सुवर्णा गोखले

मागे वळून बघताना ८ – युवती विकास उपक्रम भाग २  

गेल्या भागात आपण, युवती विकास प्रकल्पातील औपचारिक शिक्षण घेत नाहीत, अशा मुलींसाठी चालवलेल्या जास्वंद वर्गाबद्दल पाहिले. या भागात नियमित शिकणाऱ्या युवतीं विषयी थोडेसे..  युवती विकास उपक्रम सुरू करायचं ठरवलं कारण ‘बाई’ झाल्यावर म्हणजे थोडे मोठे झाल्यावर, संसाराला लागल्यावर शिकण्याला मर्यादा येतात म्हणून त्यांना महाविद्यालयातच गाठू! या उद्देशाने महाविद्यालयातच तासिका घ्यायचे असे ठरवले. पहिल्या तासांना चर्चा घेतली, त्यात प्रश्न होता, ‘महाविद्यालयात शिकायला का आलो?’ असे सांगायचे. या प्रश्नाला इतकी अनपेक्षित उत्तरे यायची की ….मैत्रीण येते म्हणून, गावाजवळ कॉलेज आहे म्हणून, पुण्यातली बहीण शिकते म्हणून, शाळेतल्या शिक्षकांनी प्रेरणा दिली म्हणून, नोकरी करता येईल म्हणून, शेतावर जायला नको म्हणून, काहीतरी करायचे म्हणून ….. थोडक्यात काय तर शब्द वेगवेगळे असले तरी ‘मला ‘हे’ शिकायचे म्हणून मी महाविद्यालयात येते!’ असे कोणाचेच उत्तर नसायचे. अनेकींच्या घरी कॉलेजमध्ये गेलेले पालक नसल्यामुळेही अशी काहीही उत्तरे येत असली तरी आपण ‘मुलगी’ म्हणून काहीतरी भारी करतोय असे गृहीतक असायचे.  त्यामुळे थोडेसे बरे मार्क पडले तरी हुशार मुलगी! म्हणून मुलींना पुढे शिकावे असे वाटायचे ही महत्वाची बाजू होती. पण काय शिकायचे, का शिकायचे, कुठे शिकता येते याचे फारसे पर्याय माहिती नसल्याने प्रश्न यायचा! या माहितीमुळे युवती विकास प्रकल्प करताना ‘पुढील शिक्षणा विषयी माहिती’ मिळावी म्हणून १० वीची परीक्षा दिलेल्यांसाठी शिबिरे घ्यायला सुरुवात केली. या शिबिरात कॉमर्स, आर्ट्स म्हणजे काय? त्यात कुठले विषय विषय असतात, सायन्सला गेले तर पुढे कुठल्या वेगळ्या संधी मिळतात याचीही माहिती दिली. मुलींनी शास्त्र शाखेत जाणे, शिकून तसा विचार करायला शिकणे ही महत्वाचे होते असे वाटून असे काही वर्ष केले. आपल्या आजूबाजूचे शिकलेले असल्यामुळे सहज जाताएता कानावर पडल्यामुळे आपल्याला ही माहितीच असते, त्यासाठी माहिती मिळवावी लागत नाही पण गावात असे घडत नाही.. काय माहिती नाही हे सुद्धा माहिती नाही या टप्प्यापासून कामाला सुरुवात करावी लागते, म्हणून अशी शिबिरे घ्यायला सुरुवात केली. एकदा तर या शिबिरात भाग घेणाऱ्या मुली म्हणाल्या, ‘आम्ही सायन्सला जायला तयार आहोत पण आमच्या गावात कॉलेज नाही आणि सायन्स शिकवले जाते, त्या लांब गावच्या कॉलेजला पालक पाठवणार नाहीत.’ मग आपल्या युवती विकास उपक्रमाच्या कामाचा भाग म्हणून स्थानिक पुढाऱ्यांना भेटून हे गाऱ्हाणे कानावर घालायला सांगितले आणि अश्चर्य म्हणजे पुढाऱ्यांनी मुलींचे ऐकून वेल्हयात सायन्स कॉलेज सुरू केले! आता तिथेही काही प्रवेश होतात.  काही कोर्स पुण्यातच शिकावे लागतील म्हणून संपर्कात आलेल्या युवतींच्या शिक्षणाचा भाग म्हणून सलग काही वर्ष कर्वे शिक्षण संस्थेत निवासी शिबिर घेतले. जिला शिकायचे आहे तिने सुद्धा मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेताना बघायला हवे. म्हणून आपल्याला चालेल अशी, माफक फी असणारी, चालेल असे वातावरण असणारी, फक्त मुलींसाठी शिक्षण देणारी संस्था कर्वे शिक्षण संस्था असल्यामुळे शिबिर तिथे घेतले. शिबिर वेळापत्रकात तिथे प्रवेश कसा मिळवायचा हे पण दाखवले. अगदी तिथे प्रवेश घेणाऱ्या मुली ‘कमवा आणि शिका’ योजनेत कसे काम करतात, निवासी मुलींना रोज जेवण कसे मिळते असेही दाखवले.. परिणामतः काही जणी प्रवेश घ्यायला तयार झाल्या पण वयात आलेल्या मुलीला शिकायला बाहेर पाठवण्यासाठी तिच्या आईची परवानगी महत्वाची होती, मग एकदा तर युवतींच्या पालिकांची सहल कर्वे संस्थेत काढली. तिथले सुरक्षित हॉस्टेल दाखवले. एरवी असे पालिकांना कोण दाखवणार? अशा ठिकाणी पोहोचणे सुद्धा अवघड.. आतून प्रवेश घेण्यापूर्वी बघायला मिळणे तर पालिकांना अशक्यच होते. संस्थेच्या मध्यस्थीने शक्य झाले. असे सगळे केल्यावर जेव्हा युवती पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतील असा विश्वास आला तेव्हा तिथल्या व्यवस्थापनाशी बोलणी केली आणि सलग ४-५ वर्ष ठरवून वर्षाला ५-६ युवती प्रवेश घेतील असे पाहिले! मुलींच्या शिक्षणाचे शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या, महिला शिक्षण संस्था असणाऱ्या पुणे जिल्ह्यातली ही वस्थूस्थिती मांडत आहे.  तर! अशा प्रयत्नाने युवती शिकत्या झाल्या. मग ज्यांनी पुण्यात शिक्षणासाठी प्रवेश घेतले त्यांच्यासाठी स्कॉलरशिप उभी करणे असे कामही ओघानेच सुरू झाले. आजही चालू आहे. अशा स्कॉलरशिप मिळालेल्या युवतींची आयुष्यच बदलतात याची देणगीदारही खात्री पटली आहे त्यामुळे अशा शिक्षणाला देणगीही मिळते. जिला प्रबोधिनीतून स्कॉलरशिप दिली, तिला सांगितले की, ‘पैशांची मदत करू, पण तू काय शिकते आहेस हे सुट्टीला गावाकडे जाशील तेव्हा गावागावात जाऊन इतर युवतींना सांगायचे!’ आणि तिनेही हे काम आनंदाने केले! जी फॅशन डिझायनिंग शिकत होती तिने बुटिकच्या कामाचा अनुभव सांगतला तर जी नर्सिंग शिकत होती तिने गणवेश घालून हॉस्पिटलमध्ये जाताना किती भारी वाटते ते सांगितले. आपण एरवी काय शिकवले जाते ते सांगितले असते पण मुलींनी त्या शिक्षणात त्यांना भारी काय वाटते याचे अनुभवकथन केले. या निमित्ताने आपवादाणे घडत असले तरी शहरात शिकायला गेलेल्या सगळ्याच मुली काही मित्र मिळवून पळून जात नाहीत हेही पालिकांना कळले. आपण विचार न करता असे काही केले तर गावातल्या पुढच्या मुलींच्या शिक्षणाचा रस्ता बंद होतो हेही युवतींना पुन्हा पुन्हा संपर्क असल्यामुळे सांगितले. अशा अनुभव कथनामुळे आता ‘शिकण्याचे मार्केटिंग’ वेगळे करावे लागले नाही. शिकणारी शिकून नोकरीला लागते तेव्हा असे काही सांगते की, ‘आमच्या घरात एवढे पैसे मिळवणारी मीच पहिली!’ तेव्हा जो परिणाम होतो तो शब्दातीत असतो. आत्मसन्मान बोलण्यातून दिसावा लागतो मग अनुकरण करणारी तयार होतात.  हे काम जरी एक दोन परिच्छेदात इथे लिहिले असले तरी यातला एक एक प्रसंग घडायला.. नव्हे समजून घडवायला काही वर्ष लागली आहेत. शिकणाऱ्या युवतीच्या आईला, कुटुंबाला युवतीच्या शिक्षणाचा अभिमान वाटायला हवा तरच असे सारे घडते. काय शिकायचे यासाठी शिक्षणाच्या सोयीची नुसती माहिती देऊन पुरत नाही सोबत प्रेरणाही द्यावी लागते, हे काम करताना लक्षात आले. असे प्रेरणा जागरणाचे काम झाले तरच स्वयंस्फूर्तीने काही घडू शकते.. हे घडवताना घडवणाऱ्या व्यक्तीच्या कामाचे सातत्य आणि गुंतवणूक किती आहे त्यावर परिणाम किती लवकर होणार हे अवलंबून असते.. सुदैवाने आपल्या कामात गेल्या ३० वर्षात काम सोडून गेलेल्या अपवादानेच आहेत, टिकून राहिलेल्या स्वघोषित कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे त्यांच्या कामावरच्या निष्ठेने सारे घडत आहे ही आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.  सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना ८ – युवती विकास उपक्रम भाग २   Read More »

