प्रबोधनाचे गीतासूत्र

१८. भगवंताचे आश्वासन हेच स्वतःच्या प्रेरणेला आवाहन

१८. भगवंताचे आश्वासन हेच स्वतःच्या प्रेरणेला आवाहन कै. आप्पा अनेक वेळा म्हणायचे की झाले आहे ते काम थेंबाएवढे आहे. आणि आणखी समुद्राएवढे काम व्हायचे आहे. एकेक व्यक्ती बदलणे म्हणजे थेंबाएवढे काम झाले. राष्ट्र घडवणे, पृथ्वीवर – साऱ्या मानवतेमध्ये – परब्रह्मशक्तीचे अवतरण होणे, हे समुद्राएवढे काम करायचे आहे. झालेल्या कामाबद्दल आणि होत असलेल्या कामाबद्दल संतोष असावा असेही ते म्हणायचे. झालेल्या कामांबद्दल संतोष म्हणजे त्यात काय राहिले, काय चुकले, याबद्दल हळहळत बसायचे नाही, कुढायचे नाही. एका वैचारिकामध्ये त्यांनी म्हटले आहे की ‌‘असमाधान, चीड, तडफड हे काहीच आमच्या मनामध्ये नसते. जे झाले त्याबद्दल थोडे समाधान, जे झाले नाही त्याबद्दल तीव्र असमाधान पाहिजे.‌’ असे म्हणून ते भगवद्गीतेतला श्लोक सांगतात (राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान १२७) – गीता ९.२२    :        अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते |                            तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम्‌‍ ॥ गीताई ९.२२  :        अनन्यभावे चिंतूनि भजती भक्त जे मज                            सदा मिसळले त्यांचा मी योग-क्षेम चालवी  परमेश्वरच आहे अन्य काही नाही असा विश्वास म्हणजे अनन्य भाव. जे अनन्य होऊन म्हणजे अनन्य भावाने सतत परमेश्वराचे चिंतन करतात, त्याची भक्ती करतात, ते नेहमीच परमेश्वराशी एकरूप होऊन गेलेले असतात. लाट जशी समुद्राच्या पाण्यापेक्षा वेगळी नसते, तशा केवळ शरीराने वेगळे दिसणाऱ्या, परंतु मन-बुद्धी परमेश्वराच्या वैश्विक मन-बुद्धीमध्ये मिसळून गेलेल्या योग्यांचा योगक्षेम मी चालवतो, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. योग म्हणजे जोडले जाणे. भक्त भगवंताशी जोडला जाणे म्हणजे योग. पण योगक्षेम या जोडशब्दात योग म्हणजे जवळ नसलेली गोष्ट मिळणे. आणि क्षेम म्हणजे जवळ असलेली गोष्ट सांभाळणे किंवा तिचे रक्षण करणे. व्यावहारिक अर्थाने भक्ताचा योगक्षेम भगवंत चालवतो म्हणजे त्याची उपासमार होऊ देत नाही. त्याला व त्याच्या कुटुंबाला जगण्यापुरते आवश्यक ते अन्न आच्छादन मिळत जाते. आध्यात्मिक अर्थाने योगक्षेम म्हणजे भक्त अधिकाधिक काळ परमेश्वराशी जोडलेला राहील व परमेश्वराचा विसर त्याला कधीही पडणार नाही. कै. आप्पांनी मात्र या श्लोकाकडे आणि त्यातल्या योगक्षेम शब्दाकडे वेगळ्याच अर्थाने पाहिले. परमेश्वरी शक्ती अधिकाधिक अंशांनी प्रकट होणे, मानवाचा देवमानव होणे ही खरी या पुढील उत्क्रांती आहे. ती अजून चालू आहे. आजवर झालेली उत्क्रांती स्थिर करणे म्हणजे क्षेम. यापुढचे उत्क्रांतीचे टप्पे गाठणे म्हणजे योग. परमेश्वर योगक्षेम पाहतो म्हणजे काय? तर अनेक व्यक्तींद्वारे तो अधिक अंशांनी प्रकट होण्याचा प्रयत्न करत राहतो. झालेल्या उत्क्रांतीबद्दल परमेश्वर समाधानी आहे. अजून न झालेल्या उत्क्रांतीसाठी त्याचे प्रयत्न सतत चालू असतात. म्हणजे तो असमाधानी पण आहे. अधिकाधिक उत्क्रांती होणे जर श्रेयस्कर आहे, तर श्रेयस तेच घडवता येण्याचे मूळ असंतोषात आहे. असंतोष असेल तरच प्रयत्न होतात. आपण प्रत्येक जण जर परमेश्वराचेच अंश आहोत तर योगक्षेमाच्या जबाबदारीचा वाटा आपण ही उचलला पाहिजे. व्यावहारिक अर्थाने सृष्टीचा, निदान मानवतेचा, किमान आपल्या राष्ट्राचा, योगक्षेम पाहिला पाहिजे आणि आध्यात्मिक अर्थानेही पाहिला पाहिजे. व्यावहारिक अर्थाने राष्ट्राचा योगक्षेम पाहणे म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये देशाचा विकास होईल, सर्व क्षेत्रांतले देशप्रश्न सुटत राहतील, यासाठी प्रयत्न करणे. आध्यात्मिक अर्थाने राष्ट्राचा योगक्षेम पाहणे म्हणजे श्लोक क्र. ९ च्या निरूपणात म्हटल्याप्रमाणे सर्व समाजच उत्तम पुरुष लक्षणांनी युक्त किंवा दैवी संपत्तीच्या गुणांनी युक्त बनावा यासाठी प्रयत्न करणे. याच वैचारिकात कै. आप्पा पुढे म्हणतात, व्यावहारिक योगक्षेमाची जबाबदारी घेणे म्हणजे वीर होणे. आध्यात्मिक योगक्षेमाची जबाबदारी घेणे म्हणजे तत्त्वज्ञ होणे. राष्ट्राच्या, मानवतेच्या ‌‘भाग्यासी काय उणे| वीर तत्त्वज्ञ कार्यकर्त्यावाचून राहिले॥‌’ देशाच्या दोन्ही प्रकारच्या योगक्षेमाची आपली जबाबदारी मानणारे ‌‘वीर आणि तत्त्वज्ञ स्त्री-पुरुष कार्यकर्ते घडवणे हेच सर्व ज्ञान प्रबोधिनीचे साध्य आहे‌’.

१८. भगवंताचे आश्वासन हेच स्वतःच्या प्रेरणेला आवाहन Read More »

