प्रस्तावना
भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यानुसार शिक्षण द्यायचे असेल तर ऋषी-मुनी आणि संत यांच्या तत्वज्ञानाची आणि जीवनाची आठवण सतत राहिली पाहिजे, या दृष्टीने १९६५ साली ज्ञान प्रबोधिनीमध्ये वर्षारंभ दिनाच्या उपासनेची सुरुवात करण्यात आली. या उपासनेमध्ये आधी सरस्वती-स्तवन होते. मग ईशावास्योपनिषद आणि कठोपनिषदातील काही श्लोक होते. त्यानंतर गुरुवंदना आणि गुरुशिष्य संबंधांविषयी श्लोक होते. त्यानंतर व्यसनांपासून दूर राहण्यासंबंधी आणि ध्येयनिष्ठेविषयी सूचना करणारे श्लोक होते, मग प्रत्यक्ष ध्येयाचा उच्चार व त्यासाठी नियमांचे पालन याविषयीचे श्लोक व अभंग होते. शेवटी हा सर्व आशय मराठीतील गद्य प्रार्थनेमध्ये मांडला होता. या वर्षारंभ दिन उपासनेचा शेवट गायत्री मंत्राने व्हायचा.
वर्षारंभ उपासनेची ही पोथी तयार केली तेव्हा मुख्यतः पुणे शहरातील इयत्ता ८वी ते ११वी चे विद्यार्थी ज्ञान प्रबोधिनीत शिकत होते. त्यानंतर गेल्या ५० वर्षात ज्ञान प्रबोधिनीचा विस्तार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झाला आहे. विद्यार्थ्यांचा वयोगटही वेगवेगळ्या ठिकाणी वय वर्षे साडेतीन पासून वयाच्या एकवीस-बावीस वर्षापर्यंत विस्तारला आहे. शालेय वयोगटाच्या शिक्षणाबरोबरच संशोधन, ग्रामविकसन, प्रशिक्षण, आरोग्य, संघटन, समाजप्रबोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक प्रौढ स्त्री-पुरुष सदस्यही ज्ञान प्रबोधिनीमध्ये मनुष्यघडणीचे आयुष्यभर चालणारे सहज शिक्षण घेत आहेत.
या सर्वांच्याच शिक्षणाचा पाया भारतीय अध्यात्मात असला पाहिजे अशी ज्ञान प्रबोधिनीची भूमिका आहे. १९६५ साली तयार केलेली पोथी श्रावणी या प्राचीन संस्काराचे पुनर्रचित रूप होते, ज्यांचे उपनयन झाले आहे, त्यांना आयुष्यभर विद्याध्ययन करण्याच्या व्रताचे दरवर्षी स्मरण व्हावे म्हणून श्रावणी या संस्काराची योजना होती. ज्ञान प्रबोधिनीमध्ये राष्ट्रघडणीच्या ध्येयाचे वार्षिक स्मरण आणि त्या ध्येयाच्या दिशेने पुढील वर्षात काही पाऊले पुढे जाण्याचा प्रकट व मनोमन आणि वैयक्तिक व सामूहिक संकल्प करण्याचा दिवस म्हणून वर्षारंभ उपासनेची योजना केलेली असते.
विविध वयोगट आणि विविध प्रकारची कामे करणारे प्रौढ सदस्य यांच्या गरजा लक्षात घेऊन वर्षारंभ उपासनेच्या या तिसऱ्या आवृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. ज्ञान प्रबोधिनीमध्ये उपनयन संस्काराची पुनर्रचित पोथी विद्याव्रत संस्कार या नावाने तयार केलेली आहे. हा विद्याव्रत संस्कार साधारणपणे इ. ८वी तील सर्व जाती-धर्मांच्या मुला-मुलींसाठी करता येतो. पुनर्रचित वर्षारंभ उपासनेमध्ये विद्याव्रत संस्कार झालेल्या आणि शालेय, महाविद्यालयीन, व विद्यापीठातील शिक्षण चालू असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्षारंभ उपासनेची एक संहिता (पोथी) केली आहे. शाळा, महाविद्यालयांमधले शिक्षण संपलेल्या व विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या प्रौढ सदस्यांसाठी वर्षारंभ उपासनेची स्वतंत्र संहिता (पोथी) केलेली आहे. या दोन्ही उपासनांचा शेवट गायत्री मंत्राने होतो.
