सुवर्णा गोखले

मागे वळून बघताना १७ : किशोरी विकास 

बचत गटाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर महिलांना स्वतःच्या मर्यादा लक्षात यायला लागल्या मग ‘मागच्यायचं ऱ्हाऊदया पुढच्याचं सुधरा’ या उक्ती प्रमाणे त्यांच्या मुलींच्यासाठी काहीतरी करा असा आग्रह त्यांनी धरला. त्यातून मुलींसाठीच्या कामाला सुरुवात झाली. किशोरी विकास हा रचनात्मक उपक्रम स्थानिक शाळांच्या सहकार्याने सुरू केला. ८-९ वीच्या किशोरींसाठी शाळेत जाऊन तास घेणे असे त्यांचे स्वरूप होते. तासिकांमध्ये किशोरींचे वृत्तीघडण व्हावे, आयुष्याची पुढची दिशा ठरायला मदत व्हावी, साहस निर्माण व्हावे आणि या सगळ्यातून आत्मविश्वास वाढवा यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले. अश्विनीताईं या उपक्रमाचे प्रमुख म्हणून नियोजन केले.   पुण्यातील साने गुरुजी कथामालेसह संवाद कौशल्य यावे म्हणून कथाकथन कसे करायचे ते सलग ८ वर्ष शिकवले. किशोरींना गोष्ट सांगण्यासाठी प्रवृत्त केले त्यांच्या स्पर्धा घेतल्या. यामुळे गटासमोर उभे राहण्याचे धाडस तर येतेच आणि शब्द संपत्ती वाढवून आपलं म्हणणं दुसऱ्यासमोर मांडण्याचे कौशल्यही शिकता येते. गटासमोर स्वतःला सादर करणे ही पहिली पायरी!  त्यानंतर मुलीवर ‘मला काहीच जमणार नाही’ असा झालेला संस्कार पूसुन काढण्यासाठी मानसिक घडण करायला सुरुवात करणे गरजेचे होते. मग थोड्याशा साहसी गोष्टी करण्याचे ठरवले. किशोरी विकास मधल्या मुलींची सातत्याने १०-१२ वर्ष ‘निवासी तंबूतील शिबिरं’ घेतली. कुटुंबापलीकडे मैत्रिणी मैत्रिणींनी रात्री एकत्र राहायचं, तंबूंना पहारा देत रात्र जागवायची, शिबिराच्या शेवटी गड किल्ले सर करायचे अशा वेगळ्याच भाविश्वात आपण किशोरींना घेऊन जायला लागलो. या प्रयत्नातून तोरणा, राजगड, पुरंदर, रायरेश्वर, सिंहगड, सज्जनगड असे किल्ले एकेकावर्षी एकेक गड सर केले! डोंगरांवर फाटा आणायला जाणाऱ्या मुलींना गड ‘सापडला’, इतिहास समजला.. मग आपसूक ‘पाळी’ या विषयाचा संकोच गेला, त्यांचा आत्मविश्वास दुणावला! शारीरिक आणि मानसिक आव्हानासाठी किशोरींनी सायकली चालवल्या पाहिजेत असा आग्रह धरला. स्वयंपूर्णतेसाठी उचललेलं हे पहिले पाऊल होतं. ३-४ वर्षात मिळून पुण्यातील मुलींच्या वापरल्या जात नाहीत अशा जवळ जवळ ८०-९० सायकली गोळा केल्या आणि नव्या कोऱ्या सायकली कॉगनिजंट कंपनीमधून मिळवल्या त्याचा वाटपाचे कार्यक्रम केले. त्यावेळी सामाजिक वातावरण असे होते की सायकल हातात असली तरीही मुली सायकली चालवण्याचं धाडसच करू शकत नव्हत्या. मग मात्र आपण मुलींनी सायकल चालवण्याला सामाजिक मान्यता मिळावी म्हणून एक वर्ष महिलांची वाहन रॅली काढली आणि त्या रॅलीमध्ये सर्वजण महिला चालक होत्या. ज्यांना स्कूटर येत होती आशा १० जणी पुण्यातून स्कूटरनी आल्या, ज्यांना गाडी येत होती त्या गाडीने आल्या आणि ५० किशोरींचा गट सायकल चालवत २२ किमी रॅलीमध्ये सहभागी झाला. रॅलीमुळे ‘शारीरिक ताकदीची चॅलेंजेस सुद्धा मानसिक ताकदीच्या बळावर मी सहज पूर्ण करू शकते’ असा विश्वास आला.  पुढे ४ वर्षानी मुलींची आणि महिलांची क्रीडा प्रात्यक्षिके घेतली त्यावेळी या गटातील काही मुलींनी सायकल कसरती सुद्धा केल्या म्हणजे एकच विषय सातत्याने लावून धरल्याने मुलींच्या मनोवृत्तीत बदल होऊन गटाचा आत्मविश्वास वाढतो हे आपण सिद्ध करून देऊ शकलो. त्यावर्षी भागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या उपक्रमाची दखल घेतली आणि खासदार निधीतून सगळ्या किशोरींना सायकल वाटप केले. आता सायकल मिळवणे या पथदर्शी प्रकल्पाचे काम संपुष्टात आले. त्यानंतर आपण हा विषय पुढे लावून धरला नाही. आजही मुली रस्त्यावर सायकल चालवताना दिसतात पण अपवादाने …. आपल्या कामाने परिस्थिती नक्कीच बदलली आहे पण सायकल चालवण्यासाठी मनोबल जसं महत्त्वाचा आहे तसं ‘माझ्या सायकलमध्ये मी हवा भरेन’ ‘माझ्या सायकलला झाले तर मीच पंचर काढीन’ याचे प्रशिक्षण देण्यात आपण कमी पडलो. पण समाजाचे मत परिवर्तन करायला ७-८ वर्षांचा काळ पुरत नाही.. पुढच्या किशोरींसाठीही अजून काही काळ असाच उपक्रम करायला हवा होता.     किशोरींसाठी तंबूतली शिबिरं घेतली तशी शारीरिक धाडस वाढावे म्हणून मढे घाटावर रॅपलिंगची शिबीरे सुद्धा घेतली. दोराच्या साह्याने प्रस्तरावरतरण करणे यासाठीची मनाने तयारी होणे हे खूपच अवघड होते. अश्विनीताई सोबत कुंदाताईंसारख्या ताईंनी स्वतः उंचच उंच कडा उतरून मुलींना दाखवले की आम्हाला जमते मग तुम्हाला का नाही? ..मग त्यांच्यावर विश्वास असणाऱ्या मुली भराभर रॅपलिंग करत उतरल्या. मनाचे घडण ही शारीरिक घडणीपासून सुरु होते! पुढचा टप्पा होता तो विद्याव्रताचा स्वतःच्या आयुष्याचा पुढचा निर्णय करण्यासाठी संकल्प कथन करणे गरजेचे होते. किशोरी विकास उपक्रमाचा एक अविभाज्य भाग म्हणून सातत्याने गेली १४-१५ विद्याव्रत करत आहोत. भागातील १०००-१२०० किशोरवयीन मुला-मुलींचे विद्याव्रत आपण केले. या सगळ्यांना विधायक विचार करण्याची ताकद, व्यसनांपासून दूर राहणे, स्वतःच्या विकासाची जबाबदारी स्वतः घेणे आणि संकल्प शक्ती वाढवणे आणि पंचकोशातून विकास या वरच्या व्याख्यानांमधून मार्गदर्शन केले. छोटे छोटे उपक्रम गटागटाने करून घेतले. यातले अनेक उपक्रम किशोरी विकास उपक्रमामुळे आयुष्यात मुलींनी एकदाच केले असतील पण हे उपक्रम असे होते की ते त्यांच्या आयुष्यातल्या सुखद आठवणीचा भाग बनले. १० वर्षांनी जरी त्या किशोरी कुठेही भेटल्या अगदी रस्त्यात, बसमध्ये, जीपमध्ये, माहेरी आल्यामुळे आपल्या गरोदर तपासणी शिबिरात…. तरी ‘ताई मला ओळखलं का? त्या शिबिरात तुम्ही आला होतात’ असं म्हणत ‘आता मी..’ आपलेपणाने बोलायला लागतात. त्यांच्या आयुष्यामध्ये त्या प्रसंगाचं महत्त्व किती होतं हे आपल्याला सांगतात.  किशोरी विकास उपक्रमातून किशोरींची स्वप्न मोठी झाली पाहिजेत म्हणून तासांना चांगलं शिक्षण होण्यासाठी चांगले मार्क मिळावेत म्हणून अभ्यास कौशल्यांचे वर्ग घेतले, दहावीत गेलेल्या मुला-मुलींना पेपर कसे सोडवायचे कुठल्याही प्रकारची कॉपी करायची नाही आणि अभ्यास कसा करून मार्क चांगले मिळवायचे यावरही मार्गदर्शन केलं. शिक्षणाच्या संधीवर व्याख्याने दिली. विविध क्षेत्रांची ओळख होऊन आयुष्याची दिशा ठरवायला मदत करणारे मार्गदर्शनही केलं. निवडक गटाला क्षेत्रभेटीसाठी पुण्यात आणलं कधी दीनानाथ सारख्या हॉस्पिटलची मुलींना भेट देऊन नर्सिंग पासून डॉक्टरांपर्यंत आणि टेक्निशियन पासून अन्य स्टाफ पर्यंत नोकरीचे काय मार्ग आहेत याचा परिचय करून दिला तर कधी कर्वे शिक्षण संस्थेच्या भेटीतून इंजीनियरिंग पासून फॅशन डिझाइनिंग पर्यंत आणि नर्सिंग पासून संगणकापर्यंत इथं मुलींच्या निवासात राहून सुरक्षित शिक्षण कसं घेता येईल याचे परिचय करून दिला. गावात दहावी होणाऱ्या मुलीला कॉलेजमध्ये जायचं एवढंच ऐकून माहिती असतं पण कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी काय करावे लागतं याबद्दल मात्र ती अनभिज्ञ असते. किशोरी विकास उपक्रमातून आधीमित्र गट मुलींना सहज उपलब्ध झाला की सोबत काम करणाऱ्या ताया वयाने त्यांच्यापेक्षा फार मोठ्या नव्हत्या त्यामुळे झालेल्या सहज संवादातून अनेक गोष्टी घडत गेल्या.  किशोरी विकास उपक्रमाने अजून एक महत्त्वाचं काम केले ते म्हणजे स्वतःच्या गावात त्यांनी धडपडून काहीतरी केलं पाहिजे म्हणून किशोरीनच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कामाचे आवाहन केलं. गावातील मुला-मुलींना जमवून बाहेरून येणाऱ्या मार्गदर्शक तायां सोबत गाव पातळीवर मेळावा घ्यायचा. असा उपक्रम आपण गेले दहा वर्ष करत आहोत एका वर्षी सगळ्यात जास्त म्हणजे ८५ गावांमधून २५०० मुला-मुलींपर्यंत किशोरींच्या मदतीने आपण पोहोचलो. स्वतःच्या गावात चांगला झालेला मेळावा बघून माझ्या मामाच्या गावात घेऊयात, माझ्या मावस बहिणीच्या गावात घेऊयात असे म्हणत मुलींनी पुढाकार कसा घ्यायचा आणि ठरवलेले काम कोणाच्यातरी मदतीने साध्य कसे करायचे याचे शिक्षण घेतले. अशा आपल्या धडपडणाऱ्या मुली कॉलेजमध्ये गेल्या आणि त्या कॉलेजमधल्या बाईंची भेट झाली तर त्या आपल्याला आवर्जून भेटून सांगतात, ‘तुमची ती मुलगी वर्गात उठून दिसते बर का!’ आणि त्यामुळे तिचं पालकत्व आपण घेतलं आहे हे तिच्या बदललेल्या वागणुकीतूनच कळतं. अशा अनेक मुलींच्या आयुष्यावर ठसा उमटवणार काम किशोरी विकासाच्या निमित्ताने केलं कारण या सगळ्या कामाला या सगळ्यांच्या आईचा पाठिंबा होता. बचत गटातून त्या शिकल्या होत्या की मुलीने

