१३.नमस्कारा ऐसे नाही सोपे
प्रत्येक जण त्याच्या श्रद्धेप्रमाणे घडलेला असतो. आपापल्या श्रद्धेप्रमाणे प्रत्येक जण आपले पूजनीय दैवत निवडतो. ज्याची त्याची त्याच्या दैवतावरची श्रद्धा परमेश्वर बळकट करतो. श्रद्धेने कोणत्याही देवाची पूजा कोणत्याही पद्धतीने केली तरी ती पूजा परमेश्वरालाच पोचते. एवढ्या सगळ्या गोष्टी आधीच्या तीन श्लोकांमध्ये पाहिल्या. ही समावेशक भक्ती करण्यासाठी मन मोठे करत जावे लागते. आज त्याला पूरक असा भक्तीचा दुसरा पैलू पाहू.
परमेश्वराला फळ, फूल, पान, पाणी यापैकी श्रद्धेने काहीही वाहिले तरी चालते. त्याला सोन्याचे दागिने, रेशमी कपडे असे बहुमोल द्रव्यच अर्पण केले पाहिजे असे नाही. त्याला श्रद्धेने नुसते हात जोडून नमस्कार केला तरी पुरते. भक्तीविषयी या सगळ्या गोष्टी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्या आहेत. त्या ऐकल्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला तो कोणत्या कोणत्या रूपात आहे ते विचारले. श्रीकृष्णाकडून ती लांबलचक यादी ऐकल्यावर ती सगळी रूपे दाखवण्याची विनंती अर्जुनाने केली. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपले विराट रूप दाखविल्यावर, ते पाहून अर्जुन म्हणाला –
गीता ११.३९ : वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशांकः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च |
नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥
गीताई ११.३९ : तू अग्नि तू वायु समस्त देव, प्रजापते तूचि पिता वडील
असो नमस्कार सहस्रवार पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा हि
आताच्या काळात शंकर, विष्णू, राम, विठ्ठल, देवी, गणपती, दत्त, मारुती अशी दैवते लोकप्रिय आहेत. गीतेच्या काळातली दैवते वेगळी होती. अग्नी, वायू, यम, वरुण, शशांक म्हणजे चंद्र, ही त्या काळातली लोकप्रिय दैवते. श्रीकृष्णाचे विशाल रूप पाहिल्यावर, ही सर्व दैवते त्यातच सामावलेली अर्जुनाला दिसली. त्यामुळे या सर्व दैवतांमध्ये तूच आहेस, म्हणजे परमेश्वरच आहे, असे अर्जुन म्हणतो. सर्व मानवांचा आद्य मानवी पूर्वज प्रजापती. त्याचा काल्पनिक किंवा मानस पिता म्हणजे ब्रह्मदेव. त्याचा श्रद्धेने मानलेला पिता म्हणजे परमेश्वर. प्रजापती हे सर्व मानवांचे वडील. म्हणून ब्रह्मदेव आजोबा. आणि परमेश्वर पणजोबा, म्हणजेच प्रपितामह. अर्जुनाला श्रीकृष्णाचे विशाल रूप पाहिल्यावर जे दिसले त्याचा त्या वेळच्या समजुतींप्रमाणे त्याने अर्थ लावला. सर्व दैवतांचे आणि सर्व मानवांचे मूळ परमेश्वर. सर्व काही त्याच्यापासून निर्माण झालेले आहे. त्याला त्याच्याच वस्तू काय देणार? श्रद्धापूर्वक, नम्रतेने, भक्तीने हात जोडून त्याला नमस्कार करणे, हेच आपल्या आवाक्यात आहे. म्हणून अर्जुन म्हणतो की मी फक्त तुला हजार वेळा नमस्कार करू शकतो.
कोणाशी वागताना किंवा बोलताना चूक झाली तर त्या व्यक्तीची क्षमा मागणे हे सभ्यतेचे लक्षण आहे. आपण त्या व्यक्तीला स्वतः इतकीच प्रतिष्ठा त्यातून देतो. कोणाला चुकून पाय लागला, एखाद्या वस्तूला किंवा जेवणाच्या ताटाला चुकून पाय लागला तर त्या व्यक्तीला किंवा वस्तूला नमस्कार करणे ही देखील क्षमा मागायची, मान द्यायचीच पद्धत आहे. जैन लोकांमध्ये वार्षिक क्षमापना मागताना अजाणतेपणे किंवा नकळत केलेल्या चुकीबद्दल देखील क्षमा मागितली जाते. यात इतरांना स्वतःहून जास्त मोठेपणा देण्याची नम्रता सुद्धा आहे. जे जे उत्तम, श्रेष्ठ दिसेल त्याला नमस्कार करण्यात आणखी नम्रपणा आहे. आपली शस्त्रे, अवजारे, यंत्रे, साधने, वह्या-पुस्तके, उखळ, पाटा-वरवंटा, चूल, केरसुणी यांची पूजा करणे, त्यांना नमस्कार करणे, यात नम्रतेचे पाठच आपण गिरवत असतो. व्यवहारात स्वतःचा उचित सन्मान राखूनही, भक्तीमध्ये स्वतःला शून्य बनवण्याचे साधन, सर्वांमधील परमेश्वराला नमस्कार करत राहणे हे आहे. मन मोठे करत जाणे हा भक्तीचा एक पैलू. आणि आपले ‘मी’पण लहान करत जाणे हा भक्तीचा दुसरा पैलू.
आपणच स्वतःला वर उचलावे, खचू देऊ नये, हा श्लोक जसा खंडेनवमीच्या दिवशी करायच्या यंत्रपूजनाच्या पोथीतला, तसा अर्जुनाने केलेल्या ईशस्तवनाचा हा श्लोक ही त्याच पोथीतला आहे. (यंत्रपूजन उपासना पोथी, शके १९०४, आवृत्ती, पान ४) यंत्रपूजनाला सुरुवातच मुळी या ईशस्तवनाने होते. ‘हे परमेश्वरा, या विश्वात तूच सर्व भरून राहिलेला आहेस. सगळ्या देवदेवता म्हणजे तुझीच वेगवेगळी रूपे आहेत. तूच सर्व लोकांना निर्माण करणारा व पालन करणारा आहेस. सर्व प्राणिमात्रांना तू वडिलांच्या ठिकाणी आहेस. तुला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो.’ असा कृतज्ञतेचा व नम्रतेचा भाव निर्माण व्हावा म्हणून, व तो व्यक्त करण्याची प्रेरणा व्हावी म्हणून, पूजा किंवा उपासना करायची असते. असे यंत्रपूजन करण्याने यंत्रावरील दैनंदिन कामही उपासना बनते.