विविध संस्कारांची माहिती

ज्ञान प्रबोधिनी, संस्कृतसंस्कृतिसंशोधिका (संत्रिका)

पौरोहित्य विभाग, पुणे
५१४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
दूरभाष : ०२०-२४२०७१४६ /१४७,
ई-पत्ता – [email protected]
संकेतस्थळ – www.santrika.org

 

‘महालय श्राद्ध‌’

 

१) श्राद्धाची संकल्पना – श्राद्धाचा विधी करताना अनेकांच्या मनात आपलं काही चुकल्यास मृत व्यक्तीला सद्गती मिळणार नाही का? असे विचार डोकावतात; पण अशी भीती अथवा शंका यांचा पगडा मनावर असणे योग्य नाही. कारण ‌‘श्रद्धया क्रियते यत‍् तत् श्राद्धम्‌‍|‌’ म्हणजे ‌‘श्रद्धायुक्त अंतःकरणाने केले जाणारे एक कर्म‌’ अशी श्राद्धाची व्याख्या आहे. ज्याप्रमाणे आपण देवाचे पूजन करतो त्याप्रमाणेच पितरांचे केलेले पूजन म्हणजे श्राद्ध.

२) श्राद्धविषयक रूढी – भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात (पितृपंधरवडा) निधनतिथीला महालयश्राद्ध करण्याचीही पद्धती रूढ आहे. महालय श्राद्धामध्ये आपल्या कुटुंबातील सर्व दिवंगतांचे एकत्रित पूजन केले जाते तसेच ज्ञात-अज्ञात, आप्त, स्नेही यांना उद्देशूनही पूजन केले जाते. तसेच भरणी श्राद्ध करण्याची प्रथाही समाजात रूढ आहे. ज्या व्यक्तीचे निधन भरणी नक्षत्रावर झालेले असते त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ भरणी नक्षत्रावर हे श्राद्ध केले जाते. हे सर्व विधी करण्यासाठी बराच वेळ खर्च होतो. तसेच या जोडीने ब्राह्मणांना व आप्तांना भोजन दिले जाते. या सर्वांचा आर्थिक भारही बराच पडतो. यातील अनेक बाबी शास्त्रदृष्ट्या अपरिहार्य नसूनही भातीपोटी केल्या जातात. ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने भरणी श्राद्ध केले जात नाही.

३) ज्ञान प्रबोधिनी पद्धतीचा महालय श्राद्धविधी – भाताचे पिंड हे दिवंगत व्यक्तींचे प्रतीक. ज्याप्रमाणे देवांची पूजा केली जाते त्याप्रमाणे श्राद्धात पितरांची पूजा करतात. गंध, काजळ, लोकर, दह्याची साय इ. पितरांना अर्पण केले जाते. धूप, दीप, नैवेद्य व दक्षिणा हे उपचारही केले जातात. देवतापूजनापेक्षा पितरांच्या पूजनाचा वेगळेपणा लक्षात येण्यासाठी काळे तीळ, माक्याची पाने व पांढरी फुले वापरली जातात. त्यानंतर पितरांची प्रार्थना केली जाते. या श्राद्धविधीला अंदाजे एक ते दीड तास लागतो.

४) स्त्रियांचा सहभाग – श्राद्धविधीत स्त्रियांचाही सहभाग अपेक्षित आहे. स्त्रियादेखील आपल्या आप्तांचे श्राद्ध करू शकतात.

५) श्राद्धाचा नैवेद्य – श्राद्धाच्या नैवेद्यासाठी काही विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे; परंतु प्रबोधिनीतर्फे असा आग्रह धरला जात नाही. यजमान आपल्या इच्छेनुसार नैवेद्याची योजना करू शकतात.

६) साहित्याची यादी

क) १) गंध, २) उदबत्त्या व घर, ३) तेल, तेलवात, ४) फुलवाती व तूप, ५) काडेपेटी, ६) विड्याची दोन पाने, ७) एक सुपारी, ८) एक नाणं

ख) १) नीरांजन/समई, २) एक तांब्या, ३) एक भांडं, चार-पाच वाट्या, ४) दोन ताम्हन, ५) एक पळी, ६) दोन चमचे, ७) दोन ताटं, ८) दोन पाट (आसने), ९) हात पुसण्यासाठी रुमाल, १०) कात्री

ग) २) २ चमचे सायीचे दही, २) लोकर – बोटभर लांबीचे तुकडे (पिंडाच्या संख्येनुसार) ३) एक ते दोन वाटी तांदळाचा भात (जितके पिंड करायचे त्या अंदाजाने भात करावा. छोटे लिंबाच्या आकाराचे पिंड करावेत. ४) अर्धी वाटी काळे तीळ, ५) पांढरी फुले, ६) माक्याची किंवा तुळशीची पाने, ७) दर्भ दोन जुड्या, ८) काजळ, ९) नैवेद्य (लाडू/खीर इ.), १०) शक्य झाल्यास केळीचे पान किंवा दोन पत्रावळ्या.

७) धनादेश, रोख, किंवा ई हस्तांतरण (cheque, cash, e-transfer) यापैकी कोणत्याही प्रकारे संस्थेला देणगी देताना देणगी देणाऱ्या व्यक्तीचा पॅन आवश्यक आहे.

 

‘साठीशांती‌’

1) शांती म्हणजे काय? – अशुभाचा किंवा अनिष्टाचा परिहार व इष्टाची प्राप्ती या दोन विचारांमधून शांतीची पारंपरिक कल्पना प्रसृत झाली व त्यातूनच विविध प्रकारच्या शांती उदयाला आल्या असाव्यात. सध्याच्या काळात या दोन कल्पनांना आधुनिक विज्ञानाचा अथवा बुद्धिप्रामाण्याचा आधार देता येत नाही; म्हणजे शांती केल्यामुळे अनिष्टाचा परिहार होतो किंवा इष्टाची प्राप्ती होते अशी शांतीसंबंधीची कल्पना विवादास्पद ठरते. मग शांतीचा विधी का करायचा? तर काही अनिष्ट गोष्टी घडण्यापूर्वी अथवा घडल्यानंतर  त्यांना तोंड देण्यासाठी मानसिक स्थैर्य व धैर्य लाभावे या हेतूने शांतिकर्म करायला हरकत नाही. काही विशिष्ट कृती व मंत्र यांचा समावेश शांतिविधींमध्ये असतो. त्या मंत्रांच्या अर्थाचे मनन केल्याचा परिणाम म्हणून मानसिक स्थैर्य व धैर्य वाढते. अशुभाचा परिहार आणि इष्टाची प्राप्ती या फलापेक्षा मानसिक स्थैर्य व धैर्य मिळविण्यासाठी, अर्थ समजून शांतीचा विधी करणे ही अधिक बुद्धिनिष्ठ कल्पना आहे. त्यामुळे ज्ञान प्रबोधिनीच्या विधीत त्यावर भर आहे.