मागे वळून बघताना ७ जास्वंद वर्ग युवती विकास उपक्रमाची सुरुवात

महिलांना तोंड बंद ठेवता येत नाही हे ग्रामीण महिलांचे खूप मोठे भांडवल आहे, हे त्यांच्या अनौपचारिक गप्पांमधून मला नेहमी कळायचे. त्यांच्या गप्पांमधून बोलणारीच्या पारदर्शक मनाचा ठाव घेता यायचा. त्यातून खरेतर बचत गट+ अशा कामांना सुरूवात झाली. विकास होऊ नये असे कोणालाच वाटत नाही पण नेमके काय केल्याने विकास लवकर करता येईल याचा खात्रीशीर मार्ग, सोपा करून, समजेल अशा प्रकारे, कोणी सांगत नाही ही खरी अडचण आहे.. असे मला ग्रामीण महिलांनी शिकवले. विकासासाठी मुलींनी शिकायला पाहिजे कारण बाई शिकली की कुटुंब शिकते! हे वाक्य आपण सगळ्यांनी अनेकदा ऐकले असेल, निबंधात वाचलेले असेल पण म्हणजे नक्की काय त्याची प्रक्रिया काय? या वर आम्ही आमच्या गटात विचार केला. मुलीला शिकवायला हवे असे शासन कानी-कपाळी ओरडते म्हणून मुलीला शिकवायचे का? असा प्रश्न शाळेत न गेलेल्या आईला कायमच पडतो. जर मुलीने शिकायला हवे असले तर ‘ती’ला शिक्षणाचे महत्व पटू दे .. आपण काम करतो तो भाग पुण्यापासून जवळचा त्यामुळे चर्चेत महिला म्हणायच्या, ‘मोप शिकवावसं वाटतं पण पैसा लागतो.. कुठे काय शिकायचे ते कळावे लागते. आम्ही कधी शाळेत सुद्धा गेलो नाही आम्हाला काय कळणार त्यातले!’ या धाग्याला धरून आपण कामाला सुरुवात केली. गेली १५-१८ वर्ष ग्रामीण भागात युवती विकास उपक्रम राबवत आहोत. दुर्गम भागातल्या मुलींसाठी वेल्हयाला निवास सुरू केल्याचे आपण या आधी पाहिले पण जी मुलगी वयाने मोठी आहे, आता शाळेत जाणार नाही तिचे काय? म्हणून दुर्गम भागातल्या शाळा सोडलेल्या, घरीच असणाऱ्या युवतींच्या अनौपचारिक शिक्षणापासून सुरूवात केली. ‘जास्वंद’ वर्ग सुरू केला. जास्वंद वर्गाचा हेतू शालेय शिक्षण झाले नाही तरी जीवन कौशल्य आली पाहिजेत असा होता. म्हणून अभ्यासक्रम ठरवताना मजुरीचे पैसे मिळवू शकतील अशी शिवणापासून-कॉम्पुटरची डेटा एंट्री करण्याची तोंड ओळख करून देणारी १० कौशल्य होती, बँक व्यवहार कळावेत म्हणून बँकेत जाणे होते, कुठल्या कार्यालयात कुठली शासकीय कामे होतात हे समजण्यासाठी तहसील कार्यालयात आणि bdo ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाणे होते. एवढेच काय पण पोलिसांना आपण घाबरायचे नसते अगदी लहान मुलाला सुद्धा ‘पोलिसांकडे देते’ असे म्हणायचे नसते, पोलिस आपल्या मदतीसाठी असतात ही कळण्यासाठी प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जाऊन येणे असे नियोजन होते. अभ्यासकामाचा भाग म्हणून पाळी कशी येते, याचे आरोग्यचक्र समजाऊन सांगण्याबरोबरच ताप, सर्दी, उलट्या, जुलाब, अंग-डोकेदुखी यावरचे घरगुती उपाय आणि औषधे यांचा परिचय असणारे १० तासांचे आरोग्य शिक्षण होते. असा ठरवलेला अभ्यासक्रम असणारा ४ महिने कालावधीचा जास्वंद वर्ग होता. वर्षाला २-३ तुकड्यांची योजना असायची. ६५० पेक्षा जास्त युवतींसाठी आपण अशा जवळजवळ ३० तुकड्या चालवल्या. एका तुकडीत ६-७ गावातल्या युवती एकत्र यायच्या. वर्गाची फी केवळ १०० रु असायची, त्यात त्यांच्या त्यांच्या गावातून वर्गाला जा-ये करायला वाहन व्यवस्था सुद्धा केली. त्यामुळे नियमित उपस्थितीसाठी काही वेगळे करावे लागले नाही. या प्रवास सोयीमुळे घरी जायला थोडा उशीर झाला तरी पालकही निर्धास्त असायचे. वैयक्तिक देणगीदारांनी या वर्गांसाठी लागणारा साहित्याचा, प्रशिक्षकांच्या मानधानाचा आणि प्रवासाचा सर्व खर्च उचलला त्यामुळे अनेकींची आयुष्य बदलली. जास्वंद वर्गाचा हेतू शालेय शिक्षण नसल्यामुळे येणारा न्यूनगंड घालवणे.. त्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यावर काम करणे असाच होता. अभ्यासक्रमात संवाद कौशल्य प्रशिक्षणाचाही भाग होता. त्यासाठी प्रशिक्षणानंतर गावातल्याच पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणे आणि गावातच ३-४ जणींच्या गटाने लहान मुलांचा ३ तासांचा मेळावा घेणे असेही काम होते. वर्गात प्रवेश घेताना आईने बळजबरीने पाठवलेल्या युवती वर्ग संपेपर्यंत गावात उठून दिसायला लागायच्या. परिणामतः यातल्या काही विद्यार्थिनींना गावात त्यांच्या अभ्यासक्रमाचे ग्रामसभेत निवेदन करायला मिळाले तर कोणाकोणाला छोटीशी नोकरी मिळाली, कोणी ‘ताई’ झाल्यामुळे गावातल्या मुलांचे नियमित खेळ घायायला लागली तर कोणी पुन्हा पुढे शिकायला कॉलेजमध्ये जायला तयार झाली. याचा खरा फिडबॅक मिळाला तो महिलांच्या बैठकीत.. ‘ताई पोरगी वर्गाला आली की बदलूनच जाते, घरी आल्यावर आज काय केले हे तिला इतके भरभरून सांगायचे असते की तिच्या गप्पा ऐकताना माझीच का ही? असा मलाच प्रश्न पडतो.’ एक तर म्हणाली, ‘पोरीला या वर्गाला पाठवून तुम्ही बापाचे कामच सोपे केले तुम्ही!’ न समजून मी ‘काय?’ असे विचारले तर .. अगदी मोकळेपणाने तिने सांगितले, ‘या वर्गात आलेल्या पोरींना सासरकडून मागणी येते आहे …. आता या पोरींनी ठरवायचे याला ‘हो’ म्हणायचे का त्याला!’ मुलग्यांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे असे स्टॅटिस्टिक्स मी सांगायला लागले की महिला म्हणायच्या, ‘तरी बापाला पोरगी उजावायला उंबरे झिजवावे लागतातच ना.. जो पर्यन्त ‘मुलीचा बाप’ असे म्हणत नाही तोवर या आकडेवारीला काही अर्थ नाही!’ जास्वंद वर्गाने हे काम केले! मुलीला प्रतिष्ठा मिळाली.. जिच्या पाठीशी आई आहे अशा मुलीला आधी प्रतिष्ठा मिळाली. जेव्हा शाळेत कधीही न गेलेली आई बचत गटात येऊन मुलीला कुठे संधी द्यायची असे ‘शिकते’ तेव्हा आपणही म्हणू शकतो की ‘आई शिकली की कुटुंब शिकते! ’***** सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना ७ जास्वंद वर्ग युवती विकास उपक्रमाची सुरुवात Read More »

मागे वळून बघताना ६ – नेतृत्व!

