मोठं होणं!

मा. यशवंतराव लेले

सर्वजण मोठे होत असतात. मनात असो की नसो, प्रत्येक दिवशी प्रत्येक जण मोठा होतच असतो! हे वयानं मोठं होणं सहजच असतं! त्याची जाणही फारशी आपल्याला नसते. वाढदिवस साजरा करणाऱ्यांना त्याची जाणीव बहुधा राहते. इतरांना त्याचं भान बरेच उशिरा येते. पण ज्ञानानं मोठं होणं हे मात्र प्रयत्नसाध्य असतं. त्यासाठी कष्ट सोसण्याची सिद्धता लागते. त्यासाठी शाळा, महाशाळा असते. ज्ञानदेव वयाने लहान असूनही ज्ञानानं केवढे तरी मोठे झाले. कुठल्या शाळेत न जाताच ते ज्ञानेश्वर झाले! ते निवृत्तीनाथांपुढे विनीत होऊन भोवतालच्या विश्वात निरीक्षण करीत गेले, चिंतन करीत गेले आणि देववाणीतील गीता त्यांनी नऊ हजार ओव्यांमध्ये सामान्यजनांसाठी लोकभाषेत आणून ठेवली. नामदेव, चोखोबा, मुक्ताबाई, जनाबाई हे सारे ‘संत’ पदवीला पोचले खरे; पण त्यांनी कुठे शाळा-महाशाळेतून तर दाखला घेतल्याचं ऐकिवात नाही. ते वारकरी विद्यापीठाचे पदवीधर म्हणावेत हवे तर! जगद्‌गुरू श्री तुकाराम महाराज हे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत इत्यादी ग्रंथांच्या अभ्यासानं येवढे ज्ञानी झाले की ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वहावा भार माथा’ असे ते छातीठोकपणे म्हणू शकले. समर्थ रामदास जांबहून निघाले ते नाशिकला पोचले. घरी ज्येष्ठांकडून काही शिक्षण झालेलं; पण बारा वर्षे कठोर तपश्चर्या करून त्यांनी ज्ञान मिळविलं आणि १२ वर्षे भारतभ्रमण करून त्यांनी अनुभवाची, निरीक्षणाची जोड ग्रांथिक ज्ञानाला दिली. मग ते ज्ञानी झाले, समर्थ बनले.. देशाटनानं त्यांचं ज्ञान परिपूर्ण होत गेलं.

अनौपचारिक व औपचारिक शिक्षण ! – रमा अनंत डोंगरे ही मुलगी वडिलांच्या मांडीवर बसून शास्त्रचर्चा ऐकत ऐकत मोठी झाली. दक्षिण भारतात दुष्काळानं ५० लक्ष लोकांचा बळ घेतलेला असताना उत्तराभिमुख होऊन ही मुलगी भावासह चार हजार किलोमीटर पायी प्रवास करीत बंगालमध्ये पोचली. ठिकठिकाणी संस्कृतमध्ये बोलत, समस्यापूर्ती करीत करीत डाक्का येथे पोचलेल्या या मुलीला बंगालमधील पंडितांनी, तिचे ज्ञान पाहून ‘पंडिता’ हा किताब दिला. आई-वडिलांविना पोरकी झालेली ही मुलगी ‘पंडिता रमाबाई’ म्हणून गौरविली गेली ती ‘केल्याने देशाटन । पंडितमैत्री सभेत संचार’ या मार्गाने! एकच सदरा रात्री धुवून सकाळी पुन्हा घालणारे आगरकर एम. ए. झाले, प्राध्यापक बनले. सुधाकर पत्राचे संपादक होऊन निरपेक्षपणे ज्ञानवितरण करत राहिले, ते डेक्कन कॉलेजात मिळवलेल्या ज्ञानधनामुळे ! डॉ. भीमराव आंबेडकरांनी अमेरिकेत जाऊन पानाच्या तुकड्यावर भूक भागवत अठरा अठरा तास अभ्यास केला. कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविली. पोटास चिमटा घेऊन दोन हजार ग्रंथ वाचण्याचा आनंद मिळविला ! २४ पेट्या ग्रंथ घेऊन ते भारतात परतले, भारतरत्न ठरले.