2) साठीशांती करण्यामागील संकल्पना – वय वर्षे ५० ते १०० या कालावधीत केल्या जाणाऱ्या विविध शांतींना ‌‘वयोवस्थाभिद शांती‌’ म्हटले आहे. बाल्य, कौमार्य, तारूण्य, प्रौढत्व आणि वार्धक्य अशा विविध वयोवस्थांमधून प्रत्येक व्यक्ती जात असते. वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर वृद्धावस्थेत शरीराचे आजार, मानसिक असमाधान यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. या सर्वांना धैर्याने सामोरे जाता यावे  म्हणून वय वर्षे ५० पासून दर ५ वर्षांनी विविध शांती करण्यास सांगितले आहे. त्यातील प्रत्येक शांतीचे नाव वेगळे आहे, देवता वेगळी आहे.

3) साठीशांतीचा पारंपरिक विधी – प्रचलित साठीशांतीमध्ये समिधा, तूप, चरू (दुधात शिजविलेला भात), दूर्वा इ. गोष्टींची आहुती दिली जाते. मार्कंडेय ऋषी हे या शांतीची प्रधान देवता आहेत.  यज्ञामध्ये १०८, १००८ या प्रमाणे यथाशक्ती आहुती दिल्या जातात. मुख्य होमानंतर बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक इ. विधी केले जातात. नंतर ब्राह्मणांना पीठदान, सुवर्णदान, भोजन इ. लौकिक गोष्टीही होतात.

4) प्रबोधिनीप्रणीत विधी – प्रबोधिनी पद्धतीत संकल्प, पुण्याहवाचन, मार्कंडेय ॠषींचे पूजन, पूर्वजांचे स्मरण यांचा समावेश आहे. यजमानांची इच्छा असल्यास यजमान ‌‘वानप्रस्थाश्रमाचा‌’ देखील स्वीकार करू शकतात, त्यासाठी या पोथीत ‌‘वानप्रस्थ दीक्षा‌’ असा स्वतंत्र उपविधी दिलेला आहे. त्यानंतर होम व नंतर गद्य प्रार्थना असा हा शांतीचा विधी आहे. स्वस्तिवाचन, रोगनाशनसूक्त व शांतिपाठ यांचे पठण हेही या साठीशांतीच्या संस्काराचे एक महत्त्वपूर्ण अंग होय.

* साठीशांतीप्रमाणेच पासष्ठी, एक्काहत्तरी, शंभरी इ. शांतीसुद्धा ज्ञा.प्र. पद्धतीने केल्या जातात. वयाची एक्याऐंशी वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केल्या जाणाऱ्या सहस्रचंद्रदर्शन-शांतीची स्वतंत्र पोथीही उपलब्ध आहे.

* व्यक्तीच्या वयाला ८१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने सहस्रचंद्रदर्शन-शांती करतात. त्या व्यक्तीने ८० वर्षात १००० पौर्णिमांचा आनंद अनुभवला अशी कल्पना त्यामागे आहे. या शांतीची देवता चंद्र. तिचे पूजन, मार्कण्डेय ॠषींचे पूजन तसेच उत्सवमूर्तीचे अभिनंदन म्हणून काही लौकिक विधी केले जातात.

5) संस्थेची देणगी – सदर संस्कारासाठी ज्ञा. प्र. ची देणगी रू. १०००/- आहे. 

6) धनादेश, रोख, किंवा ई हस्तांतरण (cheque,cash, e-transfer) यापैकी कोणत्याही प्रकारे संस्थेला देणगी देताना देणगी देणाऱ्या व्यक्तीचा पॅन आवश्यक आहे.

7) साहित्याची यादी  – क) 1) हळद 2) कुंकू 3) अष्टगंध 4) अक्षता 5) रंगीत फुले 6) उदबत्या व घर 7) भिजविलेल्या फुलवाती व तूप 8) काडेपेटी 9) दहा सुपाऱ्या 10) कलशावर ठेवण्यासाठी आंब्याची अथवा विड्याची दहा पाने 11) एक नारळ 12) पंचामृत 13) पाच सुटी नाणी 14) सहस्रचंद्रदर्शन असल्यास पंचामृत ऐवजी तिळगुळ मिश्रित दूध ठेवावे 15) काशाच्या अथवा अन्य पसरट भांड्यात ‌‘मुखदर्शनासाठी‌’ पातळ केलेले तूप.

ख) 1) निरांजन 2) एक तांब्या 3) दोन भांडी, दोन वाट्या 4) एक ताम्हन 5) एक पळी 7) दोन चमचे 8) एक ताट 9) चार पाट (आसने) 10) चौरंग, चौरंगावर घालायला वस्र 11) हात पुसण्यासाठी रुमाल 12) रांगोळी/अन्य सुशोभने 13) देवतांसाठी नैवेद्य 14) कात्री

ग) 1) अडीचशे ग्रॅम तांदूळ 2) शक्य असल्यास हार, गुच्छ 3) मार्कंडेय प्रतिमा 4) शक्य असल्यास कणकेचे ६० दिवे.

घ) 1) शक्य असल्यास चार विटा, होमकुंड (किंवा घमेले, कोरडी वाळू, माती) दोन विटा  2) २५/३० समिधांच्या तीन जुड्या  3) दोन कोरड्या गोवरी 4) अर्धा किलो शुद्ध तूप 6) कापूर (मोठ्या वड्यांची मोठी डबी).

‘सत्यनारायण पूजा‌’

1) सत्यनारायण-पूजेचे महत्त्व – एकूणच समाजमनात सत्यनारायण-पूजेविषयी भक्तिभाव व आदर दिसून येतो. श्रावण महिन्यात घरोघरी ही पूजा केली जाते. घरात काही शुभ कार्य घडले तर त्याप्रसंगीसुद्धा सत्यनारायणाची पूजा केली जाते. या पूजेची कथा ऐकणे व प्रसाद ग्रहण करणे यालाही विशेष महत्त्व असल्याचे दिसून येते.

नारायण हे विश्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्यशक्तीचे नाव आहे. काही विशेष निमित्ताने या चैतन्यशक्तीचे स्मरण, पूजन वक्षणे हा सत्यनारायण पूजेचा मूळ हेतू असावा असे वाटते. सदाचाराकडे व निष्ठापूर्वक व्रताचरणाकडे लोकांची प्रवृत्ती व्हावी, व त्यांनी ईश्वराविषयी कृतज्ञ असावे असा कथा-श्रवणाचा मूळ हेतू असावा असे दिसते.

2) सत्यनारायण-पूजेचा पारंपरिक विधी – प्रचलित पूजा-पद्धतीत आचमन, गणेशाचे षोडशोपचारे पूजन, कलश-शंख-घंटा-दीपपूजन, अष्टदिक्पाल व नवग्रह यांचे पूजन केले जाते. त्यानंतर बाळकृष्ण किंवा शाळीग्राम यांची षोडशोपचारे पूजा करून शिऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो. नंतर कथेचे वाचन केले जाते; आरती करून पूजेची समाप्ती होते.