मागे वळून बघताना १७ : किशोरी विकास  Read More »

मागे वळून बघताना १६ – कातकरी

  बचत गटाच्या कामाला सुरुवात झाली त्याला गावातल्या मुख्य गटाने प्रतिसाद दिला हे गेल्या लेखात आपण पाहिले. त्याकामात वंचित गटांसाठीच्या कामाची बरीच भर पडली गेली. गेल्या ८ वर्षा पासून प्रतिभाताईच्या पुढाकाराने वेल्ह्यातालुक्यात आपण कातकरी समाजासाठी काम सुरू केले.  कातकरी समाज हा सामाजिक उतरंडीमध्ये सगळ्यात खाली त्यामुळे ‘विकास’ या  कुटुंबापर्यंत पोहोचलाच नाही. बहुतेक घरातल्या आई-वडील यांनी स्वतः कधी शाळा सुद्धा पाहिली नाही त्यामुळे जरी सर्व शिक्षा अभियानात मुलांनी शाळेत जायाला हवे असे सांगितले असले तरी पालक म्हणून त्यांना आग्रह धरणेही अवघडच होते.  कातकरी लहान मुलांनी शाळेत जायचे का नाही? हा निर्णय ५-७ वर्षांच्या मुलांनी करायचा नसतो तर पालकांनी तो लावून धरायचा असतो. या वयात मूल शाळेत गेले नाही तर पुढे जाण्याची शक्यताच नाही. यासाठी पालक संवाद महत्वाचा हा संवाद बचत गटाच्या कामामुळे सोपा झाला. कधीच शाळेत न गेलेल्या माणसाला, वाचता सुद्धा येत नाही म्हणून कसे फसवले जाते त्याचा पालकांना अनुभव होताच पण शाळेत मुलांना पाठवण्याचा आग्रह आपल्या कामामुळे धरता आला.  गावातल्या इतर मुलांच्या सोबत शाळेत जाऊन शिकण्यासाठी कातकरी मुलांना आंघोळ करणे, केस विंसरणे, दात घासणे अशा गोष्टी शिकवण्यापासून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. जेव्हा मुलांचा गट एकदम नव्याने शाळेत जायला लागतो तेव्हा ‘गटाने जावे लागते’ म्हणजे शाळेत जायची प्रेरणा सुद्धा टिकेल असे समजून तायांनी मुलांची तशी तयारी करून घेतली, एवढेच नाही तर शाळेतल्या गुरुजींना भेटून सांगितले की, ‘आम्ही मुलांची तयारी करून पाठवत आहोत मुले बसतील असे बघा’ ज्या मुलांना वर्गात काय चाललं आहे ते कळलं ती टिकली, एवढा वेळ एकजागी बसायची सवयच नाही, वर्गात शिकवलेले काही कळत नव्हतं ती मात्र फार काळ जाऊ शकली नाहीत, शाळेला कंटाळली असंही झालं.   ताईने युवती विकास उपक्रमात सहभागी होणाऱ्या युवतींचे ‘कातकरी’ अभ्यास शिबिरच घेतले. मग या वस्ती विकासाच्या कामामध्ये त्या युवती प्रशिक्षक म्हणून काम करायला तयार झाल्या. खरेतर त्यायुवतीही जवळपासच्या गावातल्याच होत्या लांबून वस्ती त्यांना माहिती होती पण तरीही त्या कधीही वस्तीवर गेल्या नव्हत्या. तिथले दारिद्र्य बघून त्यांनाही धक्का बसला. या कर्त्या गटाने मग वेल्हे भागातल्या सर्व वस्त्यांचे सर्वेक्षण केले. त्यातून मुलांना खेळातून गोडी लाऊ.. मराठी गाणी शिकवू असे ठरवून गट कामाला लागला.  आईच्या व्यसनांमुळे रात्रीचा स्वयंपाक घरात होईलच असे नाही असे लक्षात आल्यावर कातकरी वस्तीवर सकस आहार सुरू केला, नसरापूरला शाळा व वस्ती यामधून हायवे जातो, ‘पोरे रास्ता कशी क्रॉस करणार? म्हणून शाळेत जात नाहीत!’ असे पालकांनी सांगितल्यावर आपण वस्तीवर एक ताई नेमली जी शाळेच्या वेळेत मुलांना एकत्र करून शाळेत सोडेल व आणायला जाईल.. यामुळे २५-३० मुळे शाळेत जायला लागली. काही वस्त्यांवर बचत गट केले, काही ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली. अशा शिबिरांना पूर्वी अजिबात प्रतिसाद नसायचा पण आपण वस्ती विकासाचे काम सुरू झाल्यावर अगदी लहान मुलांच्या तपासणी शिबिराला सुद्धा आई मुलाला घेऊन यायला लागली, अपवादाने एखादी गरोदर महिला गर्भारपणात तपासणी शिबिरात यायला लागली, पण आरोग्याच्या काळजीने नाही तर ताईच्या आग्रहामुळे! स्वतःच्या आरोग्याकडे बघायला अजून वेल्हयातल्या कातकऱ्यांना शिकावे-शिकवावे लागणार आहे.   सातत्याने ८ वर्ष असे काम सुरू आहे. वस्तीवर राहून मुलींनी शिकणे अजूनच अवघड आहे असे वाटले कारण अजूनही लहान वयात म्हणजे १४-१४ व्या वर्षी मुलींची लग्न होतात त्यामुळे एकीला पुण्यात कर्वे शिक्षण संस्थेत शिकायला पाठवले तिने ११ वी केले पण पुणे फार लांब वाटले म्हणून मग आपल्याच वेल्हे निवासात मुलींनी शिकायला यायचे आवाहन केले.. ४ जणींनी प्रयत्न केला पण एक जण टिकली चांगली शिकली, आज तिने दहावीची परीक्षा दिली. पुढेही शिकायचे नक्की ठरवले आहे. तिच्या शिक्षणाचा खर्च एका देणगीदारांनी उचलला त्यामुळेही शिकायचं उत्साह वाढला. तिच्यात झालेला चांगला बदल बघून आता तिची बहिणंही निवासात शिकायला आली आहे.  शिकले की अनेक गोष्टी करता येतात, रोजगाराच्या संधीही बदलतात. काही गोष्टी बघून अनुभव विश्व विस्तारावे म्हणून दरवर्षी प्रतिभाताई या गटाच्या सहल काढते. ज्ञान प्रबोधिनीवरच्या विश्वासाने पालकही पाठवतात. या निमित्ताने कधी सिंहगड तर कधी सज्जन गड, कधी राजीव गांधी प्राणिसंग्रहालय तर कधी पेशवे उद्यान असे काय काय पाहून झाले. फक्त ‘शाळेत जा’ असे सांगून पुरत नाही, शाळेत गेल्यामुळे शिक्षण मिळाल्यामुळे आयुष्य कसे बदलते हे हळूहळू सांगावे लागते. प्रतिभाताईला तर असे वाटायला लागले आहे की वस्तीच्या वातावरणामुळे शिकायचा वेग कमी होतो.. या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृहच बांधायला हवे, नाहीतर आई-वडिलांचे रोजचे व्यसन बघून, आणि सहज मिळत असल्याने पुढच्या पिढीला व्यसन लागायला वेळ लागत नाही. आई-वडिलांची इच्छा असली तरी त्यांच्या वागण्यातही बदल लगेच होणार नाही हे आपणही स्वीकारले पाहिजे.  गेली काही वर्ष आपण वस्त्यांवर दिवाळी साजरी करत आहोत. देणगीतून फराळ, रांगोळी, किल्ल्यांवरची चित्रे भेट देतो, किल्ले करून घेत आहोत, पणती लावायला शिकवत आहोत, एकत्र फराळ करायला शिकवत आहोत.. त्यावेळी अनेकांनी सांगितले की अशी गोड खाऊन आम्ही पहिल्यांदाच साजरी केली. अशा कार्यक्रमामुळे वस्तीवरचे वातावरण हळूहळू बदलायला लागले .. वस्तीवर स्वागत व्हायला लागले.  अशा कामामुळे वस्तीवरचा वावर सहज झाला. प्रतिसाद सुधारला. मग युवक, पुरुष यांचा संवाद वाढवला आणि स्वयंरोजगार संधी बघायला वस्तीवरच्या २५-३० जणांची बाळासाहेब कोळेकरांचे कातकऱ्यांसाठी चाललेले काम बघायला गट महाडला जाऊन आला. उत्साह वाढला. योजनांची माहिती मिळाली पण कागदपत्रे नसल्यामुळे काहीच लाभ घेता येत नाही असे लक्षात आले. मग ही कागदपत्रे तयार करायचे काम जे अधिकारी करतात त्या तहासिलदारांशी संवाद साधला की कधीतरी फिरस्ती असली तरी आता ही मंडळी गेली अनेक वर्ष याच वस्तीवर रहात आहेत तर त्यांना या वस्तीवरचा राहिवासा पुरावा देऊया. त्यांचे आधार कार्ड काढूया. ठरले! मग आख्या वस्तीने शासकीय कार्यालयात येण्याऐवजी अधिकारीच वस्तीवर आले तर? असा प्रस्ताव अधिकाऱ्यांसामोर मांडला आणि अधिकाऱ्यांनी मान्य केला. त्या दिवशी स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी ६०-६२ कातकरी कागदोपत्री अस्तित्वात आले हा कामाचा मोठ्ठा टप्पा म्हणायला हवा!  सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना १६ – कातकरी Read More »

मागे वळून बघताना १५ – वंचित गटांसाठीच्या कामाची सुरुवात..