परिस्थितीवर मात करणारे! – आपण परिस्थितीमुळे ‘शिकणे शक्य नाही’ असे म्हणतो पण प्रतिकूल स्थितीत पौरुषाने, पराक्रमाने अनुकूल करून घेत विविध क्षेत्रांत मोठी झालेली ही सारी माणसं! तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, त्यांचे गुरू केवलानंद सरस्वती, हे अशाच प्रकारे मोठे झाले, शाळेविना ! घरोघरी भिक्षा मागून वार लावून ज्यांनी शिक्षण पुरे केले अशी मोठी माणसे काही थोडी नाहीत. डॉ. वि. रा. करंदीकर हे मराठीचे प्राध्यापक, नामवंत ग्रंथलेखक, अगदी ‘ओम् भवति भिक्षां देहि’ म्हणून कष्टाने शिकले. पुणे विद्यापीठातील ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख झाले. तराळकीची काठी घेऊन गावकीची सारी कामे ज्यांनी १२ व्या वर्षी सुरू केली त्या शंकर खराताने प्रेतवस्त्राचा सदरा मिळविण्यातही आनंद मानला ! अर्धपोटी राहूनही अभ्यास केला. परिणामी ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. एक नामवंत लेखक म्हणून गौरविले गेले. एपीजे अब्दुल कलाम म्हणजे एका कोळ्याचा मुलगा, वर्तमानपत्रे विकणारा मुलगा, जिद्दीने शिकत गेला. परिस्थितीवर मात करत करत विश्वविख्यात अवकाश शास्त्रज्ञ झाला. भारताचा राष्ट्रपती झाला व २०२० मध्ये भारतास जगातील महासत्ता बनवण्याचं भव्य स्वप्न त्यानं आपल्या पिढीला दिलं आहे!

पाणक्याचं काम करणाऱ्या, भावाच्या कृपेवर शिकणाऱ्या, एका मुलानं गरिबीवर मात करून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं. वर्गमित्रांनी ‘बॅरिस्टरचं कारटं’ म्हणून हिणवलं, पण ‘हिंमत कभी ना हारो’ हा मंत्र हृदयी धरून या मुलानं वैद्यकीची पदवी तर मिळवलीच; पण संशोधनाच्या क्षेत्रातही त्यांनी जगभर नाव कमवलं ‘डॉ. हिंमतराव’ बावीसकर हे नाव सार्थ करीत कोकणात यशस्वी डॉक्टर म्हणून गाजत आहेत ! हॉटेलमधील कपबशा विसळता विसळता, न्यायालयात आरोपींची नावे पुकारता पुकारता, शिक्षणाचं व्रत चालू ठेवणारा एक सोलापूरचा मुलगा, परिस्थितीवर स्वार होऊन, राजनीतीत प्रविष्ट होऊन मुख्यमंत्री होतो, आंध्रचा राज्यपाल बनतो व आज केंद्रीय मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री म्हणून यशस्वी होतो हे उदाहरण मा. सुशीलकुमार शिंदे यांचं! अजूनही बालकामगार म्हणून राबणाऱ्या मुलांना प्रेरणा देण्यास पुरेसं नाही का?

समाजविकासासाठी व्यक्तिविकसन ! – जन्मापासून गुन्हेगारी म्हणून मस्तकी शिक्का घेऊन आलेला भीमराव ‘चोर, दरोडेखोर’ म्हणवून घेत शांतपणे शिकत राहिला, सोसत राहिला. ‘शिका संघटित व्हा व संघर्ष करा’ हा डॉ. आंबेडकरांचा आदेश शिरोधार्य मानून भीमराव गस्ती बुद्धिमत्तेच्या जोरावर थेट रशियात जाऊन डॉक्टरेट मिळवून आले! पैशाने श्रीमंत होण्याचा, खूप मोठे होण्याचा मार्ग न धरता, नोकरी नाकारून डॉ. गस्ती बेरड रामोशांना संघटित करण्याच्या कामी लागले. देवदासींच्या उत्थानासाठी कटिबद्ध झाले, आणि आज या कामी स्पृहणीय यश त्यांनी हस्तगत केलं आहे ! याला म्हणावं भीमपराक्रम !

शिकणं आई-वडिलांना पसंत नसल्यानं चोरून, रात्रशाळेत जाऊन बूटपॉलिश करून हॉटेलमध्ये कपबशा विसळून उपनगरी गाड्यांमध्ये विक्रेता म्हणून चार पैसे मिळवून नववी रत्तीर्ण झालेला यशवंत कवळे घरून पळून जातो व आश्रमशाळेतून दहावी उत्तीर्ण होतो. मुंबईतील झोपडपट्टीत वाढलेला हा मुलगा अर्धवेळ नोकरी करून बारावी तर होतोच व वैद्यकीय प्रवेश मिळवून डॉक्टर बनतो !