१७. करू आम्ही सर्वस्व समर्पण

१७. करू आम्ही सर्वस्व समर्पण महापुरुषपूजेच्या वेळी कै. आप्पांनी गायलेला गीतेतला पुढचा श्लोक भक्तांची लक्षणेच सांगणारा होता (ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड२, पान ३१०) – गीता १२.१४ :        संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः |                            मय्यर्पितमनोबुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ गीताई १२.१४ :      सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढनिश्चयी                             अप मज मनोबुद्धी भक्त तो आवडे मज सुख मिळवण्याच्या बाबतीत आणि दुःख टाळण्याच्या बाबतीत भक्त सारखाच तटस्थ असतो असे वर्णन आधीच्या श्लोकाच्या शेवटी आले. तटस्थता हे सुद्धा बऱ्याच वेळा अभावात्मक लक्षण वाटते. म्हणून पुढे लगेच या श्लोकाच्या सुरुवातीला सांगितले आहे की तटस्थ म्हणजे इतरांना जे प्रसंग सुखाचे वाटतात ते स्वतःवर आल्यावर त्या प्रसंगात भक्त संतुष्ट असतोच. पण इतरांना जे प्रसंग दुःखाचे वाटतात ते स्वतःवर आल्यावर त्या प्रसंगातही तो तेवढाच संतुष्ट असतो. म्हणजे सर्व परिस्थितीत प्रसन्न आणि आनंदी असतो. सुखदुःखाच्या प्रसंगी भक्त संतुष्ट कसा राहू शकतो? कारण तो योगी ही असतो. त्याची इंद्रिये संवेदना ग्रहण करत असतात किंवा कृती करत असतात. आणि मन मात्र रामरंगी रंगलेले असते. त्याने काम-क्रोध जिंकण्यासाठी मनाने आपल्या इंद्रियांचे नियंत्रण केले असते. इंद्रिये आपल्या सहज प्रवृत्तीने सुखकारक गोष्टींकडे खेचली जातात व दुःखकारक गोष्टींपासून दूर पळू पाहतात. पण योग्याचे मन संयमी असते. म्हणजे ते इंद्रियांना सहज प्रवृत्तीने वागू देत नाही. इंद्रिये आपल्या सहज प्रवृत्तीप्रमाणे वागू शकत नाहीत, तर मग कशी वागतात? बुद्धीने केलेल्या निश्चयाप्रमाणे वागतात. एका पद्यामध्ये पुढील ओळी आहेत – कर्णपथावर येतिल वार्ता, सुगम याहुनी सहस्र वाटा निर्धारे पुढती नच ढळता, चालणे दुजा चालविणे आपण चाललो आहोत त्यापेक्षा सोपे असे इतर अनेक मार्ग आहेत, असे कोणी कोणी म्हटलेले कानावर येईल. ते ऐकल्यावर ती वाट कोठे जाते याचा विचारही न करता इंद्रियांना लगेच त्या सोप्या वाटेने जावेसे वाटते.  पण संयमी मन इंद्रियांना तिकडे जाऊ देत नाही. कारण बुद्धीने कोणत्या मार्गाने व का जायचे ते ठरवले आहे. निर्धाराने म्हणजेच दृढ निश्चयाने वाट न सोडता चालत राहायचे आहे. इतरांनाही तो मार्ग दाखवायचा आहे. हे मनाने स्वीकारलेले असते व इंद्रिये मनाच्या नियंत्रणात असतात. संयमी मन आणि दृढनिश्चयी बुद्धी बरोबर कशावरून? तर ती दोन्ही आपल्या ध्येयाला, ईश्वराला, वाहिलेली आहेत म्हणून. बुद्धी कायम ईश्वराच्या स्वरूपाचे चिंतन करत असते. मन कायम ईश्वराच्या अनुभवाचा ध्यास घेऊन असते. तेव्हाच ईश्वराकडे जाण्याचा मार्ग मन-बुद्धीला स्पष्ट दिसायला लागतो. मग मन आणि बुद्धी इंद्रियांना दुसऱ्या मार्गाने जाऊ देत नाहीत. ईश्वराकडे जाण्याच्या मार्गाचे टप्पे जो भक्त असे एक-एक करून ओलांडतो आहे, तो भक्त ईश्वरालाही आवडतो. प्रबोधिनीतील दैनंदिन उपासनेत जे विरजा मंत्र किंवा शुद्धिमंत्र आहेत, त्यात मन व बुद्धी शुद्ध व्हावी अशी प्रार्थना ‌‘मे शुद्ध्यन्ताम्‌‍‌’ या शब्दांनी शेवट होणाऱ्या मंत्रांमध्ये आहे. मी मन व बुद्धी शुद्ध करीन असे ‌‘विरजा विपाप्मा भूयासं‌’ या शब्दांमधले संकल्प आहेत. त्या पुढे ‌‘ज्योतिरहं‌’ म्हणत, स्वतः मधील ईश्वराला, ‌‘स्वाहा‌’ म्हणत, मी ते समर्पित करतो/ते, अशी घोषणा ही आहे. नित्य उपासनेत अर्थ समजून घेत हे मंत्र म्हटल्याने हळूहळू समर्पण भाव जागृत होऊन स्थिर होऊ लागतो. मन आणि बुद्धी ईश्वराच्या शोधात गुंतवणे, त्यासाठीच काम करणे म्हणजे ईश्वराला सर्वस्व समर्पण करणे. महापुरुषपूजेमध्ये या श्लोकाच्या निरूपणानंतर जी गद्य प्रार्थना झाली, त्यात म्हटले होते, की परमेश्वराचेच अंश असलेल्या राष्ट्रसंतांनी प्रकट केलेले चिंतन, म्हणजे परमेश्वराचेच विचार. त्यानुसार परमेश्वराला अर्पण केलेली बुद्धी, म्हणजे मातृभूमीला कुठल्याही संकटातून वाचवू शकणारी बुद्धी. आणि परमेश्वराला अर्पण केलेले मन, म्हणजे संघटनेला सदैव अभंग ठेवणारे मन. परमेश्वराला म्हणजे राष्ट्रदेवाला मन-बुद्धी अर्पण केलेले असे भक्त म्हणतात – ‌ ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो‌’. असे भक्तच परमेश्वराला प्रिय असतात.

१७. करू आम्ही सर्वस्व समर्पण Read More »

१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण

१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण प्रबोधिनीत स्वामी विवेकानंदांच्या भाषणातील पुढील उतारा पूव विद्यार्थ्यांना पाठांतराला दिला जायचा. “जे सुकुमार आहे, शक्तिपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे, तेच परमेश्वराजवळ जाते असे श्रुतिवचन आहे. म्हणून उठा! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा हाच क्षण आहे. जो पर्यंत तुम्हांमध्ये तारुण्याची तडफ आहे, जोपर्यंत तुम्ही थकले-भागलेले, फिकटलेले, गळालेले झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात, तोपर्यंतच निश्चय करा! उठा, काम करा! नुकतेच फुललेले, न हाताळलेले, न वास घेतलेले पुष्प देवाच्या चरणी अर्पण करायचे असते; ते स्वहस्ताने ईश्वरार्पण करा!” आधीच्या श्लोकामध्ये विद्यार्थिदशेपासूनच कोट्यवधी व्यक्तींनी देशाचे रूप पालटण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत असे म्हटले आहे. विद्यार्थिदशेपासून सुरू करायचे कारण त्या वयात विद्याथ उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले असतात. त्यांनीच ईश्वराकडे जाण्याचा, स्वतःमधला ईश्वर ओळखण्याचा आणि ईश्वराच्या अवतरणाचा, इतरांना त्यांच्यामधल्या ईश्वराला ओळखायला मदत करण्याचा संकल्प करायला हवा. ईश्वरत्व ओळखणे म्हणजेच सामान्य मनुष्यत्वाकडून विकसित मनुष्यत्वाकडे स्वतः जाणे व इतरांना जायला मदत करणे. विकसित मनुष्यत्वाकडे जाण्याच्या प्रक्रियेत अनेक टप्पे असतात. शरीर सुंदर सतेज, मन पवित्र सुदृढ, बुद्धी कुशाग्र विशाल, आत्मा निर्भय निर्वैर, ही विकसित मनुष्यत्वाची लक्षणे आपण विद्याव्रत संस्कारापासून चिंतनासाठी सुचवत असतो. मन सुदृढ बनण्यासाठी आधी स्वतःवरील श्रद्धेची गरज असते. मन पवित्र होण्यासाठी समावेशक किंवा समाजाभिमुख भक्तीची गरज असते. मन पवित्र होण्याच्या प्रक्रियेतला एक-एक टप्पा ओलांडत जाणे म्हणजे भक्त असण्याचे एक-एक लक्षण आपल्यामध्ये प्रकट होत जाणे. उपासनेने मन-बुद्धीचे ऐक्य वाढत जाते. बुद्धीला आपल्या संकुचित मीपणाच्या खऱ्या विशालतेची ओळख जशी होत जाते, तसे मनामध्ये पवित्रता येऊ लागते व भक्ताची लक्षणे आपल्या वागण्यातून प्रकट होऊ लागतात. गीतेमध्ये भक्ताची लक्षणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत. गीता १२.१३ :        अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च |                             निर्ममो निरहंकारः सम दुःखसुखः क्षमी ॥ गीताई १२.१३ :      कोणाचा न करी द्वेष, दया मैत्री वसे मनीं                             मी माझे न म्हणे सोशी सुखदुःखे क्षमा-बळें  या पूर्वी  महापुरुषपूजेचा उल्लेख आला आहे. त्या पूजेची कल्पना कशी सुचली या संदर्भात श्लोक क्र. ११ आणि १२ चे निरूपण झाले आहे. या पूजेच्या वेळी प्रथम रामदास, दयानंद, विवेकानंद व अरविंद या राष्ट्रसंतांना आवाहन करण्यात आले. यानंतर ख्रिस्ती भजन व बायबलमधल्या काही उताऱ्यांचे वाचन झाले. कुराणातल्या काही सूऱ्यांचे पठण झाले. नंतर गुरु ग्रंथसाहिबमधल्या काही शबदांचे गायन झाले. शेवटी कै. आप्पांनी गीतेतले दोन श्लोक म्हटले व त्यांचे निरूपण केले. त्यापैकी पहिला या वेळचा श्लोक  होता. (ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड २, पान ३१०) सर्वभूतानां म्हणजे फक्त सर्व मनुष्यांचा असे नाही, तर अस्तित्वात असलेल्या सर्व सजीव आणि निर्जीवांचा.  यापैकी कोणाचाही आणि कशाचाही द्वेष करत नाही हे भक्ताचे पहिले लक्षण. त्याचे सर्व लक्ष आपल्या ध्येयाकडेच असते. त्यामुळे इतरांचे दोष पाहून त्यांच्याशी शत्रुत्व करणे किंवा त्यांचा राग करणे याची त्याला सवडच नसते. पण हे अभावात्मक लक्षण झाले. सगळ्यांमधली ईश्वरी शक्ती पाहण्याचा प्रयत्न करत तो सर्वांशी मैत्री करतो. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना सहृदयतेने मदत करतो. हे माझे, हे तुझे करत नाही. सर्व गोष्टी वाटून घ्यायला तयार होतो. म्हणजेच निर्मम होतो. हे सर्व करताना आपले मोठेपण मिरवत नाही. म्हणजेच निरहंकारी होतो. आपण काही विशेष करतो आहोत असे ही त्याला वाटत नाही. लोक ज्या कारणांसाठी परस्परांचा द्वेष करतात, ती कारणे तो इतरांना क्षमा करून विसरून जातो. मैत्री, करुणा, क्षमा हे गुण त्याच्यामध्ये इतके वरचढ असतात की स्वतःला सुख मिळवण्याच्या बाबतीत आणि स्वतःचे दुःख टाळण्याच्या बाबतीत तो सारखाच तटस्थ असतो. स्वतःच्या वाट्याला जे सुखदुःख येईल ते सहजपणे स्वीकारतो. महापुरुषपूजेतल्या सर्व धर्मग्रंथांच्या पूजनाच्या वेळी कै. आप्पांनी हिंदू धर्मातील व्यक्तींचा आदर्श म्हणून हा श्लोक निरूपणासह गायलेला होता.

