प्रबोधनाचे गीतासूत्र

२०१५ नंतर नव्याने लिहिलेल्या विविध संस्कार पोथ्यांमध्ये आणि जुन्या पोथ्यांच्या नव्या आवृत्त्यांमध्ये आलेले गीतेतील अन्य श्लोक

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते| प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते॥                                                  (गीता-2.65) तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया| उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥                                                 (गीता-4.34)  बन्धुरात्माऽऽत्मनस्तस्य, येनात्मैवात्मना जित:| अनात्मनस्तु शत्रुत्वे, वर्तेतात्मैव शत्रुवत्‌‍॥                                                 (गीता-6.6) युञ्जन्‌‍ एवं सदात्मानं, योगी नियतमानसः | शान्तिं निर्वाणपरमां, मत्संस्थाम्‌‍ अधिगच्छति॥ (गीता-6.15) अभयं सत्त्वसंशुद्धि:, ज्ञानयोगव्यवस्थिति:| दानं दमश्च यज्ञश्च, स्वाध्यायस्तप आर्जवम्‌‍॥ (गीता-16.1)   अहिंसा सत्यमक्रोध:, त्याग: शान्तिरपैशुनम्‌‍| दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ऱ्हीरचापलम्‌‍॥                                                 (गीता-16.2)  तेज: क्षमा धृति: शौचम्‌‍, अद्रोहो नातिमानिता| भवन्ति सम्पदं दैवीम्‌‍, अभिजातस्य भारत॥                                                 (गीता-16.3) देवद्विजगुरुप्राज्ञ-पूजनं शौचमार्जवम्‌‍| ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते॥                                                 (गीता-17.14) अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्‌‍| स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते॥  (गीता-17.15)  मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः| भावसंशुद्धिरित्येतत्‌‍, तपो मानसमुच्यते॥ (गीता-17.16)  श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः| अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते॥ (गीता-17.17) सद्भावे साधुभावे च, सदित्येतत्प्रयुज्यते| प्रशस्ते कर्मणि तथा, सच्छब्दः पार्थ युज्यते॥ (गीता-17.26)

२०१५ नंतर नव्याने लिहिलेल्या विविध संस्कार पोथ्यांमध्ये आणि जुन्या पोथ्यांच्या नव्या आवृत्त्यांमध्ये आलेले गीतेतील अन्य श्लोक Read More »

२७. ज्योती असे मी विमल निरागस ईवरचरणी समर्पिता

२७. ज्योती असे मी विमल निरागस ईवरचरणी समर्पिता ज्ञान प्रबोधिनीमध्ये प्रचलित असलेल्या उपासनेमध्ये गायत्री मंत्राशिवाय आणखी आठ संस्कृत मंत्र आहेत. त्या सर्व मंत्रांमध्ये ‌‘विरजा‌’ हा शब्द आहे. म्हणून त्यांना विरजा मंत्र म्हणतात. त्याशिवाय प्रत्येक मंत्रामध्ये ‌‘शुद्ध होवो‌’ या अर्थाचे ‌‘शुध्यन्ताम्‌‍‌’ हे क्रियापदही आहे. त्यामुळे प्रबोधिनीमध्ये या मंत्रांना शुद्धिमंत्र असेही म्हणतो. संन्यासी जेव्हा संन्यास घेतात, तेव्हा जो होम केला जातो, त्याला ‌‘विरजा होम‌’ असे म्हणतात. त्यावेळी एक-एक विरजा मंत्र म्हणून त्या होमात आहुती दिली जाते. प्रबोधिनीमध्ये मात्र ब्रह्मचारी, गृहस्थ, गृहिणी, संन्यासी या सर्वांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व अंगांच्या शुद्धीसाठी हे मंत्र म्हणावेत अशी योजना केली आहे. या शुद्धिमंत्रांमध्ये आपले शरीर, कर्मेंद्रियांची चालकशक्ती, ज्ञानेंद्रिये, मन व बुद्धी हे सर्व शुद्ध व्हावेत असे संकल्प सुरुवातीला करायचे असतात. शरीर, इंद्रिये, मन व बुद्धी हीच आपल्याला जाणवणारी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुख्य अंगे आहेत. ती शुद्ध होवोत असा संकल्प रोज मनःपूर्वक केला व त्यासाठी तसे प्रयत्न केले, तर व्यक्तिमत्त्वाची ही सर्व अंगे माझी आहेत असे मानणारा ‌‘मी‌’ सुद्धा शुद्ध होत जातो. मागच्या आठवड्यातील लोकात ज्ञेय तेच ज्ञान, आणि ते सर्वांच्या हृदयातच असते असे सांगितलेले आहे. ‌‘मी‌’ शुद्ध झाल्यावर आपणच ते ज्ञेय व ज्ञान आहोत, ज्योतीरूप आहोत, हे समजते. म्हणूनच या प्रत्येक शुद्धिमंत्रामध्ये ‌‘ज्योतिरहं‌’- मी ज्योतिरूप आहे, हे शब्दही आले आहेत. परंपरेने हनुमानाच्या तोंडी एक श्लोक सांगितला जातो. त्यात हनुमान श्रीरामांना म्हणतो, मला जेव्हा मी शरीर आहे असे वाटते, तेव्हा मी तुमचा दास आहे. मला जेव्हा मी जीव आहे असे वाटते, तेव्हा मी तुमचा अंश असतो, आणि जेव्हा मी ज्योती आहे हे मला आठवते, तेव्हा मी आणि तुम्ही एकच असतो. शरीराने, जीवरूपाने किंवा ज्योतिरूपाने या पैकी कोणत्याही प्रकाराने सर्व काळ रामाचे म्हणजे ईश्वराचे स्मरण होण्यालाच सर्व भावांनी ईश्वराला शरण जाणे असे पारंपरिक भाषेत म्हणतात. यासंबंधी गीतेत पुढील श्लोक आलेला आहे. गीता 18.62 :          तमेव शरणं गच्छ, सर्वभावेन भारत |                            तत्प्रसादात्‌‍ परां शान्तिं, स्थानं प्राप्स्यसि शावतम्‌‍ ॥    गीताई 18.62 :        त्याते चि सर्व-भावे तू जाई शरण पावसी                             त्याच्या कृपा-बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत ‌ ‘ज्ञान प्रबोधिनी, एक अभिनव शैक्षणिक प्रयोग खंड : 2‌’ मध्ये ‌‘आजच्या युगातील अद्वैत तत्त्वज्ञान‌’ या शीर्षकाचा कै. आप्पांचा लेख आहे. त्यातील शेवटच्या परिच्छेदाचे उपशीर्षक म्हणून या श्लोकाची ‌‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत‌’ ही पहिली ओळ आलेली आहे (पान 75). दास आपल्या स्वामीला कायम शरण गेलेला असतो. म्हणजे सर्व बाबतीत तो आपले स्वामी जे सांगतील तेच करतो. त्याची स्वतःची काही इच्छा नसते. हनुमान श्रीरामाला या अर्थाने शरण गेलेला होता. आधुनिक शिक्षित मनाला शरण जाणे ही कल्पनाच बोचते. म्हणून कै. आप्पांनी यासाठी विज्ञानातील अनुनादन (resonance) हा शब्द वापरला आहे. तंबोऱ्याची एक तार छेडली, की त्याच स्वरात लावलेल्या दुसऱ्या तंबोऱ्याची तार अनुनाद करायला म्हणजे आपोआप पाठोपाठ झंकारायला लागते. इथे दुसऱ्या तंबोऱ्याच्या तारेला झंकारायचे की नाही हे ठरवायचे स्वातंत्र्य नसते. पारंपरिक भाषेत ती पहिल्या तंबोऱ्याच्या तारेला शरण गेलेली असते. हनुमान शरीरानिशी रामाचा दास होता. कारण जीवरूपाने त्याचा जीव रामाच्या इच्छेप्रमाणे अनुनादित होत होता. हनुमान सर्व भावाने रामाला शरण गेला होता. म्हणून ते अनुनादनही रामाच्या इच्छेचे केवळ हनुमानच्या शरीरातील प्रकटीकरण होते. प्रबोधिनीची स्थापना 1962 साली झाली. 1979 साली लिहिलेल्या या लेखात कै. आप्पांनी म्हटले आहे, तोवरच्या ‌‘सतरा वर्षातील प्रबोधिनीचे यश प्रबोधिनीत चालणाऱ्या नित्य उपासनेमध्ये आहे. स्वतःला परिपूर्ण शरण करून आपल्या अंतःकरणाची स्पंदने परब्रह्मशक्तीच्या स्पंदनांशी जोडायची ही भारतीय अध्यात्माची देणगी आहे. प्रबोधिनीत दैनंदिन उपासनेच्या रूपाने तिचे जतन व वर्धन होत असते. ते तसे सातत्याने घडले पाहिजे‌’ सर्वभावाने शरणता साधली, की या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीतील परम शांती किंवा अढळ स्थिती, ज्योतींची ज्योती असलेल्या त्या परमेश्वराचा प्रसाद म्हणून आपल्याला मिळते. आपण मनुष्यत्वाकडून विकसित मनुष्यत्वाकडे जाणे म्हणजेच देवमानव होणे हाच तो प्रसाद. म्हणूनच प्रबोधिनीच्या संकल्पगीतात ‌‘देवत्वाप्रत खचित पोचतिल पथिकसंघ येथले‌’ असे म्हटले आहे. पथिकसंघ म्हणजे आपण सर्व.