बचत गट बैठकीला आल्यावर, महिला ज्या गप्पा मारायच्या, त्यातून लक्षात यायचं की ग्रामीण महिलांचे भावविश्व खूप मर्यादित आहे. अशांना शासनाने आरक्षण देऊन नेतृत्वाची संधी दिली. आणि आपण कामालाच लागलो… कारण त्या काळात ग्रामीण महिलेला स्वतःला ‘नेतृत्व करणारी’ या रुपात बघणे खूप अवघडच नाही तर अशक्य होते! नेतृत्वावर काम करताना लक्षात आलं की नुसती संधी देऊन पुरत नाही तर प्रोत्साहनही द्यायला लागतं, नेतृत्व करण्यासाठी पोशक वातावरण तयार करायला लागतं! म्हणजे नेतृत्व करायची तयारी जशी महिलेची करावी लागते तशीच आजूबाजूच्या मंडळींची ‘ती’चे नेतृत्व स्विकारण्याची तयारी करावी लागते. महिला नेतृत्वाचा हा सामाजिक पैलू अनुभवातून लक्षात आला. अशा प्रकारे एखादीची घडण करायची तर काही एका दिवसात होत नाही त्याला सातत्याने वर्षानुवर्षे प्रयत्न करावे लागतात.  ग्रामीण महिलांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास व्हावा म्हणून आपण असे प्रयत्न सातत्याने गेली ३० वर्ष करत आहोत. या काळात ग्रामीण भागातील महिलांमधून स्थानिक पातळीवर नेतृत्व उभे रहावे यासाठी खूप प्रयत्न केले. त्यासाठी प्रेरणा जागरण करणाऱ्या व माहिती देणाऱ्या बैठकींची योजना केली. अनुभव सहली काढल्या. आधी ८०-८५ गावाच्या परिसरासाठी एक बैठक व्हायची आता ३० वर्षांनंतर अशा प्रकारच्या ३ स्वतंत्र बैठका तेवढ्याच संख्येने होतात.  बैठक महिन्यातून फक्त एक दिवस ४ तास असते. पण बैठकीनिमित्ताने विषय कुठलाही असला तरी एकत्र यायची सवय लावावी लागते. बैठकीच्याच दिवशी पाहुणे आले तर पाहुण्यांचा पाहुणचार दुसऱ्यांवर सोपवून येणे ग्रामीण बाईला सोपे नसते. त्यामुळे हे सगळे जमवून बैठकीला वेळेवर उपस्थित राहून ज्यांनी ज्यांनी मनापासून सहभाग घेतला ती प्रत्येक जण घरात/भावकीत/ आळीत /गावात उठून दिसायला लागली.  तीच्यात लोकांना दिसण्यासारखे बदल घडून आले. कोणी स्वतःहून पुढाकार घेऊन औपचारिक शिक्षण घेतले तर बैठकीला आल्यामुळे कोणी विमानाचा प्रवास केला. कोणी गावातले पाण्याचे काम केले तर कोणी गावातल्या लोकांचे आधारकार्ड मोबाइलला जोडायचा आटापिटा केला, कोणी स्वतःचा उद्योग करून कंपनीत स्टॉल लावला तर कोणी बचत गटाला बँकेशी जोडून घेतले आणि लाखांनी कर्ज गटाला मिळवून दिले. ‘ती’च्या या बदललेल्या स्वरुपाकडे बघून ‘तिच्या’ सारखं व्हायचं आहे हिच पुढच्या गटाची मुख्य प्रेरणा ठरली!  हे नेतृव विकसनांचे काम करताना काय समजलं तर ‘ती’चा या बदलाचा वेगही समाजाला झेपेल एवढाच असावा लागतो, तरच ‘ती’ला स्वीकारले जाते. त्यामुळे नेतृत्व बैठकीत येणाऱ्या प्रत्येक महिलेला, कुटुंबातून वाढता पाठिंबा मिळतोय ना, हे तपासावे लागते. सगळ्याच काही ‘गाव चालवण्याची’ आवड नसते पण तरीही नेतृव करणाऱ्या प्रत्येकीला गावात सन्मानाचे स्थान मिळतेच मिळते.  गावाने तिचे नेतृत्व स्वीकारले की कुणाला, गावच्या निवडणुकीत कुठल्या महिला उमेदवाराला उभे करायचे याच्या बैठकीचे निमंत्रण येते तर कोणाला गावच्या जत्रेच्या तयारीच्या बैठकीत सन्मानाने बोलावले जाते. कधी कुणाच्या हस्ते शाळेत आलेल्या महिला पाहुण्यांचा शाल-नारळाने सत्कार होतो तर कुणाला शाळेतून पाल्याच्या वर्गाची पालक प्रतिनिधी बनवले जाते. असे कुठलेही काम ‘ती’ला आग्रहाने दुसरे कोणीतरी देते तेव्हा त्या कामास ती योग्य आहे असे सन्मानाने सांगितल्या सारखे असते. अशा प्रकारे गावात पुढारपण करण्याच्या संधी आपणहून चालत येतात. कार्यक्रमाला ‘कुठली साडी नेसू?’ या प्रश्नापलिकडे जाऊन जेव्हा महिला विचार करू शकतात तेव्हा ही संधी सार्थही असते.  महिला नेतृत्व करायला शिकतात त्याआधी त्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढतो, मग स्वतःच्या जबाबदारीवर त्या पैशाच्या उलाढाली करू शकतात, कुटुंबातल्या निर्णयांमध्ये सहभागी होतात, त्यानंतर सामाजिक विषयात शिरतात. त्या जेव्हा स्वतःला गरजेइतके पैसे खर्च करण्याची मुभा देतात तेव्हा त्यांचा ‘हा’ प्रवास सुरू झाला असं समजतं. मग तो खर्च साडी घ्यायला केलेला असो किंवा दवाखान्यात जायला असो.. प्रबोधिनीच्या या नेतृत्व विकसनांच्या कामात अजून एक गोष्ट लक्षात आली की ग्रामीण महिलेला ‘मी जबाबदार झाले’ असे वाटायला लागले की आईची आठवण होते मग कोणी आईला देवदर्शनाला नेऊन आणते तर कोणी तिचे मोतीबिंदूचे ऑपरेशन होईल असे बघते .. तर कोणी स्वतःच्या घरीच आईचे ‘माहेरपण’ करते. तिच्या खुलभर दुधाची कहाणी आशा तृप्त करणाऱ्या गोष्टीतून सुरू होते.  आता स्थानिक राजकारणात सर्व पक्षात आपल्या बैठकीत प्रशिक्षण झालेल्या उमेदवार असतात. काही जणी निवडणूकीला ‘बिन विरोध केलेत तरच होईन!’ अशीही अट घालतात. काही झाले तरी आता ‘आपल्यां’ प्रशिक्षित महिलांना डावलता येत नाही, हे मात्र नक्की! या वर्षी शासनाने ग्राम पंचायतीच्या पातळीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला. आपल्या सोबत काम करणाऱ्या २०-२५ कार्यकर्त्यांना मिळाला. काहींनी ही संधी दुसऱ्यांना मिळूदे अशीही भूमिका घेतली! हाही एक नेतृत्वाचा प्रगल्भ अविष्कारच होता.  नेतृत्वाच्या उपक्रमात सहभागी झाली की ‘मी गावातच रहाते, काय करू शकणार?’ अशी निर्वाणीची भाषा कोणीच करत नाही. तर सर्व मर्यादा सांभाळून ‘आपल्याच गावात नांदायचे थाटात, भिऊन शान आता भागायचे नाही!’ असा वसा गटाने घेतला आहे हे तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होत आहे! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना ६ – नेतृत्व! Read More »

मागे वळून बघताना ५: आरोग्याची मूलभूत गोष्ट… गाव विकासाची नवी व्याख्या!