१६.विकसित व्यक्तिमत्त्वाच्या वाटेवरचे भावनिक गुण Read More »

१५. प्रयत्न करणारे अनेक, त्यातले ध्येय गाठणारे काही थोडे

१५. प्रयत्न करणारे अनेक, त्यातले ध्येय गाठणारे काही थोडे आम्ही गणित, इंग्रजी किंवा इतिहास शिकवत नाही तर भाषा आणि मानव्यविद्या, भौतिक आणि सामाजिक शास्त्रे, यांच्या अभ्यासातून देशप्रश्नांचा अभ्यास करायला शिकवतो, अशी प्रबोधिनीतील नित्यघोषणा आहे. हे प्रत्यक्षात कसे आणायचे याचा विचार केला तर, संत सावता माळी यांनी बागाईतीतून, संत गोरा कुंभार यांनी मडकी बनवता बनवता, संत सेना न्हावी यांनी हजामती करता करता, संत कबीरांनी विणकाम करताना, संत रोहिदासांनी कातडे कमावताना, आपापल्या इष्ट दैवताचा साक्षात्कार करून घेतला, हीच उदाहरणे डोळ्यासमोर येतात. मागच्या लोकात पाहिल्याप्रमाणे यांनी आपले कामच पूजा बनवले होते. तसे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करताना, त्याच्या आधाराने देशप्रश्न सोडवून मातृभूमीची पूजा करायची आहे, हा ध्यास घेतला पाहिजे. पण संतांची उदाहरणे पाहिली तसे किती इतर माळी, कुंभार, न्हावी, विणकर, चांभार काम करता करता संत झाले? उत्तम क्रमिक अभ्यास करून किती जण कर्ते देशभक्त होतात? प्रबोधिनीमध्ये गेली पंचवीस वर्षे स्पर्धा परीक्षा केंद्र चालू आहे. त्यामुळे प्रशासकीय सेवांसाठी घेतल्या जाणाऱ्या या निवड परीक्षेचे  स्वरूप उलगडत गेले आहे. काही लाख उमेदवार पूर्व परीक्षेला बसतात. त्यातून काही हजार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. त्यातल्या काहींना मुलाखतीसाठी बोलावले जाते. शेवटी सात-आठशे जणांना यूपीएससी तर्फे सेवेसाठी पाचारण केले जाते. काहीशे वैमानिकांना कठोर प्रशिक्षण व दीर्घ सरावानंतर निवडीला सामोरे जावे लागते. त्यातला एखादा वैमानिक अंतराळवीर म्हणून निवडला जातो. एव्हरेस्टवर चढाई करायला गिर्यारोहक व शेर्पा मिळून चाळीस-पन्नास जणांचा चमू बेस कॅम्पपाशी जमतो. त्यातले शिखरावर दोघे-तिघेच पोचतात. स्पर्धा परीक्षा उमेदवार, वैमानिक किंवा गिर्यारोहक या पैकी सगळ्यांनाच अंतिम उद्दिष्टापर्यंत जाण्याची इच्छा असावी लागते. प्रयत्न लागतात. चिकाटी लागते. पण त्यातले काही जणच शेवट पर्यंत पोचतात. कोण पोचेल हे आधी सांगता येत नाही. पण अनेकांनी प्रयत्न सुरू केले की प्रत्येक जण काही पावले तरी पुढे जातो. या संबंधी कै. आप्पांनी ‌‘श्री माताजी-श्री अरविंद काय म्हणाले?‌’ या पुस्तकात (पान १६४) गीतेतला एक श्लोक उद्धृत केला आहे. स्वकर्माने परमेश्वराची पूजा करणारे किती जण त्यात सफल होतात? या प्रश्नाचे उत्तर त्या श्लोकात दिले आहे. गीतेतला श्लोक असा आहे – गीता ७.३  :            मनुष्याणां सहस्रेषु कश्चित्‌‍ यतति सिद्धये |                             यतताम्‌‍ अपि सिद्धानां कश्चित्‌‍ मां वेत्ति तत्त्वतः ॥ गीताई ७.३  :          लक्षावधींत एखादा मोक्षार्थ झटतो कधीं                            झटणाऱ्यांत एखादा तत्त्वतां जाणतो मज हजारातला एखादा सिद्धीसाठी म्हणजे मोक्षासाठी झटतो आणि असे प्रयत्न करणाऱ्या अनेकांमधून एखाद्यालाच माझे, परमेश्वराचे, खरे ज्ञान होते. म्हणजेच मोक्ष मिळतो असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. मोक्ष मिळण्याच्या बाबतीत हे जसे खरे आहे तसेच कोणत्याही भव्य उद्दिष्टाच्या बाबतीत ही खरे आहे. अनेकांना बसल्या जागी, प्रयत्न न करता, मिळेल त्यावर समाधान असते. त्यातल्या काही जणांना अधिक चांगले किंवा अधिक प्रमाणात मिळावे अशी आशा तरी असते. पण ते हात पाय हालवत नाहीत. त्यातल्या काही जणांमध्ये महत्त्वाकांक्षा (ॲम्बिशन) निर्माण होते. मोठे काहीतरी मिळवावे असे मनात धरून ते प्रयत्न सुरू करतात. असे लोकच हजारात किंवा लाखात एक अशा प्रमाणात असतात असे या श्लोकात म्हटले आहे. महत्त्वाकांक्षी लोकांचे उद्दिष्ट बऱ्याच वेळा ज्याला समाजमान्यता आहे असे सत्ता, वैभव, प्रसिद्धी, पुरस्कार, इत्यादी प्रकारचे असते. महत्त्वाकांक्षेपेक्षा चांगली असते ती सिद्धी प्रेरणा. लोकांची मान्यता आहे किंवा नाही असा विचार न करता, स्वतः ठरवलेले उत्तमतेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांकडे सिद्धी प्रेरणा (अचीव्हमेंट मोटिव्हेशन) असते. सिद्धी प्रेरणेपेक्षा मोठी असते ती ध्येयप्रेरणा. स्वतःपुरता विचार न करता अनेकांचा किंवा सर्वांचा विचार करण्यासाठी ध्येयप्रेरणा लागते. देशात कर्तृत्ववंतांचा कधीही दुष्काळ पडू नये यासाठी गतिशील विकसनशील संघटना झाली पाहिजे. त्यासाठी हे ध्येय समोर ठेवून कोट्यवधी व्यक्तींना विद्यार्थिदशेपासूनच प्रयत्न करण्याची प्रेरणा झाली पाहिजे. हे प्रयत्न म्हणजेच उपासना. कामाने पूजा करण्याबरोबर मानसपूजा ही करणे. त्यातून देशाचे रूप पालटायला उद्याचे थोर स्त्री-पुरुष पुढे येतील. १४०  कोटी लोकांनी उपासना केली तर १४०  लोक येतीलच येतील. म्हणून कोटीकोटी लोकांनी उपासना केली पाहिजे असे कै. आप्पा या पुस्तकात म्हणतात.

