लेख क्र. ३७ ११/७/२०२५ ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड ३ (१९८८) या ग्रंथात संस्कृत-संस्कृति-संशोधिका (संत्रिका) विभागाचे माजी विभागप्रमुख श्री. विश्वनाथ गुर्जर यांनी विभागात होणार्या संस्कार उपक्रमाबद्दल ‘संस्कार विभाग’ या लेखात माहिती दिली आहे. संस्कार का करावेत, कसे करावेत, संस्कारांसाठी कोणते साहित्य वापरावे, पौरोहित्य कोणी करावे या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखात मिळतील. संत्रिका कोणकोणते संस्कार अथवा पूजा संपन्न करते तेही येथे सांगितले आहे. संस्कार विभाग – शिक्षण, संशोधन, ग्रामविकसन या क्षेत्रांतील उपक्रमांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय असेही अनेक उपक्रम प्रबोधिनीने अंगीकारलेले आहेत. संस्कार कार्यक्रम हा त्यांतील एक महत्त्वाचा भाग आहे. सामान्यपणे असे अनुभवास येते की बहुतेक नागरिकांना मग ते विज्ञानवादी असोत, बुद्धिवादी असोत, सुशिक्षित-अशिक्षित कसेही असोत, सर्वांना व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात धार्मिक संस्काराचा काही ना काही अवलंब करावा असे वाटत असते. मग देशाच्या काना-कोपऱ्यांत पसरलेल्या कोट्यवधी लोकांना अशा संस्कारांची गरज जाणवत असते हे निराळे सांगावयास नको. संस्कारांची पुनर्मांडणी – संस्कार हा संस्कृतीचा कृतिरूप उन्मेष आहे. बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये कौटुंबिक जीवनात अपत्यजन्म, विवाह आणि देहावसान या घटना काही संस्कारांनी बांधलेल्या दिसतात. अतिशय उदात्त आणि मनोरम असा आशय या संस्कारांतून व्यक्त केला जाऊ शकतो. व्यक्तीच्या जीवनाला असलेला सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संदर्भही संस्कारांमधून प्रकट होऊ शकतो. हिंदू जीवन पद्धतीत अशा सोळा अर्थपूर्ण संस्कारांची गुंफण पूर्वी केलेली होती. कालाच्या ओघात त्यांतील नामकरण, उपनयन, विवाह, षष्ट्यब्दी, अंत्येष्टी इत्यादी संस्कार टिकून राहिले. या संस्कारांचा मूळचा पवित्र, तेजस्वी आशयही काळाच्या ओघात हरवला आणि त्याबरोबर त्या संस्कारांमध्ये अनुस्यूत असलेली मूल्येही. तो आशय आणि ती मूल्ये या संस्कारांमधून पुनरपि प्रकट व्हावीत यासाठी त्यांच्या पुनर्मांडणीची आवश्यकता होती. विद्योपासना, सामाजिक दायित्व, कौटुंबिक दायित्व, प्रेम, त्याग-भावना, ईश्वरपरायणता ही सर्व धर्मसंस्थापनेला म्हणजेच समाजाच्या धारणेला पायाभूत असलेली मूल्ये आहेत. बहुतांश संस्कारांच्या मूळ स्वरूपात ती आहेतही. काहींच्यात त्यांचा नव्याने अंतर्भाव करावा लागला. ही पुनर्मांडणी ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक संचालक कै. आप्पाजी पेंडसे यांनी धर्मनिर्णय मंडळाचे कै. श्री. कोकजे शास्त्री यांच्या सहविचाराने केली. महत्त्वाच्या प्रचलित संस्कारांचे प्रयोग ज्ञान प्रबोधिनीमध्ये करून बघितले आणि ते समाजोपयोगी होत आहेत असे वाटल्यावरून विविध संस्कारांच्या पोथ्याही मुद्रित करून घेतल्या. या संस्कारांच्या पुनर्मांडणीतील काही विशेष खाली दिले आहेत. पौरोहित्य कोणी करावे? – संस्कारांचे पौरोहित्य कोणी करावे यासंबंधीही ज्ञान प्रबोधिनीची काही धारणा आहे. पौरोहित्य करणारी व्यक्ती जन्माने ब्राह्मण असावी अशी पुष्कळांची समजूत असते. तथापि प्रबोधिनीच्या धारणेप्रमाणे जी व्यक्ती शुचिर्भूत, सदाचारी, विद्याभ्यासी आहे अथवा स्वतः सुसंस्कारित आहे, अशा कोणाही स्त्री पुरुषाला पौरोहित्याचे अधिकार आहेत. प्रबोधिनीत अशा प्रकारे तथाकथित ब्राह्मणेतर व्यक्ती आणि स्त्रियाही संस्कार कार्यक्रम संपन्न करतात. स्त्रियांनी अंत्येष्टी अथवा श्राद्धासह कोणतेही संस्कार कार्यक्रम करण्यास प्रत्यवाय नाही. या संस्कार कार्यक्रमासाठी वास्तविक कोणा व्यावसायिक पुरोहितांचीच आवश्यकता आहे असे नाही. घरातील कुटुंब प्रमुख अथवा गृहिणी, पोथीवरून कोणताही संस्कार कार्यक्रम संपन्न करू शकतात. …पत्र पुष्प फळ…मिस केवळ – संस्कारांमधील उपचार, धूप-दीप, नैवेद्य, विड्याची पाने, सुपाऱ्या, खारका, बदाम, फळे, विशिष्ट प्रकारची फुले, पत्री, विशिष्ट