 स्त्री शक्ती प्रबोधनाच्या कामाला सुरुवात केली ती ग्रामीण महिलेसाठी, बचत गट करण्यापासून! तेव्हा वाटत होते की ही ग्रामीण महिला, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे तिने मुख्य प्रवाहात यायला हवे. पण जसजशी वर्ष जायला लागली, तसतसे लक्षात यायला लागले की या ग्रामीण महिलांमध्येही वेगवेगळे गट आहेत. ग्रामीण समाजातील महिलांमध्ये एकसंधता नाही. त्यामुळे उपक्रम एकच असला तरी बचत गटाचा फायदा सर्व गटांना सारखाच पोहोचला नाही! त्याच प्रमाणे गटाचा भाग झाल्या तरी सगळ्या सभासद सारखेच शिकल्या नाहीत! ज्या महिला दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांचे आपण शासकीय योजनेसाठी स्वतंत्र बचत गट चालवले. त्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी शासनाने बचत गटाद्वारे वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. शासनाला त्यांचे ‘target’ पूर्ण करायला कुठल्यातरी गटाला फायदा मिळवून द्यायचाच आहे तर मग आपणच संघटीत केलेल्या गटांना त्याचा फायदा मिळवून देऊ म्हणजे शासनाच्या दप्तरी त्या गटांची नोंद होईल असे ठरवले. गटांना मिळणारी सबसिडी म्हणजे ‘परत न करायचे कर्ज’ सुद्धा आपण गटांना मिळवून दिली. सबसिडी घेणारा गट जरी ‘दारिद्र्य रेषेखाली’ असला तरी त्याला शिकवले की केवळ सबसिडी ‘खाऊन’ विकास होत नाही. विकास स्वकर्तृत्वावर करायचा असतो म्हणून दारिद्र्य रेषे खाली असणाऱ्या महिलांनाही दारिद्र्य रेषेवर असणाऱ्या सभासदांच्या गटात सुद्धा घेतले आणि कर्ज घेऊन व्याजासह चोख परत फेड करायला शिकवले! तसाच दुसरा गट लक्षात आला तो म्हणजे ज्या एकल आहेत अशा महिला! काहीही कारण असले तरी.. एकल म्हणजे .. ‘सोडून’ दिलेल्या असतील, नवरा नांदवत नाही असे असेल, विधवा असतील, माहेरी रहात असतील किंवा नवरा असला तरी दारूडा/व्यसनी असल्याने यांनाच कुटुंबाला पोसावे लागत असेल…. तर अशा महिला म्हणजे एकल महिला! पर्यायच नाही म्हणून त्या सगळ्या अतिशय कष्ट करणाऱ्या आणि तरीही समाजात त्यांना ‘किंमत’ नाही, सन्मान नाही, अशा दुर्लक्षित महिला असतात. बचत गटांमुळे या गटाचे सगळ्यात जास्त कल्याण झाले कारण आपले बचत गट फक्त आणि फक्त महिलांचे होते.. कारभार बघणाऱ्याही सगळ्या महिलाच आहेत. आपल्या गावपातळीवरच्या कामातही पुरुषांचा कुठेही वावर कधीही नव्हता आणि नाही, त्यामुळे एकल माहिलांना सुरक्षित वाटायचे आणि मोकळेपणाने त्या त्यांची आर्थिक गरज सुद्धा मांडू शकायच्या. यातल्या अनेक जणींना फसवलेले असायचे. शिक्षण नाही आणि एक्सपोजर नाही त्यामुळे जगाची ओळखंच नाही…. अशा महिलांना आपला आधार वाटायचा!  तिसरा गट गावातला अशा महिलांचा की ज्या सामाजिक उतरंडीमधल्या सगळ्यात तळाच्या गटात मोडतात, ज्यांना विकास प्रक्रियेत यायचे असते हेच माहीत नाही अशा! मागास समाजाच्या असल्यामुळे त्या गावातल्या व्यवहारातही सामावल्या जात नाहीत, दाखलपात्र नसतात अशा महिला. कधी धनगरांच्या, ज्या डोंगरावर छोटी वस्ती करून राहिल्याने गावापासून भौगोलिक अंतरानेही दूर असल्याने तुटलेल्या तर कधी कातकरी ज्या गावापासून दूर राहील्यामुळे वेगळा विचार करणाऱ्या ज्यांच्या अस्तित्वाचे पुरावेही अजून पर्यन्त निर्माण झाली नाहीत अशा महिला! आणि चौथा गट असा की जो दारिद्र्यरेषे पेक्षा थोडासा वर असणारा आणि सामाजिक दृष्टीने अशा समाजाचा भाग की ज्याला समाजामुळे काही शासकीय योजनेतून सवलत मिळणार नाही. हा खरं धडपडा गट अनेकदा हा गट राजकीय पुढाऱ्यांच्या पासूनही सावध अंतरावर असतो. थोडक्यात काय तर हा गट स्वकर्तृत्वावर छोटी-मोठी स्वप्न बघत असतो. ही मंडळी शेती करत असतात पण जागा खातेफोड झाली नसल्याने त्यांच्या नावावर झालेली नसते. बँकेतून कर्ज काढावसे वाटते पण उत्पन्नाचा दाखला नसतो की जामीन राहायला कोण्या शासकीय नोकरदारांची ओळख असते! त्यामुळे यांना त्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन विना तारण, माफक दरात कर्ज आणि मार्गदर्शन मिळाले तर कर्ज घेऊन स्वतःच्या कुटूंबांचे आयुष्य बदलू शकतात. बचत गटातील सहभागाने या गटातील महिलांना विशेष फायदा झाला.     स्त्री शक्ती प्रबोधनाच्या कामाला बचत गटांपासून सुरुवात केली आणि नेमके परिणाम कारक काम करायचे असेल तर अशा वेगवेगळ्या गटांसाठी, वेगवेगळे काम करण्याची गरज दिवसेंदिवस लक्षात यायला लागली. कामाच्या गरजेचे बारकावे लक्षात आल्यावर यातल्या प्रत्येक घटकासाठी स्वतंत्रपणे कामाला सुरुवात केली, कारण एकल महिलांसाठी काम करायला लागल्यावर आशाताईंना ‘एकल’ महिलांचे वेगळे प्रश्न लक्षात आले तर दारिद्र्य रेषे खालच्या गटासाठी काम करताना भारतीताई यांना वेगळेच प्रश्न जाणवले आणि कातकरी महिलांसाठी कामाला लागल्यावर तर प्रतिभाताईला वेगळ्याच प्रश्नांची जाणीव झाली.  आपण या प्रत्येक गटांसाठी स्वतंत्रपणे ज्ञान प्रबोधिनी म्हणून गेले ८-१० वर्ष काम करत आहोत. या कामाचा परिणाम म्हणून आता या प्रत्येक गटात किमान एक तरी ज्ञान प्रबोधिनीच्या गणवेशातली कार्यकर्ती आपल्याकडे आहे, जी तिचा प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडू शकायला लागली आहे. जसजसे मनुष्यबळ तयार होत गेले तसतसे काम त्या-त्या गटासाठी काम करणे सोपे झाले. खरेतर असे काम उभे करणाऱ्या प्रत्येकच ताईची कहाणी लिहिण्यासारखी आहे. आपल्याच गावात आपल्याच माणसात राहून बदलाचा विचार मांडत रहाणे सोपे नसते.. त्याला जवळचा गट/समाज आनंदाने स्वीकारतो असेही नाही.. ‘आली मोठी शिकवायला!’ अशी या शब्दांत मोठ्यांदा न बोललेली अवहेलनाही अनेकदा पंचवावी लागते. त्यामुळे सावकाश झाले तरी चालेल पण विरोध न होता कसकसे रचनात्मक काम केले ते येत्या १-२ लेखात आपण बघूया! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना १५ – वंचित गटांसाठीच्या कामाची सुरुवात.. Read More »

नोटाबंदी एक आपत्कालीन मदत कार्य

दिनांक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० नरेंद्र मोदी यांनी रात्री १२ नंतर ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्याचे जाहीर केले. ग्रामीण भागात बहुतेक व्यवहार फक्त रोखेनेच होत असल्याने या निर्णयाचा ग्रामीण जनजीवनावर चांगलाच परिणाम होणार होता. पंतप्रधानांनी असा निर्णय घेऊन आपल्या कामाची अचानक परीक्षा घेतली आहे असे वाटून निर्णय कळल्या क्षणीच बचत गटाच्या कार्यकर्त्यांचा गट कामाला लागला. २२ वर्ष केलेल्या  कामामुळे महिला आता विश्वासाने पैसे हाताळत होत्या. बचत गटाच्या निमित्ताने दरमहा लाखों रुपयांचे व्यवहार होत होते, त्या निमित्ताने ५००/१००० रुपयाचे चलन बँकेच्या कॅशियर खालोखाल बचत गट प्रमुखच हाताळत असाव्यात असा माझा प्राथमिक अंदाज होता. म्हणून अशा गावच्या प्रमुख महिला ज्या एरवी बचत गटाचे बँकेत मोठ्या रकमांचे रोखीचे व्यवहार करतात अशा महिलांची ९ नोव्हेंबरला सकाळी तातडीचे बैठक बोलावली. रात्री उशीरा ८नंतर फोनवर निरोप देऊनही १२ गावच्या १२ प्रमुख, ज्यांना या विषयाचे गांभीर्य समजत होते अशा वेळेत हजर झाल्या. ग्रामीण महिला आर्थिक सुनामीच्या मदत कार्यास पदर खोचून तयार होत्या. ज्यांच्याकडे व्हाट्सअप असणारे फोन होते त्यांनी गटातल्या महिलांना बैठकीला येण्यापूर्वी, ‘घाबरू नका थांबा आपण उपाय करू, बैठक झाले की काय करायचे ते सांगते!’ अशा आशयाच्या सूचना दिल्या होत्या.  ९ नोव्हेंबरला ग्राहकांना व्यवहारासाठी बँका बंद होत्या तरी आपल्या संपर्कातल्या बँकेत कार्यकर्त्या ‘आतून’ भेटायला गेल्या. बँक शाखा व्यवस्थापकांना कार्यकर्त्यांनीच मदतीचा हात दिला. बँक शाखा व्यवस्थापकांशी चर्चा झाली. त्यात ठरले की येते ५ दिवस तरी गावकऱ्यांना बँकेत गर्दी होऊ नये म्हणून बँकेत न येण्याची विनंती करायची. गाव प्रतिनिधीने गावातल्याच लोकांकडून डिपॉझिट स्लिप भरून घ्यायच्या म्हणून १५०० ताब्यात घेतल्या. बँकेतली गर्दी टाळण्यासाठी गाव कार्यकर्तीने स्लिप भरून, पैसे मोजून, नोटा एकत्र लावून बँकेत आणून द्यायची. ज्या गटांची कर्जफेड बाकी आहे त्या गटातल्या सदस्यांनी बँकेतले व्यवहार कमी संख्येत व्हावेत म्हणून शक्यतो एक रकमी गटाचे कर्जफेड करायची म्हणजे २० जणांच्या २० बचत खात्यासाठी डिपॉझिटची एन्ट्री करण्याऐवजी एका एन्ट्रीत २० घरचे बाद चलन बँकेत जमा होईल व सगळ्यांचेच काम हलके होईल. १० नोव्हेंबर, त्यानंतरही बँकेत काही दिवस अनियंत्रित गर्दी उसळू शकते म्हणून बँकेने पोलीस प्रोटेक्शन मागितलेच होते पण तरी गरज पडल्यास फोन केला तर लगेच बँकेच्या मदतीला येण्यासाठीचा निरोप दक्षता समितीच्या महिलांना देऊन ठेवायचे.  कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही माहिती देऊन रणनीती ठरली. गावात रोख पैसे बाळगून असणाऱ्यांपासून सावधानतेचा इशाराही देण्यात आला. नोटबंदीच्या प्रसंगामध्ये बचत गटाच्या निमित्ताने झालेली आर्थिक साक्षरता महिलांना खूपच उपयोगी पडली. त्या काळात गावात शिकलेला माणूस सुद्धा बँकेत जाण्यापूर्वी आमच्या कार्यकर्तीचा सल्ला घेत होता.  माध्यमांमध्ये येत नव्हत्या अशा अनेक गोष्टी गावात घडत होत्या. एक पंतप्रधानांनी ज्यावेळी घोषणा केली त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ‘चलनात नसणाऱ्या ५००/१००० च्या नोटा द्या आणि निम्मे पैसे घ्या’ असे म्हणणारे काही जण गावात दाखल झाले. ते असे सांगत होते की सरकार तुमचे फक्त ४०००रु. बदलून देणार आहे पण ‘रोज ४०००/-‘ हे कोणीच सांगत नव्हते. अर्धवट माहिती देऊन अनेकांना गुपचूप फसवण्याचे उद्योग सुरू झाले. ज्या गावात बँकेत नियमित जाणारी बचत गटाची ताई होती तेथे फसवणे शक्य झाले नाही. जरी या महिला वर्तमानपत्र वाचण्या इतक्या साक्षर नव्हत्या तरी अडचण आल्यावर कोणाला फोन करायचा हे त्यांना माहिती होते अशी कुटुंबे/गावे फसली नाहीत. अशा कुटुंबांनी इतरांनाही बँक मॅनेजरशी बोलून धीर दिला व असे अर्धवट माहितीमुळे होणारे अनेक गावांचे नुकसान टळले.  गावात होणारी चर्चा ऐकून येणाऱ्या प्रश्नमुळे खूप माहिती सांगावी लागत होती. काळा पैसा हा रंगाने कधीच काळा नसतो अशी माहिती वेळेत योग्य त्या गटापर्यंत पोहोचवावी लागत होती. एखाद्या सासुरवाशीणीने किंवा म्हातारीने लपवून केलेली बचत काळा पैसा नाही असे सांगून तिला आधार देऊन बँक व्यवहारात तिची बचत गुपचुप बदलून देण्याची व्यवस्था होत होती. ज्या महिलांनी बचत गटात सहभाग घेतल्यामुळे जनधन योजनेला प्रतिसाद देऊन स्वतःचे बँकेत खाते काढले होते त्या कुटुंबाचा नोटा बदलून मिळाल्याने फायदा झाला. ‘ती’चा क्षमता विकास झाल्यामुळे कुटुंबांनी तिच्यावर दाखवलेला दाखवलेला विश्वास सार्थ झाला होता.  खरे सांगायचे तर घरात बचत गटाचे कोणीतरी सभासद आहे, अशा कुटुंबांचे अडले नाही. केवळ बचत गटामुळे लाखो रुपये विनाताण बँकेत जमा झाले. या कालावधीत नवीन खाते काढून घ्यायला परवानगी नव्हती, त्या खात्यांचे चौकशी होईल अशीही भीती होतीच. बचत गट विश्वासामुळे गावागावातून डिपॉझिट स्लिप भरून आणल्या. कुठेही छापील पत्रक न वाटता हे निरोप तोंडी गावातल्या सगळ्यांपर्यंत पोहोचले. गावकरी बँकेच्या निरोपाप्रमाणे थांबले.  अडचण आल्यावर फक्त टीव्हीवरच्या बातम्या बघत असले तरी गावातले व्यावहारिक प्रश्न गटात सोबत चर्चिले गेले. आपल्या कार्यकर्त्यांनी, युवतींनी स्लिप भरायला बँकेत जाऊन मदत केली. मदतीसाठी त्या बँक आवारातच बसल्या. ४०-४५ वय उलटून गेलेल्या लोकांना जास्त मदत लागली. मदत करणारी अधिक साक्षर होती म्हणून मदत करत नव्हती तर बँकेसंबंधी कागद भरायला लागणारी वित्तीय साक्षरता तिच्याकडे होती म्हणून करत होती. अनेकींनी हे काम विना मोबदला स्वयंस्फूर्तीने केले. लोकांच्या अडचणीचा फायदा घेऊन बरेच पैसे मिळवता आले असते तरीही तसे करू नये असे वाटण्या इतकी मनुष्य घडण आर्थिक उपक्रमाने झाली होती.  बैठकीला आलेल्या सगळ्या जणी त्यांच्या मैत्रिणींना व्हाट्सअप ने जोडलेल्या होत्या त्यामुळे संदेशवहन अतिशय पटपट होत होते. या प्रक्रियेतली लोकशिक्षणाची अजून एक महत्त्वाची बाजू लक्षात आली ती म्हणजे, आपत्कालीन प्रसंगी कसे वागायचे हे शिक्षण, तातडीने निरोप देण्याच्या देवाणघेवाणीतून झाले. यामुळे एकटेपणाचे भावना नव्हती गटाच्या एकोप्याने वाढलेला आत्मविश्वास होता.  या काळात हा गट दररोज घडामोडी व्हाट्सअप च्या गटावर टाकत होता गटावरचे संदेश साधारण असे होते. ‘आज 22 स्लिप भरल्या’, ‘आज धनगराची माणसं एरवी गावाचे वावरत नाहीत ती घरी येऊन विचारत होती’, ‘गावातले पुढारी घरी येऊन गेले’, ‘वरच्या आळीच्या हिशोबात ३ नोटा खोट्या सापडल्या’, ‘आज मी 4000 रुपये बँकेतून बदलून आणले. पैसे खात्यात भरावे लागतात तसेच मिळत नाहीत’, ‘आज आमच्या बँकेतून ४००० मिळायला लागले’.  ‘माझं घर जणू गावातली बँकेत झाली आहे’. ‘मी लिखाणात गुंतून पडले तर आमच्या घरी पारूबाईने जेवण आणून दिले’, ‘माणसं बँकेत जाऊ नका म्हटलं तरी ऐकत नव्हती पण बाकीच्यांनी आपला शब्द ऐकला’, ‘त्यांचे पैसे रांगेत न थांबताच खात्यात जमा झाले असे ते दुसऱ्या गावात जाऊन सांगत होते’…. असे विश्वासार्हता वाढवणारे संदेश वाचायला मिळत होते आलेल्या अडचणीवर हे चर्चा होतीच त्यात मुख्य प्रश्न लक्षात आला तो म्हणजे खोट्या नोटांचा ज्याचा विचार किंवा उल्लेख तोपर्यंत कुठल्याही माध्यमांनी केला नव्हता ज्या गावात बचत गटाचे काम करणाऱ्या जबाबदारी घेणाऱ्या महिला होत्या, त्यांनी संस्थेतील नोटा तपासणारे व मोजणारे यंत्र गावोगावी वेळापत्रक लावून नेले. मशीनवर नोटा कशा मोजायच्या? हे त्या जबाबदारीने शिकल्या. गावकऱ्यांचा ‘माझ्याकडे असलेली नोट खोटी नाही ना?’ या धास्तीचा भार हलका झाला. महिलांचे या प्रक्रियेत खूपच शिक्षण झाले वेळेत व विश्वासार्ह माहिती मिळणे किंवा मिळवणे किती महत्त्वाचे असते हे त्यांनी अनुभवले, विश्वासाने तिचे काम सोपे झाले. बचत गटाच्या कामासाठी नियमित बँकेत जात असल्यामुळे कामात सहजता होती म्हणून गावातल्या अनेक पुरुष मंडळींनी सुद्धा त्यांचे प्रथमच ऐकले. यामुळे ‘ती’चा आत्मविश्वास लक्षणीय वाढला गटात होते म्हणून निभावले असं म्हणणाऱ्यांना अडीअडचणीला