१५. प्रयत्न करणारे अनेक, त्यातले ध्येय गाठणारे काही थोडे Read More »

१४.काम आणि कामाची साधने यांनीच पूजा करणे उत्तम

१४.काम आणि कामाची साधने यांनीच पूजा करणे उत्तम परमेश्वराला पूजेसाठी काहीही श्रद्धापूर्वक वाहिले तरी चालते. श्रद्धापूर्वक हात जोडून नमस्कार केला तरी चालते. परमेश्वराच्या दृष्टीने श्रद्धा महत्त्वाची. काहीही दिले तरी चालते या सवलतीचा भक्त मानवाने गैरफायदा घ्यावा का? की त्याने श्रद्धेने आपल्या जवळचे सगळ्यात उत्तम आहे ते द्यावे? देताना श्रद्धेने द्यावे (श्रद्धया देयम्‌‍) आणि अश्रद्धेने देऊ नये (अश्रद्धया अदेयम्‌‍), याच्याबरोबर भरभरून द्यावे (श्रिया देयम्‌‍), आपण कमी तर देत नाही ना या भीतीने द्यावे (भिया देयम्‌‍), आपल्या मोठेपणाचे प्रदर्शन तर आपण करत नाही ना, या संकोचाने द्यावे (ऱ्हिया देयम्‌‍) आणि जे ज्याचे आहे त्यालाच आपण ते देत आहोत या जाणिवेने द्यावे (संविदा देयम्‌‍) असे प्राचीन गुरूंनी सांगितले आहे. गीतेमध्ये अर्जुनाने हे श्रेष्ठ की ते श्रेष्ठ असा प्रश्न विचारला की उत्तर देताना श्रीकृष्णाने कायम जे जास्त लोकांच्या आवाक्यात आहे, जे जास्त लोकांना करणे शक्य आहे, ते जास्त श्रेष्ठ, असे उत्तर दिले आहे. जास्तीत जास्त जणांना जमण्यासारखे आहे, आणि श्रद्धेने व भरभरून देता येईल असे काय आहे? तर भगवान श्रीकृष्ण सांगतात – गीता १८.४६   :      यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वम्‌‍ इदं ततम्‌‍ |                             स्वकर्मणा तम्‌‍ अभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः ॥ गीताई १८.४६  :      जो प्रेरी भूतमात्रास ज्याचा विस्तार विश्व हे                             स्व-कर्म-कुसुमीं त्यास पूजिता मोक्ष लाभतो परमेश्वराला कोणत्या ही रूपात पाहिलेले चालते. परमेश्वराला कोणत्याही नावाने पुकारलेले चालते. मग नाव न घेतलेले ही चालते. तो आपल्याला कसा जाणवतो त्याचे वर्णन फक्त करायचे. जो सर्व भूतांना म्हणजे सजीव-निजवांना त्यांची त्यांची गती देतो तो, असे परमेश्वराचे वर्णन झाले. कोणते ही रूप चालत असेल, तर रूप नसलेले ही चालेल. सारे विश्वच ज्याच्यापासून निर्माण झाले आहे, म्हणजे जो विश्वच बनला आहे, असे त्याचे रूप झाले. गीतेमध्ये श्रीकृष्ण बोलतो आहे  म्हणून जो-तो असे शब्द आले. पण जी-ती शक्ती असे स्त्रीलिंगी उल्लेखही चालतील किंवा जे-ते तत्त्व असे नपुंसकलिंगी उल्लेख ही चालतील. कारण सर्व विश्वच ज्यापासून बनले आहे त्यात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि लिंगविरहित असे सर्वच आले. असा तो परमेश्वर, ती शक्ती, ते तत्त्व, त्याच्यावर आपलेही अस्तित्व अवलंबून आहे, असे साधारण जाणवू लागले की तो आहे म्हणून आपण आहोत, याबद्दल कृतज्ञता वाटायला लागते. माझ्याकडे जे काही आहे, ते तुझ्यामुळे आहे, तुझेच आहे, हे देवाकडे व्यक्त करण्याची पद्धत म्हणजे त्याची पूजा करणे. प्रत्येकाची कार्यशक्ती त्याच्या आवाक्यातली असते. जवळ काही नसले तरी त्या कार्यशक्तीने जे काही काम करतो, ते कामच परमेश्वराला वाहणे हे प्रत्येकाला शक्य आहे. असे स्वतःचे काम परमेश्वराला वाहण्याने, रोज वाहण्याने, सतत वाहण्याने, सिद्धी मिळते. म्हणजे मोक्ष मिळतो. म्हणजेच मी त्याचा अंश आहे, तो माझा प्रेरक आहे, अशी जाणीव सतत मनात जागी राहते. काम अर्पण करता करता एक दिवस काम करणारा ही समर्पित होऊन जातो. म्हणजे परमेश्वराचे साधन बनून जातो. मी कर्ता हा त्याचा भाव संपून जातो. कोणत्याही कामाचा संकल्प आणि निश्चय अनुक्रमे आपले मन व बुद्धी करतात. आपली ज्ञानेंद्रिये बाह्य परिस्थितीचे भान आणून देतात. आपल्या कर्मेन्द्रियांनी आपण बाह्य परिस्थितीत आपल्या संकल्प आणि निश्चयाप्रमाणे बदल घडवायचा प्रयत्न करतो. इंद्रियांच्या शक्तीला मर्यादा असल्याने आपण त्यांना अवजारे, यंत्रे, उपकरणे व साधनांची जोड देतो. बुद्धी, मन, इंद्रिये, अवजारे व साधने या सर्वांमुळे एखादे काम करणे सोपे होते. आणि काम अधिक उत्तम करता येते. आपले काम ईश्वराला अर्पण करताना बुद्धीपासूनची सर्व साधने, ती वापरून केलेली कृती, आणि त्या कृतीचा परिणाम, हे सर्वच ईश्वराला अर्पण करावे असा या लोकाचा मतितार्थ आहे. त्यामुळे सर्व साधने, आणि वापर वस्तू यांची निगा राखणे, काळजी घेणे, त्यांचा योग्य उपयोग करणे, त्या वाया न घालवणे, आदळ-आपट न करता वापरणे, योग्य रितीने स्वच्छ ठेवणे, हे त्यांचा वापर चालू नसताना देखील, स्वकर्माने करायच्या पूजेची तयारी म्हणूनच, करता आले पाहिजे. कामाच्या साधनांमध्ये आणि कामात, असे तन्मय होऊन ते काम ईश्वरार्पण करण्याने, व्यवहारही उत्तम साधतो आणि भक्तीही होते. यंत्रपूजनाच्या पोथीच्या प्रस्तावनेत सुरुवातीलाच (यंत्रपूजन उपसना पोथी, शके १९३४ आवृत्ती, पान ३) हा श्लोक सांगून पुढे म्हटले आहे की आपण प्रत्येक काम ज्या साधनाने करतो ते कुठलेही शस्त्र, अवजार, नांगर, लेखणी हे ईश्वरापर्यंत पोचवणारे जणू वाहन आहे. अशा साधनांबद्दल पण कृतज्ञता ही हिंदूंची संस्कृती आहे.

