
संत्रिका
जाति पंथ खुलवती संस्कृती भेदा नाही वाव | परस्परांना पूरक होईल एकत्वाचा भाव ||
मातृभूमी ही जगति साऱ्या वंदनीय करण्या |संस्कृत संस्कृती संशोधनपर व्यासाची स्थापना ||
वाचस्पती विनायक विश्वनाथ पेंडसे तथा आदरणीय आप्पा पेंडसे यांनी पुण्यात ज्ञान प्रबोधिनीची स्थापना इ. स. १९६२ साली केली. ती. आप्पांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या दूरदृष्टीतून हळुहळू प्रबोधिनीचे रोपटे घट्ट रुजले, त्याला एकेक फांदी फुटत गेली व ते आता उत्तम बहरले आहे. प्रबोधिनीच्या स्थापनेनंतर २२ जुलै १९७५ या दिवशी ‘संस्कृत संस्कृति संशोधिका’ म्हणजेच ‘संत्रिका’ या नावाने एका नव्या विभागाची स्थापना झाली. पुण्यातील काही मोजक्या ज्येष्ठ संस्कृत विद्वानांच्या उपस्थितीत, प्रसिद्धी व संशोधन अशा दोन्ही स्तरांवर संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीचा विकास व्हावा; त्याद्वारे समाजात संवाद सेतू बांधले जाऊन सामाजिक एकात्मता साधता यावी यासाठी विभागाची निर्मिती झाली. या नव्याने उदयास आलेल्या विभागाचे संगोपन तिच्या वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यातून करण्याचे काम प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर,जे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांच्याप्रमाणे प्रा. महाशब्दे, डॉ. सुनितीताई दुबळे यांनी केले. १९९० पासून पुढे ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य प्रा. यशवंतराव लेले व नंतर संस्कृत व अरविंदांचे अभ्यासक प्रा. विश्वनाथ गुर्जर यांनी हे कार्य बहुआयामी केले, विविधांगी कामाच्या कल्पना फुलवल्या. विभागाच्या नावात तीन ‘सं’ येतात म्हणून ‘संत्रिका’ असे लघु नाव झाले.




पोथ्या
हिंदू समाजातील अनेकांना विविध निमित्तांनी घरात अथवा संस्थेत काही धार्मिक संस्कार करवून घेण्याची गरज वाटत असते. हे संस्कार त्यातील अर्थ समजून घेऊन व्हावेत, नवशिक्षितांना संस्कारामधील उदात्त आशय कळावा, जे लोक कर्मकांडास कंटाळले आहेत त्यांना आधुनिक काळाला योग्य असे महत्त्वाचे पण सुटसुटीत विधी करता यावेत या हेतूंनी ज्ञानप्रबोधिनीने ‘धर्मनिर्णय मंड़ळ, लोणावळा’ यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विविध संस्कारांच्या (मंत्र आणि अर्थ यांनी युक्त अशा) पोथ्यांची रचना केली आहे.
लक्ष्मीपूजन, वेदपूजन, घटस्थापना पोथ्या पाहण्यासाठी खाली click करा.
पौरोहित्य
ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने पौरोहित्य करू इच्छिणार्या अथवा केवळ ही पद्धत समजून घेण्याची इच्छा असणार्या स्त्री-पुरूषांसाठी ज्ञानप्रबोधिनीत १९९० सालापासून पौरोहित्य प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत. या वर्गांमधून प्रशिक्षित झालेल्या महिला आणि पुरूष-पुरोहितांचा एक संच ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने संस्कारविधी करण्याचे कार्य करीत आहे. त्या शिवाय या वर्गामधून प्रशिक्षित झालेले अनेक स्त्री-पुरूष स्वयंपुरोहित म्हणून स्वत:च्या घरातील संस्कार स्वत:च ज्ञानप्रबोधिनीच्या पोथ्यांच्या आधारे करीत आहेत.
रामायण संग्रह
रामायणाचा प्रवास भारतभर होणे अगदी साहजिकच होते.राम चरित्रात अयोध्या ते श्रीलंका असा प्रवास दृष्टीपथात येतो. सर्व भारतीय बोली भाषा, लिखित भाषा या पलीकडे उड्डाण करीत रामकथा भारताबाहेर पोहोचली जपानी, चीन – Mandarin, थाई, कावि,उर्दू, अरेबिक,फ्रेंच भाषांमध्ये कधी जशीच्या तशी तर कधी विस्मयचकित करण्याइतकी बदलत गेली.
ज्ञान प्रबोधिनी संस्कृत संस्कृती संशोधिकेमध्ये विविध भाषा, लिपी व देशांच्या मधील सुमारे २००० रामायणे आहेत. डॉ. ग. ना. साठे यांनी भेट दिलेला मोठा संग्रह यामध्ये आहे.
मा. यशवंतराव लेले यांचे निवडक लेख