२७. ज्योती असे मी विमल निरागस ईवरचरणी समर्पिता Read More »

२६. घडो ज्ञानाचा उद्बोध

२६. घडो ज्ञानाचा उद्बोध ‘ज्ञान प्रबोधिनी, एक अभिनव शैक्षणिक प्रयोग खंड : 2‌’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर एक गूढ चित्र आहे. निळ्या-जांभळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अनेक तारे दाखवले आहेत. मध्यभागी एक प्रकाशपुंज आणि त्याच्या मधोमध एक घनदाट काळा ढग दाखवला आहे. त्या ढगातून एका दिशेने शुभ्र पांढरा प्रकाशझोत बाहेर पडतो, तर विरुद्ध दिशेने एक काळसर झोत बाहेर पडतो. (या निरूपणाच्या आधी त्या मुखपृष्ठावरील चित्र पाठवले आहे.) त्यावर चित्राची गूढता वाढवणारी गीतेतील एका श्लोकाची पहिली ओळ छापली आहे. तो श्लोक असा आहे – गीता 13.17 :         ज्योतिषामपि तज्ज्योतिः तमसः परमुच्यते|                             ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्‌‍ ॥ गीताई 13.17 :        जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले                             ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे ज्योतिः म्हणजे प्रकाश म्हणजेच ज्ञान. तम म्हणजे अंधार म्हणजेच अज्ञान. ज्ञान आणि अज्ञान याच अर्थाने या श्लोकात ज्योतिः आणि तम हे शब्द आले आहे. ज्योतिषाम्‌‍ म्हणजे सर्व ज्ञानांमध्ये. तमसः म्हणजे अज्ञानाहून. आपल्याला सर्व गोष्टी दिवसा सूर्याच्या, रात्री चंद्र-ताऱ्यांच्या आणि या पैकी काही नसेल तर दिव्याच्या प्रकाशात दिसतात. यापैकी काहीही असले, पण आपली दृष्टी काम करत नसली, तर आपल्याला दिसत नाही. त्यामुळे सूर्य-चंद्र या ज्योतींची ज्योती म्हणजे आपली दृष्टी. बाहेर प्रकाश आहे आणि दृष्टी शाबूत आहे, असे असेल तरच आपल्याला दिसते. पण काही वेळेला दिसत असूनही आपण ते पाहत नाही. कारण आपले मन दुसरीकडे कुठेतरी असते. त्यामुळे दृष्टी ही ज्योती असली तरी तिचा उपयोग मन ही ज्योती प्रकाशित झाली असेल तरच होतो. दृष्टीची ज्योत आहे मन. दृष्टी जे पाहते त्याकडे मनाचे लक्ष असले तरी अनुकूल, प्रतिकूल असा प्रतिसाद द्यायला हवा का आणि द्यायचा का हे आपली बुद्धी ठरवते. मन पाहण्यावर एकाग्र असले आणि बुद्धीने संप पुकारला तर त्या पाहण्यालाही अर्थ नसतो. म्हणून मनाची ज्योती बुद्धी आहे. बुद्धीने काहीतरी करायचा किंवा न करण्याचा निर्णय घेतला आणि निश्चय केला तरी त्याप्रमाणे कृती करण्याची प्रेरणा बुद्धीच्या पलीकडून यावी लागते. ती प्रेरणा ही बुद्धीची ज्योत म्हणजे आधीच्या सर्व ज्योतींची ज्योत. तिलाच या लोकाच्या दुसऱ्या ओळीत ‌‘ज्ञेय‌’ म्हणजे ‌‘जाणून घेतले पाहिजे ते‌’ असे म्हटले आहे. कीर्तनकारांनी अश्वत्थाम्याची एक गोष्ट प्रसिद्ध केली आहे. द्रोणाचार्य कौरवांचे गुरू होण्यापूर्वी अतिशय गरीब होते. तेव्हा त्यांच्या मुलाने, अश्वत्थाम्याने, दूध प्यायला हवे असा हट्ट धरला. गरिबीमुळे दूध विकत घेणे शक्य नसल्याने, त्याच्या आईने पाण्यात पीठ कालवून त्याला दिले. त्याने दुधाबद्दल फक्त ऐकले होते. दूध पाहिलेले नव्हते. त्यामुळे पाण्यात कालवलेल्या पिठावर त्याचे समाधान झाले. केवळ ऐकणे म्हणजे अज्ञान. पाहणे म्हणजे माहिती किंवा परिचय. दुधाची चव घेणे म्हणजे खरे दुधाचे ज्ञान. ऐकणे-पाहणे-अनुभव घेणे म्हणजे ‌‘तमसः परम्‌‍‌’, अज्ञानाच्या पलीकडे जाऊन मिळालेले ज्ञान. व्यवहारातील वस्तूंच्या बाबतीत  ऐकणे-पाहणे-अनुभव घेणे हा क्रम आहे. विचाराने कळणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत शब्द ऐकणे – त्यावर मनन करणे – अनुभव घेणे हा क्रम आहे. या क्रमाने जो अनुभव मिळतो त्यालाच श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत ‌‘ज्ञानगम्य‌’ म्हणजे ‌‘ज्ञानाने जे प्राप्त होते ते‌’ असे म्हटले आहे. दुधाची चव घेतलेली नसणे व ते पाहिलेलेही नसणे हे व्यावहारिक अज्ञान. मी सर्व पाहतो आहे, मी ज्ञान करून घेतो आहे असे वाटणे हे आध्यात्मिक अज्ञान. त्याच्या पलीकडे ‌‘तमसः परं‌’ जाणे म्हणजे मी जे पाहीन किंवा पाहतो आहे असे वाटते, ते सर्व म्हणजे मीच आहे असा अनुभव घेणे. असा अनुभव घेतला की ज्ञेय आणि ज्ञानगम्य काही वेगळे नाही हे कळते. हे कळणे म्हणजेच गीतेतील ‌‘ज्ञान‌’ किंवा गीताईतले ज्ञानाचे ज्ञान. हे ज्ञान म्हणजेच ज्ञेय म्हणजेच ज्ञानगम्य. दीर्घ काळ चिंतन, मनन, ध्यान केल्यावरच हा अनुभव येणार. तोपर्यंत आपल्यासाठी ही केवळ शाब्दिक माहितीच आहे. आधुनिक विज्ञानाच्या पद्धतीने विचार केला तर सर्व विश्व जड, म्हणजे विचारक्षमता व संवेदनक्षमता नसलेल्या, ऊर्जेच्या स्फोटातून बनले आहे. हे जाणून व समजून घेणाऱ्या मला मात्र विचारक्षमता व संवेदनक्षमता आहे. आधीच्या निरूपणात म्हटल्याप्रमाणे कुशाग्र बुद्धीने जाणून घेतलेले हे सर्वोच्च भौतिक ज्ञान आहे. पण ते आध्यात्मिक पातळीवरचे अज्ञानच  आहे. मीपण विश्वाएवढे व्यापक करता आले की विश्व जिच्यापासून निर्माण झाले ती ऊर्जा पण विचारक्षम व संवेदनक्षम आहे हे कळते. सर्व ज्योतींची ज्योती हे ज्ञेय, आध्यात्मिक अज्ञान जाऊन मी आणि विश्व एकरूप आहोत हे कळणे म्हणजे तमसः परं असलेले ज्ञानगम्य. ज्ञेय आणि ज्ञानगम्य एकच आहेत हे कळणे हे ज्ञान. कुशाग्र बुद्धी शुद्ध झाल्यावर बुद्धीच्या केंद्रस्थानी म्हणजे हृदयात हे ज्ञान-ज्ञेय-ज्ञानगम्य एकरूप होऊन राहिलेले आहे याचा अनुभव येतो. अनुभव येईपर्यंत ज्यांना शक्य आहे त्यांना यावर श्रद्धाच ठेवायला हवी. किंवा पडताळा घेऊन पाहिला पाहिजे असे एक गृहीत म्हणून हे स्वीकारायला हवे. ज्ञान प्रबोधिनीला कधीतरी सर्वांमधील या ज्ञानाचे ही प्रबोधन करायचे आहे.