१४.काम आणि कामाची साधने यांनीच पूजा करणे उत्तम Read More »

१३.नमस्कारा ऐसे नाही सोपे

१३.नमस्कारा ऐसे नाही सोपे प्रत्येक जण त्याच्या श्रद्धेप्रमाणे घडलेला असतो. आपापल्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येक जण आपले पूजनीय दैवत निवडतो. ज्याची त्याची त्याच्या दैवतावरची श्रद्धा परमेश्वर बळकट करतो. श्रद्धेने कोणत्याही देवाची पूजा कोणत्याही पद्धतीने केली तरी ती पूजा परमेश्वरालाच पोचते. एवढ्या सगळ्या गोष्टी आधीच्या तीन श्लोकांमध्ये पाहिल्या. ही समावेशक भक्ती करण्यासाठी मन मोठे करत जावे लागते. आज त्याला पूरक असा भक्तीचा दुसरा पैलू पाहू. परमेश्वराला फळ, फूल, पान, पाणी यापैकी श्रद्धेने काहीही वाहिले तरी चालते. त्याला सोन्याचे दागिने, रेशमी कपडे असे बहुमोल द्रव्यच अर्पण केले पाहिजे असे नाही. त्याला श्रद्धेने नुसते हात जोडून नमस्कार केला तरी पुरते. भक्तीविषयी या सगळ्या गोष्टी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्या आहेत. त्या ऐकल्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला तो कोणत्या कोणत्या रूपात आहे ते विचारले. श्रीकृष्णाकडून ती लांबलचक यादी ऐकल्यावर ती सगळी रूपे दाखवण्याची विनंती अर्जुनाने केली. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपले विराट रूप दाखविल्यावर, ते पाहून अर्जुन म्हणाला – गीता ११.३९    :     वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशांकः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च |                              नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥ गीताई ११.३९  :      तू अग्नि तू वायु समस्त देव, प्रजापते तूचि पिता वडील                            असो नमस्कार सहस्रवार पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा हि  आताच्या काळात शंकर, विष्णू, राम, विठ्ठल, देवी, गणपती, दत्त, मारुती अशी दैवते लोकप्रिय आहेत. गीतेच्या काळातली दैवते वेगळी होती. अग्नी, वायू, यम, वरुण, शशांक म्हणजे चंद्र, ही त्या काळातली लोकप्रिय दैवते. श्रीकृष्णाचे विशाल रूप पाहिल्यावर, ही सर्व दैवते त्यातच सामावलेली अर्जुनाला दिसली. त्यामुळे या सर्व दैवतांमध्ये तूच आहेस, म्हणजे परमेश्वरच आहे, असे अर्जुन म्हणतो. सर्व मानवांचा आद्य मानवी पूर्वज प्रजापती. त्याचा काल्पनिक किंवा मानस पिता म्हणजे ब्रह्मदेव. त्याचा श्रद्धेने मानलेला पिता म्हणजे परमेश्वर. प्रजापती हे सर्व मानवांचे वडील. म्हणून ब्रह्मदेव आजोबा. आणि परमेश्वर पणजोबा, म्हणजेच प्रपितामह. अर्जुनाला श्रीकृष्णाचे विशाल रूप पाहिल्यावर जे दिसले त्याचा त्या वेळच्या समजुतींप्रमाणे त्याने अर्थ लावला. सर्व दैवतांचे आणि सर्व मानवांचे मूळ परमेश्वर. सर्व काही त्याच्यापासून निर्माण झालेले आहे. त्याला त्याच्याच वस्तू काय देणार? श्रद्धापूर्वक, नम्रतेने, भक्तीने हात जोडून त्याला नमस्कार करणे, हेच आपल्या आवाक्यात आहे. म्हणून अर्जुन म्हणतो की मी फक्त तुला हजार वेळा नमस्कार करू शकतो. कोणाशी वागताना किंवा बोलताना चूक झाली तर त्या व्यक्तीची क्षमा मागणे हे सभ्यतेचे लक्षण आहे. आपण त्या व्यक्तीला स्वतः इतकीच प्रतिष्ठा त्यातून देतो. कोणाला चुकून पाय लागला, एखाद्या वस्तूला किंवा जेवणाच्या ताटाला चुकून पाय लागला तर त्या व्यक्तीला किंवा वस्तूला नमस्कार करणे ही देखील क्षमा मागायची, मान द्यायचीच पद्धत आहे. जैन लोकांमध्ये वार्षिक क्षमापना मागताना अजाणतेपणे किंवा नकळत केलेल्या चुकीबद्दल देखील क्षमा मागितली जाते. यात इतरांना स्वतःहून जास्त मोठेपणा देण्याची नम्रता सुद्धा आहे. जे जे उत्तम, श्रेष्ठ दिसेल त्याला नमस्कार करण्यात आणखी नम्रपणा आहे. आपली शस्त्रे, अवजारे, यंत्रे, साधने, वह्या-पुस्तके, उखळ, पाटा-वरवंटा, चूल, केरसुणी यांची पूजा करणे, त्यांना नमस्कार करणे, यात नम्रतेचे पाठच आपण गिरवत असतो. व्यवहारात स्वतःचा उचित सन्मान राखूनही, भक्तीमध्ये स्वतःला शून्य बनवण्याचे साधन, सर्वांमधील परमेश्वराला नमस्कार करत राहणे हे आहे. मन मोठे करत जाणे हा भक्तीचा एक पैलू. आणि आपले ‌‘मी‌’पण लहान करत जाणे हा भक्तीचा दुसरा पैलू. आपणच स्वतःला वर उचलावे, खचू देऊ नये, हा श्लोक जसा खंडेनवमीच्या दिवशी करायच्या यंत्रपूजनाच्या पोथीतला, तसा अर्जुनाने केलेल्या ईशस्तवनाचा हा श्लोक ही त्याच पोथीतला आहे. (यंत्रपूजन उपासना पोथी, शके १९०४, आवृत्ती, पान ४) यंत्रपूजनाला सुरुवातच मुळी या ईशस्तवनाने होते. ‌‘हे परमेश्वरा, या विश्वात तूच सर्व भरून राहिलेला आहेस. सगळ्या देवदेवता म्हणजे तुझीच वेगवेगळी रूपे आहेत. तूच सर्व लोकांना निर्माण करणारा व पालन करणारा आहेस. सर्व प्राणिमात्रांना तू वडिलांच्या ठिकाणी आहेस. तुला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो.‌’ असा कृतज्ञतेचा व नम्रतेचा भाव निर्माण व्हावा म्हणून, व तो व्यक्त करण्याची प्रेरणा व्हावी म्हणून, पूजा किंवा उपासना करायची असते. असे यंत्रपूजन करण्याने यंत्रावरील दैनंदिन कामही उपासना बनते.

१३.नमस्कारा ऐसे नाही सोपे Read More »

