मा. यशवंतराव लेले यांनी २००९ साली लिहिलेला हा गायींविषयीचा लेख आहे.
‘वसुधैव कुटुंबकम्’ ही वेदांची जीव जगताकडे पाहण्याची व्यापक दृष्टी होती. त्यामुळे गवताच्या पात्यापासून ते वृक्षापर्यंत आणि कृमिकीटकांपासून मनुष्यमात्रांपर्यंत सर्वाविषयी ‘आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचेरत्’ अशी सहानुभूतीची व स्वतःला दुःखद वाटणारी गोष्ट आपण दुसऱ्यांच्या बाबत करू नये अशी वागणूक वेदातील माणसांची होती.
दर्भ म्हणजे पाणथळ जागी उगवणारे गवत ! ते चटई बनवण्यासारख्या उपयुक्त कामी वापरण्यापूर्वी वा धर्मकार्यासाठी जमा करण्यापूर्वी तत्कालीन ऋषी त्या गवताशी बोलतो, “(तुला तोडल्यानंतर) तू पुनश्च फुटशील त्यामुळे मला काही पाप लागणार नाही” (कृष्ण यजुर्वेदीय ब्राह्मण भाग २). झाडाचा उपयोग घर कामासाठी करायचा तर त्याला इजा होणारच. तेव्हा तो मुनी म्हणतोय, ‘हे वृक्षदेवा ! मी तुला जेथे तोडणार तेथून तू शेकडो अंकुरांनी पल्लवित होऊन पूर्वीपेक्षा अधिक उंच हो. आम्हीही पुत्रपौत्रादिरूपी शाखांनी युक्त होऊन पूर्वीहून मोठ्या उन्नतीस प्राप्त होऊ (शुक्ल यजुर्वेद अध्याय ५).
वनस्पतिसृष्टीप्रमाणे प्राणिसृष्टीशीही सहसंवेदनेची वागणूक तत्कालीन जाणकारांनी केली आहे. यजुर्वेदाने असंख्य प्राणी-पक्षी आणि कृमिकीटकांचा देवांना प्रिय म्हणून उल्लेख केला असून पर्यावरणशास्त्राने त्याची दखल घेणे योग्य वाटते. वेदकालीन जीवनदृष्टी ही पर्यावरणपोषक होती असे म्हणता येईल.
ऋग्वेदाच्या सहाव्या मंडलात २८ वे सूक्त हे गोसूक्त आहे. या सूक्तात गोरूपी ऐश्वर्यधनाचे प्रास्तविक वर्णन केले असून साक्षात इंद्ररूप असणारी सवत्स, मंगलकारक, शुभशब्दकारी, हितप्रद अशी दुभती गाय घरोघरी असलीच पाहिजे, तसेच कोणत्याही सबबीवर अथवा युद्धात तिचा वध करू नये, असे कटाक्षाने सांगितले आहे. धेनूचे स्तवन करण्यासाठी या सूक्ताचे पठण करतात. सूक्तात आठ ऋचा आहेत. त्यातील काही ऋचांचा अर्थ पुढीलप्रमाणे दिला आहे.
१. अनेक जातीच्या कल्याणकारी सवत्स धेनू आमच्या घरातील गोठ्यात रममाण होऊन उषःकाली इंद्राप्रीत्यर्थ दूध देवोत.
२. धेनूच्या मदतीने यज्ञ करणारा धेनुसंपन्न गोपाल चिरस्थायी होतो. त्याने दान दिलेल्या धेनू शत्रूच्या हत्याराने नष्ट होऊ नयेत. वाटेवरील चोर त्यांचे अपहरण न करोत.
३. कृश अवयव पुष्ट करून निस्तेजांना तेजस्वी करणाऱ्या हे मंगलकारक शब्दयुक्त स्तवन केल्या गेलेल्या धेनूंनो, तुम्ही आमचे घर समृद्ध करा.
४. गाईच्या दूधात सोम मिसळून त्याचे (सोमाचे) आणि बैलाचे सामर्थ्य तुम्ही वृद्धिंगत करा. इंद्रदेवा गोरसाने तुझे बळ वाढो.