२६. घडो ज्ञानाचा उद्बोध Read More »

२५. जे अटळ आहे त्याचा स्वीकार

२५. जे अटळ आहे त्याचा स्वीकार बहुतेकांनी लहानपणी खेळातील शोभादर्शक वापरला असेल किंवा बनवलाही असेल. त्यात साधारणपणे वेगवेगळ्या आकाराचे रंगीत खडे किंवा काचेच्या बांगड्यांचे तुकडे घातलेले असतात. शोभादर्शक फिरवत राहिले की आतल्या खड्यांच्या किंवा तुकड्यांच्या वेगवेगळ्या आकर्षक रचना दिसत जातात. तुकड्यांची संख्या मर्यादित असली, तरी रचना असंख्य आणि सतत बदलत असतात. एकदा पाहिलेली रचना पुन्हा दिसेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. नवनवीन आकृत्या तयार होतात व नाहीशा होतात. पण एका शोभादर्शकातल्या काचांच्या तुकड्यांची संख्या स्थिर असते. रचना किंवा आकृत्या बदलत्या असतात, पण त्या ज्यांच्यापासून होतात, त्या तुकड्यांची संख्या स्थिर असते. जे शोभादर्शकाच्या बाबतीत आहे, तेच सगळ्या विश्वाच्या बाबतीत आहे. ज्या अणूंपासून विश्व बनलेले आहे, त्यांची संख्या अगणित असली, तरी ती बदलती आहे, असे कोणाला म्हणावेसे वाटत नाही. पृथ्वीवरील असंख्य जीवांपासून अनंत आकाशगंगांपर्यंत जे काही बनलेले आहे ते या अणूंपासून बनलेले आहे. एका लहान विषाणूपासून अनंत आकाशगंगांपर्यंत या सर्व रचना कधीतरी बनत असतात आणि कधीतरी नष्ट होत असतात. विषाणूचे आयुष्य काही मिनिटांचेच असते. आकाशगंगेचे कोट्यवधी किंवा काही अब्ज वर्षांचेही असू शकते. परंतु त्या अणूंपासून तयार होतात हे निश्चित व ते आकार नष्ट होतात हेही निश्चित. त्यांची निर्मिती किंवा जन्म आणि तसेच नाश किंवा मृत्यू अटळ आहे. प्रश्न फक्त निर्मिती आणि विनाश यांच्यामध्ये किती काळ जाणार याचा आहे. त्यांच्या जन्मापूर्वी  आणि मृत्यूनंतरही अणू असतात. अणूंचे अस्तित्व ही कायमचे आहे असे नाही. विश्वाचे आयुष्य काही अब्ज वर्षांचे असले, तरी त्यातले सर्व अणू पहिल्या तीन मिनिटांतच निर्माण झाले असे काही शास्त्रज्ञ म्हणतात. ते असे निर्माण झाले असले, तर ते ही कधीतरी नष्ट होणारच. मग ते ज्या ऊर्जेपासून बनले, त्या ऊर्जेचे अस्तित्व अटळ आहे आणि अणूंची निर्मिती झाली तसे ते नष्ट होणार हेही अटळ आहे. जे अटळ आहे ते सर्व स्वीकारले पाहिजे, असे गीतेमध्ये म्हटले आहे. गीता २.२७ :          जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च|                            तस्मादपरिहार्येऽर्थे, न त्वं शोचितुमर्हसि ॥ गीताई २.२७ :         जन्मतां निश्चयें मृत्यु मरतां निश्चये                            म्हणूनि न टळे त्याचा व्यर्थ शोक करू नको विषाणूंपासून आकाशगंगांपर्यंत सर्वांची निर्मिती आणि नाश अटळ आहे. विज्ञानाचा थोडा अभ्यास झाला असेल, तर या वास्तवाकडे तटस्थपणे पाहता येते. विषाणू मेला किंवा आकाशगंगेचा स्फोट झाला, तर त्यांच्या रचनेतले सौंदर्य ज्यांना दिसते त्यांना थोडी हळहळ वाटेल. परंतु ते नष्ट झाल्याचे दुःख मनात ठेवून कुणी शोक करत राहणार नाही. स्वतःच्या जन्माचा आनंद आपल्याला व्यक्त करता येत नाही. पण घरातल्या नव्या बाळाच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करावासा वाटतो. कोणाच्या अकाली किंवा अपघाती मृत्यूचे दुःख होते. पूर्ण कृतार्थ जीवन जगलेल्या शतायुषी माणसाच्या मृत्यूचेही दुःख होते. स्वतःच्या संभाव्य मृत्यूची भीतीही बहुतेकांच्या मनात असतेच. जन्माचा आनंद आणि मृत्यूचे दुःख किंवा भीती त्या त्या व्यक्तीशी असलेल्या भावनिक गुंतवणुकीमुळे म्हणजे नात्यामुळे असते. प्राण्यांना जे काही मन असते, त्यामुळे प्राण्यांमध्येही आईला पिल्लाच्या मृत्यूचे किंवा एका झुंडीतील प्राण्यांना झुंडीतल्या एखाद्या प्राण्याच्या मृत्यूचे दुःख होत असावे असे त्यांच्या वर्तनावरून काही वेळा वाटते. पण ते फारच थोड्या काळापुरते असते. मृत्यूची घटना विसरून प्राणी काही वेळातच पूर्ववत व्यवहार करू लागतात. माणसांमध्ये मात्र जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूचे दुःख काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत असू शकते. याचे कारण शरीर आणि मनाचे नाते ही बऱ्यापैकी घट्ट असते. आणि मन म्हणजेच मी अशी आपली बहुतेकांची ठाम समजूत असते. मी मनापेक्षा वेगळा आहे. हात, पाय, डोळे, कान या इंद्रियांसारखे मनही एक इंद्रिय आहे. आणि ती इंद्रिये वापरणारा मी वेगळा आहे, हे समजण्याची आवश्यकता असते. जसे स्वतःच्या बाबतीत आहे, तसेच इतर माणसांच्या बाबतीत असते. त्यांचे शरीर आणि मन यांच्यापेक्षा त्यांचा ‌‘मी‌’ वेगळा असतो. शरीराचा जन्म आणि मृत्यू अटळ आहे. हे समजणे थोड्याफार प्रयत्नांनी जमते. ‌‘मी‌’ चे अस्तित्व कायम आहे, अटळ आहे हे कळायला मात्र बराच प्रयत्न करावा लागतो. या प्रयत्नांनाच आध्यात्मिक साधना म्हणतात. शरीराचा जन्म-मृत्यू अटळ म्हणजे अपरिहार्य आहे. त्यामुळे जो जो जन्माला आला आहे, त्याच्या मृत्यूचा शोक करणे योग्य नाही, असे या श्लोकात सांगितले आहे. हा श्लोक सुद्धा अंत्येष्टीच्या पोथीमध्ये समाविष्ट केलेला आहे (ज्ञान प्रबोधिनी संस्कारमाला : अन्त्येष्टी दाहकर्म संस्कार पोथी, पाचवी आवृत्ती, शके 1939, पान 12), परंतु तो केवळ स्मशानातच म्हणावा असे नाही. आपल्या आजूबाजूला सर्व काळ सर्व ठिकाणी जन्म-मृत्यूचा खेळ सुरू असतो. आपले आणि इतर सर्वांचे शरीर ही त्या खेळाचा भाग आहे हे कळले आणि लक्षात राहिले पाहिजे.