विद्याव्रत संस्कार न झालेल्या इ. ५वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्षारंभ उपासनेची तिसरी स्वतंत्र संहिता (पोथी) केली आहे. या उपासनेचा शेवट गायत्री मंत्राच्या ऐवजी “चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम्” या शिवमंत्राच्या उच्चारणाने होतो.
पन्नास वर्षांपूर्वी तयार केलेल्या वर्षारंभ उपासनेच्या पोथीमध्ये प्रत्येक संस्कृत मंत्र दोन वेळा म्हटला जायचा. वर्षारंभ उपासनेच्या तीनही संहितांमध्ये सर्व मंत्र श्लोक, ओव्या किंवा अभंग एक-एकदाच घेतलेले आहेत. जुन्या संहितेपेक्षा नवीन संहितांमध्ये मराठी ओव्या किंवा श्लोक जास्त संख्येने घेतले आहेत. उपासना अधिक अर्थवाही व्हायला त्याचा उपयोग होईल असे वाटते.
ग्रामीण भागात तसेच इंग्रजी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी या पोथ्यांचा वापर करताना सर्व श्लोकांखाली दिलेला प्रमाण मराठी भाषेतला अर्थ कदाचित अध्वर्यूंना अधिक सोप्या भाषेत सांगायला लागेल. त्या वेळी त्यांनी छापील मजकूर न वाचता स्वतःच्या शब्दात अर्थ सांगण्याचे स्वातंत्र्य जरूर घ्यावे. तथापि, थोडा सराव करून घेतला तर ग्रामीण भागातील मुलेही संस्कृत मंत्र म्हणू शकतात असा अनुभव आहे. त्यामुळे संस्कृत मंत्रात शक्यतो बदल करू नये.
प्रौढ सदस्यांसाठी केलेल्या पोथीमध्ये दिलेली गद्य प्रार्थना प्रबोधिनीच्या कोणत्याही विभागात काम करणाऱ्या सदस्यांना म्हणता येईल अशा समावेशक आशयाची आहे. त्याशिवाय विभागानुसार त्यांना उचित अशा आशयाची एखाद्या परिच्छेदाची भर त्या त्या विभागाने घालण्यास हरकत नाही. प्रबोधिनीशिवाय अन्य एखाद्या संस्था-संघटनेमध्येही गद्य प्रार्थनेत किरकोळ बदल करून वर्षारंभाची ही पोथी वापरता येईल. कोणत्याही संघटनेमध्ये ही पोथी वापरून त्यांनी आपल्या ध्येयाचे वार्षिक स्मरण केल्यास ते भारतीय परंपरेला अनुसरून होईल. सर्वच सामाजिक व सार्वजनिक कामे या पोथीतल्या चिंतनानुसार आध्यात्मिक पायावर दृढ होत गेली तर राष्ट्रघडणीला अनुकूल असे बदल सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या मनोभूमिकेत होऊ शकतील असा विश्वास वाटतो.
गिरीश श्री. बापट
************************************************************************************************************
प्रस्तावना (पहिली आवृत्ती)
वेद नि ऋषी यांची श्रीमंत परंपरा आपल्याला लाभली आहे. सहज प्रतीत होणाऱ्या द्वैताच्या पलीकडच्या अद्वैताचे दर्शन घ्यावे ही आमच्या तत्त्वज्ञानाची सांगी आहे. ज्ञान आणि विज्ञान, अध्यात्मविद्या नि भौतिकविद्या यांचा समतोल राखणे नि अभ्युदय-निःश्रेयसाची चरमसीमा गाठणे हा व्यक्तिजीवनाचा परमोच्च बिंदु आहे. उन्नत व्यक्तिजीवन आणि उन्नत राष्ट्रजीवन यातील द्वैत पुसले जाऊन तेथे समभाव निर्माण व्हावा हे आम्हाला साध्य करावयाचे आहे. त्यासाठी शिक्षण ! स्वामी विवेकानंद म्हणत असत, “Education is the manifestation of perfection already in man, and religion is the manifestation of Divinity already in man.” “शिक्षण म्हणजे काय? मानवात मुळातच असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटन करणे म्हणजे शिक्षण; आणि धर्म म्हणजे काय? तर मानवात मुळातच असलेल्या ईश्वरी तत्त्वाचे प्रकटन करणे म्हणजे धर्म !”