१२. ध्येय एक – मार्ग अनेक

१२. ध्येय एक – मार्ग अनेक अनेक वर्षे विवेकानंद जयंतीला प्रबोधिनीच्या युवक विभागातर्फे क्रीडा प्रात्यक्षिके व्हायची. एका वष प्रात्यक्षिकांनंतर बोलताना कै. आप्पांनी विनोबांचे एक सहकारी श्री. राधाकृष्ण बजाज यांच्या ‌‘भारत का धर्म‌’ या लेखाचा संदर्भ दिला होता. (ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक, वि. वि. पेंडसे, दुसरी आवृत्ती, पान ६८ ते ७०) त्या लेखात श्री. बजाज यांनी म्हटले होते की जो म्हणतो ‌‘माझेच खरे, इतर सर्व खोटे‌’, तो अहिंदू. जो म्हणतो ‌‘माझे खरे आणि तुझे वेगळे असले तरी ते ही खरे‌’, तो हिंदू. ही व्यापक हिंदुत्वाची मांडणी कै. आप्पांना अत्यंत आनंद देणारी होती. महापुरुषपूजेमध्ये सर्व धर्मग्रंथ पूजेचा अंतर्भाव करताना त्यांची भूमिका अशीच व्यापक होती. आकाशातून पडलेले पावसाचे पाणी अनेक वाटांनी शेवटी समुद्राला जाऊन मिळते. त्याप्रमाणेच सर्व देवांना केलेले नमस्कार शेवटी एकाच परमेश्वराला पोचतात. या अर्थाचा श्लोक अनेकांना परिचित आहे. याच अर्थाचा शिवमहिम्न स्तोत्रातील आणखी एक श्लोक स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील सर्वधर्मपरिषदेमध्ये केलेल्या जगप्रसिद्ध भाषणात म्हटला होता. ज्या प्रमाणे सरळ किंवा वळणावळणाच्या वाटांनी पाणी समुद्राला जाऊन मिळते तसे वेगवेगळ्या आवडीनिवडीच्या लोकांना शेवटी एकाच परमेश्वरापर्यंत जावे लागते, असे या दुसऱ्या श्लोकात म्हटले आहे. पहिल्या श्लोकात एकाच परमेश्वराला केशव म्हटले आहे. तर दुसऱ्या श्लोकात त्याच परमेश्वराला शिव हे नाव आहे. ‌‘एकं सत्‌‍‌’, परमेश्वर एकच आहे. ‌‘विप्राः बहुधा वदन्ति‌’, जाणते लोक त्यालाच केशव, शिव अशी वेगवेगळी नावे देतात. आपल्या उपास्य देवाची पूजा-प्रार्थना-उपासना कशी करायची याच्या पद्धतीही अनेक असू शकतात. समुद्रापर्यंत पोचायचे पाण्याचे अनेक जवळचे किंवा लांबचे, सोपे किंवा अवघड, सरळ किंवा वेडेवाकडे मार्ग असतात. तसेच परमेश्वरापर्यंत जाण्याचे अनेक मार्ग असतात. थोडक्यात भक्ती कोणाची करायची याचे पर्याय अनेक आहेत आणि भक्ती कशी करायची याच्या पद्धतीही अनेक आहेत, ही वस्तुस्थिती मोकळ्या मनाने स्वीकारणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याला अनुसरूनच महापुरुषपूजेची योजना केली होती. त्या मागची भूमिका सांगणारा भगवद्गीतेतील पुढील श्लोक मागच्या वेळच्या श्लोकाबरोबर त्यासंबंधीच्या लेखात घेतलेला आहे. (ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड २, पान ३०८) गीता ९.२३ :          ये अपि अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः |                             ते अपि माम्‌‍ एव कौन्तेय भजन्ति अविधिपूर्वकम्‌‍ ॥ गीताई ९.२३ :         श्रद्धापूर्वक जे कोणी भजती अन्य दैवते                             यजिती ते हि मातें चि परी मार्गास सोडुनी आपापल्या श्रद्धेप्रमाणे जो तो आपापल्या दैवताची किंवा उपास्याची भक्ती करतो. तो माझीच भक्ती करत असतो असे श्रीकृष्ण म्हणतात. तुम्ही रायगडाला जा किंवा रायरेश्वराला जा. शिवनेरीला जा किंवा राजगडाला जा. प्रतापगडावर जा किंवा पन्हाळ्यावर जा. पुरंदरवर जा किंवा तोरण्याला जा. सर्वच गड शिवाजी महाराजांचे प्रतीक आहेत. तिथे जाताना व गेल्यावर मनात शिवाजी महाराजांचेच स्मरण होणार. तसेच हे आहे. कोणत्याही रूपातील देवाची पूजा करा. त्या रूपामागे मीच आहे व माझीच पूजा तुमच्याकडून होते हेच भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. महामार्गाने जाणारा दुसऱ्या पायवाटेने जाणाऱ्याला मार्ग सोडून जाणारा असेच म्हणेल. पण महामार्ग आणि पायवाट एकाच ठिकाणी पोचत असतील तर शेवटी पोचणे महत्त्वाचे. कोणी रायगडावर रोपवेने जाईल. कोणी पायऱ्यांच्या रस्त्याने जाईल. रायगडावर पोचणे महत्त्वाचे. मार्ग कोणताही, कसाही चालेल. तसेच प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असू शकेल. ते परमेश्वरापर्यंत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. एव्हरेस्टवर नेपाळच्या बाजूने जा किंवा तिबेटच्या बाजूने. एकाच शिखरावर तुम्ही शेवटी पोचता. इतरांच्या मार्गांना चुकीचे मानू व म्हणू नका असे या श्लोकात सांगितले आहे. विचारांचा हा मोकळेपणा किंवा ही उदारता कृतीतून व्यक्त करायची तर ती कशी करायची? महापुरुषपूजेच्या वेळी मार्ग शोधला तो सर्व धर्मांच्या प्रार्थना म्हणण्याचा व सर्व धर्मग्रंथांची पूजा करण्याचा. त्याबरोबर एकाच राष्ट्रपुरुषाची प्रतिमा पूजण्याऐवजी, चार राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन केले, ते ही सर्वांच्या विचारातील काळानुसार ग्राह्य भाग आम्ही घेतो म्हणून. सर्वजण एकाच भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत, त्या संस्कृतीचे आम्ही अभिमानी आहोत म्हणून. भजनाच्या शेवटी ‌‘सब संतन की जय‌’ याच भावनेने म्हणतो. एका परब्रह्मशक्तीची विविध नावे, एका संस्कृतीची विविध रूपे, एका भावनेची विविध प्रकारे अभिव्यक्ती, मुळातल्या एकात्मतेचे विविध प्रकारे दर्शन, हा प्रबोधिनीचा आध्यात्मिक पाया आहे.

१२. ध्येय एक – मार्ग अनेक Read More »

११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे

११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे ज्ञान प्रबोधिनीच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषपूजा या नावाचा एक अभिनव कार्यक्रम करण्यात आला होता. या पूजेमध्ये सर्व धार्मिक संप्रदायांच्या धर्मग्रंथांची पूजा करण्यात आली. त्या ग्रंथांमधल्या काही प्रार्थना म्हणण्यात आल्या व रामदास, दयानंद, विवेकानंद आणि अरविंद या चार राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या महापुरुषपूजेचे वृत्त ज्ञान प्रबोधिनीच्या दुसऱ्या खंडात आले आहे. त्या वृत्ताच्या बरोबर दिलेल्या चौकटीत महापुरुषपूजेमागची प्रेरणा काय ते पुढीलप्रमाणे सांगितले आहे. “आध्यात्मिकतेच्या राष्ट्रीय वारशाचा प्रबोधिनीला अभिमान आहे. प्रबोधिनी सर्व धर्ममतांमधील सारभूत सत्याचा आदर करते. हे व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे महापुरुषपूजा”. त्या वृत्तात महापुरुषपूजेची कल्पना कशी सुचली हे सांगताना गीतेतले दोन श्लोक उद्धृत केले आहेत. (ज्ञान प्रबोधिनी  : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड २, पान ३०८) त्यापैकी पहिला श्लोक आहे  गीता ७.२१  :         यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुम्‌‍ इच्छति|                            तस्य तस्याचलां श्रद्धां ताम्‌‍ एव विदधामि अहम्‌‍ ॥ गीताई ७.२१ :         श्रद्धेने ज्या स्वरूपास जे भजू इच्छिती जसे                            त्यांची ती चि तशी श्रद्धा स्थिर मी करितो स्वये  गीतेतल्या या श्लोकात म्हटले आहे की प्रत्येकाची जशी श्रद्धा असते तसाच त्या श्रद्धेतून त्याने एक आदर्श ही मानलेला असतो. एखादे प्रतीक किंवा व्यक्ती किंवा व्यक्तीचे चरित्र त्या आदर्शाचे मूर्त रूप असते. त्या साकार किंवा सगुण रूपाचे चिंतन-मनन-ध्यान-भजन-पूजन करून जो तो आपल्या आदर्शापर्यंत पोचायचा प्रयत्न करत असतो. विशिष्ट आदर्श मानणे आणि त्या पर्यंत जाण्याची धडपड हा त्या श्रद्धेचा मुख्य भाग. ती श्रद्धा बळकट असेल तर तिच्या जोरावर व्यक्ती आपल्या आदर्शापर्यंत पोचते. आदर्श कोणताही असो. आदर्श असणे महत्त्वाचे. त्यामुळे प्रत्येकाची ज्यावर श्रद्धा असेल त्यावर ती स्थिर करण्याचे काम मी करतो असे भगवान श्रीकृष्ण या श्लोकात अर्जुनाला सांगतात. प्रबोधिनी सर्व रूपांचा आदर करत असल्याने महापुरुषपूजेच्या वेळी वेद, उपनिषदे, गीता, धम्मपद, त्रिपिटक, जैन आगम ग्रंथ, गुरु ग्रंथसाहिब, बायबल, कुराण अशा ग्रंथांचे पूजन करण्यात आले. महापुरुषपूजेचा प्रबोधिनीतील पुढचा अवतार म्हणजे मातृभूमी पूजन. त्यामध्ये विनोबांनी रचलेल्या नाममालेचा उच्चार होतो. नाममालेमध्ये ख्रिश्चनांचा आकाशातील पिता, इस्लाम पंथीयांचा रहीम, ज्यू लोकांचा येहोवा, पारशी लोकांचा अहुर मज्द, चिनी लोकांचा ताओ, या भारताबाहेर उगम असलेल्या धर्ममतांच्या आदर्शांचा उल्लेख आहे. तसेच भारतातच निर्माण झालेल्या शैव, वैष्णव, शाक्त, शीख, बौद्ध, जैन इत्यादी सुमारे पंधरा-सोळा वैदिक-अवैदिक संप्रदायांच्या आदर्शांचाही उल्लेख आहे. हे विविध आदर्श म्हणजे एकाच सत्याचे वेगवेगळ्या श्रद्धांच्या भिंगांमधून त्या त्या पंथाच्या लोकांना घडलेले वेगवेगळे दर्शन आहे. महात्मा गांधींनी सत्याग्रह म्हणजे आपल्याला समजलेल्या सत्याचा आग्रह हा एक विधायक कृतीचा मार्ग सांगितला. विनोबांनी त्यात संशोधन करून सत्य-ग्राह म्हणजे विविध बाजूंनी दिसलेले सत्य ग्रहण करणे, अर्थात सत्याचा एक-एक पैलू समजून घेणे, अशी त्याची पुढची पायरी सांगितली. विनोबांनी सत्याचे पैलू समजून घेण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे असे सांगितले. रामकृष्ण परमहंसांनी विविध धर्मपंथांमधील साधना प्रत्यक्ष आचरून एकाच सत्याचा विविध मार्गांनी अनुभव घेतला. म्हणजे त्यांनी विविध धर्मपंथांमधील सत्य ग्रहण केले. भारत सरकारची छापील राजमुद्रा तीन सिंहांची आहे. तिचा मान राखणे हा नागरिकांचा सत्याग्रह होईल. परंतु प्रत्यक्षात ते शिल्प चार दिशांना तोंडे असलेल्या चार सिंहांचे आहे. कोणत्याही एका बाजूने पाहिले तर तीनच सिंह दिसतात. परंतु चारी बाजूंनी हिंडून पाहिल्यावर प्रत्यक्षात चार सिंह आहेत हे लक्षात येते. म्हणजे सत्य-ग्राह झाला, पूर्ण सत्य लक्षात आले. हे लक्षात येईपर्यंत प्रत्येक जण तीनच सिंह आहेत असे म्हणणार. तीन सिंह दिसणे हा सत्याग्रह, चार सिंहांची जाणीव होण्याच्या सत्य-ग्राहाच्या वाटेवरचा एक टप्पा आहे. मला समजले ते आणि तेवढेच सत्य असे म्हणणाऱ्या नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये, हे आधीच्या नवव्या श्लोकात नकारात्मक भाषेत पाहिले. इथे भगवान श्रीकृष्ण सकारात्मक भाषेत मी त्या नेणत्या कर्मनिष्ठांची ही श्रद्धा स्थिर करतो असे सांगतात. आपण ही इतरांच्या श्रद्धांना धक्का न लावता एक ना एक दिवस ते तिथून पुढे जातील म्हणून, त्यांना पुढे जायला मदत करणे ही समावेशक भक्ती आहे.