रंगाची वस्त्रे हे सर्व मुख्यत्वे करून मानवी मनाच्या समाधानासाठी असतात. त्या त्या संस्काराच्या रीतीनुसार त्या शक्यतो उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करावा, तथापि त्यातील एक वा अधिक वस्तू उपलब्ध नसतील तर संस्कारात मोठे उणे राहिले, परमेश्वराचे समाधान होणार नाही, त्याची अवकृपा होईल असे यत्किंचितही वाटून घेऊ नये. त्या सर्वव्यापी शक्तीपुढे शरणतेची आणि नम्रतेची भावना, दोन हस्तक व तिसरे मस्तक एवढ्याने केलेली मानसपूजादेखील पुरेशी असते अशी प्रबोधिनीची धारणा आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे – येर पत्र पुष्प फळ । भजावया मिस केवळ । वाचूनि आमुचा लाग निष्कळ । भक्तितत्त्व ।। प्रबोधिनीच्या वतीने होणारे संस्कार कार्यक्रम नियोजित वेळी व्हावेत अशी विनंती आहे, त्यामुळे इतरांचीही सोय होते आणि चांगल्या प्रथा पडतात. यजमानांच्या अपेक्षेनुसार तिथी, वार, मुहूर्त, स्थल, काल, दिशा याबाबत पुरोहित मार्गदर्शन करतील. तथापि या बाबतीतही प्रबोधिनीची भूमिका लवचिक असते. ग्रहण आणि अमावास्येखेरीज अन्य दिवशी कार्यक्रम करण्याला प्रत्यवाय नसावा. दक्षिणा निरपेक्ष – प्रबोधिनीच्या वतीने संस्कार कार्यक्रमांची व्यवस्था अथवा दायित्व स्वीकारले जाते, ते समाजकार्याचा आणि समाज पुनर्रचनेचा एक भाग म्हणून. अतएव कोणत्याही समारंभासाठी अमुक इतकी दक्षिणा मिळावी अशी अपेक्षा नाही. केवळ शुभेच्छा अथवा नाममात्र रुपयापासून सहस्र अथवा अधिकही रुपयांचे योगदान ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यात यजमान करू शकतात. त्याची रीतसर देणगीची पावती, आयकर मुक्तीचे पत्र कार्यालयात मिळू शकते. किती दक्षिणा द्यावी ? असे यजमान पुन्हा पुन्हा विचारतात. तथापि यासंबंधी कोणतीही अपेक्षा व्यक्त करू नये असे ज्ञान प्रबोधिनीचे धोरण आहे. व्यवसाय म्हणून, उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पौरोहित्य करणार्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जे पौरोहित्य करतात त्या पुरोहितांना साधेपणाचे परंतु कालमानाप्रमाणे आवश्यक त्या स्तराचे जीवन स्थिरपणे व्यतीत करता येईल यासाठी वास्तविक समाजाने काळजी घ्यावयास पाहिजे. त्यामुळे यजमानांना व पुरोहितांनाही संस्कारातील दक्षिणा व देणगी बाबत स्पष्टता असावी म्हणून विभागाची छापील माहितीपत्रके तयार केली आहेत. ज्यामुळे अयोग्य, मनाला न भावणारे व्यवहार दोन्ही बाजूंनी होऊ नयेत. संस्कार विभागासाठी प्रशिक्षकांची मानधनावर नियुक्ती केली जाते. त्यांचा योगक्षेम कोणत्याही प्रकारे संस्कार कार्यक्रमातून मिळणाऱ्या प्राप्तीवर अवलंबून नाही. आणखी काही आपणही या – संस्कार हा केवळ बाह्योपचार नव्हे. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांना शुद्ध करणारा, उदात्ताचे लेणे चढविणारा असा झाला म्हणजे तो खरा संस्कार होय. केवळ सामारंभिक थाटमाट, प्रीतीभोजने यांच्यातच मर्यादून न राहता अर्थाच्याही श्रीमंतीने शोभणारा, समाजाला एकत्र आणणारा, मूल्ये देणारा, ज्या व्यक्तींवर संस्कार केला जातो त्यांना व त्यांच्या आप्तांना भारतीय जीवनदृष्टीचे स्मरण देणारा असा संस्कार व्हावा ही आजची गरज आहे. त्यासाठी शत-सहस्र मुखांनी या संस्कारांचा प्रसार व्हायला हवा आहे. शाळा-शाळांमधून सामूहिक उपनयन संस्कार संपन्न व्हावयास हवे आहेत. सामुदायिक विवाहांचे प्रयोग जिथे होतात तिथेही मायबोलीतील हा विवाह संस्कार अर्थपूर्ण ठरेल असे वाटते. ज्ञान प्रबोधिनीप्रणीत संस्कार आपल्या घरी योजणाऱ्या सर्व सुहृदांना विनंती आहे की, त्यांच्या परिचयातील घरांमध्येही असे संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. धर्मचेतनेच्या पवित्र गंगेचे पाणी आपल्याही ओंजळीने चार रोपांच्या मुळाशी शिंपले जावे असे हार्दिक आव्हान आहे. या संस्काराचा प्रयोग अनुभवल्यानंतर काही जणांना असे वाटेल की आपणही पौरोहित्य करावे. अशा सुहृदांचे प्रबोधिनीत स्वागत आहे त्यांना येथे आवश्यक ते साहाय्य केले जाईल. यात अधिकाधिक स्त्री-पुरुष नागरिकांनी सहभागी व्हावे असेही आवाहन आहे.