3) प्रबोधिनी प्रणीत पूजा – मनाला उभारी, प्रसन्नता वाटेल, कर्मप्रवणता वाढेल, पुरूषार्थाच्या उपासनेची प्रेरणा जागृत होईल असे या पूजेचे स्वरूप करण्याचा प्रयत्न ज्ञान प्रबोधिनीच्या पोथीत आहे. त्यामुळे पूजेचे मुख्य दैवत अशा श्रीसत्यनारायणाची षोडशोपचारे पूजा, आरती व सत्याचा महिमा सांगणाऱ्या कालोचित कथा असे या पूजेचे स्वरूप आहे. दैवी चमत्कार व दैववाद यावर भर असणारा कथाभाग गाळला आहे. अथवा त्यात कालोचित बदल केले आहेत.

धनादेश, रोख किंवा ई हस्तांतरण (cheque,cash, e-transfer) यांपैकी कोणत्याही प्रकारे संस्थेला देणगी देतांना देणगी देणाऱ्या व्यक्तीचा पॅन आवश्यक आहे.

5)  साहित्याची यादी  –

क) 1) हळद, 2) कुंकू, 3) गंध, 4) अक्षता, 5) फुले, 6) उदबत्त्या व घर, 7) फुलवाती व तूप, साध्या तूपवाती, तेल आणि समई, निराजन 8) काडेपेटी, 9) 10 सुपाऱ्या, 10) कलशासाठी आंब्याची अथवा विड्याची 10 पाने. 11) पंचामृत, 12) स्वच्छ पाणी, 13) कोमट पाणी, 14) देवतेसाठी कापसाचे वस्त्र, 15) देवतेसाठी जानवे, 16) देवतेसाठी नैवेद्य, 17) कात्री, 18) सुट्टी नाणी – 5, 19) एक नारळ

ख) 1) देव पुसण्यासाठी वस्र 2) एक तांब्या 3) दोन भांडी व दोन वाट्या 4) दोन ताम्हने 5) एक पळी 6) दोन चमचे 7) दोन ताटं 8) तीन पाट (आसने) 9) चौरंग, त्यावर घालायला वस्र 10) हात पुसण्यासाठी रुमाल 11) शक्य असल्यास शंख, घंटा, रांगोळी किंवा अन्य सुशोभने.

  ग) 1) पाव किलो तांदूळ 2) तुळशीची 125 पाने 3) रंगीत फुले 3) बाळकृष्णाची मूर्ती किंवा शाळिग्राम.

 

ज्ञा. प्र. पद्धतीने श्राद्ध

1) श्राद्धाची संकल्पना – श्राद्धाचा विधी करताना अनेकांच्या मनात आपलं काही चुकल्यास मृत व्यक्तीला सद्गती मिळणार नाही का?  असे विचार डोकावतात; पण अशी भीती अथवा शंका यांचा पगडा मनावर असणे योग्य नाही. कारण ‌‘श्रद्धया क्रियते यत् तत् श्राद्धम्‌‍|‌’ म्हणजे ‌‘श्रद्धायुक्त अंतःकरणाने केले जाणारे एक कर्म‌’ अशी श्राद्धाची व्याख्या आहे. ज्याप्रमाणे आपण देवाचे पूजन करतो त्याप्रमाणेच पितरांचे केलेले पूजन म्हणजे श्राद्ध. 

2) श्राद्धविषयक रूढी – व्यक्तीच्या मृत्यूनंतर १०, ११, १२, १३ या दिवशी श्राद्धविधी करण्याची प्रथा परंपरेने रूढ आहे. दहाव्या दिवशी नदीकाठी घाटावर हे  पारंपरिक विधी सुरू होतात. पिंडदान, पिंडाला कावळा शिवणे, सपिंडीकरण, बारा मासिक श्राद्धे या प्रकारचे विधी चार दिवसात केले जातात. त्यानंतर उदकशांतीही करण्याची पद्धत प्रचलित असल्याचे दिसते. दिवंगताच्या स्मरणार्थ दरवर्षी निधनतिथीला वर्षश्राद्ध करण्याची पद्धती रूढ आहे. तसेच भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात (पितृपंधरवडा) निधनतिथीला महालयश्राद्ध करण्याचीही पद्धती रूढ आहे. महालय श्राद्धामध्ये आपल्या कुटुंबातील सर्व दिवंगतांचे एकत्रित पूजन केले जाते तसेच ज्ञात-अज्ञात, आप्त, स्नेही यांना उद्देशूनही पूजन केले जाते. तसेच भरणी श्राद्ध करण्याची प्रथाही समाजात रूढ आहे. ज्या व्यक्तीचे निधन भरणी नक्षत्रावर झालेले असते त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ भरणी नक्षत्रावर हे श्राद्ध केले जाते. हे सर्व विधी करण्यासाठी बराच वेळ खर्च होतो. तसेच या जोडीने ब्राह्मणांना व आप्तांना भोजन दिले जाते. या सर्वांचा आर्थिक भारही बराच पडतो. यातील अनेक बाबी शास्त्रदृष्ट्या अपरिहार्य नसूनही भीतीपोटी केल्या जातात.

3) ज्ञान प्रबोधिनी पद्धतीचा श्राद्धविधी – वरील वस्तुस्थिती लक्षात घेऊन धर्मनिर्णय मंडळ व ज्ञान प्रबोधिनीने कालसुसंगत असा श्राद्धविधी विकसित केला आहे. १९३८ साली स्थापन झालेल्या धर्मनिर्णय मंडळाच्या पोथीनुसार ज्ञान प्रबोधिनीने श्राद्धाची सार्थ पोथी तयार केली आहे. प्रबोधिनी पद्धतीने श्राद्धविधी होताना तो या पोथीनुसारच केला जातो.

ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीत १० व्या दिवशीचे काकस्पर्श इ. विधी केले जात नाहीत. मृत्यूनंतर ११, १२, १३ व्या दिवसांपैकी यजमानांच्या सोयीनुसार श्राद्धविधीचा दिवस निश्चित केला जातो. या विधीसाठी अश्म्याची गरज लागत नाही. या दिवशी एकोद्दिष्ट व सपिंडीकरण हे विधी यजमानांच्या घरी केले जातात. एकोद्दिष्ट म्हणजे एका व्यक्तीला अर्थात‍् दिवंगताला उद्देशून  केलेले पिंडपूजन. दिवंगताच्या आधीच्या तीन पिढ्यांच्या पिंडांशी दिवंगताच्या पिंडाचे एकत्रीकरण म्हणजे सपिंडीकरण. दिवंगत व्यक्तीचे पूजन प्रतीकात्मक रीतीने केले जाते. भाताचे पिंड हे दिवंगत व्यक्तींचे प्रतीक. ज्याप्रमाणे देवांची पूजा केली जाते त्याप्रमाणे श्राद्धात पितरांची पूजा करतात. गंध, काजळ, लोकर, दह्याची साय इ. पितरांना अर्पण केले जाते. धूप, दीप, नैवेद्य व दक्षिणा हे उपचारही केले जातात. देवतापूजनापेक्षा पितरांच्या पूजनाचा वेगळेपणा लक्षात येण्यासाठी काळे तीळ, माक्याची पाने व पांढरी फुले वापरली जातात. त्यानंतर पितरांची प्रार्थना केली जाते. या श्राद्धविधीला अंदाजे एक ते दीड तास लागतो.