नोटाबंदी एक आपत्कालीन मदत कार्य Read More »

मागे वळून बघताना १४ – आर्थिक विषयाचे प्रशिक्षण म्हणजे…. 

आपण कामाला सुरुवात केली, तेव्हा बचत गट म्हणजे काय हे ग्रामीण महिलेला माहिती नव्हते आणि हिशोब करणे, पैसे मोजणे अशी आर्थिक कामे करायची भीती वाटत होती. आता हळूहळू महिला ही कामे धिटाईने करू लागल्या आहेत. अनेक गावांना आता गटाचे आर्थिक गणित समजले. व्याजदर किती असेल तर गट बंद होताना व्याजाचा किती वाटा मिळतो हेही लक्षात आले. मग विश्वासाने बचत गटाची सभासदांची बचत वाढायला लागली. सुरुवात केली तेव्हा दरमहा प्रत्येक सभासद २० रु बचत करायची या टप्प्यापासून आता ३० वर्षात अपवादाने काही गटातील प्रत्येक सभासद दरमहा २००० रु बचत सुद्धा करून लाखात कर्ज व्यवहार सहज करायच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत याचे समाधान आहे. शहरापासून जवळच्या गावापासून हाय वे वर असणाऱ्या गावापासून सुरुवात करून आता असे व्यवहार करायला वेल्हयातील दुर्गम भागातल्या महिलांना शिकवणे अजूनही चालू आहे.  बचत गटाचे व्यवहार करताना सुरुवातीच्या काळात महिला घाबरायच्या. त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आले की बचत गटकर्जाच्या येणेबाकी रकमेवर सगळ्यांसामोर गणित करून व्याज काढता येत नव्हते, गणित  चुकले तर? अशी भीती वाटायची कारण गणित एवढे पक्के नव्हते मग आपण कॅल्क्युलेटर वापरायला शिकवलं. त्याकाळात ज्यांचे शिक्षण झाले होते ते मराठीतून म्हणजे आकडेही देवनागरीतून लिहायला शिकल्या होत्या, कॅल्क्युलेटरवर फक्त इंग्रजी आकडे असतात त्यामुळे ६, ९, मध्ये आकडे वाचनात गोंधळ व्हायचा तर इंग्रजीत (रोमनमध्ये) ७, ८ वाचताच यायचे नाहीत. मग जर अंतर्गत व्याज दर २% असेल तर येणे बाकी वर व्याज किती द्यायचे आणि ३% असेल तर व्याज किती द्यायचे असे शुद्ध देवनागरीत लिहिलेले तक्ते तयार केले. आणि प्रश्नच सुटला.. मग पुढचा प्रश्न .. हिशोब करताना कधीतरी खाडाखोड व्हायची तेव्हा हमखास बेरीज चुकायची आणि अशा वेळी जमलेली रक्कम जर हिशोबाच्या बेरजेशी बेरीज चुकल्यामुळे जुळली नाही तर भांडणे ठरलेली, मग आपल्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून आपण वेळच आली तर खाडाखोड कशी करायची, एकावर एक आकडा गिरवायचा नाही इतक्या बारीक सूचना ‘चोख हिशोबाची तंत्र!’ या नावाखाली द्यायला सुरुवात केली.   ज्ञान प्रबोधिनीने नाबार्ड कडून अर्थसाहाय्य घेऊन बचत गट तयार केले व बचत गटांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी बँकेला जोडले. त्या निमित्ताने नाबार्डचे अधिकारी आपल्याकडे बैठकीला/पहाणीला/भेटीला यायचे व असे साधे सोपे मराठीतले कमीत कमी अक्षरे लिहिलेले रंजक प्रशिक्षण साहित्य बघून त्यांनी सुचवले की नाबार्डला अर्ज करा व यांची पुस्तिका छापायला निधी मागा!  आणि आपले पहिले प्रशिक्षण पुस्तक नाबार्डच्या आर्थिक मदतीने तयार झाले.  अशा साध्या सोप्या पण सातत्याने केलेल्या प्रशिक्षणामुळे खरे म्हणजे दरमहा होणारे बचत गट हळूहळू आपापले चालायला लागले. तसतसे ग्रामीण महिला आर्थिक-स्वयंपूर्ण आणि आर्थिक साक्षर कशी होईल यावर काम सुरू केले. २००९-१०साली रिजर्व्ह बँकेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी ‘आर्थिक समावेशन’ करायचे या विषयावर काम सुरु केले. पुण्यातल्या रिजर्व्ह बँकेच्या ‘कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंग’ (CAB) मध्ये ग्रामीण बचत गटाच्या अनुभव कथनासाठी कायम निमंत्रण असायचे. हाच धागा धरून तिथल्या अधिकाऱ्यांनी विचारले ‘ज्ञान प्रबोधिनी आर्थिक समावेशनाच्या कामात रिजर्व्ह बँकेला मदत करेल का?’ रिजर्व्ह बँकेसोबत काम करायची  अतिशय उत्तम संधी आहे असे समजून आपण एकत्र कामाला लागलो. भोर, हवेली, वेल्हयाच्या १० गावात ‘बँक’ या विषयीची जाणीव जागृती करणारे कार्यक्रम घेतले, खोट्या नोटा कशा ओळखायच्या यावर गावोगावी क्लिप दाखवून जागृती केली. आर्थिक समावेशनाचे काम करण्यापूर्वी ३६ प्रश्न असणारी ७ पानी प्रश्नावली खोपीतील २४१ कुटुंबांकडून भरून घेतली. यातून लोकांचे बँकेबद्दलचे समज-गैरसमज समजले, कोण बँकेत खाते काढते, का काढते? कधी वापरते अशी सगळी माहिती गोळा झाली. बँकेत खाते काढायच्या खऱ्या अडचणी काय आहेत त्या या सर्वेक्षणामुळे समजल्या म्हणजे खात्यात पैसे कोणीही ठेवू शकते पान काढायला मात्र स्वतः जावे लागते अशी प्राथमिक माहिती सुद्धा नव्हती त्यामुळे २०० रुपये ठेवायला बँकेपर्यंत पोचायचा बसचा खर्च ४० रु करून दिवस कोण वाया जातो.. आशा उत्तरांमुळे नेमके काय सांगायला हवे ही समजले मग त्यावर काम केले. ज्या कुटुंबातल्या कोणाचेही बँकेत खाते नव्हते अशा कुटुंबातल्या महिलांना व युवकांना खाते काढण्यास प्रेरणा दिली, मदत केली. अगदी सेंट्रल बँकेची प्रासंगिक शाखा गावात उघडेल, गावातून e-transactions होतील असे पाहिले. त्यासाठी गावातील युवकांचे प्रशिक्षण घेतले आणि या सगळ्या प्रयत्नांमुळे भोर तालुक्यातील खोपी गावाचे १००% आर्थिक समावेशन झाले. यामुळे पुण्याच्या शाखेला(CAB) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या निमित्ताने रिजर्व्ह बँकेचे लोकपाल, आणि मोठमोठ्या पदावरचे अधिकारी खोपीत येऊन गेले. आपल्या कार्यकर्त्यांचाही पुण्याच्या शाखेने तेथे (CAB) बोलावून सत्कार केला. त्याच वर्षी तेव्हाचे गव्हर्नर डॉ. राघू रामराजन यांनी असंघटित लोकांचे बँकेबद्दलचे मत जाणून घ्यायचे ठरवले होते. तेव्हा रिजर्व्ह बँकेच्या निमंत्रणांवरून त्यांना प्रत्यक्ष भेटून, बँकेबद्दलचे ग्रामीण भागातल्या बचत गटाच्या महिलांचे म्हणणे काय आहे हे सांगून, ग्रामीण बँकेत फक्त पुरुष स्टाफ असल्यामुळे महिला आर्थिक प्रश्न बोलायला संकोचतात अशी अडचणीही त्यांच्यासमोर मांडता आली. असे बचत गटाच्या महिलांच्यावतीने सर्वोच्च पदावरच्या अधिकाऱ्या समोर निवेदन करायला मिळणे मिळणे ही कामाची खरी पावती होती! या कामामुळे समजलेल्या प्रश्नावर पुढे अनेक वर्ष काम केले. बचत गटाच्या बैठकीत बँकेशी म्हणजेच फॉर्मल रचनेशी जोडून घेण्यासाठी बचत गट प्रमुखांना प्रशिक्षण दिले. या सगळ्या प्रशिक्षणाचे संकलन करून ‘बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी!’ अशी एक प्रशिक्षण पुस्तिका तयार केली. ही पुस्तिका अनेक संस्थांना पाठवली, ज्यामुळे अनेक जिल्ह्यातील महिलांचे प्रशिक्षण झाले. ही प्रशिक्षण पुस्तिका जेव्हा बँक अधिकाऱ्यांना दाखवली तेव्हा लक्षात आले की बँकेत ग्राहक म्हणून येणाऱ्या माणसाच्या प्रशिक्षणापेक्षा बँक अधिकाऱ्यांचे/ अशी कामे करणाऱ्या शासकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होण्याची जास्त गरज आहे. ही संधी कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगने दिली, यशदाने, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या प्रशिक्षण केंद्राने दिली! आजही त्यांची व्याख्यानासाठी निमंत्रणे येत असतात. आणि त्यामुळे आपले काम पॉलिसी बनवणाऱ्यांपर्यंत पोचते आहे ही सांगायला आनंद होतो आहे.   सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना १४ – आर्थिक विषयाचे प्रशिक्षण म्हणजे….  Read More »

