मा. श्री. यशवंतराव लेले
मा. यशवंतराव लेले यांनी २२ जानेवारी २०१३ रोजी लिहिलेला ‘उद्योजकता’ संबंधी लेख. उद्योग, व्यवसाय करणे महत्त्वाचे आहेच, पण ते कोणत्या तत्त्वाने करावे ते त्यांनी या लेखात सांगितले.
संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज हे वाणसौद्याचा व्यवहार करीत असत. पण त्यांचे व्रत होते सचोटीचा धंदा करण्याचे! त्यामुळे धनसंग्रह करतानाही त्यांची दृष्टी कशी होती, तर ते सांगतात, “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे! उदास विचारे वेच करी!”
चरितार्थ चालविण्यासाठी सचोटीने म्हणजे, प्रामाणिकपणे चार पैसे मिळवावेत; आणि खर्च करताना केवळ स्वार्थी दृष्टीने सारे धन आपल्या कुटुंबासाठीच खर्च करण्याचा आग्रह न ठेवता उदारपणे, शेजारी पाजारी, उपाशी-तापाशी, अतिथी अभ्यागत इ. सर्वांची दखल घेऊन आणि गोग्रास, काकबली इ. जीवजगताच्या मुखी चार घास घालण्यातील आनंद उपभोगून मग कुटुंबासह जेवावे, असे ते सांगतात. या पद्धतीचे वर्णन करताना ‘उदास विचारे वेच करी’ असे शब्द ते वापरतात. येथे ‘उदास विचारे’ याचा अर्थ ‘खिन्नपणे’ असा नाही, तर उदारपणे, स्वकर्तव्यपूर्तीचा आनंद घेत घेत व्यय करावा, असा आहे.
अभंगात शेवटी तुकोबांनी म्हटले आहे, “तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ। परम पदबळ वैराग्याचे॥”
ऋषिऋण, पितृऋण, भूतऋण अशी ऋणे फेडणे यासाठी दुसरा आश्रम आपल्या संस्कृतीत राखून ठेवलेला आहे. भूतऋण म्हणजे भूतमात्रांचे आपल्या जीवनात जे स्थान असते, त्यांचे आपल्या जीवनात जे योगदान असते, त्यातून उतराई होण्यासाठी चिऊ काऊंना घास भरविणे, मुग्यांना साखर घालणे, गाईला गोग्रास देणे, कावळ्याला भाताचा घास देणे हे सारे चालत असे. हे सारे आजच्या पर्यावरणशास्त्रात सहजपणे बसणारे नाही का?
आजकाल समजूत अशी झाली आहे की, खोटेपणा केल्याविना व्यापार चालणारच नाही. भ्रष्टाचार केल्यावाचून उद्योगात लाभ होणारच नाही. लाच दिल्याविना यश हाती येणारच नाही. आपल्या अवती-भोवती चालणारे गैरव्यवहार पाहणाऱ्या व स्वतः अनुभव घेणाऱ्या व्यक्तीस असे वाटले तर त्यास दोष तरी कसा देता येईल?
वृत्तपत्रांमधून लक्षावधी कोटी रुपयांचे गैरव्यवहार कसे चालले आहेत व त्यात समाजातील साऱ्या स्तरातील माणसे कशी गुंतलेली आढळतात इ. वाचून आपण हताश होतो. ‘हे असेच चालणार’, हा सारा समाजच भ्रष्ट झाला आहे असे वाटू लागते. या पद्धतीने २०२० मध्ये हा देश एक समर्थ देश कसा होणार? असे प्रश्नचिन्ह अनेकांच्या समोर स्वाभाविकपणे उभे राहते.
रोज एकापेक्षा एक अवाढव्य भ्रष्टाचारांचे वृत्त ऐकून वाचून उद्विग्न होणाऱ्या ‘मना सज्जनास’ मग वाटू लागते “हा सारा समाज सडला आहे. भ्रष्टाचाराच्या घाणीत बुडत चालला आहे. स्वच्छ, निर्मळ, भेसळमुक्त असे काही म्हणजे, काही बाकी नाही! मग आपण तरी कसे यातून वाचणार ‘सारे जीवनच प्रदूषित झाले आहे’.