4) उदकशांती – पारंपरिक विधीमध्ये निधनानंतर चौदाव्या दिवशी उदकशांती करण्याची पद्धत दिसून येते. अशा प्रकारे उदकशांती केलीच पाहिजे असा ज्ञा.प्र. चा आग्रह नाही. तथापि प्रचलित पारंपरिक उदकशांतीला समांतर अशी ‌‘वेदपूजन‌’ पोथी ज्ञा.प्र.ने तयार केली असून, यजमानांच्या इच्छेनुसार श्राद्धानंतर वेदपूजन केले जाते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांचे प्रतीकात्मक पूजन, त्या त्या वेदातील मंत्रपठण व शेवटी यजमानांवर अभिषेक या पद्धतीने वेदपूजन केले जाते. या संबंधीचे स्वतंत्र माहितीपत्रक आहे. ते यजमानांनी घ्यावे. या विधीला साधारणपणे एक ते दीड तास लागतो.

विशेष सूचना – ज्ञा. प्र. पद्धतीने त्रिपाद/पंचक इ. शांती केल्या जात नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

(श्राद्ध व उदकशांती (वेदपूजन) हे दोन्ही विधी एकाच दिवशी एका पाठोपाठ केल्यास त्यासाठी सुमारे तीन तास वेळ लागतो.)

5) स्त्रियांचा सहभाग – श्राद्धविधीत स्त्रियांचाही सहभाग अपेक्षित आहे. स्त्रियादेखील आपल्या आप्तांचे श्राद्ध करू शकतात. पती आपल्या पतीचे किंवा मुलगी आपल्या आई-वडिलांचे श्राद्ध करू शकते.

6) श्राद्धाचा नैवेद्य – श्राद्धाच्या नैवेद्यासाठी काही विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे; परंतु प्रबोधिनीतर्फे असा आग्रह धरला जात नाही. यजमान आपल्या इच्छेनुसार नैवेद्याची योजना करू शकतात. 

7) अशौच विचार/सुतक – सामान्यपणे व्यक्तीच्या निधनानंतर तेरा दिवस सुतक पाळण्याची प्रथा दिसून येते. श्राद्धविधी व त्यानंतर उदकशांती झाल्यावर सुतक संपले असे मानले जाते. धर्म-निर्णय-मंडळाच्या पाचव्या अधिवेशनात याचा तात्त्विक दृष्टीने विचार करुन पुढीलप्रमाणे मार्गदर्शक निर्णय मांडलेला आहे. आई -वडिलांचे मुलाला व मुलाचे आई-वडिलांना, पति-पत्नीचे परस्परांना व अन्त्यक्रिया करणाऱ्या व्यक्तीला दहा दिवस सुतक असावे. अन्य मृतसन्निध असणाऱ्या एकत्र कुटुंबियांस तीन दिवस सुतक असावे. इतर नातेवाइकांस स्नानानंतर सुतक पाळण्याची गरज नाही. आधुनिक काळात बदलत्या व गतिमान जीवनशैलीमुळे इतके दिवस घरी राहून सुतक पाळणे शक्य होत नाही. त्यामुळे शोकावेग कमी झाल्यावर मानसिक स्थैर्य आल्यानंतर घरातील सदस्यांनी आपले दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू करण्यास काहीच प्रत्यावाय नाही. अन्य कामात लक्ष दिले गेले की दुःखाचा आपोआप विसर पडतो व मनाला उभारी येण्यास मदतच होते, अशी ज्ञा.प्र. ची भूमिका आहे.

8) वर्षश्राद्ध – ज्ञा. प्र. पद्धतीने दिवंगताच्या निधनतिथीला प्रतिवर्षी वर्षश्राद्ध विधी केला जातो. यामध्ये दिवंगत व्यक्ती व त्या आधीच्या दोन दिवंगत पिढ्यांचे पिंडरूपाने पूजन, प्रार्थना केली जाते. या विधीसाठी साधारणपणे अर्धा ते पाऊण तास लागतो. यानंतर उदकशांती (वेदपूजन) करणे ऐच्छिक आहे.

9) साहित्याची यादी –  क) 1) गंध 2) उदबत्त्या व घर 3) तेल, तेलवात  3) फुलवाती व तूप 4) काडेपेटी 5) विड्याची दोन पाने 6) एक सुपारी 7) एक नाणं

ख) 1) नीरांजन/समई  2) एक तांब्या 3) एक भांडं, चार-पाच वाट्या 4) दोन ताम्हन 5) एक पळी  6) दोन चमचे 7) दोन ताटं  8) दोन पाट (आसने) 9) हात पुसण्यासाठी रुमाल 10) कात्री

ग)  1) एक चमचाभर सायीचे दही 2) लोकर – पाच पाच इंचाचे ५ तुकडे 3) अर्धी वाटी तांदळाचा भात 4) अर्धी वाटी काळे तीळ 5) पांढरी फुले 6) माक्याची किंवा तुळशीची पाने 7) आठ ते दहा दर्भाची दोन जुड्या 8) काजळ 9) नैवेद्य (लाडू/खीर इ.) 10) शक्य असल्यास दिवंगत व्यक्तीचे छायाचित्र, हार, फुले इ, शक्य झाल्यास केळीचे पान किंवा दोन पत्रावळ्या.

10) धनादेश, रोख, किंवा ई हस्तांतरण (cheque,cash, e-transfer) यांपैकी कोणत्याही प्रकारे संस्थेला देणगी देताना देणगी देणाऱ्या व्यक्तीचा पॅन आवश्यक आहे.

 

उपनयन-संस्कार (मुंज)

1) संस्काराचे स्वरूप व महत्त्व – उपनयन म्हणजे बटूच्या माध्यमिक शिक्षणाचा प्रारंभ होय असे प्राचीन काळी मानले जात असे.

‌‘उप‌’ म्हणजे (गुरुंच्या) जवळ, नयन म्हणजे नेणे. उपनयनामुळे बटूचा ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश होतो. उपनयनामध्ये ब्रह्मचर्याश्रमातील व्रतांचा उपदेश केला जातो म्हणून या विधीला ‌‘व्रतबंध‌’ असेही म्हणतात. या विधीत व्रतांचे बाह्यचिह्न म्हणून मुंज नावाच्या गवताची मेखला, करदोटा बटूच्या कमरेला बांधण्यात येत असल्याने ‌‘मौंजीबंधन‌’ असेही या विधीचे नाव आहे.

बटूला द्विज (म्हणजे दुसऱ्यांदा जन्मलेला) हे  अभिधान  लाभून  वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी हा संस्कार केला जातो. हा संस्कार म्हणजे जणू त्या बटूचा दुसरा जन्मच होय.  