२५. जे अटळ आहे त्याचा स्वीकार Read More »

२४. बीजापासून फळ आणि फळावेगळे बीज

२४. बीजापासून फळ आणि फळावेगळे बीज भुईमुगाच्या शेतामध्ये जाऊन एखादे रोप उपटले आणि खाली लागलेल्या कोवळ्या शेंगा पाहिल्या, तर लक्षात येते की त्यांच्यामध्ये दाणे आणि टरफलं अजून एकमेकांपासून वेगळे झालेले नाहीत. भुईमुगाची पेरणी केली की त्याच्या मूळ सत्त्वापासून म्हणजे सृजनाच्या किंवा नवनिर्मितीच्या शक्तीपासून पूर्ण रोप आणि शेंगा तयार होतात. त्या शेंगांची हळूहळू वाढ होत टरफल टणक होत जाते व आतले दाणे भरत जातात. पूर्ण वाढ झाल्यावर टरफल वेगळे होते आणि आतले दाणे सुटे होतात. त्या दाण्यांमध्ये मुळात पेरलेले सत्त्व पुन्हा आलेले असते. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये एके ठिकाणी म्हटले आहे, की आपले शरीर हे ब्रह्मांडाचे फळ आहे. परब्रह्माच्या सृष्टी निर्माण करण्याच्या संकल्पाचे देहफळ तयार होते आणि तोच संकल्प देहामध्ये पुन्हा तयार होतो. हा संकल्प म्हणजेच ब्रह्मांडाचे सत्त्व आहे. ज्यांचे देहफळ खरेच परिपक्व झालेले आहे त्यांना स्वतःला परब्रह्माच्या संकल्पाचा विशेष प्रकारे अनुभव येतो. रामकृष्ण परमहंसांना समाधी अवस्थेमध्ये असताना आपण खोलीमध्ये वर तरंगत आहोत आणि आपला देह खाली आसनस्थ आहे असे दिसले. महर्षी  रमण यांनी लहान वयातच एक प्रयोग केला. मृत्यू काय असतो हे पाहण्यासाठी त्यांनी शवासन केले आणि निश्चल पडून राहिले. मृत्यू झाला म्हणजे हातापायातील संवेदना गेलेल्या आहेत. डोळे मिटलेले आहेत आणि कानही काही ऐकत नाहीत अशी स्थिती हवी. हातापायांचे स्नायू कडक व्हायला हवेत. शरीर असे क्रियाशून्य आणि संवेदनाशून्य केले, तरी ‌‘मी‌’ आहेच, असे त्यांना जाणवले. या अनुभवानंतरच त्यांनी आपले घर सोडले व ‌‘मी आहेच‌’ हा अनुभव ज्याला येतो तो ‌‘मी‌’ कोण, याचा शोध घेण्यासाठी तपश्चर्या केली. ‌‘मी‌’ म्हणजे देह नाही, हे त्यांना पहिल्याच प्रयोगात लक्षात आले होते. कोणी देह म्हणजे उशीचा अभ्रा व ‌‘मी‌’ म्हणजे आतली उशी असे वर्णन केले आहे. तर कोणी देह म्हणजे उशीची रिकामी खोळ व ‌‘मी‌’ म्हणजे त्या उशीला आकार देणारा आतला कापूस, असेही आपल्या अनुभवाचे वर्णन केले आहे. हे अनुभव वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वयामध्ये आलेले आहेत. त्यामुळे देहफळ परिपक्व होणे, म्हणजे शरीराची पूर्ण वाढ होणे, असा त्याचा अर्थ नसून, त्या शरीराबरोबर असलेले मन व बुद्धी परिपक्व होणे असा अर्थ आहे. ते ज्यांचे परिपक्व झाले आहेत त्यांना शरीर हे जणू रथासारखे आहे, त्या शरीरातील इंद्रिये जणू रथाच्या घोड्यांसारखी आहेत, बुद्धी म्हणजे त्या रथाचा जणू सारथी आहे व मन त्या सारथ्याच्या हातातील इंद्रियांना नियंत्रित करणारा जणू लगाम आहे हे कळते. आणि ‌‘मी‌’ त्या सारथ्याला कुठे, कधी व किती वेगाने जायचे या सूचना देणारा, त्या रथात बसलेला रथाचा जणू स्वामी आहे, हे कळते. रथातील ‌‘मी‌’ वेगळा असल्यामुळेच रथाच्या सगळ्या भागांना माझे शरीर, माझे मन, माझी बुद्धी असे आपण म्हणतो. ‌‘मी‌’ या सर्वांपेक्षा वेगळा, हे कळण्याइतके ज्याची बुद्धी परिपक्व झाली आहे, तो आपल्या शरीराकडे कसे पाहतो, हे गीतेतील पुढील श्लोकात सांगितले आहे. गीता २.२२ :          वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि |                             तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही ॥ गीताई २.२२ :         सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे मनुष्य घेतो दुसरी नवीन                            तशी चि टाकूनि जुनी शरीरे आत्मा हि घेतो दुसरी निराळी हा श्लोक देखील प्रबोधिनीने प्रचारात आणलेल्या अंत्येष्टीच्या पोथीत आलेला आहे (ज्ञान प्रबोधिनी संस्कारमाला : अन्त्येष्टी दाहकर्म संस्कार पोथी, पाचवी आवृत्ती, शके १९३९ , पान १३ ). उशी आणि तिचा अभ्रा याऐवजी गीतेमध्ये शरीर आणि शरीरावरचे कपडे असा दृष्टांत वापरला आहे. जुने, विरलेले किंवा फाटलेले कपडे आपण फेकून देतो. आणि नवीन चांगले कपडे घालतो. तसेच जुने, निरूपयोगी शरीर ‌‘मी‌’ टाकून दिले आहे व दुसरे नवे शरीर धारण करीन असे ‌‘मला‌’, म्हणजे आत्म्याला, वाटले पाहिजे. असे वाटणे हाच परब्रह्माच्या सृष्टी निर्माण करण्याच्या संकल्पाचा एका व्यक्तीपुरताचा भाग आहे. स्मशानात गेलेल्या सर्व व्यक्ती हे म्हणण्याइतक्या परिपक्व झालेल्या नसतात. ‌‘काशीस जावे नित्य वदावे‌’ अशी आपल्याकडे म्हण आहे. असे म्हणत राहिले, तर कधीतरी काशीयात्रा घडतेच. कारण पुन्हा पुन्हा म्हणून तो संकल्प मनात पक्का झालेला असतो. प्रत्यक्ष काशीयात्रा घडेपर्यंत, ती घडणारच अशी श्रद्धा मनात तयार होते. मी 1977 साली आंध्र प्रदेशातल्या वादळानंतर समुद्रलाटेत बुडालेल्या तिथल्या सुमारे अडीचशे व्यक्तींच्या मृत देहांचे दफन केले होते. त्या प्रत्येक वेळी अंत्यसंस्कार म्हणून ‌‘वासांसि जीर्णानि‌’ हा श्लोक म्हटला होता. जिवंतपणीच ‌‘मी‌’ वेगळा व ज्यात ‌‘मी‌’ राहतो तो देह वेगळा, असा रमण  महर्षींसारखा अनुभव मला अजून आलेला नाही. तरी अभावितपणे या श्लोकाचा असा अनेक वेळा जप घडल्यामुळे ‌‘मी देह नाही, आत्मा आहे‌’ या विधानावर माझी श्रद्धा जडली आहे.

२४. बीजापासून फळ आणि फळावेगळे बीज Read More »