मागे वळून बघताना १३  – आरोग्यदायक चूल

आरोग्यदायी चूल! ग्रामीण महिले सोबत काम करताना ‘ती’चे कष्टप्रद जीवन सतत समोर दिसत असते. ‘ती’च्यांच शब्दांत सांगायचे तर ‘जीवाला कधीच उसंत नसते’. त्यामुळे बैठकीच्या निमित्ताने शारीरिक काम न करता नुसते बसले तरी तिला सहज डोळा लागतो.. कारण शरीर कायमच थकलेले असते! उन्हाळ्याचे दिवस म्हणजे सरपण-लाकूडफाटा भरून ठेवायचे दिवस. या १००-१२५ दिवसांत दुर्गम गावातल्या महिला वर्षभरासाठी किमान ५ टन लाकूड फाटा भरून ठेवतात. चुलीवर स्वयंपाक करायचा, रोज आंघोळीचे पाणी तापवायचे तर ५-६ माणसाच्या कुटुंबाला एवढे लागणारच! आपण नेहमी बघतो ती सगळीकडे दिसणारी चूल, महिलेच्या आरोग्याला किती हानीकारक आहे यांची सुशिक्षित माणसाला कल्पनाच नसते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सप्टेंबर २०२१ मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार भारतात दर वर्षी निदान ५ लाखाहून जास्त बायका-मुलं चुलीच्या धूरामुळे अकाली मृत्युमुखी पडतात तर जगातला हाच आकडा ४० लाखांवर आहे. (Pre-mature death because of indoor air polution), त्यातली ८% फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्यामुळे तर २७% निमोनियाने… ही अतिशयोक्ती नाही.    बाई चुलीवर रोज स्वयंपाक करते तेव्हा चुलीचा जो धूर तिच्या फुफ्फुसात जातो, तो धूर जणूकाही रोज १०० सिगरेट ओढण्याइतका असतो, त्याने ‘ती’चे फुफ्फुस आतून हळूहळू निकामी करतो. चाळिशीच्या बाईचे फुफ्फुस किती कार्यक्षम आहे असे आपण दीनानाथ रुग्णालयात तपासले तर ३५ -४० वर्षांच्या बाईचे फुफ्फुस ८ वर्षांच्या मुलांच्या फुफ्फुसा इतके लहान झालेले असते.  हा चुलीचा धूर जर डोळ्यात गेला तर डोळ्याचेही आजार बळावतात. आणि चुलीसाठी लाकडे वाहून कणा झिजतो. कारण ग्रामीण भागातले सर्वसाधारण कुटुंब वर्षभरासाठी किमान ५ टन म्हणजे ५००० किलो लाकूड वापरते. ही लाकडे डोंगरावरून आणण्याचे कामही ‘ती’लाच करावे लागते. लाकूड जवळच्या डोंगरावर जाऊन म्हणजे सरासरी ३ किमी. अंतरावरून डोक्यावरून वाहून आणावे लागते. एक मोळी साधारण ३०-३५ किलोची असते म्हणजे वर्षातले साधारण १००-१२५ दिवस रोज ४-६ तास ती बाई लाकूडफाटा आणणे असे ‘बिन पैशाचे’ काम करत असते! लाकूड फाटा आणताना २-३ तास वेड्यावाकड्या चढ-उतारांच्या रस्त्यावर हे ओझे ‘ती’च्या डोक्यावर असते. असे वजन सातत्याने वाहून आणल्यामुळे तिचा कणा झिजतो आणि त्यामुळे कण्याच्या त्रासाने ती बेजार असते. या सगळ्या आरोग्यहानीचा परिणाम असा दिसतो की चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांचे वय, असलेल्या वयापेक्षा जास्त वाटते.. वार्धक्य लवकर येते. शहरात रहाणाऱ्या बाईपेक्षा गावातली बाई कमी जगते. कारण गरीबीमुळे अशा समस्यांना ‘ती’ला तोंड द्यावे लागते. जसजसे वय वाढते तसतसा वजन उचलल्यामुळे होणारा त्रास जास्त व्हायला लागतो आणि त्यामुळे स्वाभाविकच हे काम वयाने लहान असणाऱ्यांकडे जाते. हे चुलीसाठी लाकूडफाटा आणायचे काम इतके अपरिहार्य असते की अनेकदा गरोदर महिलांना सुद्धा हे काम करावे लागते. त्यामुळे आपल्या गारोदर पणाच्या तपासणीसाठी येणाऱ्या महिलांमध्येही गर्भपाताच्या समस्येला सामोऱ्या जाणाऱ्या काही थोड्या नाहीत.  लाकूडफाटा तोडीने निसर्गाचीही हानी होते. एक घर किमान ५ टन लाकूड तोडते तसे आख्खे गाव लाकूड फाटा आणते. पण लाकूड तोडणारे घर वर्षाला ५ टन लाकूड तयार होईल एवढी झाडे लावत नाही. यामुळे लाकडे मिळण्याची ठिकाणे दिवसेंदिवस गावापासून लांब लांब जायला लागली आहेत. पूर्वी जंगले/ लाकडासाठीची माळराने जेवढी गावाजवळ होती तेवढी आता राहिली नाहीत, असे सर्वच ग्रामीण भागात वयाने मोठ्या असणाऱ्या महिला सांगताना दिसतात. फक्त ‘पर्यावरण दिवस’ साजरा करण्यासाठी केलेले वृक्षारोपण यासाठी उपयोगी पडत नाही.  चुलीबद्दल वैज्ञानिक माहिती: आपण ज्या चुली नेहमी बघतो, ज्या चुलीवर ग्रामीण भागात स्वयंपाक केला जातो त्या चुलीचा जाळ चुलीवरचे भांडे जेवढे गरम करते त्यापेक्षा जास्त आजूबाजूची हवा गरम करते म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचे तर पारंपारिक चुलीची कार्यक्षमता (एफिशियंसी) फारच कमी असते. किती कमी असते तर फक्त १३-१४% असते. निळी ज्योत असणारे इंधन प्रदूषण मुक्त आहे पण परवडत नाही. इंधन म्हणून गॅस वापरायचा तर दिवसाची खर्च २०-२५ रुपये येतो तेवढा करता येत नाहीत अशी घरे अजून आहेत. एखाद्या संध्याकाळच्या हॉटेलच्या जेवणाचे दीड-दोन हजारांचे सहज बिल भरणाऱ्या हल्लीच्या मध्यमवर्गाला हे माहिती तरी आहे का?  कार्यक्षमता चांगली असणारी चूल वापरणे हे अनेक आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या प्रश्नांचे उत्तर आहे ही लक्षात घेऊन स्त्री शक्ती प्रबोधनच्या कामाचा भाग म्हणून आपण आरोग्यपूर्ण, पर्यावरण पूरक चुली वाटप करण्याचे काम आपण केले, ही काम गेली ८ वर्ष सुरू केले आहे. माहिलांना आधुनिक चुलीचे प्रात्यक्षिक दाखवले. ती चूल अशी आहे की ज्या चुलीला खालून हवा येण्यासाठी पंखा आहे, तो चार्ज करायची सोय आहे. पंख्यामुळे चुलीतील इंधनाला जळताना पुरेशी हवा (ऑक्सीजन) मिळतो, त्यामुळे कार्यक्षमता ४०% पर्यन्त वाढली आहे. एरवी ७-८ किलो लागणाऱ्या लाकडं ऐवजी ८०० ग्रॅम इंधनकांडी मध्ये तेवढीच उष्णता मिळते, आधुनिक पंख्याच्या चुलीत इंधनकांडी वापरता येते जी शेतात तयार होणाऱ्या काडी-कचऱ्या पासून बनवता येते. या चुली वापराचा उद्देश एकच की ग्रामीण बाईचे आयुष्य सुधारले पाहिजे.  अशा चूल वापरण्या बद्दल जाणीव जागृती केली. चूल वापरायची प्रात्यक्षिके गावोगावी करून दाखवली. एका कुटुंबासाठी कोणीतरी ७-८ हजारांची देणगी दिली तरी वापरणाऱ्या कुटुंबाने चूल नक्की वापरावी म्हणून ५०० रुपये तरी भरायचे. या प्रत्येकक्षिकांमुळे जाणीव जागृती तर झालीच पण नावनोंदणी सुद्धा चांगली झाली. सध्या भोर-वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागात अशा ३०० पेक्षा जास्त चुलींचे वाटप केले आहे. अपवाद वगळता सगळ्या वापरात आहेत. त्यामुळे बाईला रणरणत्या उन्हाळ्यात विश्रांती मिळाली आणि वेळही मिळाला. या प्रयोगासाठी आधी वैयक्तिक देणगीदारांनी पुढाकार घेतला यशस्वी होत आहे असे दाखवल्यावर कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा निधी या उपक्रमाला दिला म्हणून हे जमले. तरीही ते सिंधूतील बिंदू इतकेही नाही!  एका कुटुंबासाठी ५ टन लाकूड उत्पादन करायची व्यवस्था वृक्षारोपणातून करण्यापेक्षा, आहेत तिच झाडे तोडण्यापासून वाचवणे, हा हिरवाई टिकवण्याचा खात्रीशीर उपाय होऊ शकतो असे यातून लक्षात आले.  या चुली वाटापाला पूरक असणारी इंधन कांडी बनवणारी २ युनिट भागातच चालू आहेत. त्या बद्दल पुढे कधीतरी ऐकूया! पण आशा अनेक उनिटस् ची गरज आहे ही तुमच्या लक्षात आले असेल. सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी, ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना १३  – आरोग्यदायक चूल Read More »

