८. कामातील गुणवत्तेच्या चढत्या-वाढत्या पायऱ्या

८. कामातील गुणवत्तेच्या चढत्या-वाढत्या पायऱ्या

आजपर्यंत गीतेतील सात श्लोकांचे निरूपण पाहिले. वीरवृत्तीने सदैव कामाला सज्ज असणे हे त्यांपैकी पहिल्या श्लोकाचे तात्पर्य. स्वतःच स्वतःच्या प्रगतीची सूत्रे हातात घ्यायची असतात हे दुसऱ्या श्लोकाचे सार. सर्व क्रिया वेळच्या वेळी, योग्य प्रमाणात, योग्य रितीने केल्याने साध्य होणारा योग दुःख दूर करतो हे तिसऱ्या श्लोकात पाहिले. पुढच्या तीन श्लोकांमध्ये मिळून हाव आणि क्रोध हे दुःखाचे कारण आहेत. त्यांना शत्रू समजा. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंद्रियांवर आधी नियंत्रण मिळवा हे सांगितले. सातव्या श्लोकात सर्व क्रिया योग्य प्रकारे करून आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवून एकाग्रतेने योग साधला, म्हणजे विद्या मिळते व आत्मज्ञानही होते हे पाहिले. म्हणजे साती श्लोकांमध्ये मिळून ‌‘आधी ते करावे कर्म‌’ हेच सांगितले. विद्यार्थ्यांसाठी हे खरे आहे आणि विद्यार्थिदशा संपलेल्या प्रौढांनाही हे लागू आहे.

कर्म करतच भक्ती करता येते का ? ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग – खंड २ मध्ये, कै. आप्पांचा ‌‘आजच्या युगातील अद्वैत तत्त्वज्ञान‌’ हा लेख आहे. (पान ७४) त्यात गीतेतील एका श्लोकाचा एक चरण, अध ओळ सांगितली आहे. तो श्लोक असा –

गीता २.५० :          बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते |

                           तस्माद्‌‍ योगाय युजस्व, योगः कर्मसु कौशलम्‌‍ ॥  

गीताई २.५० :         येथे समत्व बुद्धीने टळे सुकृत-दुष्कृत

                           समत्व जोड ह्यासाठी ते चि कर्मांत कौशल

कै. आप्पांच्या लेखामध्ये या श्लोकातला ‌‘योगः कर्मसु कौशलम्‌‍‌’ हा चरण आला आहे. ‌‘फक्त कर्मनिष्ठ राहून काम करत राहणे पुरेसे नाही. केलेल्या कामाच्या पद्धतीबद्दल आणि परिणामांबद्दल विचार केला पाहिजे. विचार करताना कामाचा काय परिणाम झाला? काम बरोबर झाले का? पुन्हा तेच काम करताना काय टाळले पाहिजे? असा विचार करूनच कर्माची प्रत किंवा गुणवत्ता सुधारते. म्हणजे यात काम करण्याबरोबर विचारासाठी बुद्धी वापरणे पण आले. कर्माची प्रत वाढत जाणे म्हणजेच ‌‘योगः कर्मसु कौशलम्‌‍‌’ असे कै. आप्पांनी त्यात म्हटले आहे.

आवश्यक ते, आवश्यक तेवढे, आवश्यक तेव्हा प्रयत्न करून काम करणे म्हणजे युक्तचेष्टा असे तिसऱ्या श्लोकात पाहिले. ती कौशल किंवा कुशलतेची पहिली पायरी. आवश्यक काम स्वतःसाठीचेही असू शकते. त्यात कै. आप्पांनी त्यांच्या लेखात अशी भर घातली आहे की आवश्यक ते काम म्हणजे  समाजरचनेला हातभार लावणारे, समाजहिताचे काम. आपल्या आवडी-नावडीचा विचार न करता, स्वतः पलीकडे जाऊन समाजहिताचे काम करता येणे ही कुशलतेची दुसरी पायरी. असे काम करताना परस्परांशी सौहार्दाने वागत, परस्परांच्या साहाय्याने पराक्रम करण्याची जाणीवही हवी. त्यात कामाप्रमाणेच सहकाऱ्यांविषयी ही हा आवडता – तो नावडता असे नको. ही कुशलतेची तिसरी पायरी. ज्या कामाचा आपल्यावर प्रतिकूल परिणाम होतो ते दुष्कृत. आवश्यक असेल ते काम आवडीचे नसले, तरी कुरकुर न करता उत्साहाने करता आले, म्हणजे दुष्कृत टळले. ज्या कामाचा आपल्यावर सुखकारक परिणाम होतो ते सुकृत. म्हणून आवश्यक असेल ते काम आवडीचे असले तरी त्यातच रमून न जाता, ते संपवून मोकळे होता आले, म्हणजे सुकृत टळले. दुष्कृत आणि सुकृत टाळता येणे ही कौशलाची चौथी पायरी. कै. आप्पांनी त्यातही भर घातली आहे. त्यांच्या मते परिणामांबाबत समत्वबुद्धी हवी. पण ती असूनही आपल्या समाजबांधवांची सुखदुःखे उत्कटतेने जाणवली, व त्यांना योग्य कृतीने प्रतिसाद देण्याची प्रेरणा जिवंत राहिली, तर कर्मयोग साधला. ती कौशलाची पाचवी पायरी.

मागच्या वेळच्या श्लोकात वीरवृत्तीने कर्म करत मन उद्दिष्टावर एकाग्र झाले की ज्ञान प्रकट होते असे म्हटले आहे. पण मन एकाग्र करताना आपले जीवन निर्मल, सेवारत, देशप्रीतीने व मानवप्रीतीने भरलेले आणि कर्तृत्वसंपन्न झाले पाहिजे, असे कै. आप्पांनी म्हटले आहे. कर्मवीर कर्तृत्वसंपन्न असतो. तो देशप्रीतीने व मानवप्रीतीने भरलेला आणि सेवारत पण झाला की कर्मयोगी होतो. पाची पायऱ्यांवरचे कौशल आले, कर्मयोगी झाला, म्हणजे जीवन कर्तृत्वसंपन्न, देशप्रीतीने व मानवप्रीतीने भरलेले आणि सेवारत झाले. असे होणे म्हणजेच आपल्या कर्माचा भक्तियोग झाला व जीवनात निर्मलता, म्हणजेच ज्ञान प्रकट झाले. आजपर्यंतचे आठ श्लोक प्रबोधिनीच्या वाङ्मयातील कर्मयोगावरील श्लोक होते. पुढच्या वेळेपासून भक्तियोगातील श्लोक समजून घेऊया.