२३. आपल्या शरीरातील अक्षय शक्ती

२३. आपल्या शरीरातील अक्षय शक्ती लढाया, अपघात किंवा शस्त्रक्रिया या दरम्यान पूर्वीच्या काळी अनेकदा असे घडले आहे की शरीराचा एखादा अवयव जखमी/निकामी झाला तरी त्याच्या वेदना त्या माणसाला जाणवल्या नाहीत. आजही असे प्रसंग घडल्याच्या बातम्या येत असतात. बऱ्याच वेळेला पूर्वकल्पना नसताना हे प्रसंग घडतात. तसेच पूर्वकल्पना नसताना बारीकशा गोष्टींनीही असह्य वेदना होऊ शकतात. पेशवाईच्या काळातली उदाहरणे अशी आहेत, की शूर सरदार न्हाव्यासमोर बसला आणि वस्तरा लागल्यावर त्याच्या तोंडून दुःखाचे उद्गार बाहेर पडले. एवढेसे लागल्यावर तोंडातून दुःखाचे उद्गार येण्यावरून न्हाव्याने सरदाराची थट्टा केल्यावर त्याने आपल्या पायात भाल्याचा फाळ घुसवला आणि चेहऱ्यावरचे स्मित हास्य कायम ठेवले. शरीराला इजा झाल्यावर त्याचे संदेश मेंदूपर्यंत जातात. परंतु त्या संदेशांकडे लक्ष द्यावे वा नाही, हे आपले मन ठरवू शकते. चुकून वस्तरा लागला तेव्हा मन आणि शरीर जोडलेले होते. आणि भाल्याचा फाळ पायात मुद्दाम घुसवला तेव्हा ठरवून मन शरीरापासून किंवा निदान पायाच्या संवेदनांपासून वेगळे केले होते. अपघाताच्या वेळीही मन दुसऱ्या कोणत्या तरी विचारात असल्याने इजा झाल्याचे लगेच लक्षात येत नाही.  पायाच्या दुःखाकडे लक्ष द्यायचे नाही असे ठरवले की तिकडे लक्ष जात नाही. तसेच मन आणखी वेगळ्या कामात पूर्ण एकाग्र असले, तरी इतर कोणत्या संवदेनांकडे लक्ष जात नाही. उपनिषदांमध्ये असे एक निरीक्षण सांगितले आहे की आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांची तोंडे बाहेरच्या जगाचे ज्ञान व्हावे म्हणून शरीराच्या बाहेरच्या दिशांनी ठेवलेली आहेत. मन इंद्रियांशी जोडले गेले की तेही आपोआप बाहेरच्या दिशांनी धावते. पण इंद्रियांची तोंडे कायम बाहेरच असतात तसे मनाचे नाही. मन पाहिजे तेव्हा आतही वळवता येते. आपण ‌‘कानात प्राण आणून ऐकले‌’ असे म्हणतो. तेव्हा मन फक्त कानांशी जोडलेले असते. इतर इंद्रियांशी असलेला संबंध तात्पुरता बंद असतो. त्यावेळी फक्त ऐकू येते. पावनखिंडीत बाजीप्रभूंना तोफांचे आवाज ऐकायचे होते. ऐकण्याशिवाय बाकी काहीही करायचे नव्हते. त्यामुळे शरीर स्वतंत्रपणे जखमांची पर्वा न करता लढत होते व कान फक्त तोफांच्या आवाजांची वाट पाहत होते. डोळ्यात प्राण आणून कोणाची वाट बघत असताना मन फक्त डोळ्यांशी जोडलेले असते. अशी कल्पना करा की मन कुठल्याच इंद्रियाशी जोडले गेलेले नाही. आणि इंद्रियांच्या वाटेबाहेर लक्ष देण्याऐवजी ते आतमध्ये वळलेले आहे. तर मनाला काय कळते? आपल्या आतमध्ये एक जाणीवेचे केंद्र आहे. तेच सर्व शरीराला प्रेरणा देत असते. आणि त्यालाच स्वतःची जाणीव असते, हे त्यावेळी मनाला कळते. मन तासन्‌‍ तास गाणी ऐकू शकते, चित्रे बघू शकते, तसेच तासन्‌‍ तास आपल्या आतल्या जाणीवेच्या केंद्राशीही जोडलेले राहू शकते. असे दिवसातून अनेक वेळा आणि रोजच आतल्या केंद्राशी जोडले राहण्याचा मनाला सराव झाला, तर काय होईल? गीतेच्या पुढच्या श्लोकात हेच सांगितले आहे. गीता २.२०  :         न जायते म्रियते वा कदाचित्‌‍ नायं भूत्वा भविता वा न भूयः |                            अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ गीताई २.२० :         न जन्म पावे न कदापि मृत्यु होऊनि मागे न पुढे न होय                             आला न गेला स्थिर हा पुराण मारोत देहास परी मरे ना डोंबाऱ्याचे मूल जेव्हा दोरीवर चालायला शिकते तेव्हा सुरुवातीला त्याचे लक्ष आजूबाजूला सगळीकडेच असते. तेव्हा त्याला खालून त्याचे पालक हात धरून आधार देतात. हळूहळू फक्त दोरीवर तो लक्ष केंद्रित करू लागला, की आजूबाजूचे काही त्याला जाणवत नाही. मग पडण्याची भीतीही जाते. मग हात सोडून दिलेला चालतो. तशी आपल्या मनाला आतल्या केंद्रावर लक्ष केंद्रित करायची सवय लागली, की त्याला शरीराशी जोडले राहण्याची आवश्यकता कमी होते. मग ‌‘देह जावो अथवा राहो‌’ अशी मनाची स्थिती होते. शरीराचा जन्म झाला अथवा मृत्यू झाला, किंवा एक आयुष्य संपल्यावर पुन्हा जन्म घेतला, तरी मनाला त्याची फिकीर नसते. आतले जाणीवेचे केंद्र स्थिर आहे, ते नाहीसे होणार नाही याचा त्याला अनुभव येतो. त्यामुळे शरीर कोणी कापले तरी ‌‘मी‌’ मरणार नाही, मरते ते फक्त शरीर, असा मनाचा ठाम विश्वास असतो. हेच या श्लोकात सांगितले आहे. म्हणून प्रबोधिनीने केलेल्या अंत्येष्टीच्या पोथीत हा श्लोक देखील समाविष्ट केला आहे. (ज्ञान प्रबोधिनी संस्कारमाला : अन्त्येष्टी दाहकर्म संस्कार पोथी, पाचवी आवृत्ती, शके १९३९, पान १२) स्मशानामध्ये हा श्लोक म्हणताना गेलेल्या व्यक्तीचे आप्त आणि मित्रपरिवार यांना ही अगदी नैसर्गिक घटना घडली आहे हे समजून घ्यायला या ज्ञानाचा उपयोग होतो. आतल्या जाणीवेच्या केंद्राशी म्हणजेच आत्म्याशी जोडले जाण्याचा मनाला प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत यावर श्रद्धाच ठेवावी लागते.

२३. आपल्या शरीरातील अक्षय शक्ती Read More »

२२.आपल्या शरीरातील बदल चित्रपट पाहिल्यासारखे पाहावेत

२२.आपल्या शरीरातील बदल चित्रपट पाहिल्यासारखे पाहावेत पुराणामध्ये ध्रुवाची कथा आहे. सावत्र आईमुळे त्याला वडिलांच्या मांडीवर बसता आले नाही. त्यामुळे जेथून कोणीही उठवणार नाही, असे अढळपद मिळावे म्हणून, त्याने लहानपणीच तपश्चर्या केली. आकाशात उत्तरेला असणारा ध्रुव तारा, गेली काही हजार वर्षे एकाच जागेवर स्थिर दिसतो. तो ध्रुवतारा हेच कुमार ध्रुवाला मिळालेले अढळ स्थान अशी समजूत आहे. कुठल्याही वाहनाच्या चाकांचा अक्ष पाहिला तर तो स्थिर असतो. त्याच्या भोवती चाकाचे सर्व बिंदू गोल फिरत असतात. त्या अक्षाच्या ठिकाणी आपल्याला जाता आले, तर आपणही स्थिर राहू. पण अक्षापासून थोडे जरी दूर गेलो, तरी जत्रेतल्या पाळण्याप्रमाणे आपण गरागरा फिरू लागतो. हल्ली पूर्व-पश्चिम किनाऱ्यांवरून येणाऱ्या चक्रीवादळांची उपग्रहामधून घेतलेली छायाचित्रे बघायला मिळतात. त्यामध्ये वादळाचा केन्द्रबिंदू स्थिर असतो व त्याभोवती सगळे ढग वेगाने फिरत असतात. या सर्व चक्राकार गतींमध्ये केन्द्रस्थान स्थिर असते. तसे आपल्या आयुष्याकडे पाहता येईल का? गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तसे पाहायला सांगतात. गीता २.१३   :         देहिनोऽस्मिन्‌‍ यथा देहे कौमारं यौवनं जरा |                            तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति ॥                            गीताई २.१३  :        ह्या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी |                             तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे  जन्मापासून मृत्यूपर्यंतचे कोणाचेही आयुष्य पाहिले तर त्यात शिशू अवस्था, बालपण, पौगंडावस्था, तारुण्य, अशा अवस्थांमधून शरीराची वाढ होत जाताना दिसते. मग प्रौढ वयामध्ये काही वर्षे स्थैर्याची जातात. वृद्धावस्थेत शरीराची शक्ती कमी व्हायला लागते. आणि शेवट मृत्यूमध्ये होतो. आपले शरीर अन्नद्रव्यापासून बनलेले असते. आणि मृत्यूनंतर त्याची राख/माती होते. त्या मातीतूनच कुठे तरी पुन्हा अन्नद्रव्य तयार होऊन जगाच्या पाठीवर कुठे तरी काही काळानंतर नवीन व्यक्तीचे शरीर बनते. त्यामुळे एका व्यक्तीच्या शरीराचा जन्म ते मृत्यू हा सरळ रेषेतील प्रवास नसून जन्म-मृत्यू-जन्म-मृत्यू अशा एका मोठ्या अन्न-चक्रातील आपल्याला सरळ भासणारा छोटासा तुकडा आहे. आपण इतरांच्या जन्म-मृत्यूचे निरीक्षण करून या चक्राचा अंदाज करू शकतो. आपले शरीरही याच चक्राचा एक भाग आहे व त्या चक्राच्या गतीनुसार येणाऱ्या आयुष्यातील विविध टप्प्यांपैकी बालपण, तारुण्य आणि जरा किंवा म्हातारपण या तीन टप्प्यांचा उल्लेख गीतेच्या या श्लोकामध्ये आलेला आहे. हे तीन टप्पे आपण अनुभवलेले असतात. शरीरात बदल झाले तरी ‌‘हे माझे शरीर‌’ म्हणणारा त्या शरीरातील ‌‘मी‌’ एकच आहे. तो बदललेला नाही. याचा अनुभवही आपण घेत असतो. इतर अनेकांच्या देहाप्रमाणे आपल्या देहाचीही माती होणार व त्या मातीला अन्नद्रव्याच्या माध्यमातून नव्या शरीरात स्थान मिळणार याचेही अनुमान आपण करू शकतो. हा जो स्थिर ‌‘मी‌’ आहे, तो मृत्यूनंतर शिल्लक राहतो की नाही, हे लाखातील 99,999 लोकांना सांगता येत नाही. त्यातील अनेकांचा मृत्यूबरोबर ‌‘मी‌’ ही संपतो असे मानण्याकडे कल असतो. पण मागच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे ज्याने ब्रह्मसंस्पर्शाचा अनुभव घेतला आहे त्याला अखंड आनंदच अनुभवायला येतो. त्याला माझ्या फक्त शरीराचा मृत्यू झाला, मी आहे तसाच आहे याचा अनुभव येतो. मृत्यूनंतर मी संपतो हे जसे अनुमानच आहे, तसे मृत्यूनंतरही मी असतोच हा श्रद्धेचा विषय आहे. जो अशी श्रद्धा ठेवतो, त्याला ब्रह्माशी म्हणजे परमेश्वराशी एकरूप होण्याची संधी आहे. जवळच्या आप्तांच्या मृत्यूच्या प्रसंगी या श्लोकाचे स्मरण झाले तर मृत्यूचा शोक, आणि आपणही असेच एक दिवस मरणार ही भीती कमी होते. म्हणून धर्म निर्णय मंडळाने तयार केलेल्या व प्रबोधिनीने वापरून प्रसार केलेल्या अंत्येष्टीच्या पोथीमध्ये या श्लोकाचा समावेश केला आहे (ज्ञान प्रबोधिनी संस्कारमाला : अन्त्येष्टी दाहकर्म संस्कार, पाचवी आवृत्ती, शके 1939, पान 13). या श्लोकाच्या वाचन, पठण आणि चिंतनाने मृत्यूची भीती कमी होते. मृत्यूला सामोरे जाता येते. जो संकटांना धैर्याने सामोरा जातो, त्याला संस्कृतमध्ये ‌‘धीर‌’ म्हणतात. जीवनातील इतर घडामोडींसारखेच त्याला मृत्यूकडे तटस्थपणे पाहता येते. जो सर्व प्रकारच्या नव्या किंवा अवघड परिस्थितीला आणि मृत्यूला ही धैर्याने सामोरा जातो, तो आयुष्यातील इतर कठीण प्रसंगांनाही न डगमगता सामोरा जाऊ शकतो. स्वतःच्या मृत्यूचेही स्वागत करू शकतो. ब्रह्मसंस्पर्श होईपर्यंत एक शरीर गेले तर दुसरे शरीर मिळेल याची खात्री असल्याने मृत्यूला समोर पाहून तो गडबडून जात नाही. ह्या श्लोकापासून ज्ञानयोगातील मृत्यूकडे बघण्याच्या दृष्टिकोनाची ओळख आपण करून घ्यायला लागलो. प्रबोधिनीचे राष्ट्रसेवेचे व्रत हे ज्ञान-कर्म-युत-भक्तिव्रत आहे. त्यातील ज्ञानामध्ये लौकिक, म्हणजेच व्यावहारिक आणि शास्त्रीय ज्ञानाबरोबर, जन्म आणि मृत्यूच्या कोड्यामागील आध्यात्मिक ज्ञानाचाही समावेश होतो. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे जगातील सर्व घडामोडींमधील स्थिर काय आणि बदलते काय हे ओळखता येणे.

