११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे
ज्ञान प्रबोधिनीच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषपूजा या नावाचा एक अभिनव कार्यक्रम करण्यात आला होता. या पूजेमध्ये सर्व धार्मिक संप्रदायांच्या धर्मग्रंथांची पूजा करण्यात आली. त्या ग्रंथांमधल्या काही प्रार्थना म्हणण्यात आल्या व रामदास, दयानंद, विवेकानंद आणि अरविंद या चार राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या महापुरुषपूजेचे वृत्त ज्ञान प्रबोधिनीच्या दुसऱ्या खंडात आले आहे. त्या वृत्ताच्या बरोबर दिलेल्या चौकटीत महापुरुषपूजेमागची प्रेरणा काय ते पुढीलप्रमाणे सांगितले आहे. “आध्यात्मिकतेच्या राष्ट्रीय वारशाचा प्रबोधिनीला अभिमान आहे. प्रबोधिनी सर्व धर्ममतांमधील सारभूत सत्याचा आदर करते. हे व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे महापुरुषपूजा”. त्या वृत्तात महापुरुषपूजेची कल्पना कशी सुचली हे सांगताना गीतेतले दोन श्लोक उद्धृत केले आहेत. (ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड २, पान ३०८) त्यापैकी पहिला श्लोक आहे
गीता ७.२१ : यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुम् इच्छति|
तस्य तस्याचलां श्रद्धां ताम् एव विदधामि अहम् ॥
गीताई ७.२१ : श्रद्धेने ज्या स्वरूपास जे भजू इच्छिती जसे
त्यांची ती चि तशी श्रद्धा स्थिर मी करितो स्वये
गीतेतल्या या श्लोकात म्हटले आहे की प्रत्येकाची जशी श्रद्धा असते तसाच त्या श्रद्धेतून त्याने एक आदर्श ही मानलेला असतो. एखादे प्रतीक किंवा व्यक्ती किंवा व्यक्तीचे चरित्र त्या आदर्शाचे मूर्त रूप असते. त्या साकार किंवा सगुण रूपाचे चिंतन-मनन-ध्यान-भजन-पूजन करून जो तो आपल्या आदर्शापर्यंत पोचायचा प्रयत्न करत असतो. विशिष्ट आदर्श मानणे आणि त्या पर्यंत जाण्याची धडपड हा त्या श्रद्धेचा मुख्य भाग. ती श्रद्धा बळकट असेल तर तिच्या जोरावर व्यक्ती आपल्या आदर्शापर्यंत पोचते. आदर्श कोणताही असो. आदर्श असणे महत्त्वाचे. त्यामुळे प्रत्येकाची ज्यावर श्रद्धा असेल त्यावर ती स्थिर करण्याचे काम मी करतो असे भगवान श्रीकृष्ण या श्लोकात अर्जुनाला सांगतात.
प्रबोधिनी सर्व रूपांचा आदर करत असल्याने महापुरुषपूजेच्या वेळी वेद, उपनिषदे, गीता, धम्मपद, त्रिपिटक, जैन आगम ग्रंथ, गुरु ग्रंथसाहिब, बायबल, कुराण अशा ग्रंथांचे पूजन करण्यात आले. महापुरुषपूजेचा प्रबोधिनीतील पुढचा अवतार म्हणजे मातृभूमी पूजन. त्यामध्ये विनोबांनी रचलेल्या नाममालेचा उच्चार होतो. नाममालेमध्ये ख्रिश्चनांचा आकाशातील पिता, इस्लाम पंथीयांचा रहीम, ज्यू लोकांचा येहोवा, पारशी लोकांचा अहुर मज्द, चिनी लोकांचा ताओ, या भारताबाहेर उगम असलेल्या धर्ममतांच्या आदर्शांचा उल्लेख आहे. तसेच भारतातच निर्माण झालेल्या शैव, वैष्णव, शाक्त, शीख, बौद्ध, जैन इत्यादी सुमारे पंधरा-सोळा वैदिक-अवैदिक संप्रदायांच्या आदर्शांचाही उल्लेख आहे.
हे विविध आदर्श म्हणजे एकाच सत्याचे वेगवेगळ्या श्रद्धांच्या भिंगांमधून त्या त्या पंथाच्या लोकांना घडलेले वेगवेगळे दर्शन आहे. महात्मा गांधींनी सत्याग्रह म्हणजे आपल्याला समजलेल्या सत्याचा आग्रह हा एक विधायक कृतीचा मार्ग सांगितला. विनोबांनी त्यात संशोधन करून सत्य-ग्राह म्हणजे विविध बाजूंनी दिसलेले सत्य ग्रहण करणे, अर्थात सत्याचा एक-एक पैलू समजून घेणे, अशी त्याची पुढची पायरी सांगितली. विनोबांनी सत्याचे पैलू समजून घेण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे असे सांगितले. रामकृष्ण परमहंसांनी विविध धर्मपंथांमधील साधना प्रत्यक्ष आचरून एकाच सत्याचा विविध मार्गांनी अनुभव घेतला. म्हणजे त्यांनी विविध धर्मपंथांमधील सत्य ग्रहण केले.
भारत सरकारची छापील राजमुद्रा तीन सिंहांची आहे. तिचा मान राखणे हा नागरिकांचा सत्याग्रह होईल. परंतु प्रत्यक्षात ते शिल्प चार दिशांना तोंडे असलेल्या चार सिंहांचे आहे. कोणत्याही एका बाजूने पाहिले तर तीनच सिंह दिसतात. परंतु चारी बाजूंनी हिंडून पाहिल्यावर प्रत्यक्षात चार सिंह आहेत हे लक्षात येते. म्हणजे सत्य-ग्राह झाला, पूर्ण सत्य लक्षात आले. हे लक्षात येईपर्यंत प्रत्येक जण तीनच सिंह आहेत असे म्हणणार. तीन सिंह दिसणे हा सत्याग्रह, चार सिंहांची जाणीव होण्याच्या सत्य-ग्राहाच्या वाटेवरचा एक टप्पा आहे. मला समजले ते आणि तेवढेच सत्य असे म्हणणाऱ्या नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये, हे आधीच्या नवव्या श्लोकात नकारात्मक भाषेत पाहिले. इथे भगवान श्रीकृष्ण सकारात्मक भाषेत मी त्या नेणत्या कर्मनिष्ठांची ही श्रद्धा स्थिर करतो असे सांगतात. आपण ही इतरांच्या श्रद्धांना धक्का न लावता एक ना एक दिवस ते तिथून पुढे जातील म्हणून, त्यांना पुढे जायला मदत करणे ही समावेशक भक्ती आहे.