११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे Read More »

१०. जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो.

 १०. जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो. लोक अनेक तऱ्हांनी वागत असतात. ते जसे वागतात तसे का वागतात हे शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या स्वभावाची ठेवण जशी आहे, तसे ते वागतात हे लक्षात येते. कोणाचा स्वतः धडपड करण्यावर भर असतो. कोणी सरकार करील म्हणून वाट पाहतात. कोणी देव देईल ते घ्यायचे म्हणून स्वस्थ बसतात. कोणी एकटेच काम करतात. कोणी इतरांची मदत मागतात. कोणी मदत देऊ केली तरी घेत नाहीत. कोणी अनोळखी माणसांवर पटकन विश्वास ठेवतात. कोणी विश्वास असला तरी सर्व काही तपासून घेतात. कोणी इतरांच्या हेतूबाबत कायम संशय घेतात. कोणाला फाजील आत्मविश्वास असतो. कोणाला क्षमता असूनही स्वतःवर विश्वास नसतो. कोणी प्रतिकूल तेच घडेल असे गृहीत धरून, प्रत्येक बाबतीत पर्यायी व्यवस्था करून ठेवतात. कोणी आपण काहीही केले तरी प्रतिकूलच घडणार, असे म्हणून काहीच करत नाहीत. कोणाचा प्रयत्न केल्यावर प्रतिकूलही अनुकूल बनते, असा विश्वास असतो. ही स्वभावाची ठेवण जन्मतःच असते. कौटुंबिक परिस्थितीनेही बनलेली असते. अनुभवांमुळे ही बनलेली असते. या सर्वांमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा जो गाभा किंवा सार बनलेले असते त्यासाठी सत्त्व असा शब्द आहे. या सर्व निरीक्षणांसंबंधी गीतेत एक श्लोक आहे – गीता १७.३ :          सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत |                            श्रद्धामयोऽयं पुरुषः यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ गीताई १७.३ :         जसा स्वभाव जो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे                             श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसा चि तो  पृथ्वीच्या पाठीवर अनेक वनस्पती, अनेक प्राणी आहेत. त्यांची शरीरे वेगवेगळ्या आकार-प्रकाराची आहेत. त्यांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनक्रम वेगवेगळ्या प्रकारचा आणि कमी-जास्त कालावधीचा असतो. याला आपण जीविधा किंवा जैव विविधता म्हणतो. ती आपण सहज स्वीकारतो व ती टिकवली पाहिजे असे म्हणतो. प्रत्येक वनस्पती किंवा प्राण्याच्या गाभ्यामधले म्हणजे बीजामधले, सार किंवा सत्त्व काय आहे यावर, त्यांचा आकार-प्रकार-जीवनक्रम ठरतो. माणसांमध्ये या आकार-प्रकार-जीवनक्रमाशिवाय, वागण्याचे आणि विचार करण्याचे प्रकार आणि वेग, यांची पण विविधता असते. जीविधेच्या धतवर या विविधतेला मनोविधा म्हणता येईल. जीविधा जशी मोकळ्या मनाने स्वीकारतो तितक्याच मोकळ्या मनाने मनोविधा पण स्वीकारली पाहिजे. ही मनोविधा व्यक्ती-व्यक्तीच्या गाभ्यामधल्या म्हणजेच सत्त्वामधल्या श्रद्धेमुळे ठरते, असे या श्लोकाच्या पहिल्या ओळीत सांगितले आहे. जन्मतः मिळालेला गाभा फारसा बदलता येत नाही. असे काही जणांना वाटते. तो बदलता येतो, असे इतर काही जणांना वाटते. पण त्या त्या वेळी तो गाभा जसा असतो, त्यावरून आपण कोणत्या कामांना हात घालणार किंवा घालणार नाही ते ठरत असते. यावर सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती कशी वागेल हे तिच्या श्रद्धेप्रमाणे सांगता येते. अमुक एखादी कृती आपण केलीच पाहिजे, आपणच केली पाहिजे, अमुक एका पद्धतीनेच केली पाहिजे, असा जो ठाम विश्वास असतो, तो विश्वास म्हणजेच आपली श्रद्धा. त्या श्रद्धेमधील ठामपणा आपल्या सत्त्वातून, व्यक्तिमत्त्वाच्या गाभ्यातून, आलेला असतो.  पण ही श्रद्धा बदलता येते, असे स्वामी विवेकानंदांचे आणि कै. आप्पांचे म्हणणे होते. अमेरिकेतून परतल्यावर चेन्नई इथे केलेल्या ‌‘आम्हासमोरील कार्य‌’ या भाषणात विवेकानंदांनी म्हटले आहे, “जो जशी श्रद्धा ठेवतो तसा तो होतो. ‌‘मी स्वतः धीट आहे‌’ अशी श्रद्धा ठेवलीत की तुम्ही धीट व्हाल. ‌‘आम्ही ऋषी आहोत‌’ अशी श्रद्धा केलीत की तुम्ही ऋषी व्हाल”. एका वैचारिकाच्या पहिल्याच परिच्छेदात, कै. आप्पा विवेकानंदांच्या याच वाक्यांचा संदर्भ देऊन म्हणतात, “आपले जीवन निर्मल, निरामय, कर्तृत्वसंपन्न आणि सेवारत असावे असे संकल्प करायचे. श्रद्धापूर्वक केलेल्या संकल्पांचे बळ मोठे असते. जो जशी श्रद्धा ठेवतो तसा तो घडतो”. (राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान ५५) आपण जसे संकल्प करतो तशी आपली श्रद्धा घडते. आणखी एका वैचारिकात हेच वाक्य उद्धृत करून कै. आप्पा म्हणतात “हृदयात श्रद्धा असेल तर कृतीला प्रारंभ होतो. आपल्या हातून कृती का होत नाही? कार्याचं वेड का लागत नाही? बारा, चौदा, सोळा, अठरा तास आपण काम करू असं का वाटत नाही? कारण आमची श्रद्धा नाही, चिंतन नाही, तपश्चर्या नाही”. (राष्ट्रदेवो भव, आवृत्ती दुसरी, पान १११) म्हणजे सत्त्वाप्रमाणे श्रद्धा हे जेवढे खरे, तेवढेच संकल्पानुसार श्रद्धा व श्रद्धेनुसार सत्त्व घडते हे ही खरे. प्रत्येकाची श्रद्धा कशीही असली तरी तिचे निमित्त करून माणसा-माणसामध्ये भेदभाव करणे चूक आहे. आपण देशसेवक व्हावे अशी स्वतःची श्रद्धा घडवता येते, तशीच इतरांनी देशसेवक व्हावे अशी त्यांची श्रद्धा ही घडू शकेल. ज्याची जशी श्रद्धा आहे तसा तो आज वागत असेल. पण प्रयत्नाने तो ही देशसेवक बनू शकेल, अशा विश्वासाने कृती करणे म्हणजे समावेशक भक्ती करणे. श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत विवेकानंदांना आणि कै. आप्पांना असा कृतीपर अर्थ दिसतो.