बचत गटामुळे ग्रामीण महिलांची नात्यापलिकडच्या कारणांसाठी एकत्र यायला सुरुवात झाली. दर महिन्याला बचत गट होत होते. गटाचे व्यवहार चालू असताना पैशाचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या २-३ जणी त्यात गुंतलेल्या असतात. बाकीच्या महिला फक्त गप्प बसू शकत नाहीत आणि त्यावेळी जी चर्चा होते त्यातून ग्रामीण महिलाविश्वातल्या जिव्हाळ्याच्या अनेक विषयांना वाचा फुटते. आरोग्य हा विषय तर कायमच चर्चेतला विषय असायचा. ‘काम करुन अंग मोडून आलं’ अशा वाक्याने सुरवात होऊन वेगवेगळे उपाय सांगितले जातात…त्यातच एक गोळी खाऊन झोप असाही उपाय असतो… पण ‘गोळी आणायला सुध्दा जाववंत नाही!’ इथे थांबलेला संवाद…. ‘बाईपणाचे भोग अन् दुसरं काय!’ इथं संपतो!! ग्रामीण महिलांच्या सोबत काम करताना लक्षात आले की आरोग्याचा प्रश्न वैद्यकीय नसून त्याला आर्थिक पैलू आहे, आजाराच्या परिणामाची भीती वाटणे असा मानसिक पैलू आणि डॉक्टर ‘पुरुष’ असणे असा लिंगाधारीत भेद अशीही कारणे तेवढीच महत्त्वाची आहेत. १९९७-२००० काळात जेव्हा ज्ञान प्रबोधिनीने ग्रामीण कामाचा भाग म्हणून शासन पथदर्शी प्रयोगात आरोग्याचे काम करणारी आरोग्य प्रबोधिका गावातच उभी केली तेव्हा तिला प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणात सर्दी, ताप, उलटी, जुलाब यावर गावातच कसे औषध द्यायचे हे शिकवले. त्यात बाळाला / लहानग्यांना ताप आला तर पातळ, गोड औषध द्यायचे तर मोठ्यांना ताप आला तर गोळी असे शिकवले. खोकला व तापाचे लहानांचे औषध लाल रंगाचे दिसले तरी औषध वेगळे असते इथून शिकवावे लागले. औषध गावातच मिळत असले तरी ‘औषध’ ही त्या काळात कोणाचीच गरज नव्हती…. तरीही अशी व्यवस्था आपण अनेक वर्ष सांभाळली कारण हा उपक्रम आरोग्य शिक्षणासाठी होता…. या यशस्वी प्रयोगानंतर शासनाने गावात ‘आशा’ नेमल्या! परिणामी पुढची पिढी आजाराला औषध मागणारी बनली! आता आपण शासनाच्या आशा सेविकांसोबत ‘आरोग्य सखी’ गावागावात नेमली. जे काम शासनाच्या कामाचा भाग म्हणून आशा सेविका करत नाहीत, त्याचे प्रशिक्षण दिले. त्यामध्ये सकस आहारा पासून पाळीविषयी माहिती देण्या बद्दल विषय होते. गावातच रहाणारी असली की एक वेगळा विश्वास असतो, संवादात सहजता असते. अनेक बारीक बारीक प्रश्न तिला स्वाभाविकपणे विचारले गेले. त्त्यात सणवार जवळ आला की ‘पाळी पुढे ढकलायची गोळी कुठली?’ असा सगळ्यात जास्त विचारला जाणारा ‘अधुनिक’ सुनांचा प्रश्न होता हे लक्षात आले! आरोग्य सखींच्या मदतीने नुकतेच एक सर्वेक्षण केले, लग्न होऊन साधारण ३-४ वर्ष झालेल्या महिलांचे! त्यात प्रश्न होता ‘सॅनिटरी नॅपकिन वापरता का?’ ‘हो’ उत्तर देणाऱ्यांना विचारले, ‘त्यासाठी महिन्याला लागणारे 35-40 रुपये तुम्हाला घरून मिळतात का?’ यासाठी/यावर ‘तुम्ही नवऱ्याशी बोलता का?’ इथे नोंदवायला खेद होतो की एकाही ‘अधुनिक’ सुनेने हा विषय आम्ही नवऱ्याशी बोलू शकतो आणि त्याच्याकडून घेऊन महिन्याला 35 40 रुपये खर्च करू शकतो असे उत्तर दिले नाही. या सुना ‘अधुनिक’ म्हणजे सासऱ्याच्या उपस्थितीत ज्या गाऊन घालू शकतात अशा होत्या. पेहराव अधुनिक होता पण या सुनांनाही ‘याच्याशी नवऱ्याचा काय संबंध?’ हे ‘कळत’ नव्हते…. अनेकींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच दिसत होते. लग्न झाल्यानंतर काही वर्ष माहेरून मिळणाऱ्या पैशातून अनेकजणी सँनिटरी नँपकीनसाठी लागणारा खर्च करत होत्या. मुलवाल्या मात्र रोजच्या किराण्याला नवऱ्याकडून मिळणाऱ्या पैशातून ‘पैसे वाचवून’ त्यातून हा खर्च करत होत्या. त्यामुळे मासिक पाळी संबंधातील प्रश्न किती महिला धार्जिणा आहे असे आमच्या कार्यकर्त्यांच्या पुन्हा एकदा लक्षात आले! गावातल्या दुकानात आरोग्याला हानीकारक असली तरी पुरुष माणसाची गरज भागावी म्हणून तंबाकूची पुडी अगदी सहज मिळते पण गरजेचे सॅनिटरी नॅपकिन मिळत नाही. त्यात कधीच न बोलला जाणारा ‘शिवाशिवी’चा भागही असतोच! त्यामुळे सँनिटरी नँपकीन खरेदीला लागणारे पैसे म्हणजे तिच्या गावापासून बाजाराच्या गावापर्यंतचा प्रवासखर्च सुद्धा धरायला हवा असे अनेकींनी सुचवले…. कारण या विषयाशी ‘संबंध नसणारा’ नवरा बाजाराला गेला तरी ‘हे’ आणू शकत नाही! मग जरा चौकशीच केली की मेडिकल मधे मिळणारे अजून काय काय गावात मिळायला हवे? तर ताप, डोकंदुखी, अंगदुखी यावर उपाय करणारी रुपया-दोन रुपयाची गोळी असे उत्तर आले!शासनाने सर्वदूर राबवलेल्या ‘सर्व शिक्षा अभियाना’च्या कामामुळे म्हणा किंवा आरोग्य खात्याच्या कामामुळे म्हणा समाजात जागृती झाली आहे. आता ताप आला म्हणून कोंबडीचा नैवेद्य दाखवण्याऱ्या मागच्या पिढीपेक्षा आ़धी गोळी खाऊया असे वाटणारी नवी पिढी तयार झाली आहे. पण गावात गोळी मिळण्याची सोय नाही. गावातच शासनाची आशा वर्कर रहात असली, तिच्या स्टॉकमध्ये गोळी असली तर फुकट गोळी मिळेल. पण विकत मिळण्याची सोय नाही. वेल्हे तालुक्यात लोकसंख्या कमी आहे त्यामुळे साधारण ४०-५० गावात मिळून एक औषधाचे दुकान आहे…. बाईमाणसाला २₹ गोळी आणायला ३०-४०₹ खर्च किंवा २-३ तास चालत जावे लागते. ‘कोपऱ्यावरच्या दुकानात वाईन मिळावी ती कुठे दारु आहे?’ असे वाटणाऱ्या एकाही पुढाऱ्याला स्वाभिमानाने विकत घेऊ शकेल अशी ताप उतरवणारी गोळी गावात मिळावी असे काही करावेसे का वाटू नये? मला कळतच नाही. जगभरच्या विकासाच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर सरासरी आयुर्मर्यादा वाढयला हवी. त्यासाठी या विषयावर पंचतारांकीत हॉटेलमधल्या सेमिनारमध्ये तावातावाने मतप्रदर्शन करण्यापेक्षा तापाची-अंगदुखीची -डोकंदुखीवर उपाय करणारी गोळी गावात सहज मिळेल, महिलेला ‘सर्वार्थाने’ स्विकारले म्हणून सँनिटरी नँपकीनही गावात मिळतील असे करायला हवे. करोना काळात ‘ही’ गरज ओळखून आपण गावागावात आरोग्य सखीकडे विक्रीसाठी ठेवले. महिलांनी ते विकत घेतले. प्रत्येक वेळी गावात गोष्ट फुकटच हवी असं नसतं पण हवी असते हेही समजून घेतले पाहिजे!मला तर वाटते नवीन ‘विकासाच्या व्याखेत’ अशा गरजेच्या गोष्टी गावातच मिळायला लागल्या की गावाचा विकास झाला असे आपण म्हणायला हवे!! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी, ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना ५: आरोग्याची मूलभूत गोष्ट… गाव विकासाची नवी व्याख्या! Read More »

मागे वळून बघताना ४: औपचारिक शिक्षण! 