2) पारंपरिक उपनयनाचे स्वरूप – उपनयन संस्कारापूर्वी तीन दिवस ग्रहशांती करण्याची प्रथा आहे. तसेच घेरा करणे, मातृभोजन, मंगलाष्टके या लौकिक विधींचाही समावेश यात असतो. संस्कारामधे प्रथम संकल्प, गणपतिपूजन, पुण्याहवाचन, आदि सुरुवातीचे विधी करण्यात येतात. त्यानंतर अग्नीमध्ये आहुती देऊन बटूला यज्ञोपवीत, दण्ड, मेखला अशी ब्रह्मचर्याची बाह्यचिह्ने दिली जातात. त्यानंतर सूर्यदर्शन, अवक्षारण, हृदयालंभन असे काही विधी केले जातात. होमाचे उत्तरांग व संस्थाजप झाल्यानंतर आचार्य बटूला गायत्रीमंत्राची दीक्षा देतात. याशिवाय धारणाशक्ती हा बुद्धीचा पैलू विकसित व्हावा या उद्देशाने ‌‘मेधाजनन‌’ नावाचा विधीही या संस्काराच्या शेवटी केला जातो. भिक्षावळीचा लौकिक विधी करण्याची पद्धतीही अलीकडे रूढ आहे. प्राचीन काळापासूनच मुलांचे तसेच मुलींचेही उपनयन करण्याची प्रथा होती.

3) ज्ञान प्रबोधिनी प्रणीत उपनयन – पूर्वी उपनयनात बटूचे चौल (मुंडन) केले जाई. त्यानंतर सर्व अध्ययन पूर्ण झाल्यानंतरच केशकर्तनाची प्रथा होती. बटूचे लक्ष स्वतःच्या रूपाकडे लागून राहिले तर त्याचा अभ्यासावर परिणाम होण्याची शक्यता असे त्यामुळे चौलाची प्रथा रूढ झाली. प्राचीन काळी आठव्या वर्षी बटू उपनयनानंतर गुरूगृही जात असे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या घरी परत येईपर्यंत त्याने तारूण्यात प्रवेश केलेला असे, त्यामुळे त्या वयात आईच्या हातून जेवणे औचित्याचे ठरत नसे. त्यामुळे उपनयन संस्कारात मातृभोजनाच्या लौकिक विधीची भर पडली, ज्यामध्ये बटूची आई व अन्य स्त्रिया बटूस घास भरवितात. प्राचीन काळी मातृभोजनाचे वेळी आठ बटूंना भोजनासाठी आमंत्रित केले जात असे. त्यांना ‌‘अष्टवर्ग‌’ म्हणत. उपनयनानंतर बटू ज्या गुरूकुलात जात असे त्या गुरूकुलातीलच हे बटू असत. उपनीत बटूची त्याच्या सहाध्यायांशी यानिमित्ताने ओळख होत असे. गुरूगृही राहताना बटूला घरोघरी जाऊन भिक्षा मागावी लागत असे. मिळालेली भिक्षा गुरूंना अर्पण करावी लागे. प्रत्यक्षात भिक्षा मागताना बटूच्या मनात लज्जेची भावना उत्पन्न होऊ नये यासाठी उपनयनाचे वेळी बटूने आप्तांकडून भिक्षा मागणे अभिप्रेत असे. यावेळी बटूच्या भिक्षेत पौष्टिक खाद्यपदार्थ घातले जात असत. गुरूगृहापर्यंतच्या प्रवासात बटूला हा खाऊ उपयोगी पडत असे. तात्पर्य मातृभोजन, भिक्षावळ या सारखे हौसेचे उपविधी शास्त्राचा भाग नसून रूढींचा भाग आहेत. तसेच सध्या गुरूकुलात जाण्याचा प्रश्न नसल्यामुळे आधुनिक काळात कालबाह्य झाले आहेत. असे उपविधी गाळून धर्मनिर्णय मंडळाच्या पोथीप्रमाणे सर्व जाती-जमातींच्या ८ ते १२ वयोगटातील मुला-मुलींसाठी उपनयन संस्काराची मांडणी ज्ञान प्रबोधिनीमध्ये केलेली आहे.

गणेशपूजन, पुण्याहवाचन, व्रतबंधाचे महत्त्व, बटूच्या व्यक्तिमत्त्व-विकासाला उपयुक्त अशा पैलूंचे सोप्या भाषेत विवेचन, व्रतचिह्नधारण, दंडधारण, सूर्यदर्शन, व्रतस्मरण, होम, मेधाजनन व गायत्रीमंत्राची दीक्षा असे या संस्काराचे स्वरूप असून मंगलाष्टकांनी विधीची सांगता होते. हा संस्कार केवळ व्रतार्थी पुत्र/कन्या व वडील यांच्यापुरताच मर्यादित नसून आईनेही यावेळी उपस्थित असणे अपेक्षित आहे. उपस्थित सर्व मंडळींनीही शांत बसून या संस्काराचे महत्त्व समजून घेणे स्वागतार्ह होईल.

हा संस्कार झाल्यावर तेरा ते सोळा या वयात ज्ञान प्रबोधिनीच्या सामूहिक विद्याव्रत संस्कारात सहभागी होणे उपयुक्त ठरेल.

4) संस्थेची देणगी – सदर संस्कारासाठी ज्ञा. प्र. ची देणगी रू. १०००/-  आहे.

धनादेश, रोख, किंवा ई हस्तांतरण (cheque,cash, e-transfer) यापैकी कोणत्याही प्रकारे संस्थेला देणगी देतांना देणगी देणाऱ्या व्यक्तीचा पॅन आवश्यक आहे.

5) साहित्याची यादी – क) 1) हळद 2) कुंकू 3) अष्टगंध 4) अर्धी वाटी अक्षता, 5) गाईचे साजूक तूप-१/४ किलो 6) निरांजन-वात-तूप, 7) उदबत्ती, 8) उदबत्ती घर 9) काडेपेटी 10) तीन समिधा जुडी 11) एक डबी मोठी कापूर वडी 12) पाच सुपाऱ्या 13) सुट्टे पैसे 14) फुले

ख) 1) एक चौरंग 2) दोन ताटे  3) पाच  वाट्या 4) चार पाट /आसने बसण्यासाठी 5) दोन ताम्हण 6) एक तांब्याचा कलश 7) पळी-भांडे 8) एक दंड-काठी 9) चौरंगावर घालण्यासाठी वस्त्र, 10) हात पुसण्यासाठी रुमाल 11) कात्री 12) दहा विड्याची पाने 13) आंब्याचा डहाळा 14) बटूसाठी एक हार 15) होमकुंड 16) कोरडी वाळू/माती 17) दोन किंवा चार विटा 18) एक जानवी जोड 19) मुंडावळी

ग) 1) देवतेसाठी नैवेद्य, 2) गुळ खोबरं 3) एक नारळ

 

‘वास्तुशांती‌’

1) वास्तुशांतीचे महत्त्व – प्रत्येक व्यक्तीचे आपल्या ‌‘घरा‌’शी एक जिव्हाळ्याचे नाते असते. कोणत्याही व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनाचे अविभाज्य अंग म्हणजे ‌‘घर.‌’ नवीन वास्तूत प्रवेश करताना कोणालाही आनंद होणं स्वाभाविकच आहे. या आनंदात भर घालण्यासाठी आप्त, स्नेही यांना नव्या घरी आमंत्रित केले जाते. पण वास्तुशांती हे केवळ लोकांनी एकत्र येण्याचे एक निमित्त नसून तो एक  ‌‘संस्कार‌’ आहे. त्यामुळे केवळ वास्तुशांती होणे महत्त्वाचे नसून ती समजून-उमजून होणे अधिक महत्त्वाचे आहे. कुटुंब व्यवस्थेचे अधिष्ठान जे घर, तिथे पवित्र आणि शुभ संकल्पांचे सिंचन होणे औचित्याचे आहे.