मळलेल्या वाटेविनाही विकास – कोल्हाटी समाजातील एक मुलगी नाचगाण्याची चाकोरी सोडून शिकते, पदवीधर होते व आज गडचिरोलीची निवडणूक अधिकारी म्हणून काम करते आहे. याच किरण मुसळेने गावपंचायतीशी संघर्ष करून आंतरजातीय लग्नही केले! घरात पिढ्यान् पिढ्या सैन्यदलात जाण्याची प्रथा. ती प्रथा मोडता कामा नये म्हणून सुप्रियाला सैन्यात प्रवेश हवा होता. पण स्त्रीला सैन्यदलात प्रवेश नसल्याने ती पोलिसदलात भरती होते. महाराष्ट्रातील उपअधीक्षकपदी दाखल झालेली ती पहिलीच स्त्री! पिंपरी-चिंचवडच्या सहायक पोलीस आयुक्तपदी त्या दाखल झाल्या तेव्हा अनेकांना मोठे नवल वाटले! गुन्हे अन्वेशष विभागातही त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडता आली. या सुप्रिया पाटील यादव मुलींना आदर्श होऊ शकतील.

उड्डाण – आनंद चणे फुटाणे विकण्याचे काम करी, बरोबर भाऊ असे. मोटारी पुसण्याचे कामही दोघं मधून मधून करत. दसरा दिवाळीत फटाके विकण्याचं काम चाले. आनंदाच्या मनात मात्र वैमानिक होण्याचं स्वप्न असे. त्यासाठी पैसे मिळवत शिक्षण चालू होतेच. जिद्द दांडगी! त्यामुळे विभाग प्रशिक्षणासाठी निवड तर झाली. ते २००२ हे वर्ष होतं, लोक म्हणत ‘हा कसचा वैमानिक होतो’. त्यासाठी हवेत १४ लाख रुपये, आनंदाला घरी बसणं भाग पडत होतं. कर्ज काढले तर तारण काय देणार? सरकारी यंत्रणेत कर्जासाठी दलाली घेऊन काम करणारेही होते, पण दलालीसाठी तरी पैसे द्यायचे कुठून? अखेर सामाजिक न्याय विभागातील यशवंत मोरे, वैशाली पारकर अशा सज्जनांनी आनंदचे काम व्यवस्थित पार पाडले. प्रशिक्षण उत्तम झालं आणि २००६ मध्ये आनंद सुशील केणी हा वैमानिक म्हणून रुजू झाला.

आत्महत्या? छे ‘आत्मविकास’ – विश्वास कचरे एका शेतकरी कुटुंबातील! वाटण्यांच्या निमित्तानं घर सुटलं. भीक मागण्याची पाळी यावी, आत्महत्या करण्याची ओढ वाटावी अशी परिस्थिती; पण आत्मविश्वासानं विश्वासने खंडानं जमीन घेतली, उत्तम मेहनत केली, नाना प्रयोग करून उत्पन्न वाढविले. कृषिक्षेत्रातील नवं ज्ञान मिळवून त्याचा वापर शेतीत केला. स्वतःची जमीन घेतली. फळशेती सुरू केली. संशोधन चालू ठेवले व भिक्षाधीश विश्वास लक्षाधीश शेतकरी बनले. डाळिंबांची निर्यात करणारे विश्वासराव कचरे कृषिभूषण बनले !

भिल्लीणीची भरारी – रिटा शांताराम माळवे ही एक भिल्ल कन्या, झगडत झगडत बी. ए. झाली. एम. ए. नंतर सेट प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण होऊन संशोधनासाठी आदिवासी समाजाचा प्रश्न घेतला. साक्री (जि. धुळे) ची ही कन्या विधवा आईच्या मोलमजुरीमुळे व ‘कमवा व शिका’ योजनेमुळे यशस्वी झाली. पुणे विद्यापीठ समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शर्मिला रेगे, प्रा. विजय खरे यांच्या मदतीने, मार्गदर्शनाने रिटाने संशोधन केले आहे.

प्रतिभेची भरारी – मोलमजुरी करणारी आई आणि रिक्षाचालक वडील यांच्या आधारे पोलिओग्रस्त भाऊसाहेब बोत्रे अमेरिकेत बोस्टन विद्यापीठात शोधनिबंध वाचण्यास पात्र ठरला. हा मुलगा पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स विषय घेऊन पहिला आला. तो वर्गमित्रांच्या पाठीवर बसून शाळेत जात असे, एका उद्योजकाने शुल्क भरल्याने एम. एस्सीत प्रवेश घेऊन परीक्षेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. डॉ. दमयंती घारपुरे यांच्या मार्गदर्शनाने संगणकास गंधसंवेदनेपर्यंत प्रगत करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून भाऊसाहेबांनी धडपड केली. त्याला सिनीअर संशोधन शिष्यवृत्तीसुद्धा लाभली. दोन पायांबरोबर हातांचाही आधार घेत चालणार्‍या भाऊसाहेबाला रस्त्यावर पाहिले असणे शक्य आहे.