ऋग्वेदामध्ये १२१ वेळा गाईचा उल्लेख अवध्य (अहन्या) प्राणी म्हणून येतो. गाईस मारू नये हे ज्या ऋषींनी ठरवले त्यांनी गाईंचा बराच काळ विविध दृष्टीने अभ्यास केला असणार, त्यामुळे गाईच्या गुणवर्णनाने भरलेल्या असंख्य ऋचा त्यांनी रचलेल्या आहेत. भरपूर दूध देणारी, शांत, सुखाने जिची धार काढता येते अशी, आज्ञाधारक, प्रेमळ, निर्दोष, परोपकारी असे गाईचे वर्णन वेदांमध्ये येते.
गोस्थ म्हणजे गोठा. सायंकाळी परतणाऱ्या गाईचे आगमन हे कल्याणकारी असल्याचे म्हटले आहे. गंगा, यमुना, सरस्वती, इ. नावे असणाऱ्या गाईंना त्यांच्या त्यांच्या नावाने बोलावल्यास त्या सहज जवळ येतात. माणसांमध्ये रमणाऱ्या अशा गाई आणि गोपाळ यांचे परस्पर प्रेम; धार देऊन सुखावणारी गाय व धार काढून त्या विपुल गोरसाने प्रसन्न होणारा गोपालक; वासराला प्रेमाने चाटणारी गाय व गाईला चाटणारे तृप्त वासरू हे दृश्य डोळ्यांपुढे उभे रहावे अशी वर्णने ऋग्वेदात आहेत. आपल्या हंबरण्याने गाईला आपल्याकडे धावत यायला लावणारे गोजिरे वासरू व त्याला प्रेमपान्हा देऊन चाटणारी गाय हे शब्दचित्र वेदांमध्ये आढळते.
स्वच्छ शुद्ध पाणी; तीळ, सातू, गवत, चणे इ. उत्तम खाद्य देऊन गाईची काळजी घेण्यास, तिचे पोषण करण्यास गोपाळ तत्पर असत. त्यामुळे विपुल दूध देऊन गाई स्वस्थ जीवन जगत. बैलांचीही चांगली उपज होऊन त्यांचे वहनसामर्थ्य उत्तम असे. अशा प्रकारे ऐश्वर्यशाली गोवंश समाजासही ऐश्वर्यसंपन्न करे. म्हणून ‘अस्तु स्वस्ति गोभ्यः’ गाईंना सुखी जीवन लाभो, असे वेद म्हणतात.
धष्टपुष्ट गाईंचे कळप म्हणजेच गोधन! त्या गोधनाचे संरक्षण करण्यास जो समर्थ तो खरा शूर वीर, तोच सेनानायक होण्यास पात्र! ही तत्कालीन समाजधारणा होती. त्यापुढे जावून आपल्या माता पित्यांच्या कल्याणाची प्रार्थना करताना गाईंच्या कल्याणाचीही चिंता तत्कालीन समाजधुरीण करतात. ते म्हणतात, “स्वस्ति मात्र उत पित्रे नो अस्तु स्वस्ति गोभ्यो जगते पुरुषेभ्यः!” (अथर्ववेद १.३१.४) या मंत्रात आई, वडील, गाई यांना अग्रस्थान दिले आहे. पाठोपाठ साऱ्या मानवांसाठी नव्हे तर अवघ्या जगाचे कल्याण व्हावे ही शुभकामना वेद करतात.
ऋग्वेदातील सूक्त ८.१०१.१५ येथेकेलेले गाईचे वर्णन तर तिला आईवडिलांपेक्षाही उंच पदवीस नेऊन ठेवते. ऋचा अशी आहे, “माता रुद्राणां दुहिता वसूनां, स्वसादित्यानां अमृतस्य नाभिः। प्र नु वोचं चिकुतुषे जनाथ मा गमनागापदितिं वधिष्ट ।।” या ऋचेचा अर्थ – रूद्रांची माता, वसूंची कन्या, आदित्यांची भगिनी आणि अमृत जीवनाची नाभी अशा निरपराध उमद्या गाईस मारू नये. काही भाष्यकार म्हणतात ‘रूद्र म्हणजे रडणारी तान्ही बाळे, आदित्य म्हणजे युवक-युवती आणि वसु म्हणजे वृद्ध माणसे अशा साऱ्यांनाच पोषण देणारी या दृष्टीनेही गाय रुद्रमाता, वसुकन्या आणि आदित्यभगिनी ठरते’. आपल्या पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करतानाही आपण वसुरूद्र-आदित्य स्वरूप झालेल्या तीन पिढ्यांचा उल्लेख करतो हे विशेष! गाय ही संपूर्ण शरीरास विकसित, समुन्नत आणि संवर्धित करते ती तिच्या अमृततुल्य दुधाने! म्हणून गाईच्या कासेत सोमाचा म्हणजेच अमृताचा वास असतो असे म्हणता येते.