मागे वळून बघताना १२ – गोष्ट एकत्र उद्योगाची

आज पर्यंतच्या अनुभवात आपण यशस्वी झालेल्या गोष्टी बघितल्या पण सुरु केलेली प्रत्येकच गोष्ट हवी तशी यशस्वी होते असं नाही, काही वेळा, काही प्रमाणात यश पदरी पडलेले असते अशा एका उद्योग प्रकाराची गोष्ट आज पाहूया!  १९९५ साली वेल्ह्यात बचत गट सुरु झाले. अगदी किरकोळ म्हणजे महिन्याला २५ रुपये बचत असली तरी दर महिन्याला बचतीचे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न होताच, म्हणून जोडीनेच स्वयंरोजगाराचे काम सुरु केले. त्या सुमारास शासनाचा जोर होता की महिलांनी गटाने एकत्र येउन उद्योग करावा पण असे उद्योग कुठे यशस्वी झालेला ऐकलेले नव्हते. एखाद्या महिलेने स्वबळावर स्वयंरोजगाराच्या कामाला सुरुवात करणे हे त्या काळात फारच अवघड होते याची कल्पना होती म्हणून शासन म्हणतेच आहे तर गटानी एकत्र उद्योग करून बघू असे ठरवले! कुठलाही उद्योग करायचा ठरवला तर उद्योग यशस्वी होण्यासाठी तयार मालाची खरेदी कोण करणार हे माहित असायला हवे. जोपर्यंत शाळा आहेत आणि काळा फळा वापरला जातो तोपर्यंत खडू लागणारच या गृहीतावर १९९६ साली आपल्या वेल्ह्यातील महिलांनी गटाने पहिला खडू निर्मिती उद्योग करायचा ठरवला.  खडू कसा बनवायचा ते शिकवले, कच्चा माल कुठून आणायचा ते सुद्धा शिकवले. अतिशय उत्साहाने सगळे समजून महिलांनी परिश्रम करून खडू बनवले. वेल्ह्यातील सगळ्या शाळा सरकारच्या मालकीच्या मग ‘सरकारच विकत घेईल का?’ विचारायला हवे असे म्हणत बचत गटाच्या महिला पंचायत समितीमध्ये खडूचा नमुना घेउन गेल्या. आणि ‘हो’कार मिळवून परतल्या! खडूचा कच्चामाल कोणी आणायचा हे त्यांनी ठरवलं, परवडणारा दर काय असावा हे त्यांनी ठरवलं, वाटप करण्यासाठी कमीत कमी खर्च यावा म्हणून स्थानिक जीपवाल्याशी बोलणे केले, सगळं परवडणाऱ्या खर्चात होईल असे पाहिले आणि महिलांनी गावोगावी जाऊन शाळांना खडूचे वाटप केले सुद्धा. कधीच शाळा न पाहिलेल्या महिलांनी पुढच्या पिढीच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ केली!  आता पुढची अडचण डोळ्यासमोर आली ती म्हणजे दिलेल्या खडूच्या बिलाची वसुली कशी करायची? हे सगळं करेपर्यंत मलाही ‘शासन कसं चालतं’ याची पुरेशी कल्पना नव्हती आणि त्यामुळे मीही त्यांच्या सारख्याच  भाबड्या समजूतीत होते की ज्या अर्थी शासनाने खडूची ऑर्डर दिली त्याअर्थी पैसेही सहज मिळतील! पण तसे झाले नाही… महिनोंमहिने हेलपाटे मारावे लागले… हळूहळू गटाची प्रेरणा कमी व्हायला लागली. आता तर गटाची प्रेरणा टिकणे हेच मोठे आव्हान होउन बसलं … म्हणून या गटाला ज्ञान प्रबोधिनीच्या पौरोहित्य विभागाच्या मदतीने ‘समिधा गोळा करणे’ असे काम मिळवून दिले. हजारो रुपयांच्या समिधा या गटांनी पुण्यात आणून विकल्या. त्यातून खडूच्या वसूलीसाठी शासकीय अधिकाऱ्यांना तोंड द्यायची हिम्मत आली. जवळजवळ दोन वर्षांनी जेमतेम घातलेली मुद्दल बाहेर येऊन खडूचा व्यवसाय गुंडाळून ठेवायला लागला. खरेतर समिधा विकण्याचा उद्योग केल्यामुळे शासनाकडून खडूची रक्कम मिळवता आली, नाहीतर हेलपाटे मारण्यासाठी लागणारं महिला गटाचं मनोबलही कमी पडलं असतं. तर काय खडू निर्मिती उद्योग ना नफा ना तोटा या तत्त्वावर आपण बंद केला! त्यातून मी शिकले की तोटा झाला नाही हा मोठ्ठाच फायदा!! प्रयोग दुसरा : ज्ञान प्रबोधिनीची शिवायपूरला यंत्र शाळा चालू होती. आपण महिलांना फक्त एरवी महिलाच करू शकतील अशाच कामात गुंतवायचे नाही असे ठरवलेच होते तेव्हा संधी चालून आली की व्हऱ्लपूल वॉशिंग मशिनला शॉक अबसॉर्बर असेंबल करून हवे होते. मग काय महिलांना सोल्डरींग शिकवले आणि जॉब करून द्यायला सुरुवात झाली. गटाने उद्योग केला. गटाच्या नावाने चलन तयार केले. जमले.. पण कारखानाच त्या भागातून हालला त्यामुळे जास्त काळ जमलेला उद्योग करता आला नाही! तिसरा उद्योग: महाराष्ट्र ग्रामीण पत पुरवठा म्हणजेच एम आर सी पी योजनेतून 1998 च्या सुमारास आंबवणे गावात युरिया-डीएपी खताच्या ‘विक्रम’ नावाने ब्रिकेट करायला सुरुवात केली. दोन खतं एकत्र करून प्रेशरने त्याच्या ब्रिकेट होतील असा उद्योग, यंत्र खरेदी करून सुरु केला. जे कधी बघितले नाही त्याचे उत्पादन कर्ज घेउन करायचे हे शिकवताना खूपच अवघड जात होतं. शासकीय योजनेतून निधी मिळत होता म्हणून अंबवणं गावाच्या गटाला तयार केलं. या उत्पादनाची मुख्य खरेदी ज्ञान प्रबोधिनी संस्था स्वतः करणार होती त्यामुळे अडचण नव्हती. उत्पादन १ टन झाल्यावर आनंदाची बातमी कळली की संस्थे बरोबर आता गोळीखत वापरासाठी कृषी खात्यानी सुद्धा पुढाकार घेतला आहे. कृषी खाते सबसिडी देणार आहे. याचा प्रचार झाल्यामुळे मागणी चांगली वाढली. जिथे खाजगी लोकं खरेदी विक्री करणार होते ती प्रत्येक गोष्ट यशस्वी झाली पण जेव्हा कृषी खात्यानी दोन टन खरेदी करायचं आमिष दाखवून प्रत्यक्ष खरेदीही केली, तेव्हा मात्र हा उद्योग डब्यातजायला सुरुवात झाली कारण त्याची पै पै वसुली करण्यासाठी लागणारं मनोबळ गटाकडे शिल्लकच राहीलं नाही. खरंतर वेल्हे तालुक्यात महिलांनी चालवलेला हा एकमेव यशस्वी उद्योग असल्यामुळे त्या दोन वर्षात जणूकाही शासनाकाडे आलेला प्रत्येक पाहुणा हे युनिट बघायला आला, त्याने गटाला भेट देली. पण त्या पाहुण्यांचं चहापाण्याचं बिल मात्र गटाला कधीच मिळालं नाही. हा उद्योग, उद्योग म्हणून यशस्वी झाला पण पाहुणचारासाठी करावा लागलेला भरमसाठ खर्च गटाला परवडला नाही आणि गट कर्ज फेडू शकणार नाही म्हणजे ‘बुडीत’ झालं असं बँकेने जाहीर केले. पै सुद्धा परत न करता कर्ज माफ होणार होतं पण आपण अस करायला कधीच शिकवले नाही. उलट गटाला आवाहन केले की आपला गट बुडीत जातोच कसा? असं चालणार नाही, नफा झाला नाही तरी चालेल पण ना नफा ना तोटा या तत्त्वावर आपण गट बंद करू. त्यानंतर गटात पुन्हा एकदा जिवंतपणा आणला आणि युनिट चालू झालं. काळजी घेऊन.. एकही रुपयाची शासकीय ऑर्डर घेतली नाही. फक्त प्रबोधिनीच्या बचत गटाच्या संपर्काचा वापर करून, गटाने बँकेकडून घेतलेले कर्ज पै-पै फेडलं आणि यंत्र विकलं. यंत्र विकून आलेले पैसे गटाचा फायदा होता, तो गटाने वाटून घेतला. विशेष म्हणजे एका सभासदाच्या वाट्याचा नफा संस्थेला गटाने स्वखुशीने दिला….  या टप्प्याला गट गेला, या निमित्ताने गावात महिलांनी चालवलेला उद्योग ‘चालतोस कसा?’ म्हणूनही खूप भांडण झाली. त्या सगळ्यावर वेगवेगळ्या प्रकारानी महिलांनी मात केली. तालुकाभर चर्चा होऊन शेवटी कोणालाही अडचण नाही अशा टप्प्यावर हा गट उद्योग बंद केला आणि श्रीरामनगरच्या गटाने ते यंत्र खरेदी केले. श्रीरामनगरच्या गटाने नवीन उद्योगाला सुरुवात केली. हा युरिया ब्रिकेटचा एकत्र उद्योगाचा चौथा प्रयत्न!  श्रीरामनगरच्या गटाला जुन्या यंत्रावर जमतंय असं लक्षात आल्यानंतर जुने यंत्र वापरून वापरून रसायनामुळे निकामी झाले, मग नवीन यंत्र खरेदी केले. गटाच्या प्रमुख आशाताई गोगावले यांनी हवेली पंचायतीमध्ये चकरावर चकरा मारल्या आणि कुठल्याही टेबलवर एक रुपयाची सुद्धा लाच न देता काम करून घेतले. राज्यपालांच्या हस्ते गटाच्या उद्योगाचे उद्घाटन झाले. हा उद्योग गटाने व्यवस्थित चालवला. या गटामध्ये महिलांनी एकत्र काम करून युरिया ब्रिकेटचे उत्पादन केले हे खरे पण या वेळेपर्यंत आलेल्या अनुभवाने काम करणार्या गटाला दिवसाच्या रोजंदारीवर मजुरी देण्याऐवजी एक टन काम केले की ठराविक मजुरी असे गणित आपण करून दिले. हा उद्योग यशस्वी झाला. गटाला सर्व कर्ज फिटेपर्यंत ऑर्डर मिळण्यासाठी, मिळवण्याची संस्थेने मदत केली. गावातील स्थानिक लोकांनी सुद्धा मदत केली या गटानी खताची खरेदी विक्री करण्यासाठी परवाना सुद्धा काढला. जोपर्यंत गट एकसंध होता तोपर्यंत हा उद्योग अतिशय यशस्वी चालला. पाच-सहा वर्षानंतर त्याच गटाला तो उद्योग त्याच प्रेरणेने चालवता येणार नाही असे लक्षात आले, तेव्हा हा

मागे वळून बघताना १२ – गोष्ट एकत्र उद्योगाची Read More »