मा. यशवंतराव १९६२ पासून ज्ञान प्रबोधिनीत वेगवेगळ्या कामांमध्ये सहभागी होते. त्यांनी प्रबोधिनीद्वारा आयोजित अनेक उपक्रम व दौर्यांमध्ये सहभाग घेतला व नेतृत्त्वही केले. काश्मिर, पूर्वांचल, बिहार या प्रदेशांमध्ये तिथल्या परिस्थितींमुळे दौरे करून मदतकार्य केले. त्यांनी सकवार या आदिवासींच्या गावाचे विकसन, देवदासी चळवळ, दारूबंदी आंदोलन अशा अनेक समाजसुधारणेच्या कामात भाग घेतला. प्रा. रामभाऊ डिंबळे, डॉ. भीमराव गस्ती अशा अनेकांना घडविण्यात, मार्ग दाखविण्यात यशवंंतरावांचा हात होता. १९८७-२००२ ते संत्रिकेचे विभागप्रमुख होते. तेव्हा त्यांनी देहदान, विवाहदिन, वानप्रस्थाश्रम दीक्षा इ. आशयघन पोथ्यांची निर्मिती केली व असंख्य संशोधन-प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन केले. संत्रिका विभागप्रमुख या पदावरून जरी ते निवृत्त झाले होते तरी ते कायम मार्गदर्शक म्हणून सगळ्यांसोबत कामात उभे असायचे आणि अजूनही असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व गंभीर, ध्येयवादी तरी मार्मिक आहे.
मा. विश्वनाथ गुर्जर यांचे निवडक लेख

प्रा. विश्वनाथ गुर्जर – ज्ञान प्रबोधिनीचे विद्यार्थी व तडफदार कार्यकर्ते, संस्कृतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ. त्यांनी युवकविभागातील विविध जबाबदार्या सांभाळल्या आहेत. त्यांना खेळाचीही लहानपणापासून आवड होती. खो-खो, लंगडी, व्हॉलीबॉल हे त्यांचे आवडते खेळ होते. त्यांनी ईशान्य भारत, कोयनाभूकंप असे अनेक अभ्यास व आपत्तिनिवारण दौरे केले. ते शास्त्रीय संगीत शिकले आहेत, त्यामुळे ते प्रशालेत संगीत-शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी प्रबोधिनीतील १९७५ पासून संस्कृत अध्यापक, प्राचार्य, सहकार्यवाह, पौरोहित्य प्रशिक्षक, संत्रिका विभाग प्रमुख ही पदे सांभाळली. याशिवाय टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे संस्कृतचे अध्यापन केले. योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानाचे ते अभ्यासक आहेत. समग्र जीवन दर्शन, राष्ट्रवाद, आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे मार्गदर्शक. संस्कारांमागील अर्थपूर्णता, प्रतीकात्मकता समजून घेण्यासाठी पुरोहितांनी सातत्यपूर्ण अभ्यास करायलाच हवा असे सांगणारे विसुभाऊ!