२२.आपल्या शरीरातील बदल चित्रपट पाहिल्यासारखे पाहावेत Read More »

२१. चिदानन्दरूपी शिव मी शिव मी

२१. चिदानन्दरूपी शिव मी शिव मी  या गीतासूत्राच्या तिसऱ्या श्लोकाच्या निरूपणात आपल्या दैनंदिन व्यवहारातील सर्व योग्य त्या कृती, योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात कराव्यात असे सांगितलेले होते. तिथून कर्मयोगाची सुरुवात होते. कर्मयोगात सर्व कामे निरपेक्ष बुद्धीने करायची असतात. पण ते एकदम करता येत नाही. म्हणून आपल्या कर्माचे परिणाम परमेश्वराला अर्पण करायची युक्ती सांगितली. तिथून भक्तियोग सुरू होतो. सुरुवातीला भक्तियोगात सुद्धा परमेश्वराची मूर्ती  किंवा चित्र समोर लागते. त्यावर मन एकाग्र करत गेले, की हळूहळू डोळे मिटले तरी डोळ्यासमोर मनातल्या मनातच मूर्ती समोर उभी राहते. काही काळानंतर मूर्ती किंवा चित्राऐवजी एखादी प्रकाशज्योत मनातच पाहणे हे सुद्धा परमेश्वराचे प्रतीक म्हणून पुरते. मागच्या श्लोकात स्वतःच्या आतमध्ये हृदयाच्या ठिकाणी किंवा कपाळाच्या मध्यभागी आतमध्ये ज्योतीची कल्पना करून त्यावर मन एकाग्र करण्याचा सराव करावा अशी कल्पना सांगितली होती. एवढा सराव झाला, की भक्तियोगातून ध्यानयोगात प्रवेश होतो. असे एकाग्र मनाने ध्यानयोग करत गेल्यास हळूहळू बुद्धी शुद्धी होऊ लागते. बुद्धी शुद्ध झाल्यावर काय होते, हे आजच्या श्लोकात सांगितले आहे. पूर्वी  विद्याव्रत संस्काराला आपण उपनयन किंवा दीक्षाग्रहण संस्कार म्हणायचो. दीक्षाग्रहण संस्कार पोथीच्या पहिल्या आवृत्तीमध्ये दैनंदिन उपासनेचा परिणाम सांगण्यासाठी गीतेतील पुढील श्लोक समाविष्ट केला होता. (उपनयन उपासना, १९७६ आवृत्ती, पान २२) गीता ६.२८ :          युञ्जन्‌‍ एवं सदा आत्मानं योगी विगतकल्मषः |                            सुखेन ब्रह्मसंस्पर्शम्‌‍ अत्यन्तं सुखम्‌‍ अश्नुते ॥ गीताई ६.२८ :         आत्म्यास नित्य जोडूनि ह्यापरी दोष जाळुनी                             सुखे चि भोगतो योगी ब्रह्मानंद अपार तो कल्मष म्हणजे दोष किंवा अशुद्धी. विगतकल्मष म्हणजे ज्याचे दोष किंवा अशुद्धी नाहीशी झाली आहे, असा. म्हणजेच ज्याची बुद्धी शुद्ध झाली आहे असा. ध्यानयोगाचे आचरण करता करता ज्याची बुद्धी शुद्ध झाली आहे अशी व्यक्ती सुखेन, म्हणजे सहजपणे, फार कष्ट न घेता, अत्यंत सुख म्हणजे दुःखाचा स्पर्श ही नसलेले सुख अनुभवते. अशा सुखालाच तत्त्वज्ञानामध्ये ब्रह्मानंद असा शब्द वापरतात. प्रबोधिनीमध्ये विद्याव्रत संस्काराच्या आधीपासून काही केंद्रांवर पाचवीपासूनचे, तर काही केंद्रांवर पहिलीपासूनचे विद्यार्थी उपासनेमध्ये ‌‘चिदानंदरूपी शिव मी शिव मी‌’ हा मंत्र म्हणतात. वरील श्लोकातील दुसऱ्या ओळीचा हा त्यातल्या त्यात सोपा अनुवाद आहे. लहानपणापासून म्हणता म्हणता कधीतरी त्याचा अर्थ समजून घ्यायची इच्छा व्हावी, आणि नियमित दिनक्रम, कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग, या पायऱ्या चढत चढत या मंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, अशी अपेक्षा आहे. या पायऱ्या ठरवूनही चढता येतात. किंवा निष्ठेने कर्मयोग किंवा भक्तियोग आचरत गेल्यास आपोआपही चढल्या जातात. आपणच ब्रह्म झाल्यावर ब्रह्माचा आनंद कसा अनुभवणार? तुकाराम महाराजांनी साखर होऊन जाण्यापेक्षा  साखरेची गोडी अनुभवता यावी, असा दृष्टांत दिला आहे. म्हणूनच येथे, ब्रह्माशी एकरूप होण्यापेक्षा ब्रह्माचा अतिशय निकटचा स्पर्श – ब्रह्मसंस्पर्श व्हावा, असे म्हटले असावे. बुद्धी शुद्ध झाल्यावर ब्रह्मसंस्पर्शाचा आनंद होतो ही ध्यानयोगाची भाषा. भक्तियोगात परमेश्वराची कृपा झाली की त्याच्या दर्शनाचा आनंद होतो असे म्हणतात. ‌‘आनंदाचे डोही आनंद तरंग‌’ या अभंगामध्ये तुकारामांनी ब्रह्मसंस्पर्श झाल्याचे वर्णनच केले आहे. कोणी ब्रह्मसंस्पर्श म्हणजे शुद्ध पक्षातील चतुर्दशीचा चंद्र असे वर्णन केले आहे. एक दिवसाने पौर्णिमेचे पूर्णबिंब होणार आहे, पण पूर्णबिंब झालेले तर नाही. पौर्णिमेचे बिंब व्हायचे ही नाही. कारण पूर्णबिंब म्हणजे ब्रह्माशी एकरूप होणे. चतुर्दशीचा चंद्रच राहायचे. रामकृष्ण परमहंसांच्या संवादात ‌‘भावमुखी राहा‌’ असे शब्द वारंवार येतात. जणू घराच्या उंबऱ्यावर उभे राहून आतमध्ये वळून आतील ब्रह्माचा अनुभवही घेता येतो तर कधी बाहेर तोंड वळवल्यावर बाहेरच्या जगातही व्यवहार करता येतो. अशा स्थितीत राहणे म्हणजे भावमुखी राहणे. त्यांची बुद्धी शुद्ध असल्यामुळे अशा स्थितीत राहून ते सर्व काळ आनंद अनुभवत असत. अशी स्थिती समजू शकणारे विद्यार्थी आठवीत फारच दुर्मिळ असायची शक्यता असल्याने, विद्याव्रत पोथीच्या पुढच्या आवृत्त्यांमध्ये हा श्लोक आपण वगळला. शुद्ध चतुर्दशीचा चंद्र होऊन राहणे किंवा भावमुखी राहणे यापेक्षा वेगळा दृष्टान्त प्रबोधिनीच्या दैनंदिन उपासनेचाच भाग आहे. गायत्री मंत्रापूव ॐ भूः ते ॐ तपः या मंत्रांचा उच्चार करताना अनुक्रमे पृथ्वी ते अनंत आकाशगंगा यांचे स्मरण आपण करतो. पण अनंत आकाशगंगा म्हणजे ब्रह्म नाही. ब्रह्म त्याहूनही विशाल आहे. अनंत आकाशगंगा आपल्या बुद्धीच्या आवाक्यात येईपर्यंत सतत विस्तारणारे विश्व आणखी विस्तारलेले असते. ते शुद्ध बुद्धी झाल्यावरच अनुभवता येईल. तो पर्यंत ॐ तपः नंतर ॐ सत्यम्‌‍ म्हणताना, ब्रह्मसंस्पर्श व्हावा असाच प्रयत्न करायचा असतो. गायत्री मंत्रातली ‌‘प्रचोदना देवो‌’ ही प्रार्थना या प्रयत्नांचाच भाग आहे. त्यामध्ये ब्रह्मसंस्पर्श व्हावा यासाठी बुद्धी शुद्ध करण्याची प्रेरणा मिळो, अशीच प्रार्थना सवित्याला म्हणजेच परब्रह्माला किंवा सत्याला करायची आहे.