१०. जो जशी श्रद्धा ठेवतो, तसा तो होतो. Read More »

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य आहे

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य उद्दिष्टाकडे जायला जी कृती मदत करते ती पुण्य. उद्दिष्टाच्या विरुद्ध दिशेने नेणारी कृती, ते पाप. पाप-पुण्याच्या अशा व्याख्या केल्या तर उद्दिष्ट कोणते? स्वतःच्या खऱ्या रूपाची ओळख होणे, आत्मसाक्षात्कार होणे हे उद्दिष्ट सुद्धा एका व्यक्तीपुरते मर्यादित आहे. समाजबांधवांची सुखदुःखे उत्कटतेने जाणवणे, त्यांना योग्य कृतीने प्रतिसाद देणे हे जर कर्मातले सर्वोच्च कौशल मानले (आठव्या श्लोकाचे निरूपण पाहावे) तर उद्दिष्टसुद्धा सर्व समाजाला गवसणी घालणारे व्यापक पाहिजे. प्रत्येक माणसातली जाणीवशक्ती अधिक विकसित होणे, प्रत्येकालाच आत्मसाक्षात्कार होणे हे एका व्यक्तीची जाणीव विकसित होऊन तिला आत्मसाक्षात्कार होण्यापेक्षा अधिक व्यापक उद्दिष्ट आहे. मर्यादित उद्दिष्टापेक्षा व्यापक उद्दिष्टासाठी काम करणे हे अधिक पुण्याचे आहे. या व्यापक उद्दिष्टाचे वर्णन मानवाचा श्रेष्ठ मानव, देवमानव बनणे असे ही केलेले आहे. ‌ ‘आजच्या युगातील अद्वैत तत्त्वज्ञान‌’ या लेखात (ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग – खंड 2, पान 73) कै. आप्पा म्हणतात, ‌‘दासबोधातील उत्तम पुरुष लक्षणे किंवा भगवद्गीतेतील दैवी संपत्तीची लक्षणे यामध्ये जी वर्णने आहेत ती देवमानवाचीच वर्णने आहेत. गीतेत देवमानव होण्याचे तीन मार्ग सांगितले आहेत : भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग.‌’ या मार्गांचे स्पष्टीकरण कै. आप्पांनी केले आहे. कर्ममार्गाचे वर्णन या आधीच्या श्लोकाच्या वेळी पाहिले. कर्ममार्गेच उपासना करायची आहे. म्हणून आता उपासना मार्गाचे म्हणजेच भक्तिमार्गाचे वर्णन पाहू. ‌ ‘धूप-दीप, फुले-गंध असे विविध उपचार करून पूजा करणे म्हणजे भक्ती करणे अशी समजूत आहे. आरत्या, स्तोत्रे, गीतेचे अध्याय म्हणणे म्हणजे भक्तीचे संस्कार करणे अशी समजूत आहे. हे बाह्य आचार भक्तीची पहिली पायरी आहेत‌’ असे कै. आप्पा म्हणतात. त्याचे महत्त्व सांगण्यासाठी गीतेच्या पुढील श्लोकातील एक ओळ कै. आप्पा सांगतात. गीता 3.26 :           न बुद्धिभेदं जनयेत्‌‍ अज्ञानां कर्मसंगिनाम्‌‍ |                             जोषयेत्‌‍ सर्वकर्माणि विद्वान्‌‍ युक्तः समाचरन्‌‍ ॥         गीताई 3.26 :          नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धि-भेद करू नये                            गोडी कर्मांत लावावी समत्वें आचरूनि ती  एखाद्या शिडीच्या पायऱ्या चढत कोणी सर्वात वरच्या पायरीवर पोचला तर तो आता आधीच्या पायऱ्यांची गरज नाही म्हणून त्या तोडून टाकत नाही. मागून येणाऱ्यांसाठी सर्वच पायऱ्या आवश्यक असतात. सर्वात वरच्या पायरीवर आहे त्याला विद्वान म्हणजे जाणता आणि युक्त म्हणजे कर्मयोग साधलेला म्हटलेला आहे. आणि सगळ्यात खालच्या पायरीवर आहेत त्यांना अज्ञ म्हणजे नेणते आणि कर्मसंगी किंवा कर्मनिष्ठ म्हणतात. ते हीच कृती का? अशीच कृती का? याचा विचार न करता, कृती केली की पुरेसे आहे, असे मानणारे असतात. वरच्या पायरीवरच्याने मला खालच्या पायऱ्यांची गरज नाही म्हणून तुम्हीही त्या पायऱ्यांवर पाय ठेवायचा नाही, तुम्हालाही त्याची गरज असता कामा नये, असे म्हणणे म्हणजे त्यांचा बुद्धिभेद करणे. खालच्या पायरीवर पाय पक्का रोवा, म्हणजे त्यातला एक पाय पुढच्या वरच्या पायरीवर टाकता येईल, असे सांगणे म्हणजे त्यांच्या प्रयत्नांमध्ये जोश भरणे, उत्साह भरणे. ज्यांना समाजामध्ये रूढ असलेली काहीतरी कृती करणे म्हणजे भक्ती करणे असे वाटते, त्यांनी कोणाची भक्ती आपण करतो? भक्ती करतो म्हणजे काय करतो? असा विचार ही केलेला नसतो, ते बाह्य कृतीचा पांगुळगाडा घेऊन भक्तिमार्गावर चालायचा प्रयत्न करत असतात. त्यातून कधीतरी बाह्यकृतीचा पांगुळगाडा सुटतो आणि ज्याची भक्ती करतो तो कोण? भक्तीचे रहस्य काय? याचा काहीतरी विचार सुरू होतो. सर्व उपचारांनी पूजा करताना आधी आवाहन व प्रतिष्ठापना आणि शेवटी विसर्जन हे उपचार आहेत. मूतची पूजा करतो की त्यात आवाहन केलेल्याची, ज्याचे विसर्जन करतो त्याची पूजा करतो, याचा विचार करायला प्रोत्साहन देण्यासाठी ते उपचार आहेत. जो जिथे आहे तिथून त्याला पुढे जायला मदत करणे हा समावेशक भक्तिमार्ग झाला. कै. आप्पांनी त्यांच्या लेखामध्ये बाह्य आचारात गुंतलेल्या भक्तीला, सामान्य गोष्टीतली शरणता म्हटले आहे. आपलेच बरोबर हा आग्रह सोडून, सर्वांना ‌‘तुमच्या जागी तुम्ही बरोबर‌’ असे म्हणून, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याला त्या पुढची श्रेष्ठ प्रकारची कार्यशरणता म्हटले आहे. सर्वांना बरोबर घेऊन आपण स्वतः भक्तिमार्गाने पुढे जायचे आहे. 

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य आहे Read More »