मागे वळून बघताना ११ – नवी उमेद उपक्रम

 हिरकणी कामाचा पुढचा टप्पा म्हणजे नवी उमेद उपक्रम!! मुलासाठी (आपत्यासाठी) काही चांगले करायला सुरवात करायची तर सुरुवातंच आईच्या आत्मसन्मानाने करावी लागते कारण मी काही तरी करु शकते असा स्वसंवाद हिरकणीने करायची गरज असते. सध्याच्या ग्रामीण महिलेच्या आयुष्यातली अगतिकता म्हणजे नातेवाईकांनी ठरवलेल्या नवऱ्याशी लग्न करणे. अनोळखी घरात आता हेच आपलं म्हणून नवीन आयुष्याला सुरुवात करणे. या टप्प्यावर ‘ती’ला ‘ती’ची म्हणून असणारी जी काही असेल ती ओळख पुसावी लागते… आणि नवीन ओळख निर्माण करावी लागते.  नुकतेच लग्न झालेल्या कुठल्याही मुलीला लग्न लागून काही तास झाले असतानाही तिचे नाव विचारले तर ती वडिलांच्या नावाऐवजी नवऱ्याचे नाव लाऊन सांगते आणि ऐकणाऱ्या सगळ्यांनाही ते बरोबरच आहे असे वाटते हा सामाजिक संकेत आहे. पण हे नाव कागदोपत्री लागते का? कधी लागते? ज्याचे नाव ती लावते त्याला ‘ती’चे नाव कायदेशीररित्या बदलण्यासाठी काही करावे लागते हे माहिती असते का? ते सगळे करण्याची जबाबदारी वाटते का? तर नाही!! आणि त्यामुळे ‘ती’ सामाजिक दृष्टीने माहेरच्या नावाने अस्तित्वात नसते नि शासकीय दृष्टीने सासरच्या नावाने अस्तित्वात नसते. आपल्याला अस्तित्वच नाही हे तिला माहित असतंच पण ‘खरंच अस्तित्व नसतं’ हे स्विकारणं खूप अवघड असतं. या टप्प्यावरच्या अनेकींशी बोलताना लक्षात आलं की हा काळ अनेकींच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता. तेव्हा नेमकी नातेवाईकांपलिकडच्या आधाराची गरज असते.  हिच नवी उमेद या प्रकल्पाची मध्यवर्ती कल्पना. या प्रकल्पाच्या बैठकीत सुरवातच ‘मँरेज सर्टिफिकेट काढले आहे का?’ या प्रश्नाला हिरकणींनी तोंड देऊन होते. मुलांच्या वाढीवर बोलल्यामुळे जरा मोकळा झालेला गट अशा प्रश्नांनाही खरी उत्तरे देतो ते प्रतिप्रश्न विचारुनच …. ‘हे सर्टिफिकेट म्हणजे काय असतं?’, ‘सर्टिफिकेट मिळवायला परिक्षा द्यावी लागते का?’, ‘हे कोण काढतं’, ‘कुठं मिळतं?’ …… लग्न होऊन पोरं झालेल्या प्रत्येकीवर पोरं झाल्यामुळे आता ही सासरची झाली असा सामाजिक शिक्का बसलेला असतो, तरीही साधारण ६०℅ महिलांकडे तरी मँरेज सर्टिफिकेट नसते… त्यातल्या ५०% महिलांना हे काय असते हे सुद्धा माहिती नसते. मग चला ते काढू या… अशा कामाने त्यांच्या अस्तित्वात येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. त्यानिमित्ताने गावातल्या अंगणवाडी ताईची ओळख होते, ग्राम सेवक, तलाठी कोण आहे? ते कुठे बसतात, गावात कधी येतात हे समजते. ग्राम पंचायत कुठंय? हे सुध्दा कळते. नवीन नवरीला देवाच्या पाया पडायला नेतात त्यामुळे ग्रामदेवतेचं मंदिर कुठे आहे ते माहिती असते, आपल्या प्रयत्नाने ग्राम पंचायत कुठे आहे ते समजते. नागरीक म्हणून मतदानाचा अधिकार बजावायचा तर आधी कागदोपत्री अस्तित्वात यावे लागले! ही त्याची पहिली पायरी!  एकूणच महिलांना ‘आर्थिक’ विषय महत्वाचे असले तरी ‘आपले’ वाटत नाहीत म्हणून वेळ आल्यावर समजून घेण्यापेक्षा वेळेत समजून घ्यावेत या हेतूने या हिरकणींना बचतीची सवय लागावी म्हणून बँकेत बचत खाते काढायला सांगायचो.  साधे बचत खाते बँकेत काढायचे तर नवीन नावाने pan हवा, त्याच नावाने आधार हवे या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यापासून सुरुवात करावी लागते .. यातल्या प्रत्येक कामाला काही महीने लागतात. त्यामुळे अशी कामे करता करता एकीकडे या वयाला साजेशी आरोग्याची माहिती सांगायची. हिरकणीला स्वतःचे हिमोग्लोबिन किती आहे हे माहीत असायला हवे. त्या निमित्ताने गावाच्या जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे आहे गावात औषध देणारी आशा आरोग्य सेविका कोण आहे ती कुठे रहाते हे माहिती होते. जाताजाता पाळी चक्र समजणे, सँनिटरी नँपकिन बद्दल माहिती घेणे असेही विषय ओघाने पुढे यायचे. हिरकणी सत्र घेणारा स्थानिक कार्यकर्त्यांचा गटच नवी उमेद याही उपक्रमात काम करतो त्यामुळे संवाद मोकाळेपणा असतो. असा संवाद करण्याचे घेणाऱ्या गटाचे प्रशिक्षण नियमित चालू असते. नवी उमेद या उपक्रमाचे ही चौथे वर्ष चालू आहे,  हे सगळे करताना लक्षात घ्यायचे की गटातील हिरकणी जर पहिल्या बाळाची असेल तर तिचे लग्न होऊन फार दिवस झालेले नसतात त्यातले बरेच दिवस माहेरी ये-जा करण्यात गेलेले असतात, तशी ती संसारी फारशी रुळलेली नसते.. तिचा घरातला संवादही पुरेसा सांधलेला असतोच असे नाही. या टप्प्यावर छोट्या कुरूबुरी सुरु होण्याचा धोका असतो.. आशा कुरूबुरीचे मानसिक ताणात रूपांतर होता कामा नये म्हणून तिला छोट्याशा गटात बोलते करणे हे सुद्धा एक महत्वाचे काम करावे लागते. हिरकणी गटाला सासरच्या मंडळींकडून नातेवाईकांचा परिचय करून दिला जातो, तसा नवी उमेद उपक्रमातील सहभाग नात्यापालिकडच्या, तिच्या वयोगटातल्या गावातल्या समवयस्कांचा परिचय करून देतो.. मग त्यांना गावातच मैत्रिणी मिळतात परिणामतः गाव लवकर आपलं वाटायला लागतं. छान गट जमला आणि एखाद्या गटाची दिवसभराची मुलांना घेऊन कुठेतरी सहल निघाली तर मग गटातल्या हिरकणींचे मैत्रीबंध दृढ झालेच म्हणून समजा मग त्यांची ताकद गावाला हळूहळू कळू लागते. पण या पुढच्या सगळ्यांची सुरुवात हिरकणींच्या एकत्र बसण्यापासून सुरू होते हे विसरू नका याचेच नाव नवी उमेद, जे कागदपत्र काढण्यापासून तीला अस्तित्वात आणण्यापासून सुरू होते! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना ११ – नवी उमेद उपक्रम Read More »

मागे वळून बघताना १०: हिरकणी उपक्रम 

बचत गटात महिला आल्यामुळे नवीन उत्साहाने खूप काही शिकायला लागल्या, पण एका टप्प्यावर आल्यावर त्यांना वाटायला लागतं की आता यापुढे ‘शिकणं’ अवघड आहे… मग पुढच्या पिढीचा विचार स्वाभाविक  सुरु झाला. बचत गटात मनापासून सहभागी होणाऱ्या महिलांचे सामाजिक भान बदलले, आयुष्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोनही बदलला. ‘मुलीला कशाला शिकवायचं… ती तर परक्या घरचं धन!’ असं वाटणं बदललं. एवढंच काय पण सूनेकडे बघण्याची दृष्टी सुद्धा बदलली. ‘माझ्या सासूने माझी पोरं सांभाळली असती तर.. मी घरात अडकून पडले नसते…’ असं म्हणणारी प्रत्येक सासू सुनेच्या पाठीशी उभी राहिली. नातवंडे तर आपलीच आहेत असं म्हणून त्यांना सांभाळायची जबाबदारी घेऊन सुनेला बाहेर पडायला प्रोत्साहन देती झाली.  बचत गटाच्या कामाचे हे त्रिदशकपूर्तीचे वर्ष असले, तरी पुढच्या पिढीसाठी बचत गटाशिवाय रचना उभी करण्याचा टप्पा यायला १९ वर्ष उलटावी लागली.  या नवीन सुनांची जोपर्यंत प्रबोधिनीच्या कार्यपद्धतीची ओळख होत नाही तोवर घरुन पाठिंबा असला तरी कामाची गोडी लागणार कशी? म्हणून ’हिरकणी’ या उपक्रमाची सुरुवात केली. हिरकणी उपक्रमाचे हे ११वे वर्ष!  आपल्यासाठी हिरकणी म्हणजे ०-६ वयोगटातील मूल (आपत्य) असणारी माता! आपण या मातांसाठी मुलाच्या वाढीमध्ये त्यांनी काय व कसे योगदान द्यायचे हे शिकवला सुरवात केली. गावातच एका दिवशी ३ तास असे पंधरवड्यातून एकदा प्रशिक्षण घ्यायचे अशी ३ महिन्यात ६ वेळा प्रशिक्षण देण्याची योजना केली, प्रशिक्षणा आधी एक दिवस मेळावा घेऊन ‘हिरकणी’ ही काय कल्पना आहे ही सांगायचे, प्रशिक्षणा नंतर शेवटी समारोपाचा दिवस हिरकणींच्या मनोगतांसाठी मोकळा ठेवायचा! असा छोटासा, वेळेत बांधलेला उपक्रम. हा उपक्रम  पहिल्या पासून तृप्तीताईंनी फुलवला.  हिरकणी उपक्रमाने जरा शिकलेली, ‘काही तरी करावंसं’ वाटणारी, नवी कुमक या निमित्ताने कामात दाखल झाली. कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या मर्यादा तर होत्याच पण तरीही जिने स्वतः मुलाच्या घडणीला जाणीवपूर्वक वेळ दिला, तिने मुलाला मारणे थांबवले. मुलाची शब्द-संपत्ती वाढावी म्हणून स्वतः गोष्टी सांगितल्या, मुलाच्या सूक्ष्म स्नायू विकासासाठी प्रशिक्षणात सांगितलेले खेळ घेतले, शाळेत न शिकवला जाणारा पंचेद्रिय विकास होण्यासाठी विचार करून काही कृती केल्या, तिला वाटायला लागले की हे मुल माझं आहे! या मातृत्वाच्या जबाबदारी पुढे मुलगा का मुलगी हा भेद सहज विरघळून गेला, समानतेचा संस्कार झाला. अशा हिरकणीला आनंद देणारा, तरीही समृध्द करणारा मातृत्वाचा अनुभव स्वस्थ बसू देईना. मग काही म्हणू लागल्या, ‘ही अशी मातृत्वाची जबाबदारी कुठे शिकवंत नाहीत. आम्हाला वाटायचं मूल शाळेत गेल्यानंतरच शिकतं पण तसं नाही. मीच माझ्या बाळाची पहिली शिक्षिका आहे!’ काहीना हे इतरांनाही सांगावंस वाटायला लागलं. अनेक जणी ‘मी माझ्या बाळासाठी काय काय केलं?’ हे सांगायच्या निमित्ताने हिरकणी प्रशिक्षण गटात आल्या नि प्रशिक्षिकाच झाल्या.  आता अशा ३५-४० जणी घरचं सगळं सांभाळून, घरच्यांच पाठींब्याने कामाला नियमित येत आहेत, या शिवाय ५०-६० जणींनी  प्रासंगिक संधी घेतली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधीच्या पिढीपेक्षा थोडं जास्त शिकूनही गावातलंच सासर मिळाल्याने, काही जणी मनातून खट्टू होत्या… त्यामुळे कुटुंब संबंधात काही कुरकुर चालू असायची. हिरकणी उपक्रमाने त्यावर फुंकर घातली गेली, जी परिस्थिती बदलता येणार नाही ती स्विकारण्याचं बळ त्यांना मिळालं.  हिरकणी दशकपूर्ती पर्यंत बचत गटाचे काम चालू असणाऱ्या ५५ गावात हा उपक्रम झाला, त्यात ९८६ मातांचे प्रशिक्षण झाले. अशा मोठ्या अनुभवाने अभ्यासक्रमात अनुभवाने बदल होत गेले. अशा समृद्ध अनुभवातून या उपक्रमाची आता प्रशिक्षण पुस्तिका तयार झाली. ६ दिवसांच्या प्रशिक्षणात १८ सत्रात काय शिकवायचे? कसे शिकवायचे? गृहपाठ काय द्यायचा हे सुद्धा ठरले. आईचे मूलाप्रति कर्तव्य म्हणजे फक्त शारीरिक भूक भागवण्यासाठी खायला देणे एवढेच नाही तर त्यापलीकडे बरेच आहे हे मातांना या सहभागामुळे समजले, त्यातून मुलांचे बालपण आनंदी होत गेले. न रडणारी, न चिडचिड करणारी मुले घरातले वातावरणही आनंदी ठेवतात ही लक्षात आले. अशा अनुभवामुळे या उपक्रमाच्या दशक पूर्ती वर्षांनंतर आता आपल्या भागापलीकडे जायची विस्तारायची तयारी झाली असे वाटायला लागले! मग गट ठरवून संधी मिळवून बाहेर पडला.  या वर्षी पुण्यात व पुण्याबाहेरच्या ७ केंद्रावर मिळून २३ ठिकाणी एकाच वेळी हिरकणी उपक्रम चालू आहे. यामध्ये ४८८ हिरकणी सहभागी आहेत. १२ गावातील ३३ प्रशिक्षिका घरचं सगळं सांभाळून हा उपक्रम घेत आहेत.  बचत गट कामाच्या पाठबळावर सुरु झालेला हिरकणी हा उपक्रम आता सुटवंग होऊन नवमातांचा आत्मसन्मान वाढवण्याच्या कामाचा शुभारंभ करणारा ठरत आहे! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना १०: हिरकणी उपक्रम  Read More »

