नसेल तर पाहिल्यावर नक्की गोंधळून जाणार असा एक विषय म्हणजे राष्ट्रीय सौर कालदर्शिका! संत्रिकेमध्ये दर वर्षी आवर्जून सौर कालदर्शिका प्रकाशित केली जाते ज्याच्यामधे सौर दिनांक मोठ्या आकड्यात व ग्रेगोरियन दिनांक लहान आकड्यात असतात. संस्काराच्या चौकशीसाठी आलेले यजमान दिनांक सांगण्यासाठी भिंतीवरील कालदर्शिका बघतात व प्रश्नांकित चेहरा करतात. पुरोहित काय ते समजून घेतात व शंका निरसन करतात.

स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने १९५२ साली पंचांग समिती नियुक्त केली. समितीने विद्वानांसोबत चर्चा करून सौर कालगणना करावी हे निश्चित केले. ह्या निर्णयानुसार ‘धर्मनिर्णय मंडळ’ या संस्थेने सौर कालदर्शिका तयार करण्याचे काम हाती घेतले. संस्थेने वेगवेगळे प्रयोग करून सौर कालदर्शिका तयार केली. १९६२ पासून धर्मनिर्णय मंडळ व ज्ञान प्रबोधिनी या संस्था एकत्रितपणे कालदर्शिकेचे काम करीत होत्या. कालदर्शिका लोकांना सवयीची व्हावी, तिचा वापर वाढावा म्हणून दोन्ही संस्थांनी अथक परिश्रम घेतले. पुढे पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांच्या मृत्यूनंतर ज्ञान प्रबोधिनीने हा कार्यभार सांभाळला आणि अजूनही ह्या कालदर्शिकेचा उपयोग संस्था करीत आहे.

सौर कालदर्शिकेच्या प्रचार आणि प्रसारासाठी ज्ञान प्रबोधिनीने केलेल्या सुरुवातीच्या प्रयत्नांचा इतिहास अतिशय रंजक आहे. मा. सुभाषराव देशपांडे, वाच. अशोकराव निरफराके, वाच. लताताई भिशीकर अशा प्रबोधिनीच्या खंद्या कार्यकर्त्यांनी या प्रसाराची धुरा पेलली होती. आदरणीय वाच. वि. वि. तथा आप्पा पेंडसे यांनीही यासाठी पत्रलेखन केलेले दिसते. सौर कालदर्शिकेसंबंधी कै. प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांचे १९७८ सालातले एक जुने आवाहन पत्रक सापडले. त्या पत्रकात सौर कालदर्शिकेची प्राथमिक सिद्धता, तिच्यात झालेल्या सुधारणा, वापर इ. मुद्दे मांडले आहेत. ते जाणून घेण्यासाठी हे आवाहन पत्र जरूर ऐकावे.