एवढा मोठा महिमा असणारी गाय साहजिकच परिपालनीय, संरक्षणीय आणि देवताही ठरली! म्हणूनच यजुर्वेदात गाय ‘आदर्श राष्ट्रघटक’ म्हणून गौरविली गेली. त्यामुळे गाईची अथवा गोवंशाची हत्त्या म्हणजे महापाप ठरले. इतकेच काय! गाईची शपथ घेणेही राष्ट्रासाठी मोठी घातक गोष्ट असल्याचे स्पष्ट म्हटले आहे! शतपथ ब्राह्मणात म्हटले आहे, गोवंशासारखे शुद्ध, पवित्र अन् परोपकारी अन्य काही नाही. त्यामुळे गोवंश म्हणजेच देशाची श्री, शोभा!
स्वास्थ्यरक्षण, आरोग्यसंवर्धन याबरोबर गाईचे सत्त्वयुक्त दूध व त्यापासून बनणारे पदार्थ अनेक रोगांवरील उत्तम औषधी म्हणून सिद्ध झालेले आहेत. गोरस म्हणजे गाईचे दूध! दूध, लोणी, तूप, दही, ताक या सर्वांचाच औषधी उपयोग आपल्या देशात हजारो वर्षांपासून चालू आहे. याशिवाय गोमय म्हणजे शेण आणि गोमूत्र यांचाही उपचारासाठी या देशात यशस्वी वापर केला गेला असून आजही तो चालू आहे.
आरोग्यरक्षण, शक्तिसंवर्धन, रोगनिवारण ही सारी कामे गाईमुळे शक्य झाली त्याप्रमाणे सौंदर्यवर्धनासाठी देखील गायीचे दूध व तज्जन्य पदार्थ उपयुक्त ठरले आहेत. यामुळेच खास भारतीय अशा वैद्यक विद्येत म्हणजेच आयुर्विज्ञानात गाईपासून मिळणाऱ्या सर्व पदार्थांना विलक्षण महत्त्व प्राप्त झाले आहे हे स्वाभाविकच आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो. अडीच हजार वर्षांपूर्वी चरक, सुश्रुत इ. प्रयोगवीरांनी औषधविद्या आणि शस्त्रक्रियाशास्त्र यांचा विकास केला. नंतर वाग्भट इ. आचार्यांनी पुढच्या काळात त्यात भर घातली आहे.
गाईचा उपयोग येवढ्यातच संपत नाही. आज रासायनिक खतांनी नापीक बनवून टाकलेल्या जमिनी पुनश्च सुपीक करण्यासाठी गोमय आणि गोमूत्र यांचाच वापर करावा लागतो आहे. त्यामुळे गोवंशाचे महत्त्व आता अधोरेखित होते आहे.
गोमयाइतके उत्कृष्ट जंतुनाशक जगात नाही, असे डॉ. मॅकफर्सन यांनी म्हटले आहे. त्यामुळेच क्षयरोग्याला गोठ्यात ठेवावे असे काही वैद्यांचे म्हणणे आहे. १९३४ च्या कॉलऱ्याच्या साथीत साऱ्यांना त्याचा प्रसाद मिळाला पण गोठ्यात काम करणारे मात्र वाचले! हा चेन्नईतील नोंदवला गेलेला अनुभव आहे. इटलीत पूर्वी प्रा. जी. बी. बीगेंड यांनी गोमयावर खूप प्रयोग केले. त्यांचा निष्कर्ष असा आहे की ताज्या गोमयाने मलेरीया सारख्या तापाचे जंतू लगेच मरतात. त्यामुळे इटलीत सॅनेटोरियममध्ये गोमय वापरण्याची प्रथा प्रचारात आली.