अशा नैराश्याच्या गर्तेत जाऊ पाहणाऱ्या मनास थोपवणारे प्रकाश आमटे आणि त्यांचे सारे कुटुंबीय चार पिढ्यांपासून प्रकाश वाटा दाखवत आले आहेत! बंग दांपत्य अभय देण्यास विद्यमान आहे, साऱ्या गैरव्यवहाराविरुद्ध उभे राहिलेले वंदनीय अण्णा हजारे एखादी लढाई हरल्यासारखे भासले तरी आपणच अखेर युद्ध जिंकणार आहोत अशा आत्मविश्वासाने उभे राहूया. यावर ‘आम्ही आपली सामान्य माणसे, आम्ही काय करणार?’ असा न्यूनगंड मनी आल्यास सिंधूताई सपकाळ यांची कथा डोळ्यापुढे आणा. एक परित्यक्ता बाई अनेकानेक अनाथ मुलामुलींची आई बनू शकते. त्यांना आधार देऊ शकते तर आपण कशाला नैराश्यग्रस्त व्हावे?
त्यावर आपण म्हणाल, “ते खरं आहे. पण मोठमोठे उद्योग उभे करून भारताचे वैभव वाढवण्याचे काम केल्याविना भारत हे समर्थ राष्ट्र कसे होणार?” प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष उदाहरणानेच मिळाले तर? त्यासाठी वेळुग्रामी जाऊया. बेळगावच्या परिसरात उद्योग क्षेत्रात आपल्याला उद्योगातून सचोटीने वैभव उत्पन्न करणारा सुरेश हा यासाठी उत्तम मार्गदर्शक होऊ शकेल. औद्योगिक वसाहतीत चार ठिकाणी विखुरलेला पॉली हायड्रॉनचा उद्योग सुरेशजी हुंडरे चालवतात. नाव आहे ‘बिझिनेस आश्रम’, जरा जगावेगळं नाव! कारण खरोखरी काही जगावेगळंच येथे घडतं आहे. येथे आधुनिकातील आधुनिक असे उत्पादन होत आहे व ते चीनला निर्यात करून देशाला भरपूर परदेशी चलन मिळते आहे.
सुरेश हुंडरे यांनी धननिर्मितीसाठी उद्यमशीलता स्वीकारली आहे. ते सांगतात, “येथे एक रूपयाचेही कर्ज आम्ही घेत नाही. आमच्याकडे कुणाला एक रुपयाही लाच मिळणार नाही. आम्हीही तशी लाच देणार नाही. आम्ही आमचे काम लवकर व्हावे, नियम मोडून व्हावे, आम्हाला कर सवलत मिळावी इ. साठी म्हणून लाच देत नाही. आम्ही ७५ माणसे ८ तास काम करतो, अधिक नाही आठच तास! आम्हा कुणालाही शारीरिक वा मानसिक ताण नाही. आठ तासानंतर आपापले छंद जोपासण्यास आम्हाला आवडते. आम्ही सारेच व्यक्तिशः उत्पन्नातील १% भाग सामाजिक दायित्व पार पाडण्यासाठी आनंदाने देतो. आमच्या उद्योगाच्या लाभातील १% वाटाही सामाजिक दायित्व म्हणून क्रीडा क्षेत्रासाठी नियमितपणे देण्यात येतो, वर्षास २० लक्ष रूपयांचे हे योगदान किमान असतेच. चीन सारख्या देशांना आम्ही निर्यात करून देशाला विदेशी चलन उपलब्ध करून देतो. आम्ही सारे शासकीय, निमशासकीय नियम काटेकोरपणे पाळतो. पण शासकीय नियमाप्रमाणे २०% बोनस आम्ही देत नाही. आम्ही १००% बोनस देतो, तोही प्रति तीन महिन्यांनी!
महात्माजींची विश्वस्त कल्पना जपान प्रमाणे, आम्ही आमच्या दृष्टीने योग्य अशा बदलांसह स्वीकारली आहे. आमच्या उद्योगात कामगार संघटना नाही. कारण साऱ्या समस्या आमच्या आम्ही सोडवत असतो. प्रतिमिनिट हजार रुपये अशा दराने सरकारला आम्ही कर देत असतो. पर्यवेक्षकीय अधिकारी आमच्याकडे नाही, गुणवत्ता चाचणी विभाग आमच्याकडे नाही. आम्ही प्रत्येकजण आपापले काम उत्कृष्ट करत असतो. आमच्यातील प्रत्येक जण ३५ लक्ष रुपयांची सरासरी उलाढाल करतो. कार्यालयीन कामासाठी २०% मनुष्यबळ आहे.