गेल्या भागामध्ये मुलींचे शिक्षण ‘आई पालिकांच्या’ आग्रहाने निवासाच्या रुपात कसे प्रत्यक्षात आले ते पाहिले. ही सोय अशा आईसाठी केली जी स्वतः शिकणार नाही, अशा वयात किंवा मनस्थितीत पोचलेली आहे.      औपचारिक शिक्षणाचा असाच एक प्रयोग गेल्या काही वर्षात स्त्रीशक्ती प्रबोधन ग्रामीण विभागाने केला. महिलांना कायमच कमी शिक्षण असल्यामुळे येणाऱा न्यूनगंड वेगवेगळ्या माध्यमांतून डोकावत असतो. या न्यूनगंडावर उतारा म्हणून ग्रामीण महिलांना औपचारिक रचनेतून शिकवायचे असे ठरवले! लिहीता वाचता येत असले तरी औपचारिक शिक्षण कमीच. बचत गटाच्या कामात वावरणारी कोणी चौथी पास होती तर कोणी सातवी, कोणाची शाळा आठवीत सुटली होती तर कोणी दहावी नापास होती.. पहिल्यांदा त्यांना पटवावे लागले की तुमचे शिक्षण थांबले त्याला तुम्ही जबाबदारी नाही कारण तेव्हा तुम्ही किती शिकायचे हे तुम्ही ठरवलं नाही.. पण आता संधी मिळाली आणि तुम्ही ती घेतली नाही तर मात्र तुम्ही जबाबदार! एकदा हे पटलं की मार्ग काढायची जबाबदारी प्रबोधिनीचीच… कारण दुसरं कोण मदत करणार? मग माहिती काढली, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक याची आणि असं कळलं की चौथी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण झाले असेल तरी १८ वर्ष पूर्ण झालेल्यांना थेट प्रथम वर्षामध्ये पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो जर विद्यापीठाची १२वी समकक्ष प्रवेश परीक्षा पास झालेली असली तर! मग मार्गच मोकळा झाला असे वाटायला लागले. प्रयोग म्हणून काही जणींनी या परीक्षेला बसायचे ठरवले आणि त्या लिहित्या वाचत्या असल्याने सहज पास झाल्या, मग त्यांनी प्रथम वर्षात त्यांच्याच भाषेत सांगायचे तर १३वीत प्रवेश घेतला.  गेल्या एका वर्षात १५ जणीं समकक्ष परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्या. आजपर्यंत आपल्या प्रयत्नाने १२ वी समकक्ष परीक्षा पार करणाऱ्या किमान १७५ पेक्षा जास्त जणी झाल्या. बहुतेक सगळ्या वेल्हे म्हणजे ’मागास’ तालुक्यातल्या… आख्या तालुक्यात एकच पदवीपर्यंत शिकता येणारं कॉलेज असणाऱ्या भागातल्या!  आपल्या प्रयत्नाने ११ जणींनी पदवी मिळवली तर सध्या १८ जणी पदवी मिळवण्याच्या मार्गावर आहेत! दोघांनी समाजशास्त्र विषय घेऊन MA सुध्दा झाले. अजाण वयात कळत नसल्यामुळे शाळा सुटल्याचा सल अलगद पुसला गेला. सन्मानाने जगण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची संधी अशा एकत्र प्रयत्नांमुळे मिळाली. ‘मी गटातून बसले म्हणून पास झाले, नाहीतर नापास होण्याच्या भितीने बसलेच नसते!’ असं सांगणाऱ्या काही थोड्या नव्हत्या. पुन्हा शिक्षण प्रवाहात येण्याने अनेकींची आयुष्य बदलली म्हणून या प्रक्रियेवर अभ्यास करुन एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पेपर मांडला. त्या अभ्यासात समकक्ष परिक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती घेतल्या. खूपच नवीन माहितीचं संकलन झालं.  बहुतेकींनी घरी सांगितलेच नव्हते की त्या परीक्षेला बसल्या होत्या. दहावी पास नवरा असल्याने कमी शिक्षणाचा कौटुंबिक सल वेगळाच होता. पण जेव्हा त्यांना पास असं प्रमाणपत्र हातात मिळालं तेव्हा मात्र आता आमच्या पिढीतली सगळ्यात जास्त शिकलेली मी आहे’ असं म्हणत त्यांनी आपली मार्कलिस्ट कुटुंबाला दाखवली… परिणाम आता सासू पण ‘विचारते’ असं  सांगताना तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.    चाळीशी ओलांडलेली गावासाठी धडपडणारी ताई म्हणाली, ‘मी महिला राखीव मधून सरपंच पदाला उभी राहू शकते…. सरकारने मागेपुढे या पदासाठी शिक्षणाची अट घालती तर अडायला नको म्हणून परीक्षा देऊन ठेवली! मला २ पोरं… ती बाजू जमणारी आहे’ (३ पोरं असणारीला निवडणूक लढवू शकत नाही….हे तिला माहिती होतं ), अनेक अंगणवाडी ताईंनी या प्रयत्नांमुळे परिक्षा दिली, त्यांना पगार वाढ झाली. काही तर सासू-सूनांनी एकत्र परीक्षा दिली. हे सगळं बघून काही आई दहावी नापास मुलग्यांना घेऊन आल्या आणि ड्रायव्हर करीयर करायचे असले तर लायसन्स काढायला हवे त्यासाठी (हल्ली दहावी पास असल्याशिवाय लर्निंग लायसन्स मिळत नाही) त्यांनी या गटातून मुलग्यांना परीक्षा द्यायला लावल्या, आता ते सन्मानाने चांगली ड्रायव्हरची नोकरी करत आहेत. कुटुंब प्रमुख म्हणून तेही जास्त जबाबदार झाले! बचत गट हे निमित्त आहे! या गटातून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीमुळे, आणि प्रेरणेमुळे हे सगळे घडले-घडवता आले.  विभागाचं कामंच प्रबोधनाचं आहे… कोणाच्याही आत्मसन्मानाचं काम ‘दुसरं’ कोणी करु शकत नाही… त्यासाठी आवश्यक तो अवधी आणि संधी जिला-तिला देता यायला हवी! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी, ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना ४: औपचारिक शिक्षण!  Read More »