दूध न देणाऱ्या अथवा कमी दूध देणाऱ्या गाई व म्हातारे झालेले गाय-बैल यांना मारून त्यांचे व प्रसंगी धष्टपुष्ट गाईबैलांचे मांस विदेशांना वा स्वदेशीयांना विकून पैसा करणाऱ्यांना आता गोवंशाची खरी किंमत कळावी असा काळ आलेला आहे. ४० वर्षापूर्वी देशात एक कोटी पेक्षा अधिक बैलगाड्या होत्या. त्या दोन कोटी बैलांना चारा देणे परवडत नाही असे समजून गाडी ऐवजी ट्रक आणि टेम्पो वापरणाऱ्यांना आता पुनर्विचार करावा लागणार आहे. विदेशी इंधन तेलासाठी कोट्यवधी रूपये परदेशी धाडावे लागतात. त्यामुळे देशाचे अंदाजपत्रक हे कधी लाभाचे व्हायचेच नाही.
मोटेचा बैल गेला त्याजागी डिझेलचा पंप बसला, नांगराचे बैल गेले व त्यांच्या ऐवजी ट्रॅक्टर आले म्हणजे पुन्हा विदेशी इंधनावर शेती निर्भर होत चालली! एका बाजूने तेलाचे भूगर्भीय साठे संपत चालले आहेत. त्यामुळे अरब देशांना भविष्याचा विचार करून उत्पादन घटवावे लागणार व भाव ते म्हणतील ते आपल्याला द्यावे लागणार! अशा स्थितीत गोवंशास पुरेसे महत्त्व देऊन त्यांच्या साहाय्याने शेतीस लागणारे जैविक खत मिळविणे आवश्यक आहे. कारण रासायनिक खतांसाठीही इंधन तेलापासून निघणारे उपपदार्थ वापरावे लागतातच. गोवंशास योग्य महत्त्व देण्याने शेतीही फुलेल, जमीन सुपीक होईल. गाईची शक्ती वाढवता येईल. तिचे दूध म्हशीप्रमाणे खुराक देऊन वाढवता येईल.
साहिवाल जातीच्या गाईने वर्षात २,५०,०३९ पौंड दूध देऊन सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळवला. नेदरलंड देश दूध उत्पादनात गाजलेला खरा पण साहिवाल गाईने त्यांचा विक्रम मोडल्याचा इतिहास ५० वर्षांपूर्वीचा आहे! याचा अर्थ योग्य खुराक देऊन चांगले पोषण केल्यास भारतीय गायही लाभदायी ठरू शकते. उत्तम गोपालन झाले तर, गोरक्षण चांगले झाले तर, कंपोस्ट खताचे उत्पन्न भरपूर होईल. त्याने शेतीचे उत्पादन तर वाढेलच पण जमिनीचा पोतही बिघडणार नाही सुधारेल. ७५ लक्षाहून अधिक ट्रॅक्टर आणूण शेती करणे या देशाला परवडणार नाही. त्यापेक्षा संपत्र गोधन म्हणजे नांगरणीसाठी बलिष्ठ बैलशक्ती मिळून परदेशी इंधन तेलाची आयातही कमी करता येईल.
प्रत्यक्ष लक्ष्मी देवता व गोमाता यांचा एक संवाद महाभारतात (अनुशासन पर्व ८२) आढळतो. गोमातेकडे आश्रयास आलेल्या लक्ष्मीस ती नकार देते. ‘तू चंचल आहेस’ म्हणून गोमातेने कारण सांगितल्यावर लक्ष्मी गोमयात व गोमूत्रात राहण्यास तयार होते. हा संवाद आणि आजची शेतीची अवस्था पाहता गोमय आणि गोमूत्र शेती श्रीमंत करण्यास, गांडूळखत वाढवण्यास केवढे उपयुक्त आहे ते सामान्य शेतकरीही अनुभवतो आहे.
गोधनाचे महत्त्व ओळखून गोवंशाचे पालनपोषण जेवढे चांगले होईल तितके शेतीचे भवितव्य उज्जवल होणार आहे, हेच संपूर्ण जगात गायींचे अढळ असे स्थान आहे.