सर्व चराचरात भरून राहिलेली परमेश्वरी शक्ती वास्तुपुरूषाच्या रूपाने आपल्या घरातही असावी या भावनेने वास्तुशांती केली जाते. वास्तुनिर्मिती होत असताना विविध कृमी, कीटक, प्राणी, वनस्पती यांची नकळत हत्या होत असते. प्रत्येक स्थानावर काही सुष्ट-दुष्ट शक्तींचे वास्तव्य असते अशी आपल्याकडे समजूत आहे. ज्या शक्ती अशुभ, अहितकारी आहेत त्यांनी वास्तु सोडून जावे तसेच शुभंकर, हितकारी शक्तींनी वास्तुत वास्तव्य करावे यासाठी वास्तुशांती केली जाते.

2) वास्तुशांतीचा पारंपरिक विधी – नांदी-श्राद्ध, ६४ मातृकांचे पूजन, वास्तोष्पतीला उद्देशून २७ आवर्तनांचे १०८ स्वाहाकार, उंबरठा-पूजन, बलिदान, वास्तुप्रतिमेचा निक्षेप इ. विधी प्रचलित पारंपरिक पद्धतीत केले जातात. प्रचलित पद्धतीत चरू (म्हणजे दुधात शिजविलेला भात) असे अन्न-पदार्थ आहुतीसाठी वापरले जातात.

3) प्रबोधिनी प्रणीत वास्तुशांती – प्रबोधिनीची वास्तुशांती मात्र प्रचलित पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे. थोड्या वेळात परंतु आवश्यक विधींची पूर्ती करणारा हा संस्कार आहे. गृहप्रवेश, वरुण-वास्तुपुरूष यांचे पूजन, वेदातील मंत्रांच्या उच्चारणासह प्रधान होम, मराठीमधील गद्य प्रार्थना, वास्तुप्रतिमेचा निक्षेप व गायत्री मंत्राने सांगता असा हा आटोपशीर संस्कार आहे. प्रबोधिनीच्या पद्धतीत भात इ. अन्नपदार्थाची आहुती नाही. यजमानांच्या आर्र्थिक क्षमतेप्रमाणे व इच्छेनुसार त्यांनी  नैवेद्य ठरवावा असे प्रबोधिनीमार्फत सांगितले जाते. समाजातील सर्वच स्तरातील व्यक्तींना हा संस्कार करणे सहज शक्य व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेवूनच ही पोथी तयार केली आहे.

‌‘घर‌’ या संकल्पनेला सामाजिक संदर्भही आहे. घर हे केवळ त्या संबंधित कुटुंबाचेच नव्हे तर समाजाचेही आधारकेंद्र असावे अशी अपेक्षा आहे. कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींना घराचा आधार असतोच. त्याप्रमाणे ज्यांना घर नाही, आधार नाही अशांनाही यथाशक्य आश्रय देणे हेही चांगले कार्य होय. पशु-पक्ष्यांनाही घरातून अन्न-पाणी मिळणे; त्यांच्या रक्षणासाठी त्यांना प्रेमाने आश्रय देणे हेही तेथील व्यक्तीच्या मनाचे मोठेपणच दाखवते. ज्ञान प्रबोधिनीच्या पोथीमध्ये घराच्या या व्यापक संदर्भाकडेही लक्ष वेधले आहे.

घराच्या वास्तुशांतीबरोबरच कार्यालय, कारखाने इ. ची वास्तुशांती तसेच भूमीपूजन करण्याचीही सोय ज्ञा.प्र.मध्ये उपलब्ध आहे.

4) संस्थेला देणगी –  सदर संस्कारासाठी ज्ञा.प्र. ची देणगी रु. १५००/- आहे.

5) साहित्य –  क) 1) हळद 2) कुंकू 3) अष्टगंध 4) अक्षता 5) रंगीत फुले 6) उदबत्या व घर 7) भिजविलेल्या फुलवाती व तूप 8) काडेपेटी 9) पाच सुपाऱ्या 10) कलशावर ठेण्यासाठी आंब्याची अथवा विड्याची दहा पाने 11) एक नारळ 12) एक छोटी वाटी पंचामृत 13) पाच सुटी नाणी.

ख) 1) नीरांजन 2) एक तांब्या 3) दोन भांडी, दोन वाट्या 4) एक ताम्हन  5) एक पळी 6) दोन चमचे 7) दोन ताट 8) चार पाट (आसने) 9) चौरंग, चौरंगावर घालायला वस्त्र  10) हात पुसण्यासाठी रुमाल 11) रांगोळी/अन्य सुशोभने 12) देवतेसाठी नैवेद्य

ग) 1) अडीचशे ग्रॅम तांदूळ 2) वास्तुपुरुष प्रतिमा (सोन्याची/अन्य धातूची) 3) शक्य असल्यास दारासाठी तोरण 4) कात्री

घ) 1) शक्य असल्यास 4 विटा 2) होमकुंड (किंवा घमेले, कोरडी वाळू) दोन विटा 3) २५/३० समिधांच्या तीन जुड्या 4) दोन कोरड्या गोवऱ्या 5) बंब फोड 6) पाव किलो शुद्ध तूप 7) कापूर (मोठ्या वड्यांची मोठी डबी.)

 

‘वेद पूजन‌’ (उदकशांती)

1) उदकशांतीचा अर्थ – प्रचलित उदकशांतीला समांतर असा हा वेदपूजनाचा विधी ज्ञान प्रबोधिनीने रचला आहे. ‌‘उदक‌’ म्हणजे पाणी हे स्वभावतःच शांती व तृप्ती देते. त्यामुळे मंत्रपठनाबरोबर अभिषेकासाठी पाण्याचा उपयोग ज्यात केला जातो असे ‌‘शांतिकर्म‌’ म्हणजे उदकशांती.