निराळ्या शब्दात आमचे ध्येय ‘धर्मसंस्थापना’ करणे हे आहे. स्वतःच्या हृदयातील देव जागृत करणे आणि त्याबरोबर इतर बांधवांच्या हृदयातील परमेश्वर जागृत करणे याचे नाव ‘धर्मसंस्थापना !’ ही धर्मसंस्थापना करणे हे आमचे परंपरागत राष्ट्रीय ध्येय आहे.
या दृष्टीने विद्योपासनेला तपस्येचे पावित्र्य यावे, विद्यारम्भास सुसंस्कारांचे सामर्थ्य यावे, विद्यार्थ्याला नचिकेत्याची निष्ठा प्राप्त व्हावी नि विद्यादान करणाऱ्याला वेदव्यासांची विशाल दृष्टी लाभावी आणि यातून व्यक्ती, समष्टी आणि परमेष्टी यांचे अद्वैत प्रत्ययास यावे यासाठी ज्ञान प्रबोधिनीत वर्षारम्भाच्या अथवा श्रावणीच्या परंपरेचा स्वीकार करण्यात आला आहे.
वर्षारंभ उपासना
(विद्याव्रतानंतर औपचारिक शिक्षण चालू असेपर्यंत).
अध्वर्यू – हरिः ॐ
उपासक – हरिः ॐ
अध्वर्यू – ॐ
उपासक – ॐ
अध्वर्यू – ॐ
उपासक – ॐ
अध्वर्यू – आज वर्षारंभ समारंभ आहे. जी परब्रह्म शक्ती सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टीमध्ये आहे तिला नमस्कार करून उपासनेला प्रारंभ करू या.
अध्वर्यू आणि पाठोपाठ उपासक –
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.२०)
जी देवी भूतमात्रात बुद्धिरूपात राहते।
नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः ।।
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.३२)
जी देवी भूतमात्रात शक्तिरूपात राहते।
नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः ।।
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै। नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.५६)
जी देवी भूतमात्रात लक्ष्मीरूपात राहते।
नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः ।।
चितिरूपेण या कृत्स्नम् एतद् व्याप्य स्थिता जगत् ।
नमस्तस्यै नमस्तस्यै। नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.७८)
विश्वाला व्यापुनी पूर्ण। जी राहे दिव्य चेतना।
नमस्कार तिला अमुचा नमस्कार नमोनमः ।।
अध्वर्यू – बुद्धी, शक्ती आणि लक्ष्मी तिन्ही वाढवण्यासाठी ज्ञानार्जन करायचे असते. म्हणजेच शिकायचे असते. असे ज्ञानार्जन करताना आपण विद्येची उपासना का करायची? हे आपले ध्येय निश्चितं झाले असले पाहिजे. पुरातन काळापासून विद्येच्या उपासनेची अखेर कुठे व्हावी याची प्रार्थना ऋषींनी केलेली आहे.
अध्वर्यू आणि विद्यार्थी –
असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ।।
(बृहदारण्यक उपनिषद १.३.२८)
अध्वर्यू – आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन जा; अंधकारातून प्रकाशात घेऊन जा. मृत्यूतून अमृतत्वात घेऊन जा.