अपंगांचे पराक्रम – जन्मतः अपंग असणारी वल्लरी करमरकर कदाचित माहीत असेल, आई-वडिलांनी लहानपणी तिला नेऊन बसवणे, आणणं हे काम केलं. मैत्रिणींनी मदत केली. हात काम करीत नसल्याने लेखक घेऊन ती दहावी झाली. संस्कृत विषय घेऊन एम. ए. झालेली ही मुलगी सांगलीत संस्कृत वर्ग चालवते. अपंग मुलगी आता आपल्या पायांवर खरोखरीच उभी राहते आहे. मुलीसाठी परिश्रमांची पराकाष्ठा करणाऱ्या, अन्य अपत्याचा विचारही न करणाऱ्या, तिच्या आई-वडिलांना आदर्श पालक म्हणण्यास कोणीही तयार होईल. चाकणचे उज्ज्वला व केशव सहाणे या पालकांची जिद्द अशीच! प्रेरणा मूक-बधिर असल्याचे सहाव्या महिन्यात त्यांना समजले, अन्य अपत्याचा विचार बाजूस ठेवून ते मुलीच्या विकासासाठी झटू लागले. शुमिता महाजन यांना मार्गदशनासाठी गुरू केले. कोलकत्यात प्रेरणेनं राधाकृष्ण बॅलेत भाग घेतला, प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. ‘खामोशी’ चित्रपटात नाना पाटेकरांना पाहून प्रेरणेचं त्यांच्याशी जणू नातं उत्पन्न झालं; पण नानांना वाचा आहे हे समजल्यावर प्रेरणा त्यांच्यावर क्षणिक रुष्टही झाली. ‘प्रेरणेला ओळखा’ हा शुमिता महाजनचा उपक्रम; पण, कुणालाही ते जमलं नाही.

जिद्द जागी झाली, जातपात गेली लयाला – शिंपी, महार, वाणी, दासी, ख्रिश्चन, मुसलमान, ढोर, रामोशी, चांभार, कोल्हाटी, भिल्ल, नवबौद्ध आणि ब्राह्मण, मराठा इ. आई-वडिलांच्या पोटी जन्मास येऊन मोठी झालेली माणसं आपण पाहिली. यात घरच्या गरिबीवर मात करून मोठी झालेली बरीच आहेत. शारीरिक अपंगत्वावर विजय मिळवून प्रगती केलेली जिद्दी माणसं आहेत, सामाजिक परिस्थितीशी झगडून यशस्वी झालेल्या व्यक्ती आहेत. स्त्रीपुरुष भेदाची बेडी तोडून शौर्याच्या क्षेत्रात स्थान प्राप्त करणारी स्त्री आहे. चारशे वर्षांपूर्वी जन्मास आलेले रामदास व तुकाराम आहेत, तसेच आज आपल्या समोरच प्रगती करण्यासाठी धडपडणारी तरुण मंडळीही आहेत.

दलित आहेत, आदिवासी आहेत, दरिद्री आहेत तशी खाऊनपिऊन सुखी कुटुबातीलही आहेत. अनुसूचित जातीतील आहेत, तशीच मध्यमवर्गीयही आहेत. समाजातील विविधस्तरांमधील व्यक्तींनी आपापला विकास व्हावा यासाठी जो संघर्ष केला त्याची अगदी ओझरती झलक आपण पाहिली.

आता जे जे शिकू पाहताहेत, पुढे जाऊ इच्छित आहेत, त्यांना शासनाची मदत आहे. समाजातील संवेदनशील माणसांचा साहाय्यक हात आहे, नाना पुरस्कार आहेत, शिष्यवृत्या आहेत, प्रसंगी शैक्षणिक कर्जे उपलब्ध आहेत, आश्रमशाळा आहेत, विविध वसतिगृहे आहेत. ‘कमवा व शिका’ यासारख्या योजना राबवणारी ‘विद्यार्थी सहायक समिती’ सारखी पुण्यातील संस्था आहे. ती ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी वर्षानुवर्षे काम करते आहे. ‘विवेकानंद जीवनज्योत संस्था’ ही अशीच विद्यार्जनास सहाय्य देणारी संस्था आहे.

आपण प्रतिकूल परिस्थितीस अनुकूल करून घेऊ शकता हे वरील अनेक उदाहरणावरून स्पष्ट होते आहे ना! अगदी मतिमंद, गतिमंद अशी मुलेही कामायनी सारख्या संस्थेच्या साहाय्याने स्वावलंबी होऊ पाहत आहेत. आपण तर अव्यंग आहात. परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा पुरेपुर उपयोग कराल, जबरदस्त शरीरश्रमाची जोड देऊन एखादे मोठे स्वप्न सत्यात उतरवण्याचा चंग बांधाल तर तुमच्या यशानेही अनेकांचे नैराश्य दूर होईल, आशा पल्लवेल. तसे भव्यदिव्य स्वप्न मात्र डोळ्यासमोर सतत राहू दे. ‘उंच आणखी उंच चढू द्या, तुमच्या आशा, तुमची स्वप्ने!’