मागे वळून बघताना ३ – वेल्हयाचा सहनिवास

बचत-कर्ज व्यवहार करण्यासाठीच महिला गटात यायच्या. लग्नाचा सिझन यायच्या आधीच गटातल्या गप्पागप्पामध्ये कळायचे की यंदा कोणाकोणाच्या घरी ‘कर्तव्य आहे!’..आणि ठरणाऱ्या लग्न निमित्ताने कर्ज लागणार आहे…. ‘ठरलं तर..’ अशी कर्जाची मागणी असायची. अशी मागणी करणाऱ्या एखादीची मुलगी १८ वयाखालची असायची… मग चर्चा व्हायची की जी गोष्ट कायद्याला मान्य नाही ती कशी करायची? ‘पोरीचं लग्न’ हा  तर अगदीच जिव्हाळ्याचा विषय! बैठकीत बसलेल्या बहुतेक सगळ्याच १८ पूर्ण व्हायच्या आत उजवलेल्या! ‘काय कळत होतं तेव्हा…. लग्नात नटायला मिळतं याचंच कौतुक म्हणून मी तयार झाले लग्नाला!’ असं अगदी मोकळेपणाने सांगणारी एखादी असायचीच गटात. अशा ‘अनुभवी’ आईला लग्न-वयाचा कायदा सांगणंही अवघड…. तरी ‘पोरीच्या आरोग्यासाठी १८ संपूदे’ असं म्हंटलं तर एखादी म्हणायची, ‘ताई आपल्याच मुलींचं लवकर लग्न करून तिला सासरी पाठवावं असं वाटतं म्हणून आम्ही लवकर लग्न करतो? नाही हो! आम्ही शेतकरी माणसं दिवसभर शेतावर जातो मुली शाळेमध्ये जातात पण ज्या मुलींना शिक्षणाची आवड नसते, शाळेत डोकंच चालत नाही त्या घरात बसून काय उद्योग करतील याची खात्री वाटत नाही. त्यापेक्षा लग्न केलेलं बरं! आज नाहीतर उद्या नवऱ्याच्या घरी जायचंच आहे तर मग सुरक्षित आजच जाऊदे’ हा त्या मागचा विचार असतो.  यातून मला कळलं की जर मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत सुरक्षित राहील अशी हमी आईला मिळाली तर अशा कुठल्याही मुलीचं अठरा वर्षाच्या आत लग्न होणार नाही! या संवादातून मला नवीन विश्वास मिळाला. एकीने पुढे असंही सांगितलं की ‘आता आम्हालाच ‘आई’ या नात्याने वाटतं ना की पोरीनं शिकावं. अडाणी असलं की कसं फसवतात हे आम्हीच अनुभवलं आहे ना!’ जरी ती बोलली नसली तरी शिक्षण कमी झाल्यामुळे आलेल्या न्युनगंडाला ‘ती’ कशी सामोरी गेली ही तिच्या डोळ्यासमोरुन तरळून गेलेलं असतं. या वयात ती तर शिकू शकणार नाही म्हणून ती मुलीच्या शिक्षणाची काळजी करत असते.  हे आणि असे समांतर संवाद वारंवार गटात ऐकून मे २०१२ मध्ये वेलहयात मुलींचे निवासी शिबिर घेतले, त्याला ३५ मुली आल्या. दोन दिवसाचे शिबिर संपताना सगळ्या म्हणाल्या, ‘असे एकत्र राहून शिकायला आवडेल!’ आईची तयारी बचत गटाने केलेली होती तशी मुलींची पण परीक्षा झाली, आता सुरुवात करायलाच हवी असे वाटून, ज्ञान प्रबोधिनीने २०१२-१३ पासून मुलींच्या शिक्षणासाठी वेल्हे गावात, तालुक्याच्या ठिकाणी मुलींसाठी निवास चालू केला.  खरं सांगायचं तर ज्ञान प्रबोधिनीच्या पदाधिकार्यांनी ठरवलं आणि निवासाचे काम सुरू झालं असं झालं नाही तर ज्ञान प्रबोधिनीच्या नावानं गावागावात जमणाऱ्या स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी ठरवलं. ज्यांना ज्यांना शिक्षणाचे महत्त्व पटलं होतं त्या म्हणाल्या, ‘आमच्या मुलींना शिकवायचं असेल तर तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेल सुरू केल्याशिवाय पर्यायच नाही. ताई आपणच हॉस्टेल सुरू करू!’ असा आग्रह त्यांनी मांडला आणि अर्थातच तो मान्य ही झाला! आणि हॉस्टेल सुरू झालं.  पहिल्या वर्षी ७ जणी, दुसऱ्या वर्षी १२ असे करत करत १५ जणींसाठी सोय केली पण प्रत्यक्षात पाच वर्षांतच २५-३० जणी राहायला लागल्या. मुलीच्या प्रवेशासाठी जी आई यायची ती सांगायची की, ‘जर हिला प्रवेश दिला नाही तर तिचं शिक्षणंच थांबणार आहे. रोज उन्हापावसाचं १२-१५ किमी चालून ती काही शिकणार नाही….!’ मग ठरवलं जिला शिकायला शाळेत जायला रोज १०-१२ किलोमीटर चालावे लागते तिच्यासाठी निवासाची सोय करूया! आज म्हणता म्हणता निवासाची दशक पूर्ती होते आहे. आज पर्यन्त गेल्या १० वर्षात मिळून साधारण ४० गावातून ९२ मुलींचे प्रवेश झाले. सध्या २९ जणी शिकत आहेत. काहीचे पदवी पर्यन्त शिक्षण झाले तर काही नोकरीला लागल्या काही लग्न होऊन स्थिरावत आहेत.  दशकपूर्ती मेळाव्याला बोलावताच इथे राहून गेलेल्या अनेक जणी जणू माहेरी हक्काने आल्या सारख्या निवासी आल्या. गप्पांना रात्र पुरली नाही. त्यांच्या सोबत राहाणाऱ्या ताया.. लक्ष ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना इथे राहून गेलेल्या सगळ्यांचे निवांसाच्या सोयीमुळे आयुष्य किती विधायक बदलले हे दिसत होते. निवासामुळे शिकून नोकरी करणारी सांगत होती, ‘माझ्या घरात एवढे पैसे मिळवणारी मी पहिलीच!’ ‘इथली शिस्त बाहेर गेल्यावर कळते’.. कोणी संगत होती, ‘इथले दिवस मी कधीच विसरू शकणार नाही!’ सन्मानाने जगताना त्यांना मिळत असणारा आनंद निवासातल्या लहान मुलीना ‘ताई’ नात्याने त्या सांगत होत्या.  मुलींचा निवास सुरू करताना जोखीम वाटत होती खरी पण हे सारं ऐकताना वाटत भरून पावलं..!! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी, ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना ३ – वेल्हयाचा सहनिवास Read More »

मागे वळून बघताना २: आरोग्याची मूलभूत गोष्ट… गाव विकासाची नवी व्याख्या!

बचत गटामुळे ग्रामीण महिलांची नात्यापलिकडच्या कारणांसाठी एकत्र यायला सुरुवात झाली. दर महिन्याला बचत गट होत होते. गटाचे व्यवहार चालू असताना पैशाचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या २-३ जणी त्यात गुंतलेल्या असतात. बाकीच्या महिला  फक्त गप्प बसू शकत नाहीत आणि त्यावेळी जी चर्चा होते त्यातून ग्रामीण महिलाविश्वातल्या जिव्हाळ्याच्या अनेक विषयांना वाचा फुटते. आरोग्य हा विषय तर कायमच चर्चेतला विषय असायचा. ‘काम करुन अंग मोडून आलं’ अशा वाक्याने सुरवात होऊन वेगवेगळे उपाय सांगितले जातात…त्यातच एक गोळी खाऊन झोप असाही उपाय असतो… पण ‘गोळी आणायला सुध्दा जाववंत नाही!’ इथे थांबलेला संवाद…. ‘बाईपणाचे भोग अन् दुसरं काय!’ इथं संपतोच!! ग्रामीण महिलांच्या सोबत काम करताना लक्षात आले की आरोग्याचा प्रश्न वैद्यकीय नसून त्याला आर्थिक पैलू आहे, आजाराच्या परिणामाची भीती वाटणे असा मानसिक पैलू आणि पुरुष डॉक्टर असणे असा लिंगाधारीत भेद अशी ३ कारणे सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत. जेव्हा ज्ञान प्रबोधिनीच्या ग्रामीण कामाचा भाग म्हणून आरोग्याचे काम करणारी आरोग्य सखी गावातच उभी राहिली तेव्हा अनेक बारीक बारीक प्रश्न तिला स्वाभाविकपणे विचारले गेले. त्त्यात सणावार जवळ आला की ‘पाळी पुढे ढकलायची गोळी कुठली?’ हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा ‘अधुनीक’ सुनांचा प्रश्न! खरंतर शासनाने ‘आशा वर्कर’ ही याच पद्धतीने दर हजार माणसांमागे १ अशी रचना केलेली आहे पण शासनाच्या कुठल्याही कामात ‘प्रेरणा वाढवणे’, ‘काम कशासाठी करतो आहोत?’ ते पुन्हा पुन्हा सांगणे यावर भर दिला गेला नसल्यामुळे काही गोष्टी घडत नाहीत किंवा घडण्याची शक्यता खूपच कमी असते त्या गोष्टी गावातील आरोग्य सखींमुळे लक्षात यायला लागल्या. आरोग्य सखींच्या मदतीने लग्न होऊन साधारण ३-४ वर्ष झालेल्या महिलांचे काही दिवसांपूर्वी एक सर्वेक्षण केले.  प्रश्न होता ‘सॅनिटरी नॅपकिन वापरता का?’ ‘हो’ उत्तर देणाऱ्यांना विचारले, ‘त्यासाठी महिन्याला लागणारे 35-40 रुपये तुम्हाला घरून मिळतात का?’ यासाठी/यावर ‘तुम्ही नवऱ्याशी बोलता का?’ इथे नोंदवायला खेद होतो की एकाही ‘अधुनिक’ सुनेने हा विषय आम्ही नवऱ्याशी बोलू शकतो आणि त्याच्याकडून घेऊन महिन्याला 35 40 रुपये खर्च करू शकतो असे उत्तर दिले नाही. या सुना ‘अधुनिक’ म्हणजे सासऱ्याच्या उपस्थितीत ज्या गाऊन घालू शकतात अशा होत्या पण अशा वरवर अधुनिक पेहराव करणाऱ्या सुनांनाही ‘याच्याशी नवऱ्याचा काय संबंध?’ हे ‘कळत’ नव्हते….  अनेकींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच दिसत होते. लग्न झाल्यानंतर माहेरून मिळणाऱ्या पैशातून अनेकजणी सँनिटरी नँपकीनसाठी लागणारा खर्च करत होत्या. काहीजणी रोजच्या किराण्याला मिळणाऱ्या पैशातून ‘पैसे वाचवून’ त्यातून हा खर्च करत होत्या. त्यामुळे मासिक पाळी संबंधातील प्रश्न किती महिला धार्जिणा आहे असे आमच्या कार्यकर्त्यांच्या पुन्हा एकदा लक्षात आले! गावातल्या दुकानात आरोग्याला हानी कारक असली  तरी पुरुष माणसाची गरज भागावी म्हणून तंबाकूची पुडी मिळते पण गरजेचे सॅनिटरी नॅपकिन मिळत नाही आणि त्यामुळे सँनिटरी नँपकीनच्या खर्चात बाजाराच्या गावापर्यंतचा प्रवासखर्च ही धरायला हवा असे अनेकींनी सुचवले…. कारण या विषयाशी संबंध नसणारा नवरा बाजाराला गेला तरी ‘हे’ आणू शकत नाही! मग जरा चौकशीच केली की मेडिकल मधे मिळणारे अजून काय काय गावात मिळायला हवे? तर ताप, डोकंदुखी, अंगदुखी यावर उपाय करणारी रुपया-दोन रुपयाची गोळी असे उत्तर आले! शासनाने सर्वदूर राबवलेल्या सर्व शिक्षा अभियानाच्या कामामुळे म्हणा किंवा आरोग्य खात्याच्या कामामुळे म्हणा समाजात जागृती झाली आहे. आता ताप आला म्हणून कोंबडीचा नैवेद्य दाखवण्याऱ्या मागच्या पिढीपेक्षा  आ़धी गोळी खाऊया असे वाटणारी नवी पिढी तयार झाली आहे. पण गावात गोळी मिळण्याची सोय नाही. गावातच शासनाची आशा वर्कर रहात असली, स्टॉकमध्ये असली तर फुकट गोळी मिळेल.  पण विकत मिळणार नाही. लोकसंख्या कमी असेल तर साधारण ३०-४० गावात औषधाचे एक दुकान असते…. बाईमाणसाला २₹ गोळी आणायला ३०-४०₹ खर्च किंवा २-३ तास चालत जावे लागते. कोपऱ्यावरच्या दुकानात वाईन मिळावी असे वाटणाऱ्या एकाही पुढाऱ्याला स्वाभिमानाने विकत घेऊ शकेल अशी ताप उतरवणारी गोळी गावात मिळावी असे काही करावेसे का वाटू नये? मला कळतच नाही. जगभरातील विकासाच्या स्पर्धेत टिकायचं असेल आणि सरासरी आयुर्मर्यादा वाढवायची असेल तर या विषयावर पंचतारांकीत हॉटेलमधल्या सेमिनारमध्ये तावातावाने मतप्रदर्शन करण्यापेक्षा तापाची-अंगदुखीची -डोकंदुखीवर उपाय करणारी गोळी गावात सहज मिळेल, महिलेला ‘सर्वार्थाने’ स्विकारले म्हणून सँनिटरी नँपकीनही गावात मिळतील असे करायला हवे. मला तर वाटते नवीन ‘विकासाच्या व्याखेत’ अशा गोष्टी गावातच मिळायला लागल्या की गावाचा विकास झाला असे आपण म्हणायला लागू या!!