अशा श्रेष्ठ उद्दिष्टांसाठी विद्येची उपासना करायची झाली, तर त्यासाठी काही व्रते आपल्याला पाळावी लागतील. उत्तम निरोगी आयुष्य ज्ञान, भक्ती आणि कृतिशीलता यांनी समृद्ध झालेले जीवन आणि समाजामध्ये आपली कीर्ती पसरायची असेल तर त्यासाठी छांदोग्य उपनिषदामध्ये पुढील व्रते सांगितली आहेत.
अध्वर्यू व उपासक – महामनाः स्यात् तद् व्रतम् । (छांदोग्य २.११.२)
अध्वर्यू – मोठ्या मनाचे व्हा. तसे वागणे हेच व्रत आहे.
अध्वर्यू व उपासक –तपन्तं न निन्देत्, तद् व्रतम् । (छांदोग्य २.१४.२)
अध्वर्यू – कडक उन्हाला नावे ठेवू नका. ते सहन करणे हेच व्रत आहे.
अध्वर्यू व उपासक – वर्षन्तं न निन्देत्, तद् व्रतम् । (छांदोग्य २.१५.२)
अध्वर्यू – पाऊस कितीही आणि कधीही पडला तरी त्याला नावे ठेवू नका. त्याचा स्वीकार हेच खरे व्रत आहे.
अध्वर्यू व उपासक – ऋतुं न निन्देत्, तद् व्रतम् । (छांदोग्य २.१६.२)
अध्वर्यू – कोणत्याही ऋतूचा त्रास करून घेऊ नका. हे व्रतच आहे.
अध्वर्यू व उपासक – लोकान् न निन्देत्, तद् व्रतम् । (छांदोग्य २.१७.२)
अध्वर्यू – लोक कसेही वागले तरी नावे ठेवू नका. ते व्रत आहे.
अध्वर्यू व उपासक – पशून् न निन्देत्, तद् व्रतम् । (छांदोग्य २.१८.२)
अध्वर्यू – पाळीव प्राण्यांचा कितीही त्रास झाला तरी त्यांना छळू नका. ते व्रत आहे.
अध्वर्यू व उपासक – सर्वमस्मि इति उपासीत,तद् व्रतम् ।(छांदोग्य २.२१.२)
अध्वर्यू – अवतीभवतीच्या सर्वांशी एकरूप होण्याचा भाव ठेवावा. ते खरे व्रत आहे.
अध्वर्यू – या व्रतांचे पालन करता करता आपण आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांद्वारे अनेक संवेदना ग्रहण करतो. तो आपल्या इंद्रियांचा आहार आहे. इंद्रियांना योग्य आहार दिल्यानेच आपल्या मनातून आपल्या खऱ्या रूपाबद्दलचे सर्व संशय दूर होतात.
अध्वर्यू व उपासक –
आहारशुद्धौ सत्त्वशुद्धिः सत्त्वशुद्धौ ध्रुवास्मृतिः ।
स्मृतिलम्भे सर्व ग्रन्थीनां विप्रमोक्षः ।।
(छांदोग्य ७.२६.२)
अध्वर्यू – आहार शुद्ध असेल म्हणजेच अचूक व योग्य कारणासाठी व योग्य प्रमाणात घेतला असेल तर बुद्धी शुद्ध होते. बुद्धी शुद्ध झाली की आपल्या मूळच्या शिवस्वरूपाची आठवण पक्की राहते. शिवस्वरूपाची आठवण सतत राहिली तर कोणतीच शंका, भीती किंवा वैर शिल्लक राहत नाही. शुद्ध आहार म्हणजेच शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी संयम करण्याची वर जी व्रते सांगितली आहेत त्यांच्या पालनाबरोबर काही कृती आपणहून पुढाकार घेऊन करायची असते.
अशा कृतीला आपल्या परंपरेत तप असे म्हणतात. तीन प्रकारची तपे सांगितली आहेत.
अध्वर्यू व उपासक –
देवद्विजगुरुप्राज्ञ-पूजनं शौचमार्जवम् ।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ।।
गुरु-देवादिकी पूजा, स्वच्छता वीर्य-संग्रह ।
अहिंसा ऋजुता अंगी, देहाचे तप बोलिले ।।
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाययं तप उच्यते ।।
हितार्थ बोलणे सत्य, प्रेमाने न खुपेलसे ।
स्वाध्याय करणे नित्य, वाणीचे तप बोलिले ।।
मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्, तपो मानसमुच्यते ।।
प्रसन्न-वृत्ति सौम्यत्व आत्म-चिंतन संयम l
भावना राखणे शुद्ध, मनाचे तप बोलिले ।।
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।
अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ।। (गीता १७.१४ ते १७.१७)
तिहेरी तप ते सारे, श्रद्धा उत्कट जोडुनी l
समत्वे फळ सोडूनी, घडले जाण सात्त्विक ।। (गीताई १७.१४ ते १७.१७)
अध्वर्यू – शरीराचे, वाणीचे आणि मनाचे असे तीन प्रकारचे तप करत सुट्टीपुरते थोडाकाळ खंडित केलेले अध्ययन पुन्हा सुरू करताना आता पुढील प्रार्थना आपण गद्यामध्ये करूया.
अध्वर्यू व उपासक –
राष्ट्रार्थ भव्य कृति काही पराक्रमाची।
ईर्ष्या निजांतरी धरूनि करावयाची ।।
खरोखर राष्ट्रहितार्थ
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी
अशी तीव्र तळमळ मनात धरुन
आम्ही एकत्र जमत आहोत.
हे परमात्मन्,
तू याचा साक्षी हो!
जेथे आम्ही पदार्पण करू
तेथे मौलिक नि मूलगामी कार्य
आमच्या हातून घडेल,
असे होऊ दे.
आमचा देश जागृत व्हावा;
कर्तृत्वाने, पौरुषाने चमकावा;
विद्या आणि शास्त्रे यांत पारंगत व्हावा.
हे चैतन्यसागरा !
तुझे स्फुरण आमच्या देशात भरून राहिलेले असावे,
हीच अंतरीची तळमळ आहे.
परमात्मन्,
आपणांस स्मरून
आम्ही संकल्प करतो.
उपासना, स्वाध्याय-प्रवचन आणि सद्गुरुसेवा
यांचा आम्ही सदैव अवलंब करू.
शरीर सुंदर, सतेज करू.
विवेके, विचारे, देशकारणे
व्यक्तिमत्त्व पुनीत करू.
परमेश्वरी शक्तीचे अवतरण
सर्व मानव समाजात होण्यासाठी
आम्ही आमच्या विद्येचा उपयोग करू.
अध्वर्यू – आता गायत्री मंत्र म्हणून उपासनेची सांगता करू या.
(यानंतर चिंतनाच्या आधीचे तीन ओंकार पाठोपाठ घ्यावेत. सर्व सदस्यांना गायत्री मंत्राची उपासना येत असल्यास चिंतनाच्या नंतरचे ओंकार आणि उपासना सर्वांनी एकत्रच म्हणावी. अन्यथा तो भागही पाठोपाठच घ्यावा.)
अध्वर्यू आणि सर्व उपासक –
ॐl ॐl ॐl
(२ मिनिटे चिंतन)
ॐl ॐl ॐl
ॐ भूः । हे पृथ्वी
ॐ भुवः । हे अंतरिक्ष
ॐ स्वः । हे सूर्य
ॐ महः । हे कोटिसूर्य
ॐ जनः । हे आकाशगंगा
ॐ तपः । अनंत आकाशगंगा
ॐ सत्यम् । हे परब्रह्म
ॐ तत्सवितुर्वरेण्यम् l
भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ।।
या परब्रह्माच्या, देवाच्या
श्रेष्ठ तेजाचे ध्यान करितो.
अमुच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो.
(तैत्तिरीय आरण्यक प्रपा.१०, अनु.२७)
अध्वर्यू आणि सर्व उपासक –
ॐ तत् सत् ।
ॐ तत् सत् ।
ॐ तत् सत् ।
नमस्ते १. २. ३