९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य आहे

९. आपले आग्रह नसण्यात भक्तीचे रहस्य

उद्दिष्टाकडे जायला जी कृती मदत करते ती पुण्य. उद्दिष्टाच्या विरुद्ध दिशेने नेणारी कृती, ते पाप. पाप-पुण्याच्या अशा व्याख्या केल्या तर उद्दिष्ट कोणते? स्वतःच्या खऱ्या रूपाची ओळख होणे, आत्मसाक्षात्कार होणे हे उद्दिष्ट सुद्धा एका व्यक्तीपुरते मर्यादित आहे. समाजबांधवांची सुखदुःखे उत्कटतेने जाणवणे, त्यांना योग्य कृतीने प्रतिसाद देणे हे जर कर्मातले सर्वोच्च कौशल मानले (आठव्या श्लोकाचे निरूपण पाहावे) तर उद्दिष्टसुद्धा सर्व समाजाला गवसणी घालणारे व्यापक पाहिजे.

प्रत्येक माणसातली जाणीवशक्ती अधिक विकसित होणे, प्रत्येकालाच आत्मसाक्षात्कार होणे हे एका व्यक्तीची जाणीव विकसित होऊन तिला आत्मसाक्षात्कार होण्यापेक्षा अधिक व्यापक उद्दिष्ट आहे. मर्यादित उद्दिष्टापेक्षा व्यापक उद्दिष्टासाठी काम करणे हे अधिक पुण्याचे आहे. या व्यापक उद्दिष्टाचे वर्णन मानवाचा श्रेष्ठ मानव, देवमानव बनणे असे ही केलेले आहे.

‌ ‘आजच्या युगातील अद्वैत तत्त्वज्ञान‌’ या लेखात (ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग – खंड 2, पान 73) कै. आप्पा म्हणतात, ‌‘दासबोधातील उत्तम पुरुष लक्षणे किंवा भगवद्गीतेतील दैवी संपत्तीची लक्षणे यामध्ये जी वर्णने आहेत ती देवमानवाचीच वर्णने आहेत. गीतेत देवमानव होण्याचे तीन मार्ग सांगितले आहेत : भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग.‌’ या मार्गांचे स्पष्टीकरण कै. आप्पांनी केले आहे. कर्ममार्गाचे वर्णन या आधीच्या श्लोकाच्या वेळी पाहिले. कर्ममार्गेच उपासना करायची आहे. म्हणून आता उपासना मार्गाचे म्हणजेच भक्तिमार्गाचे वर्णन पाहू.

‌ ‘धूप-दीप, फुले-गंध असे विविध उपचार करून पूजा करणे म्हणजे भक्ती करणे अशी समजूत आहे. आरत्या, स्तोत्रे, गीतेचे अध्याय म्हणणे म्हणजे भक्तीचे संस्कार करणे अशी समजूत आहे. हे बाह्य आचार भक्तीची पहिली पायरी आहेत‌’ असे कै. आप्पा म्हणतात. त्याचे महत्त्व सांगण्यासाठी गीतेच्या पुढील श्लोकातील एक ओळ कै. आप्पा सांगतात.

गीता 3.26 :           न बुद्धिभेदं जनयेत्‌‍ अज्ञानां कर्मसंगिनाम्‌‍ |

                            जोषयेत्‌‍ सर्वकर्माणि विद्वान्‌‍ युक्तः समाचरन्‌‍ ॥        

गीताई 3.26 :          नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धि-भेद करू नये

                           गोडी कर्मांत लावावी समत्वें आचरूनि ती 

एखाद्या शिडीच्या पायऱ्या चढत कोणी सर्वात वरच्या पायरीवर पोचला तर तो आता आधीच्या पायऱ्यांची गरज नाही म्हणून त्या तोडून टाकत नाही. मागून येणाऱ्यांसाठी सर्वच पायऱ्या आवश्यक असतात. सर्वात वरच्या पायरीवर आहे त्याला विद्वान म्हणजे जाणता आणि युक्त म्हणजे कर्मयोग साधलेला म्हटलेला आहे. आणि सगळ्यात खालच्या पायरीवर आहेत त्यांना अज्ञ म्हणजे नेणते आणि कर्मसंगी किंवा कर्मनिष्ठ म्हणतात. ते हीच कृती का? अशीच कृती का? याचा विचार न करता, कृती केली की पुरेसे आहे, असे मानणारे असतात. वरच्या पायरीवरच्याने मला खालच्या पायऱ्यांची गरज नाही म्हणून तुम्हीही त्या पायऱ्यांवर पाय ठेवायचा नाही, तुम्हालाही त्याची गरज असता कामा नये, असे म्हणणे म्हणजे त्यांचा बुद्धिभेद करणे. खालच्या पायरीवर पाय पक्का रोवा, म्हणजे त्यातला एक पाय पुढच्या वरच्या पायरीवर टाकता येईल, असे सांगणे म्हणजे त्यांच्या प्रयत्नांमध्ये जोश भरणे, उत्साह भरणे.

ज्यांना समाजामध्ये रूढ असलेली काहीतरी कृती करणे म्हणजे भक्ती करणे असे वाटते, त्यांनी कोणाची भक्ती आपण करतो? भक्ती करतो म्हणजे काय करतो? असा विचार ही केलेला नसतो, ते बाह्य कृतीचा पांगुळगाडा घेऊन भक्तिमार्गावर चालायचा प्रयत्न करत असतात. त्यातून कधीतरी बाह्यकृतीचा पांगुळगाडा सुटतो आणि ज्याची भक्ती करतो तो कोण? भक्तीचे रहस्य काय? याचा काहीतरी विचार सुरू होतो. सर्व उपचारांनी पूजा करताना आधी आवाहन व प्रतिष्ठापना आणि शेवटी विसर्जन हे उपचार आहेत. मूतची पूजा करतो की त्यात आवाहन केलेल्याची, ज्याचे विसर्जन करतो त्याची पूजा करतो, याचा विचार करायला प्रोत्साहन देण्यासाठी ते उपचार आहेत.

जो जिथे आहे तिथून त्याला पुढे जायला मदत करणे हा समावेशक भक्तिमार्ग झाला. कै. आप्पांनी त्यांच्या लेखामध्ये बाह्य आचारात गुंतलेल्या भक्तीला, सामान्य गोष्टीतली शरणता म्हटले आहे. आपलेच बरोबर हा आग्रह सोडून, सर्वांना ‌‘तुमच्या जागी तुम्ही बरोबर‌’ असे म्हणून, त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याला त्या पुढची श्रेष्ठ प्रकारची कार्यशरणता म्हटले आहे. सर्वांना बरोबर घेऊन आपण स्वतः भक्तिमार्गाने पुढे जायचे आहे.