२१. चिदानन्दरूपी शिव मी शिव मी Read More »

२०. बनो शुद्ध बुद्धी ही तेजस्विनी

२०.बनो शुद्ध बुद्धी ही तेजस्विनी मागच्या श्लोकामध्ये धर्मसंस्थापनेसाठी परमेश्वर जो अवतार घेतो तो आपल्या सगळ्यांमधूनच घेतो, असे म्हटले होते. आपल्यामधून परमेश्वरी शक्ती प्रकट होत आहे अशी सुरुवातीला श्रद्धाच ठेवावी लागते. आपण जशी श्रद्धा ठेवतो, तसे आपण बनतो. त्या श्रद्धेचे प्रत्यक्ष अनुभवात रूपांतर होण्यासाठी आपली बुद्धी स्वच्छ करावी लागते. विनोबांनी गीता प्रवचनांमध्ये कंदिलाच्या काचेचा दृष्टांत दिला आहे. कंदिलातील ज्योतीचा प्रकाश दिसायचा असेल, तर कंदिलाची काच स्वच्छ धुतलेली आणि पुसलेली असावी लागते. अशा स्वच्छ काचेतून आतल्या ज्योतीचा उजेड बाहेर भरपूर पसरतो. आपल्यामधली परमेश्वरी शक्ती कंदिलाच्या ज्योतीसारखी आहे, अशी कल्पना केली, तर आपली बुद्धी जणू कंदिलाच्या काचेसारखी आहे. बुद्धी स्वच्छ करण्यालाच बुद्धी शुद्ध करणे असे म्हणतात. आपल्या बुद्धीचा विकास तीन पद्धतींनी होऊ शकतो. बुद्धीची शीघ्रता वाढवता येऊ शकते. म्हणजे एखादा विषय समजून घेणे, अतिशय वेगाने करता येते. बुद्धीची तीक्ष्णता किंवा कुशाग्रता पण वाढवता येऊ शकते. म्हणजे गुंतागुंतीची परिस्थिती किंवा अतिशय अवघड प्रश्नाच्या मुळापर्यंत सहज जाता येते. बुद्धीच्या विकासाचा तिसरा प्रकार म्हणजे बुद्धीची शुद्धता वाढवणे. शुद्धता वाढली म्हणजे विचार करत असताना, माझे मत आणि माझा फायदा, मला सुख कसे मिळेल आणि माझे दुःख कसे कमी होईल, या हेतूने विचार करणे कमी होत जाते. केवळ प्रश्न सुटला पाहिजे, परिस्थिती स्पष्ट झाली पाहिजे आणि त्यातून सर्वांचे हित झाले पाहिजे, एवढाच हेतू शुद्ध बुद्धीने विचार करताना असतो. बुद्धीची शीघ्रता, कुशाग्रता आणि शुद्धता वाढवण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे आपल्या मनाची आणि बुद्धीची एकाग्रता वाढवणे. तीक्ष्णता आणि कुशाग्रता वाढवण्यासाठी जो विषय किंवा प्रश्न समजून घ्यायचा, त्यावर मन एकाग्र करावे लागते. असे हे विषय आणि प्रश्न आपल्या बाहेरच्या जगात असतात. बुद्धीची शुद्धता वाढवण्यासाठी आपले मन आणि बुद्धी आपल्या आतमध्ये, त्या दोन्हींनाही चेतना देणाऱ्या आपल्या चेतनेच्या केंद्रावर एकाग्र करावी लागते. काही जणांचे हे केंद्र दोन भुवयांच्या मध्ये आत असते. काही जणांचे केंद्र छातीच्या हाडाच्या मागे भावनिक हृदयात असते. बाहेर किंवा आत कुठेही मन एकाग्र करायचे असले, तरी त्यासाठी रोजचा सराव लागतो. मन आत एकाग्र करायच्या सरावालाच आपण दैनंदिन उपासना म्हणतो. विद्याव्रत संस्काराच्या पोथीमध्ये (विद्याव्रत उपासना, चतुर्थ आवृत्ती, शके १९३९, पान १९) दैनंदिन उपासना करण्यासंबंधी सूचना म्हणून गीतेतला एक श्लोक सांगितला आहे. गीता ६.१२    :       तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः |                            उपविश्यासने युञ्जात्‌‍ योगम्‌‍ आत्मविशुद्धये ॥  गीताई ६.१२  :        चित्तेंद्रियांचे व्यापार वारावे तेथ बैसुनी                            आत्म-शुद्ध्यर्थ जोडावा योग एकाग्र मानसे बुद्धी शुद्ध करण्यासाठी स्वच्छ आसन घालून त्यावर ताठ बसावे. शरीराची हालचाल थांबवली, डोळे मिटून घेतले की इंद्रियांचे व्यवहार शांत होऊ लागतात. मग मनात येणारे विचार कमी करण्याचा प्रयत्न करावा. असे शरीरावर आणि मनावर नियंत्रण आणले, म्हणजे मन एकाग्र करता येते. मग आत्मशुद्धीसाठी म्हणजे मनाच्या आणि बुद्धीच्या शुद्धीसाठी प्रयत्न करावा लागतो. मन शुद्ध करणे म्हणजे मनातील दुःख, राग, अपमानाची आठवण, इ. भावना काढून टाकणे. बुद्धी शुद्ध करणे म्हणजे मनातील ‌‘मी‌’ आणि ‌‘माझे‌’ यासंबंधीचा विचार कमी करणे. याची सुरुवात सर्वांचे भले व्हावे अशा प्रार्थनेने किंवा चिंतनाने करता येते. प्रबोधिनीच्या दैनंदिन उपासनेतील ‌‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये‌’ हा मंत्र त्यासाठीच आहे. परब्रह्मशक्ती स्फुरो म्हणजे आपल्या समाजातील संघटना, पराक्रम, सर्वजण परमेश्वराचे अंश असल्याची जाणीव आणि सर्व मानवांमध्ये ही जाणीव वाढवू अशी विजयेच्छा वाढो. नंतर असेच परब्रह्मशक्तीचे स्फुरण आपल्या संघटनेत, म्हणजे प्रबोधिनीत व्हावे, असे चिंतन करावे. मग आपले शरीर आणि शरीरातील प्रत्येक पेशी, यातील शोक, भीती, अशा भावना दूर व्हाव्यात व त्यामधील ईश्वरी चेतना जागृत व्हावी अशी प्रार्थना करावी. शेवटी आपल्या शरीरातील पेशींचेही नियंत्रण करणाऱ्या चेतनेच्या केंद्रावर मन एकाग्र करावे. हे सरावाने जमू लागते. असे करण्यालाच या श्लोकामध्ये ‌‘योग‌’ म्हणजे ध्यानयोग म्हटले आहे. ध्यानयोगातून मनबुद्धीची शुद्धी झाली की आपल्यामधून परमेश्वरी शक्ती प्रकट होत आहे या श्रद्धेचे हळूहळू प्रत्यक्ष अनुभवात रूपांतर होऊ लागते. असा अनुभव येऊ शकतो या माहितीला गीतेत ज्ञान म्हटले आहे. प्रत्यक्ष अनुभवाने पटलेल्या खात्रीला गीतेत विज्ञान म्हटले आहे. ज्ञानयोग म्हणजे शुद्ध बुद्धीच्या मदतीने ज्ञानाचे विज्ञान करणे.