आमचे येथे शांत असे ध्यान मंदिर असून तेथे जाऊन मनःशांती मिळवण्याचे स्वातंत्र्य सर्वांना आहे. ध्यान मंदिरात स्वामी विवेकानंदांचे तैलचित्र असून स्वामींचे ग्रंथही तेथे उपलब्ध आहेत. यामुळेच तर आमचा उद्योग म्हणजे एक उद्योग आश्रम आहे! हे आपल्याला खरे वाटणार नाही. यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर आमच्या संकेतस्थळावर या व विचारा हवे ते – www.polyhydron.com”
एका उद्योगातील लोकांना जमते ते अन्य उद्योगात का जमू नये? एका उद्योगात जे जमते ते व्यापारात का जमणार नाही? अवघड असते ते, अशक्य थोडेच असते! आपण सारे संकल्प करू, तदनुरूप वागू तर देश सदाचार संपन्नतेकडे वाटचाल करेल.
सदाचार संपन्नता म्हणजेच तर धार्मिकता! अशी आचार शुद्धी असेल तर त्यामागे चित्तशुद्धीही असावे लागते, चित्तशुद्धी असेल तर स्वतःच्या सुखाप्रमाणे दुसऱ्याचे सुखही महत्त्वाचे असते हे समजते. स्वतःला दुःख होऊ नये त्याप्रमाणे दुसऱ्याली ही दुःख देऊ नये हे सहज समजू लागते, याला म्हणतात ‘आत्मौपम्य!’ अध्यात्मातील हा अवघड शब्द रामदासांनी खूप सोपा करून सांगितला आहे. ते म्हणतात, ‘आपणास चिमोटा घेतला। तेणे जीव कासावीस झाला। आपणावरून इतरांना। ओळखीत जावे।’ – आपल्याला चिमटा घेतल्याने कसं दुःख झालं! तसंच दुसऱ्यालाही होणार म्हणून आपण दुसऱ्याला चिमटा घेऊ नये, त्याला दुःख होईल असे काही करू नये. सर्वांचा जीव सुखासाठी धडपडतो व दुःख कोणालाच नको असते, ते तर मोठे मोठे ग्रंथ न वाचताही समजते ना? मग अध्यात्मासाठीही ग्रंथ वाचत बसले पाहिजेत असे नाही, व्यापार उद्योग करतानाच कुणी ‘कांदामुळा भाजी। अवघी विठाबाई माझी’ असे म्हणतो. सेना न्हावी, सजन कसाई, गोरा कुंभार, कबीर, नामदेव हे सारे संतकवी आपापले उद्योग देव कार्य समजून भक्तिपूर्वक करत होते. त्यामुळे तो तो उद्योग सचोटीने होत होता व समाजालाही त्यायोगे चांगले वळण लागत होते. आजही माणसांना सात्त्विक समाधान म्हणजे काय, तर ते निरपेक्षपणे दुसऱ्यासाठी काही करण्याने अनुभवता येतेच. अनेकांना नोकरी देणाऱ्या उद्योगांमधेही साऱ्यांना कुटुंबीय सदस्यांप्रमाणे वागवून काम करवून घेणारे उद्योजक आहेत. त्यांचे हे काम त्यांना स्वतःप्रमाणेच सर्वांना सुखदायक ठरत असते. यालाच सचोटीचा उद्योग म्हणतात. स्वामी विवेकानंद म्हणत ‘शिवभावे जीवसेवा करा’. ‘आपल्या बरोबर काम करणारी माणसे म्हणजे नोकर व मी त्यांचा पोशिंदा ह्या दृष्टीने काम करून घेण्यापेक्षा हे सारे माझे आत्मीय आहेत. आम्ही सारे मिळून देशाच्या संपदेमध्ये भर टाकण्याचे पवित्र काम करत आहोत.’ अशी भावना ठेऊन काम होऊ लागले की समजावे हे वेगळे काम आहे. वरच्या पातळी वरील हे काम आहे. अध्यात्मदृष्टीने चाललेले काम असेच असते!
अजिंठ्याची व वेरूळची विस्मयकारक कला अथवा बृहदीश्वराच्या प्रचंड मंदिराची अप्रतिम, सुंदर निर्मिती पहा! या निर्मितीसाठी कोणी ‘कामगार राबले’ असे म्हणत नाही, ते सारे कलावंत भक्त होते व त्यांनी आपली कलारूपी सेवा ईश्वरचरणी समर्पित केली असून स्वतःचे नावही मागे ठेवलेले नाही. खरोखरी निरपेक्ष सेवा ती ही! प्रत्येक उद्योगात ही भावना उत्पन्न करता आली तर त्यात गुणवत्ता येणारच, अलौकिक सौंदर्याने तेथील उत्पादने सर्वजन प्रिय होणारच, हीच तर उद्योगविश्वातील आध्यात्मिकता!