2) पारंपरिक उदकशांतीचा विधी – शांती हा शब्द ‌‘शम्‌‍‌’ धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ वाईट प्रभाव हटविणे, शमन करणे, विधायक शक्तींना प्रसन्न वा संतुष्ट करणे असा होतो. पारंपरिक पद्धतीच्या विविध शांती प्रचलित आहेत. निसर्गाचा प्रकोप किंवा ग्रहांची पीडा दूर करणे इ. हेतूने विविध शांती केल्या जातात. अशुभ चिन्हे व अशुभ घटना यांच्यासाठी करावयाच्या विस्तृत शांतीही सांगितल्या आहेत. अशुभाचा किंवा अनिष्टाचा परिहार व इष्टाची प्राप्ती या दोन विचारांमधून शांतीची पारंपरिक कल्पना प्रसृत झाली व त्यातूनच विविध प्रकारच्या शांती उदयाला आल्या असाव्यात. सध्याच्या काळात या दोन कल्पनांना आधुनिक विज्ञानाचा अथवा बुद्धिप्रामाण्याचा आधार देता येत नाही म्हणजे शांती केल्यामुळे अनिष्टाचा परिहार होतो किंवा इष्टाची प्राप्ती होते अशी शांतीसंबंधीची कल्पना विवादास्पद ठरते. मग शांतीचा विधी का करायचा? तर काही अनिष्ट गोष्टी घडण्यापूर्वी अथवा घडल्यानंतर त्यांना तोंड देण्यासाठी मानसिक स्थैर्य व धैर्य लाभावे या हेतूने शांतिकर्म करायला हरकत नाही.

भारतीय संस्कृतिकोश (खंड पहिला, पृष्ठ ६४४) यामध्ये दिलेल्या माहितीनुसार पारंपरिक उदकशांतीच्या विधीमध्ये संकल्प करून चार ब्राह्मण चार दिशांना बसवितात. मध्यभागी धान्याची वेदी करून त्यावर सुवर्णाने रेषा काढतात. एक कलश घेऊन तो प्रथम धूपाच्या धुराने भरून घेतात. मग तो कलश जलाने भरून त्यात गंध, फुले, दूर्वा व फळे घालतात. मग त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात षडंगसहित ब्रह्मा देवतेची स्थापना करतात. त्यानंतर रक्षोघ्नसूक्त, आयुष्यसूक्त, राष्ट्रभृत होम मंत्र, पावमानी इ. मंत्रांचा पाठ करतात. शेवटी ओंकाराचा उच्चार करून तो कुंभ सगळे मिळून उचलतात व त्यातील जलाने यजमान व त्याचे कुटुंबीय यांना अभिषेक करतात.

3) ज्ञान प्रबोधिनीप्रणीत वेदपूजन (उदकशांती) – काही विशिष्ट कृती व मंत्र यांचा समावेश शांतिविधींमध्ये असतो. त्या मंत्रांच्या अर्थाचे मनन केल्याचा परिणाम म्हणून मानसिक स्थैर्य व धैर्य वाढते. अशुभाचा परिहार आणि इष्टाची प्राप्ती या फलापेक्षा मानसिक स्थैर्य व धैर्य मिळविण्यासाठी, अर्थ समजून शांतीचा विधी करणे ही अधिक बुद्धिनिष्ठ कल्पना आहे. त्यामुळे ज्ञान प्रबोधिनीच्या विधीत त्यावर भर आहे.

वेदांमधील मंत्रांचे पठण हा पारंपरिक उदकशांतीच्या विधीतील गाभ्याचा भाग कायम ठेवून प्रबोधिनी-प्रणीत वेदपूजन-पोथीची निर्मिती केली आहे. अज्ञानातून अशांतीचा जन्म होत असल्याने शांतिलाभासाठी ज्ञानप्राप्तीचे साधन असलेल्या वेदांचे पूजन व सार्थ मंत्रपठण या विधीत प्रामुख्याने आहे. त्यामुळे या विधीला उदकशांती या नावाऐवजी ‌‘वेदपूजन‌’ असे नाव दिले आहे. वेद म्हणजे ज्ञान हेच ब्रह्म म्हणजे परमोच्च दैवत असलेल्या वरुणाचा कलश स्थापन केला जातो. चारही वेदांचे पंचोपचारे पूजन केले जाते व पूजनानंतर त्या त्या वेदातील निवडक मंत्रांचे सार्थ पठण केले जाते. शेवटी वयाने ज्येष्ठ व्यक्तीकडून किंवा पुरोहितांकडून यजमानांवर कलशातील जलाचा अभिषेक केला जातो.

समाजातील सर्वांना वेदांचा परिचय व्हावा, वेदांच्या रचनेची ओळख व्हावी या उद्देशाने उपलब्ध असल्यास प्रत्यक्ष वेदग्रंथ (प्रचलित प्रकाशित आवृत्ती) ठेवले जातात. मात्र मूळ ग्रंथ खराब होऊ नयेत म्हणून चौरंगावर चार वेदांचे प्रतीक असलेल्या चार सुपाऱ्या ठेवून त्यांचे पूजन केले जाते. (हा भाग ऐच्छिक आहे.)

विशेष सूचना – ज्ञा. प्र. पद्धतीने त्रिपाद/पंचक इ. शांती केल्या जात नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

4) संस्थेला देणगी –  सदर संस्कारासाठी ज्ञा.प्र. ची देणगी रु. ५००/- आहे.

धनादेश, रोख, किंवा ई हस्तांतरण (cheque,cash, e-transfer) यापैकी कोणत्याही प्रकारे संस्थेला देणगी देतांना देणगी देणाऱ्या व्यक्तीचा पॅन आवश्यक आहे.

5) साहित्य –  क) 1) हळद 2) कुंकू 3) अष्टगंध 4) अक्षता 5) रंगीत फुले 6) उदबत्या व घर 7) भिजविलेल्या फुलवाती व तूप 8) काडेपेटी 9) दहा सुपाऱ्या 10) कलशावर ठेण्यासाठी आंब्याची अथवा विड्याची दहा पाने  11) एक नारळ  12) देवतेसाठी नैवेद्य  13) पाच सुटी नाणी 14) पाच आंब्याची किंवा विड्याची पाने.

ख) 1) निरांजन 2) एक तांब्या 3) दोन भांडी, सहा वाट्या 4) एक ताम्हन  5) एक पळी 6) दोन चमचे 7) एक ताट 8) दोन पाट (आसने) 9) चौरंग, चौरंगावर घालायला वस्त्र  10) हात पुसण्यासाठी रुमाल 11) रांगोळी/अन्य सुशोभने 12) कात्री

ग) 1) अडीचशे ग्रॅम तांदूळ

 

‘विवाह संस्कार‌’

1) विवाह-संस्काराचे महत्त्व – आप्त, इष्टमित्र आणि अग्नी यांच्या साक्षीने ज्यामुळे विवाहेच्छु पुरुष आणि उपवर कन्या अशा दोन व्यक्तेी पति-पत्नी  म्हणून संबद्ध होतात, त्या संस्काराला विवाह असे म्हणतात.