२०. बनो शुद्ध बुद्धी ही तेजस्विनी Read More »

१९. सदाचारसंपन्न निर्भय समाज घडविणे

१९. सदाचारसंपन्न निर्भय समाज घडविणे ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेच्या वेळी ही संस्था का निर्माण करत आहोत या संबंधीचा लेख लिहिलेला आहे. त्यात म्हटले आहे की आपल्या देशात विचार आणि कर्तृत्व या दोन्ही बाबतीत नवनिर्मिती व्हावी आणि त्यांचा सर्वांमध्ये विकास व्हावा, या द्वारे देशाचे भौतिक आणि सामाजिक रूप पालटावे, जुन्या वारशाचे आदर व अभिमानाने उपयोजन व्हावे आणि नव्या परंपरा निर्माण करण्याचा उत्साह आणि उरक यावा, यासाठी ही प्रबोधिनी सुरू करत आहोत. असे करणे म्हणजेच मागच्या निरूपणात म्हटलेला समाजाचा योगक्षेम वाहणे. व्यक्तीच्या बाबतीत योगक्षेम शब्द वापरला आहे. समाजाचा योगक्षेम वाहण्यालाच गीतेमध्ये धर्मसंस्थापना असा शब्द वापरलेला आहे. प्रबोधिनीच्या सात तत्त्वांवरील लेखांपैकी धर्मसंस्थापना याच शीर्षकाच्या पहिल्या लेखात गीतेतील पुढील प्रसिद्ध श्लोक आहे.              गीता 4.8 :           परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌‍ |                                      धर्मसंस्थापनार्थाय संभावामि युगे युगे ॥              गीताई 4.8 :         राखावया जगी संतां दुष्टां दूर करावया |                                     स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगीं युगीं              शेतातली पिके कोमेजायला लागली की त्यांना तरतरी येण्यासाठी दोन गोष्टी करायला लागतात. एक म्हणजे पिकांना खत-पाणी घालणे आणि दुसरे म्हणजे पिकांची नासाडी करणारी कीड नष्ट करणे आणि त्यांची जमिनीतली पोषक द्रव्ये पळवणाऱ्या तणांना उपटून काढणे. तसे समाजात अव्यवस्था, अराजक, अनाचार व्हायला लागला की त्याचा दुसरा परिणाम म्हणजे शांतता, व्यवस्था, सदाचार, सुसंवाद यांची शक्ती कमी पडायला लागते. त्यालाच धर्माला ग्लानी आली असे म्हणतात. खूप कष्ट झेलल्यावर माणूस जसा गळून जातो, तसा जणू काही धर्म गळून जातो. धर्माची ग्लानी दूर करणे हे काम धर्माला पुन्हा बळकटी आणण्याने होते. पण धर्म पुन्हा जोराने सक्रिय व्हायचा असेल तर अराजक, अनाचाराची कारणे दूर करावी लागतात. अनाचार करणाऱ्या दुष्टांचा बंदोबस्त करावा लागतो. त्यांचा पूर्ण बंदोबस्त होईपर्यंत सदाचारपूर्ण जीवन जगू इच्छिणाऱ्यांचा प्रतिपाळही करावा लागतो. म्हणून साधू-सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्कृत्ये करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी झटणारे म्हणजे जणू मानवरूपात जन्म घेतलेली ईश्वरी शक्ती आहे अशी कल्पना केली आहे.             सरधोपट मार्गाने विचार केला तर असे काम करणे म्हणजेच धर्मसंस्थापना असे वाटते. पण सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा विनाश, ही दोन्ही कामे करणे, हे तण काढण्यासारखे आहे. अधर्म डोके वर काढत असतो ते ठेचण्यासारखे आहे. योगक्षेमापैकी हे क्षेम राखण्याचे काम आहे. पिकांची मरगळ दूर करणे, त्यांना टवटवी आणणे म्हणजे सज्जनशक्तीला निर्भय, संघटित, विस्तारशील आणि नवनिर्माणक्षम बनवणे आहे. यालाच धर्मसंस्थापना म्हणायचे. हेच योगक्षेमापैकी योग साधण्याचे काम आहे. हे काम करणारे म्हणजे जणू मानवरूपात जन्म घेतलेली ईश्वरी शक्ती आहे अशी समजूत आहे. खरे तर सर्व माणसांमध्येच ईश्वरी शक्ती असते. तिची जाणीव ज्यांना होते ते सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचा विनाश करून अधर्माची वाढ थांबवतात. आणि धर्माचा गळाठा घालवून धर्मसंस्थापना ही करतात.             ‌‘श्री माताजी-श्री अरविंद काय म्हणाले? ‌’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत कै. आप्पांनी गुरु गोविंदसिंहांच्या ‌‘विचित्र नाटक‌’ या आत्मचरित्रातील दोन ओळी उद्धृत केल्या आहेत. (प्रस्तावना पान सहा) याही काज धरा हम जनमं | समझ लेहु साधू सभ मनमं | धरम चलावन, संत उबारन | दुसट सभन को मूल उपाटन ॥ (विचित्र नाटक, ४.४३)             ‌‘हे सज्जन हो, आपण सर्व मनात जाणून असा की धर्मस्थापना करणे, साधूंचे रक्षण करणे, सर्व दुष्टांचे मूळ उपटून काढणे, यासाठीच आम्ही जन्म घेतला आहे.‌’ श्रीकृष्णाला कोणी पौराणिक पुरुष मानतात. त्याच्याच भाषेत गुरू गोविंदसिंहांसारखा ऐतिहासिक पुरुष हे सांगतो आहे. तुम्ही आम्ही सर्वजण ही तसे म्हणू शकलो पाहिजे. धर्मसंस्थापना या शब्दात धर्माला प्राधान्य आहे. धर्म शब्दाबाबत अनेक गैरसमजुती आहेत. कै. आप्पांनी त्याच्या जागी समाजाला प्राधान्य देणारा समाजसंस्थापना हा शब्द वापरायला शेवटी शेवटी सुरुवात केली. स्वतःमधील ईश्वरी शक्ती समाजसंस्थापनेसाठी जागविणे, समाजाच्या योगक्षेमासाठी वापरणे, म्हणजेच समाजसंघटन, समाजविकास आणि समाजाच्या उत्क्रांतीसाठी वापरणे, हाच खरा सकारात्मक समाजाभिमुख कर्मप्रवण भक्तियोग आहे. असे काम करणारे दर पिढीमध्ये अनेक जण असणे म्हणजेच प्रत्येक युगात परमेश्वराने अवतार घेणे.             प्रबोधनाचे गीता-सूत्र या मालेतील पहिले आठ श्लोक कर्माविषयी होते. नंतरचे आज अखेरचे अकरा श्लोक भक्तीविषयी आहेत. पुढील रविवारपासून ज्ञानाविषयीच्या श्लोकांचे निरूपण सुरू होईल.

१९. सदाचारसंपन्न निर्भय समाज घडविणे Read More »