मागे वळून बघताना २: आरोग्याची मूलभूत गोष्ट… गाव विकासाची नवी व्याख्या! Read More »

मागे वळून बघताना २ – एकल महिला

गेल्या लेखात आपण एकल महिलांची अभिव्यक्ती असा विषय पाहिला. एकदा विषय लक्षात आल्यावर मग स्वस्थ बसू देईना. एकल बद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली… काही विधवा असतात, काही परित्यक्ता, तर काहींचे काही कारणाने लग्नच झालेले नसते…मग अपंगत्व असेल किंवा मतिमंदत्व! जेवढा भाग अविकसित, शिक्षण कमी तेवढं महिलांना जास्त फसवलं जातं याचे अनेक किस्से या बचत गटाच्या बैठकीमधून समजले. असं वाटायला लागलं की आता फक्त एकल महिलांच्या कल्याणासाठी काहीतरी भरीव करूया. नक्की सुरुवात कुठून करायची हे लक्षात येईना म्हणून प्रश्न निट समजून घेण्याच्या दृष्टीने एकल महिलांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली. जरी त्या एकल असल्या हे सगळ्यांना माहिती असलं, तरीही मनात त्यांना कुठेतरी संकोच होता की ‘मी एकल आहे हे कुठे जाहीर करू नये’ स्वाभाविक होतं कारण सामाजिक सुरक्षा ही त्याच्याशी निगडित होती. मेळाव्यात १५०-२०० जणींशी बोलल्यावर, त्यांनी माहिती दिली म्हणून शासकीय योजनांचा अभ्यास केला आणि लक्षात आलं की शासन या एकल महिलांचं जगणं सुसह्य होण्यासाठी खूप सोयी/ सवलती देतं.मग मात्र असं ठरवलं की सर्व एकल महिलांचा डेटा गोळा करायचा. गेल्या आठ वर्षात जवळजवळ साडेचारशे महिलांची वैयक्तीक माहिती गोळा झाली. ही माहिती गोळा करताना गटाच्या लक्षात येत होतं की कुठल्या वयाला महिला एकल झाली त्यावरही उत्तर वेगवेगळी होती. जर एकल महिलेला फक्त मुली असतील तर अनेकदा ते माहेरी येते पण जर मुलगा असेल, म्हणजेच वंशाचा दिवा असेल, ज्याचं उद्या शेताच्या सातबाऱ्यावर त्याचं नाव लागू शकेल असा असेल तर अनेकदा ती सासरी राहते. एकल महिलांचा मुख्य प्रश्न म्हणजे अस्तित्वाचा आहे. शासकीय सवलती मिळंत असल्या तरीही महिला त्या सवलती घेत नव्हत्या कारण अस्तित्वाचे पुरावे नाहीत, बँकेत खाते नाही….. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शासकीय कार्यालयातल्या पुरुष अधिकाऱ्याशी संवाद करण्याची धास्ती! मेळाव्यामध्ये शासकीय योजनांच्या सर्व सवलतींची माहिती द्यायला सुरुवात केली. योजनेच्या लाभार्थी होण्यासाठी अर्ज करण्याचं धाडस कोणाचंही होत नव्हतं, मग प्रबोधिनीच्या ताईलाच हे काम सांगितलं…. सांगितले म्हणण्यापेक्षा तिनेच करायचं ठरवलं. एकेकीचे कागदपत्र तहसील कचेरीत द्यायला सुरुवात केली. मग पुढच्या प्रश्नांना सुरुवात झाली म्हणजे काय झालं तर एकल महिलेला शासन मदत करतं जर तिचं रेशन कार्ड स्वतंत्र असेल तर! पण जर एकल महिला सासरी रहात असेल आणि कुटुंबप्रमुख म्हणून रेशन कार्डवर सासऱ्याचं नाव असेलं तर ती कुठल्या तोंडाने सासर्‍याला सांगणार असते की मला माझं मुलांच्या सकट रेशन कार्ड वेगळे करून द्या? …… फक्त नियम करून आणि योजना करून पुरंत नाही हे आपल्याला समजलं. मग अशा सासरच्या मंडळींना आपल्या कार्यकर्त्यांनी घरी जाऊन पटवलं की ‘दादा तुमच्या घरात फूट पाडायची किंवा तुम्ही सांभाळत नाही म्हणून एकल महिलेचे वेगळे रेशन कार्ड नकोय पण हे वेगळे रेशन कार्ड केलं तर सरकार तिला काही मदत करेल तुमच्यावरचा भार थोडा कमी होईल’…. 2024 मध्ये एकल महिलेला शासन पेंशन म्हणून महिन्याला १३००/-₹ आणि दोन मुलांना प्रत्येकी १३००/-₹ (१८ वर्षापर्यंत) देते. असे ३९००/-₹ दरमहा मिळाले तर गावातल्या किमान गरजा भागतातच… मग कोणाचं मिंधेपण येत नाही… अगदी सासऱ्याचं नाही तर भावाचं सुध्दा!‘ती’च्या आत्मसन्मानासाठी असं पेंशन मिळवून देण्याचे काम हळूहळू एकेकी सोबत केले. अनेक विनापत्य वृद्ध दांपत्यही अशा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी होण्यासाठी आली… त्यांना ही आपण मदत केली. आज सांगायला अतिशय आनंद होतो की शासनाच्या या योजनांमधून आपण केलेल्या कामांमधून गेल्या काही वर्षात साधारण ७२ लाख रुपयाची आर्थिक मदत जिच्या तिच्या खात्यात पोहोचवली आहे. शासनाकडे अर्ज केल्यानंतर आपला अर्ज केराच्या टोपलीत जाऊ नये म्हणून त्याला इनवर्ड नंबर घातला जातो आहे ना याची खातर जमा करायची असते, इथपासून आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. हे सर्व काम तालुक्यामधल्या तहसील कचेरी मधून केले. कचेरीतील सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय मनापासून मदत केली. एकदा मेळाव्यात २०-२५ एकल महिलांची कागदपत्र जमा झाली तर पुढच्या कामासाठी आपली ताई अधिकारी ऑफिसमध्ये आहेत ना? हे बघायला गेली तर साहेब स्वतः म्हणाले, ‘एवढ्या सगळ्या जणींनी माझ्याकडे येण्यापेक्षा इनवर्ड रजिस्टर आणि शिक्का घेऊनच मी तुमच्या कार्यालयात येतो’ आणि त्यांनी प्रबोधिनीच्या कार्यालयात बसून आलेल्या सगळ्या एकल महिलांचे काम पूर्ण केले. एरवी शासनाकडे दिरंगाई होण्याच्या तक्रारी आपण अनेकदा ऐकतो पण एकल महिला विषयात एकही अशी तक्रार करायला आम्हाला जागा नाही, हे सांगायला आनंद होत आहे. तर अशा रितीने आपण गेली ९वर्ष एकल महिलांसाठी काम सुरू केले. कधी खेळत्या भांडवलातून भांडवल देऊन उद्योग सुरु करायला मदत केली तर कधी एकल मातेच्या मुलीला शिक्षणासाठी स्कॉलरशीप दिली. कधी त्यांचीच फक्त अनुभव समृद्ध करणारी सहल सुध्दा काढली. या कामातून एकल महिलेलाही ‘व्यक्ती’ म्हणून सन्मानाने जगता येते अशी अनेक उदाहरणेग्रामीण समाजात तयार झाली. त्यामुळे आता गावातील मेळाव्यातही उजळ माथ्याने यांचा वावर सुरु झाला. कोणी वाटी नसणारी काळी पोत गळ्यात घालायला लागली तर कोणाच्या कपाळावर पुन्हा टिकली दिसायला लागली. सहज घडत गेलं…… आता अशा अनेक एकल महिला, इतर एकल महिलांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे अशा स्त्री शक्ती प्रबोधननाच्या कामाला लागल्या आहेत….