‌‘विवाह‌’ ही मानव-समाजातील एक महत्त्वाची संस्था आहे.सोळा संस्कारांमध्ये विवाह ही संस्था केंद्रस्थानी असल्याचे दिसते. विवाहामुळे स्त्री व पुरुष या दोघांमधील संबंधांचे नियंत्रण होते. कुटुंबसंस्था ही विवाहसंस्थेवर अवलंबून असल्याने विवाह संस्कारावर सामाजिक नीतीच्या कल्पनांचा प्रभाव पडल्याचे आढळते.

2) विवाहाचा पारंपरिक विधी – प्रचलित विवाहपद्धतीत विवाहापूर्वी तीन दिवस ग्रहमख करून ग्रहांची शांती व विवाहास अनुकूलता प्राप्त केली जाते. विवाहाच्या आदल्या दिवशी सीमांतपूजन केले जाते. यानंतर दुसऱ्या दिवशी मंगलाष्टके म्हणून झाल्यावर वधू-वर एकमेकांना पुष्पमाला घालतात. यानंतर कन्यादान, मंगलसूत्रबंधन, विवाह-होम हे विधी होतात. या नंतरचा मुख्य विधी म्हणजे सप्तपदी. त्यानंतर अश्मारोहण, अरुन्धती-सप्तर्षि-ध्रुवदर्शन, वधूवरांवर अभिषेक इ. होऊन  विवाहाचे विधी पूर्ण होतात. गाठ बांधणे, कान पिळी, कंकण बांधणे, झाल इ. लौकिक विधी विवाहाच्या प्रसंगी केले जातात. सारांश, प्रचलित विवाहविधीमध्ये  गृह्यसूत्रोक्त विधींसह केवळ हौसेचा भाग म्हणून लौकिक विधी ही केले जातात. त्यामुळे विधींची संख्या व लागणारा वेळ दोन्हीत वाढ होते.

3) प्रबोधिनी प्रणीत विवाहविधी – प्रचलित पद्धतीत केवळ पुरोहित मंत्र म्हणतात. वर-वधू व संबंधित आप्त केवळ सांगितलेली कृती करतात. परंतु त्यामुळे संस्काराचा मूळ आशय दुर्लक्षिला जातो. वास्तविक विवाहासारख्या हृद्य संस्काराचा हेतू, अपेक्षा वधू-वरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे अशी प्रचिती वधू-वरांना यावी, संस्काराचा अर्थ समजून तो केला जावा या हेतूने ज्ञानप्रबोधिनीने विवाहाची पोथी तयार केली. धर्मनिर्णय मंडळाच्या विद्वज्जनांनी केलेल्या पोथीवरूनच ही पोथी संपादित केलेली आहे.

       प्रबोधिनी पद्धतीच्या विवाहाचा प्रारंभ गणेशपूजन व संकल्पाने केला जातो. त्यानंतर पुण्याहवाचन, कन्यादान केले जाते. काही वेळा काही व्यक्तींना कन्यादान ही संकल्पना रुचत नाही. अशा वेळी केला जाणारा कन्यादानाला पर्याय असा स्वयंवराचा विधी या पोथीत दिला आहे. यानंतर अक्षतारोपण, मंगलसूत्रबंधन, पाणिग्रहण, विवाहहोम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, होमाचे उत्तरांग हे विधी केले जातात. यानंतर संस्थाजप व अभिषेक करून कर्मसमाप्ती होते. नंतर मंगलाष्टके होऊन विवाह-संस्कार पूर्ण होतो.

4) कागदपत्रांची पूर्तता –

4.1) प्रथम विवाह, पुनर्विवाह, आंतरधर्मीय विवाह यापैकी कोणताही विवाह असल्यास त्यापूर्वी अनिवार्यपणे विवाहाचा ज्ञा. प्र. चा नोंदणी अर्ज भरणे आवश्यक आहे. वधू-वर वा त्यांचे पालक यांपैकी कोणीही देशाबाहेर असले तरी सदर नोंदणीपत्रक ईमेलद्वारे पाठविण्याची सोय उपलब्ध आहे त्याचा अवश्य लाभ घ्यावा. सदर नोंदणीपत्रक संपूर्ण तपशीलासह भरून मगच पौराहित्य कार्यालयात आणून द्यावे.

4.2) पुनर्विवाह असल्यास संबंधित कायदेशीर कागदपत्रांची सत्यप्रत नोंदणीपत्रकासह जोडणे आवश्यक आहे.

4.3) आंतरधर्मीय विवाह असल्यास अहिंदू व्यक्तिने विवाहापूर्वी सदर नोंदणीपत्रकाच्या जोडीने आपण ‌‘धर्मबदल करणार नसल्याबद्दलचे‌’ कायदेशीर प्रतिज्ञापत्र सादर करावे. हिंदूकरण करण्याची इच्छा असल्यास संस्काराची व्यवस्था ज्ञा.प्र. तर्फे उपलब्ध आहे.

4.4) विवाह विधीपूर्वी नोंदणी पद्धतीने विवाह झाला असल्यास त्याच्या प्रमाणपत्राची प्रत अर्जासह जोडणे आवश्यक आहे.

5) संस्थेला देणगी – सदर संस्कारासाठी ज्ञा.प्र. ची देणगी रु. ३०००/- आहे.

धनादेश, रोख, किंवा ई हस्तांतरण (cheque,cash, e-transfer) यापैकी कोणत्याही प्रकारे संस्थेला देणगी देताना देणगी देणाऱ्या व्यक्तीचा पॅन आवश्यक आहे.

6) साहित्य – क) 1) हळद 2) कुंकू 3) गंध 4) अक्षता 5) फुले 6) उदबत्या व घर 7) फुलवाती व तूप 8) काडेपेटी 9) दहा सुपाऱ्या 10) कलशावर ठेवण्यासाठी आंब्याची अथवा विड्याची वीस पाने 11) दोन नारळ 12) साध्या तेलवाती, अर्धी वाटी तेल 13) पाव किलो तांदूळ 14) सुट्टी नाणी पाच

ख) 1) दोन नीरांजने 2) दोन तांबे 3) दोन भांडी, आठ वाट्या 4) दोन ताम्हने 5) दोन पळ्या 6) लांब दांड्याचे दोन चमचे 7) तूपासाठी भांडे 8) तीन ताटे 9) आठ पाट (आसने) 10) चौरंग 11) हात पुसण्यासाठी दोन-तीन रुमाल 12) रांगोळी/अन्य सुशोभने 13) कात्री.

ग) 1) एक वाटी पंचामृत 2) शंभर  ग्रॅम साळीच्या लाह्या 3) दोन मुंडावळ्या 4) दोन मोठे  हार 5) सहाण 6) मंगळसूत्र 8) एक दर्भ जुडी 9) एक शाल 10) रांगोळी.

घ) 1) शक्य असल्यास वेदीसाठी विटा 2) होमकुंड (किंवा घमेले, माती) व दोन विटा 3) २५/३० समिधांच्या तीन  जुड्या 4) बंबफोड, एक गोवरी (शुभा)  5) शुद्ध तूप (पाव किलो) 6) कापूर (एक मोठी डबी), आंतरपाट