मागे वळून बघताना ९ – कातकरी विकास उपक्रम

कातकरी गटासाठीचे काम तसे नवीनच म्हणजे वेल्हे तालुक्यात २०१७ पासून सुरू झाले. वंचित गटासाठी काम करायचे आहे असे म्हणणारी प्रतिभाताई वेल्हे निवासात मुक्कामी आली तेव्हा कातकरी समाजाच्या विकास कामाला सुरुवात झाली.  वेल्ह्यातली कातकरी वस्ती म्हणजे मुख्य समाजापासून वंचित राहिलेली वस्ती, तशी परिचित होती पण दुरून-दुरून .. कामाला सुरुवात केली तेव्हा ताई वस्तीवर गेली की तीला दिसायची ती शाळेच्या वेळात शाळेत न जाता उंडारणारी पोरं! वस्तीवर काम सुरू करायला भेट दिली तरी काही प्रतिसादच नसायचा. शासन मुलांनी शिकावे म्हणून प्रयत्न करत असते पण शाळेत आलेल्या मुलांसाठी …. जे शाळेतच येत नाहीत त्यांच्यासाठी काय? असा मुख्य प्रश्न होता.  कातकरी समाज मागास कारण शिक्षण नाही.. शाळेत बोललेली भाषा समजत नाही, एका जागेवर एवढा वेळ बसायची सवय नाही .. ते बघून वाटायचे जर शाळेत जाऊ शकणारी मुले जर आज शाळेत गेली नाहीत तर विकासायाची सुरुवातच पुढच्या पिढीपासून होईल म्हणून ‘चला त्यांना शाळेत जावे असे वाटायला मदत करूया’ अशा उपक्रमाने सुरुवात केली. असे काम वस्तीवरच्या किती मुलांसाठी करावे लागणार आहे हे कळावे म्हणून वस्तीचे सर्वेक्षण केले. त्यात मुला-मुलींची नेमकी यादीच मिळाली. आणि आजही ५-७ भावंडे असणारी कुटुंब अस्तित्वात आहेत अशी सर्वेक्षण करणाऱ्या ग्रामीण मुलींना सुद्धा धक्का देणारी माहिती समोर आली. या सर्वेक्षणात कौटुंबिक माहिती बरोबर आर्थिक, रोजगारा विषयी, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, आरोग्य या विषयीचीही माहिती घेतली.  वस्तीवरच्या कामाची सुरुवात, वस्तीवर साप्ताहिक भेट देण्यापासून केली. या साप्ताहिक भेटीत मुलांचे शारीरिक खेळ, गाणी शिकवणे, गोष्टी सांगणे आशा उपक्रमापासून सुरू केले. हळूहळू एक-एक जण गटात यायला लागला/ली. वस्तीवरचे काम करणाऱ्या युवती जवळपासच्या गावातल्याच होत्या, तरीही अशा वस्तीवर प्रथमच जात होत्या. या ताई कॉलेजमध्ये जाणाऱ्या, वयाने लहान असल्यामुळे मुला-मुलींना जवळच्या वाटायला लागल्या. आपल्या उपक्रमात नियमित सहभागी होणाऱ्या मुलांचे भावविश्व समृद्ध व्हावे म्हणून पुण्यात सहली काढल्या, उपक्रमात पुण्यातून जाऊन सहभागी होणाऱ्या रसिकाताईच्या आग्रहाने, नवीन काही शिकायला मिळेल अशी सहामाही शिबिरे घेतली. या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपलेपणा वाढला, मग वैयक्तीक स्वच्छतेच्या सवयी असा विषय हाताळणे सोपे झाले. रोज आंघोळ करायची, वेणी घालायची, दात घासायचे याचे प्रात्यक्षिक दाखवून आग्रह धरायला सुरुवात केली. स्वच्छ कपडे घातले की मग शाळेतली बाकी मुले चिडवणार नाहीत असेही हळूहळू सांगायला सुरुवात केली. शाळेत जाताना पायात चप्पल असावी म्हणून एका ताईंनी तर गटातल्या प्रत्येकाला नवी कोरी चप्पल खरेदी करून प्रोत्साहन दिले. अगदी बक्षीस म्हणून साबण, तेल बाटली, कंगवा, पेस्ट, ब्रश अशा गोष्टी देणगी मिळवून वाटप सुरू केले.. शाळेतल्या सरांना विश्वासात घेऊन, ‘मुलांना आवरून शाळेत पाठवतो आहोत…. शिकायला बसतील असे बघा’ इथपर्यंत बोलणी केली.  प्रत्येक कातकरी वस्तीवरचे प्रश्न वेगळे होते. नसरापूर वस्ती हायवेच्या एका बाजूला आहे तर शाळा दुसऱ्या बाजूला! एवढा वहाता रस्ता छोटी मुलं ओलांडणार कसा? म्हणून मुले शाळेत जात नाहीत असे लक्षात आले. पालकांनाच शिक्षणाचे महत्व समजत नाही, आणि हातावरचे पोट, कामाच्या वेळामुळे शाळेत सोडायला जमत नाही मग देणगी मिळवून रोज वस्तीवरच्या सगळ्या मुला-मुलींना शाळेत सोडायला ताईची नेमणूक केली. सातत्याने केलेल्या अशा विविध प्रयत्नातून अनेक जण अधून मधून शाळेत जायला लागली, साधारण २५ जण मात्र नियमित शाळेत जायला लागली ही विशेष! आपल्या वेल्हे निवासात सध्या ३ जणी राहून नियमित शाळेत जात आहेत. त्यांची घरं शाळेजवळ असली तरी शाळेत जाण्यासाठी पूरक वातावरण घरात/ वस्तीवर नाही म्हणून सतत संवाद केल्यावर जागृत झालेल्या पालकांनी तिचा निवासात प्रवेश घेतला! त्यांत्यातल्या ६ जणांचे शिक्षण १०-११ वी पर्यन्त झाले. म्हणजे ते शासकीय सेवेत रुजू होऊ शकतात. ही संधी घेऊ शकतात. आपण नसतो तर ही संधी घेण्या इतके ते शिकले नसते.  फक्त शाळा भरती असे एकमेव उद्दिष्ट समोर ठेऊन विकास उपक्रम राबवता येत नाही. सोबत वस्ती विकासही करावा लागतो. विकास प्रक्रियेतील सगळ्या स्टेकहोल्डरसाठी काहीतरी करावे लागते. मग वस्तीवर महिलांसाठी बचत गट सुरू केले, गटात येणाऱ्या शेळी पालन करणाऱ्या महिलांसाठी खेळत्या भांडावलातून आर्थिक मदत केली, त्यांचे मेळावे घेतले, सहली काढल्या. महिलांसाठी असे काम सुरू केल्यावर मुलांचे काम, नियमित स्थिर उपस्थितीने सुरू झाले.  ३ वर्षांपूर्वी पुण्यातल्या ग्लोबंट कंपनीत काम करणाऱ्यांनी ग्रामीण भागातल्या कोणाची तरी दिवाळी साजरी करायला देणगी दिली. या निमिताने आपण कातकरी वस्त्यांवर दिवाळी साजरी केली. घरापुढे रांगोळी काढली, पणत्या लावल्या, मुलांना सुगंधी तेल/ अत्तर लावले एकत्र फराळ खाल्ला! अशा प्रकारे अनेक घरात पहिल्यांदाच दिवाळी साजरी झाली. आता आपण दरवर्षी कातकरी विकास उपक्रमाचा भाग म्हणून अशी दिवाळी साजरी करतो! जसे जसे उपक्रम घ्यायला लागलो तसतसे वस्तीवर स्वागत व्हायला लागले. मग कोणी बाळंतीण झाली की तिला मदत मिळावी असे वाटायला लागले. महिलाच काय पण पुरुष मंडळी सुद्धा बोलायला लागली. कोकणातले कातकरी मासेपालन कसे करतात हे पाहायला त्या सगळ्यांची सहल नेली. शासकीय योजनांची माहिती दिली. तेव्हा मात्र योजनेचे लाभार्थी हे कातकरी होऊ शकत नाहीत असे लक्षात आले कारण वस्तीवर राहाणाऱ्यांचा अस्तित्वाचा पुरावा असणारे आधार कार्ड यांच्याकडे नाही! मग तालुकाच्या तहसीलदार साहेबांशी बोलणी केली आणि वस्तीवरच आधारकार्ड निघेल असा शासकीय अधिकाऱ्यांसह मेळावा घेतला! संस्थेच्या या प्रयत्नांमुळे अजून बरीच जण बाकी असली तरी वस्तीवरची ६२ जण आधार कार्ड मिळाल्यामुळे अस्तित्वात आली.   आता ते सगळे शासकीय कार्यालयात आपापल्या कामासाठी जाऊ शकतात, बराच पल्ला गाठायचा अजून बाकी आहे तरी काही मुलं आपल्या प्रयत्नाने शाळेत जायला लागली, महिलांना बचत गटातून कर्ज मिळाली, त्यांनी त्या कर्जाची १००% परतफेड केली. मुख्य प्रवाहात यायचे तर असे सगळे करावे लागते, असे का करायचे तेही समजावे लागते. स्वतःच्या स्वार्थापलिकडे जाऊन जिच्यावर विश्वास ठेऊन करायचे अशी व्यक्ती/संस्था आपल्यासाठी काम करत आहे असे वाटले की विकासप्रक्रियेला सुरुवात होते, अशी कातकरी विकासाची सुरुवात काही वस्त्यांवर तरी आपल्या प्रयत्नाने सुरू झाली.   सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना ९ – कातकरी विकास उपक्रम Read More »