मागे वळून बघताना २ – एकल महिला Read More »

मागे वळून बघताना भाग १ – ‘ती’ला ‘मोकळीक’ दिली

ज्ञान प्रबोधिनी: स्त्री शक्ती प्रबोधनत्रिदशकपूर्तीचे वर्ष! म्हणता म्हणता बचत गटाच्या कामाला 30 वर्ष पूर्ण झाली. हे त्रिदशकपूर्तीचे वर्ष या निमित्ताने बचत गट उपक्रमाने नक्की काय केले हे समजण्यासाठी या खटाटोपाला सुरुवात करत आहे आणि म्हणून त्याला नाव देत आहे मागे वळून बघताना आज आपण बघूया: मागे वळून बघताना भाग १ ‘ती’ला ‘मोकळीक’ दिली….मुभा दिली जगभरातल्या महिला जरी एक असल्या तरी अभिव्यक्ती, समज, अनुभव, सामाजिक दडपणाखाली झालेली वाढ यामध्ये शहर आणि ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये पुणे शहरापासून  ७०-८० किलोमीटर अंतर असले तरी जमिन आसमानाचा फरक असतो तो मी अनुभवला. ‘मला कोणीतरी समजून घेतंय’ असं वाटले तरी नात्यातला दुरावा विरघळून जातो. मग होणाऱ्या मोकळ्या संवादाने खूप काही घडते… घडवता येते. असा विश्वास मला गेल्या अनेक वर्षाच्या कामातून मिळाला. एखाद्या परिस्थितीला ‘ती’ जबाबदार नाही, हे तिला माहिती असले, तरी जणू आपणच जबाबदार आहोत, असं आजूबाजूच्यांना वाटतंय, याचं ओझं आयुष्यभर बाळगणं सोपं नसतं. एखादी महिला ‘एकल’ असते, म्हणजे नवऱ्याशिवाय एकटी रहात असते…… का बरं? …तर ती सांगते, ‘काळी आहे ना….. नवऱ्याला आवडले नाही!’ ….लग्नाआधी चार चौघात बघितले होते, त्याने रीतसर ‘हो’ म्हंटल्यावरंच थाटामाटात लग्न लावले होते. पण ती जेव्हा पहिल्या बाळंतपणाला माहेरी येते त्यानंतर सासरी गेलेलीच नसते अशी ‘ती’ जेव्हा नवऱ्याचं हे उत्तर ‘ती’च्या एकलेपणाचे कारण सांगते ….. आणि तरीही समाज तिच्या ‘एकल’ असण्याला केवळ तिलाच दोशी धरतो, तेव्हा तिचं बोलणं समजतंच नाही. ‘आवडली नाहीस’ या दोन शब्दाने तिचे आणि मुलाचे सगळे आयुष्य पणाला लागलेले असते… जर तिला मुलगी असेल तर तिच्या मुलीच्या लग्नाला सुध्दा वडील नसल्याने आईच्या ‘चारित्र्याची’ मनोकल्पित अडचण येते. हे सगळं ‘समजल्यावर’ मला प्रश्न पडतो की तिची काहीच चूक नसताना एकल म्हणून जगलेल्या ‘ती’ला कशी शिकवायची लोकशाही?  कसे सांगायचे संविधानाने समानतेचा मूलभूत अधिकार दिला आहे तो लिंगाधारित नाही? अजून समाज म्हणून आपल्याला खूप शिकायचंय हेच खरं… स्त्री शक्ती प्रबोधन विभागाचे गावातले काम महिलांसाठी, महिलांनी केलेले असल्याने, कार्यक्रमाला महिलाच उपस्थित असायच्या. एकल महिला सुद्धा हक्काने यायच्या. एखादी महिला भाषण सुरु झाले की ५-१० मिनिटातच बसल्या बसल्या झोपून जायची. पण कार्यक्रम संपला की आवर्जून सांगायला यायची की कार्यक्रम चांगला झाला. मला अश्चर्य वाटायचं! मग मी तिच्या घरी सवडीने जायची.  कधी कधी आधी सांगून… कारण माझं तिच्या घरी जाणं तिला जर साजरं करायचं असलं तर संधी मिळावी म्हणून…. मग एखाद्या घरी स्वागताला भजी मिळायची तर कधी तिने लावलेल्या परड्यातल्या आळूची वडी, कधी अचानक गेले तर खास आलं घालून केलेला किंवा लिंबाचं पान टाकून केलेला चहा मिळायचा! ….. कारण ‘ती’ ला तिच्याच स्वयंपाकघरात, तिला हवे म्हणून केले असं करण्याची मुभा संस्कारामुळे तिनेच तिला दिलेली नाही. म्हणून ‘ती’च्या साजरं करण्याला माझं निमित्त लागतं!! मग गप्पागप्पात कळायचं भाषण कळलं नाही तरी त्या भाषणाला यायचा निर्णय ‘ती’ने केला. कदाचित असं काहीतरी ठरवण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या कार्यक्रमा निमित्ताने तिच्या रोजच्या कामाला तिनेच सुट्टी घेतली. तिच्याच शब्दात सांगायचे तर ‘दिवसाचा विसावा घेतला बरं वाटलं!’ त्यानिमित्ताने तिने तिला आवडणारी ठेवणीतली साडी आवर्जून नेसली….. ‘ती’ने हौस केली… सुरक्षित वातावरणात, तिला वाटणाऱ्या सर्व मर्यादा सांभाळून…. बदल खूप बारीक असतात … पण जाणीवेतून केलेला प्रत्येक बारीकसा बदल सुद्धा, एखादीचं आयुष्य बदलायला दिशादर्शक ठरु शकतो. बचत गटाने ‘बचत करणे’ ‘कर्ज देणे’ अशी रचनाच फक्त बसवली नाही तर ग्रामीण भागातील सर्वच महिलांना एक व्यक्ती म्हणून, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी घेण्याची मुभा दिली, मर्यादित, सुरक्षित स्वातंत्र्य अनुभवण्याचीही संधी दिली!  

मागे वळून बघताना भाग १ – ‘ती’ला ‘मोकळीक’ दिली Read More »