प्रस्तावना
आपण बलसंवर्धन आणि ज्ञानविज्ञानाची साधना करण्याचे व्रत आठवीमध्ये असतानाच घेतले असेल अथवा तसा केवळ विचार केला असेल. इतक्या वर्षात कधी आपण व्रताचे काटेकोर पालन केले असेल, तर प्रसंगी विचाराचे आचरणात रूपान्तर झाले नसेल, व्रत पालनात खंडही पडला असेल. आपल्याला ब्रह्मचर्यव्रताचा अंगीकार करून जे जे साधावयाचे होते त्या पैकी कोणकोणत्या गोष्टी साध्य झाल्या व कोणकोणत्या साध्य व्हायला हव्या आहेत त्यांचा आढावा घेऊया. जीवनभर ज्यांची आपल्याला नितांत आवश्यकता असेल अशा बुद्धी, शक्ती आणि संपदा या त्रिविध सामर्थ्याची उपासना आपण करणे आवश्यक दिसते, म्हणून आज आपण नव्याने निश्चय करून व्रतपालनाचे कंकण धारण करूया.
युवावस्थेत स्वहितकारक गोष्टी कोणत्या असतात व क्षणकाल आकर्षित करून सुख देणाऱ्या, पण परिणामी अहितकारक गोष्टी कोणत्या, याचे ज्ञान होत असते. अशा वेळी मनाची धाव सुखाकडे तर बुद्धीची स्वहिताकडे असते. अशा वेळी बुद्धीचे ऐकणे हे आपल्या हिताचे असते, म्हणून निर्धारपूर्वक आरोग्यास उपकारक अशा नियम बंधनांचा आपण स्वीकार करूया. मनमोहकाचा त्याग करून प्रदीर्घकाळपर्यंत निरामयतेचा अलंकार धारण करू, तर एका प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अनुभव तुमच्याकडे पाहणाऱ्याला अवश्य येईल, आणि मग शंभर वर्षेपर्यंत नित्य आनंदाचा ठेवा आपल्याजवळ असेल !
य. शं. लेले
वर्षान्तदिन उपासना
(विद्याव्रत संस्कारानंतर औपचारिक शिक्षण चालू असेपर्यंत)
सूत्रचालक : हरिः ॐ
उपासक : हरिः ॐ
सूत्रचालक : ॐ
उपासक : ॐ
सूत्रचालक : ॐ
उपासक : ॐ
सूत्रचालक : आज वर्षान्त समारंभ आहे. वर्षान्त म्हणजे वर्षारंभाला केलेल्या संकल्पांचा आढावा घेण्याचा दिवस. उपासनेला प्रारंभ करताना जी परब्रह्मशक्ती सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टीमध्ये आहे तिला नमस्कार करूया.
सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
शक्तिरूपेण संस्थिता । लक्ष्मीरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.२०,५.३२.५.५६)
चितिरूपेण या कृत्स्नम् एतद् व्याप्य स्थिता जगत् ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। (दुर्गा सप्तशती ५.७८)
सूत्रचालक: – जी देवी भूतमात्रांत बुद्धी, शक्ती व लक्ष्मीरूपाने राहते तसेच जी दिव्य चेतना सर्व विश्वाला व्यापून राहिलेली आहे, तिला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.
वर्षभर आपण आपले शिक्षक, मार्गदर्शक आणि गुरूंच्या जवळ शिकत असतो. शैक्षणिक वर्ष संपल्यावर नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत आपण आपल्या कल्पनेप्रमाणे व योजनेप्रमाणे अनेक गोष्टी करू शकतो. गतवर्षी केलेल्या संकल्पांचा आढावा घेत असताना स्वतःमध्ये म्हणजेच आपले विचार, वागणे आणि बोलणे यांच्यामध्ये आणखी काय सुधारणा करायला हव्यात याचाही विचार यानिमित्ताने करायला हवा. यापुढील काळात कोणत्या गोष्टी करायच्या हे ठरवताना कठोपनिषदामध्ये यमाने नचिकेत्याला सांगितलेली सूचना अतिशय उपयुक्त आहे.
सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :
श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः, तौ संपरीत्य विविनक्ति धीरः ।
श्रेयो हि धीरोऽभिप्रेयसो वृणीते, प्रेयो मन्दो योगक्षेमौ वृणीते ।। (कठोपनिषद १.२.२)
सूत्रचालक : जे आपल्या, समाजाच्या व देशाच्या हिताचे आहे, त्याला ‘श्रेय’ म्हणतात. जे आपल्याला आवडते त्याला ‘प्रेय’ म्हणतात. बऱ्याच वेळा आवडणाऱ्या गोष्टी तात्पुरत्या आनंद देणाऱ्या असल्या तरी कायमच्या हिताच्या असतातच असे नाही. दोन्हीमधून निवड करण्याचे प्रसंग अनेक वेळा येतात. जो माणूस ‘धीर’ म्हणजे बुद्धिमान असतो, तो श्रेय आणि प्रेय यांच्यातले नेमके ओळखू शकतो. आणि तो नेहमीच प्रेयापेक्षा जे श्रेयस्कर आहे त्याची निवड करतो. कमी बुद्धीचा माणूस मात्र हिताच्या गोष्टींपेक्षा आवडणाऱ्या गोष्टी मिळवणे आणि सांभाळणे याच्या मागे लागतो.
आपल्या भोवतीचे विश्व जाणून घेण्याचा प्रयत्न करत आपल्याला मिळालेले आयुष्य आनंदाने, आरोग्यपूर्ण आणि सामर्थ्यपूर्ण रितीने जगणे हेच मानवी जीवनातील श्रेय आहे. मानवी आयुष्य शंभर वर्षांचे असते अशी आपल्याकडची पूर्वीपासूनची कल्पना आहे. ही शंभर वर्षे कशी जगावीत ही आकांक्षा तैत्तिरीय आरण्यकात व्यक्त केली आहे.
सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :
जीवेम शरदः शतम् ।
नंदाम शरदः शतम् ।
प्रब्रवाम शरदः शतम् ।
संजीवस्याम शरदः शतम् ।
अदीनाः स्याम शरदः शतम् ।। (तै. आ. ४.४२.५)
सूत्रचालक : आम्ही शंभर वर्षे जगू, आम्ही शंभर वर्षे आनंदू, शंभर वर्षे विद्योपासना करू, आम्ही शंभर वर्षे अमृतपान करू, शंभर वर्षे सामर्थ्यपूर्ण राहू. अमृतपान करत सामर्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी दोन प्रकारचे ज्ञान उपयोगात आणावे लागते. त्यासंबंधी ईशावास्य उपनिषदात सांगितले आहे,
सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :
विद्यां च अविद्यां च, यस्तद् वेद उभयं सह ।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा, विद्ययाऽमृतमश्नुते ।। (ईशावास्य उपनिषद- ११)
सूत्रचालक: – विद्या म्हणजे अध्यात्मज्ञान आणि अविद्या म्हणजे भौतिकज्ञान. या दोन्हीच्या साहाय्याने जो ‘ते’ म्हणजे परब्रह्म जाणतो, तो भौतिकज्ञानाच्या साहाय्याने सृष्टीतील सर्व भौतिक शक्तींचा उपयोग करून घेऊ शकतो आणि अध्यात्मज्ञानाने आपल्या आत्म्याच्या अमरत्वाची जाणीव सतत ठेवतो. दोन्ही प्रकारच्या ज्ञानाचा उपयोग करून जगणे हे श्रेयस्कर असले, तरी बऱ्याच वेळा ते ज्ञान मिळविण्यासाठी आधी कष्ट सोसावे लागतात. नंतरच ज्ञान आणि शक्तियुक्त जीवनाचा आनंद मिळू शकतो. याविषयी समर्थ रामदासांनी लिहिलेल्या दोन ओव्या आपण म्हणूया.
सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :
कष्टेविण फळ नाही। कष्टेविण राज्य नाही।
केल्याविण होत नाही। साध्य जनी ।। (दासबोध दशक १८.७.३)
आधी कष्टाचे दुःख सोशिती। ते सुखाचे फळ भोगिती।
आधी आळसे सुखावती । त्यांसी पुढे दुःख ।। (दासबोध दशक १८.७.५)
सूत्रचालक : श्रेय आणि प्रेय याची निवड करताना आपल्या बुद्धीला आपले मनच अडवत असते. मनामुळे मनुष्य अडकला जातो, मनामुळेच मनुष्य सोडवला जातो. सारे सुख आणि समाधान मनात साठवलेले असते. मनच आपले गुरू असते. मनच शिष्यही असते. मनच माणसाचे चाकर असते. तेव्हा मन प्रसन्न असेल तरच माणसाची प्रगती होते. मन प्रसन्न नसेल तर अधोगती होते.
सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :
प्रसन्नतेपुढे सर्व दुःखे जाती झडूनिया ।
प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे ।। (गीताई अध्याय २.६५)
सूत्रचालक : गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी व गीतेच्या अनुवादात श्री विनोबांनी सांगितले, त्याप्रमाणेच प्रसन्न मनाचे महत्त्व तुकाराम महाराजांनी देखील आपल्या एका अभंगात सांगितले आहे. मन प्रसन्न ठेवायला सांगणारा अभंग आता आपण म्हणूया.
सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण।
मोक्ष अथवा बंधन। सुख समाधान इच्छा ते ।।१।।
मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली।
मने इच्छा पुरविली। मन माऊली सकळांची ।।२।।
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलेचि दास्य ।
प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ।। ३ ।।
साधक, वाचक, पंडित। श्रोते, वक्ते ऐका मात ।
नाही नाही आन दैवत । तुका म्हणे दुसरे ते ।।४।। (तुकारामगाथा २९१)
सूत्रचालक: मन प्रसन्न असेल तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास सुलभ होतो. आणि अशा प्रसन्न मनाने आपण इतरांच्या आकाक्षांशी जुळवून घेऊन आपल्या राष्ट्राचा विकासही साधायचा असतो. वर्षारंभाला आपण बुद्धी शुद्ध होण्यासाठी काही व्रते व तीन प्रकारच्या तपांचा संकल्प केला होता. त्याशिवाय काही व्यक्तिगत संकल्पही केले होते. असे संकल्प पूर्ण करूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. अशा विकसित व्यक्तिमत्त्वाच्या अनेक व्यक्ती राष्ट्राचा विकासही घडवत असतात. राष्ट्राच्या विकासासाठी आता शतपथ ब्राह्मणातील प्रार्थना म्हणूया.
सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :
श्रीः वै राष्ट्रम् ।
श्रीः वै राष्ट्रस्य भारः ।
श्रीः वै राष्ट्रस्य मध्यम् ।
क्षेमो वै राष्ट्रस्य शीतम् ।। (शतपथ, १३-२-९, : २,३,४,५)
सूत्रचालक : श्री म्हणजे विद्या, संपत्ती आणि नीती यांनी युक्त तेच राष्ट्र होय. विद्या-संपत्ती-नीती हाच राष्ट्राचा संभार अथवा व्याप होय. विद्या संपत्ती-नीती हाच राष्ट्राचा गाभा होय. या सर्वांचे रक्षण करणे हेच राष्ट्राचे शीतल अथवा सुख होय. असे हे आपले राष्ट्र उभे करणे, स्वतःमधील आणि राष्ट्रामधील, अंती सर्व मानव्यातील आत्मतत्त्व ओळखणे, ते प्रकट करणे यातच सर्व ज्ञानाची परिसमाप्ती आहे. कोणत्याही राष्ट्राच्या विकासामध्ये संघटित समाजजीवनाला मोठे स्थान असते. आपल्या हातून अशी संघटना घडावी यासाठी पुढील गद्यातील प्रार्थना म्हणूयात.
गद्य प्रार्थना
सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :
राष्ट्रार्थ भव्य कृति काहि पराक्रमाची।
ईर्ष्या निजांतरि धरूनि करावयाची ।।
खरोखर राष्ट्रहितार्थ
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी
अशी तीव्र तळमळ मनात धरून
आम्ही एकत्र जमत आहोत.
हे परमात्मन्,
तू याचा साक्षी हो.
जेथे आम्ही पदार्पण करू,
तेथे मौलिक नि मूलगामी कार्य
आमच्या हातून घडेल,
असे होऊ दे.
कार्ये केवळ सदिच्छेने सिद्धीस जात नाहीत,
त्यासाठी संघटना करावी लागते.
वेदांनी हेच सांगितले,
‘समानी व आकृतिः,
समाना हृदयानि वः ।’ (ऋ. १०.१९१.४)
आपणा सर्वांचा आशय एक असो,
आपणा सर्वांची हृदये अभिन्न असोत.
श्री शिवछत्रपतींनी तेच सांगितले.
“दोन हृदये एकत्र येतील
तर संकटांच्या पहाडांच्या
ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील”.
मग अशा एकत्रित हृदयांची संघटना
आमच्या हातून घडो.
आमची मने
संघटनेला आवश्यक अशी,
लवचिक आणि जुळवून घेणारी,
परस्परांना प्रेमाने बांधणारी,
आणि कोणत्याही कारणासाठी
परस्परांपासून न तुटणारी
अशी होवोत.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात
आम्ही संघटना घडवू.
आमचा देश जागृत व्हावा,
कर्तृत्वाने, पौरुषाने चमकावा,
विद्या आणि शास्त्रे यात पारंगत व्हावा.
परमेश्वरी शक्तीचे अवतरण
सर्व मानव समाजात होण्यासाठी
आम्ही आमच्या विद्येचा उपयोग करू.
हे चैतन्यसागरा !
तुझे स्फुरण आमच्या देशात भरून राहिलेले असावे.
हीच अंतरीची तळमळ आहे.
हे परमेश्वरा! हे सर्व घडू दे।
तुझे मंगल आशीर्वाद
आम्हास नित्य लाभू देत !
आमचा कण न् कण आणि क्षण न् क्षण
तुझ्याच इच्छेने सार्थकी लागू दे!
सूत्रचालक : यापुढील काळात आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी संघटना व व्यक्तिमत्त्वाचा विकास एकत्र चालत राहो यासाठी सर्वजण प्रयत्न करूयात. आमचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी लागेल तेवढे बळ आम्हाला मिळो. यापुढे काही काळ औपचारिक शिक्षणात खंड पडणार आहे, तथापि अनुभवशिक्षण निरंतर चालू राहायला हवे याची जाणीव आपल्याला असू दे. आता गायत्री मंत्र म्हणून उपासनेची सांगता करूया.
सूत्रचालक व उपासक एकत्र :
हरि: ॐ ॐ ॐ
(दोन मिनिटे चिंतन)
ॐ ॐ ॐ
ॐ भूः । हे पृथ्वी
ॐ भुवः । हे अंतरिक्ष
ॐ स्वः । हे सूर्य
ॐ महः । हे कोटिसूर्य
ॐ जनः । हे आकाशगंगा
ॐ तपः । अनंत आकाशगंगा
ॐ सत्यम् । हे परब्रह्म
ॐ तत्सवितुर्वरेण्यम्
भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ।।
या परब्रह्माच्या, देवाच्या,
श्रेष्ठ तेजाचे ध्यान करितो.
अमुच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो. (ऋ. ३.६२.१०)
सूत्रचालक व पाठोपाठ उपासक :
ॐ तत् सत् ।
ॐ तत् सत् ।
ॐ तत् सत् ।
